Tuesday, August 31, 2021

गोपालकाला !!


जन्माष्टमी नंतर वेध लागतात ते पारण्याच्या काल्याचे अर्थात गोपालकाल्याचे ...

श्रीकृष्णाने गोकुळातील सर्वांच्या सोबतीने सर्व स्तरातून एकत्र येऊन विचारांती केलेला काला म्हणजे गोपालकाला आणि गोपालकाल्यातही प्रत्येकाने आपल्या कडून काही जिन्नस आणायचा आणि काल्यात टाकायचा मुळात ही कल्पनाच किती आनंददायी आहे. पूर्ण पुरुषोत्तम योगेश्वर श्रीकृष्णाची प्रत्येक कृतीतून काहीतरी जाणवतं. 

सर्वांनी एकत्र येत समाजात आचार विचार आणि संस्कारांचे बीजारोपण करणे म्हणजे काला करणे.

गोपालकाला म्हणजे चांगल्या-वाईट विचारांचा काला .

गोपालकाला म्हणजे मना मनाला जोडणारा एक आनंदी उत्सव.

गोपालकाला म्हणजे देव देश धर्म याचा ध्यास.

गोपालकाला म्हणजे एकता.

गोपालकाला म्हणजे संस्काराचे पुनर्जीवन.

चला करूयात गोपालकाला सकारात्मक विचारांचा..आणि आस्वाद घेऊयात उज्वल भविष्याचा..

आपणांस ही गोपालकला म्हणजे काय वाटतं ?  हे कमेण्ट मध्ये नक्की कळवा..

सर्वेश 

#जन्माष्टमी #गोपालकाला

Thursday, August 12, 2021

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव १६ !! 🚩🙏🏼


हिमालयाच्या सावलीत !! 🙌

पद्मविभूषण,महाराष्ट्रभूषण,शिवशाहीर,श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांना नागपंचमी अर्थात तिथी जन्मदिवसानिमित्ताने अभिष्टचिंतन. 
आज बाबासाहेब १०० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. विलक्षण ऊर्जेचे धनी असलेल्या बाबासाहेबांना भेटून ती अक्षय ऊर्जा आजही जाणवते. शतकाच्या उंबरठ्यावर असतांना सुद्धा "शिवाजी" या अक्षराचा ध्यास घेतलेले बाबासाहेब बोलायला लागले की आश्चर्य वाटतं. त्यांच निखळ हास्य आणि नमस्कार केल्यावर पाठीवरून फिरवेलला हात याला तर शब्दात व्यक्त करणे शक्यच नाही. जिथे शब्द संपतात आणि फक्त सहवासात अनुभूतीपूर्ण असलेले क्षण कसे असतात हे अनुभवण्याचे भाग्य म्हणजे बाबासाहेबांना भेटणे आहे. 

अनेकांनी सूचना केली की बाबासाहेबांबद्दल काहीतरी लिही. खरं सांगायचं तर बाबासाहेबांबद्दल लिहिणे सोपं नाहीच. त्यांच्या प्रत्येक पैलूवर स्वतंत्र लिहावे इतकं कार्य त्यांनी करून ठेवले आहे. पण तरी प्रामाणिक प्रयत्न केला आणि आज तिथी वाढदिवसाला या लेखमालेला पूर्णविराम देतोय. त्यांच्या चरित्राचा अभ्यास करतांना,प्रसंगी वाचतांना त्यांच्या कुठल्या आणि कोणत्या पैलूला स्पर्श करावा हे लक्षातच येत नव्हते. बाबासाहेबांचे सर्वस्पर्शी योगदान थक्क करणारे आहे.  बाबासाहेबांना जाणून घ्यायचे असेल तर प्रत्येकाने "राजा शिवछत्रपती" हे द्विखंडात्मक चरित्र जवळ ठेवावें म्हणजे श्रीमंत बाबासाहेब समजू शकतील. लिहितांना अनेक संदर्भ ग्रंथाची मदत झाली त्याची सूची लेखाच्या शेवटी देतोय. 

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव हा खरंतर उत्सवच आहे. गेली १५ दिवस हा शतकोत्सव बाबासाहेबांच्या शिरस्त्याप्रमाणे सलग एक वेळ पाळण्याचा प्रयत्न करत पूर्ण केला. संपूर्ण पुरुषोत्तम योगेश्वर श्रीकृष्ण सोळा कलांचा ज्ञाता होता. चंद्राच्या पूर्ण सोळा कला आहेत. अमृत, मनदा, पुष्प, पुष्टि, तुष्टि, ध्रुति, शाशनी, चंद्रिका, कांति, ज्योत्सना, श्री, प्रीति, अंगदा, पूर्ण आणि पूर्णामृत. खरंतर सुरुवातीला अशी कल्पनाही नव्हती की हे १६ लेख होतील पण आंग्ल दिनांकापासून अर्थात २९ जुलै पासून सुरू झालेली ही लेखमाला आज १३ ऑगस्ट ( नागपंचमी) तिथीला पूर्ण होते आहे. लेखमाला लिहितांना वाचकांच्या अभिप्रायाने लिहिण्याची अक्षय्य ऊर्जा कायमच मिळत असते. आज नागपंचमी या तिथीला अनुसरून शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांना निरामय आरोग्य श्री भगवंताने प्रदान करावे हीच भगवंताचरणी प्रार्थना आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु !!

जन्मदिनस्य हार्दिक शुभेच्छा: ।। 🙏💐

संदर्भ सूची - 

*राजा शिवछत्रपती - ब.मो.पुरंदरे ,

*जाणता राजा-बाबासाहेब पुरंदरे

*राजर्षी राजमान्य - डाँ. सौ.चित्रलेखा पुरंदरे,

*शिवशाहीरांचे वाङ्मयीन ऐश्वर्य- .डाँ. सौ.चित्रलेखा पुरंदरे,

 *बेलभंडार - डाँ. सागर देशपांडे,

*ठसे माणसाचे - मीना नेरूरकर

*गणगोत-पू.ल.देशपांडे

* वाडा पुरंदऱ्यांचा - गणेश सुभाष धालपे

*अमृतग्रंथ- बाबासाहेब पुरंदरे विशेषांक
  
विविध मासिक,दिवाळी विशेषांक 

✍️ सर्वेश फडणवीस

#शिवशाहीरांची_शंभरी

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव - १५ !! 🚩🙏🏼

श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या विविध पैलूंवर आपण चिंतन करतोय.  बाबासाहेबांचा कॅनव्हास प्रचंड मोठा आहे. त्यांच्या जडणघडणीत त्यांच्या प्रवासात सावली सारखी अनेक माणसं आलीत. बाबासाहेबांच्या परिसस्पर्शाने अशाच काही व्यक्तित्वांबद्दल या लेखात आपण जाणून घेणार आहोंत. 

कै.राजाभाऊ कुलकर्णी . साहित्य प्रसार केंद्राचे सर्वेसर्वा पण बाबासाहेबांच्या परिवारात राजाभाऊ एखाद्या शुभग्रहासारखे विराजमान झाले आणि बाबासाहेब ही त्यांच्या परिवारात तसेच आहेत आजही नागपूरला बाबासाहेब त्यांच्याच घरी मुक्कामी असतात. १९४२ मध्ये बाबासाहेबांचा त्यांच्याशी परिचय झाला,नगर जिल्ह्यात 'पुणतांबा' नावाच्या गावी. या पुणतांब्याला संघाचे प्रचारक म्हणून बाबासाहेब १९४१-४२ मध्ये होते. तिथली संघशाखा त्यांनी सुरू केली. त्या शाखेत सुरुवातीपासून राजाभाऊ व त्यांचे थोरले बंधू मधुकर- मधुदादा- येत.

काहीकाळाने बाबासाहेब नागपूरला आले. बाबासाहेब ८ वर्षे येथे राहिले. त्या अवधीत बाबासाहेब आणि माजगावकर  दोघांनी मिळून साहित्य प्रसार केंद्र सुरू केले. नागपूरला त्या वेळी पुस्तकविक्रीची दोन-चार दुकानं होती, परंतु व्यवहाराच्या दृष्टीनं आणि पुस्तकांच्या दर्जाच्या दृष्टीने ती फारशी सुयोग्य नव्हती. पुढे बाबासाहेबांनी राजाभाऊला नागपूरला बोलावून घेतले आणि साहित्य प्रसार केंद्र' हे दुकान त्यांच्या ताब्यात- मालकी हक्कांसह- सुपुर्द केले. माजगावकर राजाभाऊंच्या चोख व्यवहारावर खुश होते. साहित्य प्रसार केंद्रात बाबासाहेबांची आवश्यकता नव्हती, म्हणून राजाभाऊने नागपूरला राहावे असे
ठरले. त्यांनी नागपूरचं दुकान राजाभाऊंच्या ताब्यात दिलं. कारण बाबासाहेबांना एकशे एक टक्के खात्री होती की, राजाभाऊ सगळं व्यवस्थित सांभाळेल. माणसं कशी जोडायची, ती टिकवून कशी ठेवायची, हे तर त्याच्या वृत्तीत होतेच; पण वेळेवर
सगळी बिलं भरणं, भाडं देणं हा व्यवहारही ते सांभाळतील, याबद्दल त्यांना विश्वास वाटत होता. पुस्तक-विक्री हे एक वेगळंच क्षेत्र आहे, तेथे सरस्वतीचं अधिष्ठान असलेलं आणि त्याबरोबरच लक्ष्मीचाही वास हवा. कारण त्यावरच आपलं पोट भरायचं आहे... हे सगळे विचार मनात ठेवून त्यांनी आजही आपली यशस्वी वाटचाल आजही सुरू ठेवली आहे आणि साहित्य प्रसार केंद्र नागपूरच्या वैभवात भर घालत आहे. बाबासाहेब त्यांच्या आठवणी सांगताना म्हणतात,राजाभाऊंना  रागावण्याची काय, प्रेमाचीही वेळ कधीच येणार नाही, इतका तो लांब गेलाय आणि प्रेमाची माणसं जितकी लांब जातात ना, तितक्याच त्यांच्या आठवणी आपल्या जवळ, आपल्या मनात घर करून राहू लागतात, हेच खरं!

त्यानंतर बाबासाहेबाना सावली सारखे कायम सोबत असणारे कै. प्रतापराव टिपरे. प्रताप काकांना जो भेटला असेल त्याला जाणवेल की ते बाबासाहेबांच्या ते किती जवळचे होते. अप्पांकडे अर्थात गो.नी.दांडेकरांकडे  त्यांचे विश्व मोठे असल्याने अनेकविध लोकांचे येणे जाणे होते. त्यातच बाबासाहेबांचे येणे जाणे असे. एकदा त्यांनी अप्पांकडे विषय काढला, ‘‘अप्पासाहेंब, व्याप वाढतोय, लिखाण वाढतेय, मला एक लेखनिक हवा आहे. बिनचूक लिहिणारा, चांगल्या अक्षराचा. कोण असला तर सांगा.’’ अन् अप्पांनी दादांनां त्यांचे ओंजळीत घातले. अप्पांनी आपल्या भांडारातला हा हिरा सरस्वतीपूत्र असणारे बाबासाहेबांच्या ओटीत घातला. अन् बाबासाहेबांकडे या हिऱ्याला अनेकविध पैलू पडले. एका वेगळ्या तेजाने हा हिरा चमकू लागला. आणि तो बाबासाहेबांच गळ्यातला दागिना बनून राहिला. तो त्यांचे भूषण बनला तो कायमचाच. त्यावेळी दादांचे वय जेमतेम १९-२१ असेल. दादांचे अक्षर अगदि मोत्यासारखे. त्यामुळे अप्पांनी त्यांना बाबासाहेबांचा लेखनिक बनविले. जसा शिवरायांना लिखाणासाठी बाळाजी आवजी चिटणीस मिळाला तसा बाबासाहेबांना लिखाणासाठी हा चिटणीस मिळाला. आता प्रतापरावांचे बाबासाहेबांकडे जाणे येण सूरु झाले. 

बाबासाहेब सांगतील ती पत्रे लिहावित. वा इतर लेखन करावे. ते तर मुख्य कार्य. मात्र त्यातून सतत बाबासाहेबांचा सहवास वाढत गेला. आणि प्रतापराव लेखनिकाचे स्वीय सचिव बनले. बाबासाहेबांच्या भाषणांच्या, व्याख्यानाच्या अन्य कार्यक्रमांच्या तारखांची नोंद घेणे, कार्यक्रम ठरलेवर त्या बाबत दैनंदिनीवर बिनचूक नोंदविणे. त्याबरोबरच अनेकविध गोष्टिंचे स्मरण ठेवणे आणि त्याप्रमाणे बाबासाहेबांना आठवण करुन देणे हे काम ते करु लागले.  व्याख्याने आणि अन्य कार्यक्रमासाठी गरजेप्रमाणे दादा त्यांच्या सोबत  गावोगाव भटकू लागले. त्यातून त्यांचे ज्ञानविश्व वाढत होते. समृद्ध होत होते. दादांना चांगले पदार्थ खाण्याचा विशेष आनंद होता. त्यातूनच महाराष्ट्रभर सर्वदुर फिरल्याने कोणत्या गांवी काय खावे हे दादांच्या तोंडूनच ऐकावे. तेहि हाॅटेल असो वा विशिष्ठ व्यक्तिचे घर दादा अगदि तोंडपाठ सांगायचे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । याप्रमाणे दादा सदैव बाबासाहेबांसोबतच असायचे.कोणतीही अपेक्षा न ठेवता. आपले सारे जीवन त्यांनी बाबासाहेबांच्या चरणावर वाहून घेतले.दादांच्या सतत सहवासामुळे त्या दोघांमधील ममत्व वाढत गेले त्यातूनच केवळ लेखनिक आणि सचिव या लौकिक नात्याहून त्यांच्यात पितापुत्राप्रमाणे नाते निर्माण झाले जे शेवटपर्यंत टिकून होते. 

श्री. दादा हाडप अर्थात दत्तात्रय चिंतामण हाडप. शिवकालिन प्रतापगड येथील भवानीमातेच्या मंदिरात भवानीदेवीची दैनंदिन पुजाआरतीसाठी खुद्द शिवाजी महाराजांनी नेमणूक केलेले स्व. वेदशास्त्रसंपन्न विश्वनाथ भट हाडप यांचे १० वे वारसदार!! आजही प्रतापगडावर हाडपांची वास्तु दिमाखात ऊभी आहे. साधारणपणे दादांच्या वयाच्या ८-१० वर्षी प्रतापगडच्या रहात्या घरीच, तरुण तडफदार शिवअभ्यासक व संशोधन करणार्या बाबासाहेबांची व त्यांची पहिली भेट झाली होती. गडकिल्ल्यान्च्या पहाणी व अभ्यासानिमीत्त प्रतापगडीही श्रीमंतांचे वरचेवर येणे जाणे असे आणि त्यातूनच हे मैत्रिपलिकडील नात्याचे धागे सहजतेने वृधींगत होत गेले. शिवभक्त बाबासाहेबांच्या परिसस्पर्शाने पावन अशा अनेक अनुयायींमध्ये दादांचेही स्थान लवकरच अढळ झाले. 

