Friday, March 24, 2023

सुलभ, सुगम, रसाळ रामायणावरील प्रवचने - मावशी केळकर


राम नवरात्रात जसे गीत रामायण ऐकलं जातं तसंच आवर्जून आठवण होते ती म्हणजे राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका वं. मावशी केळकर यांनी सांगितलेली "रामायणावरील प्रवचने" या ग्रंथाची. रामायण हा भारताचा मानबिंदू आहे. सर्वसामान्य माणसाला श्रीरामांच्या जीवनातून खूप काही घेण्यासारखे आहे. रामायणाचे हेच महत्त्व जाणून वं.मावशींनी रामायणावरील प्रवचनांचा उपक्रम सुरु केला जो आजही गुढीपाडवा ते रामनवमी समितीच्या शाखांमध्ये नियमित सुरू आहे. वं. मावशींची निवेदन पद्धती शांत, प्रवाही आणि भावनाप्रधान असली तरी तर्कनिष्ठ होती. सुदैवाने ही प्रवचने आज पुस्तकरूपाने उपलब्ध आहेत. रामात आम्ही आज्ञाधारक पुत्र, एकपत्नीव्रत धारण करणारा पती, लहान भावांवर प्रेम करणारा भाऊ, प्रजेचं सदैव रक्षण करणारा आदर्श राजा,आणि एक श्रेष्ठ अवतारी पुरुष पहावा अशी त्यांची शिकवण होती. 

खरं तर रामायणावर आज बरेच साहित्य उपलब्ध आहे, तरीही वं. मावशींनी लिहिलेली प्रवचने वाचकाला आकर्षित केल्यशिवाय राहत नाहीत. राष्ट्र सेविका समिती प्रमाणेच त्यांनी रामायणावरील प्रवचनांच्या माध्यमातून राष्ट्र आणि समाजसेवेचे महत्त्वाचे कार्य सार्थकी लावले. श्रीराम हा देव असला तरी मानवरूपाने अवतरला असल्याने रामायणावर आमचाच अधिकार आहे असे वं. मावशी आपल्या प्रवचनात सांगतात. वास्तविक त्या काळात रामायण, महाभारत यांसारखे ग्रंथ घरात स्त्रियांनी वाचू नये असा दंडक होता. देवळात जाऊन पुराणिकांच्या तोंडून जे काही ऐकायला मिळेल तेवढेच त्यांना या ग्रंथाचे ज्ञान होई. अशा रूढीबद्ध समाजात वाढत असताना वं. मावशींनी त्याकाळी सहज उपलब्ध असलेला ग्रंथ म्हणजे 'रामविजय' वाचून उत्तम अशा रामायण प्रवचनांची स्वतः रचना केली. अत्यंत प्रवाही भाषा आणि समजण्यास सोपें असे या प्रवचनांचे वेगळेपण आहेच आणि वाचतांना प्रत्येक पानावर ते कायम जाणवतं. प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी त्याकाळी संपूर्ण भारतभर भ्रमण केले.

सन १९६० - ६१ चा काळ. वं. मावशी लखनौ प्रवासात असताना त्यांच्या परम श्रद्धास्थानी असलेल्या राष्ट्रपुरुष श्रीरामांच जन्मस्थान 'अयोध्या' येथे दर्शनार्थ गेल्या. त्यावेळी एका मोठया फाटकाच्या आतल्या बाजूस खुर्चीवर श्रीरामपंचायतनाचा फोटो ठेवला होता. त्याचंच दर्शन घ्यावे लागे. त्या फोटोवर फुलं अर्पण करत असता त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्या म्हणाल्या, "आपला भारत देश स्वतंत्र झाला पण माझा राम अजूनही बंदी आहे ! कधी- कोण करणार त्याला मुक्त ". त्यांच्या हृदयातील हाकेला जणू जनमानसाने ओ दिला आणि काही वर्षांतच श्रीरामजन्मभूमीमुक्तीची योजना आकारास आली. आज सत्तेवर आलेल्यांकडून एक आशेचा किरण आपल्याला दिसला आणि कायद्याच्या लढाईत जिंकल्यावर रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिराचे निर्माण कार्य सुरू झाले आणि लाखो लोकांच्या हृदयात सदैव विराजमान असणारे रामराय अखेर बंदीवासातून मुक्त झाले. अयोध्येत पुढच्या वर्षीच्या रामनवमीच्या आधी भव्य राम मंदीर होईलच आणि रामलला विराजमान झालेले संपूर्ण जग बघणार आहेच. 

