Wednesday, September 8, 2021

आतुरता तुझ्या आगमनाची !!


पोळा झाला की प्रतिपदेपासून गणपतीच्या आगमनाचे वेध लागतात. सणासुदीला उत्साहाचे वातावरण असतांना सगळीकडे गणपती आणि गौरीची लगबग बघायला मिळते आहे. यंदाही कोरोनाचे सावट असल्याने आपल्याला जिथे आणि जसे आहोत त्या परिस्थितीत सण साजरा करायचा आहे. पण त्याही परिस्थितीशी जुळवत आपण आपला उत्साह ढासळू दिलेला नाहीच. गणपतीचे आणि आपले नाते मुळातच वेगळं आहे. बुद्धीची देवता अर्थात गणपती आणि ह्या गणपतीची गणेश चतुर्थीपासून आपण सर्वजण भक्तिभावाने पूजा-अर्चा करणार आहोत. श्रावणापासून त्याच्या येण्याची चाहूल लागतेच घराची थोडी स्वच्छता,पितळेची आणि चांदीची भांडी स्वच्छ करण्यात वेगळाच उत्साह दरवर्षी बघायला मिळतो. 

इतक्या वर्षात त्याचं आणि आपलं नातं खूप छान जमलंय. त्याची आणि आपली भेट दर वर्षातून एकदा होते. या भेटीत उर्वरित वर्षासाठी तो आपल्याला खूप काही देऊन जातो.घरी येण्याआधी आणि आल्या नंतरची लगबग याने तर सगळं घर आनंदून जातं. प्रत्येकाचा उत्साह हा शब्दातीत असतो सगळेजण आपली आपली कामे चोख पार पाडत असतात. त्याच्या येण्याने उत्साहाने वातावरण खरंतर भारावून गेलेले असते. 

देवघरातील त्याच्या मुकुटावर लावलेल्या बल्ब च्या प्रकाशात झगझगीत दिसणारा त्याचा उन्नत माथा आणि कोपऱ्यात उभा असलेला मी. कित्येक तास शांततेत आमचा संवाद चालू असतो.. सोंडेतूनही तो इतकं प्रसन्न कसं काय हसतो, हे मला अजूनही कळलं नाहीये. त्याच्या मूर्तीचे विलक्षण तेज हे चतुर्थी पासून चतुर्दशीपर्यन्त कलेकलेने वाढत जाते आणि सहज नकळत त्याला रोज बघणे हे आनंद आणि उत्साह देणारे ठरते. 

गेली कित्येक वर्ष आम्ही एकाच प्रकारची, एकाच रंगसंगतीची मूर्ती आणतो. इतक्या वर्षातलं माझं-त्याचं प्रेम त्या मूर्तीत शतपटीने दुणावलेल्याचा अनुभव त्याला पाहिल्यावर येतो. खरं सांगायचं तर गणपती ही काही चॉइस करण्याची गोष्ट असू शकत नाही पण तरीही..त्याला घरी आणतांना आपण नाकेडोळे रंगसंगती हे सहज बघतोच. 

लहान असताना त्याला अलगद आणता यावं म्हणून रिक्षा किंवा मग ऑटोमधून आणत असतं..मग कालांतराने दुचाकीवर आणतांना ही उत्साहाला उधाण येत असे. आता मात्र त्याच्याच कृपेने चारचाकी मध्ये एका पाटावर गुळगुळीत रस्त्यावरून प्रवास करताना तो मोठ्या विश्वासाने जो सोबत येईल त्याच्या मांडीवर ऐटीत विसावतो. त्याला ती व्यक्ती मुद्दाम स्वतःच्या हृदयाशी घट्ट आवळून ठेवते. मग गाडीतून उतरल्यावर आईकडून तुकडा पाण्याची ओवाळणी स्विकारून तो घरी एका ठिकाणी स्थानापन्न होतो.

रोज त्याच्या पूजेला सकाळी उठून पांढरी स्वस्तिकाची फुलं, जास्वंद, सोनचाफा,कन्हेर आणि त्यांचा गुंफलेला सुरेख हार, त्याच्या अंगठीत किंवा मुकुटावर अडकवायला त्याच्या विशेष आवडीचं एखादं छानसं जास्वंदीचं फुल, दुर्वांची जुडी, शमीपत्र आणि त्याच्या पुढ्यातील केळीचा घड, सफरचंद, डाळिंब, मोसंबी,कणस आणि बाजूला आसमंत सुगंधाने दरवळून टाकणारी धुपकांडी, चंदन, मोगरा, गुलाब, केवडा नाना प्रकारच्या उदबत्त्या आणि त्याच्या उजव्या बाजूला शांतपणे तेवणारी समई,आणि दुसऱ्या बाजुला तुपाचा दिवा पुढ्यात आरतीचे तबक त्यात फुले,निरंजन हे सगळे सोपस्कार त्याला प्रचंड आवडतात. 

चांदीच्या वाटीत ठेवलेला पेढा आणि खास त्याच्यासाठी बनवलेला मोदक म्हणजे पहिल्या दिवशीचा प्रसाद. खिरापतीचा, पंचखाद्याचा,शिऱ्याचा स्वादिष्ट प्रसाद तर कधी खीर,आणि श्रीखंड तर कधी बासुंदी आणि रसगुल्ले पुढे शंखाचा नाद ध्वनी ,झिनझिनणारे टाळ आणि सकाळ-संध्याकाळ होणारी त्याची आरती याने वातावरणात वेगळीच प्रसन्नता जाणवते. 

मनाला शांती, सुख देणारा विघ्नहर्ता गणपती, अर्थात आपला बाप्पा. जन्मोजन्मी तुझा सहवास असाच लाभू दे. तुझ्या सेवेत आम्हाला रममाण होऊ दे..माझं तुझ्याकडे काहीच मागणं नाही...  आजवर जसा माझ्याशी गुजगोष्टी करत राहिलास.. तसाच यापुढेही करत रहा. 

खरंतर यंदाही साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होणार आहे आणि सरकारचे सगळे नियम पाळून हा सण आपण साजरा करणार आहोत. गणेशोत्सवामध्ये सर्व लोकांनी सोशल डिस्टनसिंग आणि नियमांचे पालन करायचे आहे. थोडक्यात यावर्षी गणेशोत्सव साजरा करताना उत्सवाच्या धामधुमीत कोरोना पासून बचाव करण्यासाठी सामाजिक जबाबदारीचे भान सर्व गणेश भक्तानी ठेवणे आवश्यक आहे. 

हे आनंदी दहा दिवस आपल्याला त्याच्या प्रेमाचं सुख घेता यावं इतकंच तुझ्याकडे मागणं आहे आणि हे आलेलं कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे आणि ते दूर करणारा आहेस कारण तू विघ्नहर्ता आहेस. ह्या जगावर आलेले हे विघ्न दूर कर आणि पुन्हा सगळं आनंदी वातावरण कर,मनाची मरगळ दूर करत प्रसन्नतेची पहाट अखिल विश्वावर होऊ दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे बाप्पा..

वाट पाहतोय तुझी...

✍️सर्वेश फडणवीस

#गणपती #गणेशोत्सव

1 comment:

  1. सुंदर चित्रण।
    गणपति बाप्पा मोरया।

    ReplyDelete