Saturday, March 18, 2023

जीवनपटाच्या उंचीवर असणारे दुर्दम्य आशावादी - डॉ. रघुनाथ माशेलकर

 

डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी गेली सहा दशके आपले आयुष्य विज्ञान आणि समाजाच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. ज्येष्ठ संशोधक, शास्त्रज्ञ, पद्म श्री, पद्म भूषण, पद्म विभूषण अशा अनेक पुरस्कारांनी शोभून दिसणाऱ्या सरांनी नुकतेच वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. प्रत्यक्ष भेटल्यावर ती ऊर्जा आजही जाणवते. जो त्यांच्या संपर्कात आला तो याबद्दल अधिक समजून घेईल. ज्याची आतुरतेने वाट बघत होतो असे त्यांचे आत्मचरित्र पुण्यात अत्यंत देखण्या समारंभात नुकतेच प्रकाशित झाले. जवळपास ६०० पानी असलेल्या आत्मचरित्राचे सलग वाचन झाले. खरंतर सकारात्मकतेचा ध्यास घेतलेल्या दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर या त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रत्येक पानावर आशावाद पावलोपावली जाणवतो. अत्यंत वाचनीय आणि संग्रही असावे असेच हे आत्मचरित्र आहे. आम्हा तरुण पिढीला आणि नव्या संशोधकांना हे चरित्र उपलब्ध करून दिल्याबद्दल लेखक डॉ. सागर देशपांडे यांचे विशेष अभिनंदन आहे. गेली जवळपास १३ वर्ष ते या चरित्रावर काम करत होते. 

डॉ. माशेलकर सरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या आयुष्याची सुरुवात केली. परिस्थितीने आपल्याला काय काय आणि कसं शिकवलं याबाबत वेळोवेळी आपल्या व्याख्यानात ते बोलतात, ऐकणाऱ्यांसाठी खरोखरच प्रेरणादायी असते, आधार देणारे असते. प्रचंड परिश्रम करण्याची, ते अखंडपणे चिकाटीने करत राहण्याची त्यांची सवय, सतत नवनवीन शिकण्याचा ध्यास, लोकांमध्ये मिसळून जाण्याचा स्वभाव, स्वतःच्या अभ्यास संशोधनासाठी एकांत उपलब्ध करून घेण्यासह वेळेचं अफाट व्यवस्थापन, 'मल्टिटास्किंग' या नेमक्या इंग्रजी शब्दात व्यक्त होणारे, अनेक कामांमध्ये गुंतण्याबाबतचे झपाटलेपण, वाचन, लेखन, मनन, चिंतन, भाषण आणि त्याला दिलेली कृतीची जोड याबद्दल वाचतांना आपण अचंबित होतो. 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून - भारताच्या राष्ट्रपतींपर्यंत सर्वसामान्य व्यक्तींपासून सर्वांना तितक्याच आपुलकीने, नम्रपणाने भेटण्याचा त्यांचा स्वभाव आहे. चित्रकलेपासून शास्त्रीय संगीतापर्यंत आणि कॅरमपासून क्रिकेटपर्यंत जीवनातील  अनुभूती घेण्याची, जीवनाची कलात्मक मैफल अनुभवण्याची त्यांची वृत्ती आहे, कुटुंब वत्सलतेबरोबरच संस्थाप्रमुख म्हणून घ्यावी लागणारी कडक भूमिका स्वीकारण्याचं उत्तम प्रशासकीय आणि नेतृत्व कौशल्य, फोन- ई मेल पत्रांना उत्तर देण्याची श्रीमंती, नम्रपणा न सोडता देखील योग्य वेळी ठाम आणि कठोर भूमिका घेऊन ती परखडपणे तोंडावर सांगण्याचे धाडस अशा अनेक असाधारण गुणांचा प्रत्यय माशेलकर सरांच्या जीवनप्रवासातून आपल्याला घेता येतो. 

डॉ. माशेलकर सरांचे चरित्र वाचतांना राजकारण्यांपासून उद्योगपतींपर्यंत आणि शास्त्रज्ञांपासून ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींपर्यंत सर्वांशीच स्नेहभावाने आणि आपुलकीने कसे वागावे याची शिकवण त्यांनी घालून दिलेली आहे. प्रत्येकाशी अगत्याने वागणाऱ्या माशेलकर सरांनी समाजातल्या अनेक घटकांना, गरजू मंडळींना यथाशक्य कायम मदतीचा हात पुढे केला आहे. व्यक्ती, संस्था, प्रक्रिया यासंबंधी बोलताना कुणी नकारात्मक सांगत असेल, लिहित असेल तर त्यावेळी आणि त्यानंतरही त्यातल्या सकारात्मक बाजूंवरच अधिक बोलणारे, त्या सकारात्मक बाजूलाच अधिक बळ देणारे आणि भविष्याकडे बघायला उद्युक्त करणारे माशेलकर सर अनुभवले की, अनेकांच्या मनातली नकारात्मकता कमी होते आणि नकळतपणे हात जोडले जातात. 

