Thursday, September 23, 2021

अपार पराक्रमी,शौर्यवान,आणि सुव्यवस्था ठेवणारी वीरांगना - राणी दुर्गावती ..

प्रवासात आडवाटेने जातांना एखाद्या स्मृतिस्थळाला बघतांना ज्या गौरवशाली इतिहासाची परंपरा आपल्याला लाभलेली आहे त्याबद्दल अधिक जाणून घेतल्यावर आश्चर्य वाटतं,असाच अनुभव काल नर्रई या ठिकाणी राणी दुर्गावती स्मृतिस्थळ बघतांना आला.
जबलपूर येथील बरगी डॅम च्या जवळच हे स्थान आहे."राणी दुर्गावती" हे नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावे असे आहे. इतिहास हा ऐतिहासिक असतो. हा ऐतिहासिक ठेवा पिढी दर पिढी हस्तांतरित करतांना तो मुळात आपल्याला माहिती असायला हवा. असे कायमच वाटते. मुघल शासकांना हादरवणारी एक शूरवीर वीरांगना म्हणून राणी दुर्गावती हिचे कार्य आहे. 

मध्यप्रदेश हे राज्य स्त्री राज्यकर्त्यांनी आपल्या पराक्रमाने गाजवले नव्हे तर आजही त्यांच्या पराक्रमाचा ठेवा नित्यनूतन आणि वर्धिष्णू आहे. अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि राणी दुर्गावती. या सर्व स्त्री शक्तीच्या पराक्रमाने,नेतृत्व व युद्ध कौशल्याने मुघल शासकांना अतोनात नुकसान सहन करावे लागले. 

राणी दुर्गावती हिचा जन्म राजपूत चंदेल राजा किरत राय यांच्या कुटुंबात झाला. राणी दुर्गावतीचे वडील हे सुध्दा शूरवीर योद्धे होते ज्यांनी महमूद गजनी ह्या क्रूर लुटकर्त्याचा पराभव केला होता त्यामुळे स्वाभाविकच राज्यशासन आणि युध्द कौशल्य राणी दुर्गावती यांना लहानपणापासून घरातूनच मिळाले होते. तलवारबाजी,घोडेस्वारी,नेमबाजी यातही राणी निपुण होती. ५ ऑक्टोबर १५२४ साली दुर्गाष्टमी या तिथीला जन्म झाल्यामुळे "दुर्गावती" असे तिचे नामकरण करण्यात आले. 

कालांतराने राणी दुर्गावतीचा विवाह गोंड वंशातील राजा दलपत शाह यांच्याबरोबर झाला. राजा दलपत शाह यांच्याकडे गोंडवाना राज्याची जबाबदारी त्यांचे वडील राणा संग्राम सिंह यांनी दिली होती, परंतु विवाहाच्या नेमक्या आठ वर्षानंतर राजा दलपत शाह यांचा मृत्यू झाल्याने राणीवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यावेळी राणीच्या पदरी एक मुलगा होता. राज्याची जबाबदारी राणीला खुणावत होती आणि त्यामुळे सगळे राज्य सुस्थितीत आणण्यासाठी राणी दुर्गावतीने जबाबदारी स्वीकारली आणि शेवटच्या श्वासापर्यंत राज्याचा सांभाळ केला.

मुघल शेर शाह सुरी ह्या शक्तिशाली शासकाचे राजा दलपत शहाच्या काळात निधन झाल्यानंतर त्याचे राज्य माळवा या प्रदेशावर सुजात खान याने आपले वर्चस्व प्रस्थापित करून तो जिंकून घेतला. त्यावेळी गोंडवाना राज्यावर राणी दुर्गावती ही एक महिला राज्यकर्ती आहे याची सुजात खान याला माहिती होती व त्याने दुर्गावतीला सामान्य स्त्री समजून गोंडवाना वर आक्रमण करण्याची योजना आखली पण पुढे त्यात त्याचा दारूण पराभव झाला. या ऐतिहासिक विजयामुळे राणीने नावलौकिक मिळवला. 

अकबराच्या दरबारात राणी दुर्गावतीच्या शौर्य व साहसा सोबतच  तिच्या रूप सौंदर्याची वार्ता पसरली. आजही राणीच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्यावर तिचा पूर्णाकृती पुतळा बघतांना राणीचे सौंदर्य आपण अनुभवू शकतो. गोंडवाना हा आर्थिकदृष्ट्या समृध्द प्रांत असल्याची माहितीसुध्दा मुघल शासनाला होती, अकबराने आपला सेनापती आसिफ खां याला गोंडवाना प्रदेशावर आक्रमण करण्यास नियुक्त केले व सोबतच राणी दुर्गावतीला जिवंत मुघल दरबारात हजर करण्याचा आदेश दिला. वासनांध अकबराची दृष्टी गोंडवानाच्या संपन्नेतेसोबतच राणी दुर्गावतीच्या रूपावर सुध्दा होती. पुढे आसिफ खां याने गोंडवाना प्रदेशावर सलग तीनदा आक्रमण केले तरी सुध्दा कमी सैन्यबळाच्या जोरावर राणी दुर्गावतीने त्याचे आक्रमण परतवून लावले आणि त्याचा पराभव केला.

झालेल्या घटनने आसिफ खां पेटून उठला आणि त्याने पुन्हा गोंडवाना प्रांतावर आक्रमण केले. राणी दुर्गावातीने शर्थीने लढा दिला परंतु राणी अत्यंत गंभीर जखमी झाली. तिच्या सैन्याने युध्द भूमीतून सुरक्षित जागी जावून थांबण्याचा तिला सल्ला दिला परंतु राणीने कुणाचेही न ऐकता लढा चालूच ठेवला. राणीच्या एका डोळ्याला शत्रूचा बाण सुध्दा लागला होता परंतु अखेरच्या श्वासापर्यंत ती लढत राहिली शेवटी शत्रूच्या हातून मरण्याऐवजी राणीने स्वतः ला शस्त्राघात करवून मरण स्वीकारले.

स्वाभिमानी, शूर आणि साहसी राणी दुर्गावतीला वीरमरण आले. ज्या जागी ही वीरांगना वीरमरणास प्राप्त झाली होती तेच हे स्थान आहे. आज तिथे राणीच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्मारक बांधण्यात आलेले आहे आणि तिच्या स्मृती निरंतर अनेकांना प्रेरणा देणारी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात असतांना असेच नवनवे ऐतिहासिक स्थळाना भेट देण्याची इच्छा आहे. जमेल तसे ते बघण्याचा आणि त्याबद्दल लिहिण्याचा मानस आहे. तूर्तास इतकेच..

✍️ सर्वेश फडणवीस 

माहिती स्त्रोत - आलेख इंटेक,जबलपूर आणि गुगल

3 comments: