स्त्री ही एक शक्ती आहे. तिला सक्तीने दाबून टाकता येणार नाही याची जाणीव पुरुष विसरला की, स्त्रीने जागे व्हायला हवे. ती निसर्गत:च सहनशील आहे. पण ह्याचा अर्थ ती भ्याड आहे असा घेता येणार नाही. शारीरिक बलाने ती पुरुषापेक्षा कमी असली, तरी मनोधैर्य आणि बुद्धिचातुर्य यात ती पुरुषाला मागे टाकणारी आहे. जर स्त्रीला तथाकथित सामाजिक आणि नैतिक बंधनांनी जखडून टाकण्यात येईल, तर कुणीतरी तिला सावध करून अन्यायाविरुद्ध हिंमतीने उभे करायला हवे आणि वेदकाळात हे कार्य ब्रह्मवादिनी इंद्राणीने केले.
वेदकाळी इंद्राची पत्नी इंद्राणी ही स्त्रीजागृती आणि स्त्रीमुक्ती ह्याची पहिली प्रणेती आहे. आपल्या संस्कृतीत "गृभ्णामि सौभगत्वाय ते हस्तम् ।" विवाहाच्या वेळी वास्तविक पुरुष देवाब्राम्हणासमक्ष पुनःपुन्हा सांगत असतो की, मला सौभाग्य लाभावे म्हणून मी तुझा हात हाती घेत आहे आणि असे असताही, समाजात, तिचा पुरुष स्त्रीचे सौभाग्य ठरतो आणि पुरुषाला सौभाग्यवान म्हणण्याऐवजी स्त्रीलाच सौभाग्यवती म्हणून नावाजले जाते.
वेदकाळी इंद्राणीने कुणालाही न भीता हे कार्य केले. स्त्रियांना एकत्रित करत, नवऱ्याचा अवास्तव धाक तिने पार घालवून दिला. स्त्रीचे दुःख, स्त्रीची असहायता, स्त्रीचे लाजीरवाणे जिणे आणि तिच्या जीवाची असुरक्षितता ही पण तसे चिंतेचीच बाब. स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने मान मिळायलाच हवा, "सहोत्रं स्म पुरा नारी समनं वाव गच्छति ।' (ऋग्वेद १०-८६-१०) पूर्वी पुरुष स्त्रियांशी समानतेने व्यवहार करीत, तिला हक्कही समान होते. मग आज हे विपरीत का घडावे, असा इंद्राणीने सवाल केला. ह्याला स्त्रीच तर जबाबदार नाही ना. स्त्रीचा न्यूनगंड, पराभूत मनोवृत्ती आणि अनाठायी जाणवणारी भ्याड वृत्ती, हे विपरीत घडवीत असेल का आणि आपल्या भाग्याची, कर्तृत्वाची, सत्वाची आणि पुरुषसमान हक्काची तिची जाण गेल्याने हे तिच्या नशीबी आले असेल का ? होय. पण म्हणूनच स्त्रीला जागृत केले पाहिजे. केवळ ऋतामुळे म्हणजे कायदे करून स्त्रीची लाचारी, स्त्रीची विटंबना, स्त्रीचे दास्य संपणार नाही, म्हणून ती स्त्रियांना प्रथम हिंमत देते आणि सांगते: “उदसौ सूर्यो अगादुदयं मामको भगः । “ सूर्य उदयाला आलाय्, पहाट झालीय्,- हो हो माझ्या स्त्रीच्या भाग्याचीच पहाट आहे ती. आठव तुझे हक्क, आठव तुझ्या आज्या, पणज्या, त्या जागरूक होत्या ह्या हक्कांबद्दल. स्वपराक्रमाने त्या गाजवीत होत्या ते हक्क. घरात, सामाजिक कार्यात, राजकारणात, जनतेचे कल्याण आणि संरक्षण करण्यात त्या पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत. प्रसंगी त्यांच्यावर मात करीत, पण आज तसे उरलेले नाही. स्त्रियांचा आत्मविश्वास ढळलेला आहे. त्यांच्या बलाचा, पराक्रमाचा आणि हिंमतीचा त्यांना विसर पडलेला आहे. तेव्हा हे सगळे गेले पाहिजे. तुझ्या शक्तीची जाण आणि त्याचे भान ठेवून हे स्त्रियांनो, तुम्ही निश्चयाने बोला की, अहं तद्विद्वला पतिं अभ्यसाक्षि विषासहिः। (ऋ. १०-१५९-१) मी ह्या उदयाला आलेल्या सूर्याप्रमाणेच तेजस्वी आणि प्रखर पराक्रमी आहे. इंद्राणीने स्त्रियांना अशी स्फूर्ती दिली आणि त्याचबरोबर त्यांचा अहंकारही गेला . अहंकार हा अस्तित्वाचा मूल आधार असतो. तो अहंकार, हुंकार भरून उठला की, अन्यायाचे सूर, दूर दूर विरून जातात. म्हणून इंद्राणीने स्त्रियांना घोषवाक्ये म्हणायला दिली.
"अहं केतुरहं मूर्धा अहमुग्रा" (ऋ. १०-१५९-२) अर्थात कुलकीर्तीची मी पताका आहे. कुळाला यश लाभले ते माझ्यामुळे. मी त्याची ध्वजा आहे. मी ते यश फडकाविले आहे. मी कुटुंबाचे मस्तक आहे. मूर्धन्यस्थानी असलेली मी माझ्या मताप्रमाणे कुटुंब चालवेन. मी उग्रकाली आहे. मला केवळ नाजूक, भावुक, घाऊक आणि पडखाऊ समजू नका. ". मी अन्याय मुकाटपणे सहन करणार नाही. माझ्यावरील अन्यायांचा पाढा, माझ्यावर कोसळणाऱ्या आपत्तींची गाथा मी जनतेपुढे मोठ्याने आवाजात वाचेन.
इंद्राणीने आवर्जून सांगितले की, पुत्राचे महत्त्व कमी नाही, पण म्हणून मुलीला हीन लेखणेही शहाणपणाचे ठरणार नाही. वेदकाळीही मुलांच्यासाठी तडफडणारे पुरुष होतेच. मुलगाच आई-बापांचा तारणहार मानणारी वृत्ती आजच्या प्रमाणेच होती. मुलाचे गोडवे गाऊन मुलीला तुच्छतेने वागविणारी प्रवृत्ती स्त्रियांना त्याकाळी होत होतीच आणि म्हणूनच इंद्राणी ठणकावून सांगते की, पुत्राचे महत्त्व कमी नाही, पण तो शूरवीर निघाला तरच त्याला काही अर्थ. बाकी मुलगी म्हणजे जगाचा मूलाधार. ती नसेल तर विश्वच खुंटले. जगाची प्रतिष्ठा म्हणजे पुत्री. दुहेरी हित साधते ती दुहिता. मुलीला दुहिता म्हणतात ते याच अर्थाने. माहेर आणि सासर अशी दोनही कुळे ती एकत्रित आणते, संवर्धते आणि समृद्ध करते. दोन्ही कुळांचेही हित करणारी ही दुहिता म्हणूनच 'विराट' होय. विराट हे विश्वाधारतत्त्व आहे. भारतीय तत्त्वज्ञानात ते विश्वकल्याणकारी, सर्वतोभद्र असे महन्मंगल ब्रम्हरूप मानलेले आहे. कन्या ही असेच एक विराटत्व आहे असे इंद्राणी सांगते.
म्हणून कन्येला कुलाचे दूषण नव्हे तर भूषण मानले पाहिजे. इंद्राणी, मुलींना अशी प्रतिष्ठा देऊन स्त्रियांना उत्साह देते आणि सांगते की, प्रतिज्ञा करा की, जे जे पराक्रम आणि जे जे कर्तृत्व गाजवून पुरुष चमकला, कृतकृत्य झाला आणि सर्वत्र उत्तम ठरला ते ते मी सगळे करेन, मला हीन लेखणारे, मला दुःख देणारे, मला पीडा देणारे, माझे जीवन उद्ध्वस्त करणारे ह्या सर्वांना जिंकून मी माझ्या पतीलाही माझी कर्तबगारी आणि उत्तम कीर्ती जाणवून देईन.
मनाशी खूणगाठ बांधा स्त्रियांनो की, तुम्हांला सर्वच क्षेत्रात पुरुषाप्रमाणेच पराक्रम गाजवायचाय्, सर्वत्र विजय तुमचाच व्हायचा आहे, सत्ता, संपत्ती आणि समृद्धी सहज साधणारी कृती करणे हेच तुमचे आद्यकर्तव्य आहे. म्हणून म्हणा “समजैषमिमा अहम्।”- पुरुषा, मी सर्व क्षेत्रात तुझी स्पर्धक आहे. आणि असे कर्तृत्व गाजवून पुरुषाप्रमाणेच सुयश प्राप्त करणारी स्त्री कुटुंबात आणि समाजातही प्रतिष्ठा प्राप्त करते. स्त्रीला अशी प्रतिष्ठा लाभणे हीच आजची गरज आहे, कुटुंबमान्यता, समाजमान्यता आणि राजमान्यता लाभणे हेच स्त्रीने ध्येय ठेवावे.
वेदकाळी इंद्राणीच्या तालमीत तयार झालेल्या स्त्रियांनी आपले हक्क आपण मिळविले. पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रे काबीज केली. उगीच नाजुकपणा मिरवीत, भावुक बनून केवळ स्वतःच्या जीवाचे आणि देहाचे लाड करवून घेत ती सासरच्या हातचे कचकड्याचे केवळ दिखाऊ बाहुले बनून वागली नाही. केवळ पुरुषांची भोग्यवस्तू बनून गुलामी जीवनाची शिकार बनली नाही. इंद्राणीने अशी किमया घडविली. स्त्रीजागृती करून स्त्री मुक्त केली, इंद्राणी जगात कीर्तिमान झाली. ती खूप मोठी झाली, प्रतिष्ठा पावली. तिने स्त्रियांसाठी सामाजिक नीती घडविली. वर्तनाचे आदर्श सर्वत्र घडविले. तिची शिकवण विवाह विधीच्या वेळी वधू-मुखातून वदविली जाऊ लागली. इंद्रपत्नी सर्वकाळ त्या स्त्रियांना स्त्रीजागृतीचा, स्त्रीमुक्तीचा मार्ग दाखवून गेली. आजही अशा इंद्राणी निर्माण होवोत आणि स्त्रीचे दास्य लयाला जावो हीच प्रार्थना आहे.
सर्वेश फडणवीस
#ब्रह्मवादिनी #लेखमाला #नवरात्र #दिवसदुसरा
No comments:
Post a Comment