Saturday, October 30, 2021

करुणालये मोक्षदानी,भवानी महालक्ष्मी माये ..

करवीर अर्थात कोल्हापूर. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी करवीर निवासिनी महालक्ष्मी अथवा अंबाबाई म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले श्रीमहालक्ष्मी मंदिर म्हणजे करवीर नगरीचा मानबिंदू अशी ओळखच झाली आहे. कोल्हापूर हे देवीक्षेत्र आहे, महालक्ष्मी क्षेत्र आहे. ते करवीर पीठ आहे. या पिठात दत्तात्रेयांना महालक्ष्मी असलेली रेणुका जगदंबा भिक्षा देते आहे.

दिवाळीची चाहूल लागलेली आहे. सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे. दिवाळीत अमावस्या तिथीला लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. आई महालक्ष्मी अर्थात अंबाबाई हिचे एकमेवाद्वितीय विश्वविख्यात मंदिर कोल्हापूर येथे आहे. दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधत आज आपण कोल्हापूर येथील आई अंबाबाईच्या गाभाऱ्यात जाणार आहोत.

श्री महालक्ष्मी मंदिर आणि करवीरनगरी असा उल्लेख अनेक पूराणांमध्ये आढळतो. भारतीय स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विस्तीर्ण जागेतील या मंदिराची वास्तू पश्चिमाभिमुख आहे. साऱ्या मंदिराच्या बांधकामात हवा-प्रकाशाचा मेळ साधण्यासाठी योग्य दिशांचा अभ्यास जाणवतो. तसेच या भूप्रदेशाची भौगोलिक स्थिती ध्यानी घेऊन पर्यावरणाचा अभ्यासही त्या काळच्या अज्ञात स्थापत्य विशारदांनी केल्याचे जाणवते. राजकीय स्थित्यंतरात आलेल्या राज्यकर्त्यांच्या काळात या मंदिराची पुनर्रचना झाली आहे. 

कोल्हापूर शहराच्या मध्यावर असलेल्या महालक्ष्मी मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या बांधकामामध्ये काळ्या-निळ्या पाषाणाचा वापर करण्यात आला आहे. या पाषाणामुळे देवीच्या मंदिराची भव्यता अधिक शोभून दिसते. इ.स. ५५० ते इ.स. ६६० या चालुक्यांच्या शासन काळामध्ये या मंदिराचे बांधकाम केल्याचे शिलालेख आहेत. एकूणच स्थापत्य कलेच्या अविष्कारावरून आणि इतिहासातील दाखल्यांवरून चालुक्य राजा मंगलेशच्या कारकीर्दीमध्ये या मंदिरामध्ये महालक्ष्मीची प्रतिष्ठापना करण्यात आली असल्याचे आढळते. महालक्ष्मी मंदिरात एकूण पाच शिखरे आहेत. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. मूळ मंदिराला जोडून गरूड मंडप उभा आहे. बाराव्या शतकात शिलाहार राजाने महासरस्वती मंदिर,महालक्ष्मीचा प्रदक्षिणामार्ग बांधल्याचेही शिलालेख आहेत. चालुक्यांबरोबरच, राष्ट्रकुट, शिलाहार आणि यादव या राजघराण्यांनी देखील महालक्ष्मीला आराध्य दैवत मानल्याचे दाखले आढळतात. चालुक्‍याच्या काळात मंदिरासमोरील गणपतीची स्थापना झाली. १३व्या शतकात नगारखाना,कचेरीचे बांधकाम तसेच मंदिराच्या आवारात दिपमाळा बांधण्यात आल्या. मंदिराच्या आवारात सध्या सात दिपमाळा अस्तित्वात आहेत. १७ व्या शतकानंतर विविध राजघराण्यातील थोर मंडळींनी या मंदिराला भेटी दिल्या. त्यानंतर दिवसेंदिवस महालक्ष्मीचे भक्त वाढतच गेले आणि अंबाबाई अवघ्या महाराष्ट्राची आज आद्यदेवता बनली आहे. 

महालक्ष्मी मंदिराच्या सभोवताली भव्य दगडी तटबंदी उभारलेली असून, त्याच्या चारही बाजूस भली मोठी प्रवेशद्वारे असल्याने येथे येणे-जाणे सोयीचे आहे. त्यातील पश्चिमेकडील दरवाजास महाद्वार तर उत्तर दरवाजा म्हणजे घाटी दरवाजा म्हणून ओळखला जातो. उर्वरित दरवाजे पूर्व तसेच दक्षिण दिशेला आहेत. कोणत्याही दरवाजाने प्रवेश केल्यावर मंदिर सभोवतालच्या चौफेर प्रांगणात आपण येतो. मंदिराच्या दर्शनी भागी येताच मंदिर वास्तूची भव्यता आणि प्रमाणबद्धपणासह तेथील सुबकता नजरेत भरते. मंदिराचा बाहेरील भाग मूळ मंदिर उभारणीनंतर जोडला असला तरी मंदिरातील गर्भगृह आणि सभामंडप प्राचीनकाळचे आहेत. तसेच देवालयाची रचना तीन गाभाऱ्यांत विभागली आहे. सुमारे २६,००० चौ. फूट क्षेत्रावरील मंदिर जमिनीपासून तसे उंचावर आहे. सर्व मंदिर वास्तू म्हणजे जागोजागी उत्कृष्ट शिल्पकलेचा आविष्कार आपल्या नजरेत भरणारा आहे. भक्कम, काळ्या, पाषाणांच्या अनेक शिळांवर शिल्पकाम, नक्षीकाम करून मंदिर सौंदर्य शिल्पे बघत राहावे असेच आहे. दोन मजली मंदिर वास्तू तर भव्य आहेच, परंतु संपूर्ण मंदिरावरती अनेक देखण्या मूर्तीची कलाकृती वाखाणण्यासारखी आहे. मंदिर बाह्य़ भिंतीवरील शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना सादर करताना शिल्पकारांनी सजावटीच्या कोंदणात उभारलेल्या स्त्रियांच्या विविध मूर्तीच्या भावमुद्रा खूपच सजीव व सहजसुंदर भासतात. 

पहिल्या-दुसऱ्या मजल्याच्या बाहेरील बाजूस आणि मंदिर शिखर शिल्पाचे कोरीव काम पाहताना पुन्हा एकदा शिल्पकारांच्या दूर दृष्टीचा प्रत्यय येतो. मजल्यावरील दगडी महिरपी आणि त्याच्यावरील नक्षीकाम बघतांना कमीत कमी जागेतील प्रमाणबद्धपणा निश्चितच जाणवते. मंदिराच्या बाहेरील बाजूस नवग्रह,विष्णू,दत्त,तुळजाभवानी,विठ्ठल,राधाकृष्ण, हनुमंत यांच्या सुबक मूर्तीनी मंदिराची शान वाढवली आहे. मंदिर शिखर आणि कळसाची रचना मंदिराच्या भव्यतेला साजेशी आहे.

गाभाऱ्यातील महालक्ष्मी देवीची मूर्ती रत्नशिलेची असून ती तीन फूट उंच आहे. चबुतऱ्यावरील ही देखणी मूर्ती चतुर्भुज असून तिच्या वरच्या उजव्या हाती गदा तर डाव्या हाती ढोल,खालील उजव्या हातात म्हाळुंग (महालुंग) व डाव्या हातात मानपत्र आहे. देवीच्या मस्तकी उत्तराभिमुख लिंग असून पार्श्वभागी नागफणा आहे. तिचे वाहन सिंह आहे. कोल्हापूरची आई महालक्ष्मीची मूर्ती दुर्गेच्या स्वरूपातील (warrior God) म्हणून दुर्गेचे रूप असावे असं वाटतं. आपण महालक्ष्मीची प्रतिमा बघितली तर जिच्या दोन्ही हातात कमळ, एक हात योग मुद्रा आणि एक हात अभय मुद्रेत कमळावर बसलेली दाखवलेली जाते. त्यामुळे कोल्हापूरची आई अंबाबाई हे नामाभिधान योग्य वाटतं. वर्षांनुवर्षे होत असलेल्या अभिषेकामुळे मूर्ती पाषाणाची झीज होत आहे त्यामुळे आता व्यवस्थित काळजी घेतली जाते आहे.

महालक्ष्मी दर्शनासाठी वर्षभर भक्तांचा ओघ सतत सुरू असतो. मंदिरामध्ये दररोज विविध विधी केले जातात. त्यामध्ये भल्या पहाटे काकड आरतीने सुरूवात होते. सकाळी महापूजेनंतर महालक्ष्मीला नैवेद्य दाखवला जातो. दुपारची अलंकारपूजा झाल्यानंतर संध्याकाळी देवीची धूप आरती करण्यात येते. सर्वात शेवटी रात्री देवीच्या विश्रांतीसाठी शेजआरती होते. महालक्ष्मी मंदिरामध्ये दरवर्षी तीन महत्त्वाचे उत्सव होतात. त्यामध्ये पहिला एप्रिल महिन्यातील रथोत्सव हा एक महत्वाचा उत्सव आहे. देवीची गावात रथामधून मिरवणूक काढण्यात येते.नवरात्रोत्सवही परंपरागत सुरू आहे. 

आई महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात होणारा किरणोत्सव म्हणजे वास्तुकलेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. महालक्ष्मी मंदिरात ठरावीक सहा दिवस अनुभवायला येणारा किरणोत्सव म्हणजे आमच्या पूर्वजांनी दिशासाधनाद्वारे साधलेला अलौकिक,देवदुर्लभ चमत्कारच आहे .जगाचा तारणहार सूर्यनारायण भूतलावरच्या आई जगदंबेच्या दर्शनासाठी किती आतुर आणि उत्सुक आहे याची प्रचीती या किरणोत्सवप्रसंगी येते. कार्तिक महिन्यात म्हणजेच ९, १०,११ नोव्हेंबर आणि माघ महिन्यात ३१ जानेवारी आणि १, २ फेब्रुवारी या ठरावीक दिवसातच या किरणोत्सवाचा अनोखा अनुभव आपणास घेता येतो. दिवसभरात तेजाने तळपणारा सूर्यनारायण सूर्यास्तसमयी पश्चिम दिशेकडे मार्गक्रमण करतो, तेव्हा त्याची तेजस्वी सूर्यकिरणे क्रमाक्रमाने महालक्ष्मी देवीचे चरण, नंतर मूर्तीच्या मध्यभागी आणि अखेरीस काही वेळात मुखमंडलासह महालक्ष्मी देवीचे सर्वांग उजळून टाकतो. गाभाऱ्यातील हे क्षण अनुभवायला मिळणे हे हजारो वर्षांपूर्वी ही असामान्य कलाकृती निर्माण करणारे शिल्पकार किती प्रतिभासंपन्न होते याची साक्ष देत आहे. 

महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला जाण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर व इतर महत्त्वाच्या शहरांमधून राज्य परिवहन मंडळाच्या थेट बस आहेत. मुंबई ते कोल्हापूर हे अंतर बसने ३७६ किमी असून, रेल्वेचा प्रवास ४६५ किमीचा आहे. मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून दररोज महालक्ष्मी एक्स्प्रेस सुटते. महालक्ष्मी एक्स्प्रेस पुणे-सांगली मार्गे कोल्हापूरला जाते.

करवीर निवासिनी आई अंबाबाई भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येणारी आहे. आई अंबाबाई तुम्हाआम्हा सर्वांवर सदैव कृपा करो हीच तिच्याचरणी प्रार्थना आहे. विष्णुदास महाराजांनी रचलेल्या आरतीतील शब्द जगतजननी अंबाबाई चे वर्णन यथार्थ दर्शवणारे आहेत..ते म्हणतात,

अदिक्षीरसागर रहिवासी । जय जय कोल्हापुरवासी । अंबे भुवनत्रयी भ्रमसि । सदानिज वैकुंठी वससी । दुर्लभ दर्शन अमरांसी । पावती कशी मग इतरासी । करुणालये मोक्षदानी । भक्त जे परम जाणती वर्म । सदा पदी नरम । कृपेने त्याची सदुपाये । संकटी रक्षिसी लवलाहे ।।

जय जय नदिपती प्रिय तनये । भवानी महालक्ष्मी माये ।।

✍️ सर्वेश फडणवीस 

योगेश्वरी नाम त्रिभुवन विख्याते !!

विश्वव्यापीनी,सकलसौभाग्यकल्याणी आई रेणुकेच्या गाभाऱ्यात आपण मागच्या आठवड्यात गेलो. आई रेणुकेचे दर्शन घेत आपण माहूर गडावरून सरळ नांदेड-लातूर मार्गाने अंबाजोगाई स्थानावर येतो. भगवती योगेश्वरीचे हे स्थान अतिशय प्राचीन तर आहेच; त्याचबरोबर अनेक राजवंश व त्यांच्या राजवटीची तेथील इतिहासाची ओळख करून देणारे आहे. आजपर्यंत जे शिलालेख आणि उत्कीर्ण लेख उपलब्ध झाले त्यामधून चालुक्य, मंगळवेढ्याचे कलचुरी आणि देवगिरीचे यादव या राजघराण्याच्या उपलब्ध इतिहासात आजही या मंदिराची साक्ष देत हे चिरपुरातन मंदिर दिमाखात उभे आहे. 

महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात जयंती (जयवंती) नदीच्या काठी वसलेले एक गाव म्हणजे अंबाजोगाई. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहुरची रेणुका ही आदिशक्तीची पूर्ण पीठे, तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे पीठ. काही लोकांच्या मते अंबाजोगाईची योगेश्वरी हे अर्धे पीठ आहे. मराठीचे आद्य कवी, 'विवेकसिंधु' कर्ते मुकुंदराज आणि दासोपंतांचा अधिवास लाभलेले हे जागृत स्थान आहे. 

अंबाजोगाई हे देवीस्थान आहे. या स्थानाशी देवीभक्त व देवी उपासक मोठ्या प्रमाणावर संबंधित आहेत. अनेकांची योगेश्वरी कुलदेवता आहे. भूचरनाथ हे नाव देवी उपासकांचे परंपरादर्शक आहे. ‘नाथ’ पदान्त देवी उपासकांच्या ज्या ज्या परंपरा आहेत, त्यापैकी भूचरनाथ एक आहे. अंबादेवी परंपरेतील गुरुशिष्य शके १०६६ मध्ये अंबाजोगाईला होऊन गेले. तसेच ‘योगेश्वरी माहात्म्य’ नावाच्या स्थल पुराणातही बुटीनाथादि सिद्धांच्या ज्या कथा आहेत, त्या पाहता ‘नाथ’ पदान्त अंबादेवी उपासकांचे व तपस्वी सत्पुरुषाचे हे स्थान होते हे स्पष्ट होते. अंबाजोगाई नावाने हे स्थान आज प्रसिद्ध असले तरी स्थल माहात्म्यकार मात्र जो उल्लेख करतात तो महत्त्वाचा आहे. स्थलमाहात्म्यकार ‘योगेश्वरी माहात्म्य’ शीर्षकाने आपल्या ग्रंथाचा उल्लेख करतात तसेच प्रचलित नावदेखील ‘अंबाजोगाई’ असे आहे. जोगाई म्हणजे योगिनी.

 अंबाजोगाईच्या मध्यातून वाहणाऱ्या जयंती (जयवंती) नदीच्या पश्चिम तीरावर पुराणकाळापासून योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर असून मुख्य मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिर परिसरात दक्षिणाभिमुख महाद्वारातून प्रवेश केल्यावर समोरची दीपमाळ दिसते. पूर्वाभिमुख द्वारातून मंदिरात प्रवेश करताच मुख्य मंदिराचा उंचच उंच कळस व चार लहान कळस, मुख्य मंदिराच्या शिखरांवर विविध मूर्ती,आकृत्या दिसतात. मुख्य मंदिरात पूर्व-पश्चिम व उत्तरेस द्वारे असून पश्चिमेचे द्वार भांडारगृहाकडून असल्याने ते बंदच असते. भक्त पूर्वेकडून किंवा उत्तरेकडून मुख्य मंदिरात प्रवेश करतात. मुख्य मंदिराचा गाभारा आणि त्याची दगडी हेमाडपंती रचना अत्यंत भक्कम व सुबक

आहे. मुख्य गाभाऱ्यातील उत्तराभिमुख असलेल्या योगेश्वरीचा ओंकाराकृती भव्य शेंदरी तांदळा अत्यंत प्रसन्न तरीही किंचित भयंकर जाणवतो. दैत्याचे निर्दालन व सृजनांचे रक्षण करण्यासाठी अवतरलेली योगिनी उग्र असूनही सुहास्यवदना अशी भासते. मुख्य गाभाऱ्यातील उजव्या बाजूस कुलस्वामिनी तुळजाभवानीचे दर्शन होते. सभामंडपातून गणपती, केशवराज, देवीची भोगमूर्ती, महादेव इ.चे दर्शन घेऊन उत्तरद्वारातून बाहेर पडताच समोर भलेमोठे होमकुंड आहे. होमकुंडावरच मुख्य मंदिराच्या समोर भव्य असा सभामंडप आहे.

मंदिराच्या पराकोटास पूर्व-पश्चिम व उत्तर बाजूने दरवाजे आहेत. सभामंडपात नगारखान्याकडे जाण्याच्या मार्गावर दंतासुराची प्रतिमा (शिर)दिसते. भक्तांच्या सोयीसाठी ओवऱ्या बांधलेल्या आहेत. नैऋत्य दिशेतील ओवरीत रेणुकामातेची मूर्ती दिसते. मोराची ओवरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ओवरीत ‘श्रीकृष्णदयार्णवांनी हरीवरदा' हा ग्रंथ लिहिताना वास्तव्य केले होते. मंदिराच्या उत्तरेकडील द्वारातून बाहेर पडल्यानंतर समोर दीपमाळ व त्यापलीकडे सर्वेश्वर तीर्थ दिसते. या तीर्थावर पश्चिमेस रुद्र भैरव व महारुद्र मंदिरे आहेत. तटबंदीच्या पश्चिम दारातून बाहेर पडताच जवळच मायामोचन तीर्थ दिसते. या तीर्थाजवळ काळभैरव, अग्निभैरव, महारुद्र, गणेश आणि नारदेश्वर यांची लहान मंदिरे आहेत. या तीर्थाजवळूनच सर्वज्ञ दासोपंत व आद्य कवी मुकुंदराज यांच्या समाधीकडे जाण्याचा रस्ता आहे.

भगवतीच्या आठही दिशांना एकेक योगिनी विराजमान असते. अशा आठ आहेत. प्रथमा ते पौर्णिमेसह १५ व अधिक एक अशा १६ योगिनी अमृतकलेसह शोभायमान असतात. पण योगिनी ६४ योगिनीची दिव्यरूपता त्यांच्या ज्योतिमयतेतून सुगंधासह पाझरत असते व ही रूपता भगवतीच्या केशकलापावर अशा तर्‍हेने आकृतिमान असतात. हळूहळू त्याची रूपबंधता शिखररूपात झळाळत असते. हिंदू मंदिराला शिखर असते व शिखरासह हिंदू देवदेवतांचे मंदिर पाहिले की शिखराला वंदन करण्यास आपण हात जोडतो. शिखराची निर्मिती भगवतीच्या मस्तकावरील सुगंधित परिमळासह ज्योतिरूपात असलेल्या योगिनीतून झालेली आहे. सुगंध व ज्योत असे हे दृश्य आहे. याचीच खूण म्हणजे हिंदू परंपरेतील स्त्री आपल्या मस्तकावरील केसांना पुष्पाने शोभा देते. आपल्या डोक्यावरील केसांना गजरा व पुष्पांनी शोभायमान करण्याची हिंदू स्त्रीची पद्धत आहे व विश्वातील समस्त स्त्री वर्गात पुष्पांनी शोभा आणणारी हिंदू परंपरेत आढळते. मस्तकावरील केसांचे सौंदर्य भगवतीच्या शिखररूप सुगंधित ज्योतिमय योगिनीचे आहे. अशा योगिनींच्या आकृतिबंध (श्री यंत्रमय) समूहात भगवती योगेश्वरी जगदंबा विराजमान आहे. ती षोडशी त्रिपुरा आहे. रत्नांनी लखलखणारी, तेजाने तळपणारी, प्रकाशाने प्रज्वलित ज्योतिरूप योगिनींच्यासह पुष्पांनी सुशोभित, अंगप्रत्यंगातून सुगंध परिमळाची ही अमृता, ही श्रीपाद श्री वल्लभेश्वरी, ही शिवा, ही शिवाची पार्वती देवदेवेश्वरी समस्त योग्यांची कुमारी योगेश्वरी आपल्या ६४ योगिनींसह अंबादेवी, अंबाजोगाई दर्शनास आलेल्या वधूवरांसह समस्त भक्तांना सुख देण्यास तत्पर आहे. अंबाजोगाईला गेल्यावर योगेश्वरी चे दर्शन घेताना आरतीतील शब्द गुणगुणताना आपणही म्हणू लागतो, 

अनंत रूप शक्ती तुझ योग्य माते।

योगेश्वरी नाम त्रिभुवन विख्याते।।

व्यापक सकळा देही अनंत गुण भरिते।

निळकंठ ओवाळू कैवल्य माते।।

जय देवी जय देवी जय योगेश्वरी।

महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी।।

जय देवी जय देवी…

सर्वेश फडणवीस 

Tuesday, October 26, 2021

आदीमाय तु तुझीच माया । पसरे या भुवनी

मळवट लेपन तुझेच चिंतन मूर्ती तव नयनी

आदीमाय तु तुझीच माया । पसरे या भुवनी

सत्यरूप तव मजला दावुनी, भवबाधा ना सुनी

विकास करण्या झणी मुक्ती दे। जीवन फळयोनी ।।

सणवार असले की सगळीकडे आनंदी, प्रसन्न वातावरण असतं. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अशा हिंदूंच्या मुख्य धार्मिक सणांमध्ये म्हटल्या जाणा-या आरत्या या त्या-त्या सणांचं महत्त्व आणि उत्साह द्विगुणीत करतात. आरती म्हणताना सर्वानी त्यातील अर्थ समजून घेऊन ती मनोभावे म्हटली, तर ती देवापर्यंत पोहोचते असा मानवी समज आहे. खरंतर आर्ततेने देवांची स्तुती करण्यासाठी केलेलं गायन म्हणजे आरती. अनेकदा आरती करतांना ज्या देवतेची त्यात स्तुती केली असते तिचे रूपच साक्षात डोळ्यांसमोर येते. आरतीचे वेगळेपण अद्भुत असेच आहे. अशीच माहूरगड निवासिनीं आई रेणुकेची पारंपरिक आरती नवरात्र पर्वकाळात म्हणतांना साक्षात रेणुकेचे दर्शन होते. विकासानंद नाथांनी केलेली ही आरती म्हणजे साक्षात माहूर निवासिनी रेणुकेच्या गाभाऱ्यातील मूर्तीचे दर्शन नकळत होते. 

