Saturday, July 13, 2024
स्वामी विवेकानंदांच्या दृष्टीतून भारत : शोध व बोध
Sunday, June 16, 2024
‘देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे’
भारतीय संस्कृती खरंतर नित्यनूतन आणि वर्धिष्णू अशीच आहे. त्या संस्कृतीच्या पाऊलखुणा वाचणे म्हणजे आंनददायी पर्वणी. आपली संस्कृती बहरली आणि लोकांनी तिला आत्मसात केली म्हणून आजही युगानुयुगे तशीच शाश्वत आहे. गेले दोन दिवस या संस्कृतीच्या पाऊलखुणा देशविदेशात बहरलेल्या बघून भारावून गेलो आहे. Deepali Patwadkar लिखित ‘देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे’ पुस्तक वाचनात आले. खरंतर पुस्तक इतके छान आणि अभ्यासपूर्ण लिहिलेले आहे की एका बैठकीत वाचूनच बाजूला ठेवले जाईल असे आहे. विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाने ही कलाकृती वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदनास पात्र आहे.
भारतीयांच्या मनावर वारंवार असे बिंबवले गेले आहे की भारताचा इतिहास हा केवळ आक्रमणांचा इतिहास आहे. एका मागोमाग एक होणारी आक्रमणे आणि त्यांना बळी पडणारा हा देश असे चित्र सामान्य माणसाच्या डोळ्यासमोर उभे केले आहे. मात्र या पुस्तकातील सप्तयात्रांमधून अर्थात सात भागातून लक्षात येते की भारतीय इतिहास हा बाहेरून येऊन जिंकणाऱ्या आक्रमकांचा नसून, भारतातून बाहेर जाणाऱ्यांनी केलेल्या भारतीय संस्कृतीच्या प्रसाराचा इतिहास आहे.
भारताचा इतिहास 'कृण्वन्तो विश्वमार्यम्' या वेदवाक्याचे मूर्तरूप आहे आणि त्याचे प्रत्यंतर पानापानावर वाचकाला येते. भारत 'भा' म्हणजे तेज व 'रत' म्हणजे रममाण झालेला. तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत आहे. भारतीय संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती. अनेक पंथांचा आणि सर्व जमातींचा समावेश या संस्कृतीत होतो. एखादा जुना अल्बम काढल्यावर जशी विस्मृतीत गेलेली माणसे, प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात, त्यासारखी या यात्रेत आपल्याला भारतीय संस्कृतीची चिन्हे दिसतात त्यात त्याचा भौगोलिक इतिहास दिसतो. ही चिन्हे आपलीच कथा, आपलाच पराक्रम आपल्याला सांगतात. ही सगळी 'स्वस्तिचिन्हे' आहेत कारण ती- 'सु + अस्ति' म्हणजे कल्याणकारी आणि मंगलकारी चिन्हे आहेत आणि त्याबद्दल पुस्तकातुन जाणून घेतल्यावर आपण त्याचे पाईक आहोत हे बघूनच अभिमान वाटतो.
भारतीय लोक जिथे गेले, तिथे कुठेही त्यांनी-विध्वंस, मोडतोड, लूट, दरोडे, युद्ध, रक्तपात केला नाही. भारतीयांच्या पाऊलखुणा मंगल आहेत. त्यांनी मागे ठेवलेली चिन्हे- विधायक कामांची आणि सृजनशीलतेची 'स्वस्तिचिन्हे' आहेत. हे पुस्तक भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे जिथे उमटली आहेत, त्या ठिकाणी घेऊन जाणारी विजय यात्रा आहे. प्रत्येक भागात त्या त्या प्रदेशातील भारतीय संस्कृतीच्या स्वस्तिचिन्हांची ओळख होते व आपली पाळेमुळे किती दूर व खोल पसरली आहेत याचा अंदाज पुस्तक वाचतांना येतो.
