Saturday, March 20, 2021

अनाथांची माई : सिंधुताई सपकाळ


सिंधुताई सपकाळ हे नाव आज प्रत्येक मराठी मनावर रुंजी घालणारे आहे. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या सिंधुताई सपकाळ आज हजारो अनाथ मुलांची माई म्हणून आपल्याला दिसतात त्यांचा प्रवास ही शून्यातून विश्वनिर्मितीचा आहे. या वर्षी पद्मश्री पुरस्काराने त्या अलंकृत झाल्या आहेत.

सिंधुताईंचा खरा परिचय रेल्वेत भीक मागणारी बाई आणि रात्री भीक मागणाऱ्यांना जेऊ घालणारी बाई एवढीच एक ओळख होती. त्यांना गाणं म्हटले की खायला मिळायचं. रात्रीची खूप भीती वाटायची. त्यामुळे जेऊन झाल्यावर सर्व भिकारी झोपून जायचे आणि त्यामुळे त्या स्मशानात जायच्या. कारण त्यांना एक माहिती होते की भूताच्या भीतीने स्मशानात कोणी येत नाही आणि त्यामुळे स्मशानात अंधार, ओरडणारे पक्षी, गाडलेलं प्रेत आणि जळणार्‍या प्रेतावर भाकरी भाजणारी अशा सिंधुताई होत्या. त्यांच्या बद्दल वाचतांना,प्रसंगी बघतांना त्या कल्पनेने अंगावर काटा येतो.

आपल्या आत्मचरित्र 'मी वनवासी ' मध्ये लिहितात," तेव्हा मी जगले तेव्हा समजलं की अनुभव हाच जगण्याची खात्री आहे. ही वेळ इतर कोणत्याही बाईवर येऊ नये एवढंच वाटते. मी निर्धार केला आणि शपथ घेतली आणि पुढे अनाथांची माय झाले”, असे अनेक प्रसंग आणि अंगावर काटा आणणारा प्रवास त्यांनी आत्मचरित्रातून उलगडला आहे.

मानवतेची केवळ भाषा न करता, ती कृतीतून साकारणाऱ्या सिंधुताई 'अनाथांच्या माई' आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत, आयुष्याला दोष न देता, त्यावर मात करीत सिंधुताईंनी उभे केलेले काम प्रशंसनीय आणि वंदनीय आहे. त्यांची कहाणी महाराष्ट्राला काही नवीन नाही. खुद्द त्यांच्या भाषणांतून, त्यांच्यावरील लेखनांतून आणि चित्रपटातून ते सर्वांसमोर आहेच. आज पद्मश्री बहाल करत केंद्र सरकारने त्यांची दखलच घेतली आहे आणि त्यांच्या कार्याची जगाला ओळख करून दिली आहे. 

सिंधुताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय असली, तरी प्रेरक आहे. कोवळ्या वयातील विवाह, त्यानंतर मुलांचा जन्म, मुलांना वाढवितानाच करावे लागणारे काबाडकष्ट, घरात आणि दारात होणारी उपेक्षा. विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे जन्मलेल्या सिंधुताईंची कथा याहून वेगळी नाही; परंतु त्यांनी अन्यायाला वाचा फोडली. शेण काढणाऱ्या महिलांना मजुरी मिळत नसल्याबद्दल त्यांनी आवाज उठविला; परंतु त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. त्यांचे चारित्र्य मलिन करणारे आरोप झाले, सासरच्यांनीही साथ सोडली अन् तिथून सुरू झाला सिंधुताईंचा संघर्ष.  हा संघर्ष म्हणावा तसा सोपा नव्हताच. पण इतका संघर्ष करून आज त्या हिमालयाच्या सावलीसारख्या आहेत. जगावेगळा प्रपंच त्यांनी सुरू केला आणि आज सिंधुताईं सारखी विदर्भकन्या, अनाथांची माय झाली आहे. माईनी अनेक अनाथ मुलांना वाढवले, शिक्षण दिले, जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे… घेता घेता देणा-याचे हात घ्यावे.

समाजासाठी जीवन अर्पित करणारी आधुनिक समाजसेविका म्हणजे सिंधुताई सपकाळ ह्यांना परमेश्वराने निरामय आरोग्य प्रदान करावे हीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे. वयाच्या या टप्प्यावर असतांना आजही माईंचा अखंड प्रवास सुरु आहे. सिंधुताई सपकाळ कायम म्हणतात ..
दूध में पकाये चावल तो उसे खीर कहते है ।
मोहब्बत मे खाये ठोकर तो उसे तकदीर कहते है ।।
लकीर की फकीर हू मै उसका कोई गम नही ।
नही धन तो क्या हुवा इज्जत तो मेरी कम नही ।।

