Friday, September 26, 2025

⚜️ ब्रह्मवेत्त्याची माता : इतरा

वैदिक वाङ्मयात ब्रह्मवादिनी होत्या पण काही ब्रह्मवेत्त्याची माता म्हणूनही त्यांच्या कार्यातून स्मरणात राहतात अशीच इतरा ही एका ऋषीची पत्नी होती. ऋषीची ही दुसरी किंवा तिसरी पत्नी आणि इतरेपासून त्याला महीदास नावाचा पुत्र झाला. आधीच्या पत्नीपासून झालेली इतर संतती देखील होतीच. 'इतरा' ही तरुण व लावण्यवती पण अशिक्षित होती. ऋषी, विद्वान होता आणि समाजात त्याला प्रतिष्ठा होती. अनेक सम्मान मिळत, पण त्या सन्मानाच्या कुठल्याही समारंभात, तो आपल्या पत्नीला इतरेला बरोबर नेत नसे. पत्नीसह आमंत्रण असले तरी ऋषी एकटा जाई. इतरेला ह्याबाबत मनात सतत खंत वाटत असे. आपण अशिक्षित आहोत म्हणून काय झालं ? ती अनेकदा पतीला विचारी, "सभेत मी तुमच्या बाजूला बसले तर काय तुमची अप्रतिष्ठा होईल ?"

माझे रूप, माझे तेज आणि माझे तुमच्या जीवनातले पत्नी म्हणून स्थान ह्याची तुम्हांला लाज वाटते ? माझ्या सवतीची मुले मी सांभाळते, गृहस्थाश्रमाचा सगळा भार मी उचलते. तुमच्याइतकेच माझेही स्थान मोलाचे आहे आपल्या संसारात, मी शिकलेली नसेन पण सभेत काही चर्चा थोडीच करायची असते प्रत्येक वेळी ? तुमचा सन्मान होतो त्याप्रसंगी मी केवळ बाजूला बसले तर काय बिघडते ? - निमंत्रणं असतात मला देखील-" यावर ऋषी उत्तर देईना पण तिला समारंभालाही नेईना. पुढे मुले मोठी झाली तेव्हा तो मुलांना बरोबर नेई पण इतरेला मात्र नाही. इतरेचा पुत्र महीदास मात्र वडिलांबरोबर सभांना जाई. इतरा त्यातच समाधान मानू लागली. पण पती आपल्याला सभेला नेत नाही याचे शल्य मनातून जात नव्हते. दिवसांमागून दिवस कंठीत होते. एके दिवशी इतर सावत्र भावांबरोबर वडिलांसोबत सभेला गेलेला महीदास रडत घरी आला. आता त्याला समज आली होती. सभेत घडलं ते तो सहन करू शकला नाही. रडत आलेल्या आपल्या पुत्राला पोटाशी धरून इतरेनं मोठ्या ममतेनं विचारलं,

"काय झालं रे महीदासा ? आज तू एकटाच का परत आलास सभेतून ? आणि रडायला काय झालं ?" महीदास आणखीच स्फुंदून रडू लागला. "आता मला समजायला लागलं आहे आई आणि त्यामुळे नाही सहन होत हा प्रकार." तो कसाबसा बोलला. 'कुठला प्रकार बाळा ? " इतरा काकुळतीनं विचारती झाली. महीदासाला हुंदके आवरत नव्हते. तो रडू लागला. इतरेच्याही डोळ्यांतून अश्रूप्रवाह वाहू लागला, "काय झालं माझ्या राजा? रडू नकोस रे, सांग कुठला प्रकार घडला तो ?" भावनांचा आवेग अश्रू द्वारा वाहून गेला. मग महीदास हुंदके आवरत सांगू लागला. "बाबांना मी आवडत नाही. ते माझ्याकडं सभेत रागाने पहातात. मला खूप भीती वाटते. आज त्यांचा सन्मान होत होता तेव्हा त्यांनी माझ्या बाकी सगळ्या भावांना जवळ आसनावर बसविले, त्यांचं कौतुक केलं आणि मला मात्र दूर लोटलं, आणि तुला देखील बोलले. म्हणाले, "अडाणी आईचा गावंढळ पुत्र", आणि महीदासाच्या डोळ्यांतून पुनः अश्रूंचा पूर वाहू लागला. इतरेनं महीदासाचे अश्रू पुसले. तिचे नेत्र वेगळ्याच तेजाने चमकू लागले.

इतरा ६-७ वर्षाच्या महीदासाला हाती धरून घराबाहेर पडली. ऋषी पहातच राहीला. क्षणभर त्याला कळेचना की हे काय होतय . ती तिथून निघाली ती सरळ पृथ्वीकडे गेली आणि तिला म्हणाली, "तू आई आहेस सगळ्या विश्वाची. तुला सगळेच समान. तुझं प्रेम सगळ्यांवरच सारखं. तुझ्याजवळ कुठल्याच प्रकारचा पक्षपात नाही. पृथ्वी मनाशीच हसली. तिला सगळं समजलं होतं. तिनं महीदासाला पोटाशी धरलं. इतरेच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाली, “मी समजले आहे तुझं दुःख.. पण हिंमत सोडून कसं चालेल ? तू इथंच रहा माझ्याकडं. शिक्षण घे. महीदासावर, तो चांगला मुलगा होईल, सद्गुणी होईल, सगळ्यांशी प्रेमानं वागेल, असे संस्कार कर, "पण मी, ह्या वयात शिकणार कशी ? शिकायला, वय कधीच आड येत नाही. इंद्र बृहस्पतीकडे शिकायला गेला तेव्हा काय लहान बाळ होता ? पण महीदासाला शिकवायचंय मला. वेदविद्यापारंगत होऊन सभा जिंकायला पाहिजेत त्याने. तेही होईल. त्यालाही आश्रमात पाठवू आपण. इतरा सुखावली. पृथ्वीचे तिने पाय धरले. पृथ्वीने तिला उचलले. हा काय वेडेपणा ! तू माझी मुलगी, आईचे कर्तव्य मी करतेय, पाय कसले धरतेस माझे ?"

इतराने महीदासाला चांगले वळण लावले. इतरा स्वतः शिकली आणि महीदास एकाग्रतेनं गुरूगृही शिकू लागला. तो मोठा वेदविद्यापारंगत पंडित झाला. त्याने ऋग्वेदावर भाष्य लिहायला घेतले आणि काही अवधीतच संपूर्ण भाष्य लिहून पूर्ण केले. गुरू संतुष्ट झाले. सर्वत्र महीदासाची कीर्ती पसरली. ऋग्वेदावर भाष्य लिहीणारा हा कोण नवावतार ? त्याकाळी वेदातील, विशाल विश्वमंगलाची संकल्पना, व्यक्त करणारा, महान् मंगल ब्रह्म जाणणारा, ब्रह्मवेत्ता म्हणविला जाई आणि वेदोक्त ब्रह्मसंकल्पना सुस्पष्ट करणारे भाष्य ब्राह्मण म्हणविले जाई. महीदासाच्या भाष्याला ब्राह्मणग्रंथ म्हणून प्रतिष्ठा लाभली. इतरा सुखावली. स्वतः सुशिक्षित झाली होतीच. तिला पुत्राचे भाष्य करण्याचे पांडित्य समजले. गुरूने महीदासाला विचारले, महीदासकृतब्राह्मण ग्रंथ उद्यापासून महीदासब्राह्मण म्हणून ओळखला जावो. महीदास म्हणाला, "नाही, गुरूदेव, एका ऋषीचा पुत्र मागेच संपला. आता मी केवळ माझ्या आईचा पुत्र उरलो आहे. आईचं नाव इतरा आहे. माझं नाव 'ऐतरेय' आहे. म्हणूनच ह्या ग्रंथाचं नाव देखील ऐतरेय ब्राह्मण असेल. "  इतरेच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले. पृथ्वीने समाधानाने निश्वास सोडला. उपस्थित विद्वजनानीं आसमंत दणाणून सोडला. ऐतरेयाचा जयजयकार असो.

सर्वेश फडणवीस 

#ब्रह्मवादिनी #नवरात्र #लेखमाला #दिवससहावा

1 comment:

  1. अतिशय सुंदर लेख... ऐतरेय हे इतराचे पुत्र ही माहिती खूप कमी जणांना आहे. ही संपूर्ण लेखमालिकाच उत्कृष्ट आहे. वेदकाळ किती प्रगत होता विचारांनी आणि आचारांनीही, हे यातून लक्षात येते.

    ReplyDelete