भारताच्या या विश्वव्यापी पाउलखुणा म्हणजे आपल्या शाश्वत, चिरंतन मानवी मूल्यांचा आपण आपल्या चित्र, शिल्प, स्थापत्य कलांच्या माध्यमातून देशोदेशी रुजविलेला संस्कार असे म्हणता येईल. या संस्कार यात्रेचा हा साचेबद्ध संचार नुसताच विस्ताराने व्यापक होता असे नाही तर तो खूप खोलवर रुजलेला, दूरगामी परिणाम करणारा आणि बहुआयामी ही होता यांची माहिती पुस्तकातून वाचकाला होते.
प्राचीन काळापासून साधारणपणे तेराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती जिथे जिथे पोचली, त्या भूभागाला बृहत्तर भारत असं संबोधलं गेलं. त्या भूभागाचे दीपाली पाटवदकर यांनी सात भाग केले आणि त्याला वायव्यशल्य, उत्तरकुरू, ईशान्यसूत्र, पूर्वमित्र, आग्नेयपुराण, दक्षिणद्वीप, पश्चिमगाथा अशी नावे दिली आहे. त्या सात भागात त्यांनी अंतर्भाव केला तो पाकिस्तान,अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, शिनजियांग, चीन, मंगोलिया, कोरिया, जपान, तिबेट, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम,इंडोनेशिया, अंदमान, निकोबार, श्रीलंका, लक्षद्वीप, मालदीव, मॉरिशस, इराण, इराक, इजिप्त, ग्रीस, रोम, युरोप, या सुमारे ३१ देशात वा द्वीपात आजही इतक्या वर्षांनंतर आढळून येणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणांचा वेध घेण्याचा प्रयत्न दिपाली पाटवदकर यांनी केला आहे.
खाद्य संस्कृती, रांगोळी, अंक मोजण्याची पद्धत, कालगणनेची पद्धत, शिल्पकरायची पद्धत, स्थापत्य पद्धत, नृत्य-गायन- वादन-जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या परंपरा या सर्वांचा समावेश या पुस्तकात आहे, आणि त्याचे सचित्र पुरावे या पुस्तकातून वाचकाला समृद्ध करतात. दीपाली पाटवदकर एके ठिकाणी छान लिहितात, “ कोणतेही कर्तेपण न घेता भारतीयांनी ज्ञानाची कोठारे भरली. ज्ञान नुसते साठवले नाही, तर ते दोन्ही हातांनी भरभरून वाटले!मुक्तहस्ताने, कसलीही अपेक्षा न ठेवता, ज्ञानदान केले. भारताने गीतेतील निष्काम कर्माचे धडे नुसते दिले नाहीत, तर ते जगून दाखवले. रामदास स्वामींच्या उक्तीनुसार 'जे जे आपणासी ठावे, ते ते सकळांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे सकल जन' हे व्रत भारतीयांनी सहज पाळले.”
अशा या भरतभूमीत जन्माला येणं खरंतर ही भाग्याची गोष्ट म्हणायला हवी. योगी अरविंद speeches of Shri Aurobindo मध्ये म्हणतात, आज जगाला भारताच्या भविष्याची जाणीव झाली आहे.
The sun of India would rise..overflow the World.(speeches of Shri Aurobindo)
भारताचा सूर्य उगवेल व सर्व जगाला प्रकाशाने भारुन टाकेल हे त्यांचे उद्गार महत्त्वाचे आहेत आणि हे पुस्तक वाचून बृहत्तर भारताची पूर्ण कल्पना लक्षात येते. सांस्कृतिक, एकात्म भारताची व्याप्ती लक्षात येते. अत्यंत सहज शब्दांत आणि ससंदर्भ असलेले पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असावं असंच आहे.
देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे
पुस्तकासाठी संपर्क : www.kalaapushpa.com
सर्वेश फडणवीस
Monday, June 3, 2024
यतो धर्मस्ततो जयः ।।
Saturday, May 25, 2024
गाथा भारतीय विरागिनींची..
