नुकतेच ‘ टाटायन -एक पोलादी उद्यम गाथा‘ हे श्री गिरीश कुबेर यांचे पुस्तक वाचनात आले. स्पृहा जोशी हिचा व्हिडिओ ब्लॉग बघितला आणि लगेच रावजी लुटे ह्यांच्या ज्ञानसाधना मधून पुस्तक मागवले. भारतीय माणसाचा प्रत्येक दिवस टाटांपासून सुरू होतो आणि टाटांपाशी संपतो असं म्हंटल तर वेगळं वाटणार नाही म्हणजेच सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीय माणसाच्या आयुष्यात लागणाऱ्या ज्या ज्या वस्तू असतात, त्या टाटांनी बनवलेल्या असतात. त्यातूनच टाटा म्हणजे दर्जा, टाटा म्हणजे विश्वास असं समीकरणच भारतीय माणसांच्या मनात तयार झालेलं आहे. खाजगी क्षेत्रातील सरकारी म्हणजे टाटा असं म्हणतात खरे पण शिस्तबद्ध आणि चाकोरीबद्ध जगणे म्हणजे टाटा.
टाटायन नावावरून वाटत तसे हे कुणा एका टाटांचे चरित्र नाही तर संपूर्ण टाटा उद्योग समूहाचा दीडशे-पावणे दोनशे वर्षांचा प्रवास आहे. प्रस्तावनेत श्री गिरीश कुबेर लिहितात, मराठी माणूस नेहमी ‘ साधी रहाणी उच्चं विचारसरणी ‘ याचा पुरस्कार करतो आणि नकळत आपण साधी रहाणी ही गरिबीशी जोडतो. हे काही अर्थाने खरेही आहे आणि म्हणूनच टाटांची ही चरित्र गाथा महत्त्वाची आहे. उद्योग व्यवसाय करून,नफा मिळवून देशाच्या अर्थव्यवस्थेला भरभराटीचे दिवस आणण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणताना रहाणी साधी असू शकते हे या पुस्तकातून आपल्याला जाणवते आणि आज जमशेदजी टाटा ह्यांच्यापासून दोराबजी -आरडी टाटा पुढे जेआरडी टाटा आणि विद्यमान रतन टाटा ह्यांच्यापर्यंत हा साधेपणा आपल्याला अनुभवता येतोय आणि आज रतन टाटा ह्यांच्याकडे बघतांना तो दिसतोय.
देशात इतकी मोठी उद्योगघराणी असताना सगळ्या देशवासीयांना टाटा या नावाबद्दल एक ओतप्रोत जिव्हाळा आहे तो टाटांच्या या वेगळेपणामुळे, त्यांच्या टाटापणामुळे. जमशेदजींपासून ते रतन टाटांपर्यंतच्या टाटा समूहाच्या वाटचालीचा इतका वाचनीय प्रवास मराठीत पहिल्यांदाच मांडला गेला आहे. खरंतर हा प्रवास ही शून्यातून विश्वनिर्मितीचा आहे. महिनोन्महिने बोटीने प्रवास करत जग फिरणारे, जगात काय चाललंय ते समजून घेणारे, सतत नव्याच्या शोधात असणारे, स्वप्नं बघणारे, ती प्रत्यक्षात उतरवायला धडपडणारे जमशेदजी, त्यांची अपुरी स्वप्नं पूर्णत्वाला नेण्यासाठी धडपडणारी त्यांची पुढची पिढी, लोभस पण कणखर जेआरडी टाटा आणि रतन टाटांचं ऋजू, पण पोलादी व्यक्तिमत्त्व टाटायनच्या माध्यमातून समजून घेणं निखळ आनंद देणारे आहे. काही पुस्तकं हातात घेतल्यावर सोडवत नाही त्यातीलच एक छानसे पुस्तक म्हणजे टाटायन. टाटांनी देशाला,समाजाला एवढं दिलं आहे की त्याची परतफेड फक्त प्रेमातूनच होऊ शकते.
जमशेटजींनी पोलाद तयार करण्याचे स्वप्न पाहिले आणि त्याचा पाठपुरावा केला. दुसरीकडे भविष्य निर्वाह निधी,नागपूरातील प्रतिष्ठित एम्प्रेस मिल, ताज हॉटेल हे सुद्धा त्यांच्याच काळातले. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स ,जमशेटपूरचा पोलाद कारखाना आणि जलविद्युत प्रकल्प त्यांच्या डोळ्यांदेखत पूर्ण होऊ शकले नाहीत. पण ते पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली त्यांचा मोठा मुलगा दोराबजी टाटा आणि चुलत भाऊ आरडी टाटा यांनी. टाटा स्टील म्हणजे तेव्हाची टिस्को,याबरोबरच या दोघांचे अजून एक वेगळे कार्यक्षेत्र होते ते म्हणजे कापड व्यवसाय आणि अफू.
