Monday, September 29, 2025

⚜️ ब्रह्मवादिनी : इंद्रसेना

'इंद्रसेना' ही यज्ञयाग करणाऱ्या पुरोहिताची मुलगी. योग्यवेळी तिचे उपनयन झाले आणि ती शिकण्यासाठी गुरूगृही गेली. प्राथमिक शिक्षण पूर्ण होताच, तिने 'चारविद्या' म्हणजे हेरगिरीचे शास्त्र आणि शस्त्रकौशल्य अभ्यासण्याची इच्छा प्रदर्शित केली. गुरूला थोडे आश्चर्य वाटले. 'चारविद्या' शिकणारी ती पहिलीच स्त्री असावी कदाचीत. हेरगिरीचे काम, अत्यंत जिकीरीचे आणि जीवावरचेही. मजबूत शरीर, अविचल धैर्य, विलक्षण धडाडी, सूक्ष्म तर्क आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, हे गुण हेरगिरीसाठी अत्यंत आवश्यक होते. इंद्रसेनेने ह्या सर्व गुणांचा प्रत्यय गुरूला आणून दिला आणि ती 'चारविद्येत' निपुण झाली. द्वंद्वयुद्ध आणि शस्त्रात्र चालविण्याची विद्यादेखील, इंद्रसेनेने सहजगत्या आत्मसात केली.

शिक्षण संपल्यावर तिने आपल्या पसंतीचा वर निवडला. तो मुद्गल नावाचा एक शेतकरी होता. उत्तम शेती करून, त्याने बरेच गोधन जमविले होते, वेदविद्यापारंगत मुद्गलानं, शेतीचा व्यवसाय स्वीकारला होता, कारण त्याला त्याची आवड होती आणि "अन्नम बहु कुर्वीत" हे उपदेशवाक्य केवळ पाठ करायचे आणि तशी कृती मात्र टाळायची, हे बरे नव्हे, म्हणूनही असेल पण तो शेतीकडे वळला होता. इंद्रसेना, लवकरच कृषिकर्मातही निपुण झाली. गोधनाची उत्तम निगा राखण्याचे कौशल्य तिने आत्मसात केले. रथ हाकण्याची कला आणि बैलांना वेगाने पळविण्याचे तंत्र, तिने अभ्यासाने अंगळवणी पाडले. अडीअडचणीच्या वेळी जंगलातून रथ चपळाईने हाकण्यात तर तिचा हातखंडा होता. गोधनावर तिचे अपार प्रेम होते. गोधनदेखील तिच्यावाचून चारापाणी खाईना.

एकदा 'सुभर्वा' नावाच्या एका कुख्यात दरोडेखोरानं त्यांच्या गायी पळविल्या. एक वयस्कर बैल तेवढा उरला होता. मुद्गल आणि इंद्रसेना चिंतित झाले. गायी, कुणी पळविल्या असाव्यात ? इंद्रसेना गोठ्यासभोवती बारकाईने निरीक्षण करीत होती, गायींच्या खुरांचे ठसे मातीत उमटलेले दिसत होते, पण सगळे ठसे मोठालेच कसे ? वासरांच्या पायांचे ठसे कसे दिसत नाहीत ? वासरांना खांद्यावर टाकून चोर पळाले असावेत. मग गायी, वासरामागे निमुटपणे धावत येतातच, हे तंत्र त्यांनी अवलंबिलेले जाणवले. ह्या तंत्रामुळे, गायींना जबरदस्तीनं ओढून किंवा मारून पळवावे लागत नाही. त्याकाळी चोरी करणे सोपे आणि बिनबोभाट होते. इंद्रसेनेने हे तात्काळ ताडले आणि असे तंत्र अवलंबिणारा, धडधाकट दरोडेखोर म्हणजे 'सुभर्वा' च असावा, असा तिने निष्कर्ष काढला.

कालांतराने मुद्गलाने सुभर्वा राहत होता त्या पहाडातल्या दऱ्याखोऱ्यातून वेध घेतला पण त्याचे गोधन कुठे दिसेना. सुभर्वा देखील, त्याच्या गावातील घरी नसल्याचे त्याला कळले. मग सुभर्वा यावेळी गोधन घेऊन कुठे पळाला असावा? इंद्रसेना आणि मुद्गल शोधायला लागले. गायींच्या खुरांचे ठसे सगळेच सारखे आणि सगळ्याच दिशांना आढळणारे. मग कोणत्या ठशांची दिशा स्वीकारायची ? तिला लगेच तिच्या कपिला गायीची आठवण झाली. तिची ती आवडती गाय. तिचा मागचा पाय दुखावला होता. तो पाय तिला टेकवता येत नव्हता. ती, तो पाय फरपटत पुढे घ्यायची. मातीत खुरांच्या ठशांच्या मध्ये, असे फरफटलेले चिन्ह कुठे आढळते कां ? ते तिने शोधले आणि 'सुभर्व्यानं' आपलं गोधन कोणत्या दिशेला पळविलं ते शोधून काढले. मुद्गलाने त्या दिशेला शोध घेतला आणि दूरवर, बिकट वाट असलेल्या घनदाट जंगलातील पहाडाच्या एका विशाल कपारीत त्याचे गोधन आणि तिथेच सुभर्वा आणि त्याचे साथीदार त्याला आढळले. मुद्गलाने, सुभर्व्याला आव्हान दिले. सुभर्वा आणि त्याचे चारपाच साथीदार यांच्याशी एकटा मुद्गल यशस्वीपणे लढू शकला नाही. घायाळ मुद्गल घरी परतला. मुद्गल घायाळ अवस्थेत परतलेला पहाताच इंद्रसेनेला संताप आला. त्या सुभर्व्याला अद्दल घडविलीच पाहिजे आणि गोधन परत मिळविलेच पाहिजे असा तिने निर्धार व्यक्त केला. 

दोन-चार दिवसात मुद्गलालाही थोडी हिंमत आली. कारण आता अंगावरचे घाव बरेच सुकले होते. मग इंद्रसेनेने रथ काढला; त्याला चोरांनी मागे सोडून दिलेला वयस्कर बैल जुंपला आणि ते दोघेही सुभर्व्यावर चालून गेले. इंद्रसेना आणि मुद्गल ह्यांच्याशी लढताना सुभर्वा आणि त्याचे साथीदार हरले आणि त्यांनी घोड्यांवरून पळ काढायला सुरुवात केली. सुभर्वा हरला आणि पळू लागला पण गोधन कुठे दिसेना आणि सुभर्वाने ते आणखी इतरत्र कुठेतरी लपविले होते. आता सुभर्व्याला पकडल्याशिवाय, गोधनाचा पत्ता लागणे शक्य नव्हते, पण सुभर्व्याला पकडणार कसे ? तो घोड्यावर निघालाय.

इंद्रसेनेने लगेच आपला बैलाचा रथ त्याच्या मागे लावला. घोडा आणि रथ ह्यांची शर्यतच लागली. इंद्रसेना, रथ वेगाने हाकलीत होती, अडीअडचणीतून, उंच खोल जागेतून आणि खळखळ वहात्या नद्यानाल्यातून, रथ, सुखरूपपणे बाहेर काढताना इंद्रसेनेचे सारथ्यकौशल्य पणाला लागत होते.सुभर्वा ह्या कपारीतच कुठेतरी दडला आहे,' इद्रसेनेनं मुद्गलाला हळूच सांगितलं. पण आत कपारीत एकदम शिरायचे कसे आणि कुणीकडून ? सुभर्वा सर्वत्र नजर फेकीत असेलच. त्याला, दिसल्याशिवाय रहाणार नाही आणि त्याने आडून आपल्यावर घात केला तर ? आपण पकडले जाऊ. तेव्हा झाडाआडून सुभर्व्याचा ठाव घेतला पाहिजे.

आता इंद्रसेनेला कपारीत त्वरीत उतरण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सुभर्वा कपारीतून पळून जाण्यापूर्वी, त्याला गाठणे आवश्यक होते, पण सुभर्व्याला तोंड द्यायचं ते, शस्त्राशिवाय जमायचे कसे ? आणि शस्त्र तर, वर, दूरवर रथात राहीली होती. हातात होता तो फक्त रथाच्या आधारभूत एक लाकडी जाड ओंडका. पण वेळ घालविण्यात अर्थच नव्हता. इंद्रसेना मुद्गलासहीत भरभर कपारीत शिरली. पळत सुटलेल्या सुभर्व्याचा त्यांनी पाठलाग केला. मुद्गलावर तो वार करणार तोच इंद्रसेनेनं त्याच्या डोक्यात हातातील ओंडका हाणला. सुभर्वा गोंधळला. त्याला भोवळ आली. तोच इंद्रसेनेनं पुनः दुसरा मारा केला आणि सुभर्वा बेशुद्ध पडला. त्याचे खड्ग मुद्गलाने घेतले. मग दोघांनी उचलून त्याला पाणी पाजले, शुद्धीवर आणले आणि खड्गाचा धाक दाखवीत चोरलेल्या गायींचा ठावठिकाणा दाखवायची आज्ञा केली. माझा जीव घेऊ नका. गायी परत करतो.  सुभर्वा, काकुळतीने प्रार्थना करू लागला. इंद्रसेनेनं 'तथास्तु' म्हटले. सुभर्वाने गायी परत केल्या. इंद्रसेना आणि गायी सुखरूप घरी परत आल्या.

सर्वेश फडणवीस 

#ब्रह्मवादिनी #लेखमाला #नवरात्र #दिवसनववा

Sunday, September 28, 2025

⚜️ ब्रह्मवादिनी : गार्गी

भारतीय तत्त्वज्ञान हे जगातले एक श्रेष्ठ तत्त्वज्ञान मानले जाते. शाश्वत सत्याचा शोध घेण्यात ते एकमेव यशस्वी झाले. या बहुरूपी विश्वात एकत्व शोधून त्याने वैश्विक कल्याणाचा मौल्यवान मार्ग दाखविला.  "एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति ।" आत्मा सर्वत्र एकच आहे, नव्हे तो एकमेव आहे. ह्या एकात्मवादामुळे माणसां माणसांतील द्वैतभाव संपला, कलहाचे बीजच जळाले. प्रेम आणि सामंजस्य ह्यापायी विश्वशांती बळकट बनली. “विश्वेस्मिन् शान्तिरस्तु मानवाः सन्तु निर्भयाः ।" ही ग्वाही ह्या तत्त्वज्ञानाने दिली. अशा ह्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानात भर घालणारी, वेदकालीन विदुषी म्हणून, गार्गी ओळखली जाते. वेदान्तचर्चा करून त्यातील मौलिक तत्त्वे उघड करण्याचे तत्कालीन कौशल्य ह्या गार्गीमध्येही पहावयास मिळते. .

गार्गी ही गर्ग कुलोत्पन्ना कन्या आणि वचक्नु ऋषी हिचे वडील होते. म्हणून तिला वाचक्नवी गार्गी असे म्हणत. वेदकाळच्या पद्धतीनुसार तिचे उपनयन झाले. ती गुरूगृही शिकायला गेली. याज्ञवल्क्य वगैरे बुद्धिमान विद्यार्थ्यांबरोबर तिचे शिक्षण झाले. गार्गी देखील अत्यंत बुद्धिमान होती. विश्वाची उत्पत्ती, विश्वाचे स्वरूप आणि विश्वकल्याणाचा चिरंतन मार्ग शोधणाऱ्या ऋषींपैकी एक गणली गेली. सर्वव्यापी, आनंदरूपी आणि एकमेवाद्वितीय ब्रह्म जाणणारी वेदविद्यापारंगत गार्गी, ब्रह्मवादिनी म्हणून लौकिक मिळवती झाली. सृष्टीचे ज्ञान आणि विज्ञान, निसर्ग आणि अवकाश ह्यांचा शोध आणि बोध घेण्याचे तिचे प्रयत्न प्रशंसनीय ठरले. अनेक मान्यवर विद्वानांत तिचा वरचा क्रम लावला जाई. राजसभेत अनेक विद्वान पंडितांबरोबर ती वादविवादात भाग घेई, आपली छाप पाडत होती. 

एकदा जनक नावाच्या राजाने मोठा यज्ञ केला. त्यात खूप दक्षिणा वाटली. कुरू आणि पांचाल देशातील अनेक ब्राह्मण तिथे एकत्रित झालेले होते. गार्गीही त्या सभेला आलेली होती. वेदकाळी स्त्रिया जागरूक होत्या. समाजही समंजस होता. स्त्री-पुरुषसमप्राधान्य, त्यांच्या मनात आणि कृतीत सहजतेने मुरलेले होते. स्त्रीचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व तिच्या इच्छेनुसार आणि शक्तीनुसार ती स्वतः घडवीत असे. संसार, त्यातील चूल आणि मूल ह्यांचे कर्तृत्व गोठविणारे त्याकाळी स्त्रीच्या मानेवर लादलेले कल्पनेतही दिसत नाही. त्यामुळेच जीवनाच्या अनेक क्षेत्रात, स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने कर्तृत्व गाजवताना उठून दिसते. म्हणूनच मध्वभाष्यानुसार, विवाह होऊनही, गार्गीच्या जीवनक्रमात कुठलाही बदल झाला नाही. तिचा वेदाभ्यास, ब्रह्मज्ञानाचा व्यासंग आणि पंडीतसभेत संचार सतत चालू राहीला. 

राजा जनकाच्या त्या सभेत गार्गी आमंत्रित होती. ती पंडितसभा यज्ञाच्या निमित्ताने भरविलेली असली, तरी जनकराजाच्या मनात विद्वत्चर्चा घडावी असे होते, पण त्याने तसे उघड सांगितले नाही. कारण ह्या सर्व पंडीतांत, सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्ता कोण आहे हेच, खरे तर जाणून घेण्याची त्याला जिज्ञासा होती. त्याने एक हजार गाई आणून बांधल्या. त्या प्रत्येकीच्या शिंगांना दहा दहा सुवर्णमुद्रा बांधलेल्या होत्या. जनक राजा त्या पंडितवरांना म्हणाला, "जो कुणी सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्ता असेल त्याने ह्या गायी न्याव्यात." तिथे जमलेल्या ब्राह्मणांना, मी आहे सर्वश्रेष्ठ, असे म्हणण्याचे धारिष्ट्य करवले नाही. याज्ञवल्क्य मात्र उठला आणि काही न बोलता आपल्या शिष्यांना म्हणाला, "हाकला रे त्या गायी आपल्या आश्रमाकडे". तो ज्ञानी होता. इतरही ज्ञानी होते. पण याज्ञवल्क्याला आपल्या ज्ञानाचा आत्मविश्वास होता तसा इतरांना नव्हता. पण त्याला गायी सुखासुखी नेता आल्या नाहीत. सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्ता म्हणवितोस तर आमच्या प्रश्नांची उत्तरे दे म्हणून इतरांनी त्याला सतत प्रश्न विचारूनच सोडले. 

पूर्वीच्या काळी राजसभेत पांडित्याचे प्रशस्तीपत्र मिळवायचे, तर राजाने बोलावले असेल त्या सर्व विद्वानांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत होती. तुम्ही तुमचे विचार मांडायचे आणि त्यावर जमलेल्या विद्वानांनी प्रश्न विचारायचे. तुम्हांला त्या प्रश्नांची उत्तरे भराभर देता आली तर तुम्ही पंडित ठरले जात. राजा मग तुम्हांला मानाची शालजोडी देई. आणि राजा जनकाच्या त्या सभेत याज्ञवल्क्याला प्रतिप्रश्न करून, त्याचे ज्ञान कमी असल्याचे प्रयत्न करणारे, पंडितपुरुष बरेच निघाले. पंडितस्त्री मात्र एकमेव होती आणि ती होती गार्गी. गार्गीने याज्ञवल्क्याला भंडावून सोडले, ते तिच्या विशिष्ठ शैलीने. तिने लहानलहान प्रश्नांचा याज्ञवल्क्यावर सतत मारा केला. पहिल्या प्रश्नाचं उत्तर येतं न येतं तोच दुसरा, लगेच तिसरा असे तिने बारा प्रश्न विचारले. ह्या तिच्या शैलीने याज्ञवल्क्य चिडला. बाराव्या प्रश्नाला काही उत्तर देण्याऐवजी तो म्हणाला, "पुरे कर. यानंतर एकही प्रश्न विचारू नकोस. आणखीन विचारशील तर तुझं मस्तक पृथ्वीवर पडेल.’

गार्गीने एकापाठी एक विचारलेले प्रश्न होते तरी कोणते ? ते होते सृष्टी संबंधीचे, अवकाशा संबंधीचे. त्या विद्वत्सभेतील गार्गीचे वर्चस्व जाणवले ते तिच्या आत्मविश्वासपूर्ण उद्गारांवरून. ती इतर पंडितांना म्हणाली, "आता मी शेवटचे दोन प्रश्न विचारते आणि त्याची उत्तरे जर ह्या याज्ञवल्क्याने मला दिली, तर तुमच्यापैकी कुणीही ह्या ब्रह्मवेत्यावर विजय मिळवू शकणार नाही, असे ठरेल आणि इतर सर्व पंडितांनी त्या गोष्टीला मान्यता दिली. ज्ञानाची परीक्षा घ्यायला, हवे असलेले चौफेर ज्ञान आणि सूक्ष्म दृष्टी गार्गीजवळ होती आणि त्या तिच्या सामर्थ्यांला राजसभेत मान्यता होती.

ज्ञानाचे व विज्ञानाचे एवढे प्रचंड सामर्थ्य, जवळ असूनही गार्गी विनम्र होती. ज्ञानाचा अहंकार असू नये अशी उक्ती आहे. आजकाल मात्र अज्ञानाचाही माज चढलेला जाणवतो आणि अशावेळी गार्गीच्या विनम्रतेची आठवण मनाला स्पर्शून जाते. गार्गीने, याज्ञवल्क्याची उत्तरे ऐकली आणि स्वतःचे समाधान होताच ती परीक्षा घेणारी म्हणाली, याज्ञवल्क्याने "माझा प्रणाम स्वीकार. हे पंडितांनो, याज्ञवल्क्याला बहुमान द्या, नमस्कार करा त्याला आणि सोडा पाणी त्या सहस्त्र गायींवर व सुवर्णमुद्रांवर." गार्गीच्या निर्णयाने सभा प्रसन्न झाली. जनक राजा संतुष्ट झाला. विद्वत्ससभेत गार्गीची प्रतिष्ठा वाढली. एका पंडिताने, त्यातही स्त्रीने, दुसऱ्या पंडिताच्या ज्ञानाची प्रशंसा करावी, हा खरा ज्ञानवंतांचा आदर्श, गार्गीने घालून दिला म्हणून गार्गीचे अनन्य साधारण महत्त्व आजही जाणवते. 

गार्गीसारख्या अनेक स्त्रियांच्या चरित्रावरून जाणवते की वेदकालीन समाजात, स्त्रीला समान संधी, सर्वच क्षेत्रात उपलब्ध होती. तिची इच्छा आणि महत्त्वाकांक्षा, ह्यांना पुरुषी अहंकाराची झुल त्याकाळच्या समाजाने कधीच निर्माण होऊ दिली नाही. पुरुषप्रधान संकल्पनेतून निर्माण होणारी स्त्रियांबद्दलची कुठलीही स्वार्थी, मतलबी, किंवा द्वेष रूढी लादण्याचे वेदकालीन समाजाने कधी कल्पनेतही आणले नाही. सर्व प्रकारचे शिक्षण, वेदविद्या आणि विज्ञानाचे प्रयोग करायला स्त्रियांनाही प्रोत्साहन दिले जाई आणि महत्त्वाची तशीच अनुकरणाची बाब म्हणजे वेदकालीन स्त्रिया या सर्व सोयीसवलतींचा योग्य आणि पुरेपूर उपयोग करून घेत असत. वैदिक काळात ही अशी सगळी समाजरचना आजही अनुकरणीय अशीच आहे. 

