Wednesday, December 25, 2024
राम मंदिर ते राष्ट्र मंदिर
Wednesday, November 27, 2024
बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ !!
Friday, October 11, 2024
⚜️ *नवनवोन्मेषशालिनी : आरती अहिल्यादेवीची*
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जन्म- जयंतीनिमित्त ‘नवनवोन्मेषशालिनी’ अंतर्गत अहिल्याबाईंच्या कार्य कर्तृत्वाचे विविध पैलू यानिमित्ताने मांडले. अहिल्याबाई होळकर चरित्राचा अभ्यास झाला आणि विविध संदर्भ ग्रंथातून हे लेखन झाले. या लेखमालेसाठी अनेक ग्रंथाचे साहाय्य झाले आणि त्यासाठी त्यांच्या ऋणातच राहायला आवडेल कारण त्यांनी जे काम करून ठेवले आहे त्यातून ही लेखमाला झाली यात विजया जहागिरदार यांचे तेजस्विनी, कर्मयोगिनी(कादंबरी), लोकमाता, देविदास पोटे यांचे वेध अहिल्याबाईंचा, खंड अर्थात होळकरशाहीचा इतिहास, द. बा. पारसनीस यांची महेश्वर दरबारची बातमीपत्रे, विजया खडपेकर यांचे ज्ञात-अज्ञात अहिल्या आणि अहिल्याबाई यांच्यावरील अनेक लेख वाचनात आले.
नेहमीप्रमाणे परिचयातील अनेकांच्या सूचना आणि छान अभिप्राय मिळाले. खरंतर सलग नऊ दिवस लिहिणे तसं कठीण होतं पण पोस्टवरील प्रत्येक लाईक, कमेन्ट, शेयर बघून पुन्हा काही नवं लिहिण्याची प्रेरणा मिळत होती. प्रत्येक कमेन्टला उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण काही राहिले असल्यास सर्वांना पुनश्च धन्यवाद देतो. यानंतर नवनवोन्मेषशालिनी या हॅशटॅग खाली आपल्याला सगळे लेख वाचता येतील. ब्लॉगवरही सगळे लेख एकत्रित आहेत. आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहावे हीच प्रार्थना आहे.
समारोपाच्या शेवटी येतांना वाटतं की भारत हा उत्सवप्रिय देश आहे आणि सणवार असले की सगळीकडे आनंदी आणि प्रसन्न वातावरण असतं. हिंदूंच्या मुख्य धार्मिक सणांमध्ये म्हटल्या जाणा-या आरत्या या त्या-त्या सणांचं महत्त्व आणि उत्साह द्विगुणीत करतात. आरती म्हणताना सर्वानी त्यातील अर्थ समजून घेऊन ती मनोभावे म्हटली, तर ती त्या देवतेकडे पोहोचते असा मानवी समज आहे. खरंतर आर्ततेने स्तुती करण्यासाठी केलेलं गायन म्हणजे आरती. आज या लेखमालेची सांगता नाशिक येथील पुष्पा गोटखिंडीकर यांनी अहिल्याबाईंच्या रचलेल्या आरतीने करणार आहे. राष्ट्र सेविका समितीच्या सह कार्यवाहिका चित्रा ताईनी ही आरती उपलब्ध करून दिली. आरती करतांना ज्याची स्तुती असते ते रूपच साक्षात डोळ्यांसमोर येते आणि आरतीचे हे वेगळेपण अद्भुत असेच आहे. असेच ज्यांच्या कार्याचा जागर गेले नऊ दिवस झाला त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्तुतीपर ही आरती अगदीं अर्थपूर्ण आहे.
जय देवी जय देवी जय अहिल्यादेवी ।
तुज गुण वर्णाया मज देई स्फूर्ती ।
जय देवी जय देवी ।। ध्रु ।।
साधी राहणी तुझे उच्च विचार ।
प्रजाहितासाठी करीसी आचार ।
धार्मिक तुही, असशी उदार ।
शेकडो मंदिरांचा केला जीर्णोद्धार ।। १ ।।
जय देवी जय देवी ।। ध्रु ।।
लढवय्यी तू , निपुण घोडेस्वार ।
रणांगणी तुझी, तळपली तलवार ।
अचूक न्यायदानाचा करुनी अंगीकार ।
उत्तम प्रशासक तुझा चोख कारभार ।।२ ।।
जय देवी जय देवी ।। ध्रु ।।
महिलांचा सन्मान घेऊन कैवार ।
कायदेकानू करताना केला विचार ।
ग्रंथसंपदेची तू असशी निर्मितीकार ।
गुणवंतांनी शोभे बघ तुझा दरबार ।। ३ ।।
जय देवी जय देवी ।। ध्रु ।।
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ।। ☘️
सर्वेश फडणवीस
#नवनवोन्मेषशालिनी #लेखमाला #नवरात्र #समारोप
Thursday, October 10, 2024
⚜️ *नवनवोन्मेषशालिनी : महेश्वरच्या अहिल्याबाई*
होळकर घरातल्या तिन्ही पुरुषांचा मृत्यू झाल्यामुळे अहिल्याबाईना आता इंदूरला होळकर वाड्यात राहणे नकोसे वाटू लागले. म्हणून त्यांनी नवीन राजधानीचा शोध सुरू केला. नेमाडमध्ये नर्मदेच्या काठी पुराणात ज्याचे वर्णन मर्दाना या नावाने आले आहे. ते स्थान त्यांच्या पसंतीस उतरले. परंतु ज्योतिषी मंडळीचे म्हणणे पडले, हे स्थान राजधानीसाठी योग्य नाही. त्या पुढे निघाल्या. नर्मदेकाठचे महेश्वर हे गाव पाहताच त्या हरखून गेल्या, नर्मदा नदीचे केवढे रुंद पात्र, दाट झाडी, भुईकोट किल्ला आणि मल्हारराव होळकरांनीच काही वर्षापूर्वी महेश्वर वसविले होते. ज्योतिषी, ब्राह्मण इत्यादींना विचारणा करून त्यांनी तेच स्थान राजधानीसाठी सुनिश्चित केले.
प्राचीन साहित्यात महेश्वरचा उल्लेख माहिष्मती म्हणून आहे. रामायण, महाभारत, पुराणे, बौद्ध धर्मग्रंथ आणि सुप्रसिद्ध प्रवाशांच्या वर्णनात सर्वत्र या नगरीचा उल्लेख होता. हरिवंशात म्हटले होते, महिष्मान नावाच्या राजाने या नगरीची उभारणी केली. पुराणातील प्रसिद्ध राजा सहस्रार्जुन याने ज्या अनूप देशावर राज्य केले, त्या अनूप देशाची राजधानी हीच होती. या नगरीस सहस्रबाहू की वस्ती असेही संबोधले जात असे. वाल्मीकि रामायणात म्हटले होते की, लंकापती रावण सहस्रबाहुच्या राजधानीत आला असता त्याने आपल्या बाहुबळाने नर्मदेचा प्रवाह कोंडून आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या बाहूतून निसटून नर्मदेचा प्रवाह सहस्रधारांनी बाहेर पडला आणि वाहू लागला. कालिदासाने रघुवंशात माहिष्मती व नर्मदा यांचा उल्लेख केला आहे. जगद्गुरू शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांचा विख्यात शास्त्रार्थ याच नगरीत झाला होता, मंडनमिश्रांची पत्नी या वादात न्यायाधीश होती. पौराणिक काळाप्रमाणे ऐतिहासिक काळात हे नगर महत्त्वाचे होते. सुप्रसिद्ध हैहय वंशी राजांचे राज्य येथेच होते. चालुक्य परंपरांच्या काळातही महेश्वर ही एक प्रसिद्ध नगरी होती. नंतर मांडूच्या सुलतानांनी ती जिंकून घेतली. इ.स. १४२२ मध्ये ती गुजरातच्या सुलतान अहमदशहाने हुशंगाबादकडून जिंकली. अकबराच्या काळातही महेश्वर हे एक प्रसिद्ध स्थान होते. यातील बराचसा इतिहास अहिल्याबाईंना माहिती होता.
इ.स. १७३० च्या सुमारास मल्हारराव होळकरांनी मोगलांकडून जिंकून महेश्वर आपल्या आधिपत्याखाली आणले. या नगरीचे महत्त्व जाणून मल्हाररावांनी १७४५ मध्ये एक राजाज्ञा काढून महेश्वर नगरी उत्तम प्रकारे वसविण्यासाठी सर्व प्रकारच्या सोयी करण्याची द्वाही फिरवली. महेश्वरची परंपरा अहिल्याबाईंच्या प्रकृतीला भावणारी होती. किंबहुना त्यांच्या अंत:प्रेरणेला या नगरीने साद घातली होती. शिवाय त्यांची राज्यकारभार करणारी व्यवहारी वस्तुनिष्ठ नजर त्यांना सांगत होती, येथे एक जुना भुईकोट किल्ला आहे. राज्यकारभारासाठी सुरक्षित. होळकरांच्या वारसाचा प्रश्न अजून निकालात निघालेला नव्हता. परंतु अहिल्याबाईंनी महेश्वर हे गाव स्वत:ला राहण्यासाठी म्हणून निश्चित केले. किल्ल्याची दुरुस्ती केली. किल्ल्याच्या आत एक साधाच वाडा बांधला गेला. मालेरावाच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई महेश्वर किल्ल्याच्या आत राहू लागल्या. तेथून नर्मदेचे दर्शन स्पष्टपणे घडत होते. घरात राजदरबाराचीही जागा होती. येथेच प्रमुख कारभाऱ्यांसमवेत अहिल्याबाईंचा दरबार भरू लागला. त्या पांढऱ्या घोंगडीवर बसत असत. या घराच्या एका भागात एक मंदिर होते. त्यात शिवलिंगे होती. इतर देवदेवतांच्या मूर्तीही होत्या. याच ठिकाणी अहिल्याबाई नेहमी पूजा करत असत. अहिल्याबाई कायमच्या महेश्वर-निवासिनी झाल्या. मग मंदिरांच्या अंगणांतून होमहवनांचा पवित्र धूर भोवताली पसरू लागला, ग्रंथपठणाचे, मंत्रजागराचे गंभीर स्वर वातावरणात घुमू लागले. भजन कीर्तनाचा आणि टाळ मृदंगाचा घोष नर्मदेच्या तटावर सतत निनादत होता.
महेश्वरहून अहिल्याबाई राज्यकारभार पाहू लागल्या, होळकर म्हणजे शिंदे आणि पेशव्यांचे दोन नेत्रच असे म्हटले जात होते. अहिल्याबाई सत्तेवर आल्या तेव्हा, घरातील कुटुंबात जवळची रक्ताच्या नात्याची माणसे बोटांवर मोजण्याइतकीच होती. अहिल्याबाईंनी ज्या क्षणी महेश्वर दरबारात कार्य हाती घेतले त्यावेळी देवाब्राह्मणांसमक्ष पत्र ठेवले आणि मनोमनी प्रतिज्ञा केली. ही प्रतिज्ञा महेश्वरच्या वाड्यावर आजही लिहिलेली आहे.
माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे.
माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे,
सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे जे काही करत आहे त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे.
परमेश्वराने ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवल्या आहेत, त्या मला पार पाडावयाच्या आहेत.
महेश्वर ही होळकरांची खाजगी जहागिरी होती. गौतमाबाईंकडून ती अहिल्याबाईंकडे आलेली होती. म्हणजे एका अर्थाने ते त्यांचे अढळ ध्रुवपद होते. अहिल्याबाईंच्या संपूर्ण स्वतंत्र कारभाराचा आरंभ आणि शेवट महेश्वरमध्येच झाला.
सर्वेश फडणवीस
#नवनवोन्मेषशालिनी #नवरात्र #लेखमाला #दिवसनववा