Saturday, March 13, 2021

शोध नव्या भारताचा ..

बऱ्याच दिवसांनी पुस्तकावर लिहितोय कारण हे पुस्तक पाहताक्षणीच वाचण्याची इच्छा झाली आणि अनेकांनी वाचावे आणि संग्रही ठेवावे म्हणून हा लेखप्रपंच. पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर लिखित " Reinventing india "  या इंग्रजी पुस्तकाचा भावानुवाद म्हणजे "शोध नव्या भारताचा" पुस्तक आहे. डॉ.रघुनाथ माशेलकर यांची ओळख वैज्ञानिक अशी आहेच पण ते केवळ वैज्ञानिकच नाही तर एक विचारवंत देखील आहेत आणि भविष्याचा अचूक वेध घेणारे वैज्ञानिक विचारवंत म्हणून डॉ.माशेलकर ह्यांचा उल्लेख करता येईल कारण हे पुस्तक म्हणजे नव्या भारताची जाणीव करून देणारे आहे. त्यांनी दिलेल्या व्याख्यान आणि लेखांचे एकत्रित केलेले संकलन म्हणजे हे पुस्तक आहे. १९९६ ते २००९ ह्या दरम्यान त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचा आणि काही लेखांचा ह्यात समावेश आहे. ज्यावेळी आपण हे वाचतो त्यावेळी ते वाचतांना वैज्ञानिकाच्या भूमिकेतील व्यापक दृष्टीकोन प्रत्येक पानावर जाणवतो.  

कोरोनानंतर आत्मनिर्भर भारताची वाटचाल सुरू झाली आणि आज आपला प्रवास विकसन देशाकडून विकसित देशाकडे सुरु आहे. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेण्याचे बळ आपल्या पंखात असायला हवे आहे असेच आज प्रत्येकाला वाटते. आज भारत सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख होऊ लागली आहेच शिवाय बौद्धिक ज्ञान आपल्याकडे विपुल आहे. प्राचीन ऐतिहासिक,संस्कृती ठेवा, एकत्रित समाज व्यवस्था,कौटुंबिक पाठबळ ह्याची श्रीमंती आपल्याला पिढी दर पिढी मिळाली आहे आणि ह्या सगळ्यांच्या एकत्र येण्याने आज एक भारत श्रेष्ठ भारताचा उदय होतो आहे. 

पण तरीही वाढती लोकसंख्या,दारिद्र्य,अन्न,वस्त्र,निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा,जाती - धर्माच्या भिंती,सामाजिक कारणावरून होणाऱ्या दंगली,हिंसाचार,पर्यावरणाचा ऱ्हास, विजेचे संकट अशी आव्हानेही आहेत. यावर आपल्याला मात करीत भारताला प्रगतीच्या वाटेवर कसे नेता येईल हे स्वप्न दाखवीत ते पूर्ण करण्यासाठी काय करावे लागेल, याचा मंत्र डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी "शोध नव्या भारताचा" ह्या पुस्तकांत दिला आहे . बऱ्याच ठिकाणी वाचतांना आश्चर्य वाटत कारण काहीअंशी आपण त्यांनी सांगितलेल्या उपाय अमलात आणत आहोत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी दाखवलेले स्वप्न आज पूर्णत्वास जात आहे. सहा विभाग असलेल्या पुस्तकांत प्रत्येक विभागात पांच प्रकरणे दिली आहेत. स्वप्नातील भारत घडवताना त्यांनी नव्या सहस्त्रकातील पंचशील सांगितले आहेत

१)विद्यार्थीकेंद्रित शिक्षण(Child Centred Education)
२)महिलाकेंद्रित कुटुंब(Woman Centred Family)
३)मानवकेंद्रित विकास(Human Centred Development)
४)ज्ञानकेंद्रित समाज,(Knowledge Centred Society)
५)नवनिर्मितीकेंद्रित भारत ( Innovation Centred India)

या पंचशीलाचा वापर करून नवीन भारताची निर्मिती कशी करता येईल, हे यात प्रामुख्याने सांगितले आहे. वाचताना जाणवते की, विद्यमान सरकार ह्या पंचशीलावर काम करत आहे. २१ शतक हे भारताचे असेल अशी त्यांना खात्री आहे पण ते तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण थोडं मागे जाऊ आणि आपल्यामध्ये पायाभूत/मूलभूत(Basics) सुधारणा केल्यावर हे शक्य होईल असे त्यांना वाटते. 

आज आपण नक्कल करण्यापेक्षा शोध,संशोधन करून नवनिर्मिती करण्याची गरज आहे. कल्पनांची भूमी असलेला भारत अमेरिकेप्रमाणे संधीचा देश बनायला हवा, तंत्रज्ञान व उद्योग यांची सांगड घालायला हवी. जर प्रत्येकाला संधी दिली तर प्रत्येक भारतीयाच्या बाबतीत चमत्कार घडू शकतो आणि आगामी सहस्त्रकात भारताच्या बाबतीत असं नक्कीच घडेल असा त्यांना विश्वास आहे. आजचं दशक हे प्रज्ञेचं,ज्ञानाचं आहे आणि भारतामध्ये त्याचं नेतृत्व करण्याची सार्थ क्षमता आहे. प्रत्येक भारतीयाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. आज एकविसाव्या शतकात प्रत्येकाच्या प्राथमिक गरजा पूर्ण होणे हेच डॉ.रघुनाथ माशेलकर ह्यांचे स्वप्न आहे. ह्या सहस्त्रकाची पहाट भारताला गतवैभव प्राप्त करून देणारी,दिशा उजळणारी पहाट ठरेल आणि ही पहाट भारताला सोनेरी सकाळ नक्की दाखवेल हाच त्यांचा ठाम विश्वास आहे. नव्या पिढी विषयी,तरुणांविषयी आणि एकूणच भविष्याविषयी डॉ.रघुनाथ माशेलकर कमालीचे आशावादी आहेत हे वाचतांना जाणवते. वाचनीय आणि संग्रही असावे असे पुस्तक म्हणजे.."शोध नव्या भारताचा"...

शोध नव्या भारताचा 
डॉ.रघुनाथ माशेलकर - अनुवाद/संपादन - स्मिता देशपांडे 
प्रकाशक- सह्याद्री प्रकाशन,पुणे
मूल्य- ₹ ४००

✍️ सर्वेश फडणवीस 

पुस्तक_परिचय

No comments:

Post a Comment