१९७४ ला दादर शिवाजी पार्क येथे बाबासाहेबांनी उभारलेल्या "शिवसृष्टी" मध्ये दादांना पुर्णकाळ  पौरिहित्य करण्याचा मान मिळाला. बाबासाहेब लिखित आणि दिग्दर्शित आशिया खंडातील पहिले महा नाट्य "जाणता राजा" मध्ये अनेक भूमिकांबरोबरच, प्रयोगापुर्वीची रोजची पहिली पूजा करण्याचा मानही दादांचाच!

नुकत्याच २९ जुलै ला पुण्यात झालेल्या बाबासाहेबांच्या शतकमहोत्सव सत्कार समारंभात दादांनी  बाबासाहेबांसाठी प्रत्यक्ष आशिर्वचन व श्रीशक्ती आदिभवानीदेवीची मानसपूजा पठण  केले. आणि त्या नंतर झालेल्या प्रत्यक्ष भेटीच्या वेळेस दोघांचे पाणावलेले डोळे त्यांच्या मनातील एकमेकांबद्दल च्या भावना, प्रेम, जिव्हाळा, आदर सर्व काही व्यक्त करत होते. जिथे शब्द संपतात तिथे डोळे बोलू लागतात हा अनुभव तेथील उपस्थितांनी घेतला. याही पुढे, कार्यक्रमास येण्यात अंबरनाथ-पुणे-अंबरनाथ प्रवासात काही त्रास नाही झाला ना? तब्बेत कशी आहे? अशा चौकशीसाठी  शंभरवर्षीय बाबासाहेब  दुसऱ्यादिवशी स्वत: आस्थेन ८७ वर्षीय पंतांना (बाबासाहेब दादांना 'पंत' असे संबोधतात) फोन करतात, केवढी ही आत्मियता आपल्यांसाठी!!!  गेल्या अनेक वर्षांपासून,  बाबासाहेब पुण्यात घरी असो वा नसो, त्यांच्या तिथिनुसार वाढदिवशी म्हणजेच श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमीला त्यांच्यासाठी त्यांचे घरी (अगदी अपवादाने स्वता:च्या घरी) दादा स्वेच्छेने सप्तशती/नवचंडीचे  पाठ नेमाने वाचतात. बहुत काय लिहिणे,ही आणि अशी अनेक माणसं बाबासाहेबांच्या परिसस्पर्शाने पावन झाली आहे..

✍️ सर्वेश फडणवीस 

#शिवशाहीरांची_शंभरी  

Wednesday, August 11, 2021

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव - १४!! 🚩🙏🏼


श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या विविध पैलूंना स्पर्श करतांना "पत्रलेखन" हा पैलूपण आनंद देणारा आहे. बाबसाहेबांनी प्रसंगानुरूप अनेकांना पत्र लिहीली आहेत. असंच एक पत्र वाचनात आले. श्री अनिलराव वाळिंबे, सातारा यांना लंडनहुन हे पत्र विजयादशमीच्या अर्थात दसऱ्याच्या दिवशी लिहिले. जवळपास १२ पानी हे पत्र आहे. मुळातून पत्र हे वाचनीय आहे. "जगदंबा" या छत्रपतींच्या तलवारीचे वर्णन या पत्रात बाबासाहेबांनी केले आहे. अस्मादिकांनी हे संपूर्ण वर्णन प्रत्यक्ष ऐकले आहे. आजही पायी फिरायला जातांना ते ऐकणे हे नित्याचेच झाले आहे. ती भाषा ते वर्णन वाचतांना आपण शिवकाळात आहोत की काय इतके  रसभरीत वर्णन बाबासाहेब पत्रातून करतात… 

जगदंबा
अखंड लक्ष्मीअलंकृत विजयी भव सहस्रायु
चिरंजीव राजश्री अनिलराव वाळिंबे, सातारा
प्रति बाबासाहेब पुरंदरे, नगरी लंडन, प्रेमपूर्वक शुभाशीर्वाद!

नगरी लंडन-जगाच्या पाठीवरची एके काळची अति ऐश्वर्यवंत नगरी. इ.१९४७ पर्यंत आपल्यावर अनिर्बंध सत्ता गाजविणाऱ्या इंग्रज सुलतानची ही राजधानी. एके काळी हिचा नखरा आणि दरारा क्लिओपात्रेसारखा होता. पण आता मात्र या नगरीचं वय झालंय. तिचं साम्राज्य गेलं. भरजरी पैठणी गेली. तांबडं आलवण भाळी आलं. हे असं झाल्याला आता तीस वर्षं उलटली. साम्राज्यशाहीचा तो सरंजामी तोरा पार पार संपलाय. टॉवर ऑफ लंडन वरून या वृद्ध नगरीकडे पाहिलं की असं वाटतं की, ही म्हातारी भिंतीला टेकून अन् पाय पसरून बसली आहे आणि आपल्या भवती नातवंडाना घेऊन ही-'ह्यांच्या वेळी घरात कित्ती कित्ती होतं नि काय काय होतं, याच्या कथा भरल्या डोळ्यानं आणि दाटल्या गळ्यानं जणू सांगत बसलीय!

अनिलराव, आजचं हे पत्र मी तुम्हाला सोन्याच्या पानावर लिहायला हवं.आज दसरा आहे. सोन्याचा दिवस. विजयादशमी,शस्त्रपूजनाचा आजचा दिवस. पुरंदऱ्यांच्या परंपरेप्रमाणे मी आज साताऱ्यात असायचा. श्रीभवानीदेवीला, भवानी तलवारीला आणि छत्रपतींना सोनं अर्पण करण्यासाठी आज या वेळी, सायंकाळी, मी जलमंदिर राजवाड्यात असायचा. असंख्य मित्रांच्या गर्दीत मी हरवायचा. पण या लंडनमधील आजची ही दसऱ्याची सायंकाळ, सुन्न शांततेत तुम्हाला पत्र लिहिण्यात मी घालवतोय. कालानुक्रमानं आजच्या दिनांकावर आश्विन शुद्ध दशमी' पडलीय म्हणूनच इथं दसऱ्याचं वातावरण अजिबात नाही.इथं आजच्या दिवसाला 'दसरा' म्हणायचा झालं. इथं झेंडूंच्या माळा नाहीत. शिलंगणाचं सोनं नाही. नगाऱ्या-चौघड्यांचा दणदणाट नाही. शिंगांच्या ललकाऱ्या नाहीत. हलग्या-ताश्यांचे कडकडाट नाहीत. शिलंगणाच्या स्वारीतील ती गुलालाची  उधळण नाही. झेंडे-जरीपटके नाहीत. इथं दसराच नाही. इथं साताराच नाही. पण अनिलराव, तरी सुद्धा जन्मात कधी विसरणार नाही, असा दसरा या लंडननगरीत साजरा झाला माझा! अविस्मरणीय! लंडनला आल्यावर काय काय पहायचं, याची एक यादीच पुण्याहून निघताना माझ्या मनात तयार होती.

जे जे उत्कट आणि भव्य असेल ते ते बघायचंच. पण प्रथम बघायची ती इथं असलेली छत्रपती घराण्यातील 'ती' प्रख्यात तलवार. ही तलवार म्हणजे छत्रपती थोरल्या शिवाजीमहाराजांची भवानी तलवार नव्हे. विख्यात भवानी तलवार इथं लंडनमध्ये नाहीच. लंडनमध्ये असलेल्या तलवारीचं नाव आहे, 'जगदंबा'. ही रत्नजडीत सोन्याच्या मुठीची मौल्यवान तलवार 'जगदंबा'लंडनमधील कोणत्याही म्युझियममध्ये नसून, ती आहे ब्रिटिश राजघराण्याच्या बकिंगहॅम राजवाड्यात. राणी एलिझाबेथ सध्या या राजवाड्यात राहते. या राजवाड्यात कोणालाही प्रवेश मिळत नाही. हा राजवाडा बाहेरून अन् खूप दुरूनच पाहता येतो. या राजवाड्यातील एका दालनात, एका शोकेसमध्ये मखमलीवर ही जगदंबा तलवार उभी बसविलेली आहे. तलवारीची व्यवस्था अतिशय उत्कृष्ट प्रतीची आहे. छत्रपतींच्या राजघराण्यातील ही तलवार इथं कशी आली? त्याचं असं झालं. ब्रिटिश राजा सातवा एडवर्ड हा प्रिन्स ऑफ वेल्स असताना इ. १८७५ मध्ये आपल्या भारतात आला होता. हा राजपुत्र त्यावेळी भारतातील संस्थानिक, राजेमहाराजांचे मुजरे आणि नजराणे घेत फिरत होता.

आजपर्यंत अक्षरश: हजारो तलवारी पाहिल्या आहेत. महाराष्ट्रातल्या तर जवळ जवळ सर्वच ऐतिहासिक घराण्यांतील तलवारी मी पाहिल्या आहेत. त्यांतील अत्युत्कृष्ट अशा तीन तलवारीत मी या तलवारीची गणना करीन. मी ती तलवार जवळच्या मखमली टेबलावर ठेवली. मी आणि किशोररावांनी विजयादशमीचं सोनं त्या तलवारीवर वाहिलं आणि मुजरे केले. आजचं माझं शस्त्रपूजन असं साजरं झालं. आमच्या भवतीची ती गोरी माणसं आणि ती आंग्ल युवती आमच्याकडे अतिशय कुतूहलानं पाहत होती. त्या युवतीनं मला नंतर औत्सुक्यानं विचारलंही. मी आमच्या सोन्याचा आणि मुजऱ्याचा अर्थ तिला सांगितला. तिला तो पटला. ती मला म्हणाली, ''बरोबर! तुम्ही सांगताय तीच माहिती या तलवारीबद्दल आमच्या पॅलेसच्या कॅटलॉगमध्ये लिहिलेली आहे. नंतर तिनं मला त्या कॅटलॉगच्या दोन प्रती भेट म्हणून दिल्या. या युवतीच्या वागण्याबोलण्यात फार आस्था होती. या मुलीचं नाव आहे ज्युली हरलॅण्ड. शस्त्रपूजन झालं होतं. आता मला त्या तलवारीचा अभ्यास करावयाचा होता. ज्युली हरलॅण्डला मी विचारलं, "मला या तलवारीचा तपशीलवार अभ्यास करायचाय. वेळ लागेल, चालेल ना?"

मी त्या तलवारीची टिपणं घ्यावयास सुरुवात केली. मी आणि
किशोरराव पाऊण तास त्या तलवारीची बारकाईने टिपणं घेत होतो. या जगदंबा तलवारीच्या सरळ पात्याची लांबी शंभर सेंटिमीटर्स आहे. मूठ आणि मुठीमागील कळी यांची एकूण लांबी बावीस सेंटिमीटर्स आहे. म्हणजेच तलवारीची एकूण लांबी एकशे बावीस सेंटिमीटर्स आहे. तलवार संपूर्णपणे दुधारी नाही. तिची खालची बाजू बिनधारेची आणि जाड आहे. पुढील भागास अर्थात धार आहे. पात्याचे टोक (अग्र) अगदी थोडेसेच बाकदार अथवा वळणदार आहे. पण एकंदर तलवारीचा ढाळ सरळ (पट्टापान) आहे. गोफ बांधण्यासाठी मूठ आणि पाते यांच्या दरम्यान एक कडी (रिंग) असते. या तलवारीस कडीसाठी छिद्र आहे. पण कडी नाही. कडी पडून गेलेली दिसते. तलवारीची मूठ शुद्ध सोन्याच्या जाडसर पत्र्याने वेष्टिलेली आहे. त्यावर बाहेरच्या सर्व बाजूंना हिरे आणि माणके जडविलेली आहेत. माणके त्र्याहत्तर आहेत. पैकी दोन माणके पडलेली आहेत. त्यांची दोन कोंदणं रिकामीच आहेत. तलवारीच्या मुठीमागील कळीसुद्धा जडावाची आहे. या कळीला शेवटी सोन्याची शेंबी आहे. तलवारीचं पातं मुठीजवळ तीन सेंटिमीटर्स रुंद आहे. तलवारीचं वजन घेता आले नाही. पण ते अंदाजे एक किलो असावंसं वाटतं. संपूर्ण मुठीवर असलेल्या हिऱ्यांची (पांढऱ्या खड्यांची) संख्या नेमकी सांगता येणार नाही. मला ते मोजणे जमले नाही. पण अंदाजे हे पांढरे खडे साडेतीनशे ते पावणेचारशे असावेत, असं वाटते. या मुठीचे सौंदर्य व तेज अतिशय विलोभनीय आहे. बकिंगहॅम राजवाड्याच्या अधिकृत कॅटलॉगमध्ये या तलवारीबद्दल माहिती दिलेली आहे. त्यातील पुढील विधान महत्वाचे आहे .... "Presented by H. H. the Maharaja of Kolapore as a relic of the Mahratta Chief Shivaji, to whom it formerly belonged."

या तलवारीच्या पात्यावर दोन्ही बाजूला दोन दोन खोलगट पन्हाळी आहेत. पात्याच्या एका बाजूला ख. क ड ही अक्षरे तीन वेळा कोरलेली आहेत. कोल्हापूर दरबाराच्या दफ्तरात या तलवारीची माहिती नमूद आहे. त्यातच हिचं नाव 'जगदंबा' म्हणून नमूद आहे. हे नाव या तलवारीला कुणी व केव्हा दिलं ते मात्र समजत नाही. ही तलवार युरोपमध्ये तयार झालेली आहे. ही कमीत कमी साडेतीनशे वर्षापूर्वीची आहे. हिचं पोलाद उत्कृष्ट आहे. पातं लखलखीत आणि सरळ आहे. अशा त-हेच्या तलवारी स्पेनमध्ये टॉलेडो येथे तयार होत असत. ही 'जगदंबा' तलवार टॉलेडो येथेच तयार झालेली असावी. या जातीच्या तलवारीला आपल्याकडे 'फिरंग', 'पट्टापान', 'धोप' आणि 'सैफ' अशी नावं होती. फिरंगी देशात म्हणजे युरोपमध्ये तयार झालेली तलवार म्हणून तिला 'फिरंग' म्हणत. पट्ट्याप्रमाणे जिचं पान म्हणजे पातं सरळ आहे ती 'पट्टापान', म्हणून अशा तलवारीला 'पट्टापान' म्हणत. 'धोप' म्हणजे सरळ पात्याची.'सैफ'या शब्दाचाच अर्थ 'तलवार' असा आहे. पण जी सरळ पात्याची आहे,तिला 'सैफ' म्हणण्याचा प्रघात होता.

