रामकथेत भरताचे चरित्र मोठे उज्ज्वल आणि आदर्श आहे. त्याच्या ठिकाणी कोणताही दोष दिसून येत नाही आणि वाल्मीकि- रामायणात त्याला श्रीविष्णूंचा अंशावतार म्हणून दर्शविले आहे. त्याच बरोबर भरताचे चरित्र त्याला एक सज्जन श्रेष्ठ, आदर्श स्वामिभक्त, महात्मा, नि:स्पृह आणि भक्तिप्रधान कर्मयोगी म्हणून सिद्ध करते. भरत हा धर्म आणि नीती जाणणारा, सद्गुणसंपन्न, त्यागी, संयमी, सदाचरणी, प्रेम आणि विनम्रतेची साक्षात मूर्ती, श्रद्धाळू आणि अतिशय बुद्धिमान म्हणून दर्शविली आहे. वैराग्य, सत्य, तप, क्षमा, तितिक्षा (सहन करण्याची शक्ती), दया, वात्सल्य, धैर्य, शौर्य, गांभीर्य, ऋजुता, सौम्यता, माधुर्य, निगर्वीपणा, मैत्री, इत्यादी गुणांचा त्याच्या ठिकाणी विलक्षण विकास झालेला दिसतो.
अयोध्येत दशरथ राजा रामाच्या विरहाने दु:खी असतात. त्यांना श्रावणकुमाराच्या पित्याच्या शापाची आठवण होते. तेवढ्यात सुमंताकडून श्रीराम चित्रकुट पर्वतावर आहेत हे कळताच राम राम करत ते आपला प्राण सोडतात. अयोध्या शोकसागरात बुडते. भरत -शत्रुघ्नला आणण्यासाठी दूत पाठविण्यात येतो. भरत अयोध्येत येतो, तेव्हा त्याला अयोध्या अतिशय शांत भासते. त्याला नगरीतलं चैतन्य हरपले आहे असे वाटते. पित्यासाठी शोक करणाऱ्या भरताच्या हृदयात श्रीरामाविषयीचे प्रेम उफाळून येताना दिसते. तो म्हणू लागतो.
यो मे भ्राता पिता बन्धुर्यस्य दासोऽस्मि सम्मतः ।
तस्य मां शीघ्रमाख्याहि रामस्याक्लिष्टकर्मणः ।।
पिता हि भवति ज्येष्ठो धर्ममार्यस्य जानतः ।
तस्य पादौ ग्रहीष्यामि स हीदानीं गतिर्मम ।।
( वा० रा० २ । ७२ । ३२-३३)
जे माझा भाऊ, माझा पिता आणि माझा बंधू आहेत, ज्यांचा मी
परमप्रिय दास आहे, जे पवित्र कर्म करणारे आहेत त्या श्रीरामाला आपण माझ्या येण्याची सूचना त्वरित द्या. धर्म जाणणाऱ्या श्रेष्ठ मनुष्याच्या दृष्टीने ज्येष्ठ बंधू पित्याप्रमाणे असतो. मी त्यांच्या चरणांना वंदन करीन. आता ते माझे आश्रयस्थान आहेत.'
यावर कैकेयीने त्याला सर्व घटना सांगितल्या आणि राज्याचा स्वीकार करावयास सांगितले. कैकेयीच्या तोंडून अशाप्रकारे बंधूंच्या वनगमनाची बातमी ऐकून भरत अत्यंत दुःखाने संतापून जातो. व्याकूळ अंत:करणाने तो आईला बरेच काही अपशब्द बोलतो. श्रीरामास पुन्हा अयोध्येस आणीन, अशी शपथ घेतो. पुढे भरत आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार करतो आणि श्रीरामांना अयोध्येत परत आणण्यासाठी चित्रकुटावर जाण्याचा निश्चय करतो. तिकडे गेल्यावर श्रीराम म्हणतात,
जानामि भरतं क्षान्तं गुरुसत्कारकारिणम् ।
सर्वमेवात्र कल्याणं सत्यसन्धे महात्मनि ।।
अनेन धर्मशीलेन वनात् प्रत्यागतः पुनः ।
भ्रात्रा सह भविष्यामि पृथिव्याः पतिरुत्तमः ।।
वृतो राजा हि कैकेय्या मया तद्वचनं कृतम् ।
अनृतान्मोचयानेन पितरं तं महीपतिम् ।।
(वा० रा० २ । १११ । ३०-३२)
भरत हा मोठा क्षमाशील आणि गुरुजनांचा सन्मान करणारा आहे हे मी जाणतो. ह्या सत्यप्रतिज्ञ महापुरुषाच्या ठिकाणी कल्याणकारी असे सर्व आहेत. वनवासाचा कालावधी संपवून मी जेव्हा परत येईन, त्यावेळी मी आपल्या ह्या धार्मिक भावाबरोबर ह्या पृथ्वीचा सम्राट होईन. कैकेयीने राजाकडे वर मागितला, मी त्यांच्या आज्ञेचा स्वीकार केला. म्हणून बंधू भरता ! आता माझे म्हणणे मान्य करून त्या पृथ्वीपती राजाधिराज बाबांना असत्याच्या बंधनातून मुक्त कर.' अतुलनीय अशा त्या तेजस्वी बंधूंचा तो रोमांचकारी संवाद ऐकून आणि आपापसातील प्रेमपूर्ण वर्तन पाहून तेथे उपस्थित जनसमुदायासह सगळे महर्षी आश्चर्यचकित आणि मंत्रमुग्ध झाले. अदृश्यरूपाने अंतरिक्षात प्रकट झालेले मुनी आणि तेथे प्रत्यक्ष बसलेले महर्षी त्या दोघा बंधूंची अतिशय प्रशंसा करू लागले.