रामायण कथनाने वं. मावशींना वैयक्तिक असा फायदा झाला की,  त्यांची सुप्तावस्थेत असलेली वक्तृत्व शक्ती ही उदयास  येऊन त्यात दिवसेंदिवस कमालीची वृद्धी झाली. श्रीरामांच्या जीवनावर प्रवचन करत असता समाजावर संस्कार करण्याचे कार्य घडत होतेच, शिवाय त्यांच्या समितीचे कार्य करण्यासाठी उत्तम कार्यकर्ते आणि सहकारीही मिळत होते. त्यांना एकाने विचारले होते की, आपण प्रवचनांसाठी 'रामकथा' का निवडलीत ? त्यावर त्यांनी दिलेले उत्तर विचार करण्यासारखे आहे, त्या म्हणाल्या, 

" मानवी जीवनाच्या दृष्टीने पूर्ण मानव म्हणून श्रीरामचरित्र आहे. रामाचे जीवन सर्वच बाबतीत आदर्श आहे. समाजातील लोकांना संघटीत करून संस्कारीत करायचे असेल तर श्रीरामचरित्राच्या अभ्यासाने भारतीयांचे चारित्र्य सुधारेल यात मुळीच शंका नाही " प्रभू श्रीरामचंद्र हे महामानव, महापुरुष वाटतात. त्यांच्याकडे पूर्ण मानव, आदर्श मानव म्हणून बघू शकतो आणि केवळ पूजा, नमस्कार एवढाच आपला संबंध न राहता त्यांचे जीवन आचारण्याच्या प्रयत्नास माणूस लागेल. मानवी आचरणाचे आचरण करण्याची इच्छा नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. सर्वांनी एकत्र येऊन रामायणाचे आयोजन केल्याने 'एकसूत्रीपणा' येऊन हे राष्ट्र परम वैभवापर्यंत जाईल." 

आज राष्ट्र सेविका समितीच्या अनेक सेविका या रामायण प्रवचनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृती आणि समाज संस्कारित करण्याचे महत्कार्य करतात आहेत. वं. मावशींनी रामायण प्रवचनांच्या माध्यमातून त्याकाळी मांडलेला रामकथेचा जागर समाजाचे मन जिंकण्यास किती महत्वाचा होता हे यावरून दिसतं. 

- सर्वेश फडणवीस

Thursday, March 23, 2023

ज्योतीने तेजाची आरती..


दरवर्षी गुढीपाडव्यापासून राम नवमी पर्यंत रामनवरात्रात रामरक्षा पठणाबरोबर गीत रामायण ऐकण्याचा कुळाचार ही संपन्न होतो. याची गोडी अवीट अशीच आहे. मराठी काव्यविश्वातील अजरामर महाकाव्य. ‘न भूतो न भविष्यती’ असे एकमेवाद्वितीय असेच म्हणता येईल. १९५६ साली पहिल्यांदा पुणे आकाशवाणी वरून प्रसिद्ध झालेले हे काव्य आजही तितकेच अविस्मरणीय वाटते. ६५ हुन अधिक वर्ष झाली या काव्याला तरीही याचा गोडवा तसाच आहे.

वाल्मिकींनी रामायणात २८००० श्लोक लिहिलेत आणि ग. दि. माडगूळकर यांनी तीच रामकथा ५६ गीतात लिहिली. काल रात्री यु ट्यूबवर मा.अटल बिहारी वाजपेयी यांचे गीत रामायण सुवर्ण जयंती महोत्सवाचे भाषण ऐकत होतो. त्यांत त्यांनी खूप छान उल्लेख केला.. ते म्हणाले “ काळाचं चक्र चालत राहील. आम्ही ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीत वाहून जाऊ. पण गीत रामायण हे नित्य निरंतर अजरामर राहील”.

आज इतके वर्ष होऊन अनेक पिढ्या होऊन गेल्या तरी गीत रामायणाचा गोडवा काही वेगळाच आनंद देऊन जातो. त्यातली काही गाणी तर वातावरण प्रसन्न आणि आल्हाददायक करत असतात. स्वयें श्री राम प्रभू ऐकती पुढे राम जन्मला ग सखे, किंवा दैवजात दुःखे भरता सारखी अनेक गाणी विचार करायला प्रवृत्त करतात. अनेक गाणी मनाला आनंद देत असतात. सेतू बांधारे सागरी सारखी गाणी असु देत किंवा मग भावनाप्रधान आशय असलेली थांब सुमंता थांबवी रे रथ सारखे. कायम ऐकावे  वाटणारे असे हे अजरामर काव्य. चैत्रात जसं वातावरणात चैतन्य असतं त्याच जोडीला प्रतिपदेपासून रामनवमी पर्यँत या गीत रामायणानेही एक वेगळे चैतन्य निर्माण होते.

