Saturday, September 27, 2025

⚜️ ब्रह्मवादिनी : मैत्रेयी

'मैत्रेयी' ही 'मित्र' नावाच्या प्रधानाची मुलगी. 'मित्र' हा जनकराजाचा राजप्रधान होता. ह्या संसारात राहूनही, लोकमंगलाची पवित्र कर्तव्ये निस्वार्थपणे करणाऱ्या जनकराजाचे चरित्र आणि चारित्र्य अगदी जवळून पहाण्याचा आणि अनुभवण्याचा दुर्लभ लाभ मैत्रेयीला झाला. वेदकाळात 'गार्गी' एक ब्रम्हवादिनी, आध्यात्माच्या मार्गातील दीपस्तंभ अशी विदुषी, तिची मावशी होती. आध्यात्माचे बाळकडू ह्या मावशीने तिला पाजले. कोणतीही व्यक्ती घडते ती संस्कारांमुळेच. वैदिक काळात आणि भारतीय संस्कृती परंपरेत, सहज संस्कारही चांगले व्हावेत ह्याकडे सातत्याने लक्ष पुरविले जाई. घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे, जेणेकरून मन शांत आणि प्रसन्न राहील असे वातावरण निर्माण करणे, इतरांना न दुखावणारे बोल आपल्या आचरणाने, केवळ स्वतःचे क्षणिक सुख साधण्यासाठी दुखवणे,अशा अनेक बाबींकडे लक्ष दिले जाई.

मैत्रेयी अशाच वातावरणात आणि संगतीत वाढली, तिची बुद्धी तल्लख आणि मर्मग्राही होती. मैत्रेयीने, एका स्त्रीने त्याकाळी पुरुषी अहंकाराला सौम्य प्रवृत्तीने आणि अप्रत्यक्ष रीतीने प्रत्युत्तर देऊन निरूत्तर करण्याचे कसब दाखविले आहे. याज्ञवल्क्य हा तिचा पती, याज्ञवल्क्य जनकाचा गुरू, जनकाला अध्यात्माचे धडे त्याने दिले. दोघेही संसारी, गृहस्थाश्रमी, जनकाला संसार सोडून, संन्यास घेण्याची गरज वाटली नाही. याज्ञवल्क्य मात्र मुक्तीसाठी संन्यास घ्यायला निघाला आणि त्यावेळी त्यानं मैत्रेयीला, 'मी आता संन्यास घेतोय, पण तू काळजी करू नकोस, माझ्या धनसंपत्तीतला वाटा तुला मिळेल. तुला जीवनाची ददात रहाणार नाही," असं सांगितलं. मैत्रेयी यावर नुसती हसली होती, ती म्हणाली, "तुम्हाला असं का वाटावं की मला जीवन जगण्यासाठी धनसंपत्ती हवी ? त्यानं का मला मुक्ती मिळणार आहे? मला कुठलीही इच्छा उरलेली नाही. संसारातल्या कुठल्याही लाभासाठी मनात आसक्ती नाही. इच्छा किंवा अनिच्छा ह्यांचा माझ्या मनाला उपसर्गच पोहोचत नाही, पण तुम्ही संन्यास घेणार आहात आणि ह्या संन्यासिनीला त्यावेळी काही देण्याचे योजत असाल, तर मुक्तीच्या या प्रवासात शिदोरी म्हणून उपयोगी पडेल असं काही सांगा."

मैत्रेयी राजसभेत याज्ञवल्क्याचं पांडित्य पाहून प्रभावित झाली होती, त्याच्यावर मोहित झाली होती. त्या पांडित्याबद्दलची आत्मीयता आणि त्या पांडित्याची सर्वकष प्राप्ती, हे दोन हेतू तिच्या ठायी होते आणि याज्ञवल्क्याकडे आकृष्ट व्हायला पुरेसे ठरले. तिच्या पित्याने, मित्र नावाच्या राजप्रधानाने हे जाणले आणि मैत्रेयीच्या इच्छेनुसार तिचे याज्ञवल्क्याशी लग्न लावून दिले. याज्ञवल्क्य, संसारात रमणारा नव्हता. मैत्रेयी हे जाणून होती. तिने संसारसुखाची अपेक्षाही मनात बाळगलेली नव्हती. 'काम' हा पुरुषार्थ असला तरी मुक्तीच्या मार्गात तो अनर्थ ठरू नये इतपत आवरलाच पाहिजे, प्रसंगी त्याचा संपूर्ण त्याग करण्याची पाळी आली, तरी त्यासाठी मन तयार ठेवलंच पाहिजे, हे मैत्रेयी जाणून होती. तशी विरागी वृत्ती तिच्या अंगी बाणलेलीच होती. त्यामुळेच याज्ञवल्क्याच्या असंसारी वृत्तीचा तिला उपसर्ग पोहोचला नाही. जाणून बुजून स्वीकारलेल्या या संसारी खडतर व्रताबद्दल मैत्रेयीची कुठलीही तक्रार नव्हती. नव्हे, याज्ञवल्क्याशी, त्याच्या आध्यात्मिक मनाशी मिळून मिसळून, अगदी एकरूप होऊन वागण्यानेच ती खरी सहचारिणी, अर्धांगिनी, धर्मपली म्हणून वेदकाळात आदर्श ठरली. 

वेदकाळी हे स्पष्ट दिसतं की, 'स्त्री' कुठल्याही क्षेत्रात पुरुषाशी स्पर्धा करीत नसली तरी मागे नव्हती. 'स्पर्धा' हा तिचा उद्देशच नव्हता. स्पर्धेची प्रवृत्ती काहीशा न्यूनगंडातूनच निर्माण होत असते. स्पर्धेच्या मूळाशी, नाही म्हटले तरी असूया आणि दुसऱ्यावर मात करण्याची उन्मादी भावना मनात असते, पण त्याकाळच्या समाजात, स्त्रीच्या मनाला स्पर्धेची कल्पनाच शिवली नाही. समाजाने ती तशी निर्माण होऊच दिली नाही. 'स्त्रीपुरुषसमप्राधान्य', वृत्तीत बाणल्यामुळे, समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोण देखील वेगळाच जाणवतो. कुठल्याही कारणाने स्त्रीला तुच्छ लेखणे समाजाच्या मनातच आले नाही. तिचे स्वतंत्र आणि सन्मान्य स्थान समाज कधी विसरला नाही. स्त्रीवर पुरुषाचे स्वामित्व असते, ती त्याच्या मालमत्तेचा एक घटक असते, असल्या फाजील आणि अवास्तव कल्पना त्या समाजाच्या मनाला कधी शिवल्याच नाहीत आणि असे सगळे कधी घडूच दिले नाही.

मैत्रेयीने संसारात राहूनच, त्या दुःखदायक, तापदायक शरीरधर्माला बाजूला लोटणे हाच संन्यास आहे. संसारी राहूनच, खरे संन्यासी होता येते, हे आपल्या चरित्राने दाखवून दिले आहे. संन्यस्त वृत्ती ही विश्वाच्या समृद्धीसाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी नितांत आवश्यक आहे. पण ही सन्यस्तवृत्ती म्हणजे संसार सोडून पळणे नव्हे, उदासीन वृत्ती आणि निष्क्रीय प्रवृत्ती नव्हे, हे मैत्रेयीने, एका वेदकालीन ब्रह्मवादिनीने, मानवाला दिलेले अमोल वैचारिक धन आहे. भारतीय तत्त्वज्ञानातील तो मोठा ठेवा आहे. भारतीय तत्त्वज्ञान आणि भारत, म्हणूनच जगाला आदर्श ठरतो आहे आणि ही ब्रह्मवादिनी वेदकाळापासून कर्तृत्वशालिनी आहे. 

सर्वेश फडणवीस 

#ब्रह्मवादिनी #लेखमाला #नवरात्र #दिवससातवा

No comments:

Post a Comment