खरंतर युगायुगातून एका विशिष्ठ सामाजिक अवस्थेचे दर्शन अटळपणे घडत असते. एक मोठा वर्ग अज्ञानी असतो. आपल्या अज्ञानापायी सतत दुःख भोगत असतो, अन्याय सहन करीत असतो, केवळ मरण जगत असतो. पण त्याला त्याची कधी खंत वाटत नसते, कारण त्याला त्याची कधी जाणीवच होत नसते. आपलं जीवन हा एक शाप आहे आणि तो भोगणे क्रमप्राप्त आहे अशी समजूत तो उराशी घट्ट बाळगून असतो.
वेदकाळी एका स्त्रीने हे सगळे केले. तिने त्याकाळी अशा अजाण आणि अभागी वर्गाला नेतृत्व दिले. असा वर्ग राष्ट्रीय प्रवाहापासून दूर जातो आणि राष्ट्रापुढे संकट होऊन उभा ठाकतो. त्याला तिने समजूतदारपणे वळणावर आणले, मूळ राष्ट्रीय प्रवाहात सहज आणून सोडले, त्यांचे जीवन इतरांच्या सुखी व समृद्ध जीवनाशी एकरूप करून टाकले. ह्या वेदकालीन स्त्रीचं नाव आहे ब्रह्मवादिनी सरस्वती.
शरीर, वाणी, मन आणि बुद्धी ह्यांची चार प्रकारची ओजस्वी शक्ती, ह्या सरस्वतीनं त्या अडाण्यांना, शहाणं करून दिली. तिने त्यांना जीवन दिले. 'कुठे कुणी गेलंय का तिच्यापुढे, ती एकटीच हे कार्य करते आहे'. असं ऋग्वेद सांगतो. त्याकाळी पुढाऱ्यांनी वाणी निर्माण केली आणि आपल्यापाशीच ठेवली. सरस्वतीने सर्व प्रकारच्या प्राणिमात्रांच्या जीवन जगणाऱ्यांसाठी ती मोकळी केली. श्रीमंत, मध्यमवर्ग आणि गरीब ह्या सर्वांमध्ये ती वावरत असे. तिने ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र आणि निषाद म्हणजेच अरण्यांत रहाणारे आदिवासी ह्या पंचजनांची समृद्धी साधली. कुठेही भूक, उपासमार वा अन्नटंचाई दिसली की, सरस्वतीची आठवण झालीच समजा. ती, ही अन्नाची गरज त्वरीत दूर करी. कुणालाही भूकेपायी वा अन्न नाही, म्हणून तिने यातना सोसू दिल्या नाहीत. सर्वांचे जीवन शेतीच्या जोरावर समृद्ध करणारी ही सरस्वती त्याकाळी नदी स्वरूपच वाटली. मुक्या माणसांना तिने वाचा दिली, त्यांचं दुःख जगापुढं मांडायला वाणीचं शस्त्र दिले, चेतना आणि चैतन्य अंगी बाणवून तिनं समृद्ध केले. मग ही सरस्वती देवी त्यांना श्रेष्ठ आईच वाटली, वाग्देवी वाटली, म्हणूनच ते सरस्वतीला म्हणतात,
'अम्बितमे, नदीतमे देवितमे सरस्वति । ज्या बिचाऱ्यांना ज्ञान नव्हते, बोलता येत नव्हते, अज्ञानी म्हणून समाजात प्रतिष्ठा नव्हती, त्यांना तिने समाजात इतरांबरोबर सुप्रतिष्ठित केले. त्यांना मान मिळवून दिला. तिने सर्व समाजार्थ उत्थान साधले. ती राष्ट्राची बनली, राष्ट्रदेवी झाली. तिने समाज व राष्ट्र यांचे उत्थान साधण्यासाठी त्या काळच्या सर्व बलवान नेत्यांचे साहाय्य घेतले, ती रुद्र, मरुत, वसू, आदित्य, आणि इतर पुढारी ह्यांच्यासोबत सर्वत्र वाऱ्यासारखी फिरत होती, जनतेच्या अडचणी दूर करीत होती. त्यांचे अज्ञान घालवून, त्यांचे जीवन सुखी व समृद्ध करीत होती. अशावेळी कुणी "ज्ञानविरोधी" आढळला तर त्याची तिने गय केली नाही. जनसामान्यांच्या कल्याणासाठीच ती लढली. सामान्यांचे कुठे अहित होत असेल, तर ती त्यांच्या बाजूने सदैव उभी ठाकली. सरस्वतीने लोकांना शब्द शिकविला, ज्ञान अर्पण केले, शहाणे करून सोडले आणि समृद्धी साधायला समर्थ बनविले. तिच्यामुळेच लोकांना अन्न मिळाले, दृष्टिसुख प्राप्त झाले, गोड वाणी कानी पडली आणि मोकळा श्वास सुखाने घेता आला.
सरस्वतीचा महिमा फार मोठा होता. श्वेतवस्त्र धारण करणारी, ती शांत व धीरगंभीर स्त्री त्या काळच्या अनेक नेत्यांना सांभाळून घेत होती. मित्र वा वरुण असो, इन्द्र वा अग्नी असो, त्वष्टा आणि पूषा असो की सोम किंवा अश्विनी असो , सरस्वतीने नेतृत्व आणि धारण पोषण करत त्यांना वाणी आणि ज्ञान देऊन परिपूर्ण केले आहे , सत्याचे आचरण करणारा, न्यायी, कर्तव्यतत्पर, सरळमार्गी आणि सर्वाप्रती आदराने वागणारा पुरुष, नेत्यांना आणि समाजालाही आवडतो. सरस्वती अशांचीच चाहती होती. अशांना ती नेहमी बळ देई. ज्ञानसंपन्न बनवत होती आणि ऋषीपदाला नेत होती. मग त्यांना भूतकाळाचे भान राखून भविष्याचा वेध घेण्यास ती तयार करत होती समाजाचे नेतृत्व करण्याचा मान त्यांना सहज प्राप्त होत होता. ते ब्राह्मण म्हणून गणले जात होते, ऋषी मानले जात होते, बुद्धिमंत म्हणून पूजिले जात होते.
सरस्वतीची वृत्ती राष्ट्रीय होती. तिने वाणीच्या जोरावर सर्वांना एकत्र आणले, जनांची एकात्मता व संघवृत्ती बळकट केली. एकसंघ, एकजीनसी व एकात्म समाज व राष्ट्र तिने घडविले. धनधान्याची समृद्धी साधण्याचे मार्ग तिने जाणले आणि इतरांसाठी झिजणाऱ्यात अग्रक्रम मिळविला. मग त्या काळच्या इतर नेत्यांनादेखील, तिला कुठे ठेवू नि कुठे नाही, असे झाले. तिला त्यांनी सर्वत्र प्रतिष्ठित केली. ती निरनिराळ्या रूपात लोकांत ओळखली जाऊ लागली. सरस्वती ही सृष्टीची श्रेष्ठ शक्ती ठरली. स्त्रियांना लाभलेले हे वाणीचे सामर्थ्य योग्य जागी व योग्य प्रकारे वापरले जावे, सरस्वतीचे हे वरदान सर्वथा सफल व्हावे, हीच आजदेखील अपेक्षा आहे.
सर्वेश फडणवीस
#ब्रह्मवादिनी #नवरात्र #लेखमाला #दिवसचौथा
No comments:
Post a Comment