अशा गीत रामायणाचा प्रत्येक मराठी माणसाने नक्की आस्वाद घ्यायला हवाच. यातला प्रसंगानुरूप गीतेतला गोडवा आणि आशय आपण ऐकूनच अनुभव घेऊ शकतो. कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर यांचे शब्द आणि गायक सुधीर फडके यांचे स्वर म्हणजे अवर्णनीय भाग्यच. शब्दस्वरातून झंकारणारा प्रसाद  आणि त्यातूनच काळजाच्या गाभ्याला हात घालणारे भावपूर्ण गायन यामुळे गीत रामायण ही कलाकृती राहिली नाही तर मराठी सांस्कृतिक जीवनाचा तो अनमोल असा ठेवा झाला. म्हणून गीत रामायण चिरतरुण झालं,ज्याचा गोडवा आजही तेवढाच अवीट आहे. मराठी काव्यविश्वातील आणि गानविश्वातील लव-कुश होऊ शकतील असे गदिमा आणि बाबूजी हे आजही गीत रामायण ऐकवत आहेत. असे वाटावे, इतकं विलक्षण कार्य यांनी केले आहे.

गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराथी, कन्नड, बंगाली, आसामी भाषा, तेलुगु, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. या सर्व भाषांतरांचे वैशिष्ठ्य म्हणजे भाषांतरकर्त्यांनी एका मात्रेचाही फरक केलेला नाही. ही सर्व भाषांतरे मूळ बाबूजींनी दिलेल्या चालीवरच गायली जातात. अशा या विलक्षण प्रतिभेचे काव्य ‘गीत रामायण’ हे आपण नक्की ऐकण्याचा प्रयत्न करूया आणि हीच तेजाची आरती श्री रामरायांच्या चरणी अर्पण करूया. 

✍️ सर्वेश फडणवीस

Saturday, March 18, 2023

जीवनपटाच्या उंचीवर असणारे दुर्दम्य आशावादी - डॉ. रघुनाथ माशेलकर

 

डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी गेली सहा दशके आपले आयुष्य विज्ञान आणि समाजाच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. ज्येष्ठ संशोधक, शास्त्रज्ञ, पद्म श्री, पद्म भूषण, पद्म विभूषण अशा अनेक पुरस्कारांनी शोभून दिसणाऱ्या सरांनी नुकतेच वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. प्रत्यक्ष भेटल्यावर ती ऊर्जा आजही जाणवते. जो त्यांच्या संपर्कात आला तो याबद्दल अधिक समजून घेईल. ज्याची आतुरतेने वाट बघत होतो असे त्यांचे आत्मचरित्र पुण्यात अत्यंत देखण्या समारंभात नुकतेच प्रकाशित झाले. जवळपास ६०० पानी असलेल्या आत्मचरित्राचे सलग वाचन झाले. खरंतर सकारात्मकतेचा ध्यास घेतलेल्या दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर या त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रत्येक पानावर आशावाद पावलोपावली जाणवतो. अत्यंत वाचनीय आणि संग्रही असावे असेच हे आत्मचरित्र आहे. आम्हा तरुण पिढीला आणि नव्या संशोधकांना हे चरित्र उपलब्ध करून दिल्याबद्दल लेखक डॉ. सागर देशपांडे यांचे विशेष अभिनंदन आहे. गेली जवळपास १३ वर्ष ते या चरित्रावर काम करत होते. 

डॉ. माशेलकर सरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या आयुष्याची सुरुवात केली. परिस्थितीने आपल्याला काय काय आणि कसं शिकवलं याबाबत वेळोवेळी आपल्या व्याख्यानात ते बोलतात, ऐकणाऱ्यांसाठी खरोखरच प्रेरणादायी असते, आधार देणारे असते. प्रचंड परिश्रम करण्याची, ते अखंडपणे चिकाटीने करत राहण्याची त्यांची सवय, सतत नवनवीन शिकण्याचा ध्यास, लोकांमध्ये मिसळून जाण्याचा स्वभाव, स्वतःच्या अभ्यास संशोधनासाठी एकांत उपलब्ध करून घेण्यासह वेळेचं अफाट व्यवस्थापन, 'मल्टिटास्किंग' या नेमक्या इंग्रजी शब्दात व्यक्त होणारे, अनेक कामांमध्ये गुंतण्याबाबतचे झपाटलेपण, वाचन, लेखन, मनन, चिंतन, भाषण आणि त्याला दिलेली कृतीची जोड याबद्दल वाचतांना आपण अचंबित होतो. 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून - भारताच्या राष्ट्रपतींपर्यंत सर्वसामान्य व्यक्तींपासून सर्वांना तितक्याच आपुलकीने, नम्रपणाने भेटण्याचा त्यांचा स्वभाव आहे. चित्रकलेपासून शास्त्रीय संगीतापर्यंत आणि कॅरमपासून क्रिकेटपर्यंत जीवनातील  अनुभूती घेण्याची, जीवनाची कलात्मक मैफल अनुभवण्याची त्यांची वृत्ती आहे, कुटुंब वत्सलतेबरोबरच संस्थाप्रमुख म्हणून घ्यावी लागणारी कडक भूमिका स्वीकारण्याचं उत्तम प्रशासकीय आणि नेतृत्व कौशल्य, फोन- ई मेल पत्रांना उत्तर देण्याची श्रीमंती, नम्रपणा न सोडता देखील योग्य वेळी ठाम आणि कठोर भूमिका घेऊन ती परखडपणे तोंडावर सांगण्याचे धाडस अशा अनेक असाधारण गुणांचा प्रत्यय माशेलकर सरांच्या जीवनप्रवासातून आपल्याला घेता येतो. 

