इतिहासामध्ये अशी अनेक व्यक्तिमत्त्वे होऊन गेली, ज्यांनी आपला ठसा इतिहासाच्या विविध पानांवर उमटविला. धर्मकार्याची पताका सक्षमपणे कोणी वाहिली असेल तर अग्रक्रमाने ज्यांचे नाव घेता येईल अशा अहिल्याबाई होत्या. धर्मकार्य करणाऱ्या अहिल्याबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख बघतांना त्यांचे काशी आणि विश्वनाथाचे योगदान अनमोल असेच आहे.
अहिल्याबाई यांनी सर्वप्रथम काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले. अहिल्याबाईंच्या हृदयाचा पहिला नमस्कार नेहमी काशी विश्वेश्वराला होता आणि दुसरा नमस्कार पुण्याच्या शनिवारवाड्यातल्या पेशव्यांच्या आसनाला होता.तिवारी नावाच्या तिथल्या जागामालकाला विचारून ज्ञानवापी मशिदीच्या बाजूची जागा मंदिरासाठी वापरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हा निर्णय धाडसाचा होता. कारण, ज्या काळात स्त्रियांना बाहेर पडणे देखील कठीण होते, अशावेळी इस्लामिक हल्लेखोरांना अक्षरशः तोंड देणे, ही काही सोपी गोष्ट नव्हती. ज्ञानवापी मशिदीच्या बाजूच्या जमिनीवर अहिल्याबाईंनी मंदिर निर्माणाचे कार्य सुरू केले. किती दान दिले, याचा आकडा इतिहासाच्या पानांमध्ये उपलब्ध नाही.
अहिल्याबाईंनी १७७५ मध्ये बांधलेले हे मंदिर पूर्णपणे स्वखर्चाने उभे केले होते. आत्ता उभे असलेले आणि दिसत असलेले काशी विश्वनाथ मंदिर साधारण १७८० च्या दरम्यान अहिल्याबाईंच्या पुढाकाराने पूर्ण करण्यात आले. काशी विश्वनाथ कॉरिडोरची स्थिती पाहिल्यावर आश्चर्य वाटते की, स्वातंत्र्यानंतर आपल्या सभ्यतेतील इतक्या महत्त्वाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायला ७० वर्षे उलटावी लागली. पण जीर्णोद्धार झाला असला तरी अहिल्याबाई यांनी निर्माण केलेले मूळ मंदिर आजही सुस्थितीत बघायला मिळते.
दरम्यान काशीला दशाश्वमेध घाटही केव्हाच बांधून झाला होता. पण काशीलाच गंगेवर अजून एक मनकर्णिकेचा नवीन घाट बांधण्याचा संकल्प अहिल्याबाईंनी केला होता. मनकर्णिकेच्या घाटाच्या खास कामासाठी बाळाजी लक्ष्मण या कारकुनाची नेमणूक केली आणि पंचवीस हजार रुपयांच्या हुंड्याही काशीला पाठविल्या. अहिल्याबाईंचे कारभारी गोविंदपंत गानू या कामासाठी आश्विन वद्य सप्तमीला म्हणजेच आज, सहकुटुंब काशीला रवाना झाले. त्यांना खर्चासाठी दहा हजार रुपये दिले. विश्वनाथ भट हा ब्राह्मणही त्यांच्यासह गेला. त्याला तीन हजार रुपये दिले. गोविंदपंत गानू काशीला बांधले जाणारे घाट पाहणार होते. गया येथे जाऊन वास्तुपूजन करणार होते. सोरटी सोमनाथ येथील देवालयही अहिल्याबाईंनी नवीनच बांधून घेतले होते. तेथे दहा हजार रुपयांच्या हुंड्या घेऊन कारकून पाठविला. अशा कामांसाठी अहिल्याबाईंना पैसा कमी पडत नव्हता. याचाच अर्थ असा की, आपल्याजवळची धनसंपत्ती कोठे, कशी वापरली जावी याविषयी त्यांच्या निश्चित काही कल्पना होत्या.
अहिल्याबाईंनी काशीला पाठविलेले बाळाजी लक्ष्मण कारकून मनकर्णिकेचा घाट बांधून होईपर्यंत, काशीतच राहिले. काही महिन्यांनंतर ते काम पूर्ण झाल्याचे त्यांनी कळविले. पंचगंगा वगैरे इतर सर्व घाटांपेक्षा अहिल्याबाईंच्या नावलौकिकाला साजेसा हा घाट सुंदर झाला आहे, असे बाळाजींना वाटत होते. त्यांनी तसे अहिल्याबाईंना कळवले. आता मनकर्णिकेच्या घाटावर आपल्याकडील चौघडा आणि घड्याळ असावे म्हणजे शोभून दिसेल, असे बाळाजींच्या मनात होते. बाळाजीपंतांनी अहिल्याबाईंना लिहिले, “मनकर्णिका काशी पुराणात उत्कर्ष असता येथील काम ईश्वराने आपल्याकडून करवून यश आपल्यास आले. ही मोठी पुण्याची गोष्ट झाली. मनकर्णिकेच्या घाटावर आपल्याकडील चौघडा व घड्याळ असल्यास उत्तम होईल.”
बाळाजी लक्ष्मण हे केवळ सांगकामे नव्हते. योजलेल्या कार्याचा ते समग्र विचार करू शकत होते. मनकर्णिकेचा ग्रंथ संदर्भ त्यांना माहिती होता. पैसा खर्च करताना आपल्या स्वामिनीचा अग्रक्रम कोणता असू शकतो याची त्यांना पूर्ण कल्पना होती. अहिल्याबाई कार्यासाठी माणसे अशी अचूक हेरत होत्या, हे त्यांच्या कर्तृत्वाचे रहस्य होते.
अहिल्याबाई यांचे कार्य तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा ज्ञानवापी मशीद जिथे उभी आहे, तिथे पुन्हा एकदा काशीविश्वेश्वर प्रस्थापित होईल. अहिल्याबाई होळकर यांचे कार्य सर्वार्थाने अतुलनीय आहे. धर्माची पताका जर न घाबरता न डगमगता आपल्या खांद्यावर पुढे नेली, तर आपले नाव, आपले कर्तृत्व अजरामर होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर.
सर्वेश फडणवीस
#नवनवोन्मेषशालिनी #नवरात्र #लेखमाला #दिवसआठवा
No comments:
Post a Comment