सहवासाच्या चांदण्यात .. या नावातच एक शीतलता आणि मांगलिक भाव जाणवतो. शब्दप्रभू राम शेवाळकर यांचे विविध पैलू उलगणारी विजयाताई शेवाळकर यांच्या मुलाखतीचे हे शब्दांकन आहे आणि मुलाखतकार रेखा चवरे जैन यांनी विजयाताईंना छान शब्दबद्ध केले आहे. ८० पानी असलेल्या पुस्तकात या सहजीवनाचा पट सुरेख शब्दांत वाचायला मिळतो. पुस्तक हाती घेतले की एका बैठकीत वाचूनच ते अलगद बाजूला जाते आणि मनोमन यांच्याबद्दलच्या आत्मियतेचा सुगंध अनेक दिवस दरवळतो.
काल २ मे विजयाताईंचा स्मृतिदिन आणि आज ३ मे नानासाहेबांचा स्मृतिदिन. नियतीचे संकेतही विलक्षण असतात फक्त एका दिवसाच्या फरकाने या दांपत्याने देहाची खोळ सोडली. पण त्यांच्या आठवणीत कालची संध्याकाळ खऱ्या अर्थाने शुभंकर संध्याकाळ होती. त्या आठवणीत रमल्यावर अशी छोटेखानी पुस्तकं सुद्धा सुखद क्षण प्रदान करतात.
विद्यावाचस्पती' 'वक्ता दशसहस्त्रेषु' डॉ. राम शेवाळकर हे अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि अनेकांना आपलंसं करणारे, कित्येकांना आपले सर्वांच्या आदराला पात्र ठरलेले जन्मभर माणूसपण जपणारे होते. जनसामान्यांमध्ये वावरतांना नानासाहेबांनी - राम शेवाळकरांनी नेहमीच स्वतःच्या भव्य उत्तुंगतेला दूर ठेवलं आणि लोकांमध्ये अगदी साधेपणाने वावरले. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला आपलंसं केलं. अशी त्यांनी अनेक माणसं जोडली.
मराठी साहित्य क्षेत्रात नानासाहेबांचं भरीव योगदान तर सर्वांना ज्ञातच आहे. पण वक्ता दशसहस्त्रेषु म्हणून राम शेवाळकर यांचा नावलौकिक अधिक गाजला. त्यांची तळपती तेजस्वी वाणी विविध विषयांना भिडून जन सामान्यांच्या हृदयात हळुवारपणे शिरली. व्याख्यानांच्या समयी तळपणारी त्यांची तेजस्वी वाणी एरवी लोकांशी बोलताना किती मृदू होत असे आणि त्यांच्या वाणीमध्ये दिसणाऱ्या या दोन आविष्कारांचं नेहमी नवल वाटते पण अशी आश्चर्ये थोर माणसांमध्ये दिसत असतात म्हणूनच ती थोर असतात. संपर्कात आलेल्या प्रत्येकाशी ते इतक्या आपुलकीने बोलत, प्रत्येकाच्या सुखदुःखाची चर्चा करीत, त्यांच्या मताला किंमत देत आणि समोरच्या माणसाला जिंकून घेत. त्यांनी अशी गावंच्या गावं काबीज केली. ते ज्या गावाला जात, ते गाव त्यांचंच होऊन जाई आणि गाववाले पण त्यांना आपलं मानीत. अशा कित्येक गावातल्या अनेक माणसांना नानासाहेब आपले वाटत म्हणूनच त्यांच्या मृत्यूनतर आपण पोरकं झालो अशी उभ्या महाराष्ट्राची भावना झाली.
