Saturday, July 8, 2023

🔹 सप्तसुरांची *देवता 📖

शीर्षक वाचूनच हा स्मृतिग्रंथ वाचनाची ओढ लागली. एका बैठकीत वाचून हा ग्रंथ अलगद बाजूला झाला आणि लता दीदींना पुन्हा ऐकण्याची इच्छा झाली. सप्तसुरांची देवता लता मंगेशकर नावासोबत मुलायम आवाजातील सुंदर गीतांचं अस्तित्व आणि जनतेच्या मनातील त्यांच्याप्रती असलेला नितांत आदरभाव सामावला आहे. सप्तसुरांची देवता या स्मृतिग्रंथाच्या नावाचे मोठेपणच उत्तुंग आहे. भारतातील प्रत्येक व्यक्ती, मग तो वृद्ध असो वा बालक, गरीब असो वा श्रीमंत, शहरी भागातील असो वा ग्रामीण, सर्वांना हे नाव परिचित आहे. नुसते परिचितच नाही, तर त्या नावाबद्दल विलक्षण आपलेपणा, प्रचंड जिव्हाळा, आणि अतिशय प्रेम आहे. कुठल्याही प्रहरी हा सूर ऐकण्याची इच्छाच होते. 

प्रत्येक भारतीयाच्या मनात दिदींबद्दल आजही आदर असेल याची खात्री आहे. केवळ भारतीयांच्याच नव्हे, तर परदेशातील जनतेच्यासुद्धा मनात 'लता मंगेशकर' या नावाबद्दल विलक्षण आपुलकी आणि आदरभाव आहे. हा स्मृतिग्रंथ वाचून ती आपुलकी आणि आदर अधिक वाढत जातो कारण यात ज्या लेखांचे संकलन केले आहे ते लतादीदी गेल्यानंतर त्यांच्यावर लिहिलेल्या ३० मान्यवर लेखकांनी जसे ए. आर रहमान, गुलजार, आशुतोष शेवाळकर, सतीश पाकणीकर, श्रुती सडोलीकर, अरुणा ढेरे, राज ठाकरे, सुरेश वाडकर, श्रीधर फडके, राहुल देशपांडे, विष्णू मनोहर अशा अनेक मान्यवरांचे लेख यात आहेत आणि विविध मराठी वृत्तपत्रात लिहिलेल्या १९ विशेष संपादकीय लेखांचे संकलन यात आहे. 

मा. दीनानाथांच्या आधारवेलीवर लता मंगेशकर हे नाव बहरलेच नाही तर त्याचा वेलू गगनावरी गेला. कंठातील देवदत्त गंधार घेऊनच जन्माला आलेल्या ल-ता- मं-गे-श-क-र ह्या सप्तरंगी सुरांनी अभिजात अमृतस्वरांची नादमधुर बरसात भूतलावर करून संगीतकलेला अतिशय ऐश्वर्यसंपन्न करून सर्वोच्च उंची प्रदान केली. मधुर आणि मुलायम आवाज, स्पष्ट, अर्थपूर्ण शब्दोच्चार यांमुळे लता दिदींचे गाणे ऐकणारा कायम भारावून जातो. दुःख, क्लेश, यातना यांना विसरायला लावण्याचे विलक्षण सामर्थ्य लतादिदींच्या स्वर्गीय गळ्यात होते. जवळजवळ सर्व भारतीय भाषांत गाणी गाऊन त्यांनी आपले स्वर काश्मीर ते कन्याकुमारी अजरामर केले आहे. 

आपल्या लेखात रेखा चवरे जैन छान लिहितात, दीदी प्रत्यक्ष या भूतलावर नसल्या तरी सुरांच्या रूपाने अमर आहेत. त्यांच्या गाण्यांनी करोडो रसिकांना उच्च - निर्मळ आनंद दिला. आमच्या सुखदुःखात दीदींचा सूर तन्मय झाला. प्रत्येक सुखाची भावना त्यांच्या सुरांमुळे गडद झाली तर दुःखी भावना हलकी झाली. आनंद, तृप्ती अशा विलक्षण भावनांची अद्भुत अनुभूती घेत त्यांची गाणी आपण मनात साठविली. दीदींच्या अलौकिक - अमृतमय सुरांच्या साथसंगतीने आपले आयुष्य चैतन्यमय झाले. जगण्याच्या प्रत्येक क्षणी साथ देणारा दीदींचा सूर आणि दीदीही  आपल्याच वाटू लागल्या. दीदींच्या कारकिर्दीत गीतकारांच्या पिढ्या बदलल्या, संगीतकारांच्या पिढ्या बदलल्या, नायिकांच्याही पिढ्या बदलल्या, पण दीदी मात्र दीपस्तंभासारख्या टिकून दुसऱ्यांना मार्ग दाखवित राहिल्या. सर्व गीतकार, संगीतकार, सहगायक, नायिका या सर्वांचा ध्यास एकच होता तो म्हणजे दीदींबरोबर काम करणं. गेली सात दशकं रसिकांच्या चार पिढ्या दीदींची गाणी ऐकत मोठ्या झाल्या आणि पुढील कितीतरी पिढ्यांना हे सुवर्णसंचित लाभणार आहे आणि हे शब्दशः सत्य आहे. 

मुंबईतील 'प्रभकुंज' ही ऐतिहासिक वास्तू म्हणजे साक्षात स्वरसरस्वतीचं निवासस्थान. ही पवित्र वास्तू म्हणजे रसिकांसाठी जणू मंदिरच आहे. या मंदिराकडे नेणारा पेडर रोड हाही आपल्या आत्मीयतेचाच विषय आहे म्हणून जेव्हा येथून हसऱ्या फोटोसह दीदींचा रथ निघाला, ते दृश्य आपण बघूच शकलो नाही आणि उरात उसळणाऱ्या कालवाकालवीने हलून गेलो. ज्या मार्गावरून दीदींनी कितीदा तरी जाणं-येणं केलं, ज्या मार्गाने सदैव चैतन्यमय दीदी बघितल्या, त्या मार्गाचंही काळीज तेव्हा नक्कीच फाटलं असणार. अंतिम क्षणी दीदींच्याच स्वरात वाजत असणारं 'ए मेरे वतन के लोगो' ऐकून अजूनच गहिवरून आले. हे ही विलक्षण होते की दीदींना अखेरची मानवंदना त्यांच्याच गीताने देण्यात आली. आज दीदी प्रत्यक्ष या भूतलावर नसल्या तरी सुरांच्या रूपाने अमर आहेत. मानवाच्या मर्यादा आहेत पण लतादीदी मात्र अपार्थिव आहे. आणि याचसाठी दीदी देहरूपाने नसतांना हा स्मृतिग्रंथ वाचतांना वाचक म्हणून आपण समृद्ध होतोच पण दीदी किती मोठ्या असतील याची भावना नकळत मनात येते. हा स्मृतिग्रंथ संग्रही असावा असाच आहे. कारण येणाऱ्या कित्येक पिढ्यांना हे सांगण्याचे उत्तरदायित्व आपल्यावरच आहे. 

सप्तसुरांची देवता 
संपादन - रेखा चवरे जैन 
प्रकाशक - परचुरे प्रकाशन मंदिर
मूल्य - ₹ ३००
संपर्क क्रमांक - 9869928646 / 020-24473372

No comments:

Post a Comment