✍️ सर्वेश फडणवीस

#पद्म_गौरव #padmashri #sindhutaisapkal
#prideofsocialwork #prideofmaharashtra
#PeoplesPadma

Tuesday, March 16, 2021

आदर्श गाव निर्माण करणारे - श्यामसुंदर पालीवाल


राजस्थान मधील पिप्लंत्री ह्या गावातील माजी सरपंच श्री श्याम सुंदर पालीवाल ह्यांना ह्यावर्षी अलौकिक समाजकार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने अलंकृत करण्यात आले आहे. आदर्श ग्राम संकल्पना त्यांनी ज्या पद्धतीने साकारली आहे त्याचे कौतुक आज जगभरात होत आहे आणि देशातील आदर्श गाव म्हणून पिप्लंत्री सर्वमान्य झाले आहे.

श्री श्यामसुंदर पालीवाल नुकतेच कर्मवीर म्हणून कौन बनेगा करोडपती मध्ये येऊन गेले आहे. अमिताभ बच्चन ह्यांनी सुद्धा त्यांच्या कामाचा गौरव केला आहे तसेच मन की बात मध्ये नरेंद्र मोदी ह्यांनी सुद्धा त्यांच्या कामाला शाबासकी दिली आहे. त्यांचे कार्य खरंतर सहज सोपे वाटावे असे आहे. आपल्या घरी मुलगी जन्माला आली तर आपण काय करतो ? काही जण आनंदीत होतात आणि त्या आनंदात मिठाई-पेढे वाटतात काही जण मुलगीच झाली म्हणून निराश होतात पण राजस्थान मधील पिप्लंत्री ह्या गावात मुलगी झाली तर १११ झाडे लावली जातात. ऐकून आश्चर्य वाटेल पण आजही तिथे मुलीच्या जन्माचे स्वागत हे १११ झाडे लावूनच केले जाते. ती झाडे सगळेजण एकत्रितपणे जगवतात आणि त्यामुळे एकत्रित येत मुलीच्या शिक्षणाची सोय ही केल्या जाते.

विद्यमान केंद्र सरकारने 'बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा उपक्रम २०१४ मध्ये सुरू केला. या उपक्रमाचे स्वागत देशात सर्वदूर झाले
परंतु, पिप्लंत्री गावात त्याआधी कित्येक वर्षं मुलीचा जन्म साजरा करण्याची पद्धत आहे. अनिष्ट रूढी परंपरा बदलण्यासाठी केवळ धाडस असून उपयोग नाही, तर योग्य विचार आणि त्याची सामाजिक प्रगतीशी सांगड घालता आली पाहिजे; ज्यायोगे केवळ कौटुंबिक पातळीवर हे बदल मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाने हे सहज शक्य आहे आणि हेच कार्य श्री श्यामसुंदर पालीवाल यांनी आपल्या प्रयत्नातून सत्यात उतरवले आहे.

खरंतर आज कन्या भ्रूण हत्या हा देशासमोर ज्वलंत प्रश्न होता. राजस्थान प्रदेश हा नेहमीच आपल्या पुरुषप्रधान संस्कृती,रूढी परंपरा,हुंडाबळी, बालविवाह यांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे.
पिप्लंत्री गावामध्येही राजस्थानच्या इतर गावांप्रमाणेच स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण अधिक होतं, कुटुंबामध्ये मुलीच्या जन्माबाबत लोक अत्यंत उदासीन होते. श्यामसुंदर पालीवाल ह्यांच्या मुलीचे काही वर्षांपूर्वी दुःखद निधन झालं. आपल्या मुलीच्या निधनाने व्यथित झालेल्या श्यामसुंदर पालीवाल यांच्यामुळे परिवर्तनाची नांदी सुरू झाली आणि आज प्रदेशातील चित्र बदलले आहे.

आज पिप्लंत्री गावातील लोकांना समजावून त्यांना प्रसंगी प्रोत्साहन देवून गावातील घरात मुलीचा जन्म आणि मुलगी का हवी ह्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले आहे. आता पिप्लंत्री गावामध्ये एखाद्या कुटुंबात मुलगी जन्माला आली की सर्व गावकरी मिळून रु. २१,००० व नवजात मुलीचे पालक रु. १०,००० असे ३१,००० रुपये त्या मुलीच्या नावे मुदत ठेवीच्या स्वरुपात ठेवतात. या बरोबरच, मुलीचे पालक एक प्रतिज्ञापत्र करतात की ते मुलीला १८ वर्षं पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न करणार नाही यामुळे, केवळ त्या मुलीच्या भवितव्याची आर्थिक तरतूद केली जात नाही तर पालकांवर पण बंधन येते की त्यांनी आपल्या मुलीला सक्षम करून १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मगच तिचे लग्न करायचे.

