Friday, June 26, 2020

असा बालगंधर्व आता न होणे..



मराठी संगीत रंगभूमीवरील अनभिषिक्त सम्राट,नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व यांची आज जयंती.

जशा जन्मती तेज घेऊन तारा
जसा मोर घेऊन येतो पिसारा
तसा येई घेऊन कंठात गाणे
असा बालगंधर्व आता न होणे

रतीचे जया रूप लावण्य लाभे
कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे
सुधेसारखा साद,स्वर्गीय गाणे
असा बालगंधर्व आता न होणे

ग. दि. माडगूळकर ह्यांच्या ह्या ओळी बालगंधर्व ह्यांनाच लागू होतात. माझ्या पिढीला बालगंधर्व ह्यांची ओळख खरंतर सुबोध भावे  ह्यांच्या अभिनयातून झाली असेच म्हणता येईल. नांदी,संगीत नाटक ह्यासारख्या अनेक गोष्टी ह्या चित्रपटातून समजल्या बालगंधर्व ह्यांची व्याप्ती खरतर त्यातून समजली. पुढे बालगंधर्व उमगले ते १९२५ साली प्रकाशित झालेले सदाशिव विनायक बापट संपादित लो. टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका खंड दोन मधून त्यात ज्या आठवणी मला वाचायला मिळाल्या त्या आजच्या दिवसाचे औचित्य साधत योग्य वाटतात कारण लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दी चे हे वर्ष आहे. आणि बालगंधर्व ह्यांनी त्या लिहिलेल्या आहेत पार्थ बावस्कर  ह्या माझ्या अभ्यासक मित्राने लोकमान्य टिळक ह्यांच्यावर वर्षभर लेखमाला चालवली ह्या संदर्भात बोलतांना त्यांनी मला हा संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून दिला. त्यातील ही आठवण..

लोकमान्य बळवंतरावजी टिळक यांच्या आठवणीच्या अमूल्य ग्रंथाच्या प्रथम खंडांतील आठवणी मी वाचीत असतां मलाही सहज आणखी काही प्रसंग आठवू लागले. माझ्या स्वतःच्या कामानिमित्त काही थोड्या प्रसंगी मी त्यांचा सल्ला घेण्यासाठी त्यांजकडे गेलो होतो. त्यांचा आवाज फार मोठा असल्याने बोलतांना ते रागावून बोलत आहेत असे जरी प्रथम मला वाटले, तरी त्यांनी इतक्या प्रेमळपणानें, कळवळ्याने आणि साधकबाधक प्रमाणांचा सर्व बाजूंनी शांतपणे विचार करून प्रत्यक्ष आपल्या मुलांस जसे समजावून सांगावे  त्याप्रमाणे सर्व गोष्टी मला समजावून देऊन, अखेर हाच उपाय योग्य आहे असेंच अगदी तंतोतंत मला पटवून दिलेले आहे. असे जे काही त्यांच्या भेटीचे अपूर्व योग आले ते अजून माझ्या पूर्ण लक्षांत आहेत व तेव्हापासून माझ्या अंतःकरणांत लोकमान्य बळवंतरावजी हे कोणी अवतारी पुरुष आहेत असाच विश्वास पटलेला आहे. असो; आज अवांतर आणखी एक आठवण पुढे देत आहे.

लोकमान्य मंडालेहून सुटून आल्यावर, आम्ही नुकताच बसविलेला
विद्याहरण नाटकाचा प्रयोग पाहाण्यास पुणे येथे एका रविवारी त्यांस बोलाविलें होते. लोकमान्यांस नाटकाची अगर गायनाची विशेष हौस नसतांहि व त्यावेळी कामाच्या गर्दीमुळे त्यांस बिलकुल फुरसत नसतांहि. ज्याच्या त्याच्या उद्योगास उत्तेजन देण्याच्या त्यांच्या स्वभावास अनुसरून त्यांनी आमचे आमंत्रण मान्य केलें, व कबूल केल्याप्रमाणे ते ठराविक वेळी नाटकगृहांत आले. ही बातमी आंत आम्हांस,तोफेच्या सरबत्तीने जसे एकाद्या भूपतीचे स्वागत जाहीर व्हावे तसे, बाहेर प्रेक्षकांकडून त्यांच्या झालेल्या टाळ्यांच्या कडकडाटाच्या अपूर्व स्वागताने कळली, हे सांगावयास नकोच. कामाचा त्यांच्यामागें लकडा असतांहि त्या दिवशी अखेरपर्यंत नाटक पाहाण्यास ते बसले होते.मध्यंतरी काही वेळ नाटक पाहून झाल्यावर त्यांस आम्ही उपहाराकरितां आंत बोलाविले. त्यावेळी त्यांनी आमच्या सर्व खेळाविषयीं व एकंदर सर्व साधारण व्यवस्थेविषयी इतक्या बारकाईनें, आस्थेवाईकपणाने व चौकसबुद्धीने आम्हांस माहिती विचारली की,जणुं काय आपली स्वतःचीच ती एक संस्था आहे ! नंतर सीनसीनरीविषयी त्यांनी काही मार्मिक सूचना केल्या व म्हणाले की, "आमच्या कृष्णाजीपंतांनी अशीच नाटके लिहिली तर हलींच्या परिस्थितीला त्यांचा विशेष उपयोग होणार आहे.जर्मनीमध्ये तर काही एका विशिष्ट हेतूनेच हली नाटके लिहिली जातात व करमणुकीबरोबर राष्ट्रास योग्य असे शिक्षण देण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. आमच्या व्याख्यानास जसे ठराविक लोक येतात तसाच तुमच्या नाटकाचाहि ठराविक प्रेक्षकवर्ग आहे. म्हणून शान देण्याचे बाबतीत त्याचीहि उपेक्षा होता कामा नये."

नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व
(यशस्वी नट, मालक गंधर्व नाटक मंडळी, पुणे.)

✍️ सर्वेश फडणवीस 

#बालगंधर्व

Monday, June 22, 2020

मेघदूत- एक विरह काव्य !!

आज पाऊस सर्वदूर दाखल झाला आहे. पावसाची चातकाप्रमाणे वाट बघणारा माणूस आज आनंदी आहे. मेघ म्हंटला की सहजपणे मेघदूत आठवतं मग कालिदास,आणि रामगिरी अर्थात रामटेक ह्याचा संबंध आलाच. मेघदूताची गोडी प्रत्येक प्रांतामधील लोकांना लागली आहे. संस्कृत साहित्य विषयक रुची असलेल्या लोकांना याबद्दल विलक्षण प्रेम आहे. मेघाला दूत बनवून प्रियतमेला संदेश पाठविणाऱ्या विरही यक्षाची कथा आजही तशीच चिरतरुण आहे.  ११६ श्लोकांत महाकवी कालिदासाने विरही यक्षाच्या वेदनेचं अचूक वर्णन केलंय. मेघदूताची दीडशेहून अधिक रूपांतरं झाली. मंदाक्रांता वृत्तात लिहिलेल्या या काव्याचं त्याच वृत्तात मराठी रूपांतर केलं कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी. ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर आणि कवयित्री शांता शेळके यांनाही ‘मेघदूत’ मराठीत आणले आणि त्यांनी कालिदासच्या काव्याचं रसाळ रूपांतर केलं. मात्र केवळ कवी मंडळींनाच ‘मेघदूता’ने भुलवलं असं नाही तर ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि भारताचे पहिले अर्थमंत्री असलेल्या चिंतामणराव देशमुख यांनाही ‘मेघदूत’ मराठी भाषेत आणले त्यानंतर अनेकांनी आपापल्या परीने या अमर काव्याचा अनुवाद केला. आज आषाढस्य प्रथम दिवसे अर्थात कालिदास दिन.

कालिदासाच्या ‘मेघदूता’तील ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ ही एका श्लोकाची सुरुवात प्रचारासारखी रूढ झाली. मात्र तो ‘मेघदूता’चा आरंभ नव्हे. कालिदासाच्या कुमारसंभव आणि मेघदूत या काव्यांच्या निर्मितीची एक गमतीशीर कथा आहे. ती कथा असं सांगते की, सुशिक्षित राजकन्येचा पती झालेला कालिदास अगदीच अडाणी होता. तेव्हा पत्नीने त्याला ज्ञानप्राप्ती करून येण्यासाठी घराबाहेर पाठवलं. कालांतराने कालिदास प्रज्ञावंत होऊन परतला तेव्हा त्याच्या पत्नीने पहिला प्रश्न विचारला, ‘‘अस्ति कश्चित् वाग्विशेष?’’ म्हणजे “तुझ्या बोलण्यात (ज्ञानात) काही बदल झाला आहे का?’’ त्यावर बुद्धिमान झालेला कालिदास हसून म्हणाला, ‘‘तू हा जो प्रश्न विचारलास त्यातील प्रत्येक अक्षराने आरंभ करून मी काव्यरचना करीन.’’

मग ‘‘अस्ति उत्तरस्य दिशी देवतात्मा’’ अशी सुरुवात करून त्याने ‘कुमारसंभव’ या काव्याची रचना केली. ‘कश्चित् कांता विरहगुरुणां’ या शब्दांनी ‘मेघदूता’चा आरंभ केला आणि ‘रघुवंशा’च्या सुरुवातीला ‘वागर्थाविव संपृक्तो’ अशी शब्दयोजना केली. कदाचित या तीनही काव्यांच्या रचनेनंतर कुणीतरी ही कल्पक कथा रचली असेल.

कालिदासाच्या ‘मेघदूता’चा आणि महाराष्ट्राचा जवळचा संबंध आहे. कुबेराच्या शापाने एक वर्षाचा पत्नीविरह नशिबी आलेला यक्ष अलकानगरीतून फिरत फिरत नागपूरजवळच्या रामगिरी म्हणजे रामटेक येथे येऊन विसावला. तिथे त्याच्या विरहव्याकूळ मनाला आषाढाच्या पहिल्या दिवशी एक मोठा ढग दिसला आणि उत्तरेकडे जाणाऱ्या त्या मेघाला पाहून यक्षाने आपल्या पत्नीला संदेश देण्याची विनंती केली. तोपर्यंतच्या काळात राजहंसासारखे पक्षी दूताचं काम करून पत्र पोहोचवत असत. शिकवलेल्या पक्ष्यांचा उपयोग त्या काळी संदेशवहनासाठी होत असे, परंतु बाष्पयुक्त धूसर असलेल्या निर्जीव मेघाला ‘दूत’ बनवण्याची अद्वितीय कल्पना कवी कालिदासाला स्फुरली. मग त्या मेघाशी त्याचं हितगुज सुरू झालं. रामगिरी ते अलकानगरी आणि मध्ये उज्जयिनी असा प्रवास तो मेघ कसा करील, त्याला वाटेत काय काय दिसेल, विरही पत्नी किती दुःखाश्रू ढाळत असेल हे सारं कालिदासाचा यक्ष का मेघाला सांगतो हे सारंच वर्णन उत्कट आणि भावमधूर आहे. ‘मेघदूत’ हा कालिदासाच्या प्रतिभेचा अप्रतिम आविष्कार आहे. त्याचा प्रभाव नंतरच्या अनेक कवींवर पडला. शिलर या जर्मन कवीने मेघदूत वाचून त्याच्या कथानकातील राणी मेघाबरोबर संदेश पाठवते असं लिहिलं. आणि आज हे प्रयोगाद्वारे सिद्ध ही झाले आहे. ते मेघ उत्तरेकडून रामटेक पर्यन्त आलेले होते.

कालिदास हा संस्कृतमधला श्रेष्ठ नाटककार. शाकुंतल, मालविकाग्निमित्रम्, विक्रमोर्वशीयम् अशी त्याची अनेक नाटकं प्रसिद्ध आहेत. त्यापैकी ‘शाकुंतल’ची गोडी अनेकांना मोहात पाडणारी ठरली. जर्मन कवी गटे ‘शाकुंतल’ डोक्यावर घेऊन नाचला असं म्हणतात. याच ‘शाकुंतला’ची कथा घेऊन अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेलं ‘शाकुंतल’ हे संगीत नाटक आधुनिक मराठी संगीत नाटकाच्या परंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात करणारं ठरलं. कालिदास हा चपखल ‘उपमा’ अलंकार वापरण्यासाठी प्रसिद्ध मानला गेला. ‘उपमा कालिदासस्य’ असंच म्हटलं जातं. अशा या जागतिक कीर्तीच्या महाकवीचं काव्य मेघदूत.  कालिदासाच्या कलाकृती आजही सर्वांच्या मनात रुजल्या आहेत आज नागपूर आणि रामटेक या ठिकाणी कालिदास महोत्सव ही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. महाराष्ट्र सरकारने कालिदास स्मारक छान सुशोभित केला आहे. पण लोकांनी त्याची अवस्था दयनीय केली आहे. कालिदासाचे स्मरण करताना ज्या मेघदूताची रचना झाली त्या स्मारकाचे जतन करण्याची जबाबदारी आपली आहे. सरकारने ही पुन्हा त्याचे सौंदर्य करावे हीच इच्छा आहे. कालिदास,मेघदूत व रामगिरी याचा संबध वैदर्भीयांसाठी एक अमौलीक ठेवा आहे जो जतन करण्याची जबाबदारी आपली आहे. 

’आषाढस्य प्रथम दिवसे’ मेघदूतं पठामः।
वारंवारं कविकुलगुरुं कालिदास स्मरामः॥
यस्य प्रज्ञा खलु भगवती, लेखनं भावगर्भम्।
नाट्यं, काव्यं मनसि स्वनितं तं कथं विस्मरामः।।

✍️ सर्वेश फडणवीस

 #आषाढस्य_प्रथम_दिवसे #कालिदासदिन


Wednesday, June 17, 2020

अरण्यातील आत्ममग्न वनऋषी - मारुती चितमपल्ली !!


श्री मारुती चितमपल्ली !! हे नाव आज जगभर आदराने घेतल्या जाते. व्यक्तिगत मी स्वतः मनस्वी आनंदी आहे की ह्यांच्यावर ह्या निमित्ताने का होईना शब्दफुलांची ओंजळ समर्पित करता येते आहे. ज्येष्ठ साहित्यिक,व्रतस्थ वनसंत ,अरण्यातील आत्ममग्न ऋषी मारुती चितमपल्ली. ह्या माणसाने निसर्ग वाचला आहे. तब्बल चार दशकांचा काळ त्यांनी जंगलात घालवला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे निसर्गाच्या इतक्या निकटतम सान्निध्यात वातावरणातील बदलांचे निसर्गातील विविध घटकांवर होणारे परिणाम अत्यंत जवळून त्यांनी अनुभवले आहे. या अवलोकनातून अनेक आश्चर्यकारक गोष्टी उमगल्या आणि आज प्रत्येकाला अभिमान वाटावा असे कार्य चितमपल्ली सरांनी केले आहे. 

जंगलातील मुक्कामात असंख्य वन्यजीव-पक्ष्यांच्या प्रजातींचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावरील वास्तव्यात समुद्री पक्षी तसंच समुद्री जीवांच्या हालचालींचाही अभ्यास केला. त्यातूनही पावसाळ्यापूर्वीचे सृष्टीतील असंख्य आश्चर्यजनक बदल त्यांनी टिपले आहेत. शिवाय जंगलावरच ज्यांचे जीवन अवलंबून आहे अशा हजारो आदिवासी कुटुंबांना भेटले त्यांच्याबरोबर जंगलात राहिले, त्यांचा विश्वास संपादन केला. पशुपक्ष्यांप्रमाणेच आदिवासींनाही उपजतच निसर्गचक्रातील बदलांचे ज्ञान असते आणि ते ज्ञान ते सहसा कोणाला देत नाहीत, हे देखील त्यांनी पाहिले. परंतु अशी असंख्य निरीक्षणे त्यांनी स्वत:ही अनुभवली आणि टिपली आज तब्बल २१ हुन अधिक पुस्तकांमध्ये त्यांचा सविस्तर उल्लेख आढळतो. 

मारुती चितमपल्ली ह्यांच्याविषयी लिहितांना कुठल्या गोष्टीला स्पर्श करावा हे कळतच नाही. कारण हात लावील ते सोने असं त्याचं कार्य आहे. निसर्ग,पक्षी,प्राणी,मासे,वृक्ष,जंगल ह्या शब्दांच्या पलीकडचे विश्व त्यांनी आपल्याला दाखवले नव्हे त्यांच्या लेखणीतून ते प्रत्यक्ष घेऊन गेले आहेत. जंगलात जातांना कुठल्या गोष्टी अनुभवायला हव्या ही दृष्टी त्यांनी दिली आहे. निसर्ग माणसाला कायमच खुणावत असतो फक्त आपण त्याच्याकडे जाण्यासाठी तयार नसतो आणि हे व्रतस्थ वनऋषी अनेक दशकं तिथं जाऊन राहिले आहेत. 

पक्षी,प्राणी वृक्ष आणि त्यांच्या प्रजाती ही अत्यंत संवेदनशील आणि बदलत्या हवामानाशी स्वत:ला जुळवून घेणारी निसर्गाची आश्चर्यकारक निर्मिती आहे. अशी हजारो निरीक्षणे, टिपणे आजही त्यांच्या संग्रही आहेत. वर्षांनुवर्षे त्यांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली तेव्हा कुठे त्यांच्या दिनक्रमातील बदलांचे हे रहस्य त्यांना उलगडले. खरंतर अशी रहस्ये एका दिवसात समजत नाहीत.  वन अधिकारी असल्याने वर्षांनुवर्षे जंगलात राहिल्यामुळे त्यांचे आश्चर्यकारक विश्व समजून घेण्याची संधी त्यांना मिळाली आणि आज कथा,कादंबरी,ललित लेखनाच्या बरोबरीनेच चितमपल्ली सरांची ग्रंथसंपदा आपल्याला वाचता येत आहे. त्यांचा वाचकवर्ग कायमच त्यांच्या नव्या साहित्याची वाट बघत असतो. साहित्य प्रसार केंद्र या राजाभाऊ कुळकर्णी ह्यांच्या प्रकाशन संस्थेने त्यांची ग्रंथसंपदा प्रकाशित केलीच पण आत्मीय आणि जिव्हाळ्याचे नाते जपलें आहेत. आजही तेच ऋणानुबंध मकरंद कुळकर्णी ह्यांनी टिकवून ठेवले आहेत. आज त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी ते सांभाळून आहेत. 

मारुती चितमपल्ली ह्यांनी ६६ वर्षे जंगलात भटकंती केली आहे. जवळपास ५ लाख किमी प्रवास केला आहे. आज १३ भाषांचे ज्ञान,त्यात मूळ संस्कृत ग्रंथाचा अभ्यास करता यावा म्हणून संस्कृत भाषा शिकले आहेत.४ कोशांचे लेखन पूर्ण झाले आहे. प्राणी कोषाचे काम प्रकाशनाच्या वाटेवर आहे. मत्स्य कोष,वृक्ष कोषाचे काम ही पूर्ण होत आले आहे. पक्षीकोशाची तिसरी आवृत्ती सुरू आहे. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत राहत सकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठीत दिलेले पर्यायी शब्द आज रुळलेत. तसेच कार्य जंगलाच्या बाबतीत मारुती चितमपल्ली यांनीही करून ठेवले आहे. अरण्य आणि त्याभोवताल विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चितमपल्ली यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफले आहे. पक्षी असोत ‌की वनस्पती, कितीतरी नवी नावे केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदली गेली आहेत. या मूळ तेलगू भाषिक माणसाने मराठीला सुमारे एक लाख शब्दांचा ‌खजिना उपलब्ध करून दिला आहे. हा दुर्मिळ ठेवा समोर आणण्याच्या सकारात्मक प्रेरणेतूनच हे सर्व त्यांना साध्य झाले आहे. पुरस्कारांची श्रीमंती त्यांच्या पाठीशी असतांना वयाच्या या टप्प्यावर तरुणालाही लाजवेल अशी काम करण्याची त्यांची कारकीर्द आहे. चकवा चांदणं ह्या आत्मचरित्रातून चितमपल्ली ह्यांच्याबद्दल अधिक जाणून घेता येईल. परमेश्वराने त्यांना निरामय आरोग्य प्रदान करावे हीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस

#आयुष्य_जगणारी_माणसं

Monday, June 15, 2020

न्यायधुरीण मीरा खडक्कार !!

श्रीमती मीरा खडक्कार !! आज हे नाव नागपूरात परिचित आहेच पण आज अनेक समाजसेवी संस्थेच्या कार्यकारणी मंडळामध्ये आदराने ह्या नावाचा उल्लेख केला जातो. या देशात आपण जन्माला आलो,या देशाचे आपण काहीतरी देणं लागतो ही भावना सध्या कमी झाली,नाहीशी झाली हे कळण्याच्या पलीकडे गेलं आहे. पण मीराताई आजही अनेक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी ह्या भावनेतूनच आजही कार्यरत आहे. 

मीरा खडक्कार हे नाव निवृत्त न्यायाधीश म्हणून पुरेसे नाही तर ह्यांनी निवृत्तीनंतर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कार्य सुरू असल्याने अधिक परिचित आहे. B.A फायनल ला असतांना लग्न झाले व त्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. १९७१ मध्ये वकिलीची सुरुवात केली. पुढे १९९२ मध्ये मुंबई कुटुंब न्यायालयात न्यायदानाचे काम त्यांनी सुरू केले, १९९६ मध्ये नागपूरात बदली झाली आणि १९९७ मध्ये नागपूरच्या कुटुंब न्यायालयात पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून नवी सुरुवात झाली.जवळपास १७ वर्ष न्यायदानाचे काम केल्यानंतर जुलै २००९ मध्ये निवृत्त झाल्या आहे. कुटुंब न्यायालयात असल्याने कुटुंब हा जिव्हाळ्याचा विषय बनत गेला. अनेक विभक्त होणाऱ्या कुटूंबाची बाजू समजून घेत योग्य तो न्याय देत एकत्र कुटुंब आणण्यासाठी प्रयत्न केले. 

सहज मध्यंतरी भेट झाली असता, कुटूंब व्यवस्थेवर बरीच चर्चा झाली. मुंबई आणि नागपूर या महानगरात काम केल्याने महानगरातील कौटुंबिक समस्या जवळून बघितल्या आहेत. त्या म्हणतात,आजच्या तुलनेत कुटुंब व्यवस्था त्याकाळी बरीच चांगली होती,वातावरण चांगले होते,सदस्यांमध्ये प्रेम,जिव्हाळा होता. नात्यात आत्मीयता होती. एकमेकांना आधार देणे,मदत करणे ह्या गोष्टी सहजतेने होत होत्या. पैसा भावनेपेक्षा दुय्यम होता आणि कुटुंब विघटित करणं मनाला क्लेश कारक होते. हळूहळू परिस्थिती बदलत गेली विवाह,व्यवहार जास्त आणि प्रेम,भावना कमी झाली. व्यक्ती स्वातंत्र्य,आत्मकेंद्रित विचार,कुटुंबातील सदस्यांकरिता त्याग करण्याची वृत्ती,हळूहळू आज कमी होते आहे,आज परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे,पण तितक्याच प्रमाणात कुटूंब वाचवण्यासाठी अनेक सामाजिक संस्था आणि व्यक्ती करत आहे ह्याबद्दल आत्मीय समाधान त्यांनी व्यक्त केले होते. 

जोपर्यंत माणसाचे विचार आणि मानसिकतेत बदल होत नाही, तोपर्यंत प्रश्नं सुटणार नाहीत. तरुण पिढी ही शिक्षित आहे, पण जर ती सुजाणतेने वागली तर अनेक समस्या सोडवू शकते. आपण या देशाचे काही तरी देणे लागतो या विचाराने आपण आपली जबादारी पार पाडली पाहिजे आणि ह्याच जाणिवेतून अर्थार्जनासाठी काम करायचे नाही हे मीरा ताईंनी ठरवले. आपला अनुभव,आपले शिक्षण आणि ज्ञान याचा समाजाकरिता उपयोग व्हावा म्हणून निवृत्तीनंतर लगेच अनेक संस्थेच्या माध्यमातून कार्य सुरू केले. सुरुवातीला अध्यक्ष ग्राहक तक्रार निवारण केंद्र ,श्रद्धानंद अनाथालय उपाध्यक्ष,गृहिणी समाज,भारतीय स्त्री शक्ती येथे स्थानिक पातळीवर काम सुरू झाले. 

नंतर हळूहळू कार्याचा विस्तार होत गेला मग पुढे अधिवक्ता परिषद विदर्भ प्रांत,जम्मू काश्मीर अध्ययन केंद्र नागपूर विभाग अध्यक्ष, वृंदावन येथील विधवांच्या परिस्थितीच्या वास्तविकतेचा अभ्यास करणाऱ्या समूहाचे नेतृत्व त्यांनी केले, अधिवक्ता परिषद राष्ट्रीय उपाध्यक्ष ह्या दायित्वाने प्रवास सुरु झाला. काही वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीर मधील कठूवा प्रकरण झाले होते. त्यातील नवी दिल्ली येथील वास्तव शोधन समितीत (All India Intellectuals Association) मध्ये काम करत असतानाच जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीला त्यांना जवळून बघता आले. ज्या क्षेत्रात कायद्याचा अभ्यास,परीक्षण ह्या गोष्टी आवश्यक असतील त्यावर मीरा ताईंनी कार्य केले आहे. नुकतेच २०१९ मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या सल्लागार समितीच्या सदस्य पदी त्यांची निवड झाली आहे. 

आज इतक्या दायित्वाच्या वलयाभोवती असतांना या वयातील उत्साह बघतांना त्यांचे हेच सांगणे आहे,आपले पारिवारिक दायित्व पार पडल्यानंतरचा आपला वेळ समाजासाठी आणि आपल्या देशासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत घालवावा त्यानेच आपले मन ताजेतवाने आणि उत्साही राहते. जीवनात चढउतार येतातच पण आज वयाच्या ह्या टप्प्यावर आनंदी व मानसिक शांतता आणि समाधान त्यांच्याजवळ आहे. शालेय जीवनापासून  The Miller of The Dee ही कविता त्यांच्या जीवनाचे सूत्र आहे. त्यातली “I envy nobody no, not I And nobody envies me !" ही ओळ म्हणजेच त्यांची ओळख यथार्थ ठरेल कारण त्यांनी कधी कुणाचा हेवा केला नाही,कुणाशी स्पर्धा केली नाही. कायमच प्रसिद्ध परांगमुख राहत कार्य केले आहे. 

आज प्रत्येक सुबुद्ध ,जाणकार,सद्सद्विवेकबुद्धी शाबूत असलेल्या बुद्धीप्रामाण्यावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशेनं न जाता त्या वाऱ्याचा रोख बदलवून नव्या दिशेला जाणं अत्यंत गरजेचे आहे आणि आज ह्यासाठी मीराताई सतत कार्यमग्न आहे. सकारात्मकता जवळ असल्याने ती इतरांना सदैव सुहास्याने देणाऱ्या मीरा ताईंना परमेश्वराने निरामय आरोग्य प्रदान करावे हीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस

#आयुष्य_जगणारी_माणसं 

Saturday, June 13, 2020

अवघा झाला आनंदू !! 🚩


श्री संत कैवल्य सम्राट ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान !!

“रामकृष्ण हरी”. वारकरी संप्रदायाचा महामंत्र.

गेली साडेसातशेहून जास्त वर्षे  " वारी " अव्याहतपणे सुरू आहे. भक्तांसाठी दिंडी,भजन,कीर्तन,रिंगण,खेळ याचसोबत विविध संतांच्या पालख्यांचे दर्शन घेणे हा जिव्हाळ्याचा विषय आहे.

ज्येष्ठ कृ.अष्टमी या तिथीला आळंदी हून प्रस्थान ठेवलेली माउलींची  पालखी आळंदी ते पंढरपूर या अखिल विश्वाची उत्पत्ती करण्याऱ्या दयाघन पांडुरंगाच्या दर्शनार्थ निघाली आहे.आज आपण ही सगळे या पालखी सोहळ्यात सामाविष्ट होतो आहे. आपण प्रत्येकाने अशी भावना करायची की जणू माउलींची पालखी माझ्या खांद्यावर आहे आणि रामकृष्णाचा गजर करत आपल्या जागेवरून व्हाया आळंदी ते पंढरपूरला जात आहोत. कारण या परंपरचे महाराष्ट्र साडेसातशे वर्षापासून अत्यंत निष्ठापूर्वक आचरण करत आहेत. लाखो वारकरी,हजारो मृदुंग,हजारो विणे आणि लक्षावधी टाळ घेतलेली पाऊले जेव्हा पंढरीच्या वाटेनी चालतात तेव्हा संपूर्ण विश्व आनंदानी कोंदून जाते. मैलोनगणिक तो नामध्वनी पुढे आपल्या कानावर पडत असतो. आणि लक्षावधी वारकरी ऊन,तहान,पाऊस,वारा,वादळ याची पर्वा न करता चालत असतात.

मानवा-मानवांमध्ये सलोख्याचे, प्रेमाचे संबंध निर्माण होऊन अखिल जग सुखी व्हावे, समाधानी व्हावे यासाठी एका उदात्त ध्येयाच्या दिशेने टाकलेलं पाऊल म्हणजे वारी आणि या उच्चतम ध्येयाचा अंगीकार करण्यासाठी व्रतस्थ वृत्तीने झटणारी व्यक्ती म्हणजे वारकरी होय. 

प्रवाही नदी जशी स्वयंशिस्तीने आपले काठ निर्माण करत जाते तसाच हा वारकऱ्यांचा प्रवाह पंढरीच्या दिशेने वाहताना दिसून येतो. अगदी शिस्तीत चाललेले वारकरी नैतिक मर्यादांचे उल्लंघन न करता स्वयंप्रेरणेने  चालत असतात. वाटेत रंजल्या-गांजल्यांना मदत करत असतात.  

वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणे नव्हे तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं,वारी म्हणजे देव-भक्त भेटीतील आतुरता,वारी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास,वारी म्हणजे जीवशिवाच्या मिलनाची प्रक्रिया,वारी म्हणजे मनुष्याचा देवत्वाच्या दिशेने चाललेला अखंड प्रवास, वारी म्हणजे देव शोधता-शोधता स्वत:च देव होऊन जाणं, वारी म्हणजे वारकऱ्यांचे एकमेकांप्रति जिव्हाळा आणि नातं जे फक्त युगे अठ्ठावीस उभ्या असणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचे अर्थात पांडुरंगाच्या दर्शनार्थ आहे.

पण यावर्षी उदभवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आपल्या काही धार्मिक व पारंपरिक घटनाप्रसंग साजऱ्या करणाऱ्या पद्धतीलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी ज्ञानदेव पालखी आळंदीहुन पंढरपूरला जाते परंतु कोरोनासंकटामुळे आपल्या समोर मोठीच गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यावर्षी १७ दिवस माउलींचा मुक्काम आजोळी अर्थात गांधी वाड्यात असणार आहे. पालखी पंढरपूरला नेण्याचा उत्सव सुरू होण्यापूर्वी ज्ञानदेवांच्या पादुका झोळीत नेत असत. हैबतीबुवा,वासकर,खंडूजी,शिवथळ यांनी हा उत्सव सुरू केला होता. सकल संतांचे लाडके असे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री माउली आज काही क्षणात प्रस्थान ठेवणार आहेत..आज सर्व वारकरी आळंदीला पोहोचले असते येथुन माउलींच्या समवेत सर्वजण निघाले असते एका विठुरायाच्या दर्शनासाठी. पण आलेल्या या महामारीच्या संकटामुळे आज आपल्या स्थानावरूनच चला आपण ही निघूया त्या विठूरायाच्या दर्शनार्थ रामकृष्णाचा गजर करत… जय जय रामकृष्ण हरी...

" यंदाची वारी करूया घरी, घालवू कोरोना महामारी "

✍️ सर्वेश फडणवीस

Friday, June 12, 2020

बसोलीचा चित्सागर - प्रा.चंद्रकांत चन्ने!!

प्रा.चंद्रकांत चन्ने !! चित्रकलेच्या माध्यमातून गेली ४५ वर्ष बसोलीच्या चित्रचळवळीतून बालविश्वात आत्मविश्वास निर्माण करणारे एक चित्रजादूगार म्हणून त्यांचा गौरव होईल. चित्रकार प्रा.चंद्रकांत चन्ने हे कला इतिहासाचे अभ्यासक असले तरी प्रामुख्याने ‘बसोली’ या बालचित्रकला-विषयक कला चळवळीतील लक्षणीय कार्याबद्दल नागपूर व भारतात प्रसिद्ध आहेत. बसोली ही भारतीय चित्रकला क्षेत्रातील प्रसिद्ध चित्रशैली आहे त्याची सुरवात हिमाचल प्रदेशातील बसोली ह्या पहाडी गावातील लघुचित्र मालिकेतून झाली असे सर सांगतात. आज नागपूरमधील बालचित्रकारांच्या बसोली ग्रुप ने हीच संकल्पना पुढे नेली आहे. 

खरंतर माणसाला जगायला शिकवते ती म्हणजे कला आणि माणूसपणाच्या जगण्याला एक उंची देते ती म्हणजे सुद्धा कला आहे. दररोजच्या कंटाळवाण्यातून हवाहवासा वाटणारा विरंगुळा म्हणजे कुठलीही कला कारण कला जगण्याला सौंदर्य प्रदान करते आणि ह्या कलेमुळे जगणे अधिक सुसह्य होत जाते त्यातली अनेकांच्या जवळची,अनेकांना उपजत असलेली कला म्हणजे चित्रकला. शब्दांपासून दूर नेण्याची ताकद ही चित्रात असते. चित्रं ही माणसाच्या मनात विचारांची स्पंदने निर्माण करतात आणि चित्र आपल्याला विचारांनी समृद्ध करत असते. 

सध्या रंगांच्या दुनियेत स्वतःला हरवणारे बालपण आता मोबाईलच्या दुनियेत हरविल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. अशावेळी मुलांच्या हातून अलगद मोबाईल बाजूला काढून ठेवत रंग,ब्रश, पेन्सिल ह्यांच्या सोबतीने रंगाची सफर घडवणारे बसोलीचे बापमाणूस चित्रकार प्रा.चंद्रकांत चन्ने सर आहेत. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या व्यक्तिमत्त्वाचे स्पंदन अनुभवण्यासाठी एकदा सरांना भेटायला पाहिजेच किंवा निदान बोलायला तरी हवेच. मी स्वतः शालेय जीवनात बसोलीच्या शिबिरात गेलो आहे आणि सरांचा चित्रांवरचा आनंद अनुभवला आहे. ‘लाल कावळा,पिवळा राघू, बंधन नाही कशाचे, काढू फांद्या जमिनीलागून,आकाशाला मुळे, आम्ही बसोलीची मुले’ या गीतातील शब्दांप्रमाणे उन्मुक्त, निर्भीड आणि दिलखुलास चित्रांच्या दुनियेत भटकायला कुणाला आवडणार नाही ? जर ती भटकंती करायची असेल तर चंद्रकांत चन्ने सरांच्या सानिध्यात ते अनुभवता येते. बालगोपालांच्या आनंदी दुनियेचे शिल्पकार म्हणजे चन्ने सर आहेत. 

आज लहान मुलांना त्यांच्या भावविश्वाच्या अनुरूप चित्रांमधून व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आणि शिकवण देणारी तसेच त्यांचा आत्मविश्वास जागविणारी अनोखी चित्र चळवळ सरांनी सुरू केली आहे. सध्या लॉकडाऊन च्या काळात मुलांना चित्राची आवड निर्माण व्हावी म्हणून सरांनी अभिनव उपक्रम सुरू केले आहेत. त्यातीलच 'रंगसेतू-कुटुंब रंगलय रंगात' ह्या कुटुंब ऑनलाइन चित्र स्पर्धेचे आयोजन यशस्वीरित्या संपन्न झाले. बसोलीच्या शिबिरात मुलांना खोडरबर दिला जात नाही. काहीही खोडायचे नाही. मुलांना जपा, त्यांना वेळ द्या,त्यांना त्यांच्या भावविश्वात रममाण होऊ द्या आणि त्यांच्या भावनांवर आपले मत थोपवू नका, हेच सरांचे पालकांना सांगणे आहे आणि याच साठी त्यांचा अट्टहास आहे. आज मोठेपणाचे ओझे उतरवून सर सहज मुलांत रमतात,त्यांच्यातले एक होतात आणि त्यातून सरांप्रती सहज आत्मीयता निर्माण होते. बसोली आता ललित कला चळवळ झाली आहे. उन्हाळा सुट्टी सुरू झाली की सगळ्यात पहिले चाहूल लागते ती बसोलीच्या निवासी शिबिराची. गेल्या ४५ वर्षांत बसोली ग्रुप  नावाने परिचित झालेल्या या चित्रचळवळीत लाखो विद्यार्थी सहभागी झाले आहेत आणि होत आहेत. 

एकाच घरातील तिसरी पिढी सुद्धा आज येथे येत आहे.  बसोलीच्या शिबिरात फक्त नागपूरच नाही तर अगदी गडचिरोली,अहेरी पासून लंडन,अमेरिका येथून सुद्धा मुले येतात. मुलांची चित्रे भलेही सरळ साधी असतील, पण ती बालिश नसतात, ही तळमळ सरांच्या वागण्यातून सदैव व्यक्त होत असते. सरांचे कार्य प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. अनेक पुरस्कारांची श्रीमंती सरांच्या पाठीशी असून सुद्धा लहान मुलांच्या विश्वात ते सहज रमतांना दिसतात. कुठेही पुरस्कारांचे मोठेपण जाणवत नाही. त्यांच्याशी बोलतांना सुद्धा अतिशय आपुलकीने आणि दिलखुलासपणे व्यक्त होतात. 

चित्रकलेपासून होणारा आनंद सार्वजनिक स्वरूपाचा असतो. एकदां चित्र काढून तयार झालें कीं त्यांतील आनंदावर कोणाची सत्ता असूच शकत नाहीं कारण लहान मुलांची चित्रे मोठा आशय घेऊन येतात,ती समजायला पालक,शिक्षक आणि समाज यांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे, त्यांना वेळ दिला पाहिजे हाच सरांचा अट्टहास आहे आणि ह्याचसाठी त्यांचे कार्य सुरू आहे. सरांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. परमेश्वराने त्यांना निरामय आरोग्यप्रदान करावे हीच प्रार्थना आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#आयुष्य_जगणारी_माणसं

Wednesday, June 10, 2020

वैदिक परंपरा जपणारे - आर्वीकर घराणे !!


वेदमूर्ती गोविंदराव आर्वीकर आणि वेदमूर्ती कृष्णा गोविंदराव आर्वीकर. महाराष्ट्रात वेदाध्यापनासोबत भारतीय संस्कृती आणि परंपरा टिकविण्याचे कार्य ज्या व्यक्ती आणि घराणी करीत आहेत त्यात नागपूरातील आर्वीकर घराणे आहे. गेल्या ११ पिढय़ांपासून आर्वीकर घराण्यात वैदिक परंपरा,अध्ययन आणि अध्यापन कार्य सुरू आहे. अनेक हस्तलिखित ग्रंथांचे जतन स्वतः गोविंदराव आणि कृष्णाशास्त्री व त्यांच्या कुटुंबियांनी केले आहे.

वेद हे भारतीय धर्माचे व संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ आहे. 'मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयम्' अशी वेदाची व्याख्या करता येईल. जगातील पहिले साहित्य वेद. वेद हे मानवसृष्टीच्या आधी परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले आणि म्हणूनच ते अनादी आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद यांना वेद अथवा संहिता असे म्हटले जाते. या वेदांचे संहिता,आरण्यके,ब्राह्मणे आणि उपनिषदे असे चार उपविभाग आहेत. यापैकी उपनिषदे ही वेदांच्या शेवटी येतात म्हणून त्यांना 'वेदान्त' असे म्हटले जाते.

वेद हे आर्यधर्माच्या मूलस्थानी आहेत. 'वेदोऽखिलो धर्ममूलम् |' असे मनुवचन प्रसिद्धच आहे. वेदांवरून तत्कालीन आर्य जनांच्या भौतिक उन्नतीची कल्पना येते. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या तीन गोष्टींच्या माध्यमातून आर्यांनी भौतिक उत्कर्ष साधला होता. वेद, स्मृती, सदाचार आणि स्वतःच्या अंतःकरणास जे बरे वाटेल ते,अशी धर्माची चार प्रकारची लक्षणे आहेत. भारतीय आस्तिक दर्शनानी आपापले तत्त्वज्ञान मांडताना वेदांचा आधार घेतला आहे. व्यासांनी वेदांचे प्रवर्तन केले व त्यांच्या शिष्यांनी वेदांचे ग्रहण करून त्यांची परंपरा पुढे चालू ठेवली. हे सर्व शिष्य ज्ञानोपासक होते. वेदांचे अध्ययन करणे, त्यांचे अध्यापन करणे व वेदांचे संरक्षण करणे हे त्यांचे जीवित कार्य होते. 

वेदविद्या ही पोटार्थी विद्या नसून ती एक तपस्या आहे व त्यासाठी त्याग करावा लागतो. त्याशिवाय वेदविद्या येत नाही. कर्मकांडाचे पाच सहा वर्षांत शिक्षण घेता येते. मात्र, वेदांच्या अध्ययनाला कालमर्यादा नाही. आजन्म वेदांचे शिक्षण घेतले तरी ते कमीच आहे, अशी ज्ञाननिष्ठा असण्यासाठी मनोनिग्रहाचे बळ असावे लागते. 

एकाच घराण्यात राज्यस्तरीय महाकवी कालिदास संस्कृत साधना 
‘वेदमूर्ती पुरस्कार’ प्राप्त झाले असून १९६५ मध्ये आजोबा भाऊजी आर्वीकर, त्यानंतर २०१२ मध्ये गोविंदराव आर्वीकर, २०१३ मध्ये ललितशास्त्री आर्वीकर पुढे २०१५ मध्ये कृष्णाशास्त्री आर्वीकर यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आर्वीकर घराण्यातील ह्या सगळ्यांना ‘वेदमूर्ती पुरस्कार’ मिळाल्याने ह्यांच्या त्यागमय जीवनकार्याचा यथोचित सन्मान झाला आहे असेच म्हणता येईल. 

आज घराण्याचा पारंपरिक वारसा आणि संस्कृती जपत गोविंदराव आर्वीकर ह्यांनी वडील भाऊजी आर्वीकर ह्यांच्या छत्रछायेत वयाच्या आठव्या वर्षांपासून ते वयाच्या पंधराव्या वर्षांपर्यंत ऋग्वेद शाकल शाखा वेदाध्ययन,षडंग,याज्ञिकचे अध्ययन केले. तीर्थरूप भाऊजी ह्यांच्या निधनानंतर १९८५ पासून आजतागायत वडिलांच्या प्रेरणेने अध्यापन कार्य सुरू केले व त्यांच्याच कृपेने अखंड आजही सुरू आहे. 

कृष्णाशास्त्री गोविंद आर्वीकर यांनी ऋग्वेद दशग्रंथ आणि कर्मकांड याज्ञिकचे अध्ययन केले आहे. १९७० ते १९७५ पर्यंत घरातच, वैदिकशिरोमणी भाऊजी आर्वीकरांकडे, तर १९७५ ते १९८४ पुण्याला वेदाचार्य विनायकभट्ट घैसास गुरुजींकडे ते शिकले. विद्यावाचस्पती बह्मश्री दत्तमहाराज कवीश्वर यांचेही मार्गदर्शन कृष्णाशास्त्रींना लाभले आहे.

आज अनेक पुरस्काराने सन्मानित असलेले हे घराणे प्रसिद्धीच्या मागे नाही. आजही वेदांचे यम नियम पाळत खऱ्या अर्थाने वेदांचे रक्षण करायचे असेल तर वेदांतील ऋचांचा उच्चार योग्य माणसाने, योग्य वेळी व योग्य परिस्थितीत केल्याने त्यातील खरा अर्थ प्रकट होतो, असे सांगितले जाते. आणि हे आर्वीकर घराण्यात बघायला मिळते. गुरु शिष्य परंपरेने चालत आलेले हे ज्ञान आजवर सांभाळले गेले आहे. कारण आज देवेश्वर हा कृष्णाशास्त्री ह्यांचा मुलगा सुद्धा पूर्णपणे ह्याच मार्गावर आहे. त्याचे ऋग्वेद दशग्रंथाच्या पाठाचे अध्ययन सुरू आहे. अशा वैदिक घराण्याचा नागपूरकरांना अभिमान वाटावा असेच ह्यांचे देवदुर्लभ कार्य सुरू आहे. त्यांच्या कार्याचा असाच उत्तरोत्तर उत्कर्ष व्हावा हीच यज्ञ देवतेच्या चरणी प्रार्थना आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस

#आयुष्य_जगणारी_माणसं

Monday, June 8, 2020

' स्वरसंपदाचे' देणं - डॉ.नारायण मंगरूळकर !! 🎶🎵🎹

डॉ.नारायण मंगरूळकर. आज संगीतातील मर्मज्ञ, स्वरसाधक, उत्तम गायक,समीक्षक,लेखक,बंदिशकार,थोर गुरू असे विविधांगी व्यक्तिमत्त्व असलेले सत्पुरुष आहेत. स्वगृही राहत "स्वरसंपदा" केंद्र स्थापन करत अविरतपणे विद्यादानाचे कार्य ते आजही करत आहेत. जवळपास ९० हुन अधिक बंदिश त्यांनी रचलेल्या आहेत. 'संगीतातील घराणी आणि चरित्रे' हे अतिशय उपयुक्त पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. 