साधारणपणे तेराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत उत्तरेपासून दक्षिणेकडे आणि पूर्वपासून पश्चिमेकडे भारतात अनेक संत स्त्रिया होऊन गेल्या. मध्ययुगात सर्व भारतभर अनेक भक्तिपंथांचा उदय झाला. याच कालखंडातील भारतीय विरागिनींच्या कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन आणि पारमार्थिक पातळीवरील जीवनविचार हा संशोधनाचा फार मोठा विषय आहे. याच विषयाला अभ्यासपूर्ण संशोधनाची मांडणी देत डॉ.अरुणा ढेरे यांचा ‘भारतीय विरागिनी’ हा ग्रंथ मध्यंतरी वाचनात आला. किरण शेलार सरांनी नागपूर भेटीत आवर्जून ग्रंथ भेट दिला आणि आवर्जून वाच अशी सूचना वजा विनंती केली. यातल्या प्रत्येक स्त्रीचरित्राबद्दल वाचतांना सुद्धा प्रेरणा आणि त्यांच्या कार्याची संपूर्ण ओळख होत असतानाच त्यांच्याबद्दलचा आदर पानोपानी जाणवत होता. तब्बल ४६४ पानी असलेल्या या ग्रंथात ३० हुन अधिक स्त्रीचरित्रे वाचायला मिळतात.
संपूर्ण भारताचा पट डोळ्यांसमोर ठेवून विरागिनींचे जीवन आणि साहित्य यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न अरुणा ढेरे यांनी केला आहे. संपूर्ण ग्रंथाच्या विषयाचा विस्तार मोठा आहे. शिवाय विविध प्रादेशिक भाषांमधल्या आणि बोलींमधल्या अनेकींच्या मूळ रचनांपर्यंत पोहोचणे आणि त्या भाषेबद्दल अरुणा ताईंनी केलेला प्रयत्न हेवा आणि आदर वाटावा असाच झाला आहे. भारतीय विरागिनींचे स्त्रीत्वाशी असलेल्या संवेदना आणि भारतीय भक्तिक्षेत्राशी निर्माण झालेले नाते या ग्रंथातील प्रत्येक चरित्रातून उलगडत जाते. मानवजातीचा इतिहास पाहता प्रारंभकाळात स्त्री हीच सृष्टीशी संवादी जगत होती. निसर्गाशी तिचे नाते अधिक दृढ, सामंजस्यपूर्ण, तणावरहित, स्वाभाविक असे होते.
लौकिकातून पलीकडे पाउल टाकणाऱ्या आणि लौकिक आयुष्याने निर्माण केलेल्या सर्व बंधनांपासून मुक्त होऊन परमार्थाची वाट धरणाऱ्या स्त्रियांना आपल्याकडे विरागिनी शब्दावलीत त्यांच्या कार्याचा उल्लेख केला जातो. काश्मीरच्या लाल देदपासून तमिळनाडूच्या ओव्वै किंवा अवैयार ते आंदाळपर्यंत आणि बंगालच्या चंद्रावतीपासून महाराष्ट्राच्या मुक्तेपर्यंत गेल्या आठ शतकांमध्ये होऊन गेलेल्या भारतीय विरागिनींच्या जेवढ्या म्हणून आयुष्यकथा उपलब्ध आहेत, त्यांची काळाच्या एका विशाल पटावर मांडणी केली तर असे दिसून येते की, यांपैकी प्रत्येकीला संघर्ष अटळच ठरला आहे. स्थूल किंवा सूक्ष्म असो, आई-वडिलांशी असो, सासू-सासऱ्यांशी असो, पतीशी असो की स्वत:चाच स्वतःशी असो- प्रत्येकीला संघर्षाला सामोरे जावे लागले आहे. या संघर्षाचे आणि चरित्राचे प्रतिबिंब या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळते.
विरागिनींचा पारमार्थिक जीवनातील प्रवेश आणि त्यासाठी करावा लागणारा गृहत्याग सामाजिक स्तरावर सहज स्वीकारली जाणारी गोष्ट नव्हती. ते अवघड दिव्यच होते. यासाठी लागणाऱ्या असीम निग्रहाचा आणि धैर्याचा स्वीकार या विरागिनींनी कसा केला याबद्दल वाचून वाचक समृद्ध होतो. विरागिनींचा कौटुंबिक ते पारमार्थिक प्रवास अतिशय आत्मीयतेने अरुणा ताईंनी वर्णन केला आहे. विरागिनींनी भक्तिमार्ग स्वीकारून स्वत:ला आणि समाजाला काय दिले, अनेक पातळ्यांवरचा संघर्ष आणि त्यातून मिळणारा परमानंद या विरागिनींनी अनुभवला आहे. या अनुभवाचे यथोचित दर्शन या ग्रंथातून होते.