या जगदंबा तलवारीची बकिंगहॅम राजवाड्यात ठेवली जाणारी आस्था आणि व्यवस्था पाहून मी विस्मित झालो. उत्कृष्ट व्यवस्था! एवढी प्रतिष्ठा, व्यवस्था, जिव्हाळा आणि जपणूक आपण आपल्याकडे एखाद्या तरी वस्तूची वा वास्तूची ठेवली आहे काय? मला तरी एकही उदाहरण नमुना म्हणूनही आठवत नाही. तलवारीची टिपणं घेण्याचं आमचं काम संपलं. पॅलेसमार्फतच तलवारीची अधिकृत छायाचित्रं मला मिळतील असं ज्युली हरलॅण्डने मला सांगितलं. पॅलेसमध्ये कॅमेरा आणायला आम्हाला परवानगीच देण्यात आली नाही. आमचं काम संपलं. ती तलवार परत मी ज्युलीच्या स्वाधीन केली.

खरंच वाटत होतं की, ही तलवार परत भारतात घेऊन यावी! पण ते वाटणं अर्थशून्य होतं. एकच अमाप आनंद माझ्या अंत:करणात भरून उतू जात होता की, आज दसऱ्याच्या दिवशी मी लंडनमध्ये बकिंगहॅम राजवाड्यात छत्रपतींच्या जगदंबा तलवारीला सोनं वाहिलं. ती हातात घेतली. अनिलराव, मी आज एका अविस्मरणीय दसऱ्याचा आनंद लुटला.

बहुत काय लिहिणे? तुम्हा सर्वांस शुभाशीर्वाद, स्वहस्ताक्षर. श्रीशिवराज्य शके ३०५ विजयादशमी, बुधवार राजते लेखनावधिः।।

✍️ सर्वेश फडणवीस 

#शिवशाहीरांची_शंभरी 

छायाचित्र सौजन्य - मित्रवर्य Kaustubh Kasture

Tuesday, August 10, 2021

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव - १३!! 🚩🙏🏼

आपले सर्वांचे लाडके भाई अर्थात पु. ल.देशपांडे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ६१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने बाबासाहेबांना पत्र लिहिले. ते पत्र आज देतो आहे. पत्र मुळातूनच वाचनीय आहे. त्यातील काही भाग आजच्या लेखात देतो आहे. बाबासाहेबांचे विविध पैलूंना स्पर्श करतांना भाईंनी त्यांच्याबद्दल केलेला गौरव अतिशय योग्य वाटतो.

प्रिय बाबासाहेब

यंदाच्या नागपंचमीला तुम्ही साठ वर्षांचे होत आहात त्या गोष्टीवर माझा काही केल्या विश्वासच बसत नाही. तुमच्या जीवनकार्याची संपूर्ण प्रेरणा असणाऱ्या छत्रपतीप्रमाणे तुमच्याही जन्मतिथीबद्दल काही गोंधळ तर नाही ना अशीही शंका येते. पंचवीस वर्षांपूर्वी शिवाजीराजांचा पोवाडा गायला ज्या उत्साहाने उभे राहून ज्या नाट्यपूर्ण शैलीने आणि आवेशाने समोरच्या विराट श्रोतृसमुदायाला त्या महान जीवनकथेत भिजवून काढीत होता ती किमया आजही तुम्ही करीत आहात. आपण प्रथम भेटलो त्या वेळी तुम्ही पस्तिशीत होता. सरकारला तुमचं वय नाकबूल आहे असंच मला वाटतं. आजही रात्री रोज दोन-तीन तास भान हरपून तुम्ही शिवचरित्र सांगत असता. हे चैतन्य प्राप्त करून देणारी अमृतवल्ली तुम्हाला शिवचरित्राच्या रूपानेच सापडली आहे. शिवरायाचं स्मरण होताक्षणी आपण आनंदवनभुवनात संचार करतो आहो असंच तुम्हाला वाटतं. एखाद्या कार्याशी तन्मय-म्हणजे त्यासारखं व्हावं म्हणजे काय हे पहायचं असेल तर तुम्हाला भेटावं. माणूस रामरंगी रंगो की गानरंगी रंगो, महत्त्व असतं ते तद्रूपतेला. तुम्हाला जीवनात असं तद्रूप होऊन जाण्यासारखं उदात्त प्रयोजन लाभलं. बुद्धिनिष्ठांचाही दैवी चमत्कारावर विश्वास बसावा असा हा शिवछत्रपती.

इतिहास संशोधक म्हटल्यावर जे चित्र डोळ्यापुढे उभे राहते त्याला तुम्ही भलताच धक्का दिला होता. त्याविषयी मी यापूर्वी लिहिलेलं आहे त्याची पुनरुक्ती करीत नाही. पण आजही मला तुमच्या डोळ्यात तीच चमक दिसते. संभाषणात तेच आर्जव आढळतं. शिवचरित्रातली, तुमच्या शब्दात सांगायचं म्हणजे नवी 'एखादी गंमत' सांगताना तोच उत्साह आहे. कॅलेंडरवरचे वर्षाचे आकडे फक्त बदलताहेत. ह्या कालखंडात यशाप्रमाणे मानहानीचेही प्रसंग तुमच्यावर आले. 'अर्थी विपर्यास' हे भोगही तुम्हाला भोगावे लागले. पण त्यामुळे तुमच्या कार्यात तुम्ही खंड पडू दिला नाही. आजही त्याच उत्साहाने शिवचरित्रविषयक कार्याची नवीनवी स्वप्नं तुम्हाला पडताहेत. केवळ भूतकाळात रमून न राहता आधुनिक काळात आवश्यक असणारं कार्यही तुम्ही हाती घेतलं आहे. दुर्गम जागी असलेल्या एका खेड्यातलं जीवन सुस्थिर करावं म्हणून तुमची धडपड चालू आहे. त्याखेरीज शिवकालाचं दर्शन घडवणारं एक संग्रहालय असावं असंही तुमचं एक स्वप्न आहे. अनेक ग्रंथ लिहिण्याचा तुमचा संकल्प आहे. त्यांची कच्ची सामग्री तयार आहे. केवळ वयाने तुमच्याहून थोडा वडील असणारा तुमचा मित्र म्हणून तुम्ही ह्या कार्याच्या पूर्ततेला लागावे असे मला तुमच्या साठाव्या वाढदिवसाच्या प्रसंगी सांगावेसे वाटते.

आमच्यासारख्या सामान्यांना तुमच्या कष्टांची काळजी वाटते. आपले इप्सित कार्य हीच विश्रांती कशी होऊ शकते हे उमगत नाही. स्वत:च्या शरीराची तुम्ही हेळसांड करता आहात असं वाटतं. इतक्या धडपडीतून तुम्हाला काय फायदा मिळणार आहे असाही एक सामान्य बुद्धीला पडणारा प्रश्न उभा राहतो. शिवचरित्र सांगून काय होणार आहे? ह्या प्रश्नाचं तुमचं उत्तर शिवचरित्र सांगितलं जाणार आहे हेच आहे हे मला ठाऊक आहे. फारतर ते मला सांगितल्याशिवाय राहावत नाही अशीही पुष्टी तुम्ही त्या वाक्याला जोडाल. तुम्ही पर्वत कशासाठी चढता? त्या प्रश्नाचं उत्तर एका गिर्यारोहकाने पर्वत आहेत म्हणून एवढंच दिलं होतं. शिवाजी नावाचा पर्वतासारखा एक उत्तुंग माणूस ह्या भारतात झाला एवढ्या एकाच कारणासाठी तुम्ही त्या पर्वतासारख्या माणसाच्या प्रेमात पडलात. त्याचं चरित्र सांगण्यात आयुष्य सार्थकी लावत आलात. व्याख्यानांतून होणाऱ्या आर्थिक प्राप्तीकडेही 'इदं न मम' ह्या भावनेने पाहून लक्षावधी रुपये समाजपुरुषाला अर्पण केलेत. ते द्रव्य जणू काय छत्रपतींच्या मालकीचेच होते आणि आपण केवळ शिवकालातले वसुलीचे अधिकारी आहोत ह्या भावनेने तुम्ही 'शिवार्पणमस्तु' म्हणून ते देऊन टाकले. ही गोष्ट सोपी नाही. शिवचरित्र कथनातून मिळालेली पै न् पै तुम्ही स्वत:साठी ठेवली असतीत तर त्यात वावगं असं काहीही नव्हतं. प्रवेशमूल्याच्या रूपाने घेतलेल्या प्रत्येक पैशाचं माप दहा दहा रात्री शिवचरित्र सांगून तुम्ही लोकांच्या पदरात ते भरपूर टाकत आला आहात. अंगात ताप असतो, घसा फुललेला असतो, शरीरात कित्येकदा उभं राहण्याचं त्राणही उरलेलं नसतं आणि 'छत्रपती श्री शिवाजी महाराज' हे शब्द तुमच्या तोंडून उच्चारले गेले की त्या शब्दांचाच मंत्र होतो. बाबासाहेब पुरंदरे नावाचे एक झाड फुलून येते. पुष्पवृष्टीसारखी शब्दवृष्टी सुरू होते. मरगळलेल्या मनाची माणसं देखील क्षणभर त्या दृष्टीने सुस्नात होऊन मैदानातून बाहेर पडताना दिसतात.

काय लिहावं आणि काय लिहू नये हे सुचवण्याचा मला अधिकार नाही. पण मनात आणलेली गोष्ट तडीला नेण्यासाठी तुम्ही जिवाचं रान कसं करता हे मी पाहिलेलं आहे. तुमच्या बोटाला धरून मी शिवसृष्टीत हिंडल्याबद्दलची कृतज्ञता माझ्या मनात आहे. त्या भावनेपोटीच मी तुमच्या ह्या संकल्पित ग्रंथांच्या पूर्ततेची प्रतीक्षा करतो आहे. शिवचरित्र कथनाच्या उपक्रमाला यंदा पंचवीस वर्षं तुमच्या साठाव्या वर्षाच्या वाढदिवसाच्या वेळीच पुरी होताहेत. एक उदात्त ध्यास घेऊन तुम्ही जगत आला आहात. यापुढला तुमचा प्रवास त्या ध्यासाच्या आनंदात आणखी अनेक वर्ष चालत राहो असं माझ्याप्रमाणे असंख्य लोकांना वाटत राहावं इतकं उदंड प्रेम तुम्हाला लाभलेलं आहे. ते प्रेम प्रतिपश्चन्द्रलेखेप्रमाणे सतत वर्धिष्णु राहो ही याप्रसंगी माझी आणि सुनीताची शुभेच्छा.

तुमचाच
भाई, पु. ल. देशपांडे

✍️ सर्वेश फडणवीस

#शिवशाहीरांची_शंभरी

Monday, August 9, 2021

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव - १२ !! 🚩🙏🏼


श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पैलूंना स्पर्श करतांना पुरंदरे आणि मंगेशकर घराण्याचा स्नेहबंध आज सर्वदूर परिचित आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नजरेतून शिवशाहीरांबद्दल वाचल्यावर उर भरून येतो. त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी लता दीदी आवर्जून त्यांना फोन करतात. हे ऋणानुबंध दोघांनीही जपून ठेवले आहे. लता दीदी बाबासाहेबांबद्दल लिहीतात,

बाबासाहेब पुरंदरे हे नाव प्रथम मी केव्हा ऐकले ते आज मला नीटसे आठवत नाही. पण मला वाटते, बहुसंख्य मराठी माणसांप्रमाणे माझाही त्यांच्याशी पहिला परिचय झाला असावा तो त्यांच्या लेखनातूनच. प्रतापगड, राजगड, आग्रा वगैरे नावाने बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचे अतिशय सुंदर चरित्र लिहिले आहे. शिवाय दहा खंडांतून लिहिलेल्या चरित्राच्या द्वारा बाबासाहेबांनी महाराजांचे चारित्र्य, त्यांचे शौर्य, त्यांचे सद्गुण वाचकांच्या मनावर फार परिणामकारक रीतीने ठसवले आहेत. मी ते दहाही खंड मोठ्या उत्सुकतेने वाचून काढले. इतिहासाशी नाते सांगणारी यामुळे हे सर्व खंड अत्यंत वाचनीय झाले आहेत. ते वाचून लेखकाविषयी माझ्या मनात कुतूहल होते. त्यामुळेही बाबासाहेबांना भेटण्याचे औत्सुक्य मला वाटत होते. त्यातूनच कधी तरी पुढे बाबासाहेब पुरंदरे यांचा आणि माझा परिचय झाला. शिवाजी महाराजांबद्दलची परमभक्ती हा बाबासाहेब व माझ्यात एक समान धागा आहे.

गप्पा मारण्याची हौस यामुळे बाबासाहेब पुरंदरेंविषयी आमच्या घरातल्या साऱ्यांनाच एक घरगुती जिव्हाळा, आपुलकी वाटू लागली. परकेपणाचा भाव पुसून गेला. बाबासाहेब हे जणू घरातले, नात्यातलेच एक माणूस असे आम्हा साऱ्यांना वाटू लागले. बाबासाहेब पुरंदरे यांचा आणि माझा परिचय हा असा खूप दीर्घकालीन आहे. ओळख झाल्यानंतर बाबासाहेब आमच्याकडे येऊ-जाऊ लागले. मुंबईला काही कामानिमित्त येणे झाले की बाबासाहेबांची आमच्याकडे भेट ठरलेलीच. माझ्याप्रमाणे मीना, उषा, हृदयनाथ या माझ्या भावंडांशी गप्पा मारण्यातही ते तासन्तास रंगून जात. आम्ही भावंडेही पुण्याला गेल्यावर त्यांच्या घरी जात असू. नंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये एक प्रकारचा घरोबाच निर्माण झाला. पुढे पुढे तर आम्ही त्यांना लहानसहान घरगुती बाबतीत सल्लामसलतही विचारू लागलो. आमच्याकडच्या कौटुंबिक कार्यक्रमात, मंगलकार्यात बाबासाहेब आप्तभावनेने हजर राहात. त्यांचे येणे ही एक सरावाची गोष्ट होऊन बसली.

छत्रपतींची थोरवी महाराष्ट्राला पटवून द्यावी हाच एक ध्यास त्यांना सतत लागलेला असे. त्यासाठी व्याख्याने देणे, लेखन करणे, शारीरिक व आर्थिक झीज सोसणे हे बाबासाहेबांनी सातत्याने चालू ठेवले होते. ते पाहताना मला आश्चर्य वाटे. बाबासाहेबांच्या व्याख्यानांनाही आम्ही सतत जात असू. शिवाजी महाराजांवरचे बाबासाहेबांचे व्याख्यान ऐकणे हा एक अविस्मरणीय, रोमांचकारक असा अनुभव आहे. आमच्या घराबद्दल बाबासाहेबांच्या मनात अकृत्रिम स्नेहभाव असे. माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीला ते अनेकदा आवर्जून येतात.

इतक्या वर्षांच्या दीर्घ परिचयानंतर बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही विशेष मला अधिकच ठळकपणाने जाणवत आहेत. बाबासाहेबांच्या स्वभावात एक निरागसपणा आहे. कमालीची ऋजुता आहे आणि वागण्याबोलण्यात घरगुती मोकळेपणा आहे. त्यांनी छत्रपतींच्या बाबतीत जे कार्य केलं आहे त्याला खरोखरीच तोड नाही. पण एवढ्या कर्तृत्वानंतरही त्यांच्या मनात अहंकाराचा कुठे स्पर्श झालेला दिसत नाही. किंवा पुढे पुढे येण्याचा हव्यास धरणे, मिरवणे हेही त्यांच्या वृत्तीत नाही. त्यांना खरोखर कसली हाव नाही. त्यांनी इतके लेखन केले, इतकी व्याख्याने दिली, इतके दौरे काढले पण सगळे द्रव्य 'शिवप्रतिष्ठान'साठी खर्ची घातले. आपला काही स्वार्थ साधला नाही. शिवछत्रपतींविषयी बाबासाहेबांच्या मनात जेवढा आदरभाव आहे तितकी शिवभक्ती आजच्या जमान्यात दुर्मिळच.

बाबासाहेबांनी एकदा म्हटले होते, 'माझे सारे जीवन 'शिवाजी या तीन अक्षरात सामावलेले आहे. त्यांचे उद्गार अक्षरशः सत्य आहेत.त्यांच्याकडे पाहताना मला तर अनेकदा असे वाटते की महाराजांच्या सेवेची इच्छा अपुरी राहिलेला त्यांचा कुणी निकटवर्ती सरदारच तर बाबासाहेबांच्या रूपाने पुन्हा जन्माला आला नसेल ना?

बाबासाहेबांची शिवभक्ती, त्यांचे इतिहासप्रेम अगदी लहानलहान गोष्टींतूनही जाणवत राहते. लग्नकार्यात दागिने खरेदी करताना बाबासाहेबांची पसंती विचारली तर ते शिवकालीन स्वरूपाचे, जुन्या डिझाइनचे दागिने हटकून निवडतील. लेखन करतील, व्याख्याने देतील त्यातल्या भाषेचे वळण अस्सल ऐतिहासिक बखरीतल्या सारखे असेल. पत्र लिहितील त्यात 'राजश्रिया विराजित' या मायन्यापासून ते शेवटच्या 'मर्यादेयं विराजते' पर्यंत सर्वत्र ऐतिहासिक पत्रव्यवहाराचा बाज आढळेल. मंदिरे, शिल्पे, चित्रे, कलाकृती, इमारती बघताना त्यामध्ये काही ऐतिहासिक आहे का हे बाबासाहेबांची नजर शोधकपणे न्याहाळीत असते. बाबासाहेबांचे ऐतिहासिकत्व असे सर्वव्यापी आहे. त्याच्याइतका शिवकालात रमलेला, अंतर्बाह्य इतिहास जगणारा माणूस आज महाराष्ट्रात दुसरा कुणीही नाही. शिवाजी महाराजांचे नुसते नाव काढले तरी बाबासाहेबांना विलक्षण उत्साह चढतो.

बाबासाहेबांच्या आत्यंतिक साधेपणामुळे अनेकांना ते भोळेभाबडे वाटतात. त्यांच्या आंतरिक उत्साहामुळे कुणाला त्यांच्या वर्तनात नाटकीपणाचाही भास होतो. पण वस्तुस्थिती तशी नाही. बाबासाहेबांचा उत्साह हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभावच आहे. ते वरकरणी भाबडे वाटले तरी भोळे नाहीत. माणसांची त्यांना चांगली जाण आहे. कोण कोणत्या हेतूने कसा वागतो, कशी
जवळीक दाखवतो हे त्यांना चांगले समजत असते. पण बाहेरून ते तसे दाखवीत नाहीत. सर्वांशी सारख्याच सौजन्याने, भलेपणाने वागतात.

आपल्या आयुष्याचा एक फार मोठा भाग त्यांनी शिवकार्यात खर्ची घातला आहे. आजही त्यांचे शिवप्रेम तितकेच ज्वलंत आहे. असंख्य कल्पना त्यांच्या मनात उचंबळत आहेत. रायगड- प्रतापगडसारखे शिवकालीन किल्ले त्यांच्या पूर्ववैभवानिशी पुन्हा तरुण पिढीला दाखवावेत, सुप्रसिद्ध डिस्ने लँडप्रमाणे 'शिवसृष्टी' साकार करावी अशी स्वप्ने बाबासाहेबांच्या डोळ्यांसमोर आहेत. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील शिवभक्त जनता आणि महाराष्ट्र शासन यांनी मिळून बाबासाहेबांची ही स्वप्ने सत्यसृष्टीत उतरवण्याचे ठरवले तर त्यात अशक्य ते काय ? आपली स्वप्ने मूर्त झालेली बघण्यासाठी बाबासाहेबांना उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे.

(वयाची साठ वर्षे पूर्ण करून)एकसष्टाव्या वर्षात पदार्पण करीत असतांना भारतरत्न लता मंगेशकर यांनी काढलेले गौरवोद्गार.

✍️ सर्वेश फडणवीस

#शिवशाहीरांची_शंभरी

छायाचित्र सौजन्य - लता मंगेशकर ट्विटर हँडल 

Sunday, August 8, 2021

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव - ११!! 🚩🙏🏼


बाबासाहेबांच्या विविध पैलूंना स्पर्श करतांना त्याचा हा पैलू आपल्यापैकी अनेकांनी अनुभवला असेलच आणि तो म्हणजे दानशूरपणा अर्थात दातृत्व. आपल्याला जमेल तेवढं दान करणं, सतत करीत राहणं ही पुरंदरे घराण्याची परंपरा आहे, आमची ती वहिवाट आहे,तो रिवाज आहे' अशा शब्दांत आनंद व्यक्त करणारे बाबासाहेब त्याबाबतचे तपशील सांगण्यास मात्र कायम संकोच करतात.

सहसा दान करण्याची एकही संधी बाबासाहेब सोडत नाही, असंच त्यांच्या जीवनप्रवासातून दिसतं. मंदिरं, दर्गे, मशिदी, रुग्णालयं, शिक्षणसंस्था, कलावंत,गरीब आणि गरजू,विद्यार्थी, लोककलाकार, सर्व जाती-धर्मातील ज्ञानोपासक अशा सर्वांनाच बाबासाहेबांचे दानशूर हात वेळोवेळी मायेचा आधार देत आले आहेत.आपल्याकडं जे-जे असेल ते-ते समोरच्या गरजू माणसाला देऊन टाकणं. अगदी सणावारी घातलेले अंगावरचे उंची कपडेसुद्धा.इथंपर्यंत बाबासाहेब ज्ञानवंत,दानवंत झालेले दिसतात. समोरच्या व्यक्तीच्या गरिबीला, त्याच्या विपरीत परिस्थितीला जणू काही आपणच जबाबदार आहोत असं मानून त्याच्या बाबतीत जे-जे करता येईल ते-ते करण्याची त्यांची धडपड पाहिली की अक्षरशः थक्क व्हायला होतं. गरजू विद्यार्थ्यांना आपल्या घरी सन्मानानं ठेवून घेऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते करणं ही पुरंदरे घराण्याची परंपरा आहे. या पद्धतीनं पुरंदरे वाड्यात राहून शिक्षण घेऊन आयुष्यात पुढं गेलेल्यांची तर किती तरी उदाहरणं सांगता येतील.

कृतघ्नतेचे अनेकानेक अनुभव पाठीशी असतानाही समाजात जे जे चांगलं घडत असेल तिथं आपली काही तरी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत असली पाहिजे या भावनेतून सुरू असलेलं त्यांचं हे कार्य कल्पनेपलीकडचं आहे, हे त्यांच्या सहवासात राहिल्यानंतरच समजू शकेल. आपण आपल्या एका हातानं केलेली मदत,आपण केलेलं दान हे आपल्या दुसऱ्या हातालाही कळता कामा नये अशी त्यांची भावना असते आणि वयाच्या या टप्प्यावर असतांनाही ते कायम त्यासाठी आग्रही आहेत. याबाबत त्यांच्या स्वभावाचे नेमके वर्णन करणे तसे अवघडच आहे. परंतु 'राजमान्य राजश्री' या त्यांच्यावरील चरित्रग्रंथात काही स्वभाववैशिष्ट्ये नोंदविली गेली आहेत. 

मला नेहमी वाटतं बाबासाहेबांनी कित्येक पिढ्यांसाठी नाव मिळवून ठेवलंय. पण दानशूरपणा इतका आहे, की देता आलं तर हेही दान करून टाकतील. दान करण्याचीसुद्धा त्यांना हौस आहे आणि त्या हौसेला मोल नाहीच. त्यांना कशाची हौस नाहीय, असाच विचार करावा लागेल. त्यांचा स्वभाव अतिशय चेष्टेखोर, मिस्कील. जेवणाऱ्याला आग्रह तर इतका करतात. विचारू नये, जेवण्या -खाण्यात, कपड्यांमध्ये आणि एकूणच त्यांच्या वागण्यात साधेपणा आहे. स्वभावात काही दोषही आहेत पण तेही एक 'माणूस'च आहेत, देव नव्हेत! आणि त्यांच्याजवळ गुण इतके आहेत, की ते या दोषांवर मात करणारे सहज वाटतात. मात्र आम्ही उगाळायला हातात जायफळ घ्यायला हवं, कोळसा नव्हे.काट्यांकडे दुर्लक्ष करून फुलाच्या सुगंधाचा आस्वाद घ्यायला हवा. त्यांच्या स्वत:च्या प्रामाणिकपणाचा, सद्भावनांचा आणि तळमळीचा जर कोणी अपमान केला तर तो अपमान मात्र त्यांना अहोरात्र जिव्हारी झोंबत राहतो. ते कमालीचे अस्वस्थ होतात. मानाची अपेक्षा न करणारा हा माणूस अशा अपमानाने मात्र थोडा खट्टू होतो.

माणसं असामान्यत्वाकडे प्रवास करू लागली, की ती समाजाची अधिक होऊ लागतात. त्यांना नकोसा असला, तरी मोठेपणाचा शिक्का समाज त्यांच्यावर मारू लागतो आणि मग अशा वेळी आपण घरच्या मानापानाच्या, लक्ष-दुर्लक्षाच्या तराजूत त्यांना तोलू नये, रागलोभाच्या मापाने मापू नये, त्यांचं जगच वेगळं असतं! त्यांच्या वागण्याची 'तुला' करणारे आम्ही कोण? आम्ही आमच्या पायरीनेच राहावं हे योग्य नाही का? शेवटी प्रत्येकाच्या पायऱ्या वेगळ्याच असतात, कारण प्रत्येकाचं ध्येयाचं शिखर कमी-अधिक प्रमाणात उंचावर असतं. जगण्याचे मार्ग निरनिराळे असतात. त्यामुळे दुसऱ्याच्या वागण्याला चूक - बरोबर ठरवण्यापूर्वी आपल्या कुवतींचा, आपल्या भूमिकेचा आपण विचार करावा नाही का?"

✍️ सर्वेश फडणवीस

#शिवशाहीरांची_शंभरी

Saturday, August 7, 2021

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव - १० !! 🚩🙏🏼

शिवशाहीर बाबासाहेबांच्या पैलूंबद्दल आपण जाणून घेतांना त्यांच्या छंदांबद्दल वाचलं की आश्चर्य वाटतं. ऐतिहासिक लेखन या छंदासोबत बाबासाहेबांचा आवडता छंद म्हणजे  अश्वपालन अर्थात घोडे पाळण्याचा छंद आहे. लहान-मोठे घोडे बाबासाहेब कायम संग्रही ठेवायचे, त्यांचं पालन- पोषण करायचं, त्यांना प्रशिक्षण द्यायचं, घोड्यावरून रपेट करण्यासाठी आपण स्वतः आपल्या सहकाऱ्यांसोबत मैलोन्मैल लांबपर्यंत जायचं, लहान-मोठ्या युवक- युवतींनाही अश्वारोहणाचं शिक्षण देऊन त्यांच्या स्पर्धा घ्यायच्या हे सर्व उद्योग बाबासाहेबांसारखा इतिहास संशोधक आणि प्रतिभावान ललित लेखक करीत असेल,यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. पण आपल्या छंदासाठी वाटेल तेवढे परिश्रम घेण्याची तयारी आणि त्याबाबतची आवड लक्षात घ्यायची म्हटलं तर हे केवळ बाबासाहेबांनीच करावं असं वाटतं. 

घोडेस्वारी करणे हे भारताच्या, महाराष्ट्राच्या आणि लष्कराच्या इतिहासातलं एक अविभाज्य आणि महत्त्वाचं पान आहे. आज जाणवत नसले तरी पण इतिहासकाळात प्रवासाकरिता आणि मुख्य म्हणजे लढायांसाठी घोड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. मराठी घोडेस्वार हा अटकेपर्यंत जाऊन पोहोचला आणि तोही राजकीय पराक्रमासाठी, ही गोष्ट सामान्य नव्हतीच. आमचे घोडे अटकेपर्यंत गेले होते आणि आपल्या पूर्वजांनी अटकेच्या किल्ल्यावरती मराठी साम्राज्याचे झेंडे रोवले होते याचा अभिमान आजही व्यक्त केला जातो. यामध्ये शूर मावळ्यांचं आणि सहभागी शिलेदारांचं जेवढं कर्तृत्व त्यापेक्षा अधिक घोड्यांचं महत्त्वही लक्षात घ्यायला हवं.

भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात घोड्यांच्या अनेक जाती
आढळतात. छ. शिवाजी महाराजांच्या पदरी विविध प्रकारचे
घोडे होते. पायदळाप्रमाणेच घोडदळ हे सैन्याचं तेव्हाही स्वतंत्र अंग होतं. तोफखाना किंवा हत्तींपेक्षा घोड्याला अधिक महत्त्व होतं. घोडदळ आवश्यक होतं. महाराज आग्र्याला गेले आणि 
औरंगजेबाच्या कैदेत अडकले. तिथून सुटका करून घेतली तो दिवस म्हणजे श्रावण वद्य द्वादशी,१७ ऑगस्ट, १६६६. ऐन पावसाळ्याचे दिवस आणि छत्रपती राजगडावर पोहोचले १२ सप्टेंबरला. म्हणजे २५ दिवसांत. हा प्रसंग बाबासाहेबांकडून ऐकणं म्हणजे अंगावर अक्षरशः शहारे येतील इतकं सुरेख वर्णन बाबासाहेब करतात. अस्मादिकांनी स्वतः हा अनुभव घेतला आहे. घोड्यांचं महत्त्व त्या काळात किती होतं. ते महाराजांनी अचूक ओळखलं होतं आणि बाबासाहेबांनी छंद म्हणून घोडेस्वारी केली आहे. 

घोडा जसा धावतो तसा अडतोही," असं सांगून बाबासाहेब
म्हणतात की, "झाशीच्या राणीच्या अगदी शेवटच्या काळात
घोडा अडला आणि त्या वेळी कराव्या लागलेल्या लढाईत राणी भयंकर जखमी झाली. त्यातच या महान स्त्रीचा शेवट झाला. महाराणा प्रताप हे हळदीघाटीच्या लढाईत पराभूत झाले हे खरंच, पण बचावले तेदेखील एका घोड्यामुळेच."इतकंच काय, पण घोडा आणि कुत्रा यांच्याइतके विश्वासू आणि प्रेमळ प्राणी माणसाच्या जीवनामध्ये क्वचितच आढळतील असंही ते आवर्जून सांगतात.

घोडे उत्तमरीत्या सांभाळण्याबाबत महाराजांनी दिलेली
आज्ञापत्रंही सापडलेली आहेत. घोड्यांना वेळच्या वेळी
खायला घाला, त्यांची नालबंदी व्यवस्थित झाली पाहिजे,
त्यांची औषधं वेळेवर द्या, अशा आशयाचा त्यात उल्लेख
आहे. बाबासाहेबांच्या घरी पण घोडे होते. बाबासाहेबांना तर लहानपणापासूनच घोड्यावर बसण्याची आवड होती. तसे ते बसलेलेही होते, मात्र उत्तमपणे घोड्यावर बसणं अजूनही आपल्याला जमलं नाही असं ते नम्रपणे म्हणतात. 

घोड्यावरून नियमितपणे फिरणारे बाबासाहेब घोड्यावरून पडले आहेत. कारण घोडा हा फार हुशार प्राणी आहे. आपल्या पाठीवर बसलेला माणूस नवखा आहे की जाणकार, हे तो क्षणभरात ओळखतो. काही वर्षांपर्यंत बाबासाहेबांनी सुमारे १५ घोडे सांभाळले. पर्वती पायथ्याशी असलेल्या पुरंदरे वाड्याच्या सध्याच्या पार्किंगच्या ठिकाणी यापैकी काही घोडे बांधलेले असत. त्यामुळं बाबासाहेबांचं घर लगेचच ओळखता येई.

१९७९ च्या दरम्यान घोड्यांच्या खरेदीसाठी बाबासाहेब मुद्दाम पुण्याहून सारंगखेडला गेले होते. प्रत्येकी सात हजार रुपयांना एक याप्रमाणं एक पंजाबी आणि एक काठेवाडी अशी दोन घोडी त्यांनी खरेदी केली. 'समीर' आणि 'समशेर' अशी त्यांची नावं ठेवण्यात आली. बाबासाहेबांचे हे फारच लाडके घोडे होते. 'समीर हा तर तांबडा देवमणी घोडा. बाबासाहेब घरातून निघताना किंवा ते घरी परतल्यावर तो खिऽऽखिंऽऽ असा आनंदानं खिंकाळत असे. कितीही गडबडीत असले तरी ते त्याच्याजवळ जात, त्याला थोपटत. पाठीवरून प्रेमानं हात फिरवत. मगच त्यांचं पाऊल पुढं निघायचं. त्याला त्यांचा अन् बाबासाहेबांनाही 'समीर'चा लळा लागला होता.

हा ‘समीर' घोडा एकदा पर्वतीच्या पायथ्याशी घसरून पडला, तो विकत घेतल्यानंतर सुमारे ४ वर्षांनंतरची म्हणजे १९८३ च्या दरम्यानची ही घटना असावी. पडल्यामुळे त्याचा एक पाय घोट्यात मोडला होता. पुण्यातील रेसकोर्सवरील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले बाबासाहेबांनी औषधोपचारासाठी बराच खर्च केला. रोज स्वतः ते त्याच्या मुखात गूळ, पेढे भरवत असत. परंतु त्याच पाय बरा होणं शक्य नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांना खूप वाईट वाटलं. रेसचा घोडा निरुपयोगी झाला की, त्याला बंदुकीनं गोळी मारून ठार करतात, त्याप्रमाणं या घोड्याचं करावं असा सल्ला एका व्यक्तीनं बाबासाहेबांना दिला.वाक्य ऐकताच त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. काही न बोलताच ते घरात निघून गेले. 'समीर' वर उपचार चालूच ठेवले, त्यातून तो थोडा बराही झाला. मात्र घोडदौडीच्या दृष्टीनं त्याचा आता काहीच उपयोग होणार नव्हता तरीही बाबासाहेबांनी आपल्या कुटुंबाचाच एक सदस्य या मायेनं त्याचा शेवटपर्यंत सांभाळ केला. पुढे वृद्धापकाळान तो मरण पावला. त्या दिवशी त्याच्या कलेवरावरती बाबासाहेबांनी भारीपैकी जरीची शाल पांघरली, त्याला हळद-कुंकू वाहिलं, हार घातला आणि वाकून नमस्कार करून अखेरचा निरोप दिला.  त्या दिवशी बाबासाहेब जेवलेच नाहीत. आजही त्या पाड्याची आठवण निघाली की, आपल्या एखाद्या नातेवाईकाच्या स्मरणानं व्याकूळ व्हावं तसं ते व्याकूळ होतात. आजही दिग्विजय प्रतिष्ठानसारख्या ज्या अश्वारोहण संस्था कार्यरत आहेत, त्यांना बाबासाहेब आवर्जून प्रोत्साहन देत असतात, मार्गदर्शन करत असतात. आंबेगाव येथील शिवसृष्टीत घोडेस्वारी सुरू झाली आहे. 

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, छंद माणसाला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात आणि स्वतःच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन ही देतात. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#शिवशाहीरांची_शंभरी 

छायाचित्र सौजन्य - बेलभंडार मधून साभार

Friday, August 6, 2021

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव - ९ !! 🚩🙏🏼


बाबासाहेबांच्या वाढणाऱ्या वयाबरोबर त्यांचा काम करण्याचा उत्साहही वाढणाराच आहे. या वयातील त्यांचा उत्साह तरुणाईला लाजवेल असाच आहे. कारण शिवसृष्टी चे स्वप्न बघितलेल्या बाबासाहेबांनी ते पूर्णत्वास नेण्यासाठी जगभ्रमंती केली आणि जे जे उत्तम उदात्त उन्नत या न्यायाने सर्वोत्तम असे सारे शिवसृष्टीत आपल्याला बघता यावे यासाठी त्यांचा सततचा ध्यास मंत्रमुग्ध करणारा आहे. पुणे-बंगलोर महामार्गावरील ही शिवसृष्टीदेखील पुण्याचं आणि महाराष्ट्राचं वैभव ठरणार आहे. पुण्याजवळ आंबेगाव येथे त्यांना भव्य स्वरूपात शिवसृष्टी उभी करायची आहे आणि त्याचे १/४ कामही झाले आहे. त्याबद्दल ते म्हणतात,

''माझी भविष्यात काही स्वप्नं आहेत. ती भव्य-दिव्य आणि अफाट आहेत असं म्हणावं लागेल. भव्य तटबंदी असलेला आणि सर्व ऐतिहासिक वैशिष्ट्यं असलेला एक भला-थोरला किल्लाच उभारायचा आणि त्यामध्ये शिवकालीन एका नगराचीच उभारणी करायची असा हा प्रकल्प आहे. तटबंदी, बुरुज, अश्वारोहण केंद्र, व्यायाम शाळा, सिंधुदुर्ग देखावा,खिंड-घाट, लोककला केंद्र, नगारखाना, पालखी दरवाजा, महादरवाजा, बाजारपेठ, पुष्करणी तलाव, वस्तुसंग्रहालय, शस्त्रसंग्रहालय, ध्वनी-प्रकाश योजना, ग्रंथालय,अभ्यासकांसाठी वसतिगृह अशा स्वरूपातील या शिवसृष्टीमध्ये येणाऱ्या शिवभक्तांना अगदी शिवकाळच अनुभवता यावा हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे. इथं दसरा होईल तो शिवकालीन. त्या वेळची जीवनपद्धती इथं सजीव स्वरूपात पाहता यावी, अनुभवता यावी, आपला वैभवशाली इतिहास अन् वारसा नव्या पिढीनं न्याहाळावा आणि त्यांच्या तो जगण्यात उतरावा ही या साऱ्या योजनेमागची तळमळ आहे. सुमारे ९० कोटी रुपयांची ही योजना होती. महागाईने खर्चाच्या अंदाजपत्रकात नेहमीच वाढ होत असते. पण वृक्षारोपण, अश्वारोहण केंद्र इथं सुरू झालं असून पहिल्या टप्प्यातील किल्लेदाराच्या वाड्याचं कामही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

वॅक्स आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या माध्यमातून त्यांना संपूर्ण शिवचरित्र लोकांपुढे मांडायचं आहे. अमेरिकेतल्या 'डिस्नेलँड' सारखी ही शिवसृष्टी असावी, महाराजांच्या बारश्यापासून त्यांच्या निधनापर्यंतचे सारे प्रसंग, घटना आणि विचार त्यातून सर्वांना पाहता यावेत अशी त्यांची इच्छा आहे. शिवकालीन मुलांची खेळणी कशी होती? त्या वेळचे पोषाख कसे होते ? आपले पूर्वज जगले कसे, राहिले कसे, त्यांनी पराक्रम कसा गाजवला, त्यांचे स्वभाव कसे होते, त्या वेळच्या दरबाराचं काम कसं चालायचं, युद्ध कशी व्हायची ? हे सारं सारं आपल्या मुलाबाळांनी पाहावं, त्यांनी थेट शिवकाळातच जाऊन काही काळ जगावं अशी ही भव्य शिवसृष्टी उभारायची झाली तर कमीत कमी २०० एकर जमीन आणि हजारो कोटी रुपयांचं धन लागेल. हा एवढा ऐतिहासिक वारसा आणि बाबासाहेबांसारखा स्वप्नयोगी इतिहासकार युरोप,अमेरिकेत असता तर असे प्रकल्प केव्हाच साकारले असते. आपल्याला याचं राष्ट्रीय महत्त्व ओळखायला, समजायला,जाणवायला आणि मग कृतीत आणायला आणखी काही काळ जावा लागेल असं दिसतं आहे.

पण बाबासाहेबांच्या मनातली शिवसृष्टी आणखी भव्य आहे. त्यासाठी आपल्याला १२५ वर्षांचं तरी आयुष्य हवं असं ते म्हणतात.  'शिवसृष्टी'चे सुंदर सप्तरंगी स्वप्न मी हृदयाशी जपले आहे. हा शिवकालीन क्रांतीचा स्फूर्तिदायक इतिहास जगाने येऊन पाहावा आणि आमच्या तरुणांची मने अभिमानाने पोसली जावीत हीच त्यांची इच्छा आहे.'' खरोखरीच त्यांची स्वप्नं पाहिली की ती पूर्ण करण्यासाठी साक्षात तुळजाभवानीच त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्याचा कृपाप्रसाद नक्की नक्कीच देईल असं आपल्यालाही वाटतं.

एवढे असूनही ते अत्यंत साधेपणाने जीवन व्यतीत करतात. स्वत:बद्दल त्यांच्या कोणत्याच भ्रामक कल्पना नाहीत. उलट ते म्हणतात, "मी विद्वान नाही, पंडित नाही, साहित्यिक नाही, बुद्धिवंत नाही, इतिहास संशोधकही नाही, इतिहासकारही नाही, भाष्यकार नाही. जो काही आहे, तो वरच्या गावरान महाठी सरस्वती भक्तांच्या केळीच्या पानावरच्या, त्यांच्या जेवणातून उरलेल्या चार शिताभातांवर गुजराण करणारा येसकर आहे." लौकिक आयुष्यातील अफाट लोकप्रियतेनंतरही बाबासाहेब स्वत:ला सरस्वतीच्या पायीचा नम्र सेवक आणि येसकर समजतात, हे समजल्यावर त्यांच्या मनाच्या आणि मानाच्या मोठेपणाची कल्पना येते.

✍️ सर्वेश फडणवीस

#शिवशाहीरांची_शंभरी

Thursday, August 5, 2021

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव - ८ !! 🚩🙏🏼

शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल जाणून घेतांना त्यांच्या 'जाणता राजा' या महानाट्याविषयी माहिती नसलेला व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.१९८५ मध्ये बाबासाहेबांनी एक नवीनच प्रयोग- लेखन, दिग्दर्शन, सादरीकरणामध्ये केला. तो म्हणजे 'जाणता राजा' या महानाट्याचा. समर्थ रामदासस्वामींनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेका प्रसंगी लिहिलेल्या पत्रातील 'जाणता राजा' हे संबोधन म्हणजे या नाटकाचे शीर्षक होय. बाबासाहेबांनी 'जाणता राजा' हे शिवाजी महाराजांवरील नाटक लिहिले आणि ते रंगमंचावरही सादर केले. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे हे 'बॅले' स्वरूपाचे महानाट्य मानले जाते. याचे आतापर्यंत काही हजार प्रयोग झाले आहेत.

आज पिढीदरपिढी जाणता राजा महानाट्य घराघरात कुळाचाराचा भागच झाला आहे. दरवर्षी जिथे कुठे प्रयोग असतील तिथे गर्दी ही आपसूक असतेच.अस्मादिकांनी २००९ मध्ये जाणता राजाच्या प्रयोगात भाग घेतला होता. त्यावेळी १ महिना तालमी असताना प्रत्येक तालमीला शिवशाहीर बाबासाहेब स्वतः जातीने उपस्थित असायचे नव्हे आजही प्रत्येक प्रयोगाला  ते उपस्थित असतात. दिलेल्या वेळी हवेतर ५ मिनिटे आधीच ते उपस्थित राहत. मग तालमी सुरू असतांना ते काहीकाळ शिवकाळात घेऊन जात असत. ते दिवस आजही स्मरणात आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचं आणि आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाचं महानाट्य असलेल्या 'जाणता राजा'नं काही विक्रम तर मोडलेच, पण भारतीय नाट्यशास्त्र, इतिहास, परंपरा आणि आधुनिक तंत्र यांची जी सांगड घातली ती अत्यंत प्रभावी आहे.


हे नाटक हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये भाषांतरित झाले व पुण्यापासून ते दिल्ली,आग्रा,बडोदा, अहमदाबाद, मध्य प्रदेशापर्यंत त्याचे हिंदी प्रयोग व अमेरिकेमध्ये इंग्रजी प्रयोग झाले आहेत. बाबासाहेब व्याख्यानानिमित्त अनेकदा परदेशी गेले. त्यानंतर 'जाणता राजासाठी' गेले. एकदा 'फिलाडेल्फियाला'ला ते गेले असताना त्यांच्या त्या भेटीबद्दल आपल्या 'ठसे माणसांचे' या पुस्तकात मीना नेरूरकर लिहितात,

"फिलाडेल्फिया आर्ट म्युझियमची बिल्डिंग पाच मजले उंचीची आहे. आत गेल्यावर एखाद्या बालकाच्या उत्साहात बाबासाहेब दालनं पालथी घालत होते. पाचांपैकी तीन मजल्यांवरच्या बहुतेक सर्व गोष्टी बाबासाहेबांना परिचित होत्या. सगळी जुनी शस्त्रास्त्रे, मूर्ती, एवढेच नव्हे तर चित्रांबद्दलदेखील त्यांना सगळं ज्ञात होतं. ती कुठच्या काळची आहेत, कोणी केली आहेत ह्याची त्यांना तपशीलवार माहिती होती. एक चित्र तर त्यांनी लांबूनच बघून सांगितलं की हे काचेवर काढलेलं चित्र आहे म्हणून. मला तर ते चक्क चांगलं हँडमेड कागदावर काढलेलं, काचेची फ्रेम असलेलं चित्र वाटत होतं. मला वाटलं, की यांना दृष्टिभ्रम झाला असेल. पण अहो आश्चर्यम्, मी जवळ जाऊन त्या चित्रावरची माहिती वाचली तर ते चित्र काचेवर काढलेल्या जगातल्या काही अस्तित्वात असलेल्या चित्रांपैकी एक होतं. तशीच एका मूर्तीबद्दलची मजेशीर हकिगत! म्युझियमच्या एका दालनातून दुसऱ्या दालनात जाताना दाराशी लावलेली एक मूर्ती भारतीय होती. बाबासाहेबांनी केवळ दाराशी असलेल्या तिच्या स्थानावरून ती किती सालची असेल, कशासाठी घडवली असेल वगैरे सगळे डिटेल्स मला सांगितले. नंतर नंतर मला तो एक खेळच झाला. कसली तरी कोपऱ्यातली एखादी छोटीशी मूर्ती वा एखादे वेगळं दिसणारं शस्त्र मी बाबासाहेबांना ओळखायला सांगायचे. निमिषार्धात ते त्याबद्दलचा सगळा तपशील व्यवस्थित त्याच्या इतिहासासकट सांगायचे. कधीकधी तर त्या वस्तूच्या शेजारी लिहिलेल्या माहितीपेक्षा जास्त माहिती बाबासाहेबांना माहीत असायची. त्यांच्या अथांग, अगाध ज्ञानाने मी इतकी अवाक्, थक्क किंवा जे काही होतात तशी झाले होते, की त्या तिथे मी त्यांना केवळ लोटांगण घालायचं बाकी ठेवलं होतं. म्युझियमची सफर या विषयाचा जर काही अभ्यासक्रम असेल तर त्यातली पीएच. डी. मी एका मिनिटाचाही विचार न करता बाबासाहेबांना देईन."

इ. स. १८६१ मध्ये पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेले विनायक जनार्दन कीर्तने यांचे 'थोरले माधवराव पेशवे' हे मराठीतील पहिले ऐतिहासिक नाटक. त्यानंतर अनेक ऐतिहासिक नाटके लिहिली गेली. एकट्या शिवाजी महाराजांच्या चरित्राचा विचार केला तर अशी जवळपास दीडशे नाटके लिहिली गेली आहेत. शिवचरित्रावरील बालनाटकांची संख्याही पंधरा-वीस आहे. म्हणजे शिवचरित्रावरील नाटकांची एक लांबलचक परंपराच मराठीत आढळते. 'जाणता राजा' या बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या शिवजन्मपूर्व ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा विस्तृत आलेख आलेला आहे, असे हे एकमेव नाटक आहे असे म्हणण्यास हरकतच नाही.

खरंतर आज जगभरात मराठी माणूस विस्तारित झालेला आहे. लता मंगेशकर आणि भीमसेनजींचं गाणं न ऐकलेला, पुलंचे विनोद ऐकून न हसलेला, बाबासाहेबांचं शिवचरित्र न वाचलेला, त्यांची व्याख्यानं न ऐकलेला, सचिनचं क्रिकेट न पाहिलेला आणि आता म्हणावं लागेल 'जाणता राजा' न पाहिलेला जगाच्या पाठीवर कुणीच भेटणार नाही. 

गेल्या ३६ वर्षांत हजारो प्रयोग झालेलं, होत असलेलं आणि कोट्यवधी प्रेक्षकांनी पाहिलेलं हे मराठीतलं एकमेव महानाट्य. सामान्य शिवभक्तापासून ते पंतप्रधानपदावर असताना अटलजींसारख्या साहित्यप्रेमी कवीनं 'जाणता राजा' पाहिले. आणि बाबासाहेबांच्या अफाट उत्तुंग, प्रतिभेला हर एक प्रकारे दाद दिली. पु. ल. देशपांडे 'जाणता राजा' बघायला आले. प्रयोग पाहून ते म्हणाले, मी 'जाणता राजा' पाहायला पुन्हा कधी तरी येणार आहे. आज मला ते पूर्ण पाहता आलं नाही. कारण ते पाहताना माझ्या डोळ्यातून वारंवार अश्रू येत होते. हे ऐकल्यावर बाबासाहेबांनी त्यांना वाकून नमस्कार केला आणि हीच जादू महानाट्य बघतांना मराठी मनावर अधिराज्य गाजवणारी आहे. 

ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर नेहमी म्हणतात, 'नोबेल पुरस्कार मिळवणं हा भारतीयांचा छंद झाला पाहिजे.' नोबेल पुरस्कार टागोरांच्या रूपानं मिळाला, त्याचीही चोरी होते. तेही आपण नीट सांभाळू शकत नाही. इतिहासापासून आपण कोणता बोध घेतो? याचा आपणच बारकाईनं विचार केला पाहिजे. इतिहास हा केवळ लढाया आणि सनावळ्या लक्षात ठेवण्यासाठी नसतो, त्यापासून वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ घडवायचा असतो आणि 'जाणता राजा'ची हीच शिकवण आहे. इतिहासाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन हे महानाट्य आपल्याला देत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र म्हणजे केवळ मुजरे, लढाया आणि राज्याभिषेक एवढ्यापुरतं नाही. तर त्यांचा राज्यकारभार, प्रशासन, त्यांचं युद्धशास्त्र, माणसं हेरण्याचं आणि त्याला योग्य कामगिरी सोपवण्याचं त्यांचं कसब, त्यांची भविष्याकडं लागलेली नजर, राज्यविस्ताराच्या त्यांच्या योजना, प्रजेची काळजी, कायम सावधपणा, समाजातील साधू-सज्जनांप्रती त्यांच्याजवळ असलेला आदरभाव, मेल्यावरही शत्रूचा अपमान न करण्याची त्यांच्याकडील उदात्त माणुसकी, आपल्या सहकाऱ्यांवरील प्रेम, निष्ठावंतांचं आणि कर्तबगार मंडळींचं खुद्द महाराजांकडून आठवणीनं केलं जाणारं कौतुक यासाऱ्या गोष्टींकडं सूक्ष्मपणे पाहिलं पाहिजे. आणि या सगळ्याचे सार म्हणजे 'जाणता राजा'.. कारण या महानाट्यातील प्रत्येक प्रसंगातून  या साऱ्या गोष्टी प्रतिबिंबित झाल्या आहेत.

✍️ सर्वेश फडणवीस 

#शिवशाहीरांची_शंभरी 

Wednesday, August 4, 2021

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव - ७ !! 🚩🙏🏼


शिवशाहीर बाबसाहेबांच्या विविध पैलूंबद्दल आपण जाणून घेतोय. आज त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा आणि आवडता विषयावर जाणून घेणार आहोंत तो म्हणजे व्याख्यान..

मराठी भाषेच्या आणि वक्तृत्वाच्या इतिहासात बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे हा एक स्वतंत्र विषय मानावा लागेल. गेली पाच तपे हजारोंच्या संख्येने मराठी माणसे बाबासाहेबांच्या व्याख्यानांना हजर असतात. शहरे,खेडी,सहकारी कारखाने, वाड्या, वस्त्या यातून व्याख्यानाच्या दिशेने माणसांची रीघ लागलेली दिसते. आजच्या काळात तिकिटे ठेवून व्याख्यानमाला चालणे कठीण, अशाही काळात आठ-आठ, दहा-दहा हजार श्रोते सात दिवसांच्या व्याख्यानमालेला नियमित येतात, ही पुरंदरे यांच्या वक्तृत्वाला निळालेली सार्थ अशी पावती आहे. तीच ती व्याख्याने पुन:पुन्हा ऐकवण्याचा आग्रह त्यांना होत असतो. ही गोष्ट व्याख्यानांच्या बाबतीत दुर्मीळ आहे. त्यांच्या वक्तृत्वाने प्रादेशिक सीमा ओलांडल्या आहेत. त्यांच्या व्याख्यानांनी दुबई, अमेरिका, इंग्लंडपर्यंत विक्रम केले आहेत. त्यांच्या वक्तृत्वाचा लाभ तीन पिढ्यांना झाला आहे. शिवाय ध्वनिमुद्रणाच्या रूपाने जतन करून तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचलेला आहे नव्हे या तांत्रिक युगात पोहोचत राहील. बाबासाहेबांची ही वक्तृत्वकला त्यांनी लहानपणापासून ऐकलेल्या व स्वत: केलेल्या कीर्तनातून उदयास आली आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती'चे लेखक म्हणून जशी रूढ ओळख आहे, त्याचप्रमाणे त्यांचा अधिकतर लौकिक 'शिवशाहीर' असा आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे बाबासाहेबांनी इतर व्याख्याने वगळता फक्त शिवचरित्रावर सुमारे बारा हजार व्याख्याने दिलेली आहेत. त्यांची ही व्याख्याने म्हणजे नेपथ्याविना केलेला 'एकपात्री प्रयोग' म्हणता येईल. त्यातील अभिनय,
त्याचप्रमाणे त्यांच्या लिखित व्याख्यानांचा वाङ्मयीन अभ्यास करण्याचा प्रयत्न येथे केला आहे. त्यांनी इतिहासावरचे शेकडो ग्रंथ वाचले, हजारो कागदपत्रे चाळली. ऐतिहासिक तपशिलाच्या बाबतीत सदैव दक्ष असल्यामुळे त्यांचे प्रत्येक विधान हे साधार असते. ते गडकोट पायी फिरले. एकेक गड अनेक वेळा चढले-उतरले. कसली प्राप्ती नाही; कोणाकडून अनुदान नाही. रक्त आटवीत मनाच्या तडफडीने ते कशाचा तरी शोध घेत, वेध घेत भ्रमंती करीत राहिले. व्यासंगाने आणि एका जीवननिष्ठेने काठोकाठ भरलेले बाबासाहेबांचे मन हे त्यांच्या वक्तृत्वाचे उगमस्थान मानावे लागेल.

शिवचरित्र गाताना त्यांच्या वाणीतून वैनगंगा, पैनगंगा, बाणगंगा, गोदा, कृष्णा, पूर्णा आणि इंद्रायणी या महाराष्ट्राच्या गंगा त्यांच्या जिव्हेतून दूधसागराप्रमाणे फेसाळत बाहेर पडत आहेत की काय, असा साक्षात्कार होतो. शिवरायाच्या अथांग पराक्रमाचा इतिहास मराठी लोकांच्या अंगणापर्यंत पोहोचवला पाहिजे, हृदयापर्यंत धडकला पाहिजे, इतकेच नव्हे तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे हाच त्यांचा अट्टहास आहे.

१९५४ च्या नोव्हेंबर महिन्यात पुस्तकविक्रीसाठी बाबासाहेब नागपूरला आले होते. तिथे राजाराम सीताराम दीक्षित ग्रंथालयात त्यांचे व्याख्यान झाले. तेच त्यांचे पहिले सार्वजनिक व्याख्यान. त्यानंतर मात्र व्याख्यानांच्या भरतीची लाट त्यांना थोपविता आली नाही. अनेक विक्रम करत आणि ते मोडत त्यांनी आत्तापर्यंत सुमारे बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत.
शिवजन्मपूर्वकाळापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा काळ घेऊन त्यावर सलग सात दिवस रोज दोन तास याप्रमाणे त्यांची तिकीट लावून व्याख्याने असत. एका वेळी सुमारे ५ ते ७ हजार श्रोतृसमुदाय त्या व्याख्यानाला हजर असे. या व्याख्यानाला बाबासाहेब स्वत: तिकीट काढून जात. या व्याख्यानमालांतून जमा झालेले कोट्यवधी रुपये त्यांनी शैक्षणिक संस्था, रुग्णालयांना दान केले.

यशवंतराव चव्हाण याबद्दल म्हणाले होते,"शिवचरित्र त्यांच्या वाणीतून निथळत असे. पैसे देऊन व्याख्यान ऐकणं ही नवीन परंपरा त्यांनी महाराष्ट्रात निर्माण केली. सतत पंचवीस वर्षं एकाच विषयाचा ध्यास घेऊन कार्य करीत राहणारी माणसं कमी आढळतात. त्यात बाबासाहेबांचं नाव अग्रभागी राहील. विषय एक आणि वक्ताही एक अशी साठ वर्षे व्याख्याने देण्याचा त्यांनी केलेला विक्रम अपूर्व आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहास जागरणापूर्वी थोडा काळ अगोदर नागपूरच्या बाळशास्त्री हरदासांची भाषणे महाराष्ट्रात गाजत राहिली. स्वत: बोलत बोलत इतरांना जो बोलते करू शकतो, तो खरा वक्ता! बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानात तल्लीन श्रोत्यांचा सहभाग मोठा असतो. त्यांच्या वक्तृत्वाबद्दल ना. सं. इनामदार म्हणतात, "गेली पंचवीस वर्ष बाबासाहेब आपल्या अमोघ वाणीनं शिवचरित्र महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचवीत आहेत. दहा-दहा हजारांच्या सभा त्यांचं वक्तृत्व मंत्रमुग्ध होऊन ऐकत आहेत, राजकारण्यांनी हेवा करावा असा प्रचंड लोकसमुदाय बाबासाहेबांचे शब्द ऐकण्यासाठी आसुसलेला असतो. अखिल हिंदुस्थानात जिथं जिथं मराठी माणूस आहे, तिथं तिथ  बाबासाहेबांनी शिवचरित्र कथन करून मराठी अस्मिता जागी केली आहे."

शिवाजीराव भोसले यांनी त्यांच्या व्याख्यानांचे कौतुक करताना म्हटले आहे की, ''एका व्यक्तीने एकाच विषयावर हजारो व्याख्याने दिली, हे स्पृहणीय आहे. बाबासाहेब पुरंदरे! एक व्यक्ती की संस्था हे उमगत नाही. व्यक्ती म्हणावे तर कार्य महाराष्ट्रभर विस्तारले आहे. संस्था म्हणावे तर तिला शाखा नाहीत, एका खांबावर उभी असणारी वर्तमानकालातील ही द्वारका आहे. जे पेरले ते उगवते असे म्हणतात; पण याला एक अपवाद आहे. बाबांनी इतिहासाचे वेड पेरले आणि त्यातून ऐतिहासिक जाणिवांनी बहरलेले राष्ट्रप्रेमाचे मळे उभे राहिले. या महाराष्ट्रभूमीस असा मुलखावेगळा माळी भेटावा ही भाग्याची बाब म्हटली पाहिजे. बाबा म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साक्षात सर्वज्ञता. पण या सर्वज्ञतेने पांडित्याची वस्त्रे परिधान करणे नाकारले. डफावर थाप देऊन देश जगविणाऱ्या शाहिराची वसने त्यांनी पसंत केली. परमपवित्र अशा सगुण चरित्राची चैतन्यशाली शाहिरी करायची ती बाबांनी शाबास,शाहिरा शाबास इतिहासानेसुद्धा तुला मुजरा करावा एवढा मोठा माणूस तू या सत्वहीन, तत्त्वहीन जगात शिवतत्वाचा जागर करीत रहा, तुझ्या या जागरणाला महाराष्ट्राची सारी दैवते जातीने हजर राहतील, तुझ्या शिवकथेत... न्हाऊन निघालेला महाराष्ट्र  आपल्या तेजस्वी इतिहासाची पुनरावृत्ती घडवील आणि खंडतुल्य अशा या प्रजासत्ताकास आनंदवनभुवनाचे ऐश्वर्य प्रदान करील हे सर्व घडावे, यासाठी, हे इतिहासपुत्रा, शतायुषी हो।"

बाबासाहेबांच्या भाषणात व्यासंग तर आहेच पण लालित्य आहे, सतत झुळझुळत वाहणारा विनोदाचा प्रवास आहे आणि या सगळ्यांचा पाया आहे राष्ट्रीय पुनरुत्थानाचा विचार. ही शिवचरित्राची गाथा जो जो कोणी वाचील तो तो उचंबळून येईल, थरारून जाईल आणि त्याचबरोबर राष्ट्रप्रेमाची ठिणगीही
त्याच्या मरगळलेल्या मनात पडेल.

या व्याख्यानामागील  दृष्टिकोन त्यांच्याच शब्दात सांगायचा
झाल्यास तो असा सांगता येईल. "छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि एकूणच शिवकाल यांच्याकडे आपण डोळसपणे बघायला शिकले पाहिजे. केवळ भावनेच्या आहारी जाऊन जयजयकारात गुंतून पडण्यात काही अर्थ नाही महाराज हे युगपुरुष होते. पण आपण त्यांना देव मानू लागलो. त्यांची पूजा
करतो. एकदा देवत्व बहाल केले की आपले काम झाले असे आपल्याला वाटते. शिवचरित्रातील प्रेरणादायक प्रसंगांच्याही पलीकडे जाऊन आपण शिवाजी महाराजांच्या विचारांचा, विवेकाचा, श्रद्धांचा आणि मूल्यनिष्ठेचा शोध घेतला पाहिजे. हार, तुरे, पालख्या आणि पुतळे यांतच गुंतून पडण्यापेक्षा शिवचरित्रातील विचारधनाचे अनुकरण व आचरणच आज गरजेचे आहे.

✍️ सर्वेश फडणवीस

#शिवशाहीरांची_शंभरी

Tuesday, August 3, 2021

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव - ६ !! 🚩🙏🏼

श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले 'राजा शिवछत्रपती' हे शिवचरित्र अत्यंत लोकप्रिय ठरले. आजही अनेकजण त्याची पारायणं करतात.१९५८ मध्ये लिहिलेल्या या शिवचरित्राच्या वीस हुन अधिक आवृत्या प्रकाशित झाल्या आहे. बाबासाहेबांच्या शिवचरित्राला एवढी प्रचंड लोकप्रियता लाभण्याचे पहिले कारण अर्थातच शिवरायांसारखा चरित्रनायक हेच आहे. शिवचरित्राचे लेखन करताना इतिहासाशी प्रामाणिक राहून त्यांनी लेखन केले. महाराष्ट्रातल्या तरुणांना नवीन इतिहास निर्माण करण्याची प्रेरणा या शिवचरित्रातून मिळाली पाहिजे, या एकाच निर्धाराने त्यांचे लेखन झाले आहे. 

शिवचरित्र लिहिताना नवनवोन्मेषशालिनी महाराष्ट्रशारदा जणू काही त्यांच्या सर्वांगात संचारलेली आहे असे वाटते. हे शिवजन्माचे आख्यान मांडताना चंडमुंडभंडासुरखंडिनी जगदंबा, उदंडदंड महिषासुरमर्दिनी दुर्गा आणि महाराष्ट्रधर्मरक्षिका तुळजाभवानी ह्याच जणू आपल्या आशीर्वादाचे हात त्यांच्या डोक्यावर धरून उभ्या आहेत असा भास होतो आणि हेच आशीर्वादाचे संचित त्यांच्या लेखणीची ताकद असावी असे वाटते. शिवचरित्रापेक्षा महाराष्ट्राला अधिक पवित्र, अधिक मादक किंवा अधिक उत्तुंग असे काही नाही. हिमालयाची उंची, गंगेची विशालता आणि काश्मीरचे सौंदर्य शिवचरित्रावरून ओवाळून टाकावे, एवढी त्याची योग्यता आहे.

'राजा शिवछत्रपती' या चरित्रलेखनामागची स्वत: बाबासाहेबांची भूमिका काय होती? ते सांगतात, ''शिवचरित्र हे कुणा एका व्यक्तीचे चरित्र नाही. ते चरित्र म्हणजे राष्ट्रधर्म आहे. समाजधर्म आहे. शत्रूशी कसे वागावे आणि स्वराज्यासाठी, सुराज्यासाठी मित्राच्या जिवाला जीव कसा द्यावा हे सांगणारे ते एक शास्त्र आहे. तत्त्वज्ञान आहे. विद्वत्ता गाजविण्यासाठी आणि शाली-मशालीचा मान मिळविण्यासाठी ही अक्षरे मी लिहिलेली नाहीत. मी हे शिवचरित्र एका सूत्रान्वये लिहिलेले आहे. "शिवाजीराजा.... एक प्रेरक शक्ती' हे ते सूत्र होय."

छत्रपती सुमित्राराजे भोसले लिहितात, ''साहित्यिक जर व्रतस्थ
आणि महत्त्वाकांक्षी बनतील तर राष्ट्रही व्रतस्थ आणि महत्त्वाकांक्षी बनेल." हे वाक्य जणू बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करणारे आहे. पुढे त्या लिहितात, "ही साहसकथा चितारण्याच्या मागे बाबासाहेबांच्या मनातील हेतू..तरुणांच्या मनात साहसांची आवड निर्माण व्हावी हा आहे. त्यासाठी आधी त्यांनी स्वत: रायगड आणि सर्वच किल्ले अनेक वेळा चढले-उतरले. हा उद्योग कशासाठी तर आपले लेखन आणि वक्तृत्व जिवंत आणि प्रत्ययकारी व्हावे यासाठी!" बाबासाहेबांच्या लेखनामागील त्यांची भूमिका म्हणजे त्यांचे बोलके वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वच होय.

गो. नी. दांडेकर 'राजाशिवछत्रपती' या चरित्राबद्दल लिहितात, ''बखरींचा अभ्यास तर अनेकांनी केला आहे. पण आज शब्दकळा कुणाजवळ? बाबाचे शिवछत्रपती वाचू लागावे, तर भरजरी पाटाव नेसलेली, कानी-नाकी अलंकार ल्यालेली, वज्रचुडा पहेनलेली, कुण्या कुळवंताची कुळवंतीच हाती नीरांजन घेऊन उभी आहे, असा भास होऊ लागतो. बाबाने अवघ्या बखरी वाचल्या आहेत. अवघे शिवचरित्रसाहित्य साक्षेपाने, पदरमोड करून धांडोळले आहे आणि मग एक नवी लखलखीत, तेजाने पुंजाळलेली समप्रमाण बखरच लिहिली आहे! धन्य आमची पिढी, की तिच्यात बाबासारखा बखरकार जन्मास आला!"

बाबसाहेबांच्या लेखनाबद्दल  पु. ल. देशपांडे आपल्या 'गणगोत'
या पुस्तकात म्हणतात, ''इतिहास हा आम्ही हातच्या कागदपत्रा इतक्याच वयाने आणि त्याहूनही मनाने जीर्ण लोकांवर सोपवलेला विषय समजतो, रुमालात बांधून ठेवायचा,वर्गातही विद्यार्थ्यांच्या अंगी तो न लागता घोकंपट्टीत घुसवायचा . अशा वेळी शिवचरित्राच्या रूपाने त्या इतिहासाचे पाठ लोकमानसात नेऊन सोडणाऱ्या पुरंदरे यांचे खूप कौतुक व्हायला हवे होते. त्यांनी इतिहासकाराची पंडिती पगडी चढवली नाही. कुणाही पंडिताने धन्योद्गार काढावे इतका अभ्यास केला आणि मांडला मात्र गद्य शाहिरासारखा, त्या चरित्राला ते आधारपूर्वक लिहिलेली बखर म्हणतात, "इतिहास हा माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळण्यापर्यंत गेला पाहिजे. इतकंच नव्हे, तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे," असे म्हणणारा हा इतिहासकार मला तरी आमच्या आजवरच्या भारतीय इतिहासकारांपेक्षा एक निराळी- लोकशाहीला अत्यंत पोषक अशी- भूमिका घेऊन उभा राहिलेला दिसतो. ह्या माणसाचे इतिहास संशोधन भोवतालची ओजहीन, जिद्द नसलेली, मरगळलेली समाजपरिस्थिती पाहून उठलेल्या वेदनेतून झाले आहे आणि म्हणूनच संशोधनाने इथे साहित्यकलेच्या क्षेत्रात मानाचे पान मिळवले आहे. हा बखरकार आहे. इतिहासकार आणि बखरकार ह्यांच्यात वेदान्ती आणि कीर्तनकाराइतकाच फरक असला तरी शेवटी कीर्तनकारच तो वेदान्त लोकांपुढे संतांच्या सोप्या उत्तरांनी मांडीत असतो, वेदान्ती अभ्यासात रंगतात, कीर्तनकार निरूपणात! बाबांची भूमिका निरुपणकाराची आहे; पण कथांना भाकडकथांची जोड देणाऱ्या कथेकरी बुवाची नाही. शिवरायांविषयीच्या भावना त्यांनी शास्त्रकाट्याच्या कसोटीवर घासून अधिक तेजस्वी केल्या आहेत.

बाबासाहेबांच्या मनोगतातून त्यांचे लौकिक आणि वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीतले मर्म उलगडत जाते. ते मनोगत असे आहे, "मी इतिहासाचा एक लहानसा विद्यार्थी आहे. हा शिवशाहीचा इतिहास मी महाराष्ट्र रसात महाराष्ट्राच्या कडेपठारांवर गात हिंडतो आहे. इतिहास हा पाचवा वेद आहे पण मी वेदांती नाही. मी विद्वान नाही. मी गोंधळी आहे. मी इतिहासकार नाही. अभ्यासपूर्वक इतिहास गाणारा मी एक शाहीर आहे. मी बखरकार आहे, इतिहासाचा अभ्यास मांडणे आणि इतिहासाचा उपयोग सांगणे ही या पाचव्या वेदाच्या वैदिकांची मुख्य कामे असतात. या इतिहास वेदाचा अभ्यासपूर्वक व पथ्यपूर्वक उपयोग करण्याचे व्रत घेतलेला मी एक कलावंत आहे. मला माझ्या व्रताची अतोनात आवड आहे, हौस आहे. अभिमान आहे. मी या पुण्यात जन्मलो, रांगलो, खेळलो. या पुण्यातील मंडईत गाणाऱ्या गोंधळ्यांचे पोवाडे ऐकले. भजने, लळिते, मेळे आणि लावण्या ऐकल्या. मी त्यात रंगलो. तो रंग माझ्या अंत:करणावर पडला, तो पक्काच जडला. माझ्या तनमनाला लागलेला खंडोबाचा भंडारा, भवानीचा मळवट, ज्ञानेश्वर- तुकारामांचा अबीरबुक्का आणि मंडईच्या गणपतीचा अष्टगंध गुलाल, मी साती समुद्राच्या पार पोहून गेलो-आलो असलो तरी थोडासुद्धा धुतला जाणार नाही. पुढे ते म्हणतात, ...या वेळी आणखी एक विचार मनात येतो, की हे जग सोडून आपल्याला केव्हातरी जायचे असते आणि मग आपल्याबरोबर काय येते? इमले, बंगले, गाड्या, धनदौलत, सोने-नाणे सारे सारे काही इथे राहते, असे असताना मग समाजऋण फेडण्याची कसूर का करायची?

✍️ सर्वेश फडणवीस

#शिवशाहीरांची_शंभरी

Monday, August 2, 2021

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव - ५ !! 🚩🙏🏼

शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांच्या शताब्दी उत्सवात आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूबद्दल जाणून घेतो आहे. याच धारेत आज त्यांच्या वाङ्मयावर चिंतन करता जे जाणवले ते अचंबित करणारे आहे. बाबासाहेबांनी विविध लेखन प्रकारांत, प्रासादिक भाषेत अत्यंत मौलिक अशी साहित्यनिर्मिती केलेली आढळते. राजा शिवछत्रपती हा ग्रंथ जगाच्या पाठीवर असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या संग्रही असेल यात शंकाच नाही. 

खरंतर लेखक ज्या काळात आपल्या साहित्यनिर्मितीला प्रारंभ करतो, त्या काळातील वाङ्मयीन वातावरणाचा त्यांच्या वाङ्मयावर खोल परिणाम होत असतो. बाबसाहेबांच्या वाङ्मयात संपूर्णपणे इतिहासाविषयी आणि त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आस्था, भक्ती, कुतूहल, अभिमान आढळतो. परंपरेच्या इतिहासाच्या अनोळखी अंधाऱ्या वाटेने जात त्यातील व्यक्तिमत्त्वाचा शोध त्यांनी घेतला. इतिहासातील व्यक्तींच्या सुखदुःखांचा, त्यांच्या मनाच्या स्फुट- अस्फुट पैलूंचा शोध त्यांनी घेतलेला आढळतो. याचा अर्थ असा मात्र नव्हे, की त्यांचे वाङ्मय समकालाशी समरस होऊ शकत नाही. ते तसे समरस होत असले तरी यांच्या लिखाणाचा मूळ हेतू, गाभा अधिकतर ध्येय- ध्यास हा शिवकालावरील लेखनाचाच आहे. शिवभक्ती हा त्यांचा श्वास आहे.अर्थात काळापेक्षाही मानवाचे मूलभूत सुखदुःख, त्याचे अंतरंग, त्याच्या श्रद्धा, धर्म या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक काळ हा साहित्याला आव्हानच असतो. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य हे तिन्ही काळ साहित्यातील सौंदर्याच्या दृष्टीने सारखेच अर्थपूर्ण असतात.

