एकदा बाजीरावांबरोबर लढाईहून परत येतांना सैन्याचा तळ चौंडी गावातील सीना नदीच्या काठी पडला. नदीकाठी महादेवाचं देऊळ होतं. तिथे अहिल्या आपल्या आईबरोबर दर्शनाला आली होती. मैत्रिणींबरोबर नदीकाठच्या वाळूत शिवलिंग तयार करत होती. शाळुंकेवर वाळूचे लहान लहान गोळे ठेवून नक्षी काढत होती. तोच सैन्यातला घोडा उधळला. मैत्रिणी ओरडल्या 'अहिल्ये, पळ. घोडा उधळला.' मैत्रिणी पळाल्या सुद्धा. पण अहिल्या ? तिने आपले सर्व शरीर त्या पिंडीवर झाकले. भरधाव सुटलेला घोडा अहिल्येच्या बाजूने निघून गेला. त्याचवेळी मल्हारराव अन् बाजीराव धापा टाकत तिथे पोहोचले. तिला संतापाने खसकन् उभे करीत बाजीरावांनी ओरडून विचारले, "पोरी, इथे कां थांबलीस ? उधळता घोडा तुला तुडवून गेला असता तर?" त्यावर मुळीच न घाबरता, आपले तेजस्वी डोळे बाजीरावांच्या डोळ्याला भिडवत ती म्हणाली, "जे आपण घडवावे ते जीवापाड प्रसंगी जीव सांडूनही रक्षण करावे असंच सगळी वडील माणसे सांगतात. मी तेच केले. मी घडवलेल्या पिंडीचे रक्षण केले! माझे काही चुकले का?" त्या तेजस्वी चिमुरडीचे शब्द ऐकून बाजीराव थक्क झाले. तिच्या डोळ्यात विलक्षण तेज होते. बाजीराव मल्हाररावांकडे वळत उत्स्फूर्तपणे म्हणाले, "मल्हारबा या पोरीस तुमची सून करून घ्या. तिला राज्याच्या लायक करा. ही राज्य नांवारुपास आणेल. राज्याचं प्राणपणानं रक्षण करेल. हिचे डोळे रत्नासारखे तेजस्वी आहेत. तुमचा कुळपुत्र खंडेराव त्याला राज्याच्या लायक हीच करू शकेल. हिला सून करून घ्या आणि राज्यकारभाराच्या अनेक पदरांचं शिक्षण द्या."
बीड जिल्ह्यातील,जामखेड तालुक्यातलं चौंडी हे एक लहान गांव. माणकोजी शिंदे आणि सुशीला या मातापित्यांच्या पोटी अहिल्येने जन्म घेतला. तिला दोन भाऊ होते. चौंडीची ही अहिल्या बघताच बाजीराव आणि मल्हाररावांनी तिच्या आईवडिलांची भेट घेऊन अहिल्येला मागणी घातली. थाटात लग्नसमारंभ पार पडला. अहिल्या होळकरांची सून झाली. १७३३ मध्ये हा विवाह झाला आणि अहिल्या भाग्याची सोनपाऊले घेऊनच होळकरांच्या घरात आली. मल्हाररावांचे ऐश्वर्य वाढत चालले. अहिल्येच्या लग्नाबरोबरच तिचे शिक्षण सुरू झाले. लग्न झाले तेव्हा अहिल्या केवळ दहा वर्षांची होती. परंतु मल्हाररावांनी तिच्यातलं तेज, हुशारी जाणून, तिच्या शिक्षणासाठी गुरू नेमले. आपल्या गोड स्वभावाने आणि सेवावृत्तिने ती सर्वांची लाडकी झाली.
मल्हारराव आणि गौतमाबाई आपल्या या सुनेची अपार काळजी घेत. अहिल्येच्या पायगुणाने वैभवाची कमान उंच उंच जात होती. तिची अभ्यासातली प्रगती चकित करणारी होती. सात आठ वर्षातच ती केवळ एका नजरेने हिशोबातली चूक काढू लागली. चौदिशेस घोडेसवारी करू लागली. जिल्हे, तालुके, यांची सर्व माहिती घेतली. रामायण, महाभारत वाचून संपलं. स्तोत्रे तोंडपाठ झाली. रोज फडनिशीत जावे, हिशोब बघावे, वसूल जमा बघावी, त्यासाठी माणसं पाठवावी, न्यायनिवाडे करावे, सरदारांना पत्रे पाठवावी, फौजा तयार ठेवाव्या, खाजगी उत्पन्न आणि सरकारी उत्पन्न रोखठोकपणे वेगळे ठेवावे, मल्हारराव म्हणत, आम्ही तलवार गाजवतो ती सूनबाईच्या भरोशावर. मार्तंडांनेच हे रत्न आम्हास दिले. अवघी वीस-बावीस वर्षांची अहिल्या कुशल प्रशासक होऊ लागली.
१७४५ साली अहिल्याबाईंना पुत्र झाला. त्याचे नांव मालेराव ठेवण्यात आले. राज्यात सर्वत्र आनंदी आनंद झाला. परंतु मल्हाररावांना खंडेरावांच्या वागण्याची खंत वाटे. अहिल्येसारखे रत्न लाभूनही खंडेरावात काहीही फरक पडत नाही हे बघून त्यांना अपरंपार दुःख होई. हळूहळ खंडेराव सुधारेल ही आशाही त्यांनी सोडून दिली. आता अहिल्याबाई हेच त्यांचं आशेचं एकमेव स्थान होते. अहिल्याबाईंची हुशारी, बुद्धिमत्ता यांची पारख त्यांनी केली होती. होळकरांचे निशाण अहिल्यादेवीच उंचावर नेतील याची खात्री मल्हारराव यांना होती. ते अहिल्याबाईंना राजकारण, व्यवहार, देशाची स्थिती, सावधानता, गुप्तहेरांचं महत्त्व, पैशांची व्यवस्था, कारभारातले प्रश्न, खाचाखोचा सारं समजावून देत होते.
अहिल्याबाईंची विलक्षण बुद्धी होती. त्या दिवसेंदिवस समर्थ होत होत्या. मल्हारराव सदैव लढायात गुंतलेले असत. दूरदूरच्या ठिकाणाहून मल्हाररावांची पत्रे येत. अहिल्याबाई पत्रातील आदेश तंतोतंत पाळून, त्यांची चोख व्यवस्था करीत. अहिल्याबाई मल्हाररावांबरोबर रणांगणावरही गेल्याचे इतिहासाने नमूद केले आहे. तिथेही त्यांनी धाडस, साहस आणि रणकौशल्य दाखवून सर्व कार्यात भाग घेतला होता. रणांगणाशी संबंध येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचे त्यांना ज्ञान होते. राज्यकर्त्याने देशात फिरून भूगोल पाहिला पाहिजे, सामाजिक स्थितीचे ज्ञान करून घेतले पाहिजे असं मल्हारराव त्यांना नेहमी सांगत.
एकदा एका महत्त्वाच्या व्यक्तिस काशीला जायचे होते. त्यांची व्यवस्था करण्याची विनंती बाजीराव पेशव्यांनी अहिल्याबाईंना केली होती. अहिल्याबाईंनी त्यांची व्यवस्था केलीच आणि इंदौरपासून काशीपर्यंत वाटेत लागणारी गावे, नद्या, घाट वगैरे तपशीलाचा एक नकाशा स्वतः तयार केला. आपल्या ठिकठिकाणच्या अधिकाऱ्यांना पत्रे दिली. आपल्या पराक्रमी सासऱ्याच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली, त्यांनी सर्व राज्यकारभार नांवारूपास आणला. मालेरावांच्या पाठीवर अहिल्याबाईंना तीन वर्षांनी एक कन्यारत्न झाले. तिचे नांव मुक्ता असे ठेवण्यात आले. अहिल्याबाई नवनवीन शिखरे पादाक्रांत करत होत्या.
सर्वेश फडणवीस
#नवनवोन्मेषशालिनी #नवरात्र #लेखमाला #दिवसदुसरा
No comments:
Post a Comment