सर्वेश फडणवीस 

#ब्रह्मवादिनी #नवरात्र #लेखमाला #दिवसआठवा

Saturday, September 27, 2025

⚜️ ब्रह्मवादिनी : मैत्रेयी

'मैत्रेयी' ही 'मित्र' नावाच्या प्रधानाची मुलगी. 'मित्र' हा जनकराजाचा राजप्रधान होता. ह्या संसारात राहूनही, लोकमंगलाची पवित्र कर्तव्ये निस्वार्थपणे करणाऱ्या जनकराजाचे चरित्र आणि चारित्र्य अगदी जवळून पहाण्याचा आणि अनुभवण्याचा दुर्लभ लाभ मैत्रेयीला झाला. वेदकाळात 'गार्गी' एक ब्रम्हवादिनी, आध्यात्माच्या मार्गातील दीपस्तंभ अशी विदुषी, तिची मावशी होती. आध्यात्माचे बाळकडू ह्या मावशीने तिला पाजले. कोणतीही व्यक्ती घडते ती संस्कारांमुळेच. वैदिक काळात आणि भारतीय संस्कृती परंपरेत, सहज संस्कारही चांगले व्हावेत ह्याकडे सातत्याने लक्ष पुरविले जाई. घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे, जेणेकरून मन शांत आणि प्रसन्न राहील असे वातावरण निर्माण करणे, इतरांना न दुखावणारे बोल आपल्या आचरणाने, केवळ स्वतःचे क्षणिक सुख साधण्यासाठी दुखवणे,अशा अनेक बाबींकडे लक्ष दिले जाई.

मैत्रेयी अशाच वातावरणात आणि संगतीत वाढली, तिची बुद्धी तल्लख आणि मर्मग्राही होती. मैत्रेयीने, एका स्त्रीने त्याकाळी पुरुषी अहंकाराला सौम्य प्रवृत्तीने आणि अप्रत्यक्ष रीतीने प्रत्युत्तर देऊन निरूत्तर करण्याचे कसब दाखविले आहे. याज्ञवल्क्य हा तिचा पती, याज्ञवल्क्य जनकाचा गुरू, जनकाला अध्यात्माचे धडे त्याने दिले. दोघेही संसारी, गृहस्थाश्रमी, जनकाला संसार सोडून, संन्यास घेण्याची गरज वाटली नाही. याज्ञवल्क्य मात्र मुक्तीसाठी संन्यास घ्यायला निघाला आणि त्यावेळी त्यानं मैत्रेयीला, 'मी आता संन्यास घेतोय, पण तू काळजी करू नकोस, माझ्या धनसंपत्तीतला वाटा तुला मिळेल. तुला जीवनाची ददात रहाणार नाही," असं सांगितलं. मैत्रेयी यावर नुसती हसली होती, ती म्हणाली, "तुम्हाला असं का वाटावं की मला जीवन जगण्यासाठी धनसंपत्ती हवी ? त्यानं का मला मुक्ती मिळणार आहे? मला कुठलीही इच्छा उरलेली नाही. संसारातल्या कुठल्याही लाभासाठी मनात आसक्ती नाही. इच्छा किंवा अनिच्छा ह्यांचा माझ्या मनाला उपसर्गच पोहोचत नाही, पण तुम्ही संन्यास घेणार आहात आणि ह्या संन्यासिनीला त्यावेळी काही देण्याचे योजत असाल, तर मुक्तीच्या या प्रवासात शिदोरी म्हणून उपयोगी पडेल असं काही सांगा."

मैत्रेयी राजसभेत याज्ञवल्क्याचं पांडित्य पाहून प्रभावित झाली होती, त्याच्यावर मोहित झाली होती. त्या पांडित्याबद्दलची आत्मीयता आणि त्या पांडित्याची सर्वकष प्राप्ती, हे दोन हेतू तिच्या ठायी होते आणि याज्ञवल्क्याकडे आकृष्ट व्हायला पुरेसे ठरले. तिच्या पित्याने, मित्र नावाच्या राजप्रधानाने हे जाणले आणि मैत्रेयीच्या इच्छेनुसार तिचे याज्ञवल्क्याशी लग्न लावून दिले. याज्ञवल्क्य, संसारात रमणारा नव्हता. मैत्रेयी हे जाणून होती. तिने संसारसुखाची अपेक्षाही मनात बाळगलेली नव्हती. 'काम' हा पुरुषार्थ असला तरी मुक्तीच्या मार्गात तो अनर्थ ठरू नये इतपत आवरलाच पाहिजे, प्रसंगी त्याचा संपूर्ण त्याग करण्याची पाळी आली, तरी त्यासाठी मन तयार ठेवलंच पाहिजे, हे मैत्रेयी जाणून होती. तशी विरागी वृत्ती तिच्या अंगी बाणलेलीच होती. त्यामुळेच याज्ञवल्क्याच्या असंसारी वृत्तीचा तिला उपसर्ग पोहोचला नाही. जाणून बुजून स्वीकारलेल्या या संसारी खडतर व्रताबद्दल मैत्रेयीची कुठलीही तक्रार नव्हती. नव्हे, याज्ञवल्क्याशी, त्याच्या आध्यात्मिक मनाशी मिळून मिसळून, अगदी एकरूप होऊन वागण्यानेच ती खरी सहचारिणी, अर्धांगिनी, धर्मपली म्हणून वेदकाळात आदर्श ठरली. 

वेदकाळी हे स्पष्ट दिसतं की, 'स्त्री' कुठल्याही क्षेत्रात पुरुषाशी स्पर्धा करीत नसली तरी मागे नव्हती. 'स्पर्धा' हा तिचा उद्देशच नव्हता. स्पर्धेची प्रवृत्ती काहीशा न्यूनगंडातूनच निर्माण होत असते. स्पर्धेच्या मूळाशी, नाही म्हटले तरी असूया आणि दुसऱ्यावर मात करण्याची उन्मादी भावना मनात असते, पण त्याकाळच्या समाजात, स्त्रीच्या मनाला स्पर्धेची कल्पनाच शिवली नाही. समाजाने ती तशी निर्माण होऊच दिली नाही. 'स्त्रीपुरुषसमप्राधान्य', वृत्तीत बाणल्यामुळे, समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोण देखील वेगळाच जाणवतो. कुठल्याही कारणाने स्त्रीला तुच्छ लेखणे समाजाच्या मनातच आले नाही. तिचे स्वतंत्र आणि सन्मान्य स्थान समाज कधी विसरला नाही. स्त्रीवर पुरुषाचे स्वामित्व असते, ती त्याच्या मालमत्तेचा एक घटक असते, असल्या फाजील आणि अवास्तव कल्पना त्या समाजाच्या मनाला कधी शिवल्याच नाहीत आणि असे सगळे कधी घडूच दिले नाही.

मैत्रेयीने संसारात राहूनच, त्या दुःखदायक, तापदायक शरीरधर्माला बाजूला लोटणे हाच संन्यास आहे. संसारी राहूनच, खरे संन्यासी होता येते, हे आपल्या चरित्राने दाखवून दिले आहे. संन्यस्त वृत्ती ही विश्वाच्या समृद्धीसाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी नितांत आवश्यक आहे. पण ही सन्यस्तवृत्ती म्हणजे संसार सोडून पळणे नव्हे, उदासीन वृत्ती आणि निष्क्रीय प्रवृत्ती नव्हे, हे मैत्रेयीने, एका वेदकालीन ब्रह्मवादिनीने, मानवाला दिलेले अमोल वैचारिक धन आहे. भारतीय तत्त्वज्ञानातील तो मोठा ठेवा आहे. भारतीय तत्त्वज्ञान आणि भारत, म्हणूनच जगाला आदर्श ठरतो आहे आणि ही ब्रह्मवादिनी वेदकाळापासून कर्तृत्वशालिनी आहे. 

सर्वेश फडणवीस 

#ब्रह्मवादिनी #लेखमाला #नवरात्र #दिवससातवा

Friday, September 26, 2025

⚜️ ब्रह्मवेत्त्याची माता : इतरा

वैदिक वाङ्मयात ब्रह्मवादिनी होत्या पण काही ब्रह्मवेत्त्याची माता म्हणूनही त्यांच्या कार्यातून स्मरणात राहतात अशीच इतरा ही एका ऋषीची पत्नी होती. ऋषीची ही दुसरी किंवा तिसरी पत्नी आणि इतरेपासून त्याला महीदास नावाचा पुत्र झाला. आधीच्या पत्नीपासून झालेली इतर संतती देखील होतीच. 'इतरा' ही तरुण व लावण्यवती पण अशिक्षित होती. ऋषी, विद्वान होता आणि समाजात त्याला प्रतिष्ठा होती. अनेक सम्मान मिळत, पण त्या सन्मानाच्या कुठल्याही समारंभात, तो आपल्या पत्नीला इतरेला बरोबर नेत नसे. पत्नीसह आमंत्रण असले तरी ऋषी एकटा जाई. इतरेला ह्याबाबत मनात सतत खंत वाटत असे. आपण अशिक्षित आहोत म्हणून काय झालं ? ती अनेकदा पतीला विचारी, "सभेत मी तुमच्या बाजूला बसले तर काय तुमची अप्रतिष्ठा होईल ?"

माझे रूप, माझे तेज आणि माझे तुमच्या जीवनातले पत्नी म्हणून स्थान ह्याची तुम्हांला लाज वाटते ? माझ्या सवतीची मुले मी सांभाळते, गृहस्थाश्रमाचा सगळा भार मी उचलते. तुमच्याइतकेच माझेही स्थान मोलाचे आहे आपल्या संसारात, मी शिकलेली नसेन पण सभेत काही चर्चा थोडीच करायची असते प्रत्येक वेळी ? तुमचा सन्मान होतो त्याप्रसंगी मी केवळ बाजूला बसले तर काय बिघडते ? - निमंत्रणं असतात मला देखील-" यावर ऋषी उत्तर देईना पण तिला समारंभालाही नेईना. पुढे मुले मोठी झाली तेव्हा तो मुलांना बरोबर नेई पण इतरेला मात्र नाही. इतरेचा पुत्र महीदास मात्र वडिलांबरोबर सभांना जाई. इतरा त्यातच समाधान मानू लागली. पण पती आपल्याला सभेला नेत नाही याचे शल्य मनातून जात नव्हते. दिवसांमागून दिवस कंठीत होते. एके दिवशी इतर सावत्र भावांबरोबर वडिलांसोबत सभेला गेलेला महीदास रडत घरी आला. आता त्याला समज आली होती. सभेत घडलं ते तो सहन करू शकला नाही. रडत आलेल्या आपल्या पुत्राला पोटाशी धरून इतरेनं मोठ्या ममतेनं विचारलं,

"काय झालं रे महीदासा ? आज तू एकटाच का परत आलास सभेतून ? आणि रडायला काय झालं ?" महीदास आणखीच स्फुंदून रडू लागला. "आता मला समजायला लागलं आहे आई आणि त्यामुळे नाही सहन होत हा प्रकार." तो कसाबसा बोलला. 'कुठला प्रकार बाळा ? " इतरा काकुळतीनं विचारती झाली. महीदासाला हुंदके आवरत नव्हते. तो रडू लागला. इतरेच्याही डोळ्यांतून अश्रूप्रवाह वाहू लागला, "काय झालं माझ्या राजा? रडू नकोस रे, सांग कुठला प्रकार घडला तो ?" भावनांचा आवेग अश्रू द्वारा वाहून गेला. मग महीदास हुंदके आवरत सांगू लागला. "बाबांना मी आवडत नाही. ते माझ्याकडं सभेत रागाने पहातात. मला खूप भीती वाटते. आज त्यांचा सन्मान होत होता तेव्हा त्यांनी माझ्या बाकी सगळ्या भावांना जवळ आसनावर बसविले, त्यांचं कौतुक केलं आणि मला मात्र दूर लोटलं, आणि तुला देखील बोलले. म्हणाले, "अडाणी आईचा गावंढळ पुत्र", आणि महीदासाच्या डोळ्यांतून पुनः अश्रूंचा पूर वाहू लागला. इतरेनं महीदासाचे अश्रू पुसले. तिचे नेत्र वेगळ्याच तेजाने चमकू लागले.

इतरा ६-७ वर्षाच्या महीदासाला हाती धरून घराबाहेर पडली. ऋषी पहातच राहीला. क्षणभर त्याला कळेचना की हे काय होतय . ती तिथून निघाली ती सरळ पृथ्वीकडे गेली आणि तिला म्हणाली, "तू आई आहेस सगळ्या विश्वाची. तुला सगळेच समान. तुझं प्रेम सगळ्यांवरच सारखं. तुझ्याजवळ कुठल्याच प्रकारचा पक्षपात नाही. पृथ्वी मनाशीच हसली. तिला सगळं समजलं होतं. तिनं महीदासाला पोटाशी धरलं. इतरेच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाली, “मी समजले आहे तुझं दुःख.. पण हिंमत सोडून कसं चालेल ? तू इथंच रहा माझ्याकडं. शिक्षण घे. महीदासावर, तो चांगला मुलगा होईल, सद्गुणी होईल, सगळ्यांशी प्रेमानं वागेल, असे संस्कार कर, "पण मी, ह्या वयात शिकणार कशी ? शिकायला, वय कधीच आड येत नाही. इंद्र बृहस्पतीकडे शिकायला गेला तेव्हा काय लहान बाळ होता ? पण महीदासाला शिकवायचंय मला. वेदविद्यापारंगत होऊन सभा जिंकायला पाहिजेत त्याने. तेही होईल. त्यालाही आश्रमात पाठवू आपण. इतरा सुखावली. पृथ्वीचे तिने पाय धरले. पृथ्वीने तिला उचलले. हा काय वेडेपणा ! तू माझी मुलगी, आईचे कर्तव्य मी करतेय, पाय कसले धरतेस माझे ?"

इतराने महीदासाला चांगले वळण लावले. इतरा स्वतः शिकली आणि महीदास एकाग्रतेनं गुरूगृही शिकू लागला. तो मोठा वेदविद्यापारंगत पंडित झाला. त्याने ऋग्वेदावर भाष्य लिहायला घेतले आणि काही अवधीतच संपूर्ण भाष्य लिहून पूर्ण केले. गुरू संतुष्ट झाले. सर्वत्र महीदासाची कीर्ती पसरली. ऋग्वेदावर भाष्य लिहीणारा हा कोण नवावतार ? त्याकाळी वेदातील, विशाल विश्वमंगलाची संकल्पना, व्यक्त करणारा, महान् मंगल ब्रह्म जाणणारा, ब्रह्मवेत्ता म्हणविला जाई आणि वेदोक्त ब्रह्मसंकल्पना सुस्पष्ट करणारे भाष्य ब्राह्मण म्हणविले जाई. महीदासाच्या भाष्याला ब्राह्मणग्रंथ म्हणून प्रतिष्ठा लाभली. इतरा सुखावली. स्वतः सुशिक्षित झाली होतीच. तिला पुत्राचे भाष्य करण्याचे पांडित्य समजले. गुरूने महीदासाला विचारले, महीदासकृतब्राह्मण ग्रंथ उद्यापासून महीदासब्राह्मण म्हणून ओळखला जावो. महीदास म्हणाला, "नाही, गुरूदेव, एका ऋषीचा पुत्र मागेच संपला. आता मी केवळ माझ्या आईचा पुत्र उरलो आहे. आईचं नाव इतरा आहे. माझं नाव 'ऐतरेय' आहे. म्हणूनच ह्या ग्रंथाचं नाव देखील ऐतरेय ब्राह्मण असेल. "  इतरेच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले. पृथ्वीने समाधानाने निश्वास सोडला. उपस्थित विद्वजनानीं आसमंत दणाणून सोडला. ऐतरेयाचा जयजयकार असो.

सर्वेश फडणवीस 

#ब्रह्मवादिनी #नवरात्र #लेखमाला #दिवससहावा

Thursday, September 25, 2025

⚜️ ब्रह्मवेत्त्याची माता : जबाला

वेदवाङ्मयात अशी घायाळ पक्षिणी आहे, एक शूद्र स्त्री, जबाला तिचं नाव. दिसायला सुंदर. तारुण्य ओसंडून वाहत होते. त्यातच पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार हिंडणे क्रमप्राप्त होते , आणि घराबाहेर, एक नव्हे तर अनेक लांडगे फिरत असतात, असहाय आणि अबल सौंदर्यावर तुटून पडणारे दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतातच. त्यांच्या वासना प्रबळ बनतात आणि त्यात सौंदर्याची, दुर्बल यौवनाची आहुती पडते. जबाला ही अशीच एक तरुणी. अनेक वासनांना बळी पडलेली होती. नाईलाजानं, इच्छेविरुद्ध, केवळ अगतिक बनून, लाचार होऊन दिवस कंठीत होती. त्यातच प्राप्त झालेले निरपराध मातृत्व यात मातृत्व तसे निष्पापच. पापी आणि बदनामी प्रवृत्तीपासून जन्मलेला माणसाचा नवा निरपराध जीव सन्मानानं मान वर करून जगलाच पाहिजे हाच अट्टहास जबालाचा होता. जबालानं त्याला जिव्हाळ्याने वाढवलं, ओठातला अर्धा घास त्याच्या पोटात घालत पोसलं. तो जबाला पुत्र दिनमानानुसार वाढत होता.

आता तो शिकायला योग्य झाला, पण कोण शिकवणार त्याला ? कुठल्या आश्रमात पाठवायचं त्याला? कोण ऋषी त्याच्या आश्रमशाळेत त्याला प्रवेश देईल ? जबालाच्या मनात आलं की, माझा पुत्र सत्शील आहे. मी त्याच्यावर चांगले संस्कार केलेत. त्याचा, त्याच्या मनावर ताबा आहे. त्याने त्याच्या इंद्रियांना वाटेल तसे भरकटू दिलेले नाही. इंद्रियांचे नसते लाड पुरवायला आहे तरी कुठे बळ आमच्यात ? पण बिघडायला कुठं वेळ लागतो लहान मुलांना? उलट, दारिद्र्य असले, सभोवारचे वातावरण गलिच्छ असले की मुले संगतीनं बिघडतातच ना ? पण जबाला, ती माता, तिनं असं बिघडू दिलं नाही आपल्या पुत्राला.

 'सत्यकाम', असं नाव ठेवलं, सत्याची इच्छा करणारा. सत्याचाच पाठपुरावा करणारा असावा तो पुत्र, अशीच तिची मनीषा. तेव्हा सत्यकाम, अनुकूल वयाचा होताच तिनं त्याला गुरूगृही पाठवायचं ठरविले. मग तिने उपनयन, मौंज करायला पाहिजे असं ठरविले. पण ती कुठून करणार ? कोण करणार तिच्यासाठी पौरोहित्य? तिला ज्ञान तरी कुठं आहे अशा विधीचं ? जबालेनं सत्यकामला सरळ एका आश्रमाकडे धाडलं. तो आश्रम हारित ऋषींचा होता. हारितऋषी एक ब्राह्मण. उत्तम मार्गदर्शक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या आश्रमात प्रवेश घ्यायला गर्दी होई. श्रीमंत, राजे आणि शासक यांची मुले मोठ्या संख्येनं त्या आश्रमात होते. सत्यकाम त्या आश्रमात येताच गोंधळला. सत्यकाम एकटाच बाजूला उभा होता. दुपारचे उन्हं कलले, गर्दी ओसरली , घामानं थबथबलेला सत्यकाम अजूनही बाजूलाच उभा होता, हारितऋषींचं त्यांच्याकडं लक्ष गेलं.
"कोण बाळ तूं ?"
"मी सत्यकाम. "
"काय काम तुझं माझ्याकडं ?"
"मला शिकायचंय. "
"मग दूर का उभा राहिलास. ये." हरितांनी त्याला जवळ घेतलं. “एकटाच आलास, असू दे. उपनयन झालं तुझं ?" सत्यकाम गोंधळला. स्तब्ध राहिला. "असू दे. तुला मी शिकवेन.

सत्यकाम आनंदला. शिकायचं, आईचं नाव काढायचं. आईला सुखात ठेवायचं. ही सगळी स्वप्न पूर्ण होणार म्हणून तो उल्हसित झाला. हारित ऋषींनी त्याचं नाव टिपलं आणि जिव्हाळ्यानं विचारलं, "वडिलांचं नाव काय तुझ्या ?" वडिलांच नाव ? हे शब्द ऐकताच सत्यकाम गोंधळला. घरी आईखेरीज कुणी नव्हतंच. कधी कुणी पुरुष घरात पाहिला नव्हताच. आई कष्ट करायची. जेवू घालायची. आईनेच वाढविलं. स्वच्छता राखायला शिकवलं शरीराची आणि मनाची देखील, तेही आईनंच. मला कधी कुणाचं भय वाटू दिलं नाही, पूर्ण संरक्षण दिलं ते आईनंच. खरं बोलावं, ह्याचं वळण आणि खरं वागावं ह्याचं आचरण, तिनंच अंगवळणी पाडलं माझ्या. तेव्हा काय उत्तर द्यायचं ऋषींच्या प्रश्नाचं ?

"वडील नाहीत तुला ?” हरितांनी हळूच विचारलं. पण ह्याही प्रश्नाचं उत्तर सत्यकामाला ठाऊक नव्हतं; पण हा प्रश्न का विचारला ऋषींनी, हेही कळेना त्या बालमनाला, तो स्तब्धच होता. "जा आईला विचारून ये." हारितांनी सांगितलं. तो आईकडं आला. "आई, आश्रमा प्रवेश मिळतोय मला,पण वडिलांचं नाव विचारताहेत ऋषी. काय आहे माझ्या वडिलांचं नाव ?" जबाला त्या प्रश्नानं एकदम खचली. कुणाचं नाव सांगणार? अनेक लांडग्यांनी, वासनांनी पिसाळलेल्या, नराधमांनी माझ्या असहायतेचा, अगतिकतेचा गैरफायदा घेतला आहे आणि ते नामानिराळे झाले आहेत. त्या अनेकांपैकी कुणाला तरी विचारावं का की तुझं नाव सांगू का ? तो प्रत्येकजण भ्याड निघेल. स्वतःच्या सुखासाठी केलेले अधमकृत्य, माझ्या माथी पाप म्हणून मारताना तो कचरणार नाही. हा भ्याडपणा माझ्या लाडक्या सत्यकामाला, वडिलाचं नाव मिळवून देणार नाही. पण त्या नावाची गरज तरी का वाटते समाजाला ? मी जन्म दिलाय माझ्या मुलाला एवढे पुरेसे नाही ? माझं नाव पुरेसं नाही? जिनं नऊ महिने गर्भ वाढविला, जीवावरचं संकट झेलून, सगळे कष्ट सोसून जिनं पुत्राला जन्म दिला, माणसाचा वंश जिनं जीवापाड जपून वाढविला आणि एकटं जगून, कुणाच्याही मदतीविना तो सुरक्षित राखला, चांगले संस्कार करून त्याला खरं बोलणारा, खरं वागणारा बनविला, त्या मातेला काहीच मोल नाही? मातृत्व मातीमोल का मानणार हा समाज ? तिनं सत्यकामाला आपल्या लाडक्या पुत्राला पोटाशी धरलं. अश्रूंचा प्रवाह डोळ्यांतून घळघळा वहात होता. सत्यकाम त्या अश्रूंनी न्हाऊन निघाला. 

"आई ! वडिलांचं नाव विचारलं म्हणून रडतेस? वडील नाहीत मला? ऋषींनी विचारलंच होत तसं." "वडील असून नसल्यासारखेच समज. पण ऋषींना वडिलांच्या नावाचीच का गरज वाटते? त्यांना आईचं नाव सांग. म्हणावं मी सत्यकाम आहे. जबाला ही माझी आई व बाप आहे " "पण ते वडिलांचं नाव विचारून ये म्हणाले होते, तर त्याबाबत काय सांगू?" "खरं तेच सांग की, आईनं अनेकांची सेवा केली तरुणपणी आणि माझा लाभ झाला तिला. सत्यकामानं आईला नमस्कार केला आणि तो पुन्हा हारितऋषींकडे गेला.

जबाला मनात चिंतीत झाली. माझ्या मुलाला हारितऋषी आश्रमात घेतील ना? वडिलांच नाव पाहिजे, आईचं चालणार नाही असं ते म्हणतील का? पण त्यांनी तसं का म्हणावं ? पित्यापेक्षा माता श्रेष्ठ असते. माता ही आदिगुरू आहे. माता ही आदिशक्ती आहे. पुरुषसमान तिलाही प्रतिष्ठा आणि सन्मान समाजानं दिला आहे, ऋषीमुनींनी मानला आहे. मग पित्याऐवजी मातेच्या नावानं का ओळखला जाऊ नये पुत्र ? मुलाच्या नावापुढं वडिलांऐवजी आईचं नाव का लावू नये? अनेक प्रश्न तिच्या मनात उभे झाले. तिचा जीव कासावीस झाला. तिकडे सत्यकाम हारितांच्या आश्रमात पोहोचला. हारितऋषी समोरच उभे होते. त्यांनी सत्यकामाला ओळखले, लगेच विचारले, "बाळ, विचारलंस वडिलांचं नाव ?" 'होय. पण मला आश्रमात प्रवेश देण्यासाठी वडिलांच्या नावावाचून अडेल का ? तुम्ही लिहा, माझं नाव, सत्यकाम,' मी माझ्या आईचा जबालाचा पुत्र, तेव्हा माझ्या नावापुढं लिहा, माझ्या आईचं नाव, जबाला, मला ओळखा सत्यकाम जाबाल म्हणून. ऋषींनी स्मित केलं. क्षणभर कौतुकानं, त्या इवल्याश्या सत्यकामाकडं पाहिलं. धैर्यवान जबालाचं त्यांनी अभिनंदन केलं. 'मातृवान् पुरुषो ।" ते म्हणाले. 'स्त्री' ची प्रतिष्ठा, स्त्रीचा सन्मान - स्त्रीचं गुरू म्हणून प्रथम स्थान, आपल्या संस्कृतीनं मानलं आहे.  तुला मी प्रवेश दिलाय. जबाला गहिवरला. धावत आईकडं गेला. आईच्या आनंदाला पारावर उरला नाही. 

स्त्रीला पुरुषसमानच नव्हे, तर अधिकच मान आणि प्रतिष्ठा देणाऱ्या समाजाचे, संस्कृतीचे, जीवनशैलीचे जबाला हिने मनात आभारच मानले असतील. ही ब्रह्मवादिनी नसली तरी ब्राह्मवेत्त्याची माता म्हणून कर्तृत्ववान वाटते. खरंतर सत्यकाम जबाला याच्याकथेनी पुरुषी अहंकाराला, शरीरबलाच्या जोरावर प्राधान्य लादायला सरसावणाऱ्या पुरुषी प्रवृत्तीला, पायबंदच बसला असेल. 

सर्वेश फडणवीस

#ब्रह्मवादिनी #नवरात्र #लेखमाला #दिवसपाचवा

Wednesday, September 24, 2025

⚜️ ब्रह्मवादिनी : सरस्वती

खरंतर युगायुगातून एका विशिष्ठ सामाजिक अवस्थेचे दर्शन अटळपणे घडत असते. एक मोठा वर्ग अज्ञानी असतो. आपल्या अज्ञानापायी सतत दुःख भोगत असतो, अन्याय सहन करीत असतो, केवळ मरण जगत असतो. पण त्याला त्याची कधी खंत वाटत नसते, कारण त्याला त्याची कधी जाणीवच होत नसते. आपलं जीवन हा एक शाप आहे आणि तो भोगणे क्रमप्राप्त आहे अशी समजूत तो उराशी घट्ट बाळगून असतो. 

वेदकाळी एका स्त्रीने हे सगळे केले. तिने त्याकाळी अशा अजाण आणि अभागी वर्गाला नेतृत्व दिले. असा वर्ग राष्ट्रीय प्रवाहापासून दूर जातो आणि राष्ट्रापुढे संकट होऊन उभा ठाकतो. त्याला तिने समजूतदारपणे वळणावर आणले, मूळ राष्ट्रीय प्रवाहात सहज आणून सोडले, त्यांचे जीवन इतरांच्या सुखी व समृद्ध जीवनाशी एकरूप करून टाकले. ह्या वेदकालीन स्त्रीचं नाव आहे ब्रह्मवादिनी सरस्वती.

शरीर, वाणी, मन आणि बुद्धी ह्यांची चार प्रकारची ओजस्वी शक्ती, ह्या सरस्वतीनं त्या अडाण्यांना, शहाणं करून दिली. तिने त्यांना जीवन दिले. 'कुठे कुणी गेलंय का तिच्यापुढे, ती एकटीच हे कार्य करते आहे'. असं ऋग्वेद सांगतो. त्याकाळी पुढाऱ्यांनी वाणी निर्माण केली आणि आपल्यापाशीच ठेवली. सरस्वतीने सर्व प्रकारच्या प्राणिमात्रांच्या जीवन जगणाऱ्यांसाठी ती मोकळी केली. श्रीमंत, मध्यमवर्ग आणि गरीब ह्या सर्वांमध्ये ती वावरत असे. तिने ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र आणि निषाद म्हणजेच अरण्यांत रहाणारे आदिवासी ह्या पंचजनांची समृद्धी साधली. कुठेही भूक, उपासमार वा अन्नटंचाई दिसली की, सरस्वतीची आठवण झालीच समजा. ती, ही अन्नाची गरज त्वरीत दूर करी. कुणालाही भूकेपायी वा अन्न नाही, म्हणून तिने यातना सोसू दिल्या नाहीत. सर्वांचे जीवन शेतीच्या जोरावर समृद्ध करणारी ही सरस्वती त्याकाळी नदी स्वरूपच वाटली. मुक्या माणसांना तिने वाचा दिली, त्यांचं दुःख जगापुढं मांडायला वाणीचं शस्त्र दिले, चेतना आणि चैतन्य अंगी बाणवून तिनं समृद्ध केले. मग ही सरस्वती देवी त्यांना श्रेष्ठ आईच वाटली, वाग्देवी वाटली, म्हणूनच ते सरस्वतीला म्हणतात,

 'अम्बितमे, नदीतमे देवितमे सरस्वति । ज्या बिचाऱ्यांना ज्ञान नव्हते, बोलता येत नव्हते, अज्ञानी म्हणून समाजात प्रतिष्ठा नव्हती, त्यांना तिने समाजात इतरांबरोबर सुप्रतिष्ठित केले. त्यांना मान मिळवून दिला. तिने सर्व समाजार्थ उत्थान साधले. ती राष्ट्राची बनली, राष्ट्रदेवी झाली. तिने समाज व राष्ट्र यांचे उत्थान साधण्यासाठी त्या काळच्या सर्व बलवान नेत्यांचे साहाय्य घेतले, ती रुद्र, मरुत, वसू, आदित्य, आणि इतर पुढारी ह्यांच्यासोबत सर्वत्र वाऱ्यासारखी फिरत होती, जनतेच्या अडचणी दूर करीत होती. त्यांचे अज्ञान घालवून, त्यांचे जीवन सुखी व समृद्ध करीत होती. अशावेळी कुणी "ज्ञानविरोधी" आढळला तर त्याची तिने गय केली नाही. जनसामान्यांच्या कल्याणासाठीच ती लढली. सामान्यांचे कुठे अहित होत असेल, तर ती त्यांच्या बाजूने सदैव उभी ठाकली. सरस्वतीने लोकांना शब्द शिकविला, ज्ञान अर्पण केले, शहाणे करून सोडले आणि समृद्धी साधायला समर्थ बनविले. तिच्यामुळेच लोकांना अन्न मिळाले, दृष्टिसुख प्राप्त झाले, गोड वाणी कानी पडली आणि मोकळा श्वास सुखाने घेता आला.

सरस्वतीचा महिमा फार मोठा होता. श्वेतवस्त्र धारण करणारी, ती शांत व धीरगंभीर स्त्री त्या काळच्या अनेक नेत्यांना सांभाळून घेत होती. मित्र वा वरुण असो, इन्द्र वा अग्नी असो, त्वष्टा आणि पूषा असो की सोम किंवा अश्विनी असो , सरस्वतीने नेतृत्व आणि धारण पोषण करत त्यांना वाणी आणि ज्ञान देऊन परिपूर्ण केले आहे ,  सत्याचे आचरण करणारा, न्यायी, कर्तव्यतत्पर, सरळमार्गी आणि सर्वाप्रती आदराने वागणारा पुरुष, नेत्यांना आणि समाजालाही आवडतो. सरस्वती अशांचीच चाहती होती. अशांना ती नेहमी बळ देई. ज्ञानसंपन्न बनवत होती आणि ऋषीपदाला नेत होती. मग त्यांना भूतकाळाचे भान राखून भविष्याचा वेध घेण्यास ती तयार करत होती समाजाचे नेतृत्व करण्याचा मान त्यांना सहज प्राप्त होत होता. ते ब्राह्मण म्हणून गणले जात होते, ऋषी मानले जात होते, बुद्धिमंत म्हणून पूजिले जात होते.

सरस्वतीची वृत्ती राष्ट्रीय होती. तिने वाणीच्या जोरावर सर्वांना एकत्र आणले, जनांची एकात्मता व संघवृत्ती बळकट केली. एकसंघ, एकजीनसी व एकात्म समाज व राष्ट्र तिने घडविले. धनधान्याची समृद्धी साधण्याचे मार्ग तिने जाणले आणि इतरांसाठी झिजणाऱ्यात अग्रक्रम मिळविला. मग त्या काळच्या इतर नेत्यांनादेखील, तिला कुठे ठेवू नि कुठे नाही, असे झाले. तिला त्यांनी सर्वत्र प्रतिष्ठित केली. ती निरनिराळ्या रूपात लोकांत ओळखली जाऊ लागली. सरस्वती ही सृष्टीची श्रेष्ठ शक्ती ठरली. स्त्रियांना लाभलेले हे वाणीचे सामर्थ्य योग्य जागी व योग्य प्रकारे वापरले जावे, सरस्वतीचे हे वरदान सर्वथा सफल व्हावे, हीच आजदेखील अपेक्षा आहे.

सर्वेश फडणवीस 

#ब्रह्मवादिनी #नवरात्र #लेखमाला #दिवसचौथा

Tuesday, September 23, 2025

⚜️ ब्रह्मवादिनी : अदिती

आदिशक्तीच्या पर्वकाळात आपण वेदकालीन स्त्रियांबद्दल जाणून घेत आहोंत ‘अदिती' ही ब्रह्मवादिनी अर्थात वेदातील एक स्त्रीव्यक्तिरेखा. मातृत्वाचा एक सर्वोच्च आविष्कार. मातृत्वाला प्राप्त झालेला एक अर्थ. आद्य जगद्गुरू शंकराचार्य आपल्या 'देव्यापराधक्षमापन' स्तोत्रात म्हणतात, 'आई, मी तुझी कधी सेवा केली नाही, कधी तुला कवडीही दिली नाही, कदाचित् त्रासच दिला असेल, सर्वथा, तरी, माते तू, माझ्यावर केवळ प्रेमच केलंस, निरभिलाष आणि निरुपम प्रेम. - 'जगात पुत्र वाईट निघेल पण आई कधीही वाईट संभवणार नाही'. 'कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति'. 

इंद्र हा अदितीचा पुत्र म्हणविला आहे. वामदेव ऋषी अदितीला आठवण करून देतात की, 'माते, तुला इंद्राने काय कमी त्रास दिला? कितीतरी काळपर्यंत तू त्याला गर्भातच वाढवले, पण तिथं असताना देखील त्याने तुला खूप त्रास दिला आहे नं?' अदिती माता त्यावर सांगते की, 'नाही रे, वामदेवा, माझा पुत्र भूतकालीन आणि भविष्यकालीन अशा सर्व देवात आणि मानवात अद्वितीय असा आहे'. आत्यंतिक त्रास सोसूनही पुत्राचे गुणगान करणाऱ्या त्या मातृत्वाचा, वत्सलतेचा, पुत्रप्रेमाचा, वामदेवावर विलक्षण प्रभाव पडला. मातेची थोरवी त्याला उत्कटत्वाने जाणवली. सहस्त्र अपराध पोटात घालून ही माता त्याचे गुण तेवढेच जगात आविष्कृत करते, हे पाहून वामदेव थक्क झाला. इंद्र गर्भात असल्यापासूनच त्याच्या उपद्रवापायी त्रस्त झालेल्या जगानं त्याला त्या अवस्थेतच मारण्याचा प्रयत्न केला, पण अदिती मातेनं त्याला अनंतकाळपर्यंत पोटाशी लपविला, जगाच्या मारक हल्ल्यातून वाचवला, हे वामदेवाने जाणले व पुत्राचे गुण तेवढे जगापुढे गाणाऱ्या ह्या अदितीचा त्या वामदेवावर पुढे असा परिणाम झाला की, आधी इंद्राची वाटेल तशी निर्भत्सना करणारा हा वामदेव त्या इंद्राची एकापाठी एक स्तुतीस्तोत्रे गाऊ लागला. पुत्रावर असे अपार प्रेम करणारी ही माता आपल्या नसत्या लाडांनी आपले पुत्र बिघडणार मात्र नाहीत ह्याची पुरेपूर काळजी घेते. तिनं इंद्राला सर्वथा बलवान केलं, त्याचं शरीर दणकट आणि मन बळकट बनविलं. त्याला स्वावलंबनाचे आणि स्वयंपूर्ण होण्याचे पाठ दिले. अन्यायाविरुद्ध लढण्याचे धडे दिले, सर्वांच्या कल्याणासाठी अत्यंत उपकारक नव्हे, दुसरे जीवनच असे 'पाणी' सगळ्या मानवांना मुबलक मिळावे म्हणून तिनं इंद्राला प्रेरणा दिली आणि प्रसंगी भयानक युद्धे करायला लावून अडलेले आणि तुंबलेले पाणी प्रवाहित करायला लावले. जगाच्या कल्याणासाठी लढणारा पुत्र घडविला तो या अदितीनेच. 

आईने मुलांचे लाड अवश्य करावेत पण त्याचबरोबर त्याला कडक शिस्तीद्वारा जीवनाला यशस्वीपणे सामोरा जायला योग्य बनवावं, असं अदितीनं जगाला शिकवलंय. तिनं आपल्या पुत्रांना सर्व क्षेत्रात आघाडीवर ठेवलं. त्यांना पुढारी बनविलं नव्हे, देवत्व बाणविलं त्यांच्या ठायी. आणि हे करताना ती कोमल माता, अतिशय कठोरही बनली. ऋग्वेद सांगतो की, तिनं लोहारासारखे घणाचे घाव घालून हे देव घडविले.

'सं कर्मार इवाधमत् देवानां पूर्व्ये युगे' । वर्णनातीत वात्सल्य, प्रचंड प्रेम आणि जन्मजात जिव्हाळा, अदितीमातेतच जाणवला, तो स्त्रीत्वाचा एक अंगभूत गुण म्हणून. म्हणूनच स्त्रीचं प्रेम केवळ पुत्रावरच असतं असं नाही, स्वतः झिजून इतरांना जिव्हाळा लावणं, त्यांचं संपूर्ण जीवन सुखी करणं, त्यांची विविध प्रकारे काळजी घेणं हे स्त्रीच्या जणू रक्तातच असतं. अदितीनं हे दाखवून दिलं आहे. म्हणूनच स्त्री ही माता म्हणून पुत्राची काळजी घेते, तशीच मुलगी ह्या नात्यानं वडिलांची आणि पत्नीची भूमिका बजावताना पतीचीही जीवापाड काळजी घेते. वडिलांना पुत्रापेक्षा अधिक जिव्हाळा आणि प्रेम लाभतं ते कन्येकडूनच, आधार आणि आसरा लाभतो तो मुलीचाच अधिक आणि अकृत्रिमही. पित्याने मुलीला जन्म द्यावा आणि मुलीने पित्याला विवंचनेपासून दूर ठेवून सतत प्रेरणा द्यावी, आपले कर्तव्य करायला. आदितीने वडिलांना तसे घडविले, म्हणूनच ऋग्वेद म्हणतो, हे दक्षा, अदिती, जी तुझी कन्या तिनं तुला जन्म दिलाय. 