डॉ. माशेलकर सरांचे चरित्र वाचतांना राजकारण्यांपासून उद्योगपतींपर्यंत आणि शास्त्रज्ञांपासून ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींपर्यंत सर्वांशीच स्नेहभावाने आणि आपुलकीने कसे वागावे याची शिकवण त्यांनी घालून दिलेली आहे. प्रत्येकाशी अगत्याने वागणाऱ्या माशेलकर सरांनी समाजातल्या अनेक घटकांना, गरजू मंडळींना यथाशक्य कायम मदतीचा हात पुढे केला आहे. व्यक्ती, संस्था, प्रक्रिया यासंबंधी बोलताना कुणी नकारात्मक सांगत असेल, लिहित असेल तर त्यावेळी आणि त्यानंतरही त्यातल्या सकारात्मक बाजूंवरच अधिक बोलणारे, त्या सकारात्मक बाजूलाच अधिक बळ देणारे आणि भविष्याकडे बघायला उद्युक्त करणारे माशेलकर सर अनुभवले की, अनेकांच्या मनातली नकारात्मकता कमी होते आणि नकळतपणे हात जोडले जातात. 

'कर्मयोगा' वर डॉ. माशेलकर सरांचा प्रचंड विश्वास आहे. तुमचे जन्मदाते पालक कोण आहेत? तुमचा जन्म कुठे आणि कोणत्या तारखेला झाला यावर तुमची ओळख ठरत नाही. तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रारंभ कसा केलात आणि पुढची सारी वाटचाल कशी केलीत? यावरच तुमची खरी ओळख समाजासमोर येत असते. सकारात्मक विचार करणे, आत्मविश्वास, प्रचंड परिश्रमांची सवय, केवळ स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी नव्हे, तर आपल्या देशासाठी आयुष्यभर कार्यरत राहण्यामधली कृतार्थता त्यांनी अनुभवली आहे आणि याचेच दर्शन आपल्याला या आत्मचरित्रातून पानोपानी घडत जाते.  

"उद्योग विश्व, शिक्षण आणि राष्ट्रीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून डॉ. माशेलकर सरांनी एक ख्यातनाम शास्त्रज्ञ म्हणून दिलेलं योगदान हे असाधारण असेच आहे. भारताला अशा अनेक माशेलकरांची आज गरज आहे. ज्यामुळे विज्ञान- तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य भारतीयांचे जीवनमान सुधारण्याचे कामभविष्यात होऊ शकेल," अशा शब्दात भारताचे माजी सरन्यायाधीश पी. एन. भगवती यांनी डॉ. माशेलकर यांच्या कार्याचा गौरव केला आहे. यालाच उत्तर देतांना डॉ. माशेलकर म्हणाले, “जीवन हा एक खूप लांबचा प्रवास असतो. या प्रवासात अनेकजण आपल्याला भेटतात, आपल्या आयुष्याला आकार देत असतात. त्यांचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो. खरंच अशी जगावेगळी माणसं भारतात आहेत म्हणून भारताचे वेगळेपण टिकून आहे असं कायम वाटते. आज उद्योगपती मुकेश अंबानी, रतन टाटा, स्वाती पिरामल, इन्फोसिस चे नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांसारख्या असंख्य व्यक्तींना भावणारे डॉ. माशेलकर वाचतांना नकळतपणे काही क्षण अभिमान वाटतो.  

मुंबईतील गिरगाव चौपाटीजवळ महापालिकेच्या दिव्याखाली बसून अभ्यास करणाऱ्या एका शाळकरी मुलाला इथल्या अनेक समाजघटकांनी कसे प्रेम दिले, कसा आधार दिला याबाबतची कथा आपल्याला या आत्मचरित्रात वाचायला मिळते पण अशा परिस्थितीतून पुढे येऊन डॉ. माशेलकर सरांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवनिर्माणाच्या माध्यमातून लक्षावधी लोकांसाठी कसे योगदान दिले आहे, याची अनेक उदाहरणांसह विस्तृतपणे आणि वाचनीय अशी माहिती या ग्रंथात वाचायला मिळते. 

