रामकथेतील शत्रुघ्नाचे चरित्र देखील त्याच्या परीने थोडे वेगळे आहे. वाल्मीकी रामायणात शत्रुघ्न चरित्रातून हेच सिद्ध होते की तो श्रीरामांच्या दासानुदासांमध्ये अग्रक्रमावर होता. शत्रुघ्न शांतपणे काम करणारा, प्रेमळ, सदाचरणी, मितभाषी, सत्यवादी, विषयांच्या बाबतीत वैराग्यशील, सरल, तेजस्वी, गुरुजनानुयायी आणि शूर होता. वाल्मीकी रामायणात त्याच्याविषयी विशेष विवेचन दिसून येत नाही; परंतु जे काही उपलब्ध आहे, त्यावरून त्याच्या विषयी थोडा निष्कर्ष काढता येऊ शकतो.
बालपणापासूनच तो भरताच्या सहवासात अधिक राहत होता; म्हणून भरताचे आणि ह्याचे चरित्र एकाच वेळी चित्रित झालेले दिसते. ह्याच्याविषयी काही विशेष अशी गोष्ट रामायणात वेगळी
सांगितलेली नाही. ह्याच्या गुणांचे आणि चारित्र्याविषयीचे अनुमान भरताच्या वागणुकीशी करता येईल. बालकाण्डात त्याच्या प्रेमाविषयी वर्णन करताना म्हटले आहे -
अथैनं पृष्ठतोऽभ्येति सधनुः परिपालयन् ।
भरतस्यापि शत्रुघ्नो लक्ष्मणावरजो हि सः ।।
( वा० रा० १ । १८ । ३२)
ज्याप्रमाणे लक्ष्मण हातात धनुष्य घेऊन श्रीरामचंद्रांचे रक्षण करीत त्यांच्या मागोमाग जात असे, त्याचप्रमाणे लक्ष्मणाचा धाकटा भाऊ शत्रुघ्न देखील भरताच्या मागोमाग जात असे.'
एकदा भरताला त्याचा मामा युधाजित आपल्या देशात घेऊन जात असताना शत्रुघ्न देखील त्याच्याबरोबर आजोळी गेला. त्यावेळी भरतावरील प्रेमामुळे माता-पिता, भाऊ आणि नवविवाहित पत्नीविषयी कोणत्याही प्रकारचा मोह न बाळगता आपला बंधू भरत ह्याच्याबरोबर राहणेच आपले परमकर्तव्य आहे असे त्याने मानले. अयोध्येहून बोलावणे आल्यावर भरताबरोबर तो पुन्हा परत आला. अयोध्येला पोहोचल्यानंतर कैकेयीकडून पित्याच्या मरणाचे वृत्त तसेच लक्ष्मण आणि सीतेसह श्रीरामांच्या वनवासाचे वृत्त ऐकून त्याला देखील फार दुःख झाले. बंधू लक्ष्मणाच्या शौर्याची त्याला चांगली ओळख होती, चित्रकूट पर्वतावरून पादुका घेऊन अयोध्येला परत फिरताना दोन्ही भावांनी श्रीरामांना-प्रदक्षिणा घातली व त्यांच्या चरणांना वंदन करून ते त्यांना भेटले. लक्ष्मणाप्रमाणे शत्रुघ्नाचा स्वभाव देखील कडक होता. कैकेयीच्या बाबतीत त्याच्या मनात राग होता. श्रीराम ही गोष्ट जाणत होते. म्हणूनच निरोप देताना श्रीरामांनी शत्रुघ्नाला वत्सलतेने उपदेश करीत म्हटले -
मातरं रक्ष कैकेयीं मा रोषं कुरु तां प्रति ।।
मया च सीतया चैव शप्तोऽसि रघुनन्दन ।
(वा० रा० २ । ११२ । २७-२८)
'रघुनंदन शत्रुघ्ना, तू कैकेयी मातेची सेवा कर, तिच्यावर कधी रागावु नकोस, माझी आणि सीतेची तुला अगदी शपथ आहे.' यावरून लक्षात येते की श्रीरामांवर शत्रुघ्नाचे केवढे प्रेम आणि भक्तिभाव होता. ह्यानंतर शत्रुघ्न भरताबरोबर अयोध्येला परत येऊन अगदी त्याच्या आज्ञेप्रमाणे राज्य आणि कुटुंबाची सेवा करीत राहिला. भरताजवळ राहून शत्रुघ्न त्याच्या आज्ञेची वाट पाहात असे. भरताला त्याच्याविषयी मोठा विश्वास होता. म्हणूनच अगदी छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे काम करण्यासाठी तो शत्रुघ्नालाच आज्ञा करीत असे.
ह्यानंतर श्रीराम वनवास संपवून अयोध्येला परत येईपर्यंत शत्रुघ्नाविषयी वाल्मीकि रामायणात विशेष उल्लेखनीय अशी गोष्ट आढळून येत नाही. हनुमंताकडून श्रीरामचंद्रांच्या आगमनाची बातमी समजताच भरताच्या आज्ञेनुसार शत्रुघ्नानेच श्रीरामांच्या स्वागताची व्यवस्था आणि नगर सजवण्याची तसेच राजरस्ते आणि इतर सर्व रस्ते नीटनेटके करण्याची व्यवस्था केली होती.
वाल्मीकी रामायणात कथा येते की, शत्रुघ्नाने लवणासुरावर स्वारी केली आणि लवणासुराला ठार मारून तेथेच उत्तम प्रकारची मधुरापुरी नावाची सुंदर नगरी वसवून त्याच्या राज्याची व्यवस्था करून बारा वर्षांनी श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी शत्रुघ्न तेथून अयोध्येकडे परत फिरला. येताना पुन्हा शत्रुघ्न वाल्मीकी ऋषींच्या आश्रमातच थांबला. सकाळ होताच नित्य कर्म केल्यानंतर मुनींची आज्ञा घेऊन श्रीराम दर्शनाच्या उत्कंठेने तो अयोध्येकडे निघाला. अयोध्येला पोहोचल्यानंतर तो श्रीरामांच्या महालात आला; तेथे आसनावर विराजमान झालेल्या श्रीरामांना त्याने प्रणाम केला आणि म्हणाला की, 'भगवन आपल्या आज्ञेनुसार लवणासुराला मारून मी तेथे नगर वसवून आलो आहे.'
द्वादशैतानि वर्षाणि त्वां विना रघुनन्दन ।
नोत्सहेयमहं वस्तुं त्वया विरहितो नृप ।।
स मे प्रसादं काकुत्स्थ कुरुष्वामितविक्रम ।
मातृहीनो यथा वत्सो न चिरं प्रवसाम्यहम् ।।
(वा० रा० ७ । ७२ । ११-१२)
'महाराज रघुनाथा, ही बारा वर्षे आपल्या विरहात मी मोठ्या कष्टाने घालवली आहेत. म्हणून आपल्याशिवाय तेथे आता मी निवास करू इच्छित नाही. म्हणून महापराक्रमी श्रीरामा, आपण माझ्यावर अशी कृपा करा की, आपल्यापासून वेगळा होऊन कोठेच राहू नये.' शत्रुघ्नाचे हे बोलणे ऐकून श्रीरामांनी त्याला हृदयाशी धरले आणि म्हटले - 'हे वीरा , तू दुःख करू नकोस, ते क्षत्रियाच्या स्वभावाला शोभून दिसत नाही. क्षात्रधर्माप्रमाणे तुला प्रजेचे पालन केले पाहिजे. मला भेटण्यासाठी वेळोवेळी येत जा.' अशाप्रकारे भगवान श्रीरामांच्या आज्ञेने शत्रुघ्नाने दीनवाणेपणाने त्यांचे म्हणणे मान्य केले. नंतर भरत आणि लक्ष्मणाला भेटून तसेच सर्वांना वंदन करून तो मधुरापुरीला परत गेला. त्यानंतर भगवंत जेव्हा परमधामाला जायला निघाले, त्यावेळी शत्रुघ्नाला बोलवले गेले. तेव्हा आपल्या पुत्रांना राज्याभिषेक करून शत्रुघ्न अयोध्येला येऊन पोहोचला आणि श्रीरामांजवळ जाऊन त्यांना वंदन करून सद्गदित स्वरात म्हणाला
कृत्वाभिषेकं सुतयोर्द्वयो राघवनन्दन
तवानुगमने राजन् विद्धि मां कृतनिश्चयम्
न चान्यदद्य वक्तव्यमतो वीर न शासनम् ।
विहन्यमानमिच्छामि मद्विधेन विशेषतः ।।
(वा० रा० ७ । १०८ । १४-१५)
'महाराज रघुनाथा, आपल्या दोन्ही पुत्रांना राज्याभिषेक करून मी आपल्याबरोबर येण्याचा निश्चय करून आलेलो आहे. हे वीर, आपण आता मला दुसरी कोणतीही आज्ञा करू नये; कारण कोणाकडूनही विशेषत: माझ्यासारख्या अनुयायाकडून आपल्या आज्ञेचे उल्लंघन व्हावे अशी माझी इच्छा नाही. मी अद्यापपर्यंत आपली आज्ञा मोडली नाही. म्हणून आता देखील तसे करावयास लागू नये, त्याचे आपणच रक्षण करावे. '
भगवान श्रीरामांनी शत्रुघ्नाची विनंती ऐकली व शत्रुघ्न सुद्धा श्रीरामांच्या बरोबरच परमधामाकडे निघून गेला. शत्रुघ्नाचे हे छोटेसे व्यक्तिचित्र केवळ वाल्मीकि रामायणाच्या आधाराने लिहिले आहे. ह्यात दुसऱ्या कोणत्याही रामायणातील किंवा इतर कोणतीही कथा नाही. त्यामुळे कदाचित त्याच्या प्रेम आणि गुणांविषयींचा इतर भाग समोर आला नाही; याची जाणीव आहे परंतु त्यासाठी क्षमायाचनेशिवाय मी दुसरे काय करू शकतो?
सर्वेश फडणवीस
#ramnavmi25 #Day7 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏
No comments:
Post a Comment