शतपथ ब्राम्हणाने पिता आणि गुरू ह्यांच्यापेक्षाही माता श्रेष्ठ म्हटली आहे. 'मातृवान पितृवान आचार्यवान पुरुषो वेद" । कारण अपार मेहनतीने ती मुलांवर संस्कार करते आणि त्यांना अग्रेसर बनविते. समाजाला मार्गदर्शन करणारे सतत सुखी आणि समाधानी ठेवणारे देवपण, पुढारीपण ती पुत्रांच्या ठायी निर्माण करते. म्हणूनच अदितीला देवांची निर्मिती करणारी म्हटले आहे. तिला जगाची माता म्हटले आहे. तिचे अनेक पुत्र आहेत कारण तिनं अनेकांना घडविलं आहे. विश्वनिर्माते  आणि जगदाधार देव, देवत्वाला पावले ते तिच्यामुळेच. 

मातेच्या कर्तृत्वाला मर्यादाच नाहीत हे दर्शविणारी ही माता म्हणूनच 'अ' म्हणजे नाही, 'दिती' म्हणजे मर्यादा अशी अदिती म्हणून संबोधिली आहे. तिनं दाखवून दिलंय की, आईच्या रूपात 'स्त्री' ही आदिशक्ती आहे. जगन्माता म्हणून ती सर्ववंद्य आहे. तिच्या अपार शक्तीची, अगाध कर्तृत्वाची आणि अमाप सामर्थ्याची जाणीव मात्र स्त्रीला व्हायला पाहीजे, स्त्रीचं मातृरूपी तेज. विश्वोद्धारक आहे, तसेच ते विश्वसंहारकही आहे. अदितीच्या तेजाचा अंकूर, तिचा पुत्र तिनं असाच सामर्थ्यवान बनविला आणि तो विश्ववंद्य झाला. 

अदिती मातेने हा धर्म जगाच्या आचरणात नित्य राहील ह्याची कठोरपणे काळजी घेतली म्हणूनच तिला 'ऋताधार' म्हटले आहे. आई म्हणजे वात्सल्य, आई म्हणजे करुणा, दुसऱ्याला जीवन देण्यासाठी सतत वापर करावा हा संस्कार घडविते ही माता. म्हणूनच तिच्या कर्तृत्वाचा प्रकाश अविनाशी व दिव्य ठरला आहे. अदितीचे हे ज्ञान, हे भान आणि हे कर्तृत्व म्हणजेच मातृत्व होय. आईची थोरवी म्हणूनच मोठी, म्हणूनच आई म्हणजेच एक आदिशक्ती, नित्यनूतन, निर्माणक्षमशक्ती आणि आई हे स्त्रीचेच एक रूप म्हणून 'स्त्री' ही एक आदिशक्ती आहे असे अदिती, ही वेदकालीन स्त्री सांगून जाते.

सर्वेश फडणवीस 

#ब्रह्मवादिनी #लेखमाला #नवरात्र #दिवसतिसरा

Monday, September 22, 2025

⚜️ ब्रह्मवादिनी : इंद्राणी

स्त्री ही एक शक्ती आहे. तिला सक्तीने दाबून टाकता येणार नाही याची जाणीव पुरुष विसरला की, स्त्रीने जागे व्हायला हवे. ती निसर्गत:च सहनशील आहे. पण ह्याचा अर्थ ती भ्याड आहे असा घेता येणार नाही. शारीरिक बलाने ती पुरुषापेक्षा कमी असली, तरी मनोधैर्य आणि बुद्धिचातुर्य यात ती पुरुषाला मागे टाकणारी आहे. जर स्त्रीला तथाकथित सामाजिक आणि नैतिक बंधनांनी जखडून टाकण्यात येईल, तर कुणीतरी तिला सावध करून अन्यायाविरुद्ध हिंमतीने उभे करायला हवे आणि वेदकाळात हे कार्य ब्रह्मवादिनी इंद्राणीने केले.

वेदकाळी इंद्राची पत्नी इंद्राणी ही स्त्रीजागृती आणि स्त्रीमुक्ती ह्याची पहिली प्रणेती आहे. आपल्या संस्कृतीत "गृभ्णामि सौभगत्वाय ते हस्तम् ।" विवाहाच्या वेळी वास्तविक पुरुष देवाब्राम्हणासमक्ष पुनःपुन्हा सांगत असतो की, मला सौभाग्य लाभावे म्हणून मी तुझा हात हाती घेत आहे आणि असे असताही, समाजात, तिचा पुरुष स्त्रीचे सौभाग्य ठरतो आणि पुरुषाला सौभाग्यवान म्हणण्याऐवजी स्त्रीलाच सौभाग्यवती म्हणून नावाजले जाते. 

वेदकाळी इंद्राणीने कुणालाही न भीता हे कार्य केले. स्त्रियांना एकत्रित करत, नवऱ्याचा अवास्तव धाक तिने पार घालवून दिला. स्त्रीचे दुःख, स्त्रीची असहायता, स्त्रीचे लाजीरवाणे जिणे आणि तिच्या जीवाची असुरक्षितता ही पण तसे चिंतेचीच बाब. स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने मान मिळायलाच हवा, "सहोत्रं स्म पुरा नारी समनं वाव गच्छति ।' (ऋग्वेद १०-८६-१०) पूर्वी पुरुष स्त्रियांशी समानतेने व्यवहार करीत, तिला हक्कही समान होते. मग आज हे विपरीत का घडावे, असा इंद्राणीने सवाल केला. ह्याला स्त्रीच तर जबाबदार नाही ना.  स्त्रीचा न्यूनगंड, पराभूत मनोवृत्ती आणि अनाठायी जाणवणारी भ्याड वृत्ती, हे विपरीत घडवीत असेल का आणि आपल्या भाग्याची, कर्तृत्वाची, सत्वाची आणि पुरुषसमान हक्काची तिची जाण गेल्याने हे तिच्या नशीबी आले असेल का ? होय. पण म्हणूनच स्त्रीला जागृत केले पाहिजे. केवळ ऋतामुळे म्हणजे कायदे करून स्त्रीची लाचारी, स्त्रीची विटंबना, स्त्रीचे दास्य संपणार नाही, म्हणून ती स्त्रियांना प्रथम हिंमत देते आणि सांगते: “उदसौ सूर्यो अगादुदयं मामको भगः । “ सूर्य उदयाला आलाय्, पहाट झालीय्,- हो हो माझ्या स्त्रीच्या भाग्याचीच पहाट आहे ती. आठव तुझे हक्क, आठव तुझ्या आज्या, पणज्या, त्या जागरूक होत्या ह्या हक्कांबद्दल. स्वपराक्रमाने त्या गाजवीत होत्या ते हक्क. घरात, सामाजिक कार्यात, राजकारणात, जनतेचे कल्याण आणि संरक्षण करण्यात त्या पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत. प्रसंगी त्यांच्यावर मात करीत, पण आज तसे उरलेले नाही. स्त्रियांचा आत्मविश्वास ढळलेला आहे. त्यांच्या बलाचा, पराक्रमाचा आणि हिंमतीचा त्यांना विसर पडलेला आहे. तेव्हा हे सगळे गेले पाहिजे. तुझ्या शक्तीची जाण आणि त्याचे भान ठेवून हे स्त्रियांनो, तुम्ही निश्चयाने बोला की, अहं तद्विद्वला पतिं अभ्यसाक्षि विषासहिः। (ऋ. १०-१५९-१) मी ह्या उदयाला आलेल्या सूर्याप्रमाणेच तेजस्वी आणि प्रखर पराक्रमी आहे. इंद्राणीने स्त्रियांना अशी स्फूर्ती दिली आणि त्याचबरोबर त्यांचा अहंकारही गेला . अहंकार हा अस्तित्वाचा मूल आधार असतो. तो अहंकार, हुंकार भरून उठला की, अन्यायाचे सूर, दूर दूर विरून जातात. म्हणून इंद्राणीने स्त्रियांना घोषवाक्ये म्हणायला दिली. 

"अहं केतुरहं मूर्धा अहमुग्रा" (ऋ. १०-१५९-२) अर्थात कुलकीर्तीची मी पताका आहे. कुळाला यश लाभले ते माझ्यामुळे. मी त्याची ध्वजा आहे. मी ते यश फडकाविले आहे. मी कुटुंबाचे मस्तक आहे. मूर्धन्यस्थानी असलेली मी माझ्या मताप्रमाणे कुटुंब चालवेन. मी उग्रकाली आहे. मला केवळ नाजूक, भावुक, घाऊक आणि पडखाऊ समजू नका. ". मी अन्याय मुकाटपणे सहन करणार नाही. माझ्यावरील अन्यायांचा पाढा, माझ्यावर कोसळणाऱ्या आपत्तींची गाथा मी जनतेपुढे मोठ्याने आवाजात वाचेन.

इंद्राणीने आवर्जून सांगितले की, पुत्राचे महत्त्व कमी नाही, पण म्हणून मुलीला हीन लेखणेही शहाणपणाचे ठरणार नाही. वेदकाळीही मुलांच्यासाठी तडफडणारे पुरुष होतेच. मुलगाच आई-बापांचा तारणहार मानणारी वृत्ती आजच्या प्रमाणेच होती. मुलाचे गोडवे गाऊन मुलीला तुच्छतेने वागविणारी प्रवृत्ती स्त्रियांना त्याकाळी होत होतीच आणि म्हणूनच इंद्राणी ठणकावून सांगते की, पुत्राचे महत्त्व कमी नाही, पण तो शूरवीर निघाला तरच त्याला काही अर्थ. बाकी मुलगी म्हणजे जगाचा मूलाधार. ती नसेल तर विश्वच खुंटले. जगाची प्रतिष्ठा म्हणजे पुत्री. दुहेरी हित साधते ती दुहिता. मुलीला दुहिता म्हणतात ते याच अर्थाने. माहेर आणि सासर अशी दोनही कुळे ती एकत्रित आणते, संवर्धते आणि समृद्ध करते. दोन्ही कुळांचेही हित करणारी ही दुहिता म्हणूनच 'विराट' होय. विराट हे विश्वाधारतत्त्व आहे. भारतीय तत्त्वज्ञानात ते विश्वकल्याणकारी, सर्वतोभद्र असे महन्मंगल ब्रम्हरूप मानलेले आहे. कन्या ही असेच एक विराटत्व आहे असे इंद्राणी सांगते.

म्हणून कन्येला कुलाचे दूषण नव्हे तर भूषण मानले पाहिजे. इंद्राणी, मुलींना अशी प्रतिष्ठा देऊन स्त्रियांना उत्साह देते आणि सांगते की, प्रतिज्ञा करा की, जे जे पराक्रम आणि जे जे कर्तृत्व गाजवून पुरुष चमकला, कृतकृत्य झाला आणि सर्वत्र उत्तम ठरला ते ते मी सगळे करेन, मला हीन लेखणारे, मला दुःख देणारे, मला पीडा देणारे, माझे जीवन उद्ध्वस्त करणारे ह्या सर्वांना जिंकून मी माझ्या पतीलाही माझी कर्तबगारी आणि उत्तम कीर्ती जाणवून देईन.

मनाशी खूणगाठ बांधा स्त्रियांनो की, तुम्हांला सर्वच क्षेत्रात पुरुषाप्रमाणेच पराक्रम गाजवायचाय्, सर्वत्र विजय तुमचाच व्हायचा आहे, सत्ता, संपत्ती आणि समृद्धी सहज साधणारी कृती करणे हेच तुमचे आद्यकर्तव्य आहे. म्हणून म्हणा “समजैषमिमा अहम्।”- पुरुषा, मी सर्व क्षेत्रात तुझी स्पर्धक आहे. आणि असे कर्तृत्व गाजवून पुरुषाप्रमाणेच सुयश प्राप्त करणारी स्त्री कुटुंबात आणि समाजातही प्रतिष्ठा प्राप्त करते. स्त्रीला अशी प्रतिष्ठा लाभणे हीच आजची गरज आहे, कुटुंबमान्यता, समाजमान्यता आणि राजमान्यता लाभणे हेच स्त्रीने ध्येय ठेवावे.

वेदकाळी इंद्राणीच्या तालमीत तयार झालेल्या स्त्रियांनी आपले हक्क आपण मिळविले. पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रे काबीज केली. उगीच नाजुकपणा मिरवीत, भावुक बनून केवळ स्वतःच्या जीवाचे आणि देहाचे लाड करवून घेत ती सासरच्या हातचे कचकड्याचे केवळ दिखाऊ बाहुले बनून वागली नाही. केवळ पुरुषांची भोग्यवस्तू बनून गुलामी जीवनाची शिकार बनली नाही.  इंद्राणीने अशी किमया घडविली. स्त्रीजागृती करून स्त्री मुक्त केली, इंद्राणी जगात कीर्तिमान झाली. ती खूप मोठी झाली, प्रतिष्ठा पावली. तिने स्त्रियांसाठी सामाजिक नीती घडविली. वर्तनाचे आदर्श सर्वत्र घडविले. तिची शिकवण विवाह विधीच्या वेळी वधू-मुखातून वदविली जाऊ लागली. इंद्रपत्नी सर्वकाळ त्या स्त्रियांना स्त्रीजागृतीचा, स्त्रीमुक्तीचा मार्ग दाखवून गेली. आजही अशा इंद्राणी निर्माण होवोत आणि स्त्रीचे दास्य लयाला जावो हीच प्रार्थना आहे. 

सर्वेश फडणवीस 

#ब्रह्मवादिनी #लेखमाला #नवरात्र #दिवसदुसरा

Sunday, September 21, 2025

⚜️ ब्रह्मवादिनी : विदर्भ राजकन्या लोपामुद्रा

वैदिक वाङ्मय हे जगातील पहिले उपलब्ध वाङ्मय आहे. वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान, ज्ञानाचा विषय किंवा ज्ञान मिळविण्याचे साधन असा होतो. अतिप्राचीन काळामध्ये प्राचीन ऋषिंना वेदवाङ्मयाचा साक्षात्कार झाला म्हणजेच त्यांना वेद दिसले, त्याचे ज्ञान झाले असे यास्काचार्यांनी म्हटले आहे. ऋग्वेदातील काही ऋक्सूक्ते ऋषिकांनी रचलेली आहेत. साधारण वेदातल्या पुरुष ऋषींनी ज्याप्रमाणे त्यांच्या मानवी इच्छा, आकांक्षा, व्यावहारीक अपेक्षा त्यांच्या सूक्तांतून मोकळेपणाने मांडल्या आहेत, तशाच ऋषिकांनीही त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. एक चांगला नवरा, नवऱ्याचे प्रेम, चांगले स्वास्थ्य एवढीच त्यांची गरज आहे. स्त्रियांच्या या पहिल्या लिखित उद्गारांमधूनही त्यांच्या स्त्रीत्वाची झलक बघायला मिळते. तसेच ऋषिकांच्या लेखनात तत्कालिन कौटुंबिक जीवनाचे प्रतिबिंब पडलेले दिसते. या विदुषींची ओळख या शारदीय नवरात्रात मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्यातील पहिली ब्रह्मवादिनी आहे विदर्भकन्या लोपामुद्रा. 

तर ही वेदकाळातील गोष्ट आहे. विदर्भ देशाची राजकन्या खूप सुंदर आणि वेदशास्त्र संपन्न होती. तिचं नाव लोपामुद्रा होतं. मान्य नावाचा एक ऋषी होता. मान्य हुशार होता. त्याकाळी प्रजा खूप वाढली होती. रहायला जागा उरली नव्हती. शेते पिकवायची पण शेतीच नव्हती. लोकांची अडचण व्हायला लागली, पण लोक करणार तरी काय? जाणार तरी कुठे? आणखी दक्षिणेला सरकायचं तर विंध्य पर्वत आडवा आला होता. तो उंच पर्वत ओलांडून दक्षिणेकडं जाणं कठीण होतं. ह्या मान्य नावाच्या ऋषीनं लोकांची ही अडचण ओळखली आणि त्याने विंध्य पर्वत सहजपणे ओलांडून जाता यावं म्हणून विंध्याला ठेंगणा केला. विंध्य फोडणारा, तोडणारा म्हणून त्याची ख्याती झाली. लोक दक्षिणेकडे पसरले. मान्य ऋषीला त्यांनी नेता म्हणून घोषित केले. पुढे मान्य विदर्भात आला. लोक त्याला पहायला गर्दी करू लागले. हाच तो विंध्य नमविणारा मान्य ऋषी म्हणून त्याचं कौतुक करू लागले. हळूहळू मान्याच्या अचाट कर्तृत्वाच्या कथा दाहीदिशा पसरू लागल्या. 

लोपामुद्रेच्या कानावर मान्याची ही कीर्ती आली, पण लगेच कळले की एवढं अचाट कर्तृत्व आणि कौशल्य अंगी असूनही तो मान्य ऋषी वैराग्यासारखा रहातो. जवळ एक कवडीही नाही  आणि त्याच्याएवढ्या कर्तृत्ववान माणसाचा समाजाला खूप उपयोग होऊ शकतो, तो वैराग्य सोडून सतत पौरुष गाजवायला लागला तर ह्या पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल आणि लोकोपयोगी कार्य करायला त्याला कुणीतरी प्रेरणा द्यायला हवी. लोपामुद्रेनं त्याच्याशी विवाह केला, पण मान्य ऋषीचं वैराग्य गेल नाही. कर्तृत्व गाजविणं सोडलं की माणूस म्हातारा होतो. हा मान्य तसाच झाला होता. कसलीही इच्छा नाही की आकांक्षा नाही, संसार थाटलेला पण घरात कवडीही नाही. लोपामुद्रेला हे पाहवलं नाही. पत्नी म्हणून पतीला पराक्रम गाजवायला प्रेरणा देणं हे तिचं कर्तव्यच होतं, पत्नी ही पतीची प्रेरक व कारक शक्ती असते, तिनं मान्याला सारखं, सुरुवातीला काही उद्योग करा म्हणून सांगायला सुरुवात केली. ती म्हणायची, "माणसानं सतत उद्योग केला पाहिजे" माणूस म्हणजे त्याच्या ठायी अनेक महत्त्वाकांक्षा असायलाच हव्यात, मला असं दरिद्री जीणं नको, मी राजकन्या आहे. ऐश्वर्यात वाढले आहे. तुमच्यात कर्तृत्व आहे, कौशल्य आहे. मग उठा, काम करा, संपत्ती मिळवा'. मान्य ऋषीला, तिच्या पतीला उत्साह वाटावा, अशी जनतेनंही वाहवा केली होतीच, 'अग' म्हणजे 'पर्वत' त्याला 'स्त्यायति' म्हणजे नमविणारा म्हणून लोक त्याला 'अगस्ती' म्हणू लागले होते. तरी पण मान्य ऋषीचे वैराग्य जाईचना, विदर्भाची राजकन्या खिन्न  झाली. तिच्या मुद्रेवरचा आनंद लोपला आणि ती अक्षरशः “लोपामुद्रा' दिसू लागली, तिनंही वैराग्याचं रूप धारण करायला सुरुवात केली. लोकांना राजकन्येचा हा असा विस्कटलेला संसार पाहवेना. तेही अगस्तीला बोलू लागले. लोपामुद्रेनं तर त्याच्याशी बोलणंही सोडलं. मग मात्र अगस्ती गडबडला, "काय करू म्हणतेस मी ?"

लोपामुद्रा  म्हणाली, “सत्य मार्गानं जा. पौरुष गाजवा. ऐश्वर्य मिळवा. संतती आणि संपत्ती प्राप्त करणे संसारी पुरुषाचे कर्तव्यच असते. "ठीक. मी तुला खूप द्रव्य आणून देतो. आणि असे म्हणून अगस्ती उठला आणि इल्वल नावाच्या दैत्यावर चालून गेला. एकट्याच्या पराक्रमानं त्यांनं त्या दैत्याला हरवलं. त्याची सगळी संपत्ती हस्तगत केली आणि लोपामुद्रेपुढं आणून टाकली, पण लोपामुद्रेला केवळ असं लुटमार करून आणलेलं द्रव्य अपेक्षित नव्हतं, ती म्हणाली, "मला असलं फुकटचं द्रव्य नको. माणूस कुटुंबाकरता जगतो तसाच समाजासाठी आणि देशासाठीही. तेव्हा तुम्ही स्वतः कष्ट करा. काही उत्पादन करा. अन्न मिळवा, अन्न वाढवा. समाज आणि देश संपन्न करा. "म्हणजे काय करू म्हणतेस ?" अगस्ती. "ही कुदळ, फावडी घ्या, शेतात जा. शेतात मेहनत करा. शेत उत्तम पिकवा." अगस्ती उठला, कुदळ, फावडं घेऊन शेतावर गेला. खूप मेहेनत केली. शेती उत्तम पिकली. अन्न पिकलं, उत्पादन वाढलं. हातात पैसा आला. जनतेत लौकिक वाढला. काम करण्याची सवय लागली. वैराग्य गेलं, आळस गेला. पौरुष जागं झालं. लोपामुद्रेला आनंद झाला, पण केवळ शेतमेहनत करणारा म्हणूनच लौकिक व्हावा आपल्या पतीचा एवढ्यावर ती संतुष्ट नव्हती. ती अगस्तीला म्हणाली, "तुम्ही बुद्धिमानही आहात. जनतेत प्रतिष्ठा आहे तुम्हांला आणि देशाला तुमचा काही उपयोग होऊ द्या."

त्यानंतर 'खेल' नावाच्या त्या काळच्या एका नावाजलेल्या राजानं अगस्तीला आपला राजपुरोहित म्हणून नेमलं. आता अगस्तीचं पौरुष सर्वत्र गाजू लागलं. लोपामुद्रेच्या प्रेरणेला फळ आलं. लोपामुद्रेच्या, आपल्या पत्नीच्या प्रयत्नामुळे संपत्ती आणि नावलौकिक मिळविणाऱ्या अगस्तीला, संततीही लाभली. त्यांचा दृढास्यू नावाचा पुत्र लोपामुद्रेचा आनंद प्रतिदिन वाढवू लागला. पतीच्या पौरुषाला जागवणारी प्रेरक पत्नी म्हणून लोपामुद्रेचा सर्वत्र जयजयकार झाला अशी ब्रह्मवादिनी लोपामुद्रा होती. 

सर्वेश फडणवीस 

#ब्रह्मवादिनी #नवरात्र #लेखमाला #दिवसपहिला

Saturday, September 20, 2025

ब्रह्मवादिनी

आपल्या देव देवता म्हणजे शक्ती आहेत. शक्तीला तिच्या तेजामुळे देवी हे अभिधान प्राप्त झाले. गेल्या सहा वर्षांपासून आदिशक्तिच्या पर्वकाळात विविध विषयांवर या माध्यमातून लेखन झाले. "उत्सव आदिशक्तीचा" शीर्षकांतर्गत विदर्भातील देवी स्थानांवर, "त्वं ही दुर्गा" अंतर्गत सामाजिक क्षेत्रांत कार्य करणाऱ्या स्त्रियांवर, "कर्तृत्वशालिनी" या अंतर्गत संरक्षण दलातील कार्यरत मातृशक्तीवर आणि  "आधारवेल" अंतर्गत गेल्या शतकातील आणि आताच्या ऐतिहासिक स्त्री चरित्रांवर, "विज्ञानवादिनी" अंतर्गत वैज्ञानिक क्षेत्रात महिलांनी केलेल्या कार्याचा परिचय, अहिल्याबाई यांच्या त्रिशताब्दी जन्मजयंती निमित्ताने “नवनवोन्मेषशालिनी” अंतर्गत अहिल्याबाईंच्या नऊ पैलूंना स्पर्श केला यावर्षी याच धारेत वेदकालीन स्त्री चरित्र "ब्रह्मवादिनी"अंतर्गत सलग नऊ दिवस मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. 

घटस्थापनेपासून नवरात्रोत्सव जागर उत्सवाला सर्वत्र उत्साहात सुरुवात होणार आहे. नवरात्रात खरं तर जागर हा स्त्री शक्तीचा व्हायला हवा. अनेकजण या माध्यमातून तो करतांना दिसत आहेत.
ऋग्वेद सर्वात प्राचीन वाङ्मय समजले जाते. यात दहा मंडले असून त्यातील निरनिराळ्या सूक्तांची रचना वेगवेगळ्या ऋषींनी केली आहे. या ऋषींना आपण मंत्रद्रष्टे म्हणतो कारण त्यांच्याकडे जी दिव्य दृष्टी  आहे त्याद्वारे ते प्रत्यक्षाच्या पलीकडेही पाहू शकतात. या ऋषींमध्ये काही स्त्रियाही आहेत ज्यांनी  ऋग्वेदातील काही सूक्तांची, काही ऋचांची रचना केली आहे त्यांना ब्रह्मवादिनी म्हणत असत. वेद उपनिषद काळापासून स्त्री ही खरं तर पूजनीय, वंदनीय आहे. वैदिक काळापासून ती शिक्षित आणि उच्च विद्याविभूषित अशीच होती आणि आजही हे संचित कायम आहे. तिचा प्रतिकात्मक नऊ दिवस आणि सदैव केलेला आदर आणि सन्मान म्हणजेच नवरात्र. 

आज सर्व क्षेत्रात ती कार्य करते आहे आणि सर्व शिखर पादाक्रांत करते आहे. हे करण्याचे धैर्य तिला इतिहासातून मिळाले आहे. संस्कारांचे बाळकडू घेऊन स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्र स्वतःच्या कर्तृत्ववाने यशोशिखरावर नेले आहे. आज प्रत्येक कार्यक्षेत्रात झोकून काम करायला सदैव तयार असणारी, नव्हे अग्रेसर असणारी स्त्री आहे. ज्या भारताला आम्ही मातेचा दर्जा देतोय त्या भारतातील स्त्री वंदनीय आहे. सर्ववेद, ब्राह्मणे, बृहददेवता, उपनिषदे, महाभारत, पुराणे स्त्री चरित्रांनी भरलेले आहेत. समाजातील विकृतीला सुद्धा प्रसंगी धैर्याने लढणारी रणरागिणी म्हणजे सुद्धा एक स्त्रीच आहे इतिहासातून मिळालेल्या सद्गुणांचा संचय करत तिची वाटचाल प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास वेद आणि उपनिषदांच्या काळापासून तिच्या पराक्रमाने उन्नत झाला आहे. आपल्या पराक्रमाच्या गाथा तिने त्रिखंडात गाजवलेल्या आहेत. प्रत्येकाला गर्व वाटेल अशीच स्त्रीची वाटचाल आहे. 

खरंतर वेदकाळी स्त्रियांना प्रतिष्ठा होती. धर्मकारण, राजकारण, ज्ञान-विज्ञानकारण आणि समाजकारण ह्या सर्वात तिला पुरुषासारखे प्राधान्य होते. काही बाबतीत तर ती पुरुषाहुन अधिक सन्मानाने वागवली जाई, अद्भुत आणि अविस्मरणीय कार्य वेदकालीन स्त्रियांनी केले आहे. त्यांच्या योगदानाबद्दल त्या सदैव स्मरणात राहणाऱ्या आहेत अशाच वेदकालीन स्त्रियांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करतोय."ब्रह्मवादिनी" या बिरुदावलीत थोडीफार मांडणी करण्याचा प्रयत्न सलग ९ दिवस करणार आहे. आज जागतिकीकरणात 'ती' स्वतःला सिद्ध करत जी यशस्वी वाटचाल करते आहे त्या तिच्या कर्तृत्वाने अशीच उंच भरारी घेत रहावी हीच सदिच्छा आहे कारण हे संचित तिला वैदिक काळापासून मिळालेले आहे आणि त्यातूनच हे लेखन करण्याचा प्रयत्न असणार आहे. 

सर्वेश फडणवीस 

 #ब्रह्मवादिनी #नवरात्र #लेखमाला

Wednesday, August 27, 2025

देवा तूंचि गणेशु, सकलमति प्रकाशु । 🙌🌺

जगाच्या तत्वज्ञानाला गवसणी घालणाऱ्या श्रीज्ञानेश्वरीचा प्रारंभ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी गणेशस्तवनाने केला आहे. माउलींनी ज्ञानेश्वरीचा प्रारंभ ज्या गणेशवंदनेने केला आहे ती वंदना वाचत असता माउलींच्या शब्द स्पर्शाचे वेगळेपण सहज मनात भरणारे आहे. देवा तूंचि गणेशु, सकलमति प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु, अवधारिजो जी.. अर्थात ॐ हे गणेशाचे प्रतिक आहे. वरील ओवीत वर्णन केलेले ॐकारस्वरूपी परब्रम्ह म्हणजेच सकलांच्या बुद्धीचा दाता म्हणजे श्रीगणेश आहे. श्रीगणराजांना प्रत्येक पूजेत अग्रपूजेचा मान असल्याने माउली सुद्धा मंगलाचरणात गणपतीस नमस्कार करतात. संत आणि त्यांच्या वाङ्मयात श्री गणेशाच्या मंगलाचरणावर स्वतंत्र लेखन होईल इतक्या प्रासादिक ओव्या आपल्याला दिसतात. माउली लिहितात, 

ॐ । नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ।। १।। 
देवा तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ।।२ ।। 
हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष । जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ।।३।।
स्मृति तेचि अवयव । देखा आंगीक भाव । तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ।।४।।
अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें । पदपद्धति खेवणें । प्रमेयरत्नांचीं ।।५ ।।
पदबंध नागर । तेंचि रंगाथिले अंबर । जेथ साहित्य वाणें सपूर । उजाळाचें ।।६।।
देखा काव्य नाटका । जे निर्धारितां सकौतुका । त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ।।७।।
नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी । दिसती उचित पदें माझारीं । रत्नें भलीं ।।८।।
तेथ व्यासादिकांच्या मतीं । तेचि मेखळा मिरवती । चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ।।९।।
देखा षड्दर्शनें म्हणती । तेची भुजांची आकृति । म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधें हातीं ।।१०।।
तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु । वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ।।११।।
एके हातीं दंतु । जो स्वभावता खंडितु । तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ।।१२।।
मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु । धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ।।१३।।
देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु । जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ।।१४।।
तरी संवादु तोचि दर्शनु । जो समता शुभ्रवर्णु । देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ।।१५।।
मज अवगमलिया दोनी । मिमांसा श्रवणस्थानीं । बोधपदामृत मुनी । अली सेविती ।।१६।।
प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ । सरिसेपणें एकवटत इभ- । मस्तकावरी ।। १७ ।। 
उपरि दशोपनिषदें ।  जियें उदारें ज्ञानमकरंदे । तियें कुसुमें मुकुटीं सुगंधें ।  शोभती भलीं ।।१८।।
अकार चरण युगल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकारें ।।१९।।
हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें । तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें । आदिबीज ।।२०।। 

अर्थात सर्व मानवांना "बुद्धीची" विशेष देणगी मिळाली आहे. या बुद्धीचा दाता तो श्रीगणेश असे संबोधून स्वतःला श्रीनिवृत्तीदास म्हणवून माउली गणेशवंदनेस प्रारंभ करीत आहेत. आपल्या नजरेसमोर जे गणेशाचे ध्यान येते तेच माउलींसमोर आहे. फरक एवढाच की माउलींची असामान्य प्रतिभा लक्षात घेता ते एका वेगळ्याच उंचीवरुन त्या गणेशाचे वर्णन करतात. त्यांना त्या मूर्तीत सगळं शब्दब्रह्म साकारलंय असं वाटू लागतं. आपल्याला जी सोंड दिसते तिथे त्यांना निर्मळ विवेक दिसतोय. दोन्ही कानांच्या ठिकाणी दोन मीमांसा दिसत आहेत तर गंडस्थळाच्या ठिकाणी द्वैत-अद्वैत अर्थात असे हे जे विलक्षण दर्शन माउलींना घडले ते मुळातूनच अद्भुत आणि वाचण्यासारखे आहे.

खरंतर हे श्री गणेशाचे रुप म्हणजे केवळ मूर्तिमंत वेद - ज्यात अतिशय निर्दोष असे वर्ण हेच जणू त्याचे शरीर. निरनिराळ्या स्मृति हे त्याचे विविध अवयव. या स्मृतितील अर्थसौंदर्य हे जणु या गणेशाचे शरीर लावण्यच आहे. श्रीगणेशाचे चरण युगुल हे ॐकारातील "अ"कार तर त्याचे विशाल पोट हे "उ"कार आणि मस्तक हे "म"कार. ॐकाराच्या या तीन मात्रा जिथे एकवटल्या आहेत, जिथे हे शब्दब्रह्म साठवले गेले आहे. त्या मूळबीजभूत गणेशास मी श्रीगुरुंच्या कृपेने वंदन करीत आहे हा माउलींचा भाव मनाला स्पर्शून जाणारा आहे.

माउलींनी इथे गणेशाचे वाङ्मयीन रुप दाखवले आहे. त्यात हिंदू तत्वज्ञानातील वेद, पुराणे, सहा दर्शने, वेदांत याबरोबरच काव्य - नाटक इ.चेही महत्व विशद केले आहे. माउलींची तत्कालीन संस्कृतोद्भव अशी प्रासादिक भाषा, त्यांनी दिलेल्या विविध सुंदर सुंदर उपमा यामुळे हे सारे गणेशवर्णन आणि गणेशवंदन अतिशय उत्तुंग झाले आहे. अशा या श्रीगणेशाचे स्मरण करता भाद्रपद गणेशोत्सवात आपणही त्या मूळ अविनाशी अर्थात निराकाराशी एकरुप होण्याचा प्रयत्न करुयात. श्रीगणेश ही बुद्धीची देवता आहे. 
माउलींच्या शब्दांचे सामर्थ्य विलक्षण आणि अनाकलनीय आहे. सारस्वताच्या अभिनव शब्दप्रवाहातील हे अमृतसिंचन सतत नवनवीन अर्थात उमगत राहावे हीच कैवल्यसाम्राज्य माउलींच्या चरणी प्रार्थना आहे.  मंगलमूर्ती मोरया 🙏🙌 

Sarvesh Fadnavis 

छायाचित्र सहाय्य : Akshay Jadhav Patil 

#GaneshChaturthi2025

Friday, May 2, 2025

सहवासाच्या चांदण्यात .


सहवासाच्या चांदण्यात .. या नावातच एक शीतलता आणि मांगलिक भाव जाणवतो. शब्दप्रभू राम शेवाळकर यांचे विविध पैलू उलगणारी विजयाताई शेवाळकर यांच्या मुलाखतीचे हे शब्दांकन आहे आणि मुलाखतकार रेखा चवरे जैन यांनी विजयाताईंना छान शब्दबद्ध केले आहे. ८० पानी असलेल्या पुस्तकात या सहजीवनाचा पट सुरेख शब्दांत वाचायला मिळतो. पुस्तक हाती घेतले की एका बैठकीत वाचूनच ते अलगद बाजूला जाते आणि मनोमन यांच्याबद्दलच्या आत्मियतेचा सुगंध अनेक दिवस दरवळतो. 

काल २ मे विजयाताईंचा स्मृतिदिन आणि आज ३ मे नानासाहेबांचा स्मृतिदिन. नियतीचे संकेतही विलक्षण असतात फक्त एका दिवसाच्या फरकाने या दांपत्याने देहाची खोळ सोडली. पण त्यांच्या आठवणीत कालची संध्याकाळ खऱ्या अर्थाने शुभंकर संध्याकाळ होती. त्या आठवणीत रमल्यावर अशी छोटेखानी पुस्तकं सुद्धा सुखद क्षण प्रदान करतात. 

विद्यावाचस्पती' 'वक्ता दशसहस्त्रेषु' डॉ. राम शेवाळकर हे अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि अनेकांना आपलंसं करणारे, कित्येकांना आपले सर्वांच्या आदराला पात्र ठरलेले जन्मभर माणूसपण जपणारे होते. जनसामान्यांमध्ये वावरतांना नानासाहेबांनी - राम शेवाळकरांनी नेहमीच स्वतःच्या भव्य उत्तुंगतेला दूर ठेवलं आणि लोकांमध्ये अगदी साधेपणाने वावरले. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला आपलंसं केलं. अशी त्यांनी अनेक माणसं जोडली.

मराठी साहित्य क्षेत्रात नानासाहेबांचं भरीव योगदान तर सर्वांना ज्ञातच आहे. पण वक्ता दशसहस्त्रेषु म्हणून राम शेवाळकर यांचा नावलौकिक अधिक गाजला. त्यांची तळपती तेजस्वी वाणी विविध विषयांना भिडून जन सामान्यांच्या हृदयात हळुवारपणे शिरली. व्याख्यानांच्या समयी तळपणारी त्यांची तेजस्वी वाणी एरवी लोकांशी बोलताना किती मृदू होत असे आणि त्यांच्या वाणीमध्ये दिसणाऱ्या या दोन आविष्कारांचं नेहमी नवल वाटते पण अशी आश्चर्ये थोर माणसांमध्ये दिसत असतात म्हणूनच ती थोर असतात. संपर्कात आलेल्या प्रत्येकाशी ते इतक्या आपुलकीने बोलत, प्रत्येकाच्या सुखदुःखाची चर्चा करीत, त्यांच्या मताला किंमत देत आणि समोरच्या माणसाला जिंकून घेत. त्यांनी अशी गावंच्या गावं काबीज केली. ते ज्या गावाला जात, ते गाव त्यांचंच होऊन जाई आणि गाववाले पण त्यांना आपलं मानीत. अशा कित्येक गावातल्या अनेक माणसांना नानासाहेब आपले वाटत म्हणूनच त्यांच्या मृत्यूनतर आपण पोरकं झालो अशी उभ्या महाराष्ट्राची भावना झाली.

आदरणीय शब्दप्रभूंचे शब्द म्हणजे मराठी भाषेतील अनमोल ठेवा मग ते शब्द त्यांच्या वाणीतून निघालेले असोत वा लेखणीतून उतरलेले असोत. ते सर्वांना हवेहवेसे व महत्त्वाचे वाटत. म्हणूनच मा. मनोहर जोशींसारख्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांच्या वन्-बी पुस्तकासाठी नानासाहेबांची प्रस्तावना घेणं किती महत्त्वाचं वाटलं असेल. तत्त्वदच सुरांचं दैवी वरदान प्राप्त झालेल्या आणि संगीत-विश्वात मानदंड ठरलेल्या मंगेशकरांना त्यांच्या गाण्यासाठी नानासाहेबांच्या रसाळ निरुपणाची जोड हवीहवीशी वाटे. त्यातूनच ज्ञानेश्वरांच्या अभंग रचनांचा 'अमृताचा घनु', या आध्यात्मिक उंची गाठलेल्या कार्यक्रमाची निर्मिती झाली. "जेथे सुरांचं साम्राज्य संपते तेथे नानासाहेबांच्या शब्दांचं साम्राज्य सुरू होते" अशा शब्दात पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी नानासाहेबांच्या शब्द साम्राज्याच्या थोरवीचं वर्णन केलं आहे.

नानासाहेबांचा चाहतावर्ग अवाढव्य अगदी सामान्य माणसापासून तर राजकीय नेते. कलावंत, गायक साहित्यिक, समाजसुधारक सर्वच प्रकारातील व्यक्ती नानासाहेबांबद्दल नितांत आदर बाळगून होते. नानासाहेबांनी आपल्या विशाल हृदयात सर्वांना उदारपणे सामावून घेतलं, कोणालाही कसल्याही बाबतीत नकार देण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता, ते सतत दुसऱ्यांच्या भल्याचाच विचार करीत, दुसऱ्यांना कसलीही मदत करण्यात ते त्रास मानत नसत आणि काही नावांचं माहात्म्य असं असतं की ते जिथे असतं, त्याला वेगळंच महत्त्व प्राप्त होत असतं. प्रा. राम शेवाळकर हे नाव त्यांपैकीच एक. नानासाहेबांचं नाव जिथे असेल त्या स्थानाला एक वेगळीच उंची प्राप्त होई. मग तो कार्यक्रम असो वा पुस्तक प्रकाशन ! पुस्तकाचं प्रकाशन नानासाहेबांच्या शुभ हस्ते झालं किंवा प्रस्तावनांच्या रूपाने त्यांचा आशीर्वाद मिळाला की लेखकाला धन्य वाटायचं. अनेक लेखकांच्या लेखणीला दाद देऊन नानासाहेबांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आहे. फक्त साहित्य क्षेत्रातल्या नव्हे तर इतरही कलाकारांना नानासाहेबांचं प्रोत्साहन मिळत असे. म्हणूनच माझे पहिले पुस्तक गाभारा-मंदिरांचा समृद्ध वारसा प्रकाशित होण्यापूर्वी त्यांच्या साहित्यिक गाभाऱ्यात काहीकाळ घालवता आले हा ही योग आठवणीत राहणारा आहे. 

