Thursday, September 25, 2025

⚜️ ब्रह्मवेत्त्याची माता : जबाला

वेदवाङ्मयात अशी घायाळ पक्षिणी आहे, एक शूद्र स्त्री, जबाला तिचं नाव. दिसायला सुंदर. तारुण्य ओसंडून वाहत होते. त्यातच पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार हिंडणे क्रमप्राप्त होते , आणि घराबाहेर, एक नव्हे तर अनेक लांडगे फिरत असतात, असहाय आणि अबल सौंदर्यावर तुटून पडणारे दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतातच. त्यांच्या वासना प्रबळ बनतात आणि त्यात सौंदर्याची, दुर्बल यौवनाची आहुती पडते. जबाला ही अशीच एक तरुणी. अनेक वासनांना बळी पडलेली होती. नाईलाजानं, इच्छेविरुद्ध, केवळ अगतिक बनून, लाचार होऊन दिवस कंठीत होती. त्यातच प्राप्त झालेले निरपराध मातृत्व यात मातृत्व तसे निष्पापच. पापी आणि बदनामी प्रवृत्तीपासून जन्मलेला माणसाचा नवा निरपराध जीव सन्मानानं मान वर करून जगलाच पाहिजे हाच अट्टहास जबालाचा होता. जबालानं त्याला जिव्हाळ्याने वाढवलं, ओठातला अर्धा घास त्याच्या पोटात घालत पोसलं. तो जबाला पुत्र दिनमानानुसार वाढत होता.

आता तो शिकायला योग्य झाला, पण कोण शिकवणार त्याला ? कुठल्या आश्रमात पाठवायचं त्याला? कोण ऋषी त्याच्या आश्रमशाळेत त्याला प्रवेश देईल ? जबालाच्या मनात आलं की, माझा पुत्र सत्शील आहे. मी त्याच्यावर चांगले संस्कार केलेत. त्याचा, त्याच्या मनावर ताबा आहे. त्याने त्याच्या इंद्रियांना वाटेल तसे भरकटू दिलेले नाही. इंद्रियांचे नसते लाड पुरवायला आहे तरी कुठे बळ आमच्यात ? पण बिघडायला कुठं वेळ लागतो लहान मुलांना? उलट, दारिद्र्य असले, सभोवारचे वातावरण गलिच्छ असले की मुले संगतीनं बिघडतातच ना ? पण जबाला, ती माता, तिनं असं बिघडू दिलं नाही आपल्या पुत्राला.

 'सत्यकाम', असं नाव ठेवलं, सत्याची इच्छा करणारा. सत्याचाच पाठपुरावा करणारा असावा तो पुत्र, अशीच तिची मनीषा. तेव्हा सत्यकाम, अनुकूल वयाचा होताच तिनं त्याला गुरूगृही पाठवायचं ठरविले. मग तिने उपनयन, मौंज करायला पाहिजे असं ठरविले. पण ती कुठून करणार ? कोण करणार तिच्यासाठी पौरोहित्य? तिला ज्ञान तरी कुठं आहे अशा विधीचं ? जबालेनं सत्यकामला सरळ एका आश्रमाकडे धाडलं. तो आश्रम हारित ऋषींचा होता. हारितऋषी एक ब्राह्मण. उत्तम मार्गदर्शक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या आश्रमात प्रवेश घ्यायला गर्दी होई. श्रीमंत, राजे आणि शासक यांची मुले मोठ्या संख्येनं त्या आश्रमात होते. सत्यकाम त्या आश्रमात येताच गोंधळला. सत्यकाम एकटाच बाजूला उभा होता. दुपारचे उन्हं कलले, गर्दी ओसरली , घामानं थबथबलेला सत्यकाम अजूनही बाजूलाच उभा होता, हारितऋषींचं त्यांच्याकडं लक्ष गेलं.
"कोण बाळ तूं ?"
"मी सत्यकाम. "
"काय काम तुझं माझ्याकडं ?"
"मला शिकायचंय. "
"मग दूर का उभा राहिलास. ये." हरितांनी त्याला जवळ घेतलं. “एकटाच आलास, असू दे. उपनयन झालं तुझं ?" सत्यकाम गोंधळला. स्तब्ध राहिला. "असू दे. तुला मी शिकवेन.

सत्यकाम आनंदला. शिकायचं, आईचं नाव काढायचं. आईला सुखात ठेवायचं. ही सगळी स्वप्न पूर्ण होणार म्हणून तो उल्हसित झाला. हारित ऋषींनी त्याचं नाव टिपलं आणि जिव्हाळ्यानं विचारलं, "वडिलांचं नाव काय तुझ्या ?" वडिलांच नाव ? हे शब्द ऐकताच सत्यकाम गोंधळला. घरी आईखेरीज कुणी नव्हतंच. कधी कुणी पुरुष घरात पाहिला नव्हताच. आई कष्ट करायची. जेवू घालायची. आईनेच वाढविलं. स्वच्छता राखायला शिकवलं शरीराची आणि मनाची देखील, तेही आईनंच. मला कधी कुणाचं भय वाटू दिलं नाही, पूर्ण संरक्षण दिलं ते आईनंच. खरं बोलावं, ह्याचं वळण आणि खरं वागावं ह्याचं आचरण, तिनंच अंगवळणी पाडलं माझ्या. तेव्हा काय उत्तर द्यायचं ऋषींच्या प्रश्नाचं ?

"वडील नाहीत तुला ?” हरितांनी हळूच विचारलं. पण ह्याही प्रश्नाचं उत्तर सत्यकामाला ठाऊक नव्हतं; पण हा प्रश्न का विचारला ऋषींनी, हेही कळेना त्या बालमनाला, तो स्तब्धच होता. "जा आईला विचारून ये." हारितांनी सांगितलं. तो आईकडं आला. "आई, आश्रमा प्रवेश मिळतोय मला,पण वडिलांचं नाव विचारताहेत ऋषी. काय आहे माझ्या वडिलांचं नाव ?" जबाला त्या प्रश्नानं एकदम खचली. कुणाचं नाव सांगणार? अनेक लांडग्यांनी, वासनांनी पिसाळलेल्या, नराधमांनी माझ्या असहायतेचा, अगतिकतेचा गैरफायदा घेतला आहे आणि ते नामानिराळे झाले आहेत. त्या अनेकांपैकी कुणाला तरी विचारावं का की तुझं नाव सांगू का ? तो प्रत्येकजण भ्याड निघेल. स्वतःच्या सुखासाठी केलेले अधमकृत्य, माझ्या माथी पाप म्हणून मारताना तो कचरणार नाही. हा भ्याडपणा माझ्या लाडक्या सत्यकामाला, वडिलाचं नाव मिळवून देणार नाही. पण त्या नावाची गरज तरी का वाटते समाजाला ? मी जन्म दिलाय माझ्या मुलाला एवढे पुरेसे नाही ? माझं नाव पुरेसं नाही? जिनं नऊ महिने गर्भ वाढविला, जीवावरचं संकट झेलून, सगळे कष्ट सोसून जिनं पुत्राला जन्म दिला, माणसाचा वंश जिनं जीवापाड जपून वाढविला आणि एकटं जगून, कुणाच्याही मदतीविना तो सुरक्षित राखला, चांगले संस्कार करून त्याला खरं बोलणारा, खरं वागणारा बनविला, त्या मातेला काहीच मोल नाही? मातृत्व मातीमोल का मानणार हा समाज ? तिनं सत्यकामाला आपल्या लाडक्या पुत्राला पोटाशी धरलं. अश्रूंचा प्रवाह डोळ्यांतून घळघळा वहात होता. सत्यकाम त्या अश्रूंनी न्हाऊन निघाला. 

"आई ! वडिलांचं नाव विचारलं म्हणून रडतेस? वडील नाहीत मला? ऋषींनी विचारलंच होत तसं." "वडील असून नसल्यासारखेच समज. पण ऋषींना वडिलांच्या नावाचीच का गरज वाटते? त्यांना आईचं नाव सांग. म्हणावं मी सत्यकाम आहे. जबाला ही माझी आई व बाप आहे " "पण ते वडिलांचं नाव विचारून ये म्हणाले होते, तर त्याबाबत काय सांगू?" "खरं तेच सांग की, आईनं अनेकांची सेवा केली तरुणपणी आणि माझा लाभ झाला तिला. सत्यकामानं आईला नमस्कार केला आणि तो पुन्हा हारितऋषींकडे गेला.

जबाला मनात चिंतीत झाली. माझ्या मुलाला हारितऋषी आश्रमात घेतील ना? वडिलांच नाव पाहिजे, आईचं चालणार नाही असं ते म्हणतील का? पण त्यांनी तसं का म्हणावं ? पित्यापेक्षा माता श्रेष्ठ असते. माता ही आदिगुरू आहे. माता ही आदिशक्ती आहे. पुरुषसमान तिलाही प्रतिष्ठा आणि सन्मान समाजानं दिला आहे, ऋषीमुनींनी मानला आहे. मग पित्याऐवजी मातेच्या नावानं का ओळखला जाऊ नये पुत्र ? मुलाच्या नावापुढं वडिलांऐवजी आईचं नाव का लावू नये? अनेक प्रश्न तिच्या मनात उभे झाले. तिचा जीव कासावीस झाला. तिकडे सत्यकाम हारितांच्या आश्रमात पोहोचला. हारितऋषी समोरच उभे होते. त्यांनी सत्यकामाला ओळखले, लगेच विचारले, "बाळ, विचारलंस वडिलांचं नाव ?" 'होय. पण मला आश्रमात प्रवेश देण्यासाठी वडिलांच्या नावावाचून अडेल का ? तुम्ही लिहा, माझं नाव, सत्यकाम,' मी माझ्या आईचा जबालाचा पुत्र, तेव्हा माझ्या नावापुढं लिहा, माझ्या आईचं नाव, जबाला, मला ओळखा सत्यकाम जाबाल म्हणून. ऋषींनी स्मित केलं. क्षणभर कौतुकानं, त्या इवल्याश्या सत्यकामाकडं पाहिलं. धैर्यवान जबालाचं त्यांनी अभिनंदन केलं. 'मातृवान् पुरुषो ।" ते म्हणाले. 'स्त्री' ची प्रतिष्ठा, स्त्रीचा सन्मान - स्त्रीचं गुरू म्हणून प्रथम स्थान, आपल्या संस्कृतीनं मानलं आहे.  तुला मी प्रवेश दिलाय. जबाला गहिवरला. धावत आईकडं गेला. आईच्या आनंदाला पारावर उरला नाही. 

स्त्रीला पुरुषसमानच नव्हे, तर अधिकच मान आणि प्रतिष्ठा देणाऱ्या समाजाचे, संस्कृतीचे, जीवनशैलीचे जबाला हिने मनात आभारच मानले असतील. ही ब्रह्मवादिनी नसली तरी ब्राह्मवेत्त्याची माता म्हणून कर्तृत्ववान वाटते. खरंतर सत्यकाम जबाला याच्याकथेनी पुरुषी अहंकाराला, शरीरबलाच्या जोरावर प्राधान्य लादायला सरसावणाऱ्या पुरुषी प्रवृत्तीला, पायबंदच बसला असेल. 

सर्वेश फडणवीस

#ब्रह्मवादिनी #नवरात्र #लेखमाला #दिवसपाचवा

No comments:

Post a Comment