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची रेणुकामाता आहे. आई रेणुका ही महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाची कुळदेवी आहे. माहूरगड हे एक जागृत तीर्थ क्षेत्र आहे. माहूरनगरी प्रत्येक युगात वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध होती. कृतयुगात त्यास आमलीग्राम, त्रेतायुगात सिद्धपूर, द्वापारयुगात देवनगर आणि कलीयुगात मातापूर म्हणजेच माहूर या नावाने ओळखले जाते. माहूरला मातापूर म्हणताना एक घटना कारणीभूत आहे, ती अशी की ब्रम्हा,विष्णू आणि महेशाने महासती अनसूयेच्या सतीतेजाला प्रसन्न होऊन माहूर येथील अत्री-अनसूया आश्रमामध्ये अनसूयेची बालके झाली. अशा त-हेने महासती अनसूया तिन्ही देवांची माता झाली म्हणूनही मातापूर म्हणून याचे माहात्म्य सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहे. कुठल्याही शास्त्र, पुराणाचा दाखला घेऊन रेणूका मातेचे माहात्म्य, चरित्रस्मरण केल्यास मातेच्या अलौकिक तेजाचे गुणवर्णन आपणास ऐकावयास मिळते. आदिशक्तीचा संपूर्ण पृथ्वीवर पूर्णरूपाने वास सह्याद्री पर्वतावरील मातापूर म्हणजेच माहूरगडावर आहे.

सर्व देवी-देवता, ऋषी-मुनी, गंधर्व, किन्नर, तपस्वी आणि प्रत्यक्ष ब्रम्हा, विष्णू, महेश यांचेसह जगत्वंद्य श्री दत्तात्रेय यांचा नित्य वास माहूर गडावर आहे. ह्या भूमीला कोरी भूमी म्हणतात. म्हणजे अत्यंत शुचिर्भूत, कशाचीही बाधा न झालेली अशी रेणूका नगरी पुण्यनगरी आहे. 

पृथ्वीच्या पाठीवर एवढे दिव्य आणि परमपावन स्थान कोठेच नाही. सर्व तीर्थाहून अत्याधिक साक्षात्कारी,जागृत स्थान म्हणूनही आपल्या विश्वव्यापी तेजाने झळकत आहे. कारण ब्रम्हांडातील आद्यशक्ती, विश्वमोहिनी, विश्वव्यापिनी, देवमाता, सकल कल्याणी,मुक्तीदायिनी माहूरगडावर आजही वास करून आहे आणि आपल्या निस्सीम भक्तास साक्षात्कार दाखवून दर्शनाचा लाभ देत आहे. 

देवांचा वास असलेल्या रेणुकानगरी माहूर गडावर आपण जेव्हा प्रवेश करतो, तेव्हा सर्वप्रथम आदिशक्ती रेणूकेची स्तुतीसुमने गातअसलेल्या वृक्ष-वेली, निर्झर, पशु-पक्षी हिरव्यागार मायेच्या पदराखाली सुखात राहणारे दरी-डोंगरे पाहिले की तत्काळ आत्मशुद्धी होऊन रेणूकेचरणी नतमस्तक होण्यास मन आतूर होते. सह्याद्री शिखरावर ही निसर्गदेवता अनादी काळापासून येथे वास करून आहे. ह्या निसर्ग देवतेने रेणूकेच्या कृपेने ह्या सह्याद्री पर्वतावर सर्वच देवी-देवता, ऋषी- मुनी, संत-महंत यांना आपल्यात सामावून रेणूकेला प्रणिपात केला आहे. आपल्या मातेच्या घरी तिच्या कृपा सावलीमध्ये हे सर्वच देवी-देवता, ऋषी-मुनी, तपस्वी नित्य वास करीत रेणूकेची अर्चना-उपासना आणि स्तुती करीत आहे. आई रेणूकेच्या दर्शनाभिलाषेने येणाऱ्या प्रत्येकांवर हे स्थान कृपादृष्टी ठेवून आहे.

पहाटे प्रथम प्रहरी सूर्य आपल्या पहिल्या किरणांनी आपल्या तेजाने रेणूकेस अभिवादन करतो. तद्नंतर विश्व कल्याणाच्या कार्याकडे वळतो. सूर्याच्या पहिल्या किरणांनी सह्याद्री गडावरील निसर्गदेवता तेजाने न्हाऊन निघते आणि पशु-पक्षी आपली पहाटेची भूपाळी गाऊन स्वरांजली अर्पण करतात. दऱ्या खोऱ्यातून वाहणारे निर्झर ताल धरू लागतात. सूर्याच्या ह्या पहिल्या किरणाबरोबर सर्व तीर्थादी तीर्थांनी शुचिभुर्त होऊन सह्याद्री शिखरावर वास करीत असलेले ऋषी-मुनी, देवगणही देवीची प्रार्थना करू लागतात. हिरव्यागार वनदेवतेवर सूर्य जेव्हा रेणूका दर्शनानंतर आपली सोनेरी किरणे पसरू लागतो, तेव्हा मात्र ही सद्गुणी वनदेवता हिरव्यागार शालुवर अनेक रूपी सुवर्ण भुषणे घालून रेणूका भक्तांच्या स्वागताला सज्ज होते. 

गडावर कमलमुखी रेणूकेचे सुंदर कमलाकार मंदिर आहे. हे मंदिर अनादि काळापासून येथे असावे,असे सांगण्यात येते. शालिवाहन कालीन ह्या मंदिराचा विस्तार इ.स. १६२४ च्या सुमारास केला आहे. हे मंदिर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार उभारले गेले आहे. दक्षिणाभिमुख चांदीने मढविलेल्या प्रवेशद्वारातून आपण जेव्हा प्रत्यक्ष रेणूकेच्या मंदिरात

प्रवेश करतो. पूर्वाभिमुख असलेला रेणूकेच्या तांदळास्वरूप तेजः पुंज मुखकमलाचे दर्शन आपणास होते, तेव्हा अत्यंत चित्ताकर्षक तेजोमय देवीचे मुखकमलन आपले चित्त केद्रित करते. भक्तांकडे कृपादृष्टी टाकणारे सुवर्णनयन, रक्तवर्ण सिंदुरचर्चित मुखावरील शोभा ही अवर्णनीय आहे. डोक्यावर चांदीचा टोप रेणूकेने परिधान केला आहे. हिरवे पितांबर नेसल्याने ती अधिक मंगलमूर्ती दिसते. विविध सुवर्णाभुषणे तिने परिधान केली आहेत.

भाळी मळवट लावलेला असून, मुखामध्ये तांबुल रंगलेला आहे. हजारो सूर्याचे तेज तिच्या मुखावर प्रकटलेले आहे. तीचे दर्शन घेतांना अत्यंत चित्तवेधक-भेदक नजर सरळ आपल्या हृदयामध्ये जाते.रेणकेचे भव्य मुखकमल पाहताक्षणी तिच्या पराक्रमाचे, शौर्याचे।महन्मंगल रूप प्रत्यक्ष आपणासमोर उभे राहते. 

सभामंडपात पुत्र परशुराम गणेश रूपात थांबला आहे. असे सौभाग्यक्षणी रेणुकेचे रूप आपल्या मनात घर करून राहते. देवीच्या अगदी जवळ परशुरामाची मूर्ती आहे. रेणूकेच्या मंदिराभोवती अनेक देवी-देवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मंदिराच्या जवळच जमदग्नीचे स्थान म्हणून एक शिवलिंग आहे. ह्या शिवलिंगाचे दर्शन करून मगच रेणूकेचे दर्शन करावे, असा शिरस्ता येथे आहे. मंदिराच्या दक्षिणेस उत्तराभिमुख टुमदार तुळजाभवानीचे मंदिर आहे, तर अलीकडे पूर्वाभिमुख महालक्ष्मीचे मंदिर आहे. दक्षिणेला गडाच्या पायथ्याजवळ परशुरामाचे स्वतंत्र मंदिर आहे. 

इथे जाण्यासाठी नागपूर, अमरावती, अकोला, नांदेड, किनवट, यवतमाळ आणि पुसद येथून महाराष्ट्राच्या राज्य परिवहनच्या बसेस आहेत. मुंबई वरून जाण्यासाठी रेल्वेने नांदेडपर्यंत यायचे नंतर बस किंवा टॅक्सीने माहूर जायचे. इथे भाविकांना राहण्यासाठी सोय आहेत. लॉज, हॉटेल, शासकीय विश्रामगृहे, भक्त निवास देखील उपलब्ध आहेत.

पृथ्वीवर प्रकट होण्यापूर्वी आदिशक्ती रेणूकेने जे महन्मंगल स्वरुप, परम पावन तेज यासोबतच सर्वच दिव्यगुणांनी युक्त असे रूप धारण केले, ते माहूर गडावर एकमेवाव्दितीय असे आहे. म्हणूनच संत विष्णूदास म्हणतात, 

सव्यभागि दत्त-अत्रि वामभागि कालिका ।

धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ॥

✍️ सर्वेश फडणवीस


गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी !!


श्रीमद आदि शंकराचार्य यांचे भवानीअष्टक आणि त्यातील प्रत्येक श्लोकातील शेवटचे चरण म्हणजे गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. याचा अर्थ आई तूच माझा आधार आहेस,आश्रय आहेस,रक्षण करणारी आहेस. खरंतर मंदिर आणि मूर्ती हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. भारतातील काही प्राचीन मंदिरे आणि नव्याने उभारली जाणारी मंदिरे जनसामान्यांच्या श्रद्धेची ठिकाणे आहेत. मंदिरे अनेकांच्या आकांक्षाना वाव देत असतात, ती भक्तांना दर्शनासाठी असतात, कलाकारांच्या कलेला ती उंची प्रदान करणारी असतात. मंदिरे उंचच उंच शिखरांची व कलासमृद्ध असतील तर ते बघतांनाही आश्चर्य वाटते. ती डोळा भरून पाहावीत,अभ्यासावीत. कारण ती भक्तांना दिलासा देतात, पांथस्थांना सावली देतात, संन्याशांना विसावा देतात,वानप्रस्थींना आसरा देतात, कलाकारांना चेतना देतात, भक्तांना ऊर्जा देतात, वाट चुकलेल्यांना मार्गावर आणतात, कोणाला रसिकाची दृष्टी देतात तर कोणाला पौरुष शिकवितात,नास्तिकांना डोळस करतात, तर आस्तिकांना अस्तित्वाची जाणीव करून देतात. अशी ही मंदिर डोळाभरून बघावीत. अशाच काही मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आजपासून जाणार आहोत. 

