उदंड कीर्ति मिळवणाऱ्या तेजस्वी अहिल्याबाईंचे सांसारिक जीवन म्हणजे केवळ उन्हाळा होता. गौतमाबाई आणि मल्हारराव त्यांना पोरके करून निघून गेले, मालेरावांचा भीषण मृत्यू झाला. खंडेराव तर कधीच निघून गेले. खंडेरावांच्या नऊ सती, मल्हाररावांच्या दोन सती, मालेरावांच्या दोन सती, अशा तेरा स्त्रियांना सती जातांना त्यांनी पाहिलं. मुक्ताबाईला एकच मुलगा नथू. हा एकच नातू पण त्यालाही क्षयरोगाने ग्रासले होते. कधी ताप, कधी खोकला. वैद्याचं संशोधन त्याच्या कामी येत नव्हते. मुक्ताबाई तर जणू मातृसेवेसाठीच जन्मली होती. अहिल्याबाई याना तिचाच फक्त आधार होता. मुक्ताबरोबर अहिल्याबाईंच्या सांसारिक उन्हाळ्यात थोडा गारवा होता.
अहिल्याबाई सूर्योदयापूर्वी उठत असत. मग भूपाळ्या, देवांची विशेषकरून शंकराची पूजाअर्चा सर्व परंपरेप्रमाणे चालत असे. नंतर ठरावीक वेळ पोथ्यापुराणांचे, धर्मग्रंथाचे श्रवण. मग त्या स्वत:च्या हाताने भिक्षा घालत. बऱ्याच ब्राह्मणांना अन्नदान केले जाई. त्यानंतर लगेच भोजनाची वेळ होत असे. त्यांचे जेवण शाकाहारी होते. वास्तविक त्यांच्या जातीत मांसाहार रूढ होता. पण अहिल्याबाईंनी कधीही मांसाहार केला नाही. भोजनानंतर घटकाभर विश्रांती. मग अहिल्याबाई दुपारी दोन वाजता दरबाराला हजर होत असत. ते कामकाज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालत असे. त्यानंतर दोन ते तीन तास पुन्हा धर्मकर्म. रात्रीचे अगदी बेताचे भोजन. रात्री पुन्हा ९ ते ११ दरबाराचे काम. नंतर निद्रा. उपासाचे दिवस, उत्सव किंवा आजूबाजूला काही गडबड झाली तरच यात फरक पडत असे.
अहिल्याबाई कुणाचा निष्कारण अनादर करीत नसत. अनादर करणे, अपमान करणे हे पाप आहे, असे त्या मानीत कोणत्याही अधिकाऱ्यांनी प्रजेचा अपमान करू नये कारण प्रजेसाठी आपण आहोत हे त्या पुन्हा पुन्हा सांगत. प्रजेशी अनुचित व्यवहार आणि असत्य भाषण हीच त्यांच्या संतापाची कारणे होती. त्यांचा प्रजेशी व्यवहार कशा तऱ्हेचा होता त्याचे काही नमुने पाहिले की त्यांच्या बुद्धिची झेप लक्षात येते. अहिल्याबाईंचे संबंध प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे, प्रेमाचे होते. पक्षपात, भेदभाव, कपटकारस्थान या कशालाही थारा नव्हता. पांढरीशुभ्र साडी, भव्य कपाळ, टपोरे पाणीदार डोळे, सावळासा तेजस्वी रंग अशा अहिल्याबाई बोलू लागल्या की, सिद्ध योग्याच्या मंत्रासारखे त्यांचे शब्द येत. तेज, माधुर्य आणि शांती यांचा मिलाफ त्यांच्या नजरेत होता.
साधारणपणे १७६७ ला अहिल्याबाईंचा राज्यकारभार सुरू झाला. चारपाच वर्षे झाली तरी पैशांची घडी बसत नव्हती. मालेरावाने केलेली उधळण भरून येत नव्हती. तशातच तुकोजीचा हिशोबाचा व्यवहार चोख नव्हता. मिळालेल्या लुटीची हिस्सेवारी जमा करणे, फौजेचा खर्च, इंदोरचा खजिना ही सर्व शिस्त, तुकोजीला लावायची हीच वेळ होती. तोच पुण्याहून दुःखद वार्ता आली. श्रीमंत माधवराव पेशवे याचा मृत्यू झाला होता आणि रमाबाईसाहेब सती गेल्या होत्या. तो धक्का अजून संपलाही नाही तोवर नारायणराव पेशव्यांचा खून झाला. पुणे येथे अनर्थावर अनर्थ घडू लागले. रघुनाथरावांनी त्यांना स्वतःला पाठिंबा द्यावा अशी गुप्त पत्रे सगळीकडे पाठवल्याचे कळताच या तेजस्वी स्त्रीने सर्वांस ताकीद दिली की, “द्रव्यमोहाने दादासाहेबांना उर्फ रघुनाथरावांस कुणी आसरा दिल्यास गादीशी द्रोह समजून कडक शासन केले जाईल. मागून सफाई चालणार नाही याची फौजबंद सरदारांनी पक्की जाण ठेवावी. घरभेद्यास ठेचून टाकले जाईल. त्या कामी ढिलाई होणार नाही हे समजून असावे.”
अहिल्याबाई स्वतः डोळ्यात तेल घालून गुप्तहेरांच्या बातम्याकडे लक्ष देऊ लागल्या आणि रघुनाथरावास कळवले की,'आपली बदनियत आम्ही कधीच जाणली. आता तर खूनखराब्यापर्यंत मजल गेली. श्रीमंत नारायणरावास राखू शकला नाहीत. आपण धनीपण गमावले आहे. आलात तसे माघारी जावे. नर्मदा ओलांडल्यास खणाखणी होईल.' या तेजस्वी स्त्रीने त्यांना नर्मदा उतरू दिली नाही. अशा या सत्ताधारी स्त्रीचा चारी दिशांना पसरणारा नावलौकिक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
सर्वेश फडणवीस
नवनवोन्मेषशालिनी #नवरात्र #लेखमाला #दिवससातवा
No comments:
Post a Comment