"पुढचं शतक हे मनाचं आहे, ज्ञानाचं आहे आणि भारतामध्ये त्याचं नेतृत्व करण्याची सार्थ क्षमता आहे. म्हणून पुढचं सहस्रक हे नक्कीच भारताचं आहे. ज्यामध्ये भारत अव्दितीय बौद्धिक आणि आर्थिक महासत्ता म्हणून गणला जाईल. पूर्वीच्या सहस्रकात असलेलं गतवैभव भारताला पुन्हा प्राप्त होईल." डॉ. माशेलकर सरांचा हा अफाट, दुर्दम्य आशावाद हीच त्यांच्या आजवरच्या जीवनप्रवासाची, हीच त्यांच्या अस्सल भारतीयत्वाची ओळख आहे. डॉ. माशेलकर सरांचे आत्मचरित्र म्हणजे अमृत महोत्सवी वर्षातील देशाला मिळालेला अप्रतिम आणि अनमोल असा ठेवा आहे. भारताची शताब्दीकडे वाटचाल करताना उपयुक्त ठरेल अशी त्यांनी सांगितलेली ही सप्तसूत्री दिशादर्शक आहे. १. संतुलित भारत २. सुसंस्कारित भारत ३. सुविद्य भारत ४. समृद्ध भारत ५. सुशासित भारत ६. सुरक्षित भारत ७. स्वानंदी भारत ही सप्तसूत्री आपण प्रत्येकाने अंमलात आणायला हवी असं त्यांना वाटतं. ही सप्तसूत्री सत्यात उतरवून नवा भारत घडवण्यासाठी तत्पर राहण्याची हीच योग्य वेळ आहे. रतन टाटा लिहितात, "डॉ. माशेलकरांच अफाट ज्ञान आणि कर्तेपण त्यांच्या असामान्य नम्रतेमागे नेहमीच लपतं." आणि याचसाठी हे चरित्र आवर्जून संग्रही असावे.  

दुर्दम्य आशावादी - डॉ.रघुनाथ माशेलकर 

लेखक - डॉ. सागर देशपांडे

प्रकाशक- सह्याद्री प्रकाशन,पुणे

मूल्य- ₹ ९९९

✍️ सर्वेश फडणवीस 


Wednesday, March 15, 2023

◆ कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया -१९६२


भारतीय सैन्यातील एक पराक्रमी सैनिक आणि परमवीर चक्राचे ते सहावे मानकरी आहेत. कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३५ रोजी शकगड जिल्ह्यातील जनवल या गावी झाला. त्यांचे वडील ब्रिटिशकालीन भारतीय सेनेत कार्यरत होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण आपल्या गावी घेतल्यानंतर १९४६ रोजी ते बेंगलोर येथे किंग जॉर्ज रॉयल मिलिटरी कॉलेज येथे दाखल झाले. या कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) येथे त्यांनी प्रवेश घेतला.

५ डिसेंबर १९६१ रोजी दुपारी एक वाजून बारा मिनिटांच्या सुमारास कॅप्टन सलारिआ आपल्या छोट्या फौजेनिशी रस्त्यावरच्या अडथळ्यापासून काही अंतरावर पोहोचले आणि त्यांच्या उजवीकडून होणाऱ्या शत्रूच्या मोठ्या तोफा आणि बंदुकीच्या गोळीबारात सापडले. या ठिकाणी शत्रूने न दिसणाऱ्या खड्डयात तळ ठोकला होता. कॅप्टन सलारिया यांच्या छोट्या तुकडीसमोर, शत्रूच्या दोन शस्त्रसज्ज गाड्या आणि सैनिक होते. कॅप्टन सलारिया यांना एका गोष्टीचे समाधान वाटले की, त्यांची टक्कर छोट्या फौजेशी होतेय. हीच फौज शत्रूच्या मुख्य अडथळ्याला जर जाऊन मिळाली, तर मुख्य अडथळा जास्त मजबूत झाला असता आणि त्यांचे मुख्य उद्दिष्ट संकटात आले असते. त्यांनी ग्रेनेडच्या साहाय्याने शत्रूशी लढत दिली. त्यांना प्रसंगी रॉकेट लाँचर सहकार्यही मिळाले. या शौर्यपूर्ण कामगिरीमध्ये कॅप्टन सलारिया यांनी शत्रुसैन्यातील काहींना ठार केले. शस्त्रांनी सज्ज असलेल्या दोन गाड्या उलथवल्या. या अनपेक्षित शौर्यपूर्ण हल्ल्याने शत्रूचे मनोधैर्य खचले आणि ते संरक्षित जागी असून आणि त्यांचे संख्याबल अधिक असूनही, त्यांनी हल्ला केला. 

शत्रूच्या तोफांमधून आलेल्या गोळ्याने, कॅप्टन सलारिया यांच्या मानेला दुखापत झाली. त्यातून रक्तस्त्राव होत होता. पण अगदी शेवटपर्यंत ते लढत होते. कॅप्टन सलारिया यांच्या धीरोदात्त कामगिरीमुळे लढाईच्या मुख्य ठिकाणाकडे, शत्रूची ही फौज जाऊन मिळण्यास प्रतिबंध झाला. त्यामुळे त्या आडवळणावर शत्रूविरुद्ध लढणाऱ्या त्यांच्या मुख्य सेनेला यश प्राप्त झाले. 