ह्यानंतर सर्व महर्षीनी श्रीरामांचे म्हणणे मान्य करण्यासाठी भरताची समजूत घातली. त्यामुळे श्रीरामांना अतिशय आनंद झाला, परंतु भरताचे मात्र समाधान झाले नाही. तो अडखळणाऱ्या शब्दांनी हात जोडून पुन्हा श्रीरामांना म्हणाला 'आर्य , मी ह्या राज्याचे संरक्षण करू शकणार नाही. ह्या राज्याचा स्वीकार करून आपण त्याच्या पालनाचा भार दुसऱ्या कुणावर तरी सोपवा.' असे म्हणून भरत आपल्या भावाच्या चरणांवर पडला. त्यांचा दृढनिश्चय पाहून भरताने म्हटले,
अधिरोहार्य पादाभ्यां पादुके हेमभूषिते ।
एते हि सर्वलोकस्य योगक्षेमं विधास्यतः ।
आर्य, ह्या ज्या दोन सुवर्णभूषित पादुका आहेत, ह्यांवर आपले चरण ठेवा. ह्याच संपूर्ण जगताच्या कल्याणाचा निर्वाह करतील. खरंतर धन्य आहे भरताची ही सर्वश्रेष्ठ श्रद्धा. भगवान श्रीरामचंद्रांनी त्या पादुकांवर आपले पवित्र चरणयुगल ठेवून भरताला त्या दिल्या. त्या पादुकांना नमस्कार करून भरताने श्रीरामांना म्हटले
चतुर्दश हि वर्षाणि जटाचीरधरो ह्यहम् ।।
फलमूलाशनो वीर भवेयं रघुनन्दन ।
तवागमनमाकाङ्क्षन् वसन् वै नगराद् बहिः ।।
तव पादुकयोर्न्यस्य राज्यतन्त्रं परंतप ।
चतुर्दशे हि सम्पूर्णे वर्षेऽहनि रघूत्तम ।।
न द्रक्ष्यामि यदि त्वां तु प्रवेक्ष्यामि हुताशनम् ।
( वा० रा० २ । ११२ । २३ - २६)
'वीर रघुनंदन, मी सुद्धा चौदा वर्षांपर्यंत जटा आणि वल्कले धारण करून कंदमुळे - फळे भक्षण करीन आणि आपल्या येण्याची वाट पाहत नगराच्या बाहेरच राहीन. परंतू येवढ्या दिवसांपर्यंत राज्याची संपूर्ण धुरा आपल्या या चरणपादुकांवरच राहील. रघुश्रेष्ठ चौदा वर्षे पूर्ण होताच, त्यादिवशी जर मला आपले दर्शन झाले नाही तर मी धगधगणाऱ्या अग्नीत प्रवेश करीन.'
भरताची ही प्रतिज्ञा ऐकून भगवंतांनी मोठ्या प्रसन्नतेने दुजोरा दिला. त्यानंतर दोघा बंधूंना अर्थात भरत आणि शत्रुघ्न यांना कैकेयी मातेशी चांगले वर्तन करण्याचा उपदेश करून आणि हृदयाशी धरून आलिंगन देऊन निरोप दिला. त्यावेळी बंधू भरताच्या वियोगाने श्रीरामचंद्रांचे डोळे पाण्याने भरून आले. त्यानंतर भगवंतांच्या पादुका मस्तकावर धारण करून भरत मोठ्या आनंदाने रथावर आरूढ झाला.
वास्तविक भरताची रामभक्ती जगाच्या इतिहासात अद्वितीय आहे. भरताचा त्याग, संयम, व्रत, नियम - सर्व काही स्तुत्य आणि अनुकरण करण्यास योग्य आहे. त्याच्या चरित्रातून स्वार्थ त्याग, विनय, सहिष्णुता, गांभीर्य, सरलता, क्षमा, वैराग्य आणि स्वामिभक्ती इत्यादी सर्व गुणांचा बोध घेता येतो. भक्तीसह निष्काम भावनेने गृहस्थाश्रमात राहून सुद्धा प्रजापालन करण्याचे असे सुंदर उदाहरण इतरत्र मिळणे कठीण आहे. म्हणून भरताचे वेगळेपण लगेच डोळ्यात भरणारे आहे.
सर्वेश फडणवीस
#ramnavmi25 #Day6 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