Sunday, September 28, 2025

⚜️ ब्रह्मवादिनी : गार्गी

भारतीय तत्त्वज्ञान हे जगातले एक श्रेष्ठ तत्त्वज्ञान मानले जाते. शाश्वत सत्याचा शोध घेण्यात ते एकमेव यशस्वी झाले. या बहुरूपी विश्वात एकत्व शोधून त्याने वैश्विक कल्याणाचा मौल्यवान मार्ग दाखविला.  "एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति ।" आत्मा सर्वत्र एकच आहे, नव्हे तो एकमेव आहे. ह्या एकात्मवादामुळे माणसां माणसांतील द्वैतभाव संपला, कलहाचे बीजच जळाले. प्रेम आणि सामंजस्य ह्यापायी विश्वशांती बळकट बनली. “विश्वेस्मिन् शान्तिरस्तु मानवाः सन्तु निर्भयाः ।" ही ग्वाही ह्या तत्त्वज्ञानाने दिली. अशा ह्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानात भर घालणारी, वेदकालीन विदुषी म्हणून, गार्गी ओळखली जाते. वेदान्तचर्चा करून त्यातील मौलिक तत्त्वे उघड करण्याचे तत्कालीन कौशल्य ह्या गार्गीमध्येही पहावयास मिळते. .

गार्गी ही गर्ग कुलोत्पन्ना कन्या आणि वचक्नु ऋषी हिचे वडील होते. म्हणून तिला वाचक्नवी गार्गी असे म्हणत. वेदकाळच्या पद्धतीनुसार तिचे उपनयन झाले. ती गुरूगृही शिकायला गेली. याज्ञवल्क्य वगैरे बुद्धिमान विद्यार्थ्यांबरोबर तिचे शिक्षण झाले. गार्गी देखील अत्यंत बुद्धिमान होती. विश्वाची उत्पत्ती, विश्वाचे स्वरूप आणि विश्वकल्याणाचा चिरंतन मार्ग शोधणाऱ्या ऋषींपैकी एक गणली गेली. सर्वव्यापी, आनंदरूपी आणि एकमेवाद्वितीय ब्रह्म जाणणारी वेदविद्यापारंगत गार्गी, ब्रह्मवादिनी म्हणून लौकिक मिळवती झाली. सृष्टीचे ज्ञान आणि विज्ञान, निसर्ग आणि अवकाश ह्यांचा शोध आणि बोध घेण्याचे तिचे प्रयत्न प्रशंसनीय ठरले. अनेक मान्यवर विद्वानांत तिचा वरचा क्रम लावला जाई. राजसभेत अनेक विद्वान पंडितांबरोबर ती वादविवादात भाग घेई, आपली छाप पाडत होती. 

एकदा जनक नावाच्या राजाने मोठा यज्ञ केला. त्यात खूप दक्षिणा वाटली. कुरू आणि पांचाल देशातील अनेक ब्राह्मण तिथे एकत्रित झालेले होते. गार्गीही त्या सभेला आलेली होती. वेदकाळी स्त्रिया जागरूक होत्या. समाजही समंजस होता. स्त्री-पुरुषसमप्राधान्य, त्यांच्या मनात आणि कृतीत सहजतेने मुरलेले होते. स्त्रीचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व तिच्या इच्छेनुसार आणि शक्तीनुसार ती स्वतः घडवीत असे. संसार, त्यातील चूल आणि मूल ह्यांचे कर्तृत्व गोठविणारे त्याकाळी स्त्रीच्या मानेवर लादलेले कल्पनेतही दिसत नाही. त्यामुळेच जीवनाच्या अनेक क्षेत्रात, स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने कर्तृत्व गाजवताना उठून दिसते. म्हणूनच मध्वभाष्यानुसार, विवाह होऊनही, गार्गीच्या जीवनक्रमात कुठलाही बदल झाला नाही. तिचा वेदाभ्यास, ब्रह्मज्ञानाचा व्यासंग आणि पंडीतसभेत संचार सतत चालू राहीला. 

राजा जनकाच्या त्या सभेत गार्गी आमंत्रित होती. ती पंडितसभा यज्ञाच्या निमित्ताने भरविलेली असली, तरी जनकराजाच्या मनात विद्वत्चर्चा घडावी असे होते, पण त्याने तसे उघड सांगितले नाही. कारण ह्या सर्व पंडीतांत, सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्ता कोण आहे हेच, खरे तर जाणून घेण्याची त्याला जिज्ञासा होती. त्याने एक हजार गाई आणून बांधल्या. त्या प्रत्येकीच्या शिंगांना दहा दहा सुवर्णमुद्रा बांधलेल्या होत्या. जनक राजा त्या पंडितवरांना म्हणाला, "जो कुणी सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्ता असेल त्याने ह्या गायी न्याव्यात." तिथे जमलेल्या ब्राह्मणांना, मी आहे सर्वश्रेष्ठ, असे म्हणण्याचे धारिष्ट्य करवले नाही. याज्ञवल्क्य मात्र उठला आणि काही न बोलता आपल्या शिष्यांना म्हणाला, "हाकला रे त्या गायी आपल्या आश्रमाकडे". तो ज्ञानी होता. इतरही ज्ञानी होते. पण याज्ञवल्क्याला आपल्या ज्ञानाचा आत्मविश्वास होता तसा इतरांना नव्हता. पण त्याला गायी सुखासुखी नेता आल्या नाहीत. सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्ता म्हणवितोस तर आमच्या प्रश्नांची उत्तरे दे म्हणून इतरांनी त्याला सतत प्रश्न विचारूनच सोडले. 

पूर्वीच्या काळी राजसभेत पांडित्याचे प्रशस्तीपत्र मिळवायचे, तर राजाने बोलावले असेल त्या सर्व विद्वानांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत होती. तुम्ही तुमचे विचार मांडायचे आणि त्यावर जमलेल्या विद्वानांनी प्रश्न विचारायचे. तुम्हांला त्या प्रश्नांची उत्तरे भराभर देता आली तर तुम्ही पंडित ठरले जात. राजा मग तुम्हांला मानाची शालजोडी देई. आणि राजा जनकाच्या त्या सभेत याज्ञवल्क्याला प्रतिप्रश्न करून, त्याचे ज्ञान कमी असल्याचे प्रयत्न करणारे, पंडितपुरुष बरेच निघाले. पंडितस्त्री मात्र एकमेव होती आणि ती होती गार्गी. गार्गीने याज्ञवल्क्याला भंडावून सोडले, ते तिच्या विशिष्ठ शैलीने. तिने लहानलहान प्रश्नांचा याज्ञवल्क्यावर सतत मारा केला. पहिल्या प्रश्नाचं उत्तर येतं न येतं तोच दुसरा, लगेच तिसरा असे तिने बारा प्रश्न विचारले. ह्या तिच्या शैलीने याज्ञवल्क्य चिडला. बाराव्या प्रश्नाला काही उत्तर देण्याऐवजी तो म्हणाला, "पुरे कर. यानंतर एकही प्रश्न विचारू नकोस. आणखीन विचारशील तर तुझं मस्तक पृथ्वीवर पडेल.’

गार्गीने एकापाठी एक विचारलेले प्रश्न होते तरी कोणते ? ते होते सृष्टी संबंधीचे, अवकाशा संबंधीचे. त्या विद्वत्सभेतील गार्गीचे वर्चस्व जाणवले ते तिच्या आत्मविश्वासपूर्ण उद्गारांवरून. ती इतर पंडितांना म्हणाली, "आता मी शेवटचे दोन प्रश्न विचारते आणि त्याची उत्तरे जर ह्या याज्ञवल्क्याने मला दिली, तर तुमच्यापैकी कुणीही ह्या ब्रह्मवेत्यावर विजय मिळवू शकणार नाही, असे ठरेल आणि इतर सर्व पंडितांनी त्या गोष्टीला मान्यता दिली. ज्ञानाची परीक्षा घ्यायला, हवे असलेले चौफेर ज्ञान आणि सूक्ष्म दृष्टी गार्गीजवळ होती आणि त्या तिच्या सामर्थ्यांला राजसभेत मान्यता होती.

ज्ञानाचे व विज्ञानाचे एवढे प्रचंड सामर्थ्य, जवळ असूनही गार्गी विनम्र होती. ज्ञानाचा अहंकार असू नये अशी उक्ती आहे. आजकाल मात्र अज्ञानाचाही माज चढलेला जाणवतो आणि अशावेळी गार्गीच्या विनम्रतेची आठवण मनाला स्पर्शून जाते. गार्गीने, याज्ञवल्क्याची उत्तरे ऐकली आणि स्वतःचे समाधान होताच ती परीक्षा घेणारी म्हणाली, याज्ञवल्क्याने "माझा प्रणाम स्वीकार. हे पंडितांनो, याज्ञवल्क्याला बहुमान द्या, नमस्कार करा त्याला आणि सोडा पाणी त्या सहस्त्र गायींवर व सुवर्णमुद्रांवर." गार्गीच्या निर्णयाने सभा प्रसन्न झाली. जनक राजा संतुष्ट झाला. विद्वत्ससभेत गार्गीची प्रतिष्ठा वाढली. एका पंडिताने, त्यातही स्त्रीने, दुसऱ्या पंडिताच्या ज्ञानाची प्रशंसा करावी, हा खरा ज्ञानवंतांचा आदर्श, गार्गीने घालून दिला म्हणून गार्गीचे अनन्य साधारण महत्त्व आजही जाणवते. 

गार्गीसारख्या अनेक स्त्रियांच्या चरित्रावरून जाणवते की वेदकालीन समाजात, स्त्रीला समान संधी, सर्वच क्षेत्रात उपलब्ध होती. तिची इच्छा आणि महत्त्वाकांक्षा, ह्यांना पुरुषी अहंकाराची झुल त्याकाळच्या समाजाने कधीच निर्माण होऊ दिली नाही. पुरुषप्रधान संकल्पनेतून निर्माण होणारी स्त्रियांबद्दलची कुठलीही स्वार्थी, मतलबी, किंवा द्वेष रूढी लादण्याचे वेदकालीन समाजाने कधी कल्पनेतही आणले नाही. सर्व प्रकारचे शिक्षण, वेदविद्या आणि विज्ञानाचे प्रयोग करायला स्त्रियांनाही प्रोत्साहन दिले जाई आणि महत्त्वाची तशीच अनुकरणाची बाब म्हणजे वेदकालीन स्त्रिया या सर्व सोयीसवलतींचा योग्य आणि पुरेपूर उपयोग करून घेत असत. वैदिक काळात ही अशी सगळी समाजरचना आजही अनुकरणीय अशीच आहे. 

सर्वेश फडणवीस 

#ब्रह्मवादिनी #नवरात्र #लेखमाला #दिवसआठवा

No comments:

Post a Comment