कॅप्टन सलारिया यांना झालेल्या जखमांमुळे, नंतर त्यांचा मृत्यू झाला. स्वतःच्या सुरक्षिततेची जराही पर्वा न करता, निर्भीड नेतृत्वामुळे, कॅप्टन सलारिया यांनी आपल्या छोट्या गुरखा चमूला खूप प्रोत्साहित केले. शत्रूकडे संख्याबळ अधिक होते आणि त्यांनी त्या जागेवर भरभक्कमपणे पाय रोवले होते. तरीही ह्या छोट्या चमूने निधड्या छातीने, ती जागा लढवली. शत्रुसैन्याचे अनेक सैनिक मारले आणि शत्रूचा बीमोड केला. आपल्याकडे शत्रूच्या तुलनेत मनुष्यबळ कमी असतांना, कोणत्याही सुरक्षेचा विचार न करता, कर्तव्य बजावताना, भारत मातेचे संरक्षण करताना धैर्य आणि शौर्य दाखवण्यासाठी कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया यांना १९६२ रोजी मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. भारत मातेच्या या वीराला, त्यांच्या कार्याला मनापासून प्रणाम.

सर्वेश फडणवीस 

#rashtrankur #राष्ट्रांकुर #Day6 #paramvirchakra

Monday, March 13, 2023

' महामहोपाध्याय ' डॉ. वा.वि. मिराशी

महामोहपाध्याय डॉ. वा.वि. मिराशी अर्थात डॉ. वासुदेव विष्णु मिराशी हे नाव विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथसहवास येथे सर्वप्रथम वाचले. कुतुहल म्हणून पुढे त्यांच्याबद्दल त्याच ठिकाणी अनेकजण भरभरून बोलले आणि अनेकांना त्यांचा सहवास ही लाभला आहे. डॉ. वा. वि. मिराशी यांचा जन्म कोकणात झाला असला, तरी त्यांचे सारे कार्यकर्तृत्व नागपूरातच घडले. कारण त्यांचे वास्तव्य सहा दशके नागपूरात होते. नागपूरच्या ऐतिहासिक इतिहास लेखनातून ते आजही अनेकांच्या स्मरणात आहेत आणि त्यांचे लेखन वाचून आजही आपल्या ज्ञानात भर पडत असते. 

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक म्हणून वा.वि. मिराशी यांची ओळख जगन्मान्य आहे. त्यांचा जन्म १३ मार्च १८९३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कुवळे सध्या जि.सिंधुदुर्ग येथे मध्यमवर्गीय कुटुंबात विष्णु आणि राधाबाई या दाम्पत्यापोटी झाला. त्यांचे शिक्षण राजाराम हायस्कूल आणि राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथे झाले, तसेच पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये काहीकाळ ते होते. सुरुवातीस मुंबईतील शासकीय एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले या काळात त्यांनी एलएल. बी. पदवी प्राप्त केली. काही काळानंतर नागपूरच्या मॉरिस कॉलेजामध्ये आणि नंतर नागपूर विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. काही काळ तेथील पदव्युत्तर मानसशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली. नागपूरमधील ‘विदर्भ संशोधन मंडळʼ या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या संस्थेचे ते कार्याध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी इंग्रजीतील संशोधन मराठीत लिहून ते विदर्भ संशोधन मंडळाच्या मासिकात प्रकाशित केले. 

प्राचीन शिलालेख, नाणी आणि अभिजात प्राचीन संस्कृत साहित्य ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्रे होती. त्यांनी वाकाटकांच्या ताम्रपटांचा आणि शिलालेखांचा मागोवा घेऊन सध्याचे रामटेक म्हणजेच मेघदूतातील रामगिरी आहे असे पुराव्यानिशी  मांडले. त्यांनी मेघदूतातील रामगिरी अर्थात रामटेक या नावाने ते प्रकाशित केले. त्याचप्रमाणे अजिंठ्याच्या लेणे क्रमांक १६ येथील वाकाटक लेखाचे वाचन करून नंदिवर्धन अर्थात आताचे रामटेकजवळील नगरधन आणि वत्सगुल्म अर्थात वाशिम या ठिकाणी वाकाटक राजवंशाच्या दोन शाखा होत्या, हे सिद्ध करून त्यांनी वाकाटक वंशावळ निश्चित केली. अजिंठ्याच्या लेखातील ‘सुवीथिʼ या शब्दाचे योग्य वाचन करून अजिंठ्याच्या लेणी क्रमांक १६, १७, १९ व २१ मधील भित्तिचित्रे वाकाटकांच्या कारकिर्दीत काढली गेली, हे त्यांनी स्पष्ट केले. 