ब. मो. तथा बाबासाहेब पुरंदरे यांनी 'मुजऱ्याचे मानकरी', 'जाळत्या ठिणग्या','सावित्री', 'पुरंदरच्या बुरुजावरुन', 'पुरंदांची नौबत', 'पुरंदऱ्यांची दौलत', 'पुरंदऱ्यांचा सरकारवाडा', 'कलावंतिणीचा सज्जा' हे कथासंग्रह, 'लालमहालातील लक्ष्मी', 'मी रायगड बोलतोय', 'झुंजारबुरुज', 'महाराजांची राजचिन्हे' ही छोटी पुस्तके आणि 'आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे' ही वृत्तपत्रातील लेखमाला, 'राजा शिवछत्रपती' हे शिवचरित्र, 'महाराज' हे सचित्र शिवचरित्र, 'आग्रा', 'पुरंदर', 'लालमहाल', 'सिंहगड', 'पन्हाळगड', 'राजगड', 'प्रतापगड' ही गडसंचातील सात पुस्तके, "शिलंगणाचं सोनं', 'शेलारखिंड' या दोन कादंबऱ्या, 'जाणता राजा' हे महानाट्य असे लेखन केले आहे. बाबासाहेबांनी १९५२ ते १९६० या कालखंडात भारत इतिहास संशोधक मंडळात केलेली नोकरी म्हणजे एक सुवर्णसंधी ठरली. वास्तविक तेथील दप्तरे, ऐतिहासिक कागदपत्रे अनेकांनी वाचली, अभ्यासली असतील. परंतु बाबासाहेबांनी त्यांचा योग्य तो उपयोग करून, माहितीचा आधार घेऊन आपल्या साहित्याची निर्मिती केली. म्हणजे सुवर्णकण वेचून त्यातून सुरेखसे, नक्षीदार, टिकाऊ अलंकार निर्माण केले आणि आज जगभरातील मराठी घराघरात ही ग्रंथसंपदा मोठ्या सन्मानाने मिरवते आहे,  वाचण्यासाठी खुणावते आहे.

ज्या काळात ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, ग. दि. माडगूळकर, प्र. के अत्रे असे अनेक सिद्धहस्त लेखक अजूनही साहित्यप्रांत गाजवत होते, त्याच काळात बाबासाहेब शिवध्यासाने आपले लेखन करीत होते. त्यांच्यावर मुख्य प्रभाव होता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, भालजी पेंढारकरांचा आणि त्यांच्या हृदयात वास करीत होते संत ज्ञानेश्वर! बाबासाहेबांच्या हृदयात ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी लिहिण्यामागची ज्योत प्रकाशित झाली आणि "भाष्यकाराते वाट पुसतु'' या ज्ञानदेवांच्या भूमिकेला पूज्यस्थानी ठेवून बाबासाहेबांच्या हातून शिवचरित्राची- 'राजा शिवछत्रपती'ची- निर्मिती झाली. १९५८ मध्ये 'राजा शिवछत्रपती' प्रकाशित झाले. सुरुवातीला ते दहा खंडांत होते. पु. ल. देशपांडे यांनी ते वाचले आणि म्हटले, "ते दहा खंडी चरित्र विकत घेऊन मी निघालो. दिल्लीला पोचेपर्यंत अखंड चोवीस तासांच्या सफरीत ते दहाही खंड संपवले. 

आचार्य अत्रे यांनी ग्रंथाची व ग्रंथकर्त्याची प्रशंसा करताना म्हटले, "हे शिवचरित्र साऱ्या महाराष्ट्राने अक्षरश: डोक्यावर घेऊन नाचत सुटावे इतके सुंदर आणि बहारदार झालेले आहे. हे शिवचरित्र गद्य आहे की काव्य, की इतिहास आहे, की नाट्य, याचा प्रत्येक शब्दाशब्दागणिक वाचकांना भ्रम पडतो आणि वाचताना मराठी भाषा इतिहासाची दासी बनली आहे का इतिहास मराठी भाषेच्या पायावर लोळण घेतो आहे, याचा डोक्यात विलक्षण गोंधळ उडतो."

विचारांची, भाषेची, उच्चाराची शुद्धता, सखोल चिंतन, विचार ठामपणे मांडण्याची शैली असा बाबासाहेबांचा एकंदर वाग्वैभव-विलास बघितला की सरस्वतीचा त्यांच्यावर वरदहस्त असल्याची खात्री पटते. इतिहास आणि साहित्य यासंबंधी विचार करत असताना विशेषत्वाने ब. मो पुरंदरे हे नाव ओलांडून अथवा या नावकडे दुर्लक्ष करून आपण पुढे जाऊच शकत नाही. "वेड लागल्याशिवाय इतिहास निर्माण होत नाही.

इतिहासाचं वेड लागावं लागतं. शिवाजी महाराजांचा इतिहास हा 'वेड्यांचा इतिहास आहे," या पुरंदरे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना 'शिवचरित्राचे वेड लागले आणि त्यातूनच त्यांच्या लेखणी-वाणीने एक इतिहास घडविला' असे म्हणावे लागेल. पुढे ते असेही म्हणतात, ''इथल्या मातीचं ढेकूळ पाण्यात टाका, जो तवंग उठेल, तो इतिहासाचाच!'' आणि खरोखरीच त्यांनी छत्रपतींचा इतिहास हृदयात उसळता ठेवला. 

इतिहासाचा मागोवा घेणारा लेखक म्हणून त्यांची ओळख समाजापुढे आली. आपल्या साहित्यातून त्यांनी ऐतिहासिक कालातील जीवनानुभवांचा शोध घेतला आहे. आणि त्याला श्रेष्ठदर्जाचे साहित्यिक रूप प्रदान केले आहे. ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग इतिहासाच्या पुस्तकातून वर्णन केले जात होते आणि अगदीच हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या साहित्यकृती - चरित्र स्वरूपातच

त्यांच्यावर निर्माण केल्या जात होत्या. श्रीमंत शिवशाहीर  बाबासाहेबांनी मराठी सारस्वताच्या अंगणात राजा शिवछत्रपती रुजवला , त्याला स्वतःच्या श्वासाचे, ध्यासाचे खतपाणी घातले .... आणि आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस

Sunday, August 1, 2021

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव - ४ !! 🚩🙏🏼


श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे "शिवशाहीर" या बिरुदावलीत कायमच शोभून दिसतात. छत्रपती घराण्याने दिलेली ही पदवी त्यांनी स्वतःच्या नावापूर्वी लावली आणि त्यातच ते समरसून गेले. आज अनेक मान्यवर पुरस्काराने सन्मानित असलेले बाबासाहेब श्रीमंत शिवशाहीर या पदवीने सुवर्णांकित झाले आहे आणि प्रत्यक्ष राजमातांकडून हा सन्मान त्यांना मिळाला आहे. 

१९५८ मध्ये 'राजा शिवछत्रपती' हे त्यांनी लिहिलेले चरित्र प्रकाशित झाले. १९६३ मध्ये छत्रपती राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्याकडून बाबासाहेबांना 'शिवशाहीर' हा सन्मान बहाल करण्यात आला. त्या वेळच्या मानपत्रात म्हटले आहे, "बाबासाहेब आपण शिवरायांचे सारे गडकोट किल्ले प्रत्यक्ष पाहिलेत. आग्रा ते राजगड असा ८५ दिवसांचा पायी प्रवास केलात. पन्हाळा ते विशाळगड अशी भर पावसात इतिहासातल्या त्याच तिथीला दौड केलीत. संशोधन, चिंतन, मनन आणि प्रत्यक्ष दर्शन यांमधूनच आपले लेखन घडत राहिले.'जाळत्या ठिणग्या', 'मुजऱ्याचे मानकरी', 'दख्खनची दौलत', 'प्रतापगड,'लोहगड', 'शिवनेरी', 'आग्रा', 'पुरंदऱ्याची नौबत', 'शिलंगणाचं सोनं', 'महाराज','शेलारखिंड', 'राजा शिवछत्रपती' इत्यादी आपली २५ ग्रंथांची निर्मिती महाराष्ट्र शारदेच्या दरबारास भूषण ठरली आहे. आपल्या लेखणीने आणि वाणीने लाखमोलाचे कार्य केले आहे. शिवचरित्रातून लोकजागृती न  लोकशिक्षण करून आपण राष्ट्रीयत्व, समत्व, बंधुत्व, मित्रत्व आणि ममत्व वाढीस लावलेत." 

बाबासाहेबांचे लेखन व व्याख्यानमाला सुरू होण्यापूर्वी इतिहासाच्या पुस्तकातून, बोलताना,'शिवाजीने शाहिस्तेखानाची बोटे कापली', 'शिवाजीने अफजलखानाचा वध केला','शिवाजीची आगऱ्याहून सुटका' असा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जात असे. परंतु बाबसाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्राच्या विशेषत: त्यांच्या व्याख्यानांच्या प्रभावामुळे आता कोणीही तसा एकेरी उल्लेख करणे शक्य नाही, असे म्हणावयास हरकत नाही.

१९६७ च्या एप्रिल महिन्यात महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानची स्थापना त्यांनी केली. १९७४ च्या मे महिन्यात मुंबईच्या शिवाजीपार्क मैदानावर त्यांनी भव्य मोठे 'शिवसृष्टी' या नावाचे प्रदर्शन आयोजित केले. असे प्रदर्शन कोणी आजतागायत कुठेही भरविल्याची नोंद नाही. ती 'शिवसृष्टी' पाहण्यासाठी प्रचंड गर्दी लोटली. सामान्य नागरिकांपासून ते राष्ट्रपतींपर्यंत सगळ्यांनी त्याला पसंतीची पावती दिली. न. र. फाटक सरांनी 'शिवसृष्टी चिरस्थायी व्हावी' अशी इच्छा व्यक्त करताना म्हटले आहे, "श्री. ब. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रेरणेने मुंबईच्या शिवाजी पार्कवर उभारण्यात आलेली भव्य 'शिवसृष्टी' नजरेखाली घालण्याचा योग साधला. या 'सृष्टीत' छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरित्राचे जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचे सर्व पैलू, चित्रे व मूर्तिशिल्प या दोन्ही साधनांचा उपयोग करून दाखविले आहेत. ज्यांना शिवकालीन इतिहासाचे व महाराजांच्या पराक्रमाचे आणि जेथे तो पराक्रम घडला त्या स्थळांचे चांगले ज्ञान असेल त्यांना शिवसृष्टीतील दृश्ये पाहताना आपण शिवचरित्र काळातच वावरत आहेत असे वाटावे इतकी सजीवता शिवसृष्टीच्या उभारणीत नि:संशय आहे व त्यासाठी श्री शिवरायांचे एकान्तिक भक्त श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच होतील. ही सृष्टी पाहत असता मुंबई महापालिकेने अथवा महाराष्ट्र तिचा विस्तार करून या सृष्टीला चिरस्थायी स्वरूप का देऊ नये, असे सारखे मनात येत होते. जी कामे शासनाने करावी अशी कित्येक कामे श्री. बाबासाहेबांनी केली आहेत, त्यातलेच शिवसृष्टी हे एक आहे.भगीरथ प्रयत्नातून उभारलेली शिवसृष्टी आज पाहता आली."

याच सुमारास म्हणजे १९७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या
राज्याभिषेकाला तीनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने  'शिवकल्याण राजा' ही ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. याबद्दल लता मंगेशकर म्हणतात, "छत्रपतींच्या राज्याभिषेकाला तीनशे वर्षे झाली. त्यानिमित्त 'शिवकल्याण राजा' ही ध्वनिमुद्रिका काढावयाचे आम्ही ठरविले, ही कल्पना बाबासाहेबांना मनापासून आवडली. त्यांनी या ध्वनिमुद्रिकेच्या बाबतीत करता येईल तेवढी सर्व मदत आम्हाला केली. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या खास शैलीने त्या गीतांना निवेदनहीं जोडले आहे. त्यातून बाबासाहेबांचे वक्तृत्वगुण जसे जाणवतात, त्याप्रमाणे छत्रपतींबद्दलचा आदरभावही शब्दाशब्दात प्रकट होतो.' यामध्ये कुसुमाग्रज, स्वा. सावरकर अशा दिग्गज कवींची दहा काव्ये होती. ही ध्वनिमुद्रिका अत्यंत लोकप्रिय ठरली आणि आजही जगाच्या पाठीवर असलेला मराठी माणूस आवडीने ती सगळी गीते ऐकत असतो. आजही ऐकतांना रोमांच प्रसंगी हळवेपणा ही सहज मनातून जाणवतो. 

लोणावळा येथील 'आय. एन. एस. शिवाजी' या नौदलाच्या संस्थेसाठी पुरंदरे यांनी इंग्रज आणि मराठे यांच्यातील आरमारी युद्धाचा सुमारे पावणेदोन तासांचा ध्वनिप्रकाशयुक्त असा कार्यक्रम तयार करून दिला. 'खांदेरी उंदेरी रणसंग्राम' म्हणून इतिहासामध्ये ते प्रसिद्ध आहे. 

बाबासाहेबांच्या या कार्यानिमित्त त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. अनेक ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला.'चतुरंग' संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा 'जीवनसाधना', कलकत्त्याचा 'हेडगेवार जीवनगौरव', पुण्याचा 'पुण्यभूषण', कोल्हापूरचा 'हुकूमतपन्हा', 'महाराष्ट्रभूषण' 'पद्मविभूषण' यांसारख्या अनेक पुरस्कारांची श्रीमंती त्यांच्या पाठीशी आहे. 

शिवशाहीर बाबासाहेबांबद्दल ना. सं. इनामदार म्हणतात, "आजच्या अश्रद्धेच्या काळात स्वत:ला पटलेल्या विषयात झोकून देणारी माणसं दुर्मीळ झालेली आहेत. सोन्यासारखं आयुष्य एकाच ध्यासापायी पणाला लावणारी माणसं आता शोधून सापडत नाहीत. अशा वेळी इतिहासासारख्या रूक्ष विषयात आपल्या आयुष्याचं सर्वस्व पाहणारा एखादा शिवशाहीर लाख मोलाचा ठरतो. तशी शिवाजी महाराजांची बिरुदावली लावणारी माणसं महाराष्ट्रात थोडी का आहेत! महाराजांची जात सांगणारी माणसं गल्लीबोळातून ढिगांनी पडलेली आहेत. मिशीला पीळ भरणारी आणि वाऱ्यावर दाढ्या उडविणारी माणसंही कमी नाहीत. राजकारणात तर शिवाजी महाराज हे चलनी नाणंच झालं आहे. पण ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वानं भारून जाऊन त्यासाठी जिवाचं रान करणारा एकच ब. मो. पुरंदरे आहे."  

आपले गड-कोट,बुरुज-तटबंदी,पागा-अंबारखाना,तोफा-वाटा- पाऊलवाटा-चोरवाटा ,ऐतिहासिक दस्तऐवज जिवापलीकडे गेली १०० वर्षे  जतन करून ठेवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे नावाचे  विद्यापीठ आजही पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या पुरंदरे वाड्यात आहे. तिथे गेले की शिवशाहीरांच्या वाणीने कुणीही मंत्रमुग्ध होतो. 

✍️ सर्वेश फडणवीस

#शिवशाहीरांची_शंभरी