मंदिराच्या गाभाऱ्यात म्हणजे गर्भगृहात आत जायचे असते. गर्भगृह ही संज्ञा मानवी शरीररचनेला सूचित करते. येथून प्रत्यक्ष जीवाचा उद्भव होतो. सृष्टीला चालना देणारे परमात्म्याच्या रूपातील परमोच्च तत्त्व तेथे वास करून असते. मन स्थिर राहण्यासाठी,श्रद्धेला अवकाश प्राप्त होण्यासाठी,अहंकार गळून पडण्यासाठी, आपण मंदिरात जातो आणि तिथे गेल्यावर त्या देवतेपुढे नतमस्तक होत असतो.तेथील अक्षय्य ऊर्जा घेत गाभाऱ्यातून आपण बाहेर पडतो.

आदिशक्तीचे जागर पर्व अर्थात घट नवरात्राची सुरुवात झाली आहे. या जागर पर्वात आज आपण महाराष्ट्रातील साडे तीन पीठापैकी एक पूर्ण पीठ असलेले श्री तुळजाभवानी आईच्या दर्शनार्थ जाणार आहोत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवस्थान आहे. तुळजापूरची आई भवानी हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत. वर्षांतून एकदा तरी तुळजापूरला जायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं ही प्रथा कित्येक घरांमध्ये आजही नेमाने सुरू आहे. 

आई तुळजाभवानीच्या दर्शनार्थ येणाऱ्या भक्तांना फक्त तुळजाभवानीचे मंदिर आणि परिसर अशा काही ठरावीक गोष्टीच माहीत असतात. परंतु यापलीकडे जाऊन पाहिल्यास तुळजापूर येथे अनेक अशा प्रथा- परंपरा जपलेल्या आहेत, त्या ऐकल्यानंतर नवीन माणसाला त्याविषयी नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. खरंतर साडेतीन शक्ती पीठांपैकी फक्त श्री तुळजाभवानीची मूर्ती तिच्या जागेवरून सहजपणे काढता येते व तेवढय़ाच सहजपणे पुन्हा जागेवर बसवता येते. त्यामुळे वर्षांतून तीन वेळा म्हणजे भाद्रपद वद्य अष्टमी, आश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीच्या मूर्तीला सिंहासनावरून काढून पलंगावर झोपविले जाते. ज्याला देवीचा निद्राकाल म्हणतात. घोरनिद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा या नावाने चालणारा देवीचा निद्राकाल आजही तेवढय़ाच परंपरेने जोपासला जातो. अन्य कुठल्याही देवतेला या प्रकारे सहजपणे उचलून झोपविण्याची पद्धत बघायला मिळत नाही.

श्री तुळजाभवानीचे पहाटेचे चरणतीर्थ, सकाळ व सायंकाळची महापूजा तसेच रात्रीची प्रक्षाळपूजा व इतर प्रत्यक्षात ज्या पूजा होत असतात, त्या वेळी देवीला प्रत्यक्ष स्पर्श करण्याचा अधिकार मात्र फक्त पानेरी मठाचे महंत व सोळाआणे कदम पुजारी या घराण्यातील स्त्री- पुरुषांना आहे. यांच्याव्यतिरिक्त कुणीही असला तरी तो देवीच्या मूर्तीला स्पर्श करू शकत नाही. श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीबाबतचा एक अस्सल पुरावा तुळजापूर तालुक्यातील काटी येथील शिलालेखात सापडतो. या शिलालेखात तुळजाभवानीची मूर्ती स्वत: स्थापित केल्याचा उल्लेख या शिलालेखात असून सदरचा शिलालेख हा शके १३२० म्हणजे इ. स. १३९८ चा असून परसराम गोसावी याने ही मूर्ती दिल्याचा उल्लेख यात आहे. शिलालेखाला अस्सल पुराव्याचे स्थान देण्यात येते हे महत्त्वाचे आहे. शक्तिपीठाची निर्मिती हा विषय महत्त्वाचा असल्याने अनेक पुराणात तुळजाभवानीच्या नावाचा उल्लेख आलेला आहे.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजाभवानीचे स्थान वरचे असून छत्रपती शिवरायांच्या भोसले घराण्यासह अनेकांची ती कुलदेवता आहे. तुळजाभवानीची मूर्ती ही चल मूर्ती असून काळ्याभोर गंडकी पाषाणातून बनविलेली ही मूर्ती साधारणपणे २x३.१५ इंच आकाराची अष्टभूजा मूर्ती असून मंदिरातील गाभाऱ्यात सिंहासनावरील एका खाचेत बसविली जाते. मूर्तीला सिंहासनावरील खाचीत बसविण्याकरिता दीड फूट लांबीचा क्रुस मूर्तीच्या खालच्या बाजूला असून मूर्ती घट्ट बसावी म्हणून मेण बसविले जाते. याकरिता मूर्तीच्या खालच्या बाजूला ६’’ लांबीचा क्रूस ठेवलेला आहे. त्यामुळे तुळजाभवानीची मूर्ती बाहेर काढून प्रत्यक्ष विधीकरिता वापरली जाते. 

साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूर प्रथा-परंपरा, पूजाअर्चा याबाबतीतच नव्हे तर देवीची मूर्ती अशा सर्वच बाबतीतली भिन्नता आहे. माहूरला मूर्तीऐवजी तांदळा आहे तर वणीला एका मोठय़ा दगडावर देवी प्रतिमा शिल्पांकन करण्यात आलेली आहे. मूर्तिशास्त्रानुसार कोल्हापूर आणि तुळजापूरच्या मूर्तीत काही प्रमाणात साम्य असले तरी तुळजाभवानीची मूर्ती पूर्णत: चलमूर्ती म्हणजे उत्सवाला बाहेर काढून परत त्याच ठिकाणी बसविली जाते.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूरची श्री तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही पूर्ण पीठं तर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ म्हणून परिचित आहे. तुळजाभवानी ही महिषासूरमर्दिनी असल्याने तिला वीरांची देवता म्हटलं जातं. त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले कुळाची ती कुलदेवता असल्याने तुळजाभवानीला विशेष महत्त्व प्राप्त झालं. म्हणूनच कदाचित कोल्हापूर, माहूर आणि वणीच्या मंदिरात तुळजाभवानीचं मंदिर आहे. त्याप्रमाणे तुळजाभवानी मंदिर परिसरात इतर तीन शक्तिपीठांचा समावेश करण्यात आलेला नाही. 

तुळजाभवानी म्हणजे भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणारी ती त्वरिता! त्वरितावरूनच तुळजापूर नामाभिधान तयार झालं. तुळजाभवानीचं शारदीय आणि शाकंभरी असे दोन नवरात्र महोत्सव असून या उत्सवापूर्वी देवाला मूळ स्थानावरून उचलून शयनगृहात झोपविलं जातं. याला देवीचा निद्राकाल म्हणतात. देवीच्या निद्राकालाची परंपरा शतकानुशतकं आजही कायम आहे. एवढंच नाही तर दसऱ्याचं सीमोल्लंघन साजरं करण्याकरिता देवीला एका विशिष्ट पालखीत बसवून मिरविलं जातं.

तुळजाभवानीची पूजाअर्चा करण्याचं काम वर्षभर स्थानिक पुजारी करत असले तरी पालखी आणण्याचा मान नगरजवळील भिंगारच्या भगत घराण्याकडे आहे. निद्राकालावधीत देवी ज्या पलंगावर झोपतात तो पलंग अहमदनगरमधील पलंगे नावाच्या तेली घराण्याकडून दिला जातो. देवीच्या शिरावर मुकुट बसविण्यापूर्वी देवीच्या मस्तकी पानाची चुंबळ करावी लागते. ते पान पुरविण्याची जबाबदारी एका तांबोळी नामक मुस्लिम घराची आहे. हे तांबोळी घराणे नवरात्रीत आपल्या घरी परंपरेने घटस्थापनासुद्धा करते. त्यानुसार मंदिरातील अनेक कामे परंपरेने एकाच घराण्याकडे अखंडपणे चालत आलेली आहेत. जाधव घराणे नगारा वाजविण्याचे काम करते. कदम घराण्यातील घरे घंटी वाजवितात. न्हावी समाजाकडे सनई-चौघडा वाजविण्याचे काम आहे. याप्रमाणे प्रत्येक जाती-धर्माला इथं परंपरेनं सेवेचा अधिकार आहे.

भक्तांनी लाखोचे दान देणारी तुळजाभवानी पहिला नैवेद्य हा भाजीभाकरीचा ग्रहण करते. तो उपरकर घराण्याकडून येतो. तुळजाभवानीच्या सेवेत खंड पडू नये म्हणून अनेक सेवेकरी रात्रंदिवस झटत असतात. त्यातही एक विशेष सेवा म्हणजे तुळजाभवानीला उन्हाळय़ात उकाडा लागू नये म्हणून पलंगे सलग तीन महिने आई तुळजाभवानीला वारा घालतात. या सोबतच चैत्रशुद्ध बलिप्रतिपदेपासून ते मृगाच्या आगमनापर्यंत दररोज दुपारी देवीला नैवेद्यात सरबत दिले जाते. 

मंदिराची मूळ बांधणी किल्लेवजा असून तुळजाभवानी मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील आहे. निजाम राजवटीपासून तुळजाभवानी मंदिरात संस्थानची निर्मिती झाली असून उस्मानाबाद जिल्ह्याचे कलेक्टर त्याचे प्रमुख आहेत. मंदिराचा कारभार सरकारी यंत्रणेकडे असला तरी प्रत्यक्ष देवीची पूजा अर्चा कदम घराण्यातील १६ घरांकडे आहे. 

तुळजापुरात देवीच्या सेवेत सर्व जातीधर्माना स्थान आहे. देवीच्या नैवेद्यात मांसाहार, तर येथील काळभैरवाला नैवेद्यानंतर गांजाची चिलीम तोंडात दिली जाते. याशिवाय अख्खे गावही अनेक परंपरा पाळते. तुळजाभवानी म्हणजे शाक्त संप्रदायाशी निगडित असल्याने तिच्या प्रथापरंपराही काही वेगळय़ाच असणार आणि त्यानुसार देवीच्या नावाने गोंधळ घालणे आलेच. कुळधर्म म्हणून अनेक कुटुंबात देवीच्या नावाने गोंधळ घालण्यात येतो. 

तुळजापूर देवस्थान सोलापूर पासून ४५ किमी, उस्मानाबाद पासून २२ किमी, लातूर पासून ७७ किमी व नळदुर्ग पासून ३२ किमी आहे. सोलापूर व उस्मानाबाद येथे रेल्वे स्टेशन आहे. तसेच लातूर, सोलापूर, उस्मानाबाद व नळदुर्ग येथून तुळजापूरला एस टी बसची सुविधा आहे. तुळजाभवानी मंदिर बस स्थानकापासून पश्चिम बाजूस ५०० मीटर च्या अंतरावर आहे.

श्रीतुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी त्यामुळे ज्याप्रमाणे आई सर्वाना सामावून घेते त्याप्रमाणे इथे गुढीपाडवा, होळी, रंगपंचमी असे सर्वच सण साजरे होतात. एवढेच नव्हे तर वैष्णवांचा गोपालकालाही आषाढी एकादशीला इथं साजरा होतो. गुढीसोबतच सर्व राष्ट्रीय सणाला मंदिरावर राष्ट्रध्वजही फडकविण्याची परंपरा इथं कायम आहे. या प्रमाणपरंपरेला प्राचीन इतिहास आहे. बदलत्या जगात आजही त्याचे मनोभावे पालन केले जाते. तुळजाभवानीच्या मंदिरातील  प्रथापरंपरा अगदी निर्विघ्नपणे पुढे चालू आहेत. मातृत्व ही परमोच्च भावना आहे प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक अवस्थेत आपण तिच्यासमोर नतमस्तकच व्हायला हवे म्हणूनच म्हणावेसे वाटते.. 

उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो 

उदोकारे गर्जती कार महिमा वर्णू तिचा हो.. 

सर्वेश फडणवीस




Wednesday, October 13, 2021

कर्तृत्वशालिनी - मेजर दिव्या अजित कुमार !!

भारतीय लष्करातील मेजर दिव्या अजित कुमार भारतीय लष्कराच्या इतिहासात तलवारीचा सन्मान मिळवणाऱ्या पहिल्या महिला कॅडेट आहेत.चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (ओटीए) मध्ये त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर - स्वॉर्ड ऑफ ऑनर प्राप्त करणाऱ्या पहिली महिला कॅडेट बनल्या आहेत.

भारतीय लष्करी अधिकारी मेजर दिव्या अजित कुमार यांना सैन्यदलात जाण्याची ओढ होती. चेन्नईमधील मध्यम वर्गीय कुटुंबात त्यांचे लहानपण गेले. मेजर दिव्या महाविद्यालयीन जीवनात एनसीसीमध्ये सक्रियपणे सहभागी होत्या. त्यांनी एनसीसीमध्ये बेस्ट कॅडेट म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आणि प्रजासत्ताक दिनाच्या वेळी त्यांनी आपल्या ट्रूपच्या संचलनाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या नेतृत्व कौशल्यांमुळे त्यांना अखिल भारतीय एनसीसी गर्ल्स कंटिनेंट कमांडर म्हणून देखील निवडले गेले आणि 'ऑल इंडिया बेस्ट परेड कमांडर' चा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिला महिला भारतीय आहेत.

मेजर दिव्या अजित कुमार यांना २०१० मध्ये आर्मी कॉर्प्समध्ये कमिशन देण्यात आले. त्यांनी काही काळ ओटीए चेन्नई येथे प्रशिक्षक म्हणून काम केले आणि संयुक्त राष्ट्र मिशनचा एक भाग म्हणून दक्षिण सुदानलाही गेल्या. मेजर दिव्या यांना नोकरी व्यतिरिक्त खेळांमध्ये खूप रस आहे. त्यांना बास्केटबॉल मध्ये सहभागी होणे आणि विविध विषयांवर चर्चा करायला आवडतं. त्या प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आणि तालवाद्याचे त्यांना ज्ञान आहे.

भारतीय लष्करातील आव्हानांविषयी मेजर दिव्या म्हणतात,
“ भारतीय लष्करात कुठलाही भेदभाव होत नाही. मिळालेल्या संधीला आव्हान म्हणून घेतले आणि जर एक मुलगी म्हणून मी ते करू शकते, तर प्रत्येक इतर मुलगी ते करू शकते. फक्त स्वप्नांचे अनुसरण करणे महत्त्वाचे आहे. ” स्वप्नांचा पाठलाग करण्याच्या जिद्दीने त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. मेजर दिव्या अजित कुमार यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहेत.

✍️ सर्वेश फडणवीस

#कर्तृत्वशालिनी #नवरात्र #लेख८

Tuesday, October 12, 2021

कर्तृत्वशालिनी - मेजर मिताली मधुमिता

मेजर मिताली मधुमिता हे नाव अनेकांना अपरिचित असेच आहे. पण भारतीय लष्करात शौर्य पदक प्राप्त करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. शौर्य पदक देशासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या सैनिकांना दिले जाते. खरंतर हा सन्मान सैन्य दलातील असाधारण शौर्य किंवा बलिदानासाठी दिला जातो. 

फेब्रुवारी २०१० सालची ही घटना आहे. मेजर मिताली मधुमिता, अफगाणिस्तानमधील काबूल येथे संयुक्त राष्ट्राच्या मिशनवर होत्या. काबूलमधील कार्य करतांना आपल्या इतर सहकाऱ्यांची सुरक्षा तपासणे ही त्यांची प्राथमिकता होती. जेव्हा त्या आपल्या ड्युटीवर तैनात होत्या तेव्हा एक दिवस भारतीय दूतावास येथील परिस्थिती विषयी त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही, तेव्हा मेजर मधुमिता यांनी इतर सहकाऱ्यांना फोन केला, तेव्हा त्यांना समजले की, काबूलमधील भारतीय दूतावासावर आत्मघातकी बॉम्ब हल्ला झाला आहे. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आपले कर्तव्य बजावले. घटनास्थळी त्यांना आढळून आले की आपले इतर सहकारी जखमी झाले आहेत. गोळ्या उडत आहेत आणि ग्रेनेड स्फोट होत आहेत. त्यांनी त्यांचे कर्तव्य म्हणून जे प्रशिक्षण दिले होते ते केले, लोकांना सोडवण्यासाठी निःशस्त्र उडी मारली, दूतावासात अडकलेल्या भारतीयांसह इतर अनेकांचे प्राण त्यांनी वाचवले आणि वैद्यकीय मदतीसाठी तत्काळ स्थानिक मदत गोळा केली.

कर्तव्याच्या आवाहनापलीकडे धैर्य आणि शौर्याचे हे निखळ प्रदर्शन करणाऱ्या पहिल्या शौर्य पदकाने सन्मानित मेजर मिताली मधूमिता आहेत, मेजर मधुमिता यांना शौर्यासाठी सेना पदक देऊन सन्मानित करण्यात आले, जो पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या पहिली महिला ठरल्या आहेत. आजपर्यंत हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या एकमेव महिला राहिल्या आहे. 

ओरिसामधील शिक्षकी  कुटुंबातून आलेल्या मेजर मधुमिता या लहानपणापासून मदतीला तत्पर होत्या. कुटुंबातून मिळालेले हे संस्कार त्यांना त्या परिस्थितीत कामी आले. मेजर मधुमिता यांच्या आईची इच्छा होती की त्यांनी आईप्रमाणे शिक्षिका व्हावे, परंतु त्यांनी लष्करात जायचे पक्के ठरवले होते आणि पुढे २००० साली त्यांनी प्रवेश घेतला. मेजर  मधुमिता जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारताच्या संवेदनशील भागात देखील काहीकाळ तैनात होत्या. जेव्हा त्यांना कायमस्वरूपी कमिशनची विनंती नाकारण्यात आली तेव्हा त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. कारण त्यांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत प्रवेश मिळाला होता, ज्यामुळे लष्करी अधिकारी ५ ते १५ वर्षांच्या कालावधीसाठी काम करू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने लेफ्टनंट कर्नल मधुमिताच्या बाजूने निर्णय देईपर्यंत (त्यांचा रँक वाढला होता) त्यांनी ती लढाई शेवटपर्यंत लढली.

त्या म्हणतात, “भारत एक महान देश आहे, मला भारतीय असल्याचा खूप अभिमान आहे. आम्ही सैनिक म्हणून आम्ही आमचे कर्तव्य करतो ते शक्य तितके चांगले करतो आणि आम्ही येथे सर्व वेळ राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आहोत, जेणेकरून तुम्ही शांतपणे सर्व वेळ विश्रांती घेऊ शकाल. ”

✍️ सर्वेश फडणवीस 

#कर्तृत्वशालिनी #नवरात्र #लेख७

Monday, October 11, 2021

कर्तृत्वशालिनी - फ्लाईंग कॅडेट अवनी चतुर्वेदी, भावना कांथ आणि मोहना सिंग

आपण नेहमीच म्हणत आलोय की स्त्रिया या पुरूषांपेक्षा कुठल्याही प्रकारे कमी नाहीत. त्यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने हे सिद्धही करून दाखवलंय. २१ व्या शतकात महिला पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत असताना लढाऊ विमान एकटीने चालवत फ्लाईंग कॅडेट अवनी चतुर्वेदी, भावना कांथ आणि मोहना सिंग यांनी एक नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे. फ्लाईंग कॅडेट अवनी चतुर्वेदी,भावना कांथ आणि मोहना सिंग या तिघींची भारताच्या इतिहासात नोंद झाली आहे. या तिघींची भारताच्या पहिल्या 'फायटर पायलट' म्हणजेच 'लढाऊ वैमानिक' महिला म्हणून निवड झाली आहे. नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते "नारी शक्ती सन्मानाने"त्यांना गौरविण्यात आले आहे. 

पक्षांप्रमाणे आकाशात भरारी घेणं हे अवनी चतुर्वेदीचं वेड होतं आणि लहानपणापासून तिने बघितलेलं स्वप्न पूर्ण झालं आहे. आपल्या पुरुष सहकाऱ्यांसोबत हकिमपेठ मध्ये असलेल्या इंडियन एअर फोर्सच्या बेसमध्ये या तिघींनी ट्रेनिंग घेतले आहे. ज्या पद्धतीचे ट्रेनिंग पुरुष पायलट याना दिली जाते तेच ट्रेनिंग मिळाले आहे. केवळ महिला आहोत, म्हणून कोणतीही सूट दिली गेली नाही आणि आपल्या सरंक्षण दलाचे हे वेगळेपण कायमच आवडून जाते. 

 अवनी चतुर्वेदी ही दिल्लीची २७ वर्षीय नौदल अधिकारी लढाऊ विमान एकटीने चालवणारी पहिली महिला लढाऊ विमान पायलट ठरली आहे. "मिग-२१ बायसन" नावाचे लढाऊ विमान अवनीने गुजरातमधील जामनगर भारतीय वायूसेनेच्या तळावरून चालवले आहे. अवनी चतुर्वेदी सोबतच भावना कांथ आणि मोहना सिंग यांची जून २०१६ मध्ये लढाऊ विमानाच्या नौदल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. सगळ्यानी आपले एकेरी लढाऊ विमान उड्डाण केले आहे. 

पहिल्या विमान उड्डाणासाठी या प्रत्येकीला हवाई दलाकडून प्रशिक्षण देण्यात आले तसेच हवाई दलातील प्रशिक्षकांसह दोन आसनी जेट विमानामध्ये प्रशिक्षित करण्यात आले आहे. लढाऊ विमान उड्डाणाचे मुलभूत प्रशिक्षण घेतल्यानंतर हकिमपेठ येथे किरण लढाऊ जेट्सवरदेखील सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यानंतर बिदर वायूदल येथे हॉक एडव्हान्स ट्रेनर जेट्सवरही एका वर्षाचे प्रशिक्षण घेतले आहे.

 शत्रूच्या सीमेत विमान कोसळले आणि युद्धबंदी म्हणून पकडल्या गेल्या तरी त्या डगमगणार नाहीत. पुरुष लढाऊ वैमानिकांच्या युद्धकाळातील हिमतीचे कौतुक होते, हे कौतुक आपल्याही वाट्याला येणार याची त्यांना खात्री आहे, कारण त्यांनीही खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्याही मनात तीच जिद्द आणि तोच लढाऊ बाणा आहे. नुकताच त्यांनी प्रवेश घेतला असल्याने त्या या क्षेत्रात आजही कार्यरत आहेत. 

बिहारच्या भावना कांत, राजस्थान च्या मोहना सिंग आणि मध्य प्रदेशच्या अवनी चतुर्वेदी या तिघी तरुण-उमद्या महिला वैमानिक हवाई दलाच्या फायटर स्क्वॉड्रनमध्ये तैनात आहे. मोहना सिंग यांना हवाई दलाची पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही वायुसेनेत वैमानिक होते. ते युद्धसामग्रीवाहक विमानांचे वैमानिक होते. आज तिसऱ्या पिढीच्या मोहना यांनी एक पाऊल पुढे टाकत लढाऊ विमानांची जॉयस्टिक हाती घेतली आहे आणि त्याबद्दल ती कौतुकास पात्र आहे. 

विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिवंगत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी महिलांसाठी 'फायटर एअरक्राफ्ट' ची संधी महिलांना उपलब्ध करून दिली आहे. फ्लाईंग कॅडेट अवनी चतुर्वेदी, भावना कांथ आणि मोहाना सिंग यांनी या सुवर्ण संधीचे सोने केले. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून सदिच्छा आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#कर्तृत्वशालिनी #नवरात्र #लेख६


Sunday, October 10, 2021

कर्तृत्वशालिनी - फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना

१९९९ चे कारगिल युध्द, ८० डिग्री चढाई असलेले सतरा हजार फूटांचे बर्फाच्छादित डोंगरकडे, उणे बत्तीस अंश तापमान,पाठीवर वीस किलो वजनाची युध्दसामुग्री, रात्रीच्या निबिड अंध:कारात करावी लागणारी इंच इंच चढाई. कधी चढाई दोरखंडावरून तर कधी निसरड्या बर्फावरून! एकीकडे डोंगरमाथ्यावर ठाण मांडून बसलेल्या शत्रुकडून अहर्निश होणारा बॉम्बवर्षाव तर दुसरीकडून बोफोर्सगन्समधून शत्रुवर डागल्या जाणाऱ्या तोफगोळ्यांचा भडिमार! 'छोडो मत उनको' म्हणत बंदुकांच्या ट्रिगरवरील बोटही न काढता शेवटच्या श्वासापर्यंत लढून कोसळणारे सहकारी! अत्युच्च बलिदान देणारे हे भारतीय लष्करातील तेजोनिधी अर्थात आपले लढवय्ये शिपाई होते त्यात वायुदलाचे नेतृत्व करत होत्या फ्लाईट लेफ्टिनेंट गुंजन सक्सेना. 

फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना युद्धात जाणाऱ्या पहिल्या महिला भारतीय वायुसेनेच्या अधिकारी आहेत. १९९४ मध्ये त्यांनी वायुसेनेत प्रवेश केला. २५ महिलांच्या गटात त्या होत्या. महिला हवाई दलाच्या प्रशिक्षणार्थींची ही पहिली तुकडी होती. १३२ फॉरवर्ड एरिया कंट्रोलचा भाग म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग उधमपूर एअर फोर्स कॅम्पमध्ये होती. तिथे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. ८ वर्षे सेवा केल्यानंतर २००४ मध्ये त्यांचा हेलिकॉप्टर पायलट म्हणून कार्यकाळ संपला. गुंजन सक्सेना आता निवृत्त झाल्या आहेत. त्यांची खरी ओळख "कारगिल गर्ल " या नावाने देखील आहे. गुंजन सक्सेना यांना साहसासाठी शौर्य पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी शौर्याने दाखवून दिले की, महिलाना युध्द भूमीवर देखील स्वतःचे कर्तृत्व सिध्द करता येते.  

१९७५ मध्ये एका मध्यमवर्गीय आर्मी कुटुंबात जन्माला आलेल्या गुंजन नेहमीच हुशार आणि महत्वाकांक्षी होत्या. गुंजन सक्सेना यांचे वडील लेफ्टनंट कर्नल अनुप कुमार सक्सेना आणि भाऊ लेफ्टनंट कर्नल अंशुमन सक्सेना हे दोघेही भारतीय लष्करात सेवा करत असल्याने सैन्यदलात जाण्याचे त्यांच्याकडून निश्चित होते. पुढे हंसराज कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सफदरगंज फ्लाइंग क्लबमध्ये त्या जात असत. भारतीय वायुसेनेत पहिल्यांदा महिला वैमानिकांची भर्ती करण्यात आली आणि त्यावेळी एसएसबी परीक्षा पास करत वायूदलात त्यांनी प्रवेश घेतला. वायूदलात महिलांनी भर्ती होणे सोपे नव्हते. मात्र त्यांच्या बॅचच्या महिलांनी वायूदलात विमान उडवत इतिहास रचला. 

१९९९ च्या कारगिल युध्दा दरम्यान त्यांनी चीता हॅलिकॉप्टर उडवले होते. पाकिस्तानी सैनिक मिसाइल लाँचरद्वारे हल्ला करत होते. गुंजन यांच्या हॅलिकॉप्टरवर देखील मिसाइल हल्ला करण्यात आला होता मात्र त्या थोडक्यात बचावल्या. अनेक जखमी सैनिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम त्या करत होत्या.कारगिल युद्धात फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवले होते. लढाऊ विमान उडवणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. दरम्यान कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर निशाणा साधण्यात येत होता. त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं होते.

त्यांच्या मुलाखतीत त्या म्हणतात, भारतीय लष्कराच्या जखमी सैनिकांना बाहेर काढणे हे युद्धाच्या दरम्यान सर्वात जास्त प्रेरणा देणारे आहे. अपघातग्रस्त सैनिकांना युद्धभूमीवरून बाहेर काढताना तुम्हाला धीर आणि संयम या दोन्ही गोष्टींचे मोल समजते. जेव्हा तुम्ही सैनिकांचा जीव वाचवता तेव्हा खूप समाधानकारक भावना असते कारण देशभक्तीची जाणीव प्रत्यक्षात युद्धभूमीवर जाणवते. त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. पेंगविन इंडिया प्रकाशित "द कारगिल गर्ल" हे आत्मचरित्र मुळातून वाचनीय आणि संग्रही असावे असेच आहे. देशभक्तीचे संस्कार घरातून मिळाले तर अनेक गुंजन सक्सेना सैन्यदलात येतील हाच विश्वास वाटतो. फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#कर्तृत्वशालिनी #नवरात्र #लेख५

Saturday, October 9, 2021

कर्तृत्वशालिनी - कॅप्टन रुची शर्मा (निवृत्त)

भारतीय लष्करात महिला स्वयंस्फूर्तीने प्रवेश घेण्यास उत्सुक आहेत. त्याने सैन्यदलाची शक्ती नक्कीच वाढते आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महिलांनी स्वतःच्या संपूर्ण समर्पण आणि कौशल्याने अनेकांची मने जिंकून घेतली आहे पण आलेल्या  संधीचे सोनं करण्याची ताकद त्यांच्यात आहे असं वाटतं. काही वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती,लष्करात महिलांची संख्या कमी होती त्यातही जिद्द आणि चिकाटीने त्यांनी परिस्थितीवर मात केली आणि स्वतःच्या कर्तृत्वाने यशस्वी कारकीर्द पूर्ण केली. आज ज्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोंत त्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला पॅराट्रूपर कॅप्टन रुची शर्मा आहे. 

कॅप्टन(निवृत्त) रुची शर्मा. खरंतर कॅप्टन रुची शर्मा यांचा प्रवास १९९६ मध्ये सुरु झाला जेव्हा त्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये कमिशन मिळाल्याने त्या देशातील पहिल्या महिला ऑपरेशनल पॅराट्रूपर बनल्या आहे. ऑपरेशनल पॅराट्रूपर एक लष्करी पॅराशूटिस्ट आहे ज्यांना पॅराशूट घातलेल्या विमानातून उडी मारण्याचे प्रशिक्षण दिले जाते. आकाशात विशिष्ट अंतरावरून पॅराशूटच्या साह्याने उडी मारण्याचे कार्य पॅराट्रूपर करतात म्हणजेच ते एखाद्या विशिष्ट ठिकाणी उतरतात. पॅराट्रूपर यांचा सहसा युद्धांदरम्यान सरप्राईज हल्ल्यांमध्ये विशेष सहभाग असतो. 

कॅप्टन रुची शर्मा सशस्त्र दलातील कुटुंबातून आल्या आहे.त्यांचे वडील भारतीय लष्करात अधिकारी होते त्यामुळे शिस्तीचे वातावरण घरात होते. देशासाठी काही तरी करण्याचे बाळकडू त्यांना लहानपणापासून मिळाले. महिलांना फक्त डॉक्टर आणि परिचारिका म्हणून सैन्यात कमिशन मिळू शकते हे त्या जाणून होत्या पण त्यांना पॅराट्रूपर म्हणून कार्य करायचे होते.पुढे कमिशन मिळाल्यापर्यंत,भारतीय सैन्यात इतर सेवांमध्ये त्यांचा सहभाग होता आणि त्यावेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर, जिथे सर्व कारवाई होत असे, तिथे त्या आघाडीवर होत्या परंतु महिलांना लढाऊ भूमिका घेण्याची परवानगी नव्हती. परंतु आता बरेच बदल झाले आहे. स्वप्नवत वाटावे अशीच त्यांची वाटचाल आहे. कॅ.रुची शर्मा यांना नेहमीच असे वाटत होते की पॅराट्रूपर्सची स्वतःची एक आभा असते आणि त्यामुळे त्यांनी लीगमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करत प्रशिक्षण पूर्ण करत त्यांची ऑपरेशनल पॅराट्रूपर म्हणून पुढे निवड झाली.

ऑपरेशनल पॅराट्रूपर होण्याच्या आव्हानांबद्दल रुची शर्मा म्हणतात की, ऑपरेशनल जवानांना अनेकदा शत्रूच्या रेषेच्या पलीकडे सोडले जाते आणि त्यांना आत्मनिर्भरता आणि इतर पैलूंवर प्रशिक्षण दिले जाते कारण त्यांना तासनतास चालावे लागते. निश्चित पोहोचण्याचे ठिकाण माहिती नसते, अतिशय खडतर प्रशिक्षणाला सामोरं जावं लागतं आणि त्यातून ऑपरेशनल पॅराट्रूपरची निवड होते. सुरुवातीला त्यांना वाटले की हे कठीण काम आहे. पण यामुळे त्यांना सर्वोत्तम काम करण्यास प्रेरणा मिळाली. प्रशिक्षणादरम्यान पाठीवर १० किलो भार घेऊन ४० किमी धावावे लागले. शारीरिक श्रमाची पराकाष्ठा न करता प्रशिक्षण पूर्ण झाले. कॅप्टन रुची शर्मा यांची पहिली उडी १९९७ मध्ये होती आणि त्यांनतर २००३ मध्ये वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी निवृत्ती स्वीकारली. 

कॅप्टन रुची शर्मा यांनी निवृत्तीनंतर अनेक महिलांना आपल्या देशाची सेवा करण्यास प्रवृत्त केले आहे आणि सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी लष्करी शाळेत प्राचार्य म्हणून काही काळ सेवा दिली आहे. तरुणांना सैन्यदलात भरती होण्यासाठी मार्गदर्शक म्हणून त्या सदैव तयार असतात. भारताच्या राष्ट्रपतींकडून कॅप्टन रुची शर्मा याना गौरविण्यात आले आहे. त्या तरुणांना सांगतात,जेव्हा तुमच्याकडे राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची तीव्र भावना असते, तेव्हा ऑलिव्ह ग्रीन युनिफॉर्म मध्ये आणि देशाची सेवा करणे यापेक्षा अधिक योग्य काहीही असू शकत नाही. कॅप्टन रुची शर्मा यांच्या भावी वाटचालीस सदिच्छा आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#कर्तृत्वशालिनी #नवरात्र #लेख४





Friday, October 8, 2021

कर्तृत्वशालिनी - सर्जन रीअर ऍडमिरल शीला सामंता मथाई


 ‘शं नो वरुण:’ या घोषवाक्याने भारतीय नौसेनेची जगाला ओळख आहे. अर्थात वरूण (पर्जन्य देवता) आमच्यावर सदा प्रसन्न राहो आणि याच कल्याणाची कामना करणारी भारतीय नौसेना अविरत कार्य करते आहे. आज याच नौसेनेतील अधिकारी सर्जन रीअर ऍडमिरल शीला सामंता मथाई यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. नौदलात ३६ वर्षांहून अधिक काळ सेवा आणि भारतीय नौदलात या पदावर जाणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

सर्जन रीअर ऍडमिरल शीला सामंता मथाई यांनी १९८५ मध्ये भारतीय नौदलात प्रवेश केला. पुण्याच्या प्रतिष्ठित सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले,त्यांना त्यावेळी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून कलिंग ट्रॉफी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी बालरोगशास्त्रात एमडी केले आणि मुंबई विद्यापीठातून नियोनेटोलॉजीमध्ये डीएम केले. २००३ साली यूके येथील कॉमनवेल्थ व्हिजिटिंग फेलोशिप देण्यात आली आहे आणि २०१४ मध्ये फाउंडेशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च ची फेलोशिपही बहाल करण्यात आली आहे. 

आज बालरोगतज्ञ म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पोर्ट ब्लेअर आणि गोवा येथील नौदल रुग्णालयांमध्ये बालरोग विभाग आणि मुंबई आणि पुण्यातील सेवा आणि छावणी रुग्णालयांमध्ये नवजात अतिदक्षता विभाग सुरू केला आहे. त्यांचा प्रवास म्हणावा तसा सोपा नाहीच. प्राध्यापक आणि विभागप्रमुख - बालरोग, एएफएमसी, पुणे, संचालक आणि डीन, इन्स्टिट्यूट ऑफ नेवल मेडिसिन, मुंबई आणि कमांड मेडिकल ऑफिसर - ईस्टर्न नेव्हल कमांड विशाखापट्टणम या प्रतिष्ठित पदांवर त्यांनी काम केले आहे. 

ऍडमिरल शीला सामंता मथाई भारतीय नौदलातील सर्वात वरिष्ठ सेवा करणाऱ्या महिला अधिकारी आहेत आणि सध्या वेस्टर्न नेव्हल कमांडच्या कमांड मेडिकल ऑफिसर पदावर त्या कार्यरत आहेत. यातील विशेष कार्यासाठी १९९३ मध्ये नौदल प्रमुख प्रशंसा, २०१२ मध्ये विशिष्ठ सेवा पदक आणि २०२१ मध्ये नौसेना पदक त्यांना देण्यात आले आहे.

संरक्षण कुटुंबातील पार्श्वभूमी असल्याने, ऍडमिरल मथाई यांनी कलकत्यातील लॉरेटो स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. वडील आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये नामांकित सर्जन म्हणून काम करत होते. आयुष्याच्या सुरुवातीलाच पालकत्व गमावल्यामुळे त्यांना दिवंगत वडिलांच्या पाऊलावर चालण्याची  प्रेरणा मिळाली आणि सशस्त्र दलात करिअर करण्यासाठी त्यांनी पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि पुढे मागे वळून पाहिले नाही. पुढे त्यांचे लग्न केएमएस हॉस्पिटल, केरळ येथे कार्यरत सर्जन सीएमडीई केआय मथाई, व्हीएसएम (निवृत्त) यांच्याशी झाले, केआय मथाई, व्हीएसएम (निवृत्त) यांनी स्वतः ३५ वर्षांहून अधिक काळ नौसेनेत सेवा केली आहे.

ऍडमिरल मथाई त्यांच्या क्षेत्रात खूप प्रसिद्ध आहे. वैद्यकीय जर्नल्समध्ये त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये अतिथी प्राध्यापक म्हणून गौरविण्यात आले आहे, जर्नल ऑफ मरीन मेडिकल सोसायटीच्या मुख्य संपादक असण्याव्यतिरिक्त त्यांचे बालरोग शास्त्रावर पुस्तक प्रकाशित झाले आहे. भारतीय नौसेनेतील तरुण सहकाऱ्यांना ऍडमिरल मथाई सतत मार्गदर्शन करत असतात. बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या ऍडमिरल शीला सामंता मथाई यांना लघुकथा लिहिणे,मॅरेथॉन धावणे आणि पक्षी निरीक्षण करणे असे अनेक छंद आहेत. ट्रेकिंग सारख्या साहसी कार्यात देखील त्यांनी भाग घेतला आहे.

भारतीय नौदलात गेल्या ३५ वर्षांत त्यांनी अनेक अनुभव घेतले  आहेत. त्याबद्दल त्या म्हणतात,

" कधीही नाही म्हणू नका; सर्व काही शक्य आहे. आपले डोके आणि आपले हृदय या दोन्हीसह कार्य करा - ते सर्वोत्तम परिणाम देते. गणवेशात नेहमी सेवेला स्वतःपुढे ठेवा म्हणजे कधीही चुकीचे होणार नाही. जेव्हा तुम्ही पांढरा गणवेश परिधान करता, तेव्हा स्वत: ला एक महिला अधिकारी म्हणून विचार करू नका; फक्त स्वत: ला एक अशी व्यक्ती समजा ज्याला गणवेश घालण्यात अभिमान आहे कारण संरक्षण वर्दीमध्ये आपण पुरुष किंवा महिला नाही - आपण सर्व योद्धा आहोत."

सर्जन व्हाइस एडमिरल शीला मथाई यांची भारतीय नौदलातील कारकीर्द प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून सदिच्छा आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#कर्तृत्वशालिनी #नवरात्र #लेख३

Thursday, October 7, 2021

कर्तृत्वशालिनी - एअर मार्शल पद्मश्री पद्मावती बंडोपाध्याय


नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥

भारतीय वायुसेनेचं आदर्श वाक्य आहे “नभ: स्पृशं दीप्तम” ।श्रीमद्भगवद्गीतेतील ११ व्या अध्यातील हा २४ वा श्लोक आहे.महाभारतातील कुरुक्षेत्र युद्धभूमीवरुन भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना आपल्या विराट रूपाचं दर्शन दिलं. जे पाहून अर्जुनाच्या मनात भय आणि अशांती निर्माण होऊन आत्मविश्वास कमी होऊ लागला. याप्रमाणे भारतीय वायुसेनेचे विराट रूप शत्रूच्या मनात भय आणि अशांती निर्माण करीत आहे. असं हे विराट सामर्थ्य असणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या पहिल्या एअर मार्शल पद्मावती बंडोपाध्याय आहेत. 

तिरुपती येथील एका मध्यमवर्गीय तामिळ कुटुंबातील असल्याने, चाकोरीबद्ध आयुष्यात त्यांचे बालपण गेले. घरचे वातावरण बरेच धार्मिक होते. पुढे संपूर्ण कुटुंब दिल्लीला आल्याने वातावरणात थोडाफार बदल झाला. पण लहानपणापासून तामिळ आणि संस्कृत या भाषेवर प्रभुत्व असल्याने त्यांना हिंदी आणि इंग्रजी भाषा आत्मसात करायला थोडा वेळ लागला. अभ्यास करून आपल्या पायावर उभे राहावे यासाठी कुटुंबाचा आग्रह होता. पण वायुसेनेचे स्वप्न त्यांना खुणावत होते आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करत,बिकट परिस्थितीत त्यांनी एअर मार्शल पद्मावती बंडोपाध्याय ही ओळख सार्थ ठरवली. 

एअर मार्शल पद्मावती बंडोपाध्याय, भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला एअर मार्शल आहेत,त्रितारांकित अधिकाऱ्यांची बढती मिळालेल्या भारतीय सशस्त्र दलातील त्या दुसऱ्या महिला आहेत. त्यांनी १९६८  मध्ये भारतीय वायुसेनेत प्रवेश घेतला. पुढे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांनी केलेल्या कार्यासाठी १९७६ साली विशिष्ठ सेवा पदक,२००२ साली अति विशिष्ठ सेवा पदक,२००६ साली परम विशिष्ठ सेवा पदक त्यांना प्राप्त झाले आहे. विंग कमांडर सती नाथ बंडोपाध्याय आणि एअर मार्शल पद्मावती बंडोपाध्याय हे एकाचवेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करणारे भारतीय वायुसेनेतील पहिले दाम्पत्य आहे.

पद्मावती बंडोपाध्याय यांची कारकीर्द यशस्वी आणि प्रेरणादायी आहे. एरोस्पेस मेडिकल सोसायटी ऑफ इंडियाची फेलो म्हणून पहिली महिला आणि उत्तर ध्रुवावर वैज्ञानिक संशोधन करणाऱ्या पहिली भारतीय महिला म्हणून हा विक्रम त्यांच्या नावाने आहे. १९७८ मध्ये डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या महिला सशस्त्र सेना अधिकारी आहे. हवाई मुख्यालयात महासंचालक वैद्यकीय सेवा म्हणूनही काही काळ कार्य केले आहे. २००२ मध्ये एअर व्हाइस मार्शल म्हणून पदोन्नती मिळणारी पहिली महिला म्हणून त्यांना मान मिळाला आहे.  

एव्हिएशन मेडिसिन तज्ज्ञ म्हणून पद्मावती बंडोपाध्याय यांनी त्यांच्या ३७ वर्षांच्या सेवेत सशस्त्र दलांच्या सुधारणेसाठी काम केले. वैद्यकीय संशोधन केले जे प्रतिकूल परिस्थितीत सैनिकांसाठी मार्गदर्शक आहे. आणि त्या कार्यात पूर्ण समाधानी आहे. त्या म्हणतात,“मी सेवेत जे काही केले ते माझ्या सहकारी अधिकाऱ्यांच्या प्रतिबंध आणि सुधारणेसाठी होते. माझ्या संशोधनामुळे, मला वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा करायची होती जेणेकरून सशस्त्र दलांची कार्यक्षमता वाढेल. 

एअर मार्शल पद्मावती बंडोपाध्याय न्यूयॉर्क अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या सदस्य आहेत. निवृत्तीनंतर ही त्यांनी स्वतःला अनेक सामाजिक कार्यात वाहून घेतले आहे.निवृत्ती स्वीकारल्या नंतर पूर्व उत्तर प्रदेशातील वंचित मुलांना वैद्यकीय आणि शिक्षण सेवा देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य त्या करत आहेत. याच वैद्यकीय सेवेसाठी २०२० साली भारत सरकारने त्यांना भारताचा नागरी सन्मान "पद्मश्री" प्रदान केला. एअर मार्शल पद्मावती बंडोपाध्याय या भारतातील नागरी पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या संरक्षण अधिकारी आहेत कारण सशस्त्र दल नागरी सन्मानासाठी पात्र नाहीत.

त्यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया गौरवपूर्ण होती त्या म्हणतात, “हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी नम्र आहे. हे अत्यंत दुर्मिळ आहे की एका संरक्षण अधिकाऱ्याला सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळतो, परंतु मला वाटते की हे एक किंवा दोन दिवसांच्या कामासाठी नाही तर आयुष्यभरासाठी आहे .

एअर मार्शल पद्मावती बंडोपाध्याय या भारतीय वायूसेनेच्या पहिल्या महिला एअर मार्शल आहेत निवृत्तीनंतर सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःची वेगळी ओळखही निर्माण केली. "The lady in blue - the memoirs of lady Air Marshal" या आत्मचरित्रपर पुस्तकांत त्यांचे अनेक पैलू वाचायला मिळतात. देशभक्ती कशी असायला हवी याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे एअर मार्शल पद्मश्री पद्मावती बंडोपाध्याय आहे. त्यांच्या भावी कार्यास मनापासून सदिच्छा आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#कर्तृत्वशालिनी #नवरात्र #लेख२



Wednesday, October 6, 2021

कर्तृत्वशालिनी - लेफ्टनंट जनरल डॉ.माधुरी कानिटकर


यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।।

ही मनुस्मृतिची शिकवण आम्हाला परंपरेने मिळालेलं वैभव आहे. याच परंपरेचे पाईक म्हणून कर्तृत्ववान स्त्रियांचा उल्लेख करता येईल अशा काही स्त्रियांचा यानिमित्ताने आपण परिचय करून घेणार आहोंत. या धारेत आजची कर्तृत्वशालिनी स्त्री लेफ्टनंट जनरल डॉ.माधुरी कानिटकर यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या भारतीय लष्करातील डॉक्टर असून पुणे येथील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या पहिल्या महिला अधिष्ठाता आहेत. लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत पोहचणार्‍या त्या देशातील तिसऱ्या, तर राज्यातील एकमेव महिला ठरल्या आहेत. इतकेच नव्हे, तर पंतप्रधानांच्या सायन्स टेक्‍नॉलॉजी सल्लागार समितीत असणाऱ्या एकमेव डॉक्‍टर म्हणून त्यांची वर्णी लागली आहे. डॉ.माधुरी कानिटकर पुण्याच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी असून त्यांना राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले आहे. २०१७ मध्ये त्या पुण्याच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता होत्या. तेथे दोन वर्षे काम केल्यानंतर त्यांनी उधमपूर येथे मेजर जनरल (वैद्यकीय) पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नुकतीच नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी ले. ज. डॉ. माधुरी कानिटकर  यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

त्रितारांकित अधिकाऱ्यांचे पद नौदलात व्हाइस अ‍ॅडमिरल, स्थलसेनेत लेफ्टनंट जनरल तर हवाई दलात एअर मार्शल या नावाने ओळखले जाते. लेफ्टनंट जनरल पद भूषवण्याचा पहिला मान पुनिता अरोरा यांना आहे. त्यानंतर पद्मावती बंडोपाध्याय या पहिल्या महिला एअर मार्शल ठरल्या, तर आता डॉ.माधुरी कानिटकर या लेफ्टनंट जनरल झाल्या आहेत.

डॉ. माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरलपदी निवड गेल्या वर्षीच झाली आहे. नवी दिल्ली येथे त्यांनी एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस- वैद्यकीय) म्हणून सूत्रे त्यांनी हाती घेतली आहे. हा विभाग संरक्षण प्रमुख यंत्रणेच्या अंतर्गत आहे. लष्करात या श्रेणीचे पद मिळवणाऱ्या डॉ.माधुरी कानिटकर या तिसऱ्या महिला अधिकारी असून त्या बालरोगतज्ज्ञ आहेत. डॉ.माधुरी कानिटकर यांचे पती राजीव कानिटकर लष्करात लेफ्टनंट कर्नल होते. ते नुकतेच निवृत्त झाले. खरंतर पती-पत्नीने लष्करात लेफ्टनंट कर्नलपद भूषवल्याची ही पहिलीच घटना आहे.

डॉ. माधुरी कानिटकर यांनी लष्करात ३७ वर्षे सेवा केली आहे. भारतीय लष्कराच्या तिन्ही सेवांबाबत (हवाई दल, नौदल आणि स्थलसेना) केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम त्या करत आहेत. 
डाॅ. माधुरी कानिटकर यांना १९८२ मध्ये अभ्यास आणि शिक्षणविषयक क्षेत्रातील कामगिरीबद्दल राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक तसेच कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि बालकांच्या काळजीसाठी दिलेल्या विशेष योगदानासाठी २०१४ साली विशिष्ट सेवा पदक आणि २०१८ साली अति विशिष्ट सेवा पदक देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. 

डॉ.माधुरी कानिटकर यांच्याबद्दल अधिक जाणून घेतांना एका 
मुलाखतीत त्यांनी छान सांगितले.त्या म्हणतात,

‘‘भारतीय लष्कराचे कामकाज महिलांच्या दृष्टिकोनातून विचार करता पारदर्शक, न्याय्य असून महिलांना तेथे कर्तृत्व दाखवण्याची संधी निश्चितच मिळते. लष्करी वेशात असतानाही प्रत्येक दिवस मुलाच्या उत्साहात आनंदाने साजरा करा, अशक्य ते साध्य करण्याचे आव्हान तुम्ही स्वत:च स्वत:ला द्या. कधीही हार मानू नका. निम्मे जग तर महिलांचेच आहे, पण सेवेसाठी सगळे जग तुमच्यासाठी खुले आहे. त्यामुळे तुमच्यातील जे उत्तम असेल ते देशासाठी द्या.’’

मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातील एक मुलगी घरच्या विरोधाला न जुमानता आपली यशस्वी कारकीर्द घडवते आणि आज ले.ज. या पदावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते. हा प्रवास म्हणावा तसा सोपा नाहीच. त्याग,जिद्द,परिश्रम आणि मेहनत या चतुःसूत्रीच्या आधाराने ले.ज.डॉ.माधुरी कानिटकर हे नाव सुवर्णाक्षरांनी अंकित करून ठेवावे असेच आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.  

✍️ सर्वेश फडणवीस 

#कर्तृत्वशालिनी #नवरात्र२०२१ #लेख१

⚜️ कर्तृत्वशालिनी !!

आपल्या देव देवता म्हणजे शक्ती आहेत. कल्पनांचा हळूहळू विकास होत गेला आणि शक्तीला तिच्या तेजामुळे देवी हे अभिधान प्राप्त झाले. दिव्याती इति देवी, देवी ह्या शब्दाची उत्पत्ती आहे. दिव म्हणजे खेळणे,अनंतकोटी ब्रह्मांडाच्या सृष्टी,स्थिती,लय रूपाची क्रीडा देवी करत असते म्हणून ती देवी आणि ह्या जागर पर्वात तिचा उद्घोष करण्यासाठी नवरात्र असावे. 

उद्यापासून अर्थात घटस्थापनेपासून नवरात्रोत्सव जागर उत्सवाला सर्वत्र उत्साहात सुरुवात होणार आहे. यावर्षी कोरोनामुळे स्थानिक बंद असलेली मंदिर उद्यापासून सुरू होणार आहेत पण तरी काही मर्यादांचे पालन आपल्याला करायचे आहे. नवरात्रात खरं तर जागर हा स्त्री शक्तीचा व्हायला हवा. अनेकजण या माध्यमातून तो करतांना दिसत आहेत. आजची स्त्री खरं तर पूजनीय,वंदनीय आहे. तिचा प्रतिकात्मक नऊ दिवस आणि सदैव केलेला आदर आणि सन्मान म्हणजेच नवरात्र. 

स्त्री - एक सुंदर ईश्वरी अविष्करण. आज सर्व क्षेत्रात ती कार्य करते आहे आणि सर्व शिखर पादाक्रांत करते आहे. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्र स्वतःच्या कर्तृत्ववाने यशोशिखरावर नेले आहे. आज प्रत्येक कार्यक्षेत्रात झोकून काम करायला सदैव तयार असणारी,नव्हे अग्रेसर असणारी स्त्री शक्ती आहे. ज्या भारताला आम्ही मातेचा दर्जा देतोय त्या भारतातील स्त्री वंदनीय आहे. समाजातील विकृतीला सुद्धा प्रसंगी धैर्याने लढणारी रणरागिणी म्हणजे सुद्धा एक स्त्रीच आहे. सद्गुणांचा संचय करत तिची वाटचाल प्रत्येकाला प्रेरणादायी आहे.आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास अनेक स्त्री सैनिकांच्या पराक्रमाने उन्नत झाला आहे. आपल्या पराक्रमाच्या गाथा तिने त्रिखंडात गाजवलेल्या आहेत. प्रत्येकाला गर्व वाटेल अशीच तिची वाटचाल आहे. अशाच भारतीय सैन्यदलात कार्य करणाऱ्या 'कर्तृत्वशाली' आधुनिक नवदुर्गांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करतोय. "कर्तृत्वशालिनी" या धनश्री लेले ताईंनी दिलेल्या बिरुदावलीत यांच्या कार्याबद्दल मांडणी करण्याचा प्रयत्न सलग ९ दिवस करणार आहे. 

"For Our Tomorrow She gives her Today" 

खरंतर आज जागतिकीकरणात ती स्वतःला सिद्ध करत जी यशस्वी वाटचाल करते आहे त्या तिच्या कर्तृत्वाने अशीच उंच भरारी घेत रहावी हीच सदिच्छा आहे आणि त्यातूनच हे लेखन करण्याचा प्रयत्न असणार आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

 #कर्तृत्वशालिनी #नवरात्र #लेखमाला