शिलालेख व ताम्रपट यांच्या अचूक वाचनाबरोबरच नाणीशास्त्रातही त्यांनी अजोड कामगिरी केली. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील तऱ्हाळा येथे सातवाहनकालीन नाणेनिधी सापडला; त्याचा सखोल अभ्यास करून पुराणांत तसेच इतर प्राचीन साहित्यात उल्लेख नसलेल्या तीन नवीन सातवाहन राजांचा शोध लावण्यात त्यांना यश मिळाले.संस्कृत साहित्यातील त्यांचे विशेष योगदान त्यांच्या कालिदास, भवभूती, हर्षचरितसार आणि लघुकौमुदी या पुस्तकांतून दिसून येते. याशिवाय त्यांनी संशोधन मुक्तावलिमधून अनेक संशोधनात्मक लेख लिहिले. कॉर्पस् इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम् या ग्रंथमालेचे मिराशी हे पहिले भारतीय संपादक होते. या परंपरेतूनच त्यांनी कलचुरी आणि त्यांचा काल, वाकाटक आणि त्यांचा काल, शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख, सातवाहन व पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख इत्यादी प्राचीन राजवंशांवरील ग्रंथ लिहिले. डॉ. मिराशींनी प्रामुख्याने इंग्रजीतून लेखन केले; तथापि प्रारंभीचे त्यांचे ग्रंथलेखन मराठीत होते. त्यांचे सुमारे ३८ ग्रंथ आणि चारशेहून अधिक संशोधनात्मक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांच्या ग्रंथांची विविध भाषांतून भाषांतरे झाली आहेत.

डॉ. वा.वि.मिराशी यांना अनेक शिष्यवृत्त्या, पारितोषिके मिळाली. तत्कालीन ब्रिटिश सरकारची 'महामहोपाध्याय' ही उपाधी १९५६ मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते आणि १९६१ मध्ये राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या हस्ते ताम्रपट त्यांना मिळाला आहे; केंद्र सरकारतर्फे 'पद्मभूषण' या सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले आहे. असे महामोहपाध्याय डॉ.वा.वि मिराशी हे नागपूरभूषण आणि नागपूर चे वैभव आहेत. आज त्यांची जन्म जयंतीनिमित्त त्यांना सादर अभिवादन. 

सर्वेश फडणवीस

Tuesday, March 7, 2023

अष्टावधानी 'ती' 🇮🇳


आज जागतिक महिला दिन. महिला, स्त्री याचा समानार्थी शब्द अर्थात अष्टभुजा. सारी प्रतीके जिच्या हाती आहेत ती अष्टभुजा आणि ती अष्टावधानीच असली पाहिजे असं कायमच वाटतं. महत्वाच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्वापार तिने सांभाळल्या आहेत आणि आजही त्या सर्वोत्तम पद्धतीने सांभाळते आहे. 

अष्टभुजा ही कालानुरूप बदलत गेली. वेदकाळात वैदिक संहितेचे अध्ययन करणारी ती ऋषिका होती. सातवाहन काळात राणी नागनिका हिच्या यशस्वी कारकीर्द आपणांस ज्ञात आहेच. पुढे गुप्त घराण्याची प्रभावती गुप्ता ही वाकटकांची सून झाल्यावर विदर्भाचे राज्य तिने यशस्वीपणे चालवले. मध्ययुगात स्त्री शक्तीने यशस्वी राज्यकारभार बघितला आणि आपल्या पराक्रमाने विजयी ध्वज डौलाने फडकवला. सत्याचा आदर्श जिजाबाई, अहिल्याबाई आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई आहेत कारण त्यांचे वैशिष्ट्य ही एकच सदैव अष्टावधान जागरूक असलेल्या त्या आहेत.

खरंच स्त्री ही अष्टभुजाच आहे. सारे गुणात्मक स्त्रीलिंगी शब्द हे तिचेच आहेत .तेव्हा अष्टवधान जागृत असलेली स्त्रीची आज भारतमाता विश्वपटलावर वाट पाहतो आहे. ' यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता' हीच वेदांची शिकवण आम्हाला परंपरेने मिळालेलं वैभव आहे याच परंपरेचे पाईक म्हणून या कर्तृत्ववान स्त्रियांचा उल्लेख करता येईल. 

आज भारताचे नेतृत्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु करतात आहेत. देशाचे अर्थ खाते निर्मला सीतारामन यांच्याकडे आहे. डी आर डी ओ च्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या प्रमुख संचालिका मिसाईल वूमन ऑफ इंडिया म्हणून ज्यांची ओळख जगन्मान्य झाली आहे अशा डॉ. टेसी थॉमस आहेत. देशातील जुने विद्यापीठ म्हणून लौकिक असलेले जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित आहेत. देशातील सगळ्यात जुनी आणि सर्वात मोठी वैज्ञानिक संस्था (CSIR) कौन्सिल फॉर सायंटिफिक इंडस्ट्रीअल रिसर्च अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन अनुसंधान संस्थेच्या महासंचालक डॉ. नल्लाथेंबी कलाईसेलवी आहेत.

