Saturday, March 29, 2025

रामायणातील विविध व्यक्तिरेखा

आजपासून रामनवमी पर्यंत रोज एक नवा विचार ह्या माध्यमातून पोस्ट करणार आहे. सकारात्मक विचार ही आजची गरज आहे. या माध्यमातून दरवर्षी लेखन करत असतांना कायमस्वरूपी आत्मिक समाधान मिळत असते, गेली ५ वर्षे झाली दरवर्षी काहीतरी लेखन होत असताना यावर्षी कुठल्या विषयावर स्पर्श करायचा असा प्रश्न होता काहींनी विचारणा केली की यावेळी काय लिहितोय मग डॉ. लीना रस्तोगी यांना भेटल्यावर त्यांनी लगेच उत्तर दिले, ‘सर्वेश माझ्या मनात हा विषय आहे पण तू लिहायला घे आणि तो विषय आहे “रामायणातील विविध व्यक्तिरेखा”. 

५०० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर गेल्या वर्षी श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामजन्मोत्सव अत्यंत भव्यदिव्य होत असतांना त्यांचेच विचार आणि प्रभू श्रीरामाला घडविलेल्या विविध व्यक्तिरेखा यानिमित्ताने नऊ दिवस मांडतोय. स्वामी गोविंददेवगिरी एके ठिकाणी छान लिहितात, “श्रीराम प्रभूंचे चरित्र हा समस्त भारतीयांच्या विचारविश्वाचा, भावविश्वाचा केंद्रबिंदू. आबालवृद्ध, सुशिक्षित - अशिक्षित, आस्तिक- नास्तिक, सश्रद्ध - अश्रद्ध आणि सर्वांच्याच मनात रामाला काही ना काही तरी स्थान आढळतेच. अगदी पाश्चात्य विचारधारेने ज्यांचे अंत:करणच पाश्चात्यीभूत झालेले असते त्यांनाही सश्रद्ध भारतीयांच्या अंत:करणात विराजमान झालेल्या रामप्रभूंच्या मूर्तीचे भंजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यातच मोठा पुरुषार्थ वाटतो. मग स्वतःच्या बुद्धीची परिसीमा गाठणाऱ्या चिकित्सक बुद्धिमंतांना याच प्रभुचरित्राचा पुनश्च धांडोळा घेऊन त्याचे एक नवेच रूप लोकांसमोर मांडण्यात कृतकृत्यता वाटावी यात काय नवल ?” आणि हेच सूत्र आहे. 

पूर्ण पुरुषोत्तम मर्यादा प्रभू श्रीराम आणि त्यांचे चरित्र आदिकवी वाल्मीकीने लिहिले आहे ते 'रामायण' या नावाने प्रसिद्ध आहे. वाल्मीकीचा श्रीराम जसा थोर आहे, आदर्श आहे, तसा एक मानवही आहे. वाल्मीकीने त्याला ईश्वर बनविले नाही. 'आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम्' म्हणजे 'मी स्वतःला दशरथाचा पुत्र राम समजतो', हे वचन वाल्मीकीने रामाच्या तोंडी घातलेले आहे. श्रीराम मानव असल्यामुळे त्याचे जीवन सामान्य मानवी भावभावनांनीही युक्त आहे. श्रीरामाला दुःख झालेले आहे. श्रीरामाला क्रोध आलेला आहे. सोन्याचा मृग पाहून त्याला मोहही झाला आहे आणि श्रीरामाने विनोदही केला आहे. पण या भावभावनांच्या आहारी मात्र ते गेले नाही. त्यांच्यावर मात केली म्हणून ते श्रेष्ठ आहे. म्हणून पूर्ण पुरुषोत्तम मर्यादा श्रीराम आहे आणि त्यांना घडवण्यासाठी जे त्यांच्याबरोबर सदैव होते ज्यांनी श्रीरामाला सिद्ध केले अशा काही व्यक्तिमत्त्वाच्या गावी आपण या नऊ दिवस काहीकाळ स्थिरावणार आहोंत. श्रीरामवरदायिनी हे कार्य सिद्धीस नेईल हा विश्वास आहेच. जय श्रीराम 🙏🚩

सर्वेश फडणवीस

#ramnavmi25 #Day1 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏

No comments:

Post a Comment