Sunday, June 16, 2024

‘देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे’


भारतीय संस्कृती खरंतर नित्यनूतन आणि वर्धिष्णू अशीच आहे. त्या संस्कृतीच्या पाऊलखुणा वाचणे म्हणजे आंनददायी पर्वणी. आपली संस्कृती बहरली आणि लोकांनी तिला आत्मसात केली म्हणून आजही युगानुयुगे तशीच शाश्वत आहे. गेले दोन दिवस या संस्कृतीच्या पाऊलखुणा देशविदेशात बहरलेल्या बघून भारावून गेलो आहे. Deepali Patwadkar लिखित ‘देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे’ पुस्तक वाचनात आले. खरंतर पुस्तक इतके छान आणि अभ्यासपूर्ण लिहिलेले आहे की एका बैठकीत वाचूनच बाजूला ठेवले जाईल असे आहे. विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाने ही कलाकृती वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदनास पात्र आहे. 

भारतीयांच्या मनावर वारंवार असे बिंबवले गेले आहे की भारताचा इतिहास हा केवळ आक्रमणांचा इतिहास आहे. एका मागोमाग एक होणारी आक्रमणे आणि त्यांना बळी पडणारा हा देश असे चित्र सामान्य माणसाच्या डोळ्यासमोर उभे केले आहे. मात्र या पुस्तकातील सप्तयात्रांमधून अर्थात सात भागातून लक्षात येते की भारतीय इतिहास हा बाहेरून येऊन जिंकणाऱ्या आक्रमकांचा नसून, भारतातून बाहेर जाणाऱ्यांनी केलेल्या भारतीय संस्कृतीच्या प्रसाराचा इतिहास आहे.

भारताचा इतिहास 'कृण्वन्तो विश्वमार्यम्' या वेदवाक्याचे मूर्तरूप आहे आणि त्याचे प्रत्यंतर पानापानावर वाचकाला येते. भारत 'भा' म्हणजे तेज व 'रत' म्हणजे रममाण झालेला. तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत आहे. भारतीय संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती. अनेक पंथांचा आणि सर्व जमातींचा समावेश या संस्कृतीत होतो. एखादा जुना अल्बम काढल्यावर जशी विस्मृतीत गेलेली माणसे, प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात, त्यासारखी या यात्रेत आपल्याला भारतीय संस्कृतीची चिन्हे दिसतात त्यात त्याचा भौगोलिक इतिहास दिसतो. ही चिन्हे आपलीच कथा, आपलाच पराक्रम आपल्याला सांगतात. ही सगळी 'स्वस्तिचिन्हे' आहेत कारण ती- 'सु + अस्ति' म्हणजे कल्याणकारी आणि मंगलकारी चिन्हे आहेत आणि त्याबद्दल पुस्तकातुन जाणून घेतल्यावर आपण त्याचे पाईक आहोत हे बघूनच अभिमान वाटतो.

भारतीय लोक जिथे गेले, तिथे कुठेही त्यांनी-विध्वंस, मोडतोड, लूट, दरोडे, युद्ध, रक्तपात केला नाही. भारतीयांच्या पाऊलखुणा मंगल आहेत. त्यांनी मागे ठेवलेली चिन्हे- विधायक कामांची आणि सृजनशीलतेची 'स्वस्तिचिन्हे' आहेत. हे पुस्तक भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे जिथे उमटली आहेत, त्या ठिकाणी घेऊन जाणारी विजय यात्रा आहे. प्रत्येक भागात त्या त्या प्रदेशातील भारतीय संस्कृतीच्या स्वस्तिचिन्हांची ओळख होते व आपली पाळेमुळे किती दूर व खोल पसरली आहेत याचा अंदाज पुस्तक वाचतांना येतो.

भारताच्या या विश्वव्यापी पाउलखुणा म्हणजे आपल्या शाश्वत, चिरंतन मानवी मूल्यांचा आपण आपल्या चित्र, शिल्प, स्थापत्य कलांच्या माध्यमातून देशोदेशी रुजविलेला संस्कार असे म्हणता येईल. या संस्कार यात्रेचा हा साचेबद्ध संचार नुसताच विस्ताराने व्यापक होता असे नाही तर तो खूप खोलवर रुजलेला, दूरगामी परिणाम करणारा आणि बहुआयामी ही होता यांची माहिती पुस्तकातून वाचकाला होते. 

प्राचीन काळापासून साधारणपणे तेराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती जिथे जिथे पोचली, त्या भूभागाला बृहत्तर भारत असं संबोधलं गेलं. त्या भूभागाचे दीपाली पाटवदकर यांनी सात भाग केले आणि त्याला वायव्यशल्य, उत्तरकुरू, ईशान्यसूत्र, पूर्वमित्र, आग्नेयपुराण, दक्षिणद्वीप, पश्चिमगाथा अशी नावे दिली आहे. त्या सात भागात त्यांनी अंतर्भाव केला तो पाकिस्तान,अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, शिनजियांग, चीन, मंगोलिया, कोरिया, जपान, तिबेट, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम,इंडोनेशिया, अंदमान, निकोबार, श्रीलंका, लक्षद्वीप, मालदीव, मॉरिशस, इराण, इराक, इजिप्त, ग्रीस, रोम, युरोप, या सुमारे ३१ देशात वा द्वीपात आजही इतक्या वर्षांनंतर आढळून येणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणांचा वेध घेण्याचा प्रयत्न दिपाली पाटवदकर यांनी केला आहे.

खाद्य संस्कृती, रांगोळी, अंक मोजण्याची पद्धत, कालगणनेची पद्धत, शिल्पकरायची पद्धत, स्थापत्य पद्धत, नृत्य-गायन- वादन-जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या परंपरा या सर्वांचा समावेश या पुस्तकात आहे, आणि त्याचे सचित्र पुरावे या पुस्तकातून वाचकाला समृद्ध करतात. दीपाली पाटवदकर एके ठिकाणी छान लिहितात, “ कोणतेही कर्तेपण न घेता भारतीयांनी ज्ञानाची कोठारे भरली. ज्ञान नुसते साठवले नाही, तर ते दोन्ही हातांनी भरभरून वाटले!मुक्तहस्ताने, कसलीही अपेक्षा न ठेवता, ज्ञानदान केले. भारताने गीतेतील निष्काम कर्माचे धडे नुसते दिले नाहीत, तर ते जगून दाखवले. रामदास स्वामींच्या उक्तीनुसार 'जे जे आपणासी ठावे, ते ते सकळांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे सकल जन' हे व्रत भारतीयांनी सहज पाळले.”

अशा या भरतभूमीत जन्माला येणं खरंतर ही भाग्याची गोष्ट म्हणायला हवी. योगी अरविंद speeches of Shri Aurobindo मध्ये म्हणतात, आज जगाला भारताच्या भविष्याची जाणीव झाली आहे.

The sun of India would rise..overflow the World.(speeches of Shri Aurobindo)

भारताचा सूर्य उगवेल व सर्व जगाला प्रकाशाने भारुन टाकेल हे त्यांचे उद्गार महत्त्वाचे आहेत आणि हे पुस्तक वाचून बृहत्तर भारताची पूर्ण कल्पना लक्षात येते. सांस्कृतिक, एकात्म भारताची व्याप्ती लक्षात येते. अत्यंत सहज शब्दांत आणि ससंदर्भ असलेले पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असावं असंच आहे.

देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे
पुस्तकासाठी संपर्क :  www.kalaapushpa.com

सर्वेश फडणवीस

No comments:

Post a Comment