नानासाहेब आणि विजयाताई हे एकरूप झालेले दाम्पत्य. विजयाताई खऱ्या अर्थाने सहजीवन जगल्या. सखी, पत्नी, मैत्रीण, शिक्षक, मदतनीस, लेखनिक आणि प्रसंगी आईचीही भूमिका पार पाडत नानासाहेबांना शारीरिक, भावनिक, मानसिक आधार देणाऱ्या, नानासाहेबांशी एकरूप होऊन देखील स्वतंत्र अस्तित्व राखणाऱ्या विजयाताई नानासाहेबांबद्दल भरभरून बोलत असत. बहुआयामी अशा नानासाहेबांचे विविध पैलू उलगडून कलावंत म्हणून आणि माणूस म्हणून त्यांचं जे दर्शन विजयाताईंनी घडविलं ते स्तिमित करणारं आहे. 

नानासाहेबांसारखी व्यक्ती महानतेला कशी प्राप्त झाली, उंचीवर कशी गेली ही काहीशी प्रक्रियाच विजयाताईंनी उद्धृत केली. त्या म्हणतात, "वयोमानानुसार आठवत नाही, विसरून जाते" विजयाताईच्या या छोट्याशा तक्रारीवर नानासाहेबांचे विविध पैलू उलगडणाऱ्या मुलाखतकारांनी विचारलेल्या प्रश्नांनी स्मरणाच्या गुहेचं दार उघडल्या जाण्याचाच अवकाश की त्यातून मनोरम आणि मौल्यवान खजिना बाहेर येतो. नानासाहेबांचं जीवन म्हणजे अनुभवांचं समृद्ध भांडारच त्यामुळे त्यांच्या आत्मपर लेखनातही अस्पर्शित राहिलेले अज्ञात, हृद्य, भावपूर्ण, अविस्मरणीय, रंजक पण महत्त्वाचे प्रसंग या संवादातून ज्ञात होतात. नानासाहेबांचं असं सूक्ष्म दर्शन विजयाताईंशिवाय अन्य कोण घडवू शकणार आणि ते या पुस्तकात वाचायला मिळते. साहित्यक्षेत्रात आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तीचं तर हे दर्शन आहेच पण सुमारे ७५ वर्षांपूर्वीचा काळ, काळातील स्थिती, सांस्कृतिक वातावरण, कलावंतांमधील उदात्तता, नम्रता, सहृदयता, साधेपणा, कनवाळूपणा, संतुष्ट वृत्ती अशा त्या पण आताच्या काळात अतिशय दुर्मीळ झालेल्या गुणांचं ही हे विलोभनीय दर्शन वाचनीय आहे. 

विजया ताई म्हणतात, “कोणालाही हेवा वाटावा एवढ सुख जीवनात ओसंडून वाहिलं. थोरामोठ्यांशी परिचय झाला. काहींशी घनिष्ठ संबंध जोडता आला, त्याच्याजवळ बसता आल, गप्पा मारता आल्या. त्यांचा पाहुणचार करता आला. त्यांच्याशी मनातल बोलता आल. पण विशेष आनंद याचा आहे की त्यांनीही मला नानासाहेबांइतकंच आपलं मानलं. जेवढं प्रेम नानासाहेबांवर केले, माझ्यावर विश्वास ठेवून आपल्या आंतरिक गोष्टी सांगितल्या. तेवढंच माझ्यावरही केलं. मनातल्या गुजगोष्टी सांगण्याइतपत त्यांनी मला आपलं मानले. हे सगळं सगळं 'राम' मुळेच! नानासाहेबांची अर्धांगिनी होण्याचं भाग्य लाभलं आणि माझं जीवन उजळलं. अगदी सहजीवनाला सुरुवात झाल्यापासून दुधात साखर विरघळावी तशी मी त्यांच्यात विरघळून गेले. त्यांच्या सहवासाने माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण सुगंधी झाला. 'राममय' झाला.

अर्धशतकापेक्षाही अधिक वर्षांचं त्याचे सहजीवन.नानासाहेबांच्या प्रत्येक निर्णयाला त्यांनी साथ दिली,आनंदाने. सहवासाचा नानासाहेबांना किती लाभ झाला हे न कळे पण "तुझ्यामुळेच मी हे करू शकलो” असं ते नेहमी म्हणत. एकमेकांवरच्या गाढ विश्वासाने वाटचाल झाली. एकमेकांना सांभाळत पुढे गेले, येणारा प्रत्येक दिवस एकमेकांच्या भरभक्कम सोबतीने आनंदाने जगले. नव्यानव्या अनुभवांना सामोरे गेले. एकमेकांची संगत सुख वाढवत होती, दुःखाची तीव्रता कमी करत होती. नानासाहेबांचं तेज कधी कधी संक्रमित होत होतं की काय! त्यांच्या सहवासात मी चैतन्याने फुलून जात होते. असंही त्या म्हणतात “ नानासाहेबांच्या आयुष्याची भागीदार, सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणाची साक्षीदार मला होता आलं हे माझं केवढं भाग्य!” असं विजयाताई आवर्जून म्हणतात. ‘समईच्या दिव्यातील तेवणारी वात म्हणजे विजयाताई’ असं काल आशा बगे म्हणाल्या आणि हेच शब्दशः खरे आहे. यांच्याबद्दल वाचल्यावर हेच योग्य वाटते. वाचावे आणि संग्रही असावे असेच पुस्तक म्हणजे सहवासाच्या चांदण्यात….

सर्वेश फडणवीस

Sunday, April 6, 2025

रामो विग्रहवान् धर्मः !! 🚩

भगवान् श्रीराम आणि श्रीरामचंद्रांची ही कथा आपल्या भारतीय संस्कृतीची प्राणधारा आहे. प्रभु श्रीरामचंद्रांबद्दल जोपर्यंत काहीतरी गुणगानात्मक म्हटलं जात नाही तोपर्यंत या देशातील कुणीही आचार्य, कुणीही ऋषी, कुणीही संत इतकेच नव्हे तर कुणीही साहित्यिक आपल्या वाणीची अथवा लेखणीची पूर्तता अथवा तृप्ती मानीत नाही.

खरंतर भगवान् रामचंद्रांचे चिंतन हे केवळ वैयक्तिक दृष्टीनं, पारिवारिक दृष्टीनं, सामाजिक दृष्टीनंच नव्हे तर सर्वच दृष्टींनी मनुष्याच्या जीवनाचा सर्व प्रकारचा विकास करण्यास समर्थ आहे. प्रभू श्रीराम अवतीभवतीच्या वक्तींच्या वलयातून घडले आणि ते घडतांना त्यांनी अनेकांना कसे आपलेसे केले यासाठी मूळ वाल्मीकी रामायण मुळातून वाचतांना जो आनंद मिळतो तो शब्दातीत आहे. आपल्या वैयक्तिक जीवनात, आपल्या कौटुंबिक जीवनात, आपल्या संस्थात्मक अथवा सामाजिक जीवनात आपण केव्हा कसाकसा निर्णय घ्यावा हे ठरवायचे असल्यास किंवा कुठला निर्णय योग्य आणि कुठला निर्णय अयोग्य याबद्दल धर्माचे मत जाणून घ्यावयाचे असल्यास रामाचे चरित्र पहायला हवे. सगळे धर्मग्रंथ वाचण्याची अथवा सगळे वेद, पुराणं, कथा आणि शास्त्रं बघण्याची आवश्यकता नाही. महर्षि वसिष्ठांनी म्हटलं आहे, “रामो विग्रहवान् धर्मः' मानवी जीवनातल्या सगळ्या उत्तुंग गुणांचं साक्षात् साकार दर्शन म्हणजे भगवान् श्रीराम आहेत.

गुढीपाडवा ते श्रीरामनवमी या रामनवरात्रात श्रीराम शक्तीचा जागर करताना श्रीरामांचे गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न करूया. प्रभू श्रीरामांनी आपल्या संपूर्ण जीवनात मानवी जीवन सुखकर होण्यासाठी जे जे करावे लागते ते सर्व केले आणि आदर्श माणूस पण घालून दिले. आज या उत्सवाची पूर्णाहुती. प्रभू श्रीरामाच्या अवतीभवती असणाऱ्या विविध व्यक्तिचित्रणाचा रामजन्मोत्सव निमित्ताने नव जागर करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. ‘स्वानतः सुखाय’ भावनेने हे लेखन झाले. ही लेखनसेवा श्रीरामरायाचरणी रुजू व्हावी हीच प्रार्थना. जय श्रीराम🚩🙏

सर्वेश फडणवीस

#ramnavmi25 #Day9 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏

Saturday, April 5, 2025

वानरराज सुग्रीव

प्रत्यक्ष भरताने ज्याचें वर्णन करताना असें म्हटलें आहे की :-
त्वमस्माकं चतुर्णां वै भ्राता सुग्रीव पञ्चमः ।
सौहृदाज्जायते मित्रमपकारोऽरिलक्षणम् ॥।
- वाल्मीकि रामायण, युद्धकाण्ड, सर्ग १२७

आम्हा चार भावांचा तू पांचवा भाऊ आहेस. सौहार्दानेच मित्रत्व व अपकाराने शत्रुत्व व्यक्त होत असतें. तो वानरराज सुग्रीव हा रामचंद्रांचा त्यांनी स्वतःच्या बरोबरीचें स्थान दिलेला मित्र असून रामायणातील व्यक्तिचित्रात त्याचें एक विशिष्ट असें स्वतंत्र स्थान आहे. खरंतर बघताक्षणी तो एक भ्याड, लंपट, स्वकर्तव्यपराङ्मुख असावा असें वाटतें. पण वस्तुस्थिति तशी नाही. रामचंद्रांनी सुग्रीवाशी अग्निसाक्षीने मैत्री करून त्याला स्वतःच्या बरोबरीचें स्थान दिले होते. महर्षि वाल्मीकि म्हणतात :-

ततोऽग्नि दीप्यमानं तौ चक्रतुश्च प्रदक्षिणम् ।।
सुग्रीवो राघवश्चैव वयस्यत्वमुपागतौ ।
ततः सुप्रीतमनसौ तावुभौ हरिराघवौ ।।
अन्योन्यमभिवीक्षन्तौ न तृप्तिमभिजग्मतुः ।
त्वं वयस्योऽसि हृद्यो मे ह्येकं दुःखं सुखं च नौ ।।
- वाल्मीकि रामायण, किष्किन्धाकाण्ड, सर्ग ५

नंतर प्रज्वलित केलेल्या अग्नीला राम व सुग्रीव या दोघांनीही प्रदक्षिणा केल्यानंतर ते एकमेकांचे मित्र बनले. प्रेमाने एकमेकांकडे पहात असता त्यांना तृप्ति म्हणून वाटेना. ते एकमेकांना म्हणाले, आता आपण परस्परांचे खरे मित्र झालो आहोत. आपले सुख व दुःख एक आहे. प्रत्यक्ष रामचंद्रांच्या उद्गारावरून सुग्रीवाच्या मैत्रीची त्यांना किती आवश्यकता वाटत होती व तिला ते किती किंमत देत होते हे स्पष्ट होतें. ते म्हणतात :

दुर्लभो हीदृशो बंधुरस्मिन्काले विशेषतः ।।
- वाल्मीकि रामायण, किष्किंधाकाण्ड,
असा मित्र या काळात मिळणे फारच कठीण आहे. सुग्रीवाने रामाला जें साहाय्य केलें तें मनापासून,आपल्या सर्व सामर्थ्यानिशी केलेले आहे. एकटे मारुतीच नव्हेत तर नल, मंद, द्विविध, अंगद, जाम्बुवान इत्यादि अनेक कसलेले योद्धे, बुद्धिमान् व श्रेष्ठ शिल्पज्ञ असे पुरुष त्याच्या संग्रही होते. त्या सर्वांचें रामचंद्रांना अतिशय साहाय्य झालेलें आहे. लक्ष्मणाच्या रागावण्यावरून त्याने सीतेचा शोध चालविला हेंही खोटें आहे. उलट लक्ष्मण येण्याच्या कितीतरी पूर्वीच त्याने रामचंद्रांच्या साहाय्यासाठी सिद्धता चालविली होती. रामचंद्र जरी सुग्रीवाला स्वतःचा बरोबरीचा मित्र समजत असले तरी सुग्रीव स्वतःला त्यांचा दास समजत होता. यातच त्याच्या स्वभावाचें औदार्य प्रकट होते.

यदिन्द्रो वर्षते वर्षं न तच्चित्रं भविष्यति ।
आदित्योऽसो सहस्रांशुः कुर्याद्वितिमिरं नभः॥
चन्द्रमा रजनी कुर्यात्प्रभया सौम्य निर्मलाम् ।
त्वद्विधो वापि मित्राणां प्रीतिं कुर्यात्परंतप ॥
- वाल्मीकि रामायण, किष्किंधाकाण्ड, सर्ग ३९

इंद्राने वर्षाव करणें, सूर्याने अंधार नाहीसा करणें आणि चंद्राने आपल्या ज्योत्स्नेने रात्र उजळणें हें जितकें स्वाभाविक तितकेंच
तुझ्यासारख्या मित्रांनी आपल्या मित्राचें प्रेम संपादन करण्यासाठी
जिवाचें रान करणें हें स्वाभाविक आहे. आणि अखेरीस रामचंद्रांच्या बरोबरच राजा सुग्रीवाने सुद्धा शरयूप्रवेश करून आपल्या प्रगाढ मैत्रीचा अमर शिलालेख जगाच्या इतिहासात कोरलेला आहे. या रामनिर्याणाच्या प्रसंगी या दोन अभूतपूर्व मित्रांच्या मित्रत्वाचें शब्दचित्र रेखाटताना महर्षि वाल्मीकि म्हणतात:--

एतस्मिन्नन्तरे रामं सुग्रीवोऽपि महाबलः ।
प्रणम्य विधिवद्वीरं विज्ञापयितुमुद्यतः ।।
अभिषिच्याङगदं वीरमागतोऽस्मि नरेश्वर ।
तवानुगमने राजन् विद्धि मां कृतनिश्चयम् ।।
तस्य तद्वचनं श्रुत्वा रामो रमयतां वरः ।
वानरेन्द्रमथोवाच मैत्रं तस्यानुचिन्तयन् ।।
सखे शृणुष्व सुग्रीव न त्वयाहं विनाकृतः ।
गच्छेयं देवलोकं वा परमं वा पदं महत् ।।
वाल्मीकि रामायण, उत्तरकाण्ड,

याच वेळी सुग्रीवाने रामचंद्रांना वंदन करून सांगितलें की, अंगदाला राज्याभिषेक करून मी आलो आहे. तुमच्याच मागोमाग देवगतीला येण्याचा मी निश्चय केलेला आहे. त्याचे ते उद्गार ऐकताच त्याचें मित्रत्व आठवून राम म्हणाले, " मित्रा, सुग्रीवा! आपला आजवर कधीच वियोग झालेला नाही. देवलोकाला अथवा परमदालाही आपण बरोबर कसें जाणार नाही ?” राजद्वारापासून स्वर्गद्वारापर्यंत ज्यांच्या सहजीवनात कधीच खंड पडलेला नाही असें हें सुग्रीव व श्रीराम यांचें सौहार्द मानवतेच्या इतिहासात अनन्वय अलंकाराचे उदाहरणच गणलें जाईल. म्हणूनच म्हणतात सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला.

सर्वेश फडणवीस

#ramnavmi25 #Day8 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏

Friday, April 4, 2025

शत्रुघ्न

रामकथेतील शत्रुघ्नाचे चरित्र देखील त्याच्या परीने थोडे वेगळे आहे. वाल्मीकी रामायणात शत्रुघ्न चरित्रातून हेच सिद्ध होते की तो श्रीरामांच्या दासानुदासांमध्ये अग्रक्रमावर होता. शत्रुघ्न शांतपणे काम करणारा, प्रेमळ, सदाचरणी, मितभाषी, सत्यवादी, विषयांच्या बाबतीत वैराग्यशील, सरल, तेजस्वी, गुरुजनानुयायी आणि शूर होता. वाल्मीकी रामायणात त्याच्याविषयी विशेष विवेचन दिसून येत नाही; परंतु जे काही उपलब्ध आहे, त्यावरून त्याच्या विषयी थोडा निष्कर्ष काढता येऊ शकतो.

बालपणापासूनच तो भरताच्या सहवासात अधिक राहत होता; म्हणून भरताचे आणि ह्याचे चरित्र एकाच वेळी चित्रित झालेले दिसते. ह्याच्याविषयी काही विशेष अशी गोष्ट रामायणात वेगळी
सांगितलेली नाही. ह्याच्या गुणांचे आणि चारित्र्याविषयीचे अनुमान भरताच्या वागणुकीशी करता येईल. बालकाण्डात त्याच्या प्रेमाविषयी वर्णन करताना म्हटले आहे -

अथैनं पृष्ठतोऽभ्येति सधनुः परिपालयन् ।
भरतस्यापि शत्रुघ्नो लक्ष्मणावरजो हि सः ।।
( वा० रा० १ । १८ । ३२)

ज्याप्रमाणे लक्ष्मण हातात धनुष्य घेऊन श्रीरामचंद्रांचे रक्षण करीत त्यांच्या मागोमाग जात असे, त्याचप्रमाणे लक्ष्मणाचा धाकटा भाऊ शत्रुघ्न देखील भरताच्या मागोमाग जात असे.'

एकदा भरताला त्याचा मामा युधाजित आपल्या देशात घेऊन जात असताना शत्रुघ्न देखील त्याच्याबरोबर आजोळी गेला. त्यावेळी भरतावरील प्रेमामुळे माता-पिता, भाऊ आणि नवविवाहित पत्नीविषयी कोणत्याही प्रकारचा मोह न बाळगता आपला बंधू भरत ह्याच्याबरोबर राहणेच आपले परमकर्तव्य आहे असे त्याने मानले. अयोध्येहून बोलावणे आल्यावर भरताबरोबर तो पुन्हा परत आला. अयोध्येला पोहोचल्यानंतर कैकेयीकडून पित्याच्या मरणाचे वृत्त तसेच लक्ष्मण आणि सीतेसह श्रीरामांच्या वनवासाचे वृत्त ऐकून त्याला देखील फार दुःख झाले. बंधू लक्ष्मणाच्या शौर्याची त्याला चांगली ओळख होती, चित्रकूट पर्वतावरून पादुका घेऊन अयोध्येला परत फिरताना दोन्ही भावांनी श्रीरामांना-प्रदक्षिणा घातली व त्यांच्या चरणांना वंदन करून ते त्यांना भेटले. लक्ष्मणाप्रमाणे शत्रुघ्नाचा स्वभाव देखील कडक होता. कैकेयीच्या बाबतीत त्याच्या मनात राग होता. श्रीराम ही गोष्ट जाणत होते. म्हणूनच निरोप देताना श्रीरामांनी शत्रुघ्नाला वत्सलतेने उपदेश करीत म्हटले -

मातरं रक्ष कैकेयीं मा रोषं कुरु तां प्रति ।।
मया च सीतया चैव शप्तोऽसि रघुनन्दन ।
(वा० रा० २ । ११२ । २७-२८)

'रघुनंदन शत्रुघ्ना, तू कैकेयी मातेची सेवा कर, तिच्यावर कधी रागावु नकोस, माझी आणि सीतेची तुला अगदी शपथ आहे.' यावरून लक्षात येते की श्रीरामांवर शत्रुघ्नाचे केवढे प्रेम आणि भक्तिभाव होता. ह्यानंतर शत्रुघ्न भरताबरोबर अयोध्येला परत येऊन अगदी त्याच्या आज्ञेप्रमाणे राज्य आणि कुटुंबाची सेवा करीत राहिला. भरताजवळ राहून शत्रुघ्न त्याच्या आज्ञेची वाट पाहात असे. भरताला त्याच्याविषयी मोठा विश्वास होता. म्हणूनच अगदी छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे काम करण्यासाठी तो शत्रुघ्नालाच आज्ञा करीत असे.