ह्या सगळ्या बदलाची सुरुवात २००६ साली सुरू झाली ज्यावेळी श्यामसुंदर पालीवाल हे गावाचे सरपंच झाले. पिप्लंत्री गावाचा हळूहळू कायापालट होतो आहे. आज पिप्लंत्री गाव हिरवेगार झाले आहे. जवळपास ४ लाख हुन अधिक झाडे गावात आहेत. वाळवंटातील हा बदल श्यामसुंदर पालीवाल ह्यांनी घडवला आहे. पिप्लंत्री गावात आज वर्षाला जवळपास ५० हुन अधिक मुलींचा जन्म होतो आणि प्रत्येक मुलीच्या जन्माचे स्वागत १११ झाडे लावून होते. पिप्लंत्री गावात वड, पिंपळ, आंबा, कडुनिंबाची झाडे दूरदूर पर्यन्त पसरली आहे. त्या सोबतच झाडांच्या अवतीभवती कोरफडीची लागवड सुद्धा केली जाते. कोरफडीच्या लागवडींने गावात आर्थिक उद्योग ही उदयाला आला आहे त्यातून गावाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत झाली आहे.

श्यामसुंदर पालीवाल ह्यांच्या दूरदृष्टी आणि व्यापक विचारांचा सकारात्मक परिणाम पिप्लंत्री गावाच्या रूपाने संपूर्ण जगाला दिसला आणि छोट्या पण सातत्याने पूर्ण करण्याच्या विश्वासाने कार्य करणाऱ्या माजी सरपंच श्यामसुंदर पालीवाल यांना निरामय आरोग्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

✍️ सर्वेश फडणवीस

#पद्म_गौरव #padmashri #shyamsunderpaliwal
#prideofsocialwork #prideofrajasthan
#PeoplesPadma

Saturday, March 13, 2021

शोध नव्या भारताचा ..

बऱ्याच दिवसांनी पुस्तकावर लिहितोय कारण हे पुस्तक पाहताक्षणीच वाचण्याची इच्छा झाली आणि अनेकांनी वाचावे आणि संग्रही ठेवावे म्हणून हा लेखप्रपंच. पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर लिखित " Reinventing india "  या इंग्रजी पुस्तकाचा भावानुवाद म्हणजे "शोध नव्या भारताचा" पुस्तक आहे. डॉ.रघुनाथ माशेलकर यांची ओळख वैज्ञानिक अशी आहेच पण ते केवळ वैज्ञानिकच नाही तर एक विचारवंत देखील आहेत आणि भविष्याचा अचूक वेध घेणारे वैज्ञानिक विचारवंत म्हणून डॉ.माशेलकर ह्यांचा उल्लेख करता येईल कारण हे पुस्तक म्हणजे नव्या भारताची जाणीव करून देणारे आहे. त्यांनी दिलेल्या व्याख्यान आणि लेखांचे एकत्रित केलेले संकलन म्हणजे हे पुस्तक आहे. १९९६ ते २००९ ह्या दरम्यान त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचा आणि काही लेखांचा ह्यात समावेश आहे. ज्यावेळी आपण हे वाचतो त्यावेळी ते वाचतांना वैज्ञानिकाच्या भूमिकेतील व्यापक दृष्टीकोन प्रत्येक पानावर जाणवतो.  

कोरोनानंतर आत्मनिर्भर भारताची वाटचाल सुरू झाली आणि आज आपला प्रवास विकसन देशाकडून विकसित देशाकडे सुरु आहे. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेण्याचे बळ आपल्या पंखात असायला हवे आहे असेच आज प्रत्येकाला वाटते. आज भारत सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख होऊ लागली आहेच शिवाय बौद्धिक ज्ञान आपल्याकडे विपुल आहे. प्राचीन ऐतिहासिक,संस्कृती ठेवा, एकत्रित समाज व्यवस्था,कौटुंबिक पाठबळ ह्याची श्रीमंती आपल्याला पिढी दर पिढी मिळाली आहे आणि ह्या सगळ्यांच्या एकत्र येण्याने आज एक भारत श्रेष्ठ भारताचा उदय होतो आहे. 

पण तरीही वाढती लोकसंख्या,दारिद्र्य,अन्न,वस्त्र,निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा,जाती - धर्माच्या भिंती,सामाजिक कारणावरून होणाऱ्या दंगली,हिंसाचार,पर्यावरणाचा ऱ्हास, विजेचे संकट अशी आव्हानेही आहेत. यावर आपल्याला मात करीत भारताला प्रगतीच्या वाटेवर कसे नेता येईल हे स्वप्न दाखवीत ते पूर्ण करण्यासाठी काय करावे लागेल, याचा मंत्र डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी "शोध नव्या भारताचा" ह्या पुस्तकांत दिला आहे . बऱ्याच ठिकाणी वाचतांना आश्चर्य वाटत कारण काहीअंशी आपण त्यांनी सांगितलेल्या उपाय अमलात आणत आहोत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी दाखवलेले स्वप्न आज पूर्णत्वास जात आहे. सहा विभाग असलेल्या पुस्तकांत प्रत्येक विभागात पांच प्रकरणे दिली आहेत. स्वप्नातील भारत घडवताना त्यांनी नव्या सहस्त्रकातील पंचशील सांगितले आहेत