आज इतके सगळे मोठे दायित्व स्त्रीला देणं हा स्त्रीत्वाचा सन्मान आहे असं वाटतं. देशाचे भविष्य नक्कीच उज्वल आणि विकसित राष्ट्रांकडे जाणारा हा प्रवास अभिमान वाटावा असाच आहे. यांच्या वाटचालीस मनापासून सदिच्छा आहेत आणि जागतिकीकरणात प्रत्येक महिला स्वतःला सिद्ध करत यशस्वी वाटचाल करणाऱ्या प्रत्येक महिलेला नमन आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. 

✍️ सर्वेश फडणवीस

#womensday2023

Monday, March 6, 2023

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा !


आज सकाळपासून सारखें हेच गाणं गुणगुणतो आहे. या गाण्याचे आणि आजच्या दिवसांचे प्रयोजन कसे होऊ शकेल या बद्दल नाही सांगता येणार पण फाल्गुन पौर्णिमेला वेध लागतात ते होळीचे. पारंपरिक भारतीय सणांच्या रचनेमध्ये वर्षाचा शेवटचा सण म्हणजे होळी हा आहे. फाल्गुन पौर्णिमेला संध्याकाळीच होळी करतात. विधिपूर्वक पवित्र अग्नी होळीमध्ये प्रज्वलित केला जातो. साधारणपणे पौर्णिमा ते वद्य पंचमी असा हा रंगोत्सव आपल्याकडे आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. मुळात सणांची मजा ही वर्णन करण्याच्या पलीकडची आहे. कुठलाही सण उत्साहात साजरा करण्याची भारतीय मानसिकता ही जगावेगळी आहे. 

अग्नी ही एकच देवता हव्य अर्थात हवनाची सामग्री वहन करणारी आहे. काहीही हवनद्रव्य दिले की ते ज्या देवतेच्या नावाने दिले जाईल त्या देवतेपर्यंत ते पोहोचवायचा त्या अग्नीलाच फक्त अधिकार असतो. म्हणून शास्त्रोक्त अग्नी स्थापना करून होळी साजरी केली जाते.

वद्य प्रतिपदेला “धूलिवंदन” असते. त्या दिवशी होळीच्या राखेची किंवा धूळीची पूजा करतात. पारंपरिक पुरणपोळीच्या नैवेद्याच्या रूपाने आपण होळीला आपली कर्मे आणि कर्तृत्ववाचा अहंकार हेच अर्पण करायचे असते. अशा समर्पित भावनेनंतर दुसरा दिवस येतो तो रंगपंचमीचा. या दिवशी पिचकरीने रंग उडवण्याची मजा वेगळीच असते. पळसाची फुलं पाण्यात भिजवून त्या रंगाच्या पाण्याने रंगोत्सव आणखीनच उत्साह प्रदान करतो. रंगोत्सवातुन निखळ प्रेम आणि सुख हेच मिळतं. आणि यातूनच येणाऱ्या नवीन वर्षात पदार्पण करण्यासाठी ज्याप्रमाणे रंगांची उधळण करून रंगोत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे येणारे वर्ष सर्व रंगानी युक्त, मुक्त बहरत जीवन अधिक जबाबदारी आणि प्रत्येकाप्रति प्रेम भाव निर्माण करो याचसाठी रंगपंचमी हा दिवस असावा असं वाटतं. 

वृंदावनातील रंगोत्सव हा जगभरातील आकर्षणाचा विषय आहे. श्री भगवंत आणि गोपी यांच्यातील रंगोत्सव म्हणजे बघण्यासारखा सोहळा आहे. रंग खेळण्यासाठी प्रामुख्याने वापरतात तो गुलाल म्हणजे प्रेमातला आनंद आणि या आनंदाची उधळण म्हणून गुलाल. गुलाल हे भगवतप्रेमातील आनंदाचे प्रतीक आहे. म्हणून जन्मोत्सव झाल्यावर गुलालाची मुक्त उधळण करतात. गुलाल हा प्रेमाचा रंग आहे.आणि याची मुक्त बरसात करण्यासाठी या रंगपंचमीच्या दिवसाची योजना असावी असं वाटतं. 

आपल्या संस्कृतीत जी सणांची मांडणी केली आहे ती अतिशय जाणीवपूर्वक केली आहे असे ककायम वाटते. अविद्येची, अज्ञानाची, अपूर्णतेची, विकारांची होळी करून ज्ञानाचा, तेजाचा, सद्गुणांचा, सत्त्वाचा स्निग्ध प्रकाश पसरवणारा हा तेजोत्सव अर्थात आपल्या सणांच्या उत्सवातील शेवटचा सण होलिकोत्सव. प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि उत्साह प्रदान करून ही होळी आनंदाची अनुभूती प्रदान करो हीच सदिच्छा. होळीबद्दल लिहिताना सुरेश भटांच्या ओळीच आठवतात आहेत. ते लिहितात, 

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा !

✍️ सर्वेश फडणवीस

#holi