दरवर्षी तुळशीची आरती म्हणतांना ही ओळ विशेष आनंद देऊन जाते. सहज परवा संध्याकाळी गार्डन मध्ये फिरत असतांना गार्डन शेजारी घरात तुळशीचे लग्न लागले आणि मग फिरत असतांना हे शब्द पुन्हा मनात रुंजी घालू लागले. कार्तिक महिना आणि तुळशीचे लग्न हे समीकरण आनंद आणि उत्साह प्रदान करणारे आहे.
कार्तिक महिना मग कार्तिक स्नान,दिवाळीची चाहूल,गुलाबी थंडी आणि त्यातच हे तुळशीचे लग्न म्हणजे उत्सवाचा उत्साह हा मनस्वी आनंद देणारा आहे. खरंतर उत्सव आणि उत्साह हे जरी भिन्न असले तरी त्याचा आनंद हा बऱ्यापैकी प्रत्येकजण आपण अनुभवत असतो.
खरंतर आपण ज्या संस्कृतीचे पाईक आहोत त्याबद्दल आपण स्वतःला नशीबवानच समजायला हवं. कारण प्रत्येक सणांच्या मागे सातत्य आणि परंपरा आहे आणि हे संचित पूर्वजांकडून आपल्याला मिळाले आहे. आपल्याला निसर्ग,वृक्ष, वेली,नद्या,हवा,पाणी ह्यांचे रक्षण करण्याचे संस्कार नकळतपणे ह्या उत्सवाच्या माध्यमातून मिळत असतात. देव आणि धर्म ह्याच्याशी संबंध जुळवत हे कार्यही श्रद्धेने आणि अंतःकरणपूर्वक घरोघरी केले जाते. सध्याच्या पार्श्वभूमीवर ह्याचा उत्साह अधिक आहे असेही वाटते. कारण बऱ्यापैकी बाहेर जाणे कमी म्हणून मग ह्या उत्सवाच्या निमित्ताने उत्साह अधिक आहे.
प्रत्येक हिंदूंच्या घरी तुळस ही पवित्र मानली जाते. जवळपास प्रत्येकाच्या घरात ती दिसतेच. तुळशीचे महत्व जसे अध्यात्मिक आहे तसेच औषधीयुक्त ही आहे. तुळशीचे विविध गुणधर्म आयुर्वेदात सांगितले गेले आहे. तुळस ही वनस्पती वातावरणातील सात्विकता खेचत ती प्रभावीपणे जिवाकडे प्रक्षेपित करत असते. अखिल सृष्टीतून कृष्ण तत्व खेचून आणण्याची क्षमता तुळशीत अधिक आहे. अशी ही बहुगुणी, औषधीयुक्त तुळशीचे प्रतिकात्मक पूजन,अर्चन म्हणजे हे तुळशीचे लग्न आहे. शास्त्राने देवपूजेत सुद्धा तुळस आवश्यक सांगितली आहे. वारकरी संप्रदायात गळ्यात तुळशीची माळ असणे, हे धार्मिकतेचे व सदाचाराचे प्रतीक मानले गेले आहे. अनेक व्याधींवर तुळस हे प्रभावी औषध आहे.श्रीविष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीच्या आरतीत ही त्याचा उल्लेख आढळतो. तुळशीचे पान वाहिल्याने तो जितका प्रसन्न होतो, तो अन्य कशाने होत नाही. तुळशीदला शिवाय नित्य पूजा पूर्ण होत नाही. तुळशी दुषित वायू शोषून घेत प्राणवायू सोडते, हे शास्त्रानेही सिद्ध झाले आहे. म्हणून दारोदारी तुळशी वृंदावन असतेच. आज शहरी भागात खिडकीतल्या कुंडीत तुळशीचे रोप लावले जाते. दारात तुळशी असणे, हे शुभलक्षण मानले आहे. द्वादशीपासून- पौर्णिमेपर्यन्त पाच दिवस जमेल तसे प्रत्येक कुटुंब उत्साहात हे लग्न साजरे करत असते.
शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी । मंजिरिची बहु आवड कमलारमणासी । सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।
✍️ सर्वेश फडणवीस
#तुळस #तुळशीचे_लग्न #त्रिपुरी_पौर्णिमा
No comments:
Post a Comment