आदरणीय शब्दप्रभूंचे शब्द म्हणजे मराठी भाषेतील अनमोल ठेवा मग ते शब्द त्यांच्या वाणीतून निघालेले असोत वा लेखणीतून उतरलेले असोत. ते सर्वांना हवेहवेसे व महत्त्वाचे वाटत. म्हणूनच मा. मनोहर जोशींसारख्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांच्या वन्-बी पुस्तकासाठी नानासाहेबांची प्रस्तावना घेणं किती महत्त्वाचं वाटलं असेल. तत्त्वदच सुरांचं दैवी वरदान प्राप्त झालेल्या आणि संगीत-विश्वात मानदंड ठरलेल्या मंगेशकरांना त्यांच्या गाण्यासाठी नानासाहेबांच्या रसाळ निरुपणाची जोड हवीहवीशी वाटे. त्यातूनच ज्ञानेश्वरांच्या अभंग रचनांचा 'अमृताचा घनु', या आध्यात्मिक उंची गाठलेल्या कार्यक्रमाची निर्मिती झाली. "जेथे सुरांचं साम्राज्य संपते तेथे नानासाहेबांच्या शब्दांचं साम्राज्य सुरू होते" अशा शब्दात पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी नानासाहेबांच्या शब्द साम्राज्याच्या थोरवीचं वर्णन केलं आहे.
नानासाहेबांचा चाहतावर्ग अवाढव्य अगदी सामान्य माणसापासून तर राजकीय नेते. कलावंत, गायक साहित्यिक, समाजसुधारक सर्वच प्रकारातील व्यक्ती नानासाहेबांबद्दल नितांत आदर बाळगून होते. नानासाहेबांनी आपल्या विशाल हृदयात सर्वांना उदारपणे सामावून घेतलं, कोणालाही कसल्याही बाबतीत नकार देण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता, ते सतत दुसऱ्यांच्या भल्याचाच विचार करीत, दुसऱ्यांना कसलीही मदत करण्यात ते त्रास मानत नसत आणि काही नावांचं माहात्म्य असं असतं की ते जिथे असतं, त्याला वेगळंच महत्त्व प्राप्त होत असतं. प्रा. राम शेवाळकर हे नाव त्यांपैकीच एक. नानासाहेबांचं नाव जिथे असेल त्या स्थानाला एक वेगळीच उंची प्राप्त होई. मग तो कार्यक्रम असो वा पुस्तक प्रकाशन ! पुस्तकाचं प्रकाशन नानासाहेबांच्या शुभ हस्ते झालं किंवा प्रस्तावनांच्या रूपाने त्यांचा आशीर्वाद मिळाला की लेखकाला धन्य वाटायचं. अनेक लेखकांच्या लेखणीला दाद देऊन नानासाहेबांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आहे. फक्त साहित्य क्षेत्रातल्या नव्हे तर इतरही कलाकारांना नानासाहेबांचं प्रोत्साहन मिळत असे. म्हणूनच माझे पहिले पुस्तक गाभारा-मंदिरांचा समृद्ध वारसा प्रकाशित होण्यापूर्वी त्यांच्या साहित्यिक गाभाऱ्यात काहीकाळ घालवता आले हा ही योग आठवणीत राहणारा आहे.
नानासाहेब आणि विजयाताई हे एकरूप झालेले दाम्पत्य. विजयाताई खऱ्या अर्थाने सहजीवन जगल्या. सखी, पत्नी, मैत्रीण, शिक्षक, मदतनीस, लेखनिक आणि प्रसंगी आईचीही भूमिका पार पाडत नानासाहेबांना शारीरिक, भावनिक, मानसिक आधार देणाऱ्या, नानासाहेबांशी एकरूप होऊन देखील स्वतंत्र अस्तित्व राखणाऱ्या विजयाताई नानासाहेबांबद्दल भरभरून बोलत असत. बहुआयामी अशा नानासाहेबांचे विविध पैलू उलगडून कलावंत म्हणून आणि माणूस म्हणून त्यांचं जे दर्शन विजयाताईंनी घडविलं ते स्तिमित करणारं आहे.