जमशेटजी टाटा जसे पोलाद उद्योगाचे जनक तसे जेआरडी टाटा भारतीय हवाई वाहतुकीचे प्रवर्तक. एअर इंडिया ची स्थापना ते १९५३ मध्ये राष्ट्रीयकरण ही स्थित्यंतरे त्यांनी पहिली आणि अनुभवली आहे. याच काळात भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि देश उभारणीचे कार्य जोमाने चालू झाले. देशाच्या विकासासाठी स्थानिक उद्योग असायला हवेत या जाणिवेतून टेल्को ,टाटा ऑइल मिल्स , टाटा केमिकल्स अशा विविध क्षेत्रातील उद्योगांची स्थापना झाली. टाटा उद्योग समूहाचा आलेख जेआरडी यांच्या काळात उत्तरोत्तर चढतच गेला. १९५२ साली जेआरडी यांचे नाव जगातल्या पहिल्या १०० उद्योगपतींमध्ये होते. दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्योत्तर समाजवादी सरकारी धोरणे आणि उद्योगपती यांच्यात सतत संघर्ष होता. पं. नेहरू आणि जेआरडी यांचे जवळचे वैयक्तिक संबंध पण त्यांच्यातल्या विविध प्रसंगांमधील पत्रव्यवहारामधून हा संघर्ष वाचतांना ठळकपणे जाणवतो. जेआरडी ना फक्त नेहरूच नाही तर त्यानंतर जनता दल - इंदिरा गांधी यांच्या राजकीय काळालाही तोंड द्यावे लागले. तरीही टाटांचा प्रवास सुरूच राहिला. उद्योगधंद्यांबरोबरच त्यांनी गुणी माणसांमधेही गुंतवणूक केली आणि त्यामुळेच त्यांच्या काळात टेल्कोचे सुमंत मुळगावकर ,टाटा केमिकल्स चे दरबारी सेठ ,टिस्कोचे रुसी मोदी,इंडियन सिमेंटचे नानी पालखीवाला,इंडियन हॉटेलचे अजित केरकर हे सर्वजण आपापल्या उद्योगांबरोबरच मोठे झाले. जमशेदपूरच्या कारखान्याची उभारणी असो,जमशेदपूर -टेल्कोत झालेले कामगारांचे संप असो कि नॅनोच्या संपूर्ण कारखान्याचे प.बंगालमधल्या सिंगूरमधून उच्चाटन करून गुजरातमध्ये आनंद येथे स्थलांतर असो. या तपशिलांमधून आपल्याला या घटनांमागची टाटांची भूमिका कळते.
इंडिकापर्व, जग्वार,टीसीएस हे सगळं मुळातूनच वाचण्यासारखं आहे. ७५ व्या वर्षी निवृत्तीचा निर्णय घेऊन समूहातल्या बुजुर्गाना घरचा रस्ता दाखवणारे रतन टाटा स्वत:ही ७५ व्या वर्षी पायउतार झाले आणि त्यांनी सायरस मिस्त्री यांच्याकडे सूत्रं सोपवली.
जमशेदजींपासून सुरू झालेला टाटा समूहाचा प्रवास अशा रीतीने सायरस मिस्त्री यांच्यापर्यंत येऊन पोहोचतो. या सगळ्या प्रवासात संघर्ष आहे, आव्हानं आहेत, अडचणी आहेत, त्याच्या जोडीला जिद्द आहे, साहस आहे, नवी क्षितिजं धुंडाळण्याची उमेद आहे, पैसा आहे आणि त्याचा सुसंस्कृत व्यय आहे. हे आहे टाटापण. ही आहे टाटा संस्कृती. समाजातून मिळवलेला पैसा परत समाजासाठी खर्च करणं आणि त्याचा कोणताही बडेजाव न मिरवणं ही टाटा संस्कृती 'उदास विचारे वेच करी' या प्रकरणात तपशीलवार मांडली आहे. टाटांनी समाजासाठी दिलेलं योगदान विलक्षण आहे. ‘टाटायन’मधून भरपूर माहितीसह अतिशय सहजसोप्या भाषेत, त्याला पुरेपूर न्याय दिला गेला आहे.
शेवटच्या पानावर लिहिलेले अधिक मनाला स्पर्शून जाणारे आहे. टाटा,भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटीच्या, विश्वासाच्या भक्कम पायावर उभी राहिलेली, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढ्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटासंस्कृती. टाटांनी केलेली संपत्तिनिर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम. सालंकृत तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत तशीच नीतिमंत. जमशेटजी आणि दोराबजींपासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत सा-यांच्या कर्तबगारीनं सतत चढतं राहिलेलं उद्योगतोरण म्हणजेच टाटायन! येणाऱ्या दिवाळीत भेट म्हणून देण्यासाठी सर्वोत्तम असं पुस्तक म्हणजे टाटायन.
टाटायन
लेखक : गिरीश कुबेर
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
किंमत : रु. ४००/-
पृष्ठ : ४१९
✍️ सर्वेश फडणवीस