जगाच्या तत्वज्ञानाला गवसणी घालणाऱ्या श्रीज्ञानेश्वरीचा प्रारंभ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी गणेशस्तवनाने केला आहे. माउलींनी ज्ञानेश्वरीचा प्रारंभ ज्या गणेशवंदनेने केला आहे ती वंदना वाचत असता माउलींच्या शब्द स्पर्शाचे वेगळेपण सहज मनात भरणारे आहे. देवा तूंचि गणेशु, सकलमति प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु, अवधारिजो जी.. अर्थात ॐ हे गणेशाचे प्रतिक आहे. वरील ओवीत वर्णन केलेले ॐकारस्वरूपी परब्रम्ह म्हणजेच सकलांच्या बुद्धीचा दाता म्हणजे श्रीगणेश आहे. श्रीगणराजांना प्रत्येक पूजेत अग्रपूजेचा मान असल्याने माउली सुद्धा मंगलाचरणात गणपतीस नमस्कार करतात. संत आणि त्यांच्या वाङ्मयात श्री गणेशाच्या मंगलाचरणावर स्वतंत्र लेखन होईल इतक्या प्रासादिक ओव्या आपल्याला दिसतात. माउली लिहितात,
ॐ । नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ।। १।।
देवा तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ।।२ ।।
हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष । जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ।।३।।
स्मृति तेचि अवयव । देखा आंगीक भाव । तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ।।४।।
अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें । पदपद्धति खेवणें । प्रमेयरत्नांचीं ।।५ ।।
पदबंध नागर । तेंचि रंगाथिले अंबर । जेथ साहित्य वाणें सपूर । उजाळाचें ।।६।।
देखा काव्य नाटका । जे निर्धारितां सकौतुका । त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ।।७।।
नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी । दिसती उचित पदें माझारीं । रत्नें भलीं ।।८।।
तेथ व्यासादिकांच्या मतीं । तेचि मेखळा मिरवती । चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ।।९।।
देखा षड्दर्शनें म्हणती । तेची भुजांची आकृति । म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधें हातीं ।।१०।।
तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु । वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ।।११।।
एके हातीं दंतु । जो स्वभावता खंडितु । तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ।।१२।।
मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु । धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ।।१३।।
देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु । जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ।।१४।।
तरी संवादु तोचि दर्शनु । जो समता शुभ्रवर्णु । देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ।।१५।।
मज अवगमलिया दोनी । मिमांसा श्रवणस्थानीं । बोधपदामृत मुनी । अली सेविती ।।१६।।
प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ । सरिसेपणें एकवटत इभ- । मस्तकावरी ।। १७ ।।
उपरि दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदे । तियें कुसुमें मुकुटीं सुगंधें । शोभती भलीं ।।१८।।
अकार चरण युगल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकारें ।।१९।।
हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें । तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें । आदिबीज ।।२०।।
अर्थात सर्व मानवांना "बुद्धीची" विशेष देणगी मिळाली आहे. या बुद्धीचा दाता तो श्रीगणेश असे संबोधून स्वतःला श्रीनिवृत्तीदास म्हणवून माउली गणेशवंदनेस प्रारंभ करीत आहेत. आपल्या नजरेसमोर जे गणेशाचे ध्यान येते तेच माउलींसमोर आहे. फरक एवढाच की माउलींची असामान्य प्रतिभा लक्षात घेता ते एका वेगळ्याच उंचीवरुन त्या गणेशाचे वर्णन करतात. त्यांना त्या मूर्तीत सगळं शब्दब्रह्म साकारलंय असं वाटू लागतं. आपल्याला जी सोंड दिसते तिथे त्यांना निर्मळ विवेक दिसतोय. दोन्ही कानांच्या ठिकाणी दोन मीमांसा दिसत आहेत तर गंडस्थळाच्या ठिकाणी द्वैत-अद्वैत अर्थात असे हे जे विलक्षण दर्शन माउलींना घडले ते मुळातूनच अद्भुत आणि वाचण्यासारखे आहे.
खरंतर हे श्री गणेशाचे रुप म्हणजे केवळ मूर्तिमंत वेद - ज्यात अतिशय निर्दोष असे वर्ण हेच जणू त्याचे शरीर. निरनिराळ्या स्मृति हे त्याचे विविध अवयव. या स्मृतितील अर्थसौंदर्य हे जणु या गणेशाचे शरीर लावण्यच आहे. श्रीगणेशाचे चरण युगुल हे ॐकारातील "अ"कार तर त्याचे विशाल पोट हे "उ"कार आणि मस्तक हे "म"कार. ॐकाराच्या या तीन मात्रा जिथे एकवटल्या आहेत, जिथे हे शब्दब्रह्म साठवले गेले आहे. त्या मूळबीजभूत गणेशास मी श्रीगुरुंच्या कृपेने वंदन करीत आहे हा माउलींचा भाव मनाला स्पर्शून जाणारा आहे.
माउलींनी इथे गणेशाचे वाङ्मयीन रुप दाखवले आहे. त्यात हिंदू तत्वज्ञानातील वेद, पुराणे, सहा दर्शने, वेदांत याबरोबरच काव्य - नाटक इ.चेही महत्व विशद केले आहे. माउलींची तत्कालीन संस्कृतोद्भव अशी प्रासादिक भाषा, त्यांनी दिलेल्या विविध सुंदर सुंदर उपमा यामुळे हे सारे गणेशवर्णन आणि गणेशवंदन अतिशय उत्तुंग झाले आहे. अशा या श्रीगणेशाचे स्मरण करता भाद्रपद गणेशोत्सवात आपणही त्या मूळ अविनाशी अर्थात निराकाराशी एकरुप होण्याचा प्रयत्न करुयात. श्रीगणेश ही बुद्धीची देवता आहे.
माउलींच्या शब्दांचे सामर्थ्य विलक्षण आणि अनाकलनीय आहे. सारस्वताच्या अभिनव शब्दप्रवाहातील हे अमृतसिंचन सतत नवनवीन अर्थात उमगत राहावे हीच कैवल्यसाम्राज्य माउलींच्या चरणी प्रार्थना आहे. मंगलमूर्ती मोरया 🙏🙌
Sarvesh Fadnavis
छायाचित्र सहाय्य : Akshay Jadhav Patil
#GaneshChaturthi2025