१)विद्यार्थीकेंद्रित शिक्षण(Child Centred Education)
२)महिलाकेंद्रित कुटुंब(Woman Centred Family)
३)मानवकेंद्रित विकास(Human Centred Development)
४)ज्ञानकेंद्रित समाज,(Knowledge Centred Society)
५)नवनिर्मितीकेंद्रित भारत ( Innovation Centred India)

या पंचशीलाचा वापर करून नवीन भारताची निर्मिती कशी करता येईल, हे यात प्रामुख्याने सांगितले आहे. वाचताना जाणवते की, विद्यमान सरकार ह्या पंचशीलावर काम करत आहे. २१ शतक हे भारताचे असेल अशी त्यांना खात्री आहे पण ते तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण थोडं मागे जाऊ आणि आपल्यामध्ये पायाभूत/मूलभूत(Basics) सुधारणा केल्यावर हे शक्य होईल असे त्यांना वाटते. 

आज आपण नक्कल करण्यापेक्षा शोध,संशोधन करून नवनिर्मिती करण्याची गरज आहे. कल्पनांची भूमी असलेला भारत अमेरिकेप्रमाणे संधीचा देश बनायला हवा, तंत्रज्ञान व उद्योग यांची सांगड घालायला हवी. जर प्रत्येकाला संधी दिली तर प्रत्येक भारतीयाच्या बाबतीत चमत्कार घडू शकतो आणि आगामी सहस्त्रकात भारताच्या बाबतीत असं नक्कीच घडेल असा त्यांना विश्वास आहे. आजचं दशक हे प्रज्ञेचं,ज्ञानाचं आहे आणि भारतामध्ये त्याचं नेतृत्व करण्याची सार्थ क्षमता आहे. प्रत्येक भारतीयाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. आज एकविसाव्या शतकात प्रत्येकाच्या प्राथमिक गरजा पूर्ण होणे हेच डॉ.रघुनाथ माशेलकर ह्यांचे स्वप्न आहे. ह्या सहस्त्रकाची पहाट भारताला गतवैभव प्राप्त करून देणारी,दिशा उजळणारी पहाट ठरेल आणि ही पहाट भारताला सोनेरी सकाळ नक्की दाखवेल हाच त्यांचा ठाम विश्वास आहे. नव्या पिढी विषयी,तरुणांविषयी आणि एकूणच भविष्याविषयी डॉ.रघुनाथ माशेलकर कमालीचे आशावादी आहेत हे वाचतांना जाणवते. वाचनीय आणि संग्रही असावे असे पुस्तक म्हणजे.."शोध नव्या भारताचा"...

शोध नव्या भारताचा 
डॉ.रघुनाथ माशेलकर - अनुवाद/संपादन - स्मिता देशपांडे 
प्रकाशक- सह्याद्री प्रकाशन,पुणे
मूल्य- ₹ ४००

✍️ सर्वेश फडणवीस 

पुस्तक_परिचय

Tuesday, March 9, 2021

ओरिसा येथील आदिवासी लोकगायिका पूर्णमासी जानी ..

पूर्णमासी जानी ओरिसा मधील प्रसिद्ध लोकगायिका आहेत. गेली सहा दशके त्यांनी लोककल्याणासाठी उत्तम गीतांची रचना केली आहे. ह्यावर्षी त्यांना लोकगायिका ह्या कलाक्षेत्रातील प्रकारासाठी पद्मश्री पुरस्काराने अलंकृत करण्यात आले आहे. आदिवासी समाजातील प्रतिष्ठित गायिका म्हणूनही त्या परिचित आहेत.

ओरिसाच्या कंधमाल जिल्ह्यातील आदिवासी लोकगायिका पूर्णमासी जानी यांचे औपचारिक शिक्षण झाले नाही, तरीही कुई, ओडिया आणि संस्कृतमध्ये ५० हजारहून अधिक भक्तीगीते सादर केल्याचे श्रेय त्यांना दिले जाते. तडीसारू बाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या पूर्णमासी जानी ह्या समाजसेविका म्हणूनही प्रसिद्ध आहेत. पूर्णमासी जानी ह्यांनी रचलेल्या ५०,००० गाण्यांपैकी १५,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली गेली आहेत. पूर्णमासी जानी ह्यांना लिहिता वाचता येत नसल्याने त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या सगळ्या रचना लिहून ठेवल्या आहेत. आज त्यांच्या गाण्यांवर आधारित त्यांच्या शिष्यांनी जवळपास ६ पुस्तकं प्रकाशित केली आहेत. आज पूर्णमासी जानी ह्यांच्या गीतांवर संशोधक डॉक्टरेट मिळवत आहे.

