दरवर्षी गुढीपाडव्यापासून राम नवमी पर्यंत रामनवरात्रात रामरक्षा पठणाबरोबर गीत रामायण ऐकण्याचा कुळाचार ही संपन्न होतो. याची गोडी अवीट अशीच आहे. मराठी काव्यविश्वातील अजरामर महाकाव्य. ‘न भूतो न भविष्यती’ असे एकमेवाद्वितीय असेच म्हणता येईल. १९५६ साली पहिल्यांदा पुणे आकाशवाणी वरून प्रसिद्ध झालेले हे काव्य आजही तितकेच अविस्मरणीय वाटते. ६५ हुन अधिक वर्ष झाली या काव्याला तरीही याचा गोडवा तसाच आहे.
वाल्मिकींनी रामायणात २८००० श्लोक लिहिलेत आणि ग. दि. माडगूळकर यांनी तीच रामकथा ५६ गीतात लिहिली. काल रात्री यु ट्यूबवर मा.अटल बिहारी वाजपेयी यांचे गीत रामायण सुवर्ण जयंती महोत्सवाचे भाषण ऐकत होतो. त्यांत त्यांनी खूप छान उल्लेख केला.. ते म्हणाले “ काळाचं चक्र चालत राहील. आम्ही ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीत वाहून जाऊ. पण गीत रामायण हे नित्य निरंतर अजरामर राहील”.
आज इतके वर्ष होऊन अनेक पिढ्या होऊन गेल्या तरी गीत रामायणाचा गोडवा काही वेगळाच आनंद देऊन जातो. त्यातली काही गाणी तर वातावरण प्रसन्न आणि आल्हाददायक करत असतात. स्वयें श्री राम प्रभू ऐकती पुढे राम जन्मला ग सखे, किंवा दैवजात दुःखे भरता सारखी अनेक गाणी विचार करायला प्रवृत्त करतात. अनेक गाणी मनाला आनंद देत असतात. सेतू बांधारे सागरी सारखी गाणी असु देत किंवा मग भावनाप्रधान आशय असलेली थांब सुमंता थांबवी रे रथ सारखे. कायम ऐकावे वाटणारे असे हे अजरामर काव्य. चैत्रात जसं वातावरणात चैतन्य असतं त्याच जोडीला प्रतिपदेपासून रामनवमी पर्यँत या गीत रामायणानेही एक वेगळे चैतन्य निर्माण होते.
अशा गीत रामायणाचा प्रत्येक मराठी माणसाने नक्की आस्वाद घ्यायला हवाच. यातला प्रसंगानुरूप गीतेतला गोडवा आणि आशय आपण ऐकूनच अनुभव घेऊ शकतो. कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर यांचे शब्द आणि गायक सुधीर फडके यांचे स्वर म्हणजे अवर्णनीय भाग्यच. शब्दस्वरातून झंकारणारा प्रसाद आणि त्यातूनच काळजाच्या गाभ्याला हात घालणारे भावपूर्ण गायन यामुळे गीत रामायण ही कलाकृती राहिली नाही तर मराठी सांस्कृतिक जीवनाचा तो अनमोल असा ठेवा झाला. म्हणून गीत रामायण चिरतरुण झालं,ज्याचा गोडवा आजही तेवढाच अवीट आहे. मराठी काव्यविश्वातील आणि गानविश्वातील लव-कुश होऊ शकतील असे गदिमा आणि बाबूजी हे आजही गीत रामायण ऐकवत आहेत. असे वाटावे, इतकं विलक्षण कार्य यांनी केले आहे.
गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराथी, कन्नड, बंगाली, आसामी भाषा, तेलुगु, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. या सर्व भाषांतरांचे वैशिष्ठ्य म्हणजे भाषांतरकर्त्यांनी एका मात्रेचाही फरक केलेला नाही. ही सर्व भाषांतरे मूळ बाबूजींनी दिलेल्या चालीवरच गायली जातात. अशा या विलक्षण प्रतिभेचे काव्य ‘गीत रामायण’ हे आपण नक्की ऐकण्याचा प्रयत्न करूया आणि हीच तेजाची आरती श्री रामरायांच्या चरणी अर्पण करूया.
✍️ सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment