Tuesday, September 23, 2025

⚜️ ब्रह्मवादिनी : अदिती

आदिशक्तीच्या पर्वकाळात आपण वेदकालीन स्त्रियांबद्दल जाणून घेत आहोंत ‘अदिती' ही ब्रह्मवादिनी अर्थात वेदातील एक स्त्रीव्यक्तिरेखा. मातृत्वाचा एक सर्वोच्च आविष्कार. मातृत्वाला प्राप्त झालेला एक अर्थ. आद्य जगद्गुरू शंकराचार्य आपल्या 'देव्यापराधक्षमापन' स्तोत्रात म्हणतात, 'आई, मी तुझी कधी सेवा केली नाही, कधी तुला कवडीही दिली नाही, कदाचित् त्रासच दिला असेल, सर्वथा, तरी, माते तू, माझ्यावर केवळ प्रेमच केलंस, निरभिलाष आणि निरुपम प्रेम. - 'जगात पुत्र वाईट निघेल पण आई कधीही वाईट संभवणार नाही'. 'कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति'. 

इंद्र हा अदितीचा पुत्र म्हणविला आहे. वामदेव ऋषी अदितीला आठवण करून देतात की, 'माते, तुला इंद्राने काय कमी त्रास दिला? कितीतरी काळपर्यंत तू त्याला गर्भातच वाढवले, पण तिथं असताना देखील त्याने तुला खूप त्रास दिला आहे नं?' अदिती माता त्यावर सांगते की, 'नाही रे, वामदेवा, माझा पुत्र भूतकालीन आणि भविष्यकालीन अशा सर्व देवात आणि मानवात अद्वितीय असा आहे'. आत्यंतिक त्रास सोसूनही पुत्राचे गुणगान करणाऱ्या त्या मातृत्वाचा, वत्सलतेचा, पुत्रप्रेमाचा, वामदेवावर विलक्षण प्रभाव पडला. मातेची थोरवी त्याला उत्कटत्वाने जाणवली. सहस्त्र अपराध पोटात घालून ही माता त्याचे गुण तेवढेच जगात आविष्कृत करते, हे पाहून वामदेव थक्क झाला. इंद्र गर्भात असल्यापासूनच त्याच्या उपद्रवापायी त्रस्त झालेल्या जगानं त्याला त्या अवस्थेतच मारण्याचा प्रयत्न केला, पण अदिती मातेनं त्याला अनंतकाळपर्यंत पोटाशी लपविला, जगाच्या मारक हल्ल्यातून वाचवला, हे वामदेवाने जाणले व पुत्राचे गुण तेवढे जगापुढे गाणाऱ्या ह्या अदितीचा त्या वामदेवावर पुढे असा परिणाम झाला की, आधी इंद्राची वाटेल तशी निर्भत्सना करणारा हा वामदेव त्या इंद्राची एकापाठी एक स्तुतीस्तोत्रे गाऊ लागला. पुत्रावर असे अपार प्रेम करणारी ही माता आपल्या नसत्या लाडांनी आपले पुत्र बिघडणार मात्र नाहीत ह्याची पुरेपूर काळजी घेते. तिनं इंद्राला सर्वथा बलवान केलं, त्याचं शरीर दणकट आणि मन बळकट बनविलं. त्याला स्वावलंबनाचे आणि स्वयंपूर्ण होण्याचे पाठ दिले. अन्यायाविरुद्ध लढण्याचे धडे दिले, सर्वांच्या कल्याणासाठी अत्यंत उपकारक नव्हे, दुसरे जीवनच असे 'पाणी' सगळ्या मानवांना मुबलक मिळावे म्हणून तिनं इंद्राला प्रेरणा दिली आणि प्रसंगी भयानक युद्धे करायला लावून अडलेले आणि तुंबलेले पाणी प्रवाहित करायला लावले. जगाच्या कल्याणासाठी लढणारा पुत्र घडविला तो या अदितीनेच. 

आईने मुलांचे लाड अवश्य करावेत पण त्याचबरोबर त्याला कडक शिस्तीद्वारा जीवनाला यशस्वीपणे सामोरा जायला योग्य बनवावं, असं अदितीनं जगाला शिकवलंय. तिनं आपल्या पुत्रांना सर्व क्षेत्रात आघाडीवर ठेवलं. त्यांना पुढारी बनविलं नव्हे, देवत्व बाणविलं त्यांच्या ठायी. आणि हे करताना ती कोमल माता, अतिशय कठोरही बनली. ऋग्वेद सांगतो की, तिनं लोहारासारखे घणाचे घाव घालून हे देव घडविले.

'सं कर्मार इवाधमत् देवानां पूर्व्ये युगे' । वर्णनातीत वात्सल्य, प्रचंड प्रेम आणि जन्मजात जिव्हाळा, अदितीमातेतच जाणवला, तो स्त्रीत्वाचा एक अंगभूत गुण म्हणून. म्हणूनच स्त्रीचं प्रेम केवळ पुत्रावरच असतं असं नाही, स्वतः झिजून इतरांना जिव्हाळा लावणं, त्यांचं संपूर्ण जीवन सुखी करणं, त्यांची विविध प्रकारे काळजी घेणं हे स्त्रीच्या जणू रक्तातच असतं. अदितीनं हे दाखवून दिलं आहे. म्हणूनच स्त्री ही माता म्हणून पुत्राची काळजी घेते, तशीच मुलगी ह्या नात्यानं वडिलांची आणि पत्नीची भूमिका बजावताना पतीचीही जीवापाड काळजी घेते. वडिलांना पुत्रापेक्षा अधिक जिव्हाळा आणि प्रेम लाभतं ते कन्येकडूनच, आधार आणि आसरा लाभतो तो मुलीचाच अधिक आणि अकृत्रिमही. पित्याने मुलीला जन्म द्यावा आणि मुलीने पित्याला विवंचनेपासून दूर ठेवून सतत प्रेरणा द्यावी, आपले कर्तव्य करायला. आदितीने वडिलांना तसे घडविले, म्हणूनच ऋग्वेद म्हणतो, हे दक्षा, अदिती, जी तुझी कन्या तिनं तुला जन्म दिलाय. 

शतपथ ब्राम्हणाने पिता आणि गुरू ह्यांच्यापेक्षाही माता श्रेष्ठ म्हटली आहे. 'मातृवान पितृवान आचार्यवान पुरुषो वेद" । कारण अपार मेहनतीने ती मुलांवर संस्कार करते आणि त्यांना अग्रेसर बनविते. समाजाला मार्गदर्शन करणारे सतत सुखी आणि समाधानी ठेवणारे देवपण, पुढारीपण ती पुत्रांच्या ठायी निर्माण करते. म्हणूनच अदितीला देवांची निर्मिती करणारी म्हटले आहे. तिला जगाची माता म्हटले आहे. तिचे अनेक पुत्र आहेत कारण तिनं अनेकांना घडविलं आहे. विश्वनिर्माते  आणि जगदाधार देव, देवत्वाला पावले ते तिच्यामुळेच. 

मातेच्या कर्तृत्वाला मर्यादाच नाहीत हे दर्शविणारी ही माता म्हणूनच 'अ' म्हणजे नाही, 'दिती' म्हणजे मर्यादा अशी अदिती म्हणून संबोधिली आहे. तिनं दाखवून दिलंय की, आईच्या रूपात 'स्त्री' ही आदिशक्ती आहे. जगन्माता म्हणून ती सर्ववंद्य आहे. तिच्या अपार शक्तीची, अगाध कर्तृत्वाची आणि अमाप सामर्थ्याची जाणीव मात्र स्त्रीला व्हायला पाहीजे, स्त्रीचं मातृरूपी तेज. विश्वोद्धारक आहे, तसेच ते विश्वसंहारकही आहे. अदितीच्या तेजाचा अंकूर, तिचा पुत्र तिनं असाच सामर्थ्यवान बनविला आणि तो विश्ववंद्य झाला. 

अदिती मातेने हा धर्म जगाच्या आचरणात नित्य राहील ह्याची कठोरपणे काळजी घेतली म्हणूनच तिला 'ऋताधार' म्हटले आहे. आई म्हणजे वात्सल्य, आई म्हणजे करुणा, दुसऱ्याला जीवन देण्यासाठी सतत वापर करावा हा संस्कार घडविते ही माता. म्हणूनच तिच्या कर्तृत्वाचा प्रकाश अविनाशी व दिव्य ठरला आहे. अदितीचे हे ज्ञान, हे भान आणि हे कर्तृत्व म्हणजेच मातृत्व होय. आईची थोरवी म्हणूनच मोठी, म्हणूनच आई म्हणजेच एक आदिशक्ती, नित्यनूतन, निर्माणक्षमशक्ती आणि आई हे स्त्रीचेच एक रूप म्हणून 'स्त्री' ही एक आदिशक्ती आहे असे अदिती, ही वेदकालीन स्त्री सांगून जाते.

सर्वेश फडणवीस 

#ब्रह्मवादिनी #लेखमाला #नवरात्र #दिवसतिसरा

No comments:

Post a Comment