राम नवरात्रात जसे गीत रामायण ऐकलं जातं तसंच आवर्जून आठवण होते ती म्हणजे राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका वं. मावशी केळकर यांनी सांगितलेली "रामायणावरील प्रवचने" या ग्रंथाची. रामायण हा भारताचा मानबिंदू आहे. सर्वसामान्य माणसाला श्रीरामांच्या जीवनातून खूप काही घेण्यासारखे आहे. रामायणाचे हेच महत्त्व जाणून वं.मावशींनी रामायणावरील प्रवचनांचा उपक्रम सुरु केला जो आजही गुढीपाडवा ते रामनवमी समितीच्या शाखांमध्ये नियमित सुरू आहे. वं. मावशींची निवेदन पद्धती शांत, प्रवाही आणि भावनाप्रधान असली तरी तर्कनिष्ठ होती. सुदैवाने ही प्रवचने आज पुस्तकरूपाने उपलब्ध आहेत. रामात आम्ही आज्ञाधारक पुत्र, एकपत्नीव्रत धारण करणारा पती, लहान भावांवर प्रेम करणारा भाऊ, प्रजेचं सदैव रक्षण करणारा आदर्श राजा,आणि एक श्रेष्ठ अवतारी पुरुष पहावा अशी त्यांची शिकवण होती.
खरं तर रामायणावर आज बरेच साहित्य उपलब्ध आहे, तरीही वं. मावशींनी लिहिलेली प्रवचने वाचकाला आकर्षित केल्यशिवाय राहत नाहीत. राष्ट्र सेविका समिती प्रमाणेच त्यांनी रामायणावरील प्रवचनांच्या माध्यमातून राष्ट्र आणि समाजसेवेचे महत्त्वाचे कार्य सार्थकी लावले. श्रीराम हा देव असला तरी मानवरूपाने अवतरला असल्याने रामायणावर आमचाच अधिकार आहे असे वं. मावशी आपल्या प्रवचनात सांगतात. वास्तविक त्या काळात रामायण, महाभारत यांसारखे ग्रंथ घरात स्त्रियांनी वाचू नये असा दंडक होता. देवळात जाऊन पुराणिकांच्या तोंडून जे काही ऐकायला मिळेल तेवढेच त्यांना या ग्रंथाचे ज्ञान होई. अशा रूढीबद्ध समाजात वाढत असताना वं. मावशींनी त्याकाळी सहज उपलब्ध असलेला ग्रंथ म्हणजे 'रामविजय' वाचून उत्तम अशा रामायण प्रवचनांची स्वतः रचना केली. अत्यंत प्रवाही भाषा आणि समजण्यास सोपें असे या प्रवचनांचे वेगळेपण आहेच आणि वाचतांना प्रत्येक पानावर ते कायम जाणवतं. प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी त्याकाळी संपूर्ण भारतभर भ्रमण केले.
सन १९६० - ६१ चा काळ. वं. मावशी लखनौ प्रवासात असताना त्यांच्या परम श्रद्धास्थानी असलेल्या राष्ट्रपुरुष श्रीरामांच जन्मस्थान 'अयोध्या' येथे दर्शनार्थ गेल्या. त्यावेळी एका मोठया फाटकाच्या आतल्या बाजूस खुर्चीवर श्रीरामपंचायतनाचा फोटो ठेवला होता. त्याचंच दर्शन घ्यावे लागे. त्या फोटोवर फुलं अर्पण करत असता त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्या म्हणाल्या, "आपला भारत देश स्वतंत्र झाला पण माझा राम अजूनही बंदी आहे ! कधी- कोण करणार त्याला मुक्त ". त्यांच्या हृदयातील हाकेला जणू जनमानसाने ओ दिला आणि काही वर्षांतच श्रीरामजन्मभूमीमुक्तीची योजना आकारास आली. आज सत्तेवर आलेल्यांकडून एक आशेचा किरण आपल्याला दिसला आणि कायद्याच्या लढाईत जिंकल्यावर रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिराचे निर्माण कार्य सुरू झाले आणि लाखो लोकांच्या हृदयात सदैव विराजमान असणारे रामराय अखेर बंदीवासातून मुक्त झाले. अयोध्येत पुढच्या वर्षीच्या रामनवमीच्या आधी भव्य राम मंदीर होईलच आणि रामलला विराजमान झालेले संपूर्ण जग बघणार आहेच.
रामायण कथनाने वं. मावशींना वैयक्तिक असा फायदा झाला की, त्यांची सुप्तावस्थेत असलेली वक्तृत्व शक्ती ही उदयास येऊन त्यात दिवसेंदिवस कमालीची वृद्धी झाली. श्रीरामांच्या जीवनावर प्रवचन करत असता समाजावर संस्कार करण्याचे कार्य घडत होतेच, शिवाय त्यांच्या समितीचे कार्य करण्यासाठी उत्तम कार्यकर्ते आणि सहकारीही मिळत होते. त्यांना एकाने विचारले होते की, आपण प्रवचनांसाठी 'रामकथा' का निवडलीत ? त्यावर त्यांनी दिलेले उत्तर विचार करण्यासारखे आहे, त्या म्हणाल्या,
" मानवी जीवनाच्या दृष्टीने पूर्ण मानव म्हणून श्रीरामचरित्र आहे. रामाचे जीवन सर्वच बाबतीत आदर्श आहे. समाजातील लोकांना संघटीत करून संस्कारीत करायचे असेल तर श्रीरामचरित्राच्या अभ्यासाने भारतीयांचे चारित्र्य सुधारेल यात मुळीच शंका नाही " प्रभू श्रीरामचंद्र हे महामानव, महापुरुष वाटतात. त्यांच्याकडे पूर्ण मानव, आदर्श मानव म्हणून बघू शकतो आणि केवळ पूजा, नमस्कार एवढाच आपला संबंध न राहता त्यांचे जीवन आचारण्याच्या प्रयत्नास माणूस लागेल. मानवी आचरणाचे आचरण करण्याची इच्छा नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. सर्वांनी एकत्र येऊन रामायणाचे आयोजन केल्याने 'एकसूत्रीपणा' येऊन हे राष्ट्र परम वैभवापर्यंत जाईल."
आज राष्ट्र सेविका समितीच्या अनेक सेविका या रामायण प्रवचनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृती आणि समाज संस्कारित करण्याचे महत्कार्य करतात आहेत. वं. मावशींनी रामायण प्रवचनांच्या माध्यमातून त्याकाळी मांडलेला रामकथेचा जागर समाजाचे मन जिंकण्यास किती महत्वाचा होता हे यावरून दिसतं.
- सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment