भारतीय सैन्यातील एक पराक्रमी सैनिक आणि परमवीरचक्राचे तिसरे मानकरी सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे आहेत. त्यांचा जन्म २६ जून रोजी धारवाड जिल्ह्यातील हवेली या गावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा बोर्डाच्या शाळेत झाले त्यानंतर पुढील शिक्षण उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या चेंदिया या गावात झाले. त्यांचे वडील राघोबा राणे हे पोलीस दलात कॉन्स्टेबल होते. रामा राघोबा राणे १० जुलै, १९४० रोजी ब्रिटिश भारतीय लष्कराच्या बॉम्बे इंजिनीयर रेजिमेंटमध्ये दाखल झाले. त्यांची नायक पदी नेमणूक झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राणे यांची निवड कोर ऑफ इंजियनियर्सच्या बॉम्बे सॅपर्स रेजिमेंटमध्ये झाली. तेथे त्यांना सेकंड लेफ्टनंट म्हणून पद दिले गेले.
१९४८ च्या भारत पाकिस्तान युद्धात भारताने गमावलेले झंगर गाव भारतीय सैन्याने १८ मार्च, १९४८ रोजी परत मिळविले आणि तेथून राजौरी कडे कूच केली. ८ एप्रिल, १९४८ ला सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे- बॉम्बे इंजिनीअर्स- यांना नौशेरा - राजौरी मैल क्र. २६ येथून अत्यंत डोंगराळ प्रदेशातून जाणाऱ्या रस्त्यावरचे सुरुंग आणि अडथळे काढून टाकण्याचे काम करण्यास सांगितले होते. त्या दिवशी अकरा वाजता 'नादपूर - दक्षिण' च्या जवळ, सेकंड लेफ्टनंट राणे आणि त्यांचे पथक, पुढील रस्त्यावर पेरलेले सुरुंग काढून टाकत, वाहतूक सुरळीत करण्याच्या कामास सुरुवात करण्यासाठी, रणगाड्याजवळ उभे होते. इतक्यात शत्रूसैन्याकडून त्या भागात गोळा फेक करण्यास सुरुवात झाली. त्यांच्या पथकातील दोन माणसे त्यात शहीद झाली आणि पाच जण जखमी झाले. राणेही त्यात जखमी झाले.
९ एप्रिलला सकाळी सहा वाजता त्यांनी पुन्हा कामास सुरुवात केली. दुपारी ३ वाजेपर्यंत ते काम करत होते. रणगाड्यांना जाण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्याचे काम पार पडले, तेव्हाच त्यांनी काम थांबवले. सशस्त्र फौजा पुढे निघाल्या तेव्हा तेही एका रणगाड्यात बसून निघाले. पुढे गेल्यानंतर त्यांना रस्त्यामधे पाईनवृक्षाचा अडथळा असल्याचे आढळले. त्यांनी लगेचच खाली उतरून, ते झाड उचलून बाजूला फेकून दिले आणि थोडं पुढे गेल्यावर पुन्हा तीच पुनरावृत्ती झाली. यावेळी संध्याकाळचे पाच वाजले होते. डोंगरातील रस्ता नागमोडी वळणावळणाचा होता. पुढच्या रस्त्यावरच्या अडथळ्यामधे रस्त्यावरचा छोटा पूलच उध्वस्त केला होता. सेकंड लेफ्टनंट राणे उतरून लगेच कामाला लागले. ते काम सुरु करणार इतक्यात शत्रूने मशीन गनमधून गोळ्यांचा वर्षाव सुरु केला. पण असामान्य धैर्य आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणाऱ्या राणेंनी पर्यायी मार्ग तयार केलाच आणि सशस्त्र फौजा पुढे निघाल्या. आता संध्याकाळचे सव्वासहा वाजले होते. सूर्यप्रकाशही कमी झाला होता रात्रीचा मुक्काम तिथेच होता आणि ११ एप्रिलला सकाळी सहा वाजता त्यांनी पुन्हा कामास सुरुवात केली. ११ वाजेपर्यंत चिंगासचा रस्ता बनवून वाहतुकीस खुला केला आणि त्यापुढचा रस्ता सुरक्षित करण्यासाठी ते सतत सतरा तास काम करीत त्यांनी नौशेरा-राजौरी मार्ग बांधून काढण्याचे काम केले. राणेंच्या या अथक परिश्रमामुळे राजौरी आणि चिंगासमधील असंख्य नागरिकांचे प्राण वाचले. या चढाईमध्ये भारतीय सैन्याने ५०० पाकिस्तानी सैनिकांवर हल्ला केला आणि अधिक जखमी केले. त्यांच्या या अतुलनीय शौर्याला आणि शत्रूच्या माऱ्याखाली केलेल्या परिश्रमांबद्दल त्यांना ८ एप्रिल १९४८ रोजी परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले.
३१ जानेवारी २०२० ला बॉंबे सॅपर्सच्या स्थापनेला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, श्रीमती राजेश्वरी राणे यांनी हे परमवीर चक्र त्यावेळेसचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांना सुपूर्द केले. हे पदक घरी राहण्यापेक्षा लष्कराकडेच राहीले तर अधिकाऱ्यांना आणि जवानांना त्यातून प्रेरणा मिळत राहील अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. युद्धानंतर राणे लष्करात राहिले आणि २५ जून १९५८ रोजी मेजर पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर १९५८ पासून ते ७ एप्रिल १९७१ पर्यंत राणे पुनर्नियुक्त अधिकारी म्हणून सैन्यात कार्यरत होते. १९७१ मध्ये त्यांनी पूर्ण निवृत्ती घेतली. पुढे ११ एप्रिल १९९४ रोजी पुण्यातील सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपले १५ तेलवाहू जहाजांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली आहेत. एम.टी. राम राघोबा राणे, पीव्हीसी हे जहाज ८ ऑगस्ट, १९८४ पासून २५ वर्षे सेवेत होते. कालांतराने कारवार येथे आयएनएस चपळ युद्ध संग्रहालयाजवळ राणे यांचा पुतळा आजही सुस्थितीत आहे. त्यांच्या अद्भुत कामगिरी आपल्याला सदैव प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या स्मृतीस सादर अभिवादन.
- सर्वेश फडणवीस
#rahstrankur #राष्ट्रांकुर #Day3