ह्यानंतर श्रीराम वनवास संपवून अयोध्येला परत येईपर्यंत शत्रुघ्नाविषयी वाल्मीकि रामायणात विशेष उल्लेखनीय अशी गोष्ट आढळून येत नाही. हनुमंताकडून श्रीरामचंद्रांच्या आगमनाची बातमी समजताच भरताच्या आज्ञेनुसार शत्रुघ्नानेच श्रीरामांच्या स्वागताची व्यवस्था आणि नगर सजवण्याची तसेच राजरस्ते आणि इतर सर्व रस्ते नीटनेटके करण्याची व्यवस्था केली होती.

वाल्मीकी रामायणात कथा येते की, शत्रुघ्नाने लवणासुरावर स्वारी केली आणि लवणासुराला ठार मारून तेथेच उत्तम प्रकारची मधुरापुरी नावाची सुंदर नगरी वसवून त्याच्या राज्याची व्यवस्था करून बारा वर्षांनी श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी शत्रुघ्न तेथून अयोध्येकडे परत फिरला. येताना पुन्हा शत्रुघ्न वाल्मीकी ऋषींच्या आश्रमातच थांबला. सकाळ होताच नित्य कर्म केल्यानंतर मुनींची आज्ञा घेऊन श्रीराम दर्शनाच्या उत्कंठेने तो अयोध्येकडे निघाला. अयोध्येला पोहोचल्यानंतर तो श्रीरामांच्या महालात आला; तेथे आसनावर विराजमान झालेल्या श्रीरामांना त्याने प्रणाम केला आणि म्हणाला की, 'भगवन आपल्या आज्ञेनुसार लवणासुराला मारून मी तेथे नगर वसवून आलो आहे.'

द्वादशैतानि वर्षाणि त्वां विना रघुनन्दन ।
नोत्सहेयमहं वस्तुं त्वया विरहितो नृप ।।
स मे प्रसादं काकुत्स्थ कुरुष्वामितविक्रम ।
मातृहीनो यथा वत्सो न चिरं प्रवसाम्यहम् ।।
(वा० रा० ७ । ७२ । ११-१२)

'महाराज रघुनाथा, ही बारा वर्षे आपल्या विरहात मी मोठ्या कष्टाने घालवली आहेत. म्हणून आपल्याशिवाय तेथे आता मी निवास करू इच्छित नाही. म्हणून महापराक्रमी श्रीरामा, आपण माझ्यावर अशी कृपा करा की, आपल्यापासून वेगळा होऊन कोठेच राहू नये.' शत्रुघ्नाचे हे बोलणे ऐकून श्रीरामांनी त्याला हृदयाशी धरले आणि म्हटले - 'हे वीरा , तू दुःख करू नकोस, ते क्षत्रियाच्या स्वभावाला शोभून दिसत नाही. क्षात्रधर्माप्रमाणे तुला प्रजेचे पालन केले पाहिजे. मला भेटण्यासाठी वेळोवेळी येत जा.' अशाप्रकारे भगवान श्रीरामांच्या आज्ञेने शत्रुघ्नाने दीनवाणेपणाने त्यांचे म्हणणे मान्य केले. नंतर भरत आणि लक्ष्मणाला भेटून तसेच सर्वांना वंदन करून तो मधुरापुरीला परत गेला. त्यानंतर भगवंत जेव्हा परमधामाला जायला निघाले, त्यावेळी शत्रुघ्नाला बोलवले गेले. तेव्हा आपल्या पुत्रांना राज्याभिषेक करून शत्रुघ्न अयोध्येला येऊन पोहोचला आणि श्रीरामांजवळ जाऊन त्यांना वंदन करून सद्गदित स्वरात म्हणाला

कृत्वाभिषेकं सुतयोर्द्वयो राघवनन्दन
तवानुगमने राजन् विद्धि मां कृतनिश्चयम्
न चान्यदद्य वक्तव्यमतो वीर न शासनम् ।
विहन्यमानमिच्छामि मद्विधेन विशेषतः ।।
(वा० रा० ७ । १०८ । १४-१५)

'महाराज रघुनाथा, आपल्या दोन्ही पुत्रांना राज्याभिषेक करून मी आपल्याबरोबर येण्याचा निश्चय करून आलेलो आहे. हे वीर,  आपण आता मला दुसरी कोणतीही आज्ञा करू नये; कारण कोणाकडूनही विशेषत: माझ्यासारख्या अनुयायाकडून आपल्या आज्ञेचे उल्लंघन व्हावे अशी माझी इच्छा नाही. मी अद्यापपर्यंत आपली आज्ञा मोडली नाही. म्हणून आता देखील तसे करावयास लागू नये, त्याचे आपणच रक्षण करावे. '

भगवान श्रीरामांनी शत्रुघ्नाची विनंती ऐकली व शत्रुघ्न सुद्धा श्रीरामांच्या बरोबरच परमधामाकडे निघून गेला. शत्रुघ्नाचे हे छोटेसे व्यक्तिचित्र केवळ वाल्मीकि रामायणाच्या आधाराने लिहिले आहे. ह्यात दुसऱ्या कोणत्याही रामायणातील किंवा इतर कोणतीही कथा नाही. त्यामुळे कदाचित त्याच्या प्रेम आणि गुणांविषयींचा इतर भाग समोर आला नाही; याची जाणीव आहे परंतु त्यासाठी क्षमायाचनेशिवाय मी दुसरे काय करू शकतो?

सर्वेश फडणवीस

#ramnavmi25 #Day7 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏

Thursday, April 3, 2025

भरत

रामकथेत भरताचे चरित्र मोठे उज्ज्वल आणि आदर्श आहे. त्याच्या ठिकाणी कोणताही दोष दिसून येत नाही आणि वाल्मीकि- रामायणात त्याला श्रीविष्णूंचा अंशावतार म्हणून दर्शविले आहे. त्याच बरोबर भरताचे चरित्र त्याला एक सज्जन श्रेष्ठ, आदर्श स्वामिभक्त, महात्मा, नि:स्पृह आणि भक्तिप्रधान कर्मयोगी म्हणून सिद्ध करते. भरत हा धर्म आणि नीती जाणणारा, सद्गुणसंपन्न, त्यागी, संयमी, सदाचरणी, प्रेम आणि विनम्रतेची साक्षात मूर्ती, श्रद्धाळू आणि अतिशय बुद्धिमान म्हणून दर्शविली आहे. वैराग्य, सत्य, तप, क्षमा, तितिक्षा (सहन करण्याची शक्ती), दया, वात्सल्य, धैर्य, शौर्य, गांभीर्य, ऋजुता, सौम्यता, माधुर्य, निगर्वीपणा, मैत्री, इत्यादी गुणांचा त्याच्या ठिकाणी विलक्षण विकास झालेला दिसतो.

अयोध्येत दशरथ राजा रामाच्या विरहाने दु:खी असतात. त्यांना श्रावणकुमाराच्या पित्याच्या शापाची आठवण होते. तेवढ्यात सुमंताकडून श्रीराम चित्रकुट पर्वतावर आहेत हे कळताच राम राम करत ते आपला प्राण सोडतात. अयोध्या शोकसागरात बुडते. भरत -शत्रुघ्नला आणण्यासाठी दूत पाठविण्यात येतो. भरत अयोध्येत येतो, तेव्हा त्याला अयोध्या अतिशय शांत भासते. त्याला नगरीतलं चैतन्य हरपले आहे असे वाटते. पित्यासाठी शोक करणाऱ्या भरताच्या हृदयात श्रीरामाविषयीचे प्रेम उफाळून येताना दिसते. तो म्हणू लागतो.

यो मे भ्राता पिता बन्धुर्यस्य दासोऽस्मि सम्मतः ।
तस्य मां शीघ्रमाख्याहि रामस्याक्लिष्टकर्मणः ।।
पिता हि भवति ज्येष्ठो धर्ममार्यस्य जानतः ।
तस्य पादौ ग्रहीष्यामि स हीदानीं गतिर्मम ।।
( वा० रा० २ । ७२ । ३२-३३)

जे माझा भाऊ, माझा पिता आणि माझा बंधू आहेत, ज्यांचा मी
परमप्रिय दास आहे, जे पवित्र कर्म करणारे आहेत त्या श्रीरामाला आपण माझ्या येण्याची सूचना त्वरित द्या. धर्म जाणणाऱ्या श्रेष्ठ मनुष्याच्या दृष्टीने ज्येष्ठ बंधू पित्याप्रमाणे असतो. मी त्यांच्या चरणांना वंदन करीन. आता ते माझे आश्रयस्थान आहेत.'
यावर कैकेयीने त्याला सर्व घटना सांगितल्या आणि राज्याचा स्वीकार करावयास सांगितले. कैकेयीच्या तोंडून अशाप्रकारे बंधूंच्या वनगमनाची बातमी ऐकून भरत अत्यंत दुःखाने संतापून जातो. व्याकूळ अंत:करणाने तो आईला बरेच काही अपशब्द बोलतो. श्रीरामास पुन्हा अयोध्येस आणीन, अशी शपथ घेतो. पुढे भरत आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार करतो आणि श्रीरामांना अयोध्येत परत आणण्यासाठी चित्रकुटावर जाण्याचा निश्चय करतो. तिकडे गेल्यावर श्रीराम म्हणतात,

जानामि भरतं क्षान्तं गुरुसत्कारकारिणम् ।
सर्वमेवात्र कल्याणं सत्यसन्धे महात्मनि ।।
अनेन धर्मशीलेन वनात् प्रत्यागतः पुनः ।
भ्रात्रा सह भविष्यामि पृथिव्याः पतिरुत्तमः ।।
वृतो राजा हि कैकेय्या मया तद्वचनं कृतम् ।
अनृतान्मोचयानेन पितरं तं महीपतिम् ।।
(वा० रा० २ । १११ । ३०-३२)

भरत हा मोठा क्षमाशील आणि गुरुजनांचा सन्मान करणारा आहे हे मी जाणतो. ह्या सत्यप्रतिज्ञ महापुरुषाच्या ठिकाणी कल्याणकारी असे सर्व आहेत. वनवासाचा कालावधी संपवून मी जेव्हा परत येईन, त्यावेळी मी आपल्या ह्या धार्मिक भावाबरोबर ह्या पृथ्वीचा सम्राट होईन. कैकेयीने राजाकडे वर मागितला, मी त्यांच्या आज्ञेचा स्वीकार केला. म्हणून बंधू भरता ! आता माझे म्हणणे मान्य करून त्या पृथ्वीपती राजाधिराज बाबांना असत्याच्या बंधनातून मुक्त कर.' अतुलनीय अशा त्या तेजस्वी बंधूंचा तो रोमांचकारी संवाद ऐकून आणि आपापसातील प्रेमपूर्ण वर्तन पाहून तेथे उपस्थित जनसमुदायासह सगळे महर्षी आश्चर्यचकित आणि मंत्रमुग्ध झाले. अदृश्यरूपाने अंतरिक्षात प्रकट झालेले मुनी आणि तेथे प्रत्यक्ष बसलेले महर्षी त्या दोघा बंधूंची अतिशय प्रशंसा करू लागले.

ह्यानंतर सर्व महर्षीनी श्रीरामांचे म्हणणे मान्य करण्यासाठी भरताची समजूत घातली. त्यामुळे श्रीरामांना अतिशय आनंद झाला, परंतु भरताचे मात्र समाधान झाले नाही. तो अडखळणाऱ्या शब्दांनी हात जोडून पुन्हा श्रीरामांना म्हणाला 'आर्य , मी ह्या राज्याचे संरक्षण करू शकणार नाही. ह्या राज्याचा स्वीकार करून आपण त्याच्या पालनाचा भार दुसऱ्या कुणावर तरी सोपवा.' असे म्हणून भरत आपल्या भावाच्या चरणांवर पडला. त्यांचा दृढनिश्चय पाहून भरताने म्हटले,

अधिरोहार्य पादाभ्यां पादुके हेमभूषिते ।
एते हि सर्वलोकस्य योगक्षेमं विधास्यतः ।

आर्य, ह्या ज्या दोन सुवर्णभूषित पादुका आहेत, ह्यांवर आपले चरण ठेवा. ह्याच संपूर्ण जगताच्या कल्याणाचा निर्वाह करतील. खरंतर धन्य आहे भरताची ही सर्वश्रेष्ठ श्रद्धा. भगवान श्रीरामचंद्रांनी त्या पादुकांवर आपले पवित्र चरणयुगल ठेवून भरताला त्या दिल्या. त्या पादुकांना नमस्कार करून भरताने श्रीरामांना म्हटले

चतुर्दश हि वर्षाणि जटाचीरधरो ह्यहम् ।।
फलमूलाशनो वीर भवेयं रघुनन्दन ।
तवागमनमाकाङ्क्षन् वसन् वै नगराद् बहिः ।।
तव पादुकयोर्न्यस्य राज्यतन्त्रं परंतप ।
चतुर्दशे हि सम्पूर्णे वर्षेऽहनि रघूत्तम ।।
न द्रक्ष्यामि यदि त्वां तु प्रवेक्ष्यामि हुताशनम् ।
( वा० रा० २ । ११२ । २३ - २६)

'वीर रघुनंदन, मी सुद्धा चौदा वर्षांपर्यंत जटा आणि वल्कले धारण करून कंदमुळे - फळे भक्षण करीन आणि आपल्या येण्याची वाट पाहत नगराच्या बाहेरच राहीन. परंतू येवढ्या दिवसांपर्यंत राज्याची संपूर्ण धुरा आपल्या या चरणपादुकांवरच राहील. रघुश्रेष्ठ चौदा वर्षे पूर्ण होताच, त्यादिवशी जर मला आपले दर्शन झाले नाही तर मी धगधगणाऱ्या अग्नीत प्रवेश करीन.'

भरताची ही प्रतिज्ञा ऐकून भगवंतांनी मोठ्या प्रसन्नतेने दुजोरा दिला. त्यानंतर दोघा बंधूंना अर्थात भरत आणि शत्रुघ्न यांना कैकेयी मातेशी चांगले वर्तन करण्याचा उपदेश करून आणि हृदयाशी धरून आलिंगन देऊन निरोप दिला. त्यावेळी बंधू भरताच्या वियोगाने श्रीरामचंद्रांचे डोळे पाण्याने भरून आले. त्यानंतर भगवंतांच्या पादुका मस्तकावर धारण करून भरत मोठ्या आनंदाने रथावर आरूढ झाला.

वास्तविक भरताची रामभक्ती जगाच्या इतिहासात अद्वितीय आहे. भरताचा त्याग, संयम, व्रत, नियम - सर्व काही स्तुत्य आणि अनुकरण करण्यास योग्य आहे. त्याच्या चरित्रातून स्वार्थ त्याग, विनय, सहिष्णुता, गांभीर्य, सरलता, क्षमा, वैराग्य आणि स्वामिभक्ती इत्यादी सर्व गुणांचा बोध घेता येतो. भक्तीसह निष्काम भावनेने गृहस्थाश्रमात राहून सुद्धा प्रजापालन करण्याचे असे सुंदर उदाहरण इतरत्र मिळणे कठीण आहे. म्हणून भरताचे वेगळेपण लगेच डोळ्यात भरणारे आहे.

सर्वेश फडणवीस

#ramnavmi25 #Day6 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏

Wednesday, April 2, 2025

सुमित्रा

 
रामायणातील विविध व्यक्तीरेखा समजून घेतांना मनात येते की , रामायण हे केवळ श्रीरामाच्या जीवनाचा इतिहास नाही तर एक महाकाव्य गाथा आहे जी श्रद्धाळू आणि बुद्धिमान दोघांसाठीही खूप काही विचार देणारी आहे. हा भक्तीचा एक अथांग खोल महासागर आहे, त्यातील पात्रे, त्यांचे इतरांशी असलेले संवाद, हे सर्व खोलवर जाऊन स्वतंत्र अभ्यास करण्यासारखे आहे.

रामकथेतील प्रत्येक पात्र आकर्षक आहे, पण काही पात्रे अशी आहेत जी मला इतरांपेक्षा जास्त आकर्षित करतात - ती पात्रे जी फक्त तिथेच असतात असे वाटते, कथेवर त्यांचा लक्षणीय परिणाम होत नाही आणि त्याच धारेतील आजचे व्यक्तिचित्रण अर्थात राणी सुमित्रा. सुमित्रा ही अयोध्येचा राजा दशरथाच्या तीन प्रमुख राण्यांपैकी एक आहे , कालिदासाच्या रघुवंशम नुसार सुमित्राला मगधची राजकुमारी म्हणून स्थापित केले आहे. कालिदास त्यांच्या रघुवंशम मध्ये तिला प्रथम उल्लेख करण्याचा मान देतात,

तमलभन्त पति पतिदेवताः शिखरिणामिव सागरमापगाः । मगधकोलकेकशासिनां दुहितरोऽहितरोपितमार्गणम् ।। 

मगध, कोसल आणि कैकेय या राजांच्या कन्या दशरथ राजाला पती म्हणून स्वीकारण्यात आनंदित होतात,आणि ज्याप्रमाणे पर्वतातून उतरणाऱ्या नद्या समुद्राला आलिंगन देतात त्याचप्रमाणे या तिन्ही राण्या राजा दशरथमय होत्या. राजपुत्रांच्या जन्मानंतर, वाल्मिकी रामायणात, श्रीरामांच्या वनवासाच्या टप्प्यापर्यंत, सुमित्राचे फारसे वर्णन आपल्याला आढळत नाही. राजा दशरथाने सुमित्राचाही उल्लेख रामाच्या वनवास विरहाच्या वेळी केला आहे, 

प्रकार विं च रामस्य संप्रयाण वनस्य च ।।
सुमित्रा प्रेक्ष्यवै भीता कथं मे विश्वसिष्यति ।। 

रामाला तुच्छतेने वागवले जाणारे आणि त्याला वनवासात पाठवले जाणारे पाहून भीती वाटल्याने, सुमित्रा माझ्यावर कसा विश्वास ठेवेल अर्थात हे स्पष्ट होते की सुमित्रा ही त्यांच्या मनात खूप आदराची आहे. योग्य आणि अयोग्य, धर्म आणि अधर्म, राम आणि कैकेयी यांच्यात ; सुमित्रा ही योग्य, धर्म, रामाच्या बाजूने आहे.

पुढे घडणाऱ्या घटनांमध्ये, आपल्या मोठ्या भावावर पूर्ण समर्पित लक्ष्मण, श्रीराम वनवासात निघून जात असताना मागे राहण्याची कल्पना करू शकला नाही आणि त्याने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. श्रीरामांशी निर्णय घेऊन आणि चर्चा करून , तो आपल्या आईची परवानगी आणि आशीर्वाद घेण्यास निघाला येथेच सुमित्राचे पात्र समोर येते. तिने राणी, चांगली आई आणि तिला शोभणारे अनुकरणीय गुण प्रदर्शित केले. वाल्मिकी रामायणामध्ये यात अधिक उल्लेख आहे, 

तं वन्दमानं रुदती माता सौमित्रिमब्रवीत् ।
हितकामा महाबाहुं मूर्ध्नि उपाघ्राय लक्ष्मणम् ।। (२-४०-४)

अर्थात लक्ष्मण आपली आई सुमित्रेची परवानगी घेण्यासाठी त्यांच्या प्रसादात येतांना सुमित्रा रडत असते आणि ती त्याला आशीर्वाद देत लक्ष्मणाला म्हणते, 

सृष्टः वन वासाय स्वनुरक्तः सुहृज्जने |
रामे प्रमादं कार्षीः पुत्र भ्रातरि गच्छति || (२-४०-५)

तुझा भाऊ राम मला खूप आवडतो, तुला मी वनात राहण्याची परवानगी दिली आहे. लक्ष्मणा, वनात जाणाऱ्या रामाकडे दुर्लक्ष करू नकोस.

व्यसनी वा समृद्धो वा गति एष तव अनघ ।
एष लोके सतां धर्मः यज्जयेष्ठः वशगो भवेत् ।। (२-४०-६)

अरे, निर्दोष, संकटात असो किंवा श्रीमंतीत, तोच तुमचा एकमेव आश्रय आहे. जगात अशी आचारसंहिता असली पाहिजे की, धाकट्या भावाने त्याच्या मोठ्या भावाच्या इच्छेनुसार वागले पाहिजे.

इदं हि वृत्तं उचितं कुलस्य अस्य सनातनम् ।
दान दीक्षा च यज्ञेषु तनु त्यागो मृधेषु च ।। (२-४०-७)

तुमच्या कुळात प्राचीन काळापासून भेटवस्तू देण्याची यज्ञविधीसाठी स्वतःला समर्पित करण्याची आणि युद्ध लढण्यासाठी स्वतःचे शरीर त्यागण्याची प्रथा आहे.

लक्ष्मण त्वेवम्क्त्वा सासंसिद्धं प्रियराघवम् । 
सुमित्रा गच्छेति पुनरुवाच तम् ।।(२-४०-८)

अशाप्रकारे लक्ष्मणाशी बोलताना, जो रामावर खूप प्रेम करत होता आणि वनात जाण्याच्या तयारीत होता, सुमित्रा त्याला वारंवार म्हणत होती, "जा, जा!"

रामं दशरथं विद्धि मां विद्धि जनात्मजाम् ।
अयोध्यां अटवीं विद्धि गच्छ तात्यति सुखम् ॥ (२-४०-९)

अर्थात रामाला दशरथ समज. जनकाची कन्या सीता, मला (तुझी आई) समज. माझ्या मुला, वनाला अयोध्या समज आणि आनंदाने निघून जा. सुमित्राने आनंदाने लक्ष्मणाच्या मोठ्या भावाला सावली देण्याची परवानगी दिली; कारण वाल्मिकी रामायणातील या प्रसंगातून स्पष्टपणे दिसून येते की, धाकट्या भावाने नेहमी त्याच्या मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवले पाहिजे असा तिचा विश्वास होता

सुमित्रा लक्ष्मणाच्या श्रीरामांसोबत वनात जाण्याच्या निर्णयाला मनापासून पाठिंबा देत होती , तर राणीने तिच्या मुलाला ज्या पद्धतीने सल्ला दिला पाहिजे त्याबद्दल, त्याच्या कर्तव्यांबद्दल, वर्तनाबद्दल उपदेश देत होती. आपल्यावर संयम ठेवला आणि लक्ष्मणाला ज्याची भीती वाटत असली तरी, चौदा वर्षे तिच्या प्रिय मुलापासून वेगळे झाल्यावर सुमित्रा मातृभावनेला बळी पडली नाही. वाल्मिकी रामायणात सुमित्रेचा श्रीरामांबद्दलचा  दृष्टिकोन एका राजकुमारासारखा होता जो राज्याभिषेक करण्यास पात्र होता ; रामायणातील सुमित्रा ही व्यक्तिरेखा आकाशातील तेजस्वीपणे चमकणाऱ्या शुक्र ग्रहासारखी आहे - ती फक्त थोड्या काळासाठी दिसते, परंतु ताऱ्यांपेक्षा मोठी आणि तेजस्वी; रामायणातील हे पात्र लक्षात येण्यासारखे, प्रशंसनीय, तेजस्वी आणि नितांतसुंदर असे आहे.

सर्वेश फडणवीस 

#ramnavmi25 #Day5 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏

Tuesday, April 1, 2025

कैकेयी

रामायणातील इतर स्त्री-पात्रांच्या तुलनेत कैकेयी ही व्यक्तिरेखा काहीशी वेगळी आहे. थोडी अनाकलनीय देखील आणि म्हणूनच प्रतिभावान कवि-लेखकांच्या कल्पनाशक्तीला या व्यक्तिरेखेने भरपूर खाद्यही पुरविलेले आहे. संपूर्ण भारतात राम प्रत्येकाला आपलासा वाटतो. म्हणूनच वाल्मीकि रामायणाच्या व्यतिरिक्त अध्यात्मरामायण (संस्कृत), भावार्थरामायण (मराठी), रामचरितमानस (हिंदी), कृतिबासरामायण (बंगाली), रंगनाथरामायण (तेलुगू), कंबरामायण (तामिळ), गिरधरकृत रामायण (गुजराथी), जगमोहनरामायण (उडिया) अशा विविध भाषांतील विविध प्रतिभावंतांनी मूळ कथेत आपापल्या कल्पनेनुसार काही भाग जोडून तर काही भाग वगळून रामकथा अधिक रोचक बनविण्याचा प्रयत्न केला. अर्थातच रामकथेतील कैकेयीचेही चित्रण प्रत्येकाने आपापल्या धारणेनुसार केले.

सर्वांच्या गळ्यातला ताईत असणाऱ्या रामाच्या राज्याभिषेकात विघ्न, त्याला भोगावा लागणारा वनवास आणि दशरथाचा विकल अवस्थेत झालेला मृत्यू ह्या सर्व अप्रिय घटनांना कैकेयीच कारणीभूत झाली हे प्रथमदर्शनी वाटते, हे खरेच आहे. त्यामुळेच सामान्य माणसाला ती तिरस्करणीय वाटते- इतकी की, 'प्रतिवाल्मीकि' म्हणून गाजलेल्या ग. दि. माडगूळकरांनी देखील भरताच्या मुखातून 'माता न तू वैरिणी' अशी तिची कठोर निर्भर्त्सना केली आहे.

पण रामाबद्दल कैकेयीच्या मनात खरोखरच इतका धगधगता
सापत्न भाव होता का ? राम राजा झाल्यास कौसल्या
'राजमाता' म्हणून तोरा मिरवील आणि आपण नगण्य ठरू
असे वाटण्याइतपत कैकेयी इतकी कोत्या मनाची आणि आत्मकेंद्रित होती का ? की ती फक्त सत्तेसाठी हपापलेली होती आणि कैकेयी नेमकी कशी होती यासाठी वाल्मीकी रामायणात डोकावल्यावर कैकेयी अधिक लक्षात येते. ज्यावेळी मंथरा तिला सावध करण्यासाठी धावतपळत येऊन रामाचा उद्या राज्याभिषेक होणार ही सूचना देते, तेव्हा ही शुभ वार्ता ऐकून कैकेयी आनंदाने स्वतःच्या गळ्यातला कंठा तिला बक्षीस देते आणि ही तिची उत्स्फूर्त प्रतिक्रिया कारण जी वार्ता ऐकून कैकेयी संतप्त होईल असे मंथरेला वाटले होते, तेथे हे भलतेच झालेले पाहून मंथरा तिला डिवचण्यासाठी पुन्हा म्हणते की, 'अभिषेक भरताचा नाही, रामाचा आहे, तेव्हाही तिचे मनापासूनचे निरागस उद्गार आहेत की,'रामे वा भरते वाऽहं विशेषं नोपलक्षये।' अर्थात मला तर रामात किंवा भरतात काही वेगळेपणा जाणवतच नाही.येथे कैकेयीच्या मनात सापत्नभावाचा लवलेशही दिसत नाही. अध्यात्मरामायणातही थोड्याफार फरकाने असेच वर्णन आढळते. 

कैकेयीच्या मनात कुठेही रामाबद्दल दुजाभाव नव्हताच पण पुढचा अनर्थ मात्र तिच्याचमुळे घडला. दशरथाच्या विनवण्यांनाही तिने कठोरपणे धुडकावून लावले आणि मग सहज प्रश्न पडतो कैकेयी असे का वागली ? तिची व्यक्तिरेखा गुंतागुंतीची भासते ती या अन्तविरोंधामुळेच. तिचे आकलन वेगवेगळ्या कवींनी वेगवेगळ्या प्रकारे केलेले आहे. खरंतर रामाचा राज्याभिषेक सुरळीतपणे पार पडला असता तर तो अयोध्येपुरताच पण रामाची आवश्यकता अयोध्येपेक्षाही राक्षसपीडित 'योध्य' प्रदेशाला अधिक होती. त्या राक्षसांचे शक्तिकेंद्र असणाऱ्या रावणाला संपवायचे होते, आणि म्हणूनच रामाने फक्त अयोध्येतच राहणे योग्य नव्हते. यासाठी सर्व देवगणांच्या विनंतीनुसार वाग्देवी सरस्वतीने मंथरेत प्रवेश केला असे अध्यात्म रामायणकारांनी दर्शविले आहे. सरस्वतीच्या प्रभावामुळेच कैकेयीचा बुद्धिभेद करण्यात मंथरा यशस्वी झाली असे रंगवून कैकेयीच्या स्वार्थपरायणतेचा हा प्रयत्न दिसतो आणि तुलसीदासांनी सुद्धा असेच चित्र रंगवले आहे. 

मुळात कैकेयी 'त्यागमूर्ती' होती की स्वार्थाने आंधळी झालेली एक
सत्तालोलुप स्त्री होती आणि वाल्मीकी यांना स्मरून सांगायचे तर ती या दोन्ही टोकांना स्पर्श करीत नाही. दशरथाच्या दृष्टीने ‘अर्चता तस्य कौसल्या, प्रिया केकयवंशजा’ अर्थात पट्टराणी म्हणून कौसल्या 'अर्थिता' होती, पण 'प्रिय' मात्र कैकेयीच होती. ती 'प्रिय' का होती ? त्याचे उत्तर शोधले तर ते वाल्मीकी रामायणाच्या आधारे, कारण ते एकच रामायण रामाला समकालीन असणाऱ्या महर्षी वाल्मीकीने लिहिले असल्यामुळे त्यात कल्पना नाही. तारुण्याने मुसमुसलेली ही लावण्यवती सर्वांत धाकटी राणी म्हणून दशरथाला प्रिय होतीच; पण केवळ इतकेच नाही. ती प्रिय असल्याचे दुसरे कारण याहून महत्त्वाचे आहे आणि तिने त्याचा एकदा जीव वाचविला आहे.

एकदा मोहिमेवर असताना दशरथाचा निवास कैकय नरेश अश्वपतीच्या प्रासादात होता. कैकेयी ही अश्वपतीची रूपवती कन्या. शूर दशरथाच्या स्वागत सत्काराकडे तिने जातीने लक्ष दिले. ती दशरथाच्या मनात भरती. यापूर्वी दशरथाचे दोन विवाह झाले होते. परंतु तो निपुत्रिकच होता. राजा दशरथ यांनी अश्वपतीकडे कैकेयीला मागणी घातली. अश्वपतीने कन्यादान केले, पण 'तिच्याच मुलाला अयोध्येचे राज्य मिळेल' या अटीवर,   कौसल्येला आणि सुमित्रेला पुत्र नाहीच, तेव्हा हिला पुत्र झाला तर तोच सिंहासनाचा अधिकारी ठरेल या विचाराने ती अट मान्य करून दशरथाने कैकेयीशी विवाह केला.

वस्तुतः कैकेयी मुळात भाबडीच आहे. ती अल्लड आहे, पण
तिचे मन निर्मळ आहे. रामाच्या सद्गुणावर तिचा पूर्ण विश्वास
आहे म्हणून राम जर राजा झाला तर तुझी दुर्दशा होईल, या
मंथरेच्या विधानाला ती प्रारंभी धुडकावून लावते, आपण राजमाता व्हावे आणि इतर राण्यांवर वर्चस्व गाजवावे अशी तिची राक्षसी महत्वाकांक्षा ही नाही आणि विकृत मानसिकताही नाही. कैकेयीची व्यक्तिरेखा जाणून घ्यायची, तर बाह्य मुद्द्यांवर विचार करत बसण्यापेक्षा तिच्याच अंतरंगाचा वेध घेणे श्रेयस्कर आहे आणि तसा वेध घेतल्यावर उमगते की कैकेयी शेवटी तिरस्करणीय ठरली खरी, पण फक्त मंथरेच्या विचारसरणीच्या आहारी गेल्यामुळेच आणि मुळात कैकेयी हलक्या कानाची होती आणि विवेकहीन होती हे मानावेच लागेल. 

सर्वेश फडणवीस 

#ramnavmi25 #Day4 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏

Monday, March 31, 2025

महर्षि वसिष्ठ

वसिष्ठ अर्थात् प्रकाशमान, सर्वांत उत्कृष्ट, सर्वांमध्ये श्रेष्ठ महर्षि वसिष्ठ हे ब्रह्मदेवाच्या दहा मानस पुत्रांपैकी एक आहेत. अध्यात्मात जेवढ्या काही पायर्‍या किंवा पदे आहेत, त्या सर्वांच्या शिखरावर गुरु वसिष्ठ विद्यमान आहेत. महर्षि वसिष्ठ हे ऋषींचे ऋषि आणि महर्षींचे महर्षि आहेत. ऋषि परंपरेचे सर्वाेच्च पद असलेल्या ‘ब्रह्मर्षि’ रूपात ते प्रतिष्ठित आहेत. वसिष्ठ महर्षि, महातेजस्वी, त्रिकालदर्शी, पूर्णज्ञानी, महातपस्वी आणि योगी आहेत. ब्रह्मशक्तीचे मूर्तीमंत स्वरूप आहेत. मंत्र, तसेच यज्ञ विद्या यांचे जाणकार आहेत. ऋग्वेदाच्या सातव्या मंडलाचे अधिष्ठाता वसिष्ठ आहेत. 

ब्रह्मदेवांनी वसिष्ठांना उत्पन्न केल्यानंतर त्यांना मृत्यूलोकात म्हणजे पृथ्वीलोकात जाऊन सृष्टीचा विस्तार करणे, तसेच सूर्यवंशाचे पौरोहित्य कर्म करणे याची आज्ञा दिली. त्या वेळी ब्रह्मदेवाने वसिष्ठांना सांगितले होते, ‘‘याच सूर्यवंशात पुढे जाऊन श्रीविष्णूचा मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम अवतार होणार आहे. हे पौरोहित्य कर्मच तुमच्या मुक्तीचा मार्ग होणार आहे.’’ वैवस्वताचा पुत्र इक्ष्वाकूच्या हाती मनूने सर्वांत प्रथम या पृथ्वीचे समृद्धशाली राज्य सोपवले होते. इक्ष्वाकू अयोध्येचा पहिला राजा आहे. इक्ष्वाकूने वसिष्ठांच्या उपदेशाने आपले वेगळे राज्य बनवले आणि अयोध्यापुरीला त्या राज्याची राजधानी केली. महर्षि वसिष्ठ हे इक्ष्वाकु वंशाच्या या सर्व राजांचे कुलपुरोहित होते.

राजा दशरथाच्या महालात भगवंताचे प्रागट्य झाले. त्यानंतर भगवंताच्या या दिव्य मनोहर रूपाचे नामकरण करायचे होते. अखिल जगाचा पालक जेव्हा पृथ्वीतलावर अवतरला, तेव्हा त्याची कीर्ती कोणत्या नावाने करायची ? ते नावही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. श्रीविष्णूच्या दिव्य अवताराच्या नामकरण संस्काराच्या वेळी भगवंताच्या या बालरूपाचे नामकरण करणारे महर्षि वसिष्ठच होते. पुत्रांच्या नामकरण संस्काराच्या वेळी महर्षि वसिष्ठ म्हणतात, ‘‘कौसल्यानंदनाचे नाव केवळ दोन अक्षरांचे आहे; परंतु त्या नावातच एवढे सामर्थ्य आहे की, अनंत ब्रह्मांडे त्यात सामावून जातील. अखिल विश्वाला आनंद देणार्‍या या सुखधामाचे नाव आहे ‘राम’ ’’ आणि महर्षीनी हे दिव्य रामनाम मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम याना प्रदान केले.

भगवान श्रीरामचंद्रांचे आणि त्यांच्या भावंडांचे उपनयन झाले. त्यांना वेदांचे अध्ययन करण्याकरता आणि राजपुत्रास योग्य ते इतरही शिक्षण मिळावे म्हणून वसिष्ठांच्या आश्रमात पाठविण्यात आले. राजपुत्रांनी वेदाध्ययन केलं. धनुर्वेद, आयुर्वेद, वास्तुनिर्मिति यांचंही शिक्षण घेतले. शिल्पकला, सारथ्य, पशु-परीक्षा, राज्यशास्त्र, व्यवस्थापन, न्याय इत्यादि ज्ञानशाखांचेही अध्ययन झाले आणि त्यानंतर त्यांना सांगण्यात आलं, 'तुम्ही तीर्थयात्राकरावी !' तीर्थाटनाचा हेतु आपला देश पाहावा, समाज जीवन जवळून पाहाव लोकसंस्कृतीचं निरीक्षण करावं, सहज जाता जाता काही पंडितांशी गप्पा व्हाव्यात, वेगवेगळ्या हवापाण्याची, अन्नाची शरीराला सवय व्हावी आणि ते कणखर बनावे, हा असतो. 

श्रीराम केवळ पंधरा वर्षांचेच होते. सारे राजपुत्र देशाटन करीत हिंडले. रामाचे मन उदासीन झाले तीर्थाटनावरून श्रीराम परत आले; पण त्यानंतर कमालीचे उदासीन झाले. तीर्थाटनात जी दृश्यं पाहिली, जे समाज-दर्शन घडलं वा जाता-येता ज्या सहज चर्चा झाल्या त्या सर्वांचा एकंदरीत परिणाम असा झाला. त्यांचं मन उदास बनले. कुठल्याच कार्यात त्यांना उत्साह राहिला नाही. कुणाशी मनमोकळेपणी बोलेनात. आपल्याच चिंतनात मग्न असत. कुठंतरी आकाशात टक लावून बसत. भोजन घेत. पेय पीत. पण 'हे छान झालं !' 'हे आवडलं !' 'हे नको !' अस काही नाही. समोर आलं जेवून घेतले. कुणा सेवकाला कसलीही आज्ञा नसत. हवंच असेल तर स्वत: उठून घेत. मुखावरचं हास्य मावळलं. कुणाशी फारसं बोलणं नाही. हास्यविनोद नाही. श्रीरामांच्या जवळ दोघे बंधू असत. लक्ष्मण आणि शत्रुघ्न. भरत तर आजोळी गेला होता. पण या दोघा बंधूंनाही श्रीरामाची ही उदासीनता जाणवत होती. त्यांनी विचारलं तर ठरलेलं उत्तर मिळे - 'तसं' काही नाही हे ' 'उगीच!' - 'नाही मन कशात रमत. इतकंच' श्रीरामाच्या बंधूंनी, सेवकांनी दशरथाच्या कानावर ही गोष्ट घातली. तिन्ही मातांनाही सांगितलं. त्यांनी चौकशी केली. खोदून खोदून चौकशी केली. 'श्रीराम, अरे, झालंय काय ? का असा उदासीन ?' त्यांनतरची पुढची कथा सर्वश्रुत आहे. काही काळाने श्रीरामाला वासिष्ठांनी बोलावले. ज्ञानाची खरी जिज्ञासा जागृत झाली आणि रामाच्या निमित्ताने महर्षींनी योगवासिष्ठाच्या बत्तीस सहस्त्र श्लोकातून सर्वांना जीवनाचे रहस्य उलगडुन सांगितले. 

राजा दशरथाच्या मृत्यूनंतर आणि श्रीराम वनवासात गेल्यावर भरतासह संपूर्ण प्रजेला आधार देणारे एकमात्र महर्षि वसिष्ठ होते महर्षि वसिष्ठांनी इतिहासातील अनेक प्रसंग सर्वांना सांगितले. त्या अपार ज्ञानाच्या तेजाने सर्वांचा शोक नाहीसा केला. सर्वांना धीर दिला. राजदरबारात भरताला धर्ममय उपदेश केला, ‘‘भरता, जीवनात लाभ-हानी, जीवन-मरण आणि यश-अपयश या गोष्टी केवळ विधात्याच्याच हाती असतात. त्यामुळे या गोष्टींसाठी कुणालाही दोष देणे व्यर्थ असते.’’ या निमित्ताने महर्षि वसिष्ठांनी अखिल मानवजातीलाच जीवनाचे शाश्वत सूत्र दिले आहे. भरताच्या काळातही १४ वर्षे जनतेने रामराज्यच अनुभवले. त्यामागे महर्षि वसिष्ठांचे मोठे योगदान आहे. महर्षि वसिष्ठ म्हणजे रामराज्याचा प्रमुख आधार स्तंभच होते. साक्षात् श्रीरामांचे गुरु आणि रघुवंशाचे कुलगुरु, राजगुरु बनून पिढ्यान्‌पिढ्या दिशादर्शन करणारे वसिष्ठ हे ऋषिश्रेष्ठ आहेत.

सर्वेश फडणवीस 

#ramnavmi25 #Day3 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