खरंतर हे सगळं आश्चर्य वाटावे असेच आहे. पूर्णमासी जानी यांचा प्रवास कंधमाळमधील खेड्यातील कोंढ आदिवासी मुलीपासून प्रसिद्ध लोकगायिका म्हणून झालेली उत्क्रांती अचंबित करणारी आहे. १९३६ मध्ये दालापाडा गावात जन्मलेल्या पूर्णमासी जानी ह्यांचे लग्न लवकर झाले. कुपोषण आणि लवकर गर्भधारणेमुळे दहा वर्षात त्यांना सहा मुले गमवावी लागली,मुले गमावल्यामुळे व्याकुळ झाल्याने त्या पतीसह आदिवासी देवतांकडे वळल्या. १९६९ साली पूर्णमासी जानी ताडीसरू या पवित्र टेकडीवर गेल्या. तेथे ध्यान केल्यानंतर त्यांना  दैवी शक्तींनी आशीर्वाद दिला. खरंतर त्या अशिक्षित आहे आणि फक्त कुईमध्ये बोलू शकतात - आज एक आदिवासी भाषा - आणि केवळ ओडिया बोलू शकणाऱ्या पूर्णमासी जानी ओडिया, कुई आणि संस्कृतमध्ये गाऊ शकतात.

पूर्णमासी जानी यांना २००६ साली ओरिसा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. आज संपूर्ण समर्पित कार्य करणाऱ्या पूर्णमासी जानी ह्यांच्या उत्स्फूर्त रचना आहेत. तसेच त्यांची गाणी भक्ती आणि सामाजिक परिस्थिती दर्शविणारी आहेत आणि कंधमाल आणि आसपासच्या जिल्ह्यातील आदिवासी जमातींमध्ये त्यांचे विस्तृत अनुसरण आहे. आज त्यांच्या गाण्यांचा उपयोग अंधश्रद्धा आणि मद्यपान, बालविवाह आणि पशू बलिदान यासारख्या सामाजिक समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो आहे.
पूर्णमासी जानी ह्यांचा आदिवासी समाजात खूप मोठा प्रभाव आहे. त्यांच्या प्रभावाखाली आदिवासी तरुणांनी हिंसाचार आणि मद्यपान पूर्ण बंद केल्याची बरीच उदाहरणे आहेत. लोकगायिका पूर्णमासी जानी ह्या सामाजिक कार्यासाठी आदिवासी क्षेत्रात अध्यात्मिकही समजल्या जातात. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून सदिच्छा आहेत. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#पद्म_गौरव #padmashri #Purnamasijani
#prideofart #prideofodisha
#PeoplesPadma

Monday, March 8, 2021

कोरोना रुग्णांच्या आधारवड डॉ.मृणाल हरदास..

सर्वप्रथम सर्व स्त्री शक्तीला महिला दिनाच्या शुभेच्छा. आज जागतिक महिला दिन. जगन्मान्य असलेल्या ह्या दिनाचे औचित्य साधत काय लिहावे आणि कुणाबद्दल आणि किती लिहावे असा प्रश्न सारखा मनात येत होता. स्त्री.. सुंदर ईश्वरी अविष्करण. आज स्त्री सर्व क्षेत्रात कार्य करते आहे आणि सर्व शिखर पादाक्रांत करते आहे, खरंतर ही कौतुकाची बाब आहे. स्त्री शक्तीला, तिच्या भक्तीला शब्दच नाहीत. कुठल्याही कार्यक्षेत्रात झोकून काम करायला सदैव तयार असणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव करण्याचा हक्काचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन आहे.

मागचे पूर्ण वर्ष कोरोनामय गेले,आजही कोरोनाच्या केसेस वाढत आहे. पण ह्या कोरोनाकाळात कोरोना योद्धा म्हणून कार्य करणाऱ्या नागपूरातील मेयो हॉस्पिटलमध्ये औषध विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ.मृणाल हरदास यांची वेगळी बाजू मनाला प्रकर्षाने भावली आणि कुठेतरी ते प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजे ह्या भावनेतून लिहिण्याची ऊर्जा मिळाली आणि त्यातून हे लेखन आहे. 

