वैदिक वाङ्मय हे जगातील पहिले उपलब्ध वाङ्मय आहे. वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान, ज्ञानाचा विषय किंवा ज्ञान मिळविण्याचे साधन असा होतो. अतिप्राचीन काळामध्ये प्राचीन ऋषिंना वेदवाङ्मयाचा साक्षात्कार झाला म्हणजेच त्यांना वेद दिसले, त्याचे ज्ञान झाले असे यास्काचार्यांनी म्हटले आहे. ऋग्वेदातील काही ऋक्सूक्ते ऋषिकांनी रचलेली आहेत. साधारण वेदातल्या पुरुष ऋषींनी ज्याप्रमाणे त्यांच्या मानवी इच्छा, आकांक्षा, व्यावहारीक अपेक्षा त्यांच्या सूक्तांतून मोकळेपणाने मांडल्या आहेत, तशाच ऋषिकांनीही त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. एक चांगला नवरा, नवऱ्याचे प्रेम, चांगले स्वास्थ्य एवढीच त्यांची गरज आहे. स्त्रियांच्या या पहिल्या लिखित उद्गारांमधूनही त्यांच्या स्त्रीत्वाची झलक बघायला मिळते. तसेच ऋषिकांच्या लेखनात तत्कालिन कौटुंबिक जीवनाचे प्रतिबिंब पडलेले दिसते. या विदुषींची ओळख या शारदीय नवरात्रात मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्यातील पहिली ब्रह्मवादिनी आहे विदर्भकन्या लोपामुद्रा.
तर ही वेदकाळातील गोष्ट आहे. विदर्भ देशाची राजकन्या खूप सुंदर आणि वेदशास्त्र संपन्न होती. तिचं नाव लोपामुद्रा होतं. मान्य नावाचा एक ऋषी होता. मान्य हुशार होता. त्याकाळी प्रजा खूप वाढली होती. रहायला जागा उरली नव्हती. शेते पिकवायची पण शेतीच नव्हती. लोकांची अडचण व्हायला लागली, पण लोक करणार तरी काय? जाणार तरी कुठे? आणखी दक्षिणेला सरकायचं तर विंध्य पर्वत आडवा आला होता. तो उंच पर्वत ओलांडून दक्षिणेकडं जाणं कठीण होतं. ह्या मान्य नावाच्या ऋषीनं लोकांची ही अडचण ओळखली आणि त्याने विंध्य पर्वत सहजपणे ओलांडून जाता यावं म्हणून विंध्याला ठेंगणा केला. विंध्य फोडणारा, तोडणारा म्हणून त्याची ख्याती झाली. लोक दक्षिणेकडे पसरले. मान्य ऋषीला त्यांनी नेता म्हणून घोषित केले. पुढे मान्य विदर्भात आला. लोक त्याला पहायला गर्दी करू लागले. हाच तो विंध्य नमविणारा मान्य ऋषी म्हणून त्याचं कौतुक करू लागले. हळूहळू मान्याच्या अचाट कर्तृत्वाच्या कथा दाहीदिशा पसरू लागल्या.
लोपामुद्रेच्या कानावर मान्याची ही कीर्ती आली, पण लगेच कळले की एवढं अचाट कर्तृत्व आणि कौशल्य अंगी असूनही तो मान्य ऋषी वैराग्यासारखा रहातो. जवळ एक कवडीही नाही आणि त्याच्याएवढ्या कर्तृत्ववान माणसाचा समाजाला खूप उपयोग होऊ शकतो, तो वैराग्य सोडून सतत पौरुष गाजवायला लागला तर ह्या पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल आणि लोकोपयोगी कार्य करायला त्याला कुणीतरी प्रेरणा द्यायला हवी. लोपामुद्रेनं त्याच्याशी विवाह केला, पण मान्य ऋषीचं वैराग्य गेल नाही. कर्तृत्व गाजविणं सोडलं की माणूस म्हातारा होतो. हा मान्य तसाच झाला होता. कसलीही इच्छा नाही की आकांक्षा नाही, संसार थाटलेला पण घरात कवडीही नाही. लोपामुद्रेला हे पाहवलं नाही. पत्नी म्हणून पतीला पराक्रम गाजवायला प्रेरणा देणं हे तिचं कर्तव्यच होतं, पत्नी ही पतीची प्रेरक व कारक शक्ती असते, तिनं मान्याला सारखं, सुरुवातीला काही उद्योग करा म्हणून सांगायला सुरुवात केली. ती म्हणायची, "माणसानं सतत उद्योग केला पाहिजे" माणूस म्हणजे त्याच्या ठायी अनेक महत्त्वाकांक्षा असायलाच हव्यात, मला असं दरिद्री जीणं नको, मी राजकन्या आहे. ऐश्वर्यात वाढले आहे. तुमच्यात कर्तृत्व आहे, कौशल्य आहे. मग उठा, काम करा, संपत्ती मिळवा'. मान्य ऋषीला, तिच्या पतीला उत्साह वाटावा, अशी जनतेनंही वाहवा केली होतीच, 'अग' म्हणजे 'पर्वत' त्याला 'स्त्यायति' म्हणजे नमविणारा म्हणून लोक त्याला 'अगस्ती' म्हणू लागले होते. तरी पण मान्य ऋषीचे वैराग्य जाईचना, विदर्भाची राजकन्या खिन्न झाली. तिच्या मुद्रेवरचा आनंद लोपला आणि ती अक्षरशः “लोपामुद्रा' दिसू लागली, तिनंही वैराग्याचं रूप धारण करायला सुरुवात केली. लोकांना राजकन्येचा हा असा विस्कटलेला संसार पाहवेना. तेही अगस्तीला बोलू लागले. लोपामुद्रेनं तर त्याच्याशी बोलणंही सोडलं. मग मात्र अगस्ती गडबडला, "काय करू म्हणतेस मी ?"