संपूर्ण भारतातील तत्कालीन भारतीय कुटुंबरचना, आध्यात्मिक वातावरण, संप्रदायाचे अधिष्ठान, मठाधिपती आणि त्याचे माहात्म्य, पितृसत्ताक समाजव्यवस्थेत स्त्रियांचे स्थान, स्त्रीचे लग्नाचे वय, बालविवाह, विधवांची जीवनपद्धती इत्यादी अनेक घटकांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे या ग्रंथातून अरुणा ताईंनी समर्पक शब्दातून मांडणी केली आहे. अतिशय संशोधनपूर्ण केलेल्या या ग्रंथाच्या समारोपात अरुणा ताई लिहितात, ‘स्त्रीचे जे मिथक शेकडो वर्षांच्या हातांनी घडत गेले होते, त्या मिथकात या विरागिनींनी आत्मानुभूतीचा नवा प्राण भरला आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड ऊर्जेच्या लोटात त्या मिथकांचा जुना साचा संपूर्ण वितळून गेला.’ वाचनीय आणि प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक आहे.
‘भारतीय विरागिनी’ – डॉ. अरुणा ढेरे म
हाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
पृष्ठसंख्या ४६४, किंमत- २३२ रुपये.
सर्वेश फडणवीस
Sunday, May 12, 2024
◆ आचार्य शंकर !! 🚩
Friday, May 3, 2024
सहवासाच्या चांदण्यात 🌠
चांदण्याचा सहवास कुणालाही हवाहवासा वाटतो. पण साहित्याच्या सहवासात हे चांदणं अधिक आशादायक, दिलासादायक, आनंदी आणि स्वच्छंदी असतं यात शंकाच नाही. मध्यंतरी एका छान पुस्तकाच्या प्रवासाचा भाग होता आले ही नक्कीच पूर्वपुण्याई असावी असे वाटते. विजयाताई राम शेवाळकर यांच्याशी रेखा चवरे यांनी साधलेला हा संवाद नुकताच २ मार्चला शेवाळकरांच्या अंगणात दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांच्या हस्ते प्रकाशित झाला. अनेक दिवसांपासून यावर लिहायचे मनात होते. पण आजचा दिवस राखून ठेवला होता. पुस्तक प्रकाशनापूर्वी रेखा ताईंनी वाचायला पाठवले आणि एका बैठकीत पुस्तक वाचून पूर्ण झाले. ८४ पानांच्या या पुस्तकातून विद्यावाचस्पती वक्तादशसहस्त्रेशु राम शेवाळकर यांचे विविध पैलू उलगडून दाखवणारे हे आगळेवेगळे पुस्तक. राम आणि विजया शेवाळकर यांच्या आठवणींची वाक्गंगा म्हणजे हे पुस्तक आहे. रेखा चवरे यांच्या इच्छेला त्वरित होकार देणाऱ्या विजयाताई आणि या सुवर्णसंधीचा फायदा घेत आता अजरामर झालेली ही कलाकृती जन्माला आली.
काही योगायोग हे नियतीने लिहिलेले असतात कारण आज ३ मे नानासाहेबांचा स्मृतिदिवस आणि बरोबर त्याच्याच एक दिवस आधी अर्थात काल २ मे ला विजयाताई शेवाळकर यांनी या जगाचा निरोप घेतला. नानासाहेबांबरोबर प्रत्येक क्षण अनुभवलेल्या, सुखदुःखात नव्हे तर प्रत्येक क्षणी सावली सारखी साथ देणाऱ्या सहधर्मचारिणी असणाऱ्या विजयाताई साहित्याच्या सहवासाच्या चांदण्यात विलीन झाल्या असल्या तरी या पुस्तकातून आणि आठवणीच्या चांदण्यात कायमच स्मरणात राहणाऱ्या आहेत.