लॉकडाऊनच्या काळात हा खालील फोटो प्रचंड वायरल झाला आणि त्यातूनच डॉ.मृणाल हरदास ह्यांची सकारात्मक कार्याची श्रीमंती जगाला दिसली. खरंतर आई होणे हे जगातील कुठल्याही स्त्रीसाठी सर्वांत मोठी गोष्ट आहे. मातृत्व हा एक धर्म आहे. ते निभावण्यासाठी कुठलीही स्त्री ९ महिने ९ दिवस रक्ताचे पाणी करून गर्भातल्या जीवाला स्वत:पेक्षा अधिक जपत असते. बाळ कधी एकदा गर्भातून बाहेर येईल आणि त्याला कधी जवळ घेऊ असे प्रत्येक गरोदर महिलेला वाटत असते. पण नियतीची इच्छा असेल तसेच होते, प्रसूतीनंतर बाळाला पाहण्यासाठी आसुसलेल्या ह्या आईला करोनाने अचानक गाठले. प्रसूतीच्या अगदी काही तासांपूर्वी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि त्यामुळे नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला करोनाची बाधा होऊ नये म्हणून आईपासून त्या मुलाला नाईलाजाने दूर ठेवण्यात आले होते. १४ दिवस आईला आपल्या मुलाला बघता येऊ नये ह्यासारखे दुसरे दुःख कुठले असेल पण कोरोनावर मात करत आपल्या मुलाला मातृवत प्रेम करताना त्या आईच्या काय भावना असतील ह्याला शब्दांत सांगता येणारच नाही. पण डॉ.मृणाल हरदास ह्यांनी त्या आईच्या भावनांना कृतीची जोड दिली आणि त्या आईच्या पाठीवरून जो मायेचा हात फिरवत प्रसंगी जो आधार दिला तेव्हा जे सकारात्मक चित्र समाजात आले तो दिवस सुवर्णाक्षरांनी लिहावा असाच दिवस ठरला आहे. 

डाॅ. मृृणाल हरदास सध्या मेयो हाॅस्पिटलमध्ये कोविड विभागाच्या प्रमुख आहेत. प्रचंड मेहनत,कामाप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण ह्या त्रयींवर त्यांनी आलेली प्रत्येक जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. जगभरात कोविड विरुद्धच्या लढ्यात औषधशास्त्र विभागाची भूमिका अग्रस्थानी आहे. आज भारताने जगाला लस दिली आणि हळूहळू कोरोना योध्दे,ज्येष्ठ नागरिक स्वतः पुढे येत लसीकरण करवून घेत आहे आणि समाजात योग्य संदेश त्यातून जातो आहे. 

खरंतर कोविड रुग्णांना औषधापेक्षा मानसिक आधाराची अधिक गरज आहे आणि हेच ओळखून डाॅ.मृृृृणाल हरदास ह्यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांना आपलेसे केले आहे. मनात कुठलीही भीती न बाळगता त्या थेट कोविड रुग्णांशी संवाद साधत आहे. आजही प्रत्येक कोविड संक्रमित व्यक्ती त्यांना फोन करून औषधाबद्दल माहिती घेत असतात आणि त्याही निःस्वार्थ भावनेने प्रत्येक व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करत असतात. अतिशय सकारात्मक वलय स्वतःभोवती निर्माण करणाऱ्या डाॅ.मृृृृणाल हरदास आज प्रत्येकाच्या देवदूत बनल्या आहेत. 

आत्मीयता,ममत्व जपणाऱ्या डाॅ.मृृृृणाल हरदास आज सगळ्यांना हव्याहव्याशा झाल्या आहेत. प्रत्येकाची आस्थेनं चौकशी करण्याची त्यांची शैली आज अनेकांना प्रेरणा देणारी आहे. सरकारी आरोग्य यंत्रणेतील आशादायी आणि प्रेरणादायी चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. प्रत्येकाशी मातृवत प्रेम आणि काळजी घेणाऱ्या  
डाॅ.मृृृृणाल हरदास ह्यांच्या कार्याला नमन आहेच. आपले कार्य सदैव प्रेरणा देत राहो हीच आज महिला दिनी शुभकामना आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#internationalwomensday2021 #womensupportingwomen #CoronavirusPandemic #CoronaWarriorsIndia

Saturday, March 6, 2021

झिरो बजेट नैसर्गिक शेती चे जनक सुभाष पाळेकर

सुभाष पाळेकर आज एका गाईच्या मदतीने तीस एकर शेती करत आहेत. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात बेलोरा या खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पाळेकरांनी शेतीतच भविष्य करायचे ठरवले होते. त्यामुळे त्यांनी १९७२ ते १९८२ रासायनिक शेती केली. सुरुवातीची तीन वर्ष चांगले उत्पादन मिळाले पण नंतर उत्पादन  खाली तर खर्च वर जाऊ लागला. यावर त्यांनी माहिती मिळवायला सुरवात केली, अनेक कृषी तज्ञांना भेटले परंतु त्यांना कुठेच समाधानकारक उत्तर भेटत नव्हते. म्हणून आपणच याचे उत्तर शोधायचे त्यांनी ठरवले आणि झिरो बजेट शेतीचा शोध सुरू झाला.
आज शेतकऱ्याची परिस्थिती सुधारण्यासाठी सुभाष पाळेकर यांनी झिरो बजेट शेतीचा पर्याय शोधून काढला आहे. ह्या शोधामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी स्वतःच्या अधिकारांतर्गत २०१७ साली पद्म पुरस्कार देऊ केला आणि त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 