लोपामुद्रा म्हणाली, “सत्य मार्गानं जा. पौरुष गाजवा. ऐश्वर्य मिळवा. संतती आणि संपत्ती प्राप्त करणे संसारी पुरुषाचे कर्तव्यच असते. "ठीक. मी तुला खूप द्रव्य आणून देतो. आणि असे म्हणून अगस्ती उठला आणि इल्वल नावाच्या दैत्यावर चालून गेला. एकट्याच्या पराक्रमानं त्यांनं त्या दैत्याला हरवलं. त्याची सगळी संपत्ती हस्तगत केली आणि लोपामुद्रेपुढं आणून टाकली, पण लोपामुद्रेला केवळ असं लुटमार करून आणलेलं द्रव्य अपेक्षित नव्हतं, ती म्हणाली, "मला असलं फुकटचं द्रव्य नको. माणूस कुटुंबाकरता जगतो तसाच समाजासाठी आणि देशासाठीही. तेव्हा तुम्ही स्वतः कष्ट करा. काही उत्पादन करा. अन्न मिळवा, अन्न वाढवा. समाज आणि देश संपन्न करा. "म्हणजे काय करू म्हणतेस ?" अगस्ती. "ही कुदळ, फावडी घ्या, शेतात जा. शेतात मेहनत करा. शेत उत्तम पिकवा." अगस्ती उठला, कुदळ, फावडं घेऊन शेतावर गेला. खूप मेहेनत केली. शेती उत्तम पिकली. अन्न पिकलं, उत्पादन वाढलं. हातात पैसा आला. जनतेत लौकिक वाढला. काम करण्याची सवय लागली. वैराग्य गेलं, आळस गेला. पौरुष जागं झालं. लोपामुद्रेला आनंद झाला, पण केवळ शेतमेहनत करणारा म्हणूनच लौकिक व्हावा आपल्या पतीचा एवढ्यावर ती संतुष्ट नव्हती. ती अगस्तीला म्हणाली, "तुम्ही बुद्धिमानही आहात. जनतेत प्रतिष्ठा आहे तुम्हांला आणि देशाला तुमचा काही उपयोग होऊ द्या."
त्यानंतर 'खेल' नावाच्या त्या काळच्या एका नावाजलेल्या राजानं अगस्तीला आपला राजपुरोहित म्हणून नेमलं. आता अगस्तीचं पौरुष सर्वत्र गाजू लागलं. लोपामुद्रेच्या प्रेरणेला फळ आलं. लोपामुद्रेच्या, आपल्या पत्नीच्या प्रयत्नामुळे संपत्ती आणि नावलौकिक मिळविणाऱ्या अगस्तीला, संततीही लाभली. त्यांचा दृढास्यू नावाचा पुत्र लोपामुद्रेचा आनंद प्रतिदिन वाढवू लागला. पतीच्या पौरुषाला जागवणारी प्रेरक पत्नी म्हणून लोपामुद्रेचा सर्वत्र जयजयकार झाला अशी ब्रह्मवादिनी लोपामुद्रा होती.
सर्वेश फडणवीस
#ब्रह्मवादिनी #नवरात्र #लेखमाला #दिवसपहिला
No comments:
Post a Comment