Sunday, March 30, 2025

ब्रह्मर्षी विश्वामित्र


भारतीय मनाला काही गोष्टींचे अत्यंत आकर्षण आहे त्यातीलच एक गोष्ट म्हणजे आपल्याला एक दिवस रामराज्यात जगायला मिळावे. महर्षी वाल्मीकी यांना सुद्धा ज्यांच्याबद्दल लिहावेसे वाटले असे प्रभू श्रीराम. याच वाल्मिकी रामायणातील काही व्यक्तीचित्रे या निमित्ताने जाणून घेऊया. त्यातील पहिले व्यक्तिचित्र म्हणजे एका सम्राटापासून ब्रम्हर्षी पदापर्यंतचा प्रवास श्रेष्ठ ऋषीवर विश्वामित्र. प्रचंड जिद्द, महत्त्वाकांक्षा, एकाग्रता, तपःसिद्धी यांचे मूर्तिमंत रूप म्हणजे ब्रम्हर्षी विश्वामित्र. एका धर्मपरायण, धर्मज्ञ, विद्वान, प्रजाहितदक्ष नृपांचे ब्राह्मतेज धारण करणाऱ्या ब्रह्मर्षित रूपांतरण म्हणजे विश्वामित्र. सगळी सुखं, ऐश्वर्य, धन, गजांतलक्ष्मी, स्वामित्व या सगळ्यांचा त्याग करून रानावनात तपसाधनेत विलीन होणं म्हणजे विश्वामित्र. 

वाल्मीकी रामायणात विश्वामित्रांचा परिचय बालकांडात होतो. महाराज दशरथाकडून आपल्या यज्ञ रक्षणाकरिता विश्वामित्र रामाची अपेक्षा करतात. खरं तर कोवळा, सुकुमार राजकुमार रामाची विश्वामित्रांसारख्या सर्व अस्त्रांचे ज्ञाते असलेल्या ब्रह्मर्षीने कामना करावी हे जरासे वेगळे आहे. ते स्वतःच स्वतःच्या यज्ञाचे रक्षण करू शकले असते पण त्या दूरदर्शी, गुणग्राही, रत्नपारखी ऋषींनी श्रीरामातील क्षात्रतेज ओळखले होते. त्या क्षात्रतेजाला झळाळी आणण्याचं महत्कर्म विश्वामित्रांनी केलं. प्रासादिक राजमहालातील वातावरणातून प्रभू श्रीरामांना बाहेर काढून त्यांच्याकडून जणू प्रात्यक्षिकच करवले.

विश्वामित्रांनी स्वत:ची आणि आपल्या कुळाची ओळख करून दिली, शतानंद आपल्या आईला आणि वडिलांना भेटून आलेल्या प्रभू रामचंद्रांना त्यांच्याबरोबर आलेल्या ऋषिसंघाच्या समोर
विश्वामित्रांची ओळख करून देताहेत. वाल्मिकी रामायणात ते पंधरा सर्ग आहेत. केवळ एका व्यक्तीच्या ओळखीसाठी रामायणात सगळ्यात जास्त सर्ग वापरलेले असतील, तर ते विश्वामित्रांच्या ओळखीचे आहेत. हे विश्वामित्र जे आपल्याबरोबर आज ऋषिरूपात उभे आहेत ते मुळात फार मोठे राजा होते. पृथ्वीचे पालन करणारा राजा म्हणून त्यांची कारकीर्द आहे. कुश कुटुंबात त्यांचा मोठा दबदबा होता. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे आपली संस्कृती सगळीकडे पाळली जाते की नाही, हे पाहण्यासाठी ही राजे मंडळी राजधानीत बसून कारभार करीत असत शिवाय सगळीकडे हिंडत असत. भारतीय मनाला काही गोष्टींचे अत्यंत आकर्षण आहे त्यातीलच राजा प्रजापतींचा पुत्र नरेश कुश , कुश नरेशचा पुत्र धर्मपरायण राजा कुशनाभ. कुश नाभाचा पुत्र गाधि आणि गाधि नरेशाचा महातेजस्वी महामुनी विश्वामित्र पुत्र आहेत. ब्राह्मण आणि क्षत्रिय राजे ह्यांच्यातील सहकार्याचे हे द्योतक आहे. रामायणातील निर्देशानुसार विश्वामित्रांनी कौशिकी नदीच्या काठी आपले कायम निवासस्थान केले होते.