नानासाहेबांसारखी व्यक्ती महानतेला कशी प्राप्त झाली, उंचीवर कशी गेली ही काहीशी प्रक्रियाच विजयाताईंनी उद्धृत केली. त्या म्हणतात, "वयोमानानुसार आठवत नाही, विसरून जाते" विजयाताईच्या या छोट्याशा तक्रारीवर नानासाहेबांचे विविध पैलू उलगडणाऱ्या मुलाखतकारांनी विचारलेल्या प्रश्नांनी स्मरणाच्या गुहेचं दार उघडल्या जाण्याचाच अवकाश की त्यातून मनोरम आणि मौल्यवान खजिना बाहेर येतो. नानासाहेबांचं जीवन म्हणजे अनुभवांचं समृद्ध भांडारच त्यामुळे त्यांच्या आत्मपर लेखनातही अस्पर्शित राहिलेले अज्ञात, हृद्य, भावपूर्ण, अविस्मरणीय, रंजक पण महत्त्वाचे प्रसंग या संवादातून ज्ञात होतात. नानासाहेबांचं असं सूक्ष्म दर्शन विजयाताईंशिवाय अन्य कोण घडवू शकणार आणि ते या पुस्तकात वाचायला मिळते. साहित्यक्षेत्रात आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तीचं तर हे दर्शन आहेच पण सुमारे ७५ वर्षांपूर्वीचा काळ, काळातील स्थिती, सांस्कृतिक वातावरण, कलावंतांमधील उदात्तता, नम्रता, सहृदयता, साधेपणा, कनवाळूपणा, संतुष्ट वृत्ती अशा त्या पण आताच्या काळात अतिशय दुर्मीळ झालेल्या गुणांचं ही हे विलोभनीय दर्शन वाचनीय आहे.
विजया ताई म्हणतात, “कोणालाही हेवा वाटावा एवढ सुख जीवनात ओसंडून वाहिलं. थोरामोठ्यांशी परिचय झाला. काहींशी घनिष्ठ संबंध जोडता आला, त्याच्याजवळ बसता आल, गप्पा मारता आल्या. त्यांचा पाहुणचार करता आला. त्यांच्याशी मनातल बोलता आल. पण विशेष आनंद याचा आहे की त्यांनीही मला नानासाहेबांइतकंच आपलं मानलं. जेवढं प्रेम नानासाहेबांवर केले, माझ्यावर विश्वास ठेवून आपल्या आंतरिक गोष्टी सांगितल्या. तेवढंच माझ्यावरही केलं. मनातल्या गुजगोष्टी सांगण्याइतपत त्यांनी मला आपलं मानले. हे सगळं सगळं 'राम' मुळेच! नानासाहेबांची अर्धांगिनी होण्याचं भाग्य लाभलं आणि माझं जीवन उजळलं. अगदी सहजीवनाला सुरुवात झाल्यापासून दुधात साखर विरघळावी तशी मी त्यांच्यात विरघळून गेले. त्यांच्या सहवासाने माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण सुगंधी झाला. 'राममय' झाला.
अर्धशतकापेक्षाही अधिक वर्षांचं त्याचे सहजीवन.नानासाहेबांच्या प्रत्येक निर्णयाला त्यांनी साथ दिली,आनंदाने. सहवासाचा नानासाहेबांना किती लाभ झाला हे न कळे पण "तुझ्यामुळेच मी हे करू शकलो” असं ते नेहमी म्हणत. एकमेकांवरच्या गाढ विश्वासाने वाटचाल झाली. एकमेकांना सांभाळत पुढे गेले, येणारा प्रत्येक दिवस एकमेकांच्या भरभक्कम सोबतीने आनंदाने जगले. नव्यानव्या अनुभवांना सामोरे गेले. एकमेकांची संगत सुख वाढवत होती, दुःखाची तीव्रता कमी करत होती. नानासाहेबांचं तेज कधी कधी संक्रमित होत होतं की काय! त्यांच्या सहवासात मी चैतन्याने फुलून जात होते. असंही त्या म्हणतात “ नानासाहेबांच्या आयुष्याची भागीदार, सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणाची साक्षीदार मला होता आलं हे माझं केवढं भाग्य!” असं विजयाताई आवर्जून म्हणतात. ‘समईच्या दिव्यातील तेवणारी वात म्हणजे विजयाताई’ असं काल आशा बगे म्हणाल्या आणि हेच शब्दशः खरे आहे. यांच्याबद्दल वाचल्यावर हेच योग्य वाटते. वाचावे आणि संग्रही असावे असेच पुस्तक म्हणजे सहवासाच्या चांदण्यात….
सर्वेश फडणवीस