अत्यंत देखणे मुखपृष्ठ हे देखील या पुस्तकाचे वेगळेपण आहे. राम शेवाळकर आणि विजया शेवाळकर यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्यावेळी काढलेले हे छायाचित्र आहे. single picture speaks more than a thousand words. This one picture tells its own story. असं म्हंटल तर प्रत्येकाने अनुभवलेले आणि प्रत्येकाला भावलेले असे हे दोघे मुखपृष्ठ बघितल्याक्षणी जाणवतील. खरंतर विजयाताईंना बोलतं करण्याचे फार मोठे काम रेखा चवरे यांनी केले आहे. साहित्याच्या हिमालयात राहणाऱ्या विजयाताई पण त्यांनी सावलीसारखी साथ राम शेवाळकर यांना दिली आणि शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळली. यांच्या संपर्कातील अनेकांनी हा अनुभव घेतला आहे. मुलाखत संग्रहातून विजयाताईंनी मोकळेपणाने आणि आपुलकीने आपल्या संसारातील अनेक चांगल्या गोष्टींचा खजिना वाचकांसाठी यानिमित्ताने रिता केला आहे.
पुस्तक वाचतांना तुमच्या माझ्या अनेकांच्या घरातीलच हे प्रसंग असतील इतके ते सजीव आणि सुंदर आहे पण साहित्याच्या वटवृक्षात त्या कशा बहरत गेल्या आणि अधिक समृद्ध होत गेल्या यासाठी हे पुस्तक वाचनीय आहे. आदरातिथ्य करण्यात या दांपत्याचा हात कुणीही धरू शकणार नाही. जे मिळेल ते स्वीकारण्याची यांची वृत्ती प्रत्येकाला अनुकरणीय आहे. पुस्तकातून नानासाहेबांचे जसे विविध पैलू वाचायला मिळतात तसे विजयाताईंचे पाककलेच्या गुणाबद्दलही वाचायला मिळते.
मुलाखतीच्या शेवटी मुलाखतकार रेखा चवरे-जैन विजयाताईंच्या एकूण प्रवासाबद्दल खूप छान व्यक्त होतात.'सखी, पत्नी, मैत्रीण, शिक्षक, मदतनीस, लेखनिक आणि प्रसंगी आईचीही भूमिका पार पाडत नानासाहेबांना शारीरिक, भावनिक, मानसिक आधार देणाऱ्या, नानासाहेबांशी एकरूप होऊन देखील स्वतंत्र अस्तित्व राखणाऱ्या विजयाताई नानासाहेबांबद्दल भरभरून व्यक्त होतात हे वाचतांना जाणवते. बहुआयामी अशा नानासाहेबांचे विविध पैलू उलगडून कलावंत म्हणून आणि माणूस म्हणून त्याचे जे दर्शन विजयाताईंनी घडविलं ते स्तिमित करणारं आहे. प्रत्येक प्रसंगात मुलगा, सून, नात यांच्यासोबत राम शेवाळकर आणि विजयाताईंचे संबंध किती मोकळे, संकोच विरहित होते याचीही कल्पना येते आणि एकंदरीत शेवाळकर घराण्यातील हे चांदणे त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाला आनंदी, समृद्ध करणारे आहेत.
वैशाखात जसा मोगरा मानवी मनाला शांतता, शीतलता आणि सुगंधी दरवळ देणारा असतो तसंच काही नानासाहेब आणि विजयाताईंनी शेवाळकर कुटुंबाला आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला सुगंधी अत्तर दरवळणारे क्षण प्रदान केले. वाचकांच्या जवळ आवर्जून संग्रही असावा असा संग्रह म्हणजे सहवासाच्या चांदण्यात.