एकदा विश्वामित्र जप करणाऱ्यांत श्रेष्ठ अशा वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात गेले. तिथे वसिष्ठ ऋषींनी त्यांचे अगत्य केले. आदर सत्कार केला. विश्वामित्र राजा प्रसन्न झाले. पण वसिष्ठांना विश्वामित्रांचे अधिक आदरातिथ्य झाले पाहिजे असे वाटले. विश्वामित्रांनी 'आम्ही तृप्त झालो आहोत ' असे म्हणूनही वसिष्ठांनी त्यांच्याकरिता आणखी आदरातिथ्याचे आयोजन केले. वनात राहणारे, कंदमुळे खाणारे वसिष्ठ आणि आपल्या सोबतच्या सैन्याचे आदरातिथ्य कसे करणार याबद्दल विश्वामित्रांना कुतूहल वाटत होते. तेव्हा वसिष्ठांनी त्यांच्या आश्रमातल्या शबला नामक कामधेनूला सगळ्यांना तृप्त करण्याचा आदेश दिला शबलेनेही हजारोच्या सैन्याला आणि राजा विश्वामित्राला वेगवेगळ्या व्यंजनांनी तृप्त केले. पण हि तृप्तीच महर्षी वसिष्ठ आणि शबलेकरिता घातक ठरली. पृथ्वीचा अधिपती असलेल्या विश्वामित्रांनी वशिष्ठांकडे शबलेची मागणी केली. बदल्यात लाखो गाई मिळत असूनही वसिष्ठांनी शबलेला देण्यास नकार दिला आणि वसिष्ठांचा आदेश मिळताच शबलेने सैन्य निर्माण करून विश्वामित्रांच्या सैन्याला निकामी केले. हा पराभव विश्वामित्रांना जिव्हारी लागला. मानी विश्वामित्र राजा दुखावला गेला आणि स्वतःच्या एका पुत्राला राजसिंहासनावर बसवून तो वनात तपश्चर्ये करिता निघून गेला. वशिष्ठांना हरवणे या उद्देशाने ही तपश्चर्या होती. तेव्हा ब्रम्हर्षी वसिष्ठांनी विश्वामित्रांना 'ब्रम्हर्षी' अशी हाक दिली आणि विश्वामित्र ब्रम्हर्षी झाले. त्यानंतरची कथा सर्वश्रुत आहे. 

आपला सगळाच भारतीय इतिहास, भारतीय वाङ्मय हे मानवाचे पतन; पण त्या पतनातून नंतर होणारे उत्थान आणि उन्नती
यांनी भरलेले आहे. सतत उन्नतीकडे, त्या वर जाण्याच्या दिशेकडे बोट दाखवणारे आणि ती प्रेरणा देणारे भारतीय वाङ्मय आहे. तेच विश्वामित्रांच्या कथेमध्ये १५ सर्गांमध्ये वाल्मीकींनी तपशिलात आपल्यासमोर ठेवलेले आहे. राम, लक्ष्मण, स्वतः विश्वामित्र, जनक, जनकाबरोबरची इतर सगळी मंडळी बसलेली असताना
त्यांना शतानंद ती कथा सांगतात. ही मंडळी जनकाने उभारलेल्या यज्ञवाटिकेमध्ये बसली होती. त्यामुळे जनकाने नंतर पुढे होऊन म्हटले, 'पावितोऽहं त्वया ब्रह्मन् दर्शनेन महामुने।' “विश्वामित्रांची सगळी कथा ऐकल्यानंतर आम्ही पवित्र झालो," असे म्हणून जनकानेही त्यांना मान दिला. संध्याकाळ झाली, सूर्य कलला; परंतु अजूनही 'तृप्तिराश्चर्यभूतानां कथानां नास्ति।' ही कथा पुन्हापुन्हा ऐकावी वाटते, मनाचे समाधान होत नाही असा आनंद
त्यांनी व्यक्त केला. आपण विश्रांतीला आपल्या आश्रमातल्या वाटिकेत जा. मीही आपल्या प्रासादात परत जातो. उद्या आपण पुन्हा भेटू असे सांगून सगळ्यांनी निरोप घेतला. 

सर्वेश फडणवीस 

#ramnavmi25 #Day2 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏



No comments:

Post a Comment