'कर्मयोगा' वर डॉ. माशेलकर सरांचा प्रचंड विश्वास आहे. तुमचे जन्मदाते पालक कोण आहेत? तुमचा जन्म कुठे आणि कोणत्या तारखेला झाला यावर तुमची ओळख ठरत नाही. तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रारंभ कसा केलात आणि पुढची सारी वाटचाल कशी केलीत? यावरच तुमची खरी ओळख समाजासमोर येत असते. सकारात्मक विचार करणे, आत्मविश्वास, प्रचंड परिश्रमांची सवय, केवळ स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी नव्हे, तर आपल्या देशासाठी आयुष्यभर कार्यरत राहण्यामधली कृतार्थता त्यांनी अनुभवली आहे आणि याचेच दर्शन आपल्याला या आत्मचरित्रातून पानोपानी घडत जाते.  

"उद्योग विश्व, शिक्षण आणि राष्ट्रीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून डॉ. माशेलकर सरांनी एक ख्यातनाम शास्त्रज्ञ म्हणून दिलेलं योगदान हे असाधारण असेच आहे. भारताला अशा अनेक माशेलकरांची आज गरज आहे. ज्यामुळे विज्ञान- तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य भारतीयांचे जीवनमान सुधारण्याचे कामभविष्यात होऊ शकेल," अशा शब्दात भारताचे माजी सरन्यायाधीश पी. एन. भगवती यांनी डॉ. माशेलकर यांच्या कार्याचा गौरव केला आहे. यालाच उत्तर देतांना डॉ. माशेलकर म्हणाले, “जीवन हा एक खूप लांबचा प्रवास असतो. या प्रवासात अनेकजण आपल्याला भेटतात, आपल्या आयुष्याला आकार देत असतात. त्यांचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो. खरंच अशी जगावेगळी माणसं भारतात आहेत म्हणून भारताचे वेगळेपण टिकून आहे असं कायम वाटते. आज उद्योगपती मुकेश अंबानी, रतन टाटा, स्वाती पिरामल, इन्फोसिस चे नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांसारख्या असंख्य व्यक्तींना भावणारे डॉ. माशेलकर वाचतांना नकळतपणे काही क्षण अभिमान वाटतो.  

मुंबईतील गिरगाव चौपाटीजवळ महापालिकेच्या दिव्याखाली बसून अभ्यास करणाऱ्या एका शाळकरी मुलाला इथल्या अनेक समाजघटकांनी कसे प्रेम दिले, कसा आधार दिला याबाबतची कथा आपल्याला या आत्मचरित्रात वाचायला मिळते पण अशा परिस्थितीतून पुढे येऊन डॉ. माशेलकर सरांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवनिर्माणाच्या माध्यमातून लक्षावधी लोकांसाठी कसे योगदान दिले आहे, याची अनेक उदाहरणांसह विस्तृतपणे आणि वाचनीय अशी माहिती या ग्रंथात वाचायला मिळते. 

"पुढचं शतक हे मनाचं आहे, ज्ञानाचं आहे आणि भारतामध्ये त्याचं नेतृत्व करण्याची सार्थ क्षमता आहे. म्हणून पुढचं सहस्रक हे नक्कीच भारताचं आहे. ज्यामध्ये भारत अव्दितीय बौद्धिक आणि आर्थिक महासत्ता म्हणून गणला जाईल. पूर्वीच्या सहस्रकात असलेलं गतवैभव भारताला पुन्हा प्राप्त होईल." डॉ. माशेलकर सरांचा हा अफाट, दुर्दम्य आशावाद हीच त्यांच्या आजवरच्या जीवनप्रवासाची, हीच त्यांच्या अस्सल भारतीयत्वाची ओळख आहे. डॉ. माशेलकर सरांचे आत्मचरित्र म्हणजे अमृत महोत्सवी वर्षातील देशाला मिळालेला अप्रतिम आणि अनमोल असा ठेवा आहे. भारताची शताब्दीकडे वाटचाल करताना उपयुक्त ठरेल अशी त्यांनी सांगितलेली ही सप्तसूत्री दिशादर्शक आहे. १. संतुलित भारत २. सुसंस्कारित भारत ३. सुविद्य भारत ४. समृद्ध भारत ५. सुशासित भारत ६. सुरक्षित भारत ७. स्वानंदी भारत ही सप्तसूत्री आपण प्रत्येकाने अंमलात आणायला हवी असं त्यांना वाटतं. ही सप्तसूत्री सत्यात उतरवून नवा भारत घडवण्यासाठी तत्पर राहण्याची हीच योग्य वेळ आहे. रतन टाटा लिहितात, "डॉ. माशेलकरांच अफाट ज्ञान आणि कर्तेपण त्यांच्या असामान्य नम्रतेमागे नेहमीच लपतं." आणि याचसाठी हे चरित्र आवर्जून संग्रही असावे.  

दुर्दम्य आशावादी - डॉ.रघुनाथ माशेलकर 

लेखक - डॉ. सागर देशपांडे

प्रकाशक- सह्याद्री प्रकाशन,पुणे

मूल्य- ₹ ९९९

✍️ सर्वेश फडणवीस 


No comments:

Post a Comment