खरंतर शास्त्रीय संगीत हे अभिजात संगीत आहे. भारतीय संस्कृतीत संगीताबद्दल फार प्राचीन व ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. प्राचीन काळी गुरुकुल पध्दतीने किंवा गुरुगृही राहत संगीताची साधना केली जात असे. भारतीय संगीताची निर्मिती ही खूप प्राचीन आहे. सृष्टीच्या सुवर्णमय प्रारंभापासून आतापर्यंत संगीताचे महत्त्व इतिहासाच्या प्रत्येक पानावर विद्यमान असणार आहे कारण संगीताची जादूच जनमानसाला आनंद देणारी आहे. 

डॉ.नारायण मंगरूळकर ह्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी पं.सावळाराम मास्तर यांच्याकडून तालीम घेण्यास सुरुवात केली पुढे पं.शंकरराव सप्रे यांनी त्यांच्यावर संगीताचे संस्कार केले. यानंतर नामांकित गायक पं. राजाभाऊ कोगजे यांच्याकडे ते गायन शिकले. संगीतशास्त्र विजयिनी’ (१९८९), तसेच एकूण १५० संगीत कलावंतांची चरित्रपर माहिती देणारे ‘संगीतातील घराणी आणि चरित्रे’ (१९९२) ही दोन पुस्तके आज नागपूर,अमरावती विद्यापीठ व अ.भा.गांधर्व महाविद्यालय मंडळातर्फे संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासक्रमात मान्यताप्राप्त झाली आहे. विविध स्मरणिका, गौरवांक व विविध वृत्तपत्रे यांमधून संगीतविषयक शंभरांहून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी १९७२ ते १९९० अशी सलग अठरा वर्षे दै. ‘लोकमत’मधून संगीत समीक्षात्मक लेखन केले आहे. नारायणराव यांनी विविध राग-तालांतील सुमारे ९० हुन अधिक बंदिशी रचल्या आहेत. ते नागपूर व अमरावती विद्यापीठांचे संगीत विषयाचे मान्यताप्राप्त मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर वीस हुन अधिक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

आज संगीत क्षेत्रात घराणेशाहीसारख्या परंपरांचे जोखड झुगारून नारायणरावांसारख्या संगीतज्ञांनी नावीण्य, प्रयोगशीलतेची कास धरत उत्तमोत्तम बंदीशी तयार केल्या आहेत. गायन,वादन व नृत्य अशा तिन्ही कलांमधील एक शास्त्रीय प्रकार म्हणजे बंदीश. ख्यालगायकीच्या संदर्भात वापरला जाणारा,‘चीज’ किंवा इंग्रजीत ‘सिंफनी’ म्हणूनही ओळखला जाणारा,असा हा प्रकार आहे. एखादी मैफिली जशी रागांच्या नावाने ओळखली जावी तशी ती बंदीशींच्या वर्णनानेही ओळखली जाते. खरंतर एखाद्या बंदीशकारासाठी त्याची बंदीश म्हणजे मौल्यवान ‘चीज’वस्तू असते. बंदीशी तयार करण्यामागे त्याची प्रचंड मेहनत तर असतेच, शिवाय, अनेक भावना,आठवणी,भूमिका त्याभोवती गुंफलेल्या असतात. आपला खजिना दुसऱ्यांच्या हाती सोपवताना त्यांना अतोनात वेदना होत असतातच पण आनंद ही होत असेलच. नारायणराव ह्यांनी रचलेल्या बंदिशी अनेक शास्त्रीय गायक आपल्या गायकीने मंत्रमुग्ध करतात.

नारायणरावांचा एक सद्गुणी, अगत्यशील, निर्व्यसनी, निरंकरी, चतुरस्त्र कलाकार म्हणून त्यांचा खरा परिचय घडतो. नारायणरावांच वागणं, बोलणं,सत्यता,अगत्य,संगीत कलेला वाहून घेण्याचे जीवनव्रत आहे. नारायणरावांच्या जीवनाची बैठक धार्मिक, अध्यात्मिक, ईश्वरावर, गुरूंवर असणारी श्रद्धा ह्यामुळेच त्यांच्यात वेगळेपण जाणवणारी आहे. आज नारायणराव ह्यांच्याजवळ विद्वात्ता आहे पण त्याचा गर्व नाही. प्रसिध्दी पराङ्गमुख राहत त्यांची संगीत साधना आजही सुरू आहे. आजही नवोदितांना, विद्यार्थ्यांना व्यासपीठावर संधी मिळावी ह्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. आजही तंबोरा घेत रियाज करणारे नारायणराव वयाच्या नव्वदीत असतांना सुद्धा कार्यरत आहे. अनेक पुरस्कारांची श्रीमंती त्यांच्याजवळ असून सुद्धा त्याचा कुठेही ते गर्व करत नाही. सध्या लॉकडाऊन च्या काळात समप्राकृतिक राग या विषयावर फेसबुकच्या माध्यमातून ते आपल्या समोर येत आहेत. प्रसिद्ध निवेदक श्री.किशोर गलांडे हे दिलखुलासपणे त्यांच्याशी संवाद साधत याबद्दल अधिक माहिती पोहोचवत आहेत. त्यात त्यांचा मुलगा जयंत आणि नातू अथर्व आणि खुद्द नारायणराव अशा संगीत क्षेत्राला वाहिलेल्या तीन पिढ्या एकत्रित दिसत आहेत. नारायणरावांना परमेश्वराने उदंड आयुष्य व निरामय आरोग्य प्रदान करावे हीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#आयुष्य_जगणारी_माणसं

Friday, June 5, 2020

ज्ञानभाषेची विदुषी - प्रा.डॉ.लीना रस्तोगी

डॉ.लीना रस्तोगी !! संस्कृत साहित्यिका,व्याख्याता,संत साहित्य अभ्यासिका,अनेक ग्रंथ प्रकाशित सिद्ध लेखिका असल्या तरी विदुषी या शब्दांत यथार्थपणे त्यांच्या कार्याचा गौरव करता येईल.  "मूर्ती लहान कीर्ती महान"अशा लीना ताई आहेत. आज अनेक पुरस्कार प्राप्त असून सुद्धा प्रसिद्ध पराङ्गमुख राहत आजही ज्यांचे नियमित लेखन सुरू आहे. 

संस्कृत ही भाषांची जननी आहे. ती जनभाषा होती हे लक्षात घेऊन तिचे ज्ञानभाषा म्हणून असलेले महत्त्व आजही कायम आहे. भाषा हे निव्वळ अभिव्यक्तीचे साधन नसून ते मनुष्याच्या सामाजिक ओळखीचे एक महत्त्वाचे माध्यम असते. जात,धर्म,देश यांच्याबरोबरीनेच भाषा या संकल्पनेभोवतीदेखील सामूहिक अस्मिता विणली जात असते. संस्कृत ही जगातील सर्वात प्राचीन भाषा आहे. सर्व भारतीय भाषांची जननी म्हणजे संस्कृत भाषा आहे आणि ह्या भाषेच्या प्रचार आणि प्रसार ह्यासाठी लीनाताई आजही तत्पर आहेत. आजही संस्कृत एकांकिका लेखन,त्रिवेणी लेखन अर्थात ललित,वैचारिक,सामाजिक लेखन संस्कृत भाषेतून सुरू आहे. संस्कृत भवितव्यम हे नागपूरातील संस्कृत भाषा प्रचारणी सभेचे मुखपत्र आहे. सतत ६५ वर्षांपासून प्रकाशित होत असलेलं हे, एकमेव वैश्विक संस्कृत साप्ताहिक आहे.सध्याच्या विद्यमान संपादिका म्हणून कार्यरत आहेत. 

आजचे युग हे विज्ञानाच्या चमत्काराचे युग मानले जाते. परंतु वैज्ञानिकांनाही थक्क करून सोडणारा,  तर्कापलीकडचा एक चालता बोलता चमत्कार या विसाव्या शतकातही घडला आहे. आपल्या महाराष्ट्रात घडला आहे. प्रज्ञाचक्षु गुलाबरावमहाराज. लीनाताईंची संस्कृत,मराठी,हिंदी भाषेत गुलाबराव महाराजांवर विपुल ग्रंथसंपदा आहे. 

आज राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषदेत त्या विशेष आमंत्रित असतात. अनेक विश्व विद्यालय,महाविद्यालयात व्याख्याता म्हणून त्यांना आमंत्रित केले जाते,अनेक नाटय एकांकिका त्यांनी संस्कृत मध्ये लिहिल्या आहेत आणि रंगमंचावर त्याचे सादरीकरण सुद्धा झाले आहे. International centre for cultural studies ह्याच्या स्थापनेपासून त्या जुळून आहेत. आजही अनेक व्याख्यान व प्रवचनांसाठी त्यांचा देशभर प्रवास सुरु असतो. संस्कृत व संस्कृती विषयक तीस मराठी ग्रंथ व अनेक संस्कृत ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली आहे. संस्कृत मध्ये नारदीय कीर्तन त्यांनी सादर केले आहे. आजही अनेक संस्कृत व्याकरण कार्यशाळेत त्यांचा विशेष सहभाग असतो. संस्कृत भाषेच्या भवितव्याच्या दृष्टीने त्या सतत कार्यमग्न असतात. सेवा निवृत्ती झाल्यानंतर ही त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना निःशुल्क संस्कृत शिकवत आहे. २००७ पासून गीतावर्ग ही घेत आहेत. गीतेची संथा,अर्थ आणि विश्लेषण करत त्याचे नियमित वर्ग सुरू आहे. आजवर २०० हुन अधिक जण गीता शिकले आहेत आणि त्यातील काहीजण स्वतः गीतावर्ग घेत आहेत.

हिंदू धर्म तत्त्वज्ञानाचा गाभा म्हणून ज्या प्राचीन दशोपनिषदांना मानले जाते ती बहुतेक सर्व इ.स.पू. १००० पर्यंत रचली गेली असावीत. उपनिषदांना जरी वेदांत म्हणजे ‘वेदांचाच शेवटचा भाग’ असे म्हटले जाते तरी ते सयुक्तिक वाटत नाही. कारण यांचा रचना-काळ हा ऋग्वेद रचनेच्या सुरुवातीनंतर सुमारे दीड हजार वर्षांनंतरचा काळ आहे. त्यामुळे त्यांची भाषाही वेगळी आहे.वैदिक साहित्यात उपनिषदे ही सर्वात शेवटी येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’ असेही म्हटले जाते. आज लीना ताईंचा उपनिषदांचा वर्गही सुरू आहे. २०१४ पासून त्यांनी ह्या वर्गाची सुरुवात केली. आतापर्यंत ईश,केन,कठ, प्रश्न,मुंडक,मांडुक्य उपनिषदांचे वर्ग पूर्ण झाले आहेत. आजवर जेवढे उपनिषद ग्रंथ उपलब्ध आहेत त्याचा अन्वय,अर्थ आणि त्यावरील भाष्य लिहून ते प्रकाशित करण्याचे खूप मोठे कार्य सुरू आहे. जवळपास ५ खंडांमध्ये ते प्रकाशित होण्याची शक्यता आहे.  पहिला ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे. बाकी ४ खंडात इतर उपनिषदांचा अन्वय,अर्थ आणि त्यावरील भाष्य ह्याचे कामही पूर्णत्वाच्या दिशेने आहे. 

डॉ.लीना रस्तोगी म्हणजे संस्कृत भाषेला मिळालेले एक मोठे देणं आहे. संस्कृत भाषेतल्या शीघ्र कवी म्हणून त्यांची ओळख यथार्थ होईल. यावयातला त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे. आज त्यांचा संस्कृत संभाषणाचा कायमच आग्रह असतो. त्या म्हणतात की जिभेचा उत्तम व्यायाम म्हणजे संस्कृत उच्चारण आहे. संस्कृत शब्दसंपदेच्या त्या धनी आहेत. खरंतर त्यांना संस्कृत शब्दावलीचा चालताबोलता ज्ञानकोष म्हणणेच यथार्थ ठरेल. अतिशय नम्र,शालीन आपुलकी आणि सहजपणा यामुळे त्या आपल्याला वेगळ्या अशा वाटतच नाही. आज त्यांच्या कार्याचा आलेख बघितला की आपण थक्क होतो. सध्या त्या बंगाली भाषेचा अभ्यास करत आहेत. त्या म्हणतात की,बंगाली भाषा मुळात अतिशय मधुर आहे तर त्यातील साहित्य ही तसेच आहे. मूळ साहित्य वाचनासाठी त्यांचा सध्या बंगाली शिकण्याची तयारी सुरू आहे. आणि पुढे अनेक चांगले साहित्य त्यांच्या अनुवादित पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळतील हा विश्वास वाटतो. प्राकृत ज्ञानभाषा अर्थात संस्कृत भाषा आणि या ज्ञानभाषेची विदुषी हेच संबोधन त्यांना यथार्थपणे लागू होईल. डॉ.लीना रस्तोगी ह्यांना श्री भगवंताने निरामय आरोग्य प्रदान करावे हीच प्रार्थना आहे.

✍️ सर्वेश फडणवीस 

#आयुष्य_जगणारी_माणसं

Wednesday, June 3, 2020

भागवताचार्य श्रीरामपंत जोशी !! 🚩🚩

ह.भ.प.श्रीराम गंगाधरपंत जोशी !! आज हे नाव नागपूर आणि महाराष्ट्रात सर्वदूर परिचित आहे. वारकरी संप्रदायाचा समर्थपणे प्रसार करणारे, संप्रदाय सक्षमपणे पुढे नेणारे आणि संप्रदायाच्या क्षमता ओळखून त्याचा प्रसार, प्रचार करणाऱ्यांमध्ये ह.भ.प.श्रीरामपंत जोशी यांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल. 

ज्ञानदेवें रचिला पाया । उभारीलें देवालया।।
नामा तयाचा किंकर । त्यानें केला हा विस्तार ।।
जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत।।
तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।। 
या अभंगात तुकाराम महाराजांच्या श्रेष्ठ शिष्या संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील भागवत-धर्ममंदिराचा पाया श्री ज्ञानदेवांनी घातला असे निक्षून सांगितले आहे. श्री ज्ञानदेवांनी घातलेल्या भक्कम पायाच्या आधारावर महाराष्ट्र भागवत धर्ममंदिर, ही वारकरी संप्रदायाची इमारत सुदृढ स्थितीत आजही उभी आहे.

महाराष्ट्रात वारकरी आणि वारकरी संप्रदायाला मोठी परंपरा आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये जाती-भेद-धर्माचे पाश तोडून भाविक यामध्ये सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा आहे. प्रत्यकाने तो एकदा तरी अनुभवणं म्हणजे पर्वणीच आणि ह्या वारीबद्दल श्रीरामपंत जोशी महाराजांकडून ऐकणं म्हणजे ब्रह्मानंदाची अनुभूती घेणं असा अनुभव असतो. आज वारकरी संप्रदाय पुढे नेणाऱ्यांमध्ये अनेक संतांनी,महाराजांनी मोलाचा वाटा उचलेला आहे. 

वारकरी संप्रदाय श्री ज्ञानदेवांच्या काळी होता तसाच पवित्र नि तेजसंपन्न आजही आहे. याचे कारण ज्ञानदेवांनी घातलेल्या अतिशय भक्कम व विविधांगी रूपाने तो बघायला मिळतो. आपण जर आस्थेने व श्रद्धेने जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर ज्ञानदेवांनी घातलेल्या या भक्कम पायाची विविध अंगे आपणांस स्फटिकाप्रमाणे स्वच्छ दिसू शकतात. 

ह.भ.प.श्रीरामपंत आपल्या भागवतात नेहमी सांगतात,भक्तीशास्त्रात भगवद्कथेमधे आवड असणे म्हणजेच भक्ती होय. यात भगवंताची कथा प्रेमाने गाणे,प्रेमाने श्रवण करणे या गोष्टीला भक्तीशास्त्रात महत्व आहे. कथा कीर्तनाने भक्तीचे महत्त्व सिद्ध  होते. भगवंताची कथा ही एक कथासंकीर्तनरूपी यज्ञच आहे. कोणतेही साधन म्हणा भगवंताची उपासना स्वतःच्या चित्तशुध्दी करीता करायची असते त्या साधनेचे फळ हरिकथेच्या ठिकाणी ज्याचा खरा प्रेमभाव असेल त्याला प्राप्त होत असते. संत तुकाराम महाराज हे भगवंताच्या कथेची विशेष आवड ठेवणारे होते ते देवाजवळ स्पष्ट म्हणतात,
सांडुनी कीर्तन न करी आणिक काज |
नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगी ||
भगवंताची लीला सांगणारी कथा अर्थात भागवत ही भगवंताला अतिशय आवडणारी भक्ती आहे.आणि आज ह्या भक्तिमार्गावर समाजाला जोडण्याचे कार्य श्रीरामपंत जोशी महाराज करत आहे. 
मला वैयक्तिक रामकृष्ण मठात महाभारत कथेतील विविध पात्र ह्या विषयावर पाच दिवस प्रवचन श्रवण करण्याचा योग आला आहे. 