सहवासाच्या चांदण्यात
मुलाखतकार: रेखा चवरे-जैन
प्रकाशक: विजय प्रकाशन, नागपूर
सर्वेश फडणवीस
Thursday, May 2, 2024
स्वरगंधर्व सुधीर फडके
बायौपीकची सुरुवात गाणारे व्हायोलिन म्हणून ओळखले जाणारे प्रभाकर जोग यांच्या इन्स्ट्रुमेंटल मेडलीने होते. तब्बल २६ मूळ बाबूजींनी गायलेली गाणी या चित्रपटाची वेगळी बाजू आहे. एवढी गाणी असून सुद्धा जाणवत नाही इतकी ती त्यांच्या संपूर्ण आयुष्याशी समरस झालेली आहेत हे चित्रपट बघतांना जाणवतं. दूरदर्शनच्या प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात अशोक रानडे यांनी बाबूंजींच्या घेतलेल्या मुलाखतीतून बाबूजींचा जीवनपट उलगडत जातो. लहान वयातच कोल्हापूरमधील बाबूजींची संगीताबद्दलची आवड दाखवणारे प्रसंग छान जमले आहेत.
प्रतिकूल परिस्थितीशी, जीवाची घालमेल प्रसंगी आत्महत्येचा विचार आणि खिशात पैसे नसतांना होरपळलेले बाबूजी बघितल्यावर अंगावर काटा आला. देशभर अनेक ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम मिळवण्यासाठी झालेले प्रयत्न आणि एका वेळचे जेवणही मिळवताना झालेले कष्ट आणि रडकुंडीला आलेले बाबूजीं, असं काही बघितले की वाटतं आपल्याला प्रसिद्ध व्यक्तींचं प्रसिद्धीच्या यशोशिखरावर असलेले आयुष्य, मिळणारी वाहवा दिसते पण त्यामागची खडतर तपस्या आणि संघर्ष दिसत नाही. पोटात अन्नाचा कणही नसतांना गाणे गाण्याची जिद्द बघून डोळे पाणावतात.
चित्रपटाबद्दल अनेकजण लिहितील पण मला भावलेला आणि आवडलेले बाबूजींचे पैलू यानिमित्ताने मांडण्याचा प्रयत्न करतोय. बुद्धिमत्ता, प्रतिभा, कल्पकता आणि इतर प्रांतातील संगीताचा अभ्यास या सर्व गोष्टींचा वापर करून एक वेगळंच युग सुधीर फडके यांनी निर्माण केलं. ज्याचा परिणाम आजही जाणवतो आणि पुढेही जाणवत राहील. प्रख्यात संगीतकार, मनस्वी गायक, प्रखर राष्ट्रभक्त, सावरकरनिष्ठा अशा गुणवैशिष्ट्यांनी युक्त असणारे महाराष्ट्राचे लाडके बाबूजी म्हणजे सुधीर फडके. त्यांच्या बायोपिक मधून जाणवतं की कोणतेही काम एकदा स्वीकारलं की, ते अत्यंत मनापासून आणि अतिशय चांगल्या रीतीनेच करायचं, मग त्यासाठी कितीही कष्ट पडोत, वेळ लागो अथवा पैसे खर्च होवोत; पण चांगलंच करायचं हा त्यांचा स्वभाव होता.
प्रत्येक मराठी माणूस बाबूजींच्या सुरांचा चाहता आहे. त्यांचे सुर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भरून उरले आहेत त्याचा प्रत्येक गायकाने आदर्श ठेवावा आणि प्रत्येक कानसेनाने तृप्ततेची अनुभूती घ्यावी, असं हे सह्याद्रीच्या कुशीतलं हिमालयाची उंची गाठलेलं व्यक्तिमत्त्व होतं. सुरांच्या माध्यमातून ते आपल्यात सामावले असले तरी व्यक्ती म्हणून, कलाकार म्हणून ते कसे होते यासाठी आवर्जून हा बायोपिक बघायला हवा.
सुधीर फडकेंच्या मनात प्रखर देशप्रेम होतं. संगीतकार, गायक म्हणून त्यांना कीर्ती, बहुमान, पैसा मिळाला होता. त्यांच्याजागी दुसरा कोणी असता, तर सुखासीन आयुष्य व्यतीत करण्यात धन्यता मानली असती. पण फडकेसाहेबांची तशी वृत्ती नव्हती. देशाच्या उन्नतीसाठी आपल्याला काय करता येईल, याचा तेसतत विचार करीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दादरा नगर हवेली सशस्त्र क्रांतीचा उठाव कसा झाला यासाठी हा बायोपिक बघायला हवा.
बायोपिक बघतांना जाणवतं की, बाबूजी या नावाभोