अहिल्याबाईंच्या चरित्रातील हा टप्पा अत्यंत विचार करायला लावणारा आहे. त्याकाळी असलेल्या परिस्थितीत अहिल्याबाई यांनी जो क्रांतिकारी बदल घडवला तो अद्भुत असाच होता. खंडेराव कुंभेरीच्या लढाईत मारले गेले आणि अहिल्याबाईंचा अनावर शोक बघून मल्हारराव घाबरून गेले. सगळे सरदार, 'खंडेरावाचा अंत्यविधी करायला हवा' असं सांगून मल्हाररावांना सावध करत होते.
खंडेरावांच्या नऊ बायकांना इंदोरहून आणण्यात आले. त्या सगळ्या जणी सतीवस्त्रे नेसून उभ्या होत्या. अहिल्याबाईंनीही सती जायचा निर्धार जाहीर केला. त्याही सतीवस्त्रे नेसून, मळवट भरून उभ्या राहाताच मल्हाररावांच्या दुःखाला पारावार राहिला नाही. ते अहिल्याबाईंच्या पुढे डोई घासत म्हणाले,
“मुली, अहिल्या मेली आणि खंडू जिवंत आहे असे मी समजेन, पण तूं सती जाऊं नकोस. माझं ऐक. " हृदयाचे पाणी करणाऱ्या ह्या शब्दांनी मल्हारराव पुत्रनिधनानंतर आपल्या सुनेची समजूत घालीत होते. ही गोष्ट इ. स. १७५४ मध्ये घडली. पेशव्यांचा भाऊ राघोबा ( रघुनाथ ) याने कुंभेरीचा किल्ला घेतला. या मोहिमेंत मल्हारराव त्यांच्या मदतीला गेले होते. लढाईत मल्हाररावांचा मुख्या मारला गेला. या वेळीं अहिल्याबाईही त्यांच्याबरोबर होत्या. खंडूजी मल्हाररावाचे एकुलते एक पुत्र असल्यामुळे त्यांना पुत्रनिधनाचा फार मोठा धक्का बसला. या वेळीं अहिल्याबाईचें वय अवघें वीस वर्षांचे होते.
पुत्राचा अपमृत्यू बघायची दुर्दैवी वेळ तर त्यांच्यावर आलीच होती परंतु कर्तबगार अशा सुनेनं सती जायची तयारी केलेली बघून त्यांच्या हृदयाचा ठाव सुटला. अहिल्याबाईंना राज्यकारभाराचे सर्व पदर त्यांना पुत्राच्या जागी मानूनच शिकवले. त्या तेजस्वी स्त्रीने हा सारा राज्यकारभार, त्यातल्या खाचाखोचा,तडफदारपणे शिकून घेतल्या. अहिल्याबाई कुटुंबाच्या आणि राज्याच्याही आधारस्तंभ झाल्या होत्या. हा आधारच आता कोसळणार होता. मल्हारराव दुःखाने खचून गेले. " मुली, कष्टाने मिळवलेल्या या राज्याचा, या प्रजेचा विचार कर." तेथे उभे असलेल्या नातलगांनी मल्हाररावांचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला. अहिल्याबाई म्हणाल्या, "मामंजी, पतिव्रतेने सतीच जायचे असते ना? मी सती गेले नाही तर माझ्या धर्माची चेष्टा होईल, माझी अपकीर्ति होईल, मला सती जाऊ द्या!"
"पोरी, हे राज्य तुझ्या मदतीने नावारुपास आले. आपण जे घडवावे ते प्राणपणाने रक्षावे हे तुझंच वाक्य! माझं पुण्य संपलं का पोरी ?” मल्हारराव ढसाढसा रडू लागले. तोवर गौतमाबाईंनी अहिल्येला मिठी घातली. म्हणाल्या, "अग, तू माय आहेस या घराची! या झेंड्याची लाज राख! भीक घाल या म्हाताऱ्यांच्या पदरात!" इकडे चिता रचली गेली. खंडेरावांचं प्रेत ठेवलं गेलं. त्यांच्या नऊ बायका चितेकडे निघाल्या. अहिल्येने सर्वांच्या पायावर डोकं ठेवलं. हात जोडले, म्हणाली, "स्वामी, माझ्या निष्ठेची शपथ. आजपासून सारे अलंकार, रंग, उपभोग या चितेत टाकते. आजपासून फक्त शुभ्र वस्त्रे नेसेन. यापुढील आयुष्य प्रजेसाठी, राज्यासाठी!" अहिल्याबाईंनी सर्व अलंकार शेल्यात बांधून चितेवर ठेवले. चिता धडधडून पेटली. सगळा आसमंत सतीच्या किंकाळ्यांनी भरून गेला. सती न जाण्याचा विचार पक्का केल्यानंतर त्यांनी आपले सर्वस्व राज्य कारभारांतच खर्च करण्याचें ठरविलें. त्यांची जन्मतः असलेली धार्मिक वृत्ती आयुष्यांतील दु:खामुळे वाढतच गेली. दिवसाचा बराच वेळ त्या पूजा-अर्चा, ध्यान, चिंतन आणि पुराणश्रवण यांत घालवत असत.
डेऱ्यात आल्यावर मल्हारराव म्हणाले, "आजपासून तुम्ही आम्हाला पुत्राच्या जागी. यापुढे तुम्हाला एकेरी हाकारणे नाही. आमच्या वस्तीला वणवा लागला. वीज कोसळली. पण तुमच्यासारखे एक अनमोल रत्न आम्ही वाचवले. तुमच्या पतिव्रताधर्माच्या आड आलो, त्याचा जबाब ईश्वराच्या दरबारात देऊ आम्ही!" आणि मल्हाररावांनी अहिल्याबाईंना बहुमानार्थी संबोधने वापरायला सुरवात केली.
मल्हारराव स्वर्गवासी झाल्यानंतर मालेरावांकडे औपचारिकरीत्या सुभेदारी आली. परंतु त्याच्या अंगांत कुवत नसल्यानें प्रत्यक्षांत सर्व राज्यकारभार अहिल्याबाईच पाहत होत्या. पेशव्यांना त्यांच्या वकुबाची पूर्ण कल्पना असल्यामुळे मालेरावांच्या निधनानंतर त्यांनी संस्थानची प्रमुख म्हणून अहिल्याबाई यांनाच मान्यता दिली. स्वतःच्या सूक्ष्म निरीक्षणानें मराठी राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या सर जॉन माल्कमनें अहिल्याबाईसंबंधीं असें म्हटलें आहे कीं, "त्यांची अंतर्गत राज्यव्यवस्था आश्चर्य वाटावी इतकी नमुनेदार होती. त्यांच्या मर्यादा लक्षांत घेऊन असें म्हणावेसें वाटतें कीं ती एका विशुद्ध मनाची आणि आदर्श राज्यकर्ती होती."
सर्वेश फडणवीस
#नवनवोन्मेषशालिनी #नवरात्र #लेखमाला #दिवसचौथा
No comments:
Post a Comment