Monday, September 29, 2025

⚜️ ब्रह्मवादिनी : इंद्रसेना

'इंद्रसेना' ही यज्ञयाग करणाऱ्या पुरोहिताची मुलगी. योग्यवेळी तिचे उपनयन झाले आणि ती शिकण्यासाठी गुरूगृही गेली. प्राथमिक शिक्षण पूर्ण होताच, तिने 'चारविद्या' म्हणजे हेरगिरीचे शास्त्र आणि शस्त्रकौशल्य अभ्यासण्याची इच्छा प्रदर्शित केली. गुरूला थोडे आश्चर्य वाटले. 'चारविद्या' शिकणारी ती पहिलीच स्त्री असावी कदाचीत. हेरगिरीचे काम, अत्यंत जिकीरीचे आणि जीवावरचेही. मजबूत शरीर, अविचल धैर्य, विलक्षण धडाडी, सूक्ष्म तर्क आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, हे गुण हेरगिरीसाठी अत्यंत आवश्यक होते. इंद्रसेनेने ह्या सर्व गुणांचा प्रत्यय गुरूला आणून दिला आणि ती 'चारविद्येत' निपुण झाली. द्वंद्वयुद्ध आणि शस्त्रात्र चालविण्याची विद्यादेखील, इंद्रसेनेने सहजगत्या आत्मसात केली.

शिक्षण संपल्यावर तिने आपल्या पसंतीचा वर निवडला. तो मुद्गल नावाचा एक शेतकरी होता. उत्तम शेती करून, त्याने बरेच गोधन जमविले होते, वेदविद्यापारंगत मुद्गलानं, शेतीचा व्यवसाय स्वीकारला होता, कारण त्याला त्याची आवड होती आणि "अन्नम बहु कुर्वीत" हे उपदेशवाक्य केवळ पाठ करायचे आणि तशी कृती मात्र टाळायची, हे बरे नव्हे, म्हणूनही असेल पण तो शेतीकडे वळला होता. इंद्रसेना, लवकरच कृषिकर्मातही निपुण झाली. गोधनाची उत्तम निगा राखण्याचे कौशल्य तिने आत्मसात केले. रथ हाकण्याची कला आणि बैलांना वेगाने पळविण्याचे तंत्र, तिने अभ्यासाने अंगळवणी पाडले. अडीअडचणीच्या वेळी जंगलातून रथ चपळाईने हाकण्यात तर तिचा हातखंडा होता. गोधनावर तिचे अपार प्रेम होते. गोधनदेखील तिच्यावाचून चारापाणी खाईना.

एकदा 'सुभर्वा' नावाच्या एका कुख्यात दरोडेखोरानं त्यांच्या गायी पळविल्या. एक वयस्कर बैल तेवढा उरला होता. मुद्गल आणि इंद्रसेना चिंतित झाले. गायी, कुणी पळविल्या असाव्यात ? इंद्रसेना गोठ्यासभोवती बारकाईने निरीक्षण करीत होती, गायींच्या खुरांचे ठसे मातीत उमटलेले दिसत होते, पण सगळे ठसे मोठालेच कसे ? वासरांच्या पायांचे ठसे कसे दिसत नाहीत ? वासरांना खांद्यावर टाकून चोर पळाले असावेत. मग गायी, वासरामागे निमुटपणे धावत येतातच, हे तंत्र त्यांनी अवलंबिलेले जाणवले. ह्या तंत्रामुळे, गायींना जबरदस्तीनं ओढून किंवा मारून पळवावे लागत नाही. त्याकाळी चोरी करणे सोपे आणि बिनबोभाट होते. इंद्रसेनेने हे तात्काळ ताडले आणि असे तंत्र अवलंबिणारा, धडधाकट दरोडेखोर म्हणजे 'सुभर्वा' च असावा, असा तिने निष्कर्ष काढला.

कालांतराने मुद्गलाने सुभर्वा राहत होता त्या पहाडातल्या दऱ्याखोऱ्यातून वेध घेतला पण त्याचे गोधन कुठे दिसेना. सुभर्वा देखील, त्याच्या गावातील घरी नसल्याचे त्याला कळले. मग सुभर्वा यावेळी गोधन घेऊन कुठे पळाला असावा? इंद्रसेना आणि मुद्गल शोधायला लागले. गायींच्या खुरांचे ठसे सगळेच सारखे आणि सगळ्याच दिशांना आढळणारे. मग कोणत्या ठशांची दिशा स्वीकारायची ? तिला लगेच तिच्या कपिला गायीची आठवण झाली. तिची ती आवडती गाय. तिचा मागचा पाय दुखावला होता. तो पाय तिला टेकवता येत नव्हता. ती, तो पाय फरपटत पुढे घ्यायची. मातीत खुरांच्या ठशांच्या मध्ये, असे फरफटलेले चिन्ह कुठे आढळते कां ? ते तिने शोधले आणि 'सुभर्व्यानं' आपलं गोधन कोणत्या दिशेला पळविलं ते शोधून काढले. मुद्गलाने त्या दिशेला शोध घेतला आणि दूरवर, बिकट वाट असलेल्या घनदाट जंगलातील पहाडाच्या एका विशाल कपारीत त्याचे गोधन आणि तिथेच सुभर्वा आणि त्याचे साथीदार त्याला आढळले. मुद्गलाने, सुभर्व्याला आव्हान दिले. सुभर्वा आणि त्याचे चारपाच साथीदार यांच्याशी एकटा मुद्गल यशस्वीपणे लढू शकला नाही. घायाळ मुद्गल घरी परतला. मुद्गल घायाळ अवस्थेत परतलेला पहाताच इंद्रसेनेला संताप आला. त्या सुभर्व्याला अद्दल घडविलीच पाहिजे आणि गोधन परत मिळविलेच पाहिजे असा तिने निर्धार व्यक्त केला. 

दोन-चार दिवसात मुद्गलालाही थोडी हिंमत आली. कारण आता अंगावरचे घाव बरेच सुकले होते. मग इंद्रसेनेने रथ काढला; त्याला चोरांनी मागे सोडून दिलेला वयस्कर बैल जुंपला आणि ते दोघेही सुभर्व्यावर चालून गेले. इंद्रसेना आणि मुद्गल ह्यांच्याशी लढताना सुभर्वा आणि त्याचे साथीदार हरले आणि त्यांनी घोड्यांवरून पळ काढायला सुरुवात केली. सुभर्वा हरला आणि पळू लागला पण गोधन कुठे दिसेना आणि सुभर्वाने ते आणखी इतरत्र कुठेतरी लपविले होते. आता सुभर्व्याला पकडल्याशिवाय, गोधनाचा पत्ता लागणे शक्य नव्हते, पण सुभर्व्याला पकडणार कसे ? तो घोड्यावर निघालाय.

इंद्रसेनेने लगेच आपला बैलाचा रथ त्याच्या मागे लावला. घोडा आणि रथ ह्यांची शर्यतच लागली. इंद्रसेना, रथ वेगाने हाकलीत होती, अडीअडचणीतून, उंच खोल जागेतून आणि खळखळ वहात्या नद्यानाल्यातून, रथ, सुखरूपपणे बाहेर काढताना इंद्रसेनेचे सारथ्यकौशल्य पणाला लागत होते.सुभर्वा ह्या कपारीतच कुठेतरी दडला आहे,' इद्रसेनेनं मुद्गलाला हळूच सांगितलं. पण आत कपारीत एकदम शिरायचे कसे आणि कुणीकडून ? सुभर्वा सर्वत्र नजर फेकीत असेलच. त्याला, दिसल्याशिवाय रहाणार नाही आणि त्याने आडून आपल्यावर घात केला तर ? आपण पकडले जाऊ. तेव्हा झाडाआडून सुभर्व्याचा ठाव घेतला पाहिजे.

आता इंद्रसेनेला कपारीत त्वरीत उतरण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सुभर्वा कपारीतून पळून जाण्यापूर्वी, त्याला गाठणे आवश्यक होते, पण सुभर्व्याला तोंड द्यायचं ते, शस्त्राशिवाय जमायचे कसे ? आणि शस्त्र तर, वर, दूरवर रथात राहीली होती. हातात होता तो फक्त रथाच्या आधारभूत एक लाकडी जाड ओंडका. पण वेळ घालविण्यात अर्थच नव्हता. इंद्रसेना मुद्गलासहीत भरभर कपारीत शिरली. पळत सुटलेल्या सुभर्व्याचा त्यांनी पाठलाग केला. मुद्गलावर तो वार करणार तोच इंद्रसेनेनं त्याच्या डोक्यात हातातील ओंडका हाणला. सुभर्वा गोंधळला. त्याला भोवळ आली. तोच इंद्रसेनेनं पुनः दुसरा मारा केला आणि सुभर्वा बेशुद्ध पडला. त्याचे खड्ग मुद्गलाने घेतले. मग दोघांनी उचलून त्याला पाणी पाजले, शुद्धीवर आणले आणि खड्गाचा धाक दाखवीत चोरलेल्या गायींचा ठावठिकाणा दाखवायची आज्ञा केली. माझा जीव घेऊ नका. गायी परत करतो.  सुभर्वा, काकुळतीने प्रार्थना करू लागला. इंद्रसेनेनं 'तथास्तु' म्हटले. सुभर्वाने गायी परत केल्या. इंद्रसेना आणि गायी सुखरूप घरी परत आल्या.

सर्वेश फडणवीस 

#ब्रह्मवादिनी #लेखमाला #नवरात्र #दिवसनववा

No comments:

Post a Comment