महामोहपाध्याय डॉ. वा.वि. मिराशी अर्थात डॉ. वासुदेव विष्णु मिराशी हे नाव विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथसहवास येथे सर्वप्रथम वाचले. कुतुहल म्हणून पुढे त्यांच्याबद्दल त्याच ठिकाणी अनेकजण भरभरून बोलले आणि अनेकांना त्यांचा सहवास ही लाभला आहे. डॉ. वा. वि. मिराशी यांचा जन्म कोकणात झाला असला, तरी त्यांचे सारे कार्यकर्तृत्व नागपूरातच घडले. कारण त्यांचे वास्तव्य सहा दशके नागपूरात होते. नागपूरच्या ऐतिहासिक इतिहास लेखनातून ते आजही अनेकांच्या स्मरणात आहेत आणि त्यांचे लेखन वाचून आजही आपल्या ज्ञानात भर पडत असते.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक म्हणून वा.वि. मिराशी यांची ओळख जगन्मान्य आहे. त्यांचा जन्म १३ मार्च १८९३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कुवळे सध्या जि.सिंधुदुर्ग येथे मध्यमवर्गीय कुटुंबात विष्णु आणि राधाबाई या दाम्पत्यापोटी झाला. त्यांचे शिक्षण राजाराम हायस्कूल आणि राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथे झाले, तसेच पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये काहीकाळ ते होते. सुरुवातीस मुंबईतील शासकीय एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले या काळात त्यांनी एलएल. बी. पदवी प्राप्त केली. काही काळानंतर नागपूरच्या मॉरिस कॉलेजामध्ये आणि नंतर नागपूर विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. काही काळ तेथील पदव्युत्तर मानसशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली. नागपूरमधील ‘विदर्भ संशोधन मंडळʼ या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या संस्थेचे ते कार्याध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी इंग्रजीतील संशोधन मराठीत लिहून ते विदर्भ संशोधन मंडळाच्या मासिकात प्रकाशित केले.
प्राचीन शिलालेख, नाणी आणि अभिजात प्राचीन संस्कृत साहित्य ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्रे होती. त्यांनी वाकाटकांच्या ताम्रपटांचा आणि शिलालेखांचा मागोवा घेऊन सध्याचे रामटेक म्हणजेच मेघदूतातील रामगिरी आहे असे पुराव्यानिशी मांडले. त्यांनी मेघदूतातील रामगिरी अर्थात रामटेक या नावाने ते प्रकाशित केले. त्याचप्रमाणे अजिंठ्याच्या लेणे क्रमांक १६ येथील वाकाटक लेखाचे वाचन करून नंदिवर्धन अर्थात आताचे रामटेकजवळील नगरधन आणि वत्सगुल्म अर्थात वाशिम या ठिकाणी वाकाटक राजवंशाच्या दोन शाखा होत्या, हे सिद्ध करून त्यांनी वाकाटक वंशावळ निश्चित केली. अजिंठ्याच्या लेखातील ‘सुवीथिʼ या शब्दाचे योग्य वाचन करून अजिंठ्याच्या लेणी क्रमांक १६, १७, १९ व २१ मधील भित्तिचित्रे वाकाटकांच्या कारकिर्दीत काढली गेली, हे त्यांनी स्पष्ट केले.
शिलालेख व ताम्रपट यांच्या अचूक वाचनाबरोबरच नाणीशास्त्रातही त्यांनी अजोड कामगिरी केली. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील तऱ्हाळा येथे सातवाहनकालीन नाणेनिधी सापडला; त्याचा सखोल अभ्यास करून पुराणांत तसेच इतर प्राचीन साहित्यात उल्लेख नसलेल्या तीन नवीन सातवाहन राजांचा शोध लावण्यात त्यांना यश मिळाले.संस्कृत साहित्यातील त्यांचे विशेष योगदान त्यांच्या कालिदास, भवभूती, हर्षचरितसार आणि लघुकौमुदी या पुस्तकांतून दिसून येते. याशिवाय त्यांनी संशोधन मुक्तावलिमधून अनेक संशोधनात्मक लेख लिहिले. कॉर्पस् इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम् या ग्रंथमालेचे मिराशी हे पहिले भारतीय संपादक होते. या परंपरेतूनच त्यांनी कलचुरी आणि त्यांचा काल, वाकाटक आणि त्यांचा काल, शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख, सातवाहन व पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख इत्यादी प्राचीन राजवंशांवरील ग्रंथ लिहिले. डॉ. मिराशींनी प्रामुख्याने इंग्रजीतून लेखन केले; तथापि प्रारंभीचे त्यांचे ग्रंथलेखन मराठीत होते. त्यांचे सुमारे ३८ ग्रंथ आणि चारशेहून अधिक संशोधनात्मक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांच्या ग्रंथांची विविध भाषांतून भाषांतरे झाली आहेत.
डॉ. वा.वि.मिराशी यांना अनेक शिष्यवृत्त्या, पारितोषिके मिळाली. तत्कालीन ब्रिटिश सरकारची 'महामहोपाध्याय' ही उपाधी १९५६ मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते आणि १९६१ मध्ये राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या हस्ते ताम्रपट त्यांना मिळाला आहे; केंद्र सरकारतर्फे 'पद्मभूषण' या सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले आहे. असे महामोहपाध्याय डॉ.वा.वि मिराशी हे नागपूरभूषण आणि नागपूर चे वैभव आहेत. आज त्यांची जन्म जयंतीनिमित्त त्यांना सादर अभिवादन.
सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment