Tuesday, July 16, 2024

श्रीज्ञानेश्वरकन्या - प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज

ईशानस्य सुता, मुकुन्ददयिताज्ञानेशमुद्रांकिता
या माधुर्यरसान्विता, सुललिता, कात्यायनीकीर्तिता ।
ख्याता पच्चलताभिधानमहता श्रद्धावतां देवता
सा मच्चिन्तनवेद्यतामवतरेत् सश्रद्धमाराधिता ।।

आपला भारतदेश 'संतांची भूमि' म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आरंभबिंदू म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, आणि त्याच परंपरेला अधिक पुष्ट करणारा एक समर्थ दुवा म्हणजे श्रीगुलाबराव महाराज. भारताचा सांस्कृतिक इतिहास गौरवशाली आहे. हा गौरव मुख्यत्वे करून या भूमीतील संतांच्या शिकवणीतून प्राप्त झाला आहे. अनेक आघात सोसूनसुद्धा अजून आपली संस्कृती वर्धिष्णू आहे. धर्माला ग्लानी आली असता आणि दुष्टांचे वर्चस्व वाढले असता धर्म रक्षणासाठी व दुष्टांचे निर्दालनासाठी योगेश्वर श्रीकृष्ण ज्याप्रमाणे नवा जन्म घेतात त्याप्रमाणेच भारतीय संस्कृतीला परकीयांचे घाव बसू लागले की संस्कृती रक्षणासाठी आपल्या भूमीमध्ये संतांचे अवतार झालेले आहेत म्हणूनच भारतामध्ये संत हे भगवान स्वरूप मानले आहेत.

विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यात चांदुरबाजार तालुक्यातलं 'माधान' हे एक छोटंसं गाव. मोहोड घराण्याकडे त्या गावाची पाटीलकी होती. घराणं राजस्थानचं. महाराजांचे पूर्वज तिथून प्रथम उत्तर प्रदेशात. नंतर हे मुळात मराठवाड्यात आणि शेवटी विदर्भात आले आणि माधानमध्ये स्थिरावले. या मोहोड घराण्यात 'राणोजीराव' हे एक कट्टर शिवभक्त होऊन गेले. शिवरात्रीचं त्यांचं व्रत एकवीस दिवसांचे असे - फक्त भस्म ग्रहण करूनच ते हा उपवास करीत असत. एके दिवशी प्रत्यक्ष महादेवानं त्यांना वृत्तांत दिला की तुझ्या कुळात एका थोर महात्म्याचा जन्म होईल. या राणोजीरावांना चार मुलं होती. रघुजी, बकारामजी, नरसोजी आणि गोंदूजी. त्यातले नरसोजी तर अल्पायुषीच ठरले. आणि रघुजी - बकारामजी यांना अपत्यलाभ झालाच नाही. कनिष्ठ पुत्र गोंदूजीचं भाग्य मात्र फळफळलं. त्यांच्या घरी या लोकोत्तर महात्म्यानं जन्म घेतला.

अमरावतीच्या दक्षिणेला लोणीटाकळी हे लहानसं खेडं आहे. तिथल्या अलोकाबाईशी गोंदूजींचा विवाह झाला होता. अलोका माहेरी गेली आणि आषाढ शु. दशमी अर्थात ६ जुलै १८८१ ला तिनं एका तेजस्वी गुटगुटीत बाळाला जन्म दिला. त्या दिवशी फक्त मोहोड कुटुंबालाच नाही तर अवघ्या 'आर्य धारणे'ला हर्ष झाला असेल की आता आमचा उद्धार करणारा, आमच्या वचनांची संगती लावणारा, अद्वैत - तत्त्वज्ञानाशी भक्ति धारेचा समन्वय साधणारा, आर्य अस्मिता जागवणारा कुणीतरी अवतरला.  

ज्या काळात स्वत:ला सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणविणारे ज्या मार्गाने, ज्या रूपाने, ज्या पद्धतीने आपला परिचय करून देत होते, त्या काळात कमालीच्या दारिद्र्याला अंगाखांद्यावर घेत, डोक्यावर ग्रंथलेखनाच्या कार्याची पेटी घेऊन रस्ते नसलेल्या गावागावांतून हे अंध महापुरुष आपल्या बरोबर वैदर्भीय काळ्याभोर चिकण मातीच्या सुगंधाचे वाटप जेथे जाईल तेथे करीत होते. विद्वान, पंडितांना मागे टाकील अशा आशयसंपन्न शैलीने सरस्वतीची पूजा बांधित होते आणि ज्ञानदेवीच्या वैभवाचा गोपालकाला मुक्त हस्ताने देत होते. त्या काल्याचा आस्वाद घेता घेता हेही कळत होते, माहीत होते की, अरे गुलाबराव महाराज हे गुलाबराव महाराज नाहीत. ते ग्रंथकार नाहीत. ते अंधही नाहीत तर आपल्या दोन देदीप्यमान लक्षणासह या विदर्भभूमीवर आलेली ही ज्ञानेश्वर कन्या आहे, गोपगोपिकांची सखी व व्रज मंडळातील रासक्रीडेतील, राधेसह अन्य गोपींसह श्रीकृष्णाच्या व्रज जीवनातील पंचलतिक गोपी आहे. खरंतर हा सर्व प्रकारच अलौकिक आहे आणि दिव्य आहे.
 
वृंदावनातील पंचलतिका गोपी व विदर्भातील कौंडण्यपूरची रुक्मिणी या दोघीही कृष्णाशी आपले हृद्य नाते सांगताना विदर्भभूमीची निवड करतात व रुक्मिणीप्रमाणेच ज्ञानेश्वर कन्या आपल्या वृंदावनातील गोपीच्या मधुर रसपूर्ण रूपाची आठवण करून देते. आज आषाढ शुद्ध दशमी श्रीज्ञानेश्वरकन्या प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यांची जयंती. त्यांच्या सुकोमल चरणी साष्टांग दंडवत.

सर्वेश फडणवीस

No comments:

Post a Comment