झिरो बजेट शेतीची चारसुत्री आहे ती म्हणजे बीजामृत, जीवामृत, आच्छादन आणि वाफसा हे महत्वाचे सूत्र आहे. नैसर्गिक शेतीचे पाळेकर तंत्र हेच आहे. शेतीतल्या संसाधनांचा शेतीसाठी वापर, हे त्यांच्या तंत्राचे मूळ आहे. सुभाष पाळेकर 'झिरो बजेट' नैसर्गिक शेतीचे तंत्र शिकवण्यासाठी देशभर फिरत असतात, ठिकठिकाणी शिबिरे घेतात. त्यांचे कार्य दक्षिणेकडील राज्यांमध्ये विशेष परिचयाचे आहे.  सुभाष पाळेकर यांना २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचे जाहीर झाले, तेव्हा ते आंध्र प्रदेशातील एका शिबिरात मार्गदर्शन करत होते. त्यावेळी सहा हजार शेतकरी त्या शिबिरात होते. पाळेकर यांनी आठ वर्षांच्या संशोधनानंतर त्या तंत्राची सिद्धता केली आहे. झिरो बजेट शेतीत ओलिताच्या शेतीत जेवढे पाणी लागते, त्यांच्या केवळ दहा टक्के पाणी आणि दहा टक्के वीज लागते. उत्पादन मात्र कमी येत नाही. शिवाय जे उत्पादन मिळेल ते पाळेकर यांच्या शब्दांत, विषमुक्त, पौष्टिक आणि उत्कृष्ट चवीचे असे पीक उत्पन्न होते. 

आज सुभाष पाळेकर तंत्राच्या नैसर्गिक शेतमालाला बाजारात मागणी आहे आणि त्याला दुप्पट भाव मिळतो आहे. त्या तंत्रातून जमीन सुपीक व समृद्ध बनते. नैसर्गिक शेती , ग्लोबल वॉर्मिग रोखण्यास मदत करते आहे. हवेतील कार्बन डायऑक्साइड जास्तीत जास्त बंदिस्त करण्याची किमया ‘झिरो बजेट’ शेती करते असे सुभाष पाळेकर सांगतात. सुभाष पाळेकर ह्यांनी स्वतः प्रयोग केल्यामुळे ह्या विषयावर त्यांना संपूर्ण माहिती आहे. त्यांनी पुस्तक,व्याख्याने आणि शिबिरे यांच्या माध्यमातून या झिरो बजेट शेतीचा प्रसार चालवला आहे. देशात चाळीस लाख शेतकरी झिरो बजेट शेती करत आहेत. कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ या राज्यांत झिरो बजेट शेती करणारे शेतकरी जास्त आहेत. महाराष्ट्रात आणि विशेषतः विदर्भात मात्र पाळेकर तंत्र काहीसे उपेक्षित राहिले आहे याची थोडीशी खंत पाळेकरांना वाटते. ते सांगतात, की त्यांच्या वेबसाईटचा वापर करून अमेरिका, आफ्रिका या देशांतही काही शेतकरी पाळेकर तंत्राचा उपयोग करत आहेत. 

विदर्भातील कोरड्या जमीनीत ह्या नैसर्गिक घटकांनी शेतीत आमूलाग्र बदल घडवून आणणारे सुभाष पाळेकर ह्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आल्याने झिरो बजेट नैसर्गिक शेतीला आज जागतिक मान्यता मिळाली आहे. त्यांनी असेच कार्य उत्तरोत्तर करत राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#पद्म_गौरव #padmashri #subhashpalekar
#prideofagriculture #prideofmaharashtra
#PeoplesPadma

Tuesday, March 2, 2021

ओरिसातील शिक्षणव्रती ९८ वर्षीय नंदा प्रस्टी..


विद्या दान हे सर्वोत्कृष्ट दान आहे आणि शिक्षणाचा, साक्षरतेचा अट्टहास प्रसंगी त्यासाठी धडपड करणारे ओरिसातील शिक्षणव्रती ९८ वर्षीय नंदा प्रस्टी गेल्या सात दशकांपासून कार्यरत आहे. आज 'नंदा सर' म्हणून परिचित असलेले नंदा प्रस्टी ह्यांना साहित्य आणि शिक्षण अंतर्गत पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 

ओरिसातील जाजपूर जिल्ह्यातील कांतीरा गावचे रहिवासी असलेले 
नंदा प्रस्टी वयाच्या ९८ व्या वर्षी मुलांना विनामूल्य शिकवण्यासाठी आग्रही आहे. आज वयोमानपरत्वे त्यांना कमी ऐकू येतं पण त्यांचा आवाज आजही भारदस्त आहे. भुवनेश्वरपासून साधारण १०० कि.मी. अंतरावर असलेल्या आपल्या गावात गेली ७० वर्षांपासून मुलांना विनामूल्य शिकवणी देत आहेत. त्यांनी आजपर्यंत एकाच कुटुंबातील तीन पिढ्या शिकवल्या आहेत. ह्यावरून साधारणपणे अंदाज येतो की त्यांनी किती वर्षे शिक्षण क्षेत्रांत कार्य केले आहे.

कोणत्या वर्षी सुरुवात केली ह्याबद्दल आता त्यांना आठवत नाही पण स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी शिकवायला सुरुवात केली. गावात शाळा नव्हती आणि साक्षरतेचे प्रमाण अल्प होते म्हणून मामाकडे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले आणि तेथून परत आल्यावर त्यांनी आपल्या गावात साक्षरता अभियान राबविले. 

नंदा प्रस्टी ह्यांचे कुटुंब शेती करीत असत आणि त्यामुळे घरातील परिस्थिती चांगली होती,पण त्याच्या लक्षात आले की, खेड्यात मुले इकडे तिकडे उन्हाडक्या करत फिरत असतात. नंदा ह्यांना तसे काही काम नव्हते आणि म्हणूनच त्यांनी मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांना मुलांच्या मागे पळावे लागत कारण त्यावेळी मुलांना शिक्षणासाठी तयार करणे फार कठीण होते. पण सातत्य आणि गावासाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि त्यातूनच त्यांचा शिकवण्याचा प्रवास सुरु झाला. 

नंदा प्रस्टी ह्यांच्या गावात शिकवण्यासाठी शाळा किंवा इतर जागा नव्हती म्हणून त्यांनी मुलांना झाडाखाली शिकवायला सुरुवात केली. नंदा ह्यांचा असा विश्वास होता की ज्ञानदान करणे म्हणजे एखाद्याला मदत करण्यासारखे आहे आणि म्हणूनच या कार्यासाठी त्यांनी पैसे घेतले नाही. आजही ते मुलांना मोफत शिकवत आहे. त्यांना मुलं खूप आवडतात आणि शिकवण्यामुळे त्यांना आनंद ही मिळतो. प्रत्येक मुलाने चांगली व्यक्ती व्हावे हीच त्यांची इच्छा आहे. पूर्वी २ शिफ्ट शाळा होती. सकाळी मुले आणि संध्याकाळी वडीलधारी मंडळी येत असत. आता गावात चांगल्या शाळा आहेत.गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटले आहे पण गावातील लोक नंदा सरांकडे आपल्या मुलांना शिकवणीसाठी पाठवतात. 

वयाच्या ह्या टप्प्यावर असताना आजही नंदा सर सकाळी ६ वाजता उठतात आणि साडेसात ते साडे नऊ पर्यंत वर्ग घेतात. नंतर दुपारी साडेचार वाजल्यापासून ते पुन्हा वर्ग घेतात. आज ४० विद्यार्थी त्यांच्या वर्गात आहेत. आज गावातील प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव शाळेत नोंदविल्या गेले आहे पण रोज अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी त्यांच्याकडे येत असतात. गावकऱ्यांच्या मते,नंदा सरांनी आपल्या कुटुंबातील येणाऱ्या पिढीला शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे म्हणून आजही शिकवणी सुरु असावी इतका विश्वास त्यांनी कमावला आहे. 

ज्या झाडाखाली त्यांनी शिकवणी सुरू केली होती त्याठिकाणी ७ वर्षांपूर्वी एक छोटेसे मंदिर बांधण्यात आले होते. आता त्या मंदिरात शिकवणी सुरू आहे. कोरोनाच्या काळात काही दिवस शिकवणी बंद होती पण आता वर्ग पुन्हा पूर्ववत सुरू झाले आहे. आजपर्यंत त्यांनी कुठलीही सरकारी मदत घेतली नाही आणि भविष्यात त्यांना घेण्याची इच्छा ही नाही. सात दशके त्यानी विनामूल्य शिक्षण दिले आहे,त्यांचे ध्येय इतरांना शिक्षित करणे आहे. जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत शिकवत राहणे हीच इच्छा आहे. ९८ व्या वर्षी मुलांना शिकवण्याची उत्कटता ही एक अतिशय प्रेरणादायक घटना आहे. नंदा सरांना परमेश्वराने निरामय आरोग्य प्रदान करावे हीच प्रार्थना आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#पद्म_गौरव #padmashri #nandaprusty
#prideoflitratureneducation #prideofodisha
#PeoplesPadma