आज २०० वर्षांपूर्वीच्या नागपूरातील गणेशपेठ भागातील प्राचीन विठ्ठल मंदिरात ३ पिढ्यांपासून त्यांची विट्ठल सेवा सुरू आहे. वारकरी कीर्तन परंपरा त्यांना लाभली आहे. आजही वारकरी कीर्तनासाठी त्यांचा सतत प्रवास सुरु असतो. रामायण आणि भागवत या कथांमध्ये गुजराती आणि उत्तर भारतीय कथाकारांचाच दबदबा पाहायला मिळतो. मात्र, महाराष्ट्रात भागवताचार्य श्रीरामपंत जोशी महाराज यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या ६७ वर्षांपासून त्यांचे ह्या विठ्ठल मंदिरात प्रौष्ठपदी भागवत सुरू आहे. आजही नागपूरात अनेक ठिकाणी त्यांची कथा सुरू असतेच. अनेक सामाजिक उपक्रम ते राबवत असतात. शेगाव येथे ४०० हुन अधिक कीर्तनकारांचे संमेलन,श्री क्षेत्र काशी येथे १०००० वारकऱ्यांसह भव्य ज्ञानेश्वरी पारायणाचे व वारकरी सप्ताहाचे आयोजन त्यांनी केले आहे. अयोध्या येथे श्रीरामजन्मभूमी आंदोलनात एक हजार वारकऱ्यांसह भव्य वारकरी सप्ताहाचे नियोजनही त्यांनी केले होते. अनेक दैनिकात महाराजांनी विपुल लेखन केले आहे. आज पुस्तक रूपाने त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. अनेक सामाजिक संस्थांना ते भागवत कथेतून आर्थिक मदत करत असतात. आज गोपालन, गोरक्षणाचे कार्य ही सुरू आहे. सध्या विश्व हिंदू परिषद,दिल्ली केंद्रीय मार्गदर्शक मंडळावर सदस्य म्हणून आहेत. विश्व वारकरी प्रतिष्ठान च्या मार्गदर्शक मंडळावर आहेत. अनेक सत्कार आणि पुरस्कारांची श्रीमंती महाराजांजवळ असली तरी प्रसिद्धीच्या मागे न लागता ह.भ.प.श्रीरामपंत जोशी महाराजांची भागवत धर्माची पताका घेऊन नित्य वाटचाल सुरू आहे. ह.भ.प.श्रीरामपंत जोशी महाराजांचे कृपाशीर्वाद सदैव असावे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.

✍️ सर्वेश फडणवीस 

#आयुष्य_जगणारी_माणसं

Monday, June 1, 2020

गीतेची गोडी लावणारे - श्री.श्रीनिवास वर्णेकर - सौ.वंदना वर्णेकर

श्री.श्रीनिवास वर्णेकर - सौ.वंदना वर्णेकर !! हे दाम्पत्य भगवद्गीतेची गोडी लावणारे,गीतेचा अभ्यास करणाऱ्या व गीता मुखोद्गत करण्यासाठी कायमच तत्पर असलेले दाम्पत्य आहेत. गीता- वेदांच्या अखेरच्या रचनेतील प्राचीन भारतीय ग्रंथ आहे आणि ह्याचसाठी सद्गुरुंच्या आज्ञेने ह्यांचा नित्य गीता अभ्यास वर्ग सुरू असतो. सात दिवस रोज वेगवेगळ्या ठिकाणी गीता पठण व चिंतन करण्याच्या उद्देशाने त्यांचे वर्ग सतत सुरू असतात. 

भगवद्गीता हा ग्रंथ भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाचा मुकुटमणी आहे. मानवी जीवनाला उत्तुंगतेकडे नेणारे ते एक यथार्थ जीवनदर्शन आहे. गीता हे शास्त्र आहे. गीता हे काव्य आहे. गीता हे तत्त्व आहे. गीता ही विद्या आहे. गीता हा संवाद आहे आणि गीता हे दर्शन आहे. गीता हे नुसते शास्त्र नाही, तर शास्त्रांचेही शास्त्र आणि सकल शास्त्रांचे विश्रांतीस्थान आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला "योगोपनिषद" किंवा "गीतोपनिषद" म्हंटले जाते. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे,ह्याचे मार्गदर्शन करतो. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो आणि त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला मोक्षशास्त्र म्हंटले गेले आहे. 

प्रज्ञाभारती डॉ. श्री.भा.वर्णेकर ह्यांनी आपल्या मुलांवर लहानपणापासून गीतेचे संस्कार केले. पाचवीत असतांना मुलांना गीता पाठांतर करायला सुरुवात केली. त्या वयात जे पाठ होतं ते पुढे कधीही विसरत नाही. त्यामुळे गीतेचे १८ अध्याय श्रीनिवास वर्णेकर व अन्य भावंडांना मुखोद्गत होते. श्री.भा. स्वतः संस्कृत उत्तम जाणणारे होते,अनेक ग्रंथ लेखन त्यांनी केले होते, मुलांनी जेव्हा गीतेचा अर्थ विचारला तेव्हा त्यांनी सांगितले की रोज गीतेचे पाठ करतांना अर्थ तुम्हालाच तुमचा उमजेल आणि तसेच झाले परम श्रद्धेय गोविंददेवगिरी यांच्या गीता साधना शिबिरात गेल्यावर स्वामींजीच्या मुखातून गीतेचा अर्थ समजला आणि हळूहळू पुढे  रोज जनार्दन योगाभ्यासी मंडळात गीतेचा एक श्लोक व त्याचे चिंतन मांडण्याची सूचना आ.राम खांडवे गुरुजींनी दिली आणि आजही संपूर्ण आठवडा त्यांचा याच कार्यासाठी विविध ठिकाणी गीता शिकवण्यासाठी जातो. सौ.वंदना वर्णेकर ह्यांचा सुद्धा स्वतंत्र अभ्यास व चिंतन आहे आणि गीतेबद्दल गोडी त्या निर्माण करत आहेत. त्या म्हणतात की रोज एका श्लोकाचे चिंतन व मनन केले की,जीवन समृद्ध व प्रपंच सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. 

खरंतर गीतेमध्ये ज्ञान आहे,भक्ती आहे, कर्म आहे आणि या सर्वांना जोडणारा विवेक आहे. या तिन्हींच्या समन्वयाचे विवेकदर्शन म्हणजे गीता होय. ज्ञानरसाच्या आनंदोत्सवाने भारलेली गीता प्रासादातील १८ प्रसन्न आणि समृद्ध दालने आहेत. कोणत्याही दालनात प्रवेश करावा आणि ज्ञानाची व आनंदाची अनुभूती घेऊनच तृप्त व्हावे, हेच गीतेचे मोठेपण होय. गीतेची व्याप्ती वैश्विक आहे. तिची शिकवण जातीधर्माच्या बंधनापलीकडील आहे. जगातील सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक ग्रंथांपैकी मानली जाणारी गीता, ही आयुष्याला सत्य आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारी नैतिक दिशादर्शक आहे. गीतेच्या अभ्यासातून मिळणारी शांती आणि भव्यता अतुलनीय आहे. कृष्णाने सांगितलेले पूर्ण सत्य म्हणजेच ही गीता; श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर दिलेले ज्ञान,तत्त्वज्ञान हे सर्व गीतेत उलगडत जाते. आजही गीतेतल्या आध्यात्मिक ज्ञानाने जगभरात लाखो लोकांचे आयुष्य उजळून टाकले आहे. त्यांना एक नवा दृष्टिकोन दिला आहे. 

आज सत्तेची, प्रसिद्धीची, ऐश्वर्याची नशा मनुष्याला एक प्रकारच्या भोवऱ्यात अडकवते आहे. या उलट अध्यात्म मनाला आनंद देतो असतो,ते तुम्हाला फुलवू शकते. तुमच्यातल्या सकारात्मक बाबी खुलवू शकते. म्हणूनच तुमच्या मनाची दिशा यामुळे बदलू शकते. गीता ही आयुष्यात वरची पातळी गाठण्याची पायरी आहे. आत्मपरीक्षण, संयम, ध्यान आणि अर्थातच दया या सगळ्यांमुळे आयुष्य कसे समृद्ध होते याची शिकवण गीता देते. यामुळे एका विचारावरून दुसऱ्या विचाराकडे धावणारे चंचल मन यामुळे शांत होते. ज्यावेळी श्रीनिवास मामांशी ह्याविषयी बोलणे झाले तेव्हा ते म्हणाले, वास्तविक गीतेचे महत्व शब्दांनी वर्णन करता येत नाही कारण हा अत्यंत रहस्यपूर्ण ग्रंथ आहे. प्रत्येकवेळी वाचतांना त्याचे नवनवीन अर्थ प्राप्त होतात. म्हणूनच हजारो वर्षे झाली तरीही त्याची गोडी अवीट आहे. आपले कार्य उत्तरोत्तर सातत्यपूर्ण व्हावे हीच आजच्या निर्जला एकादशीच्या निमित्ताने श्री भगवंताचरणी प्रार्थना. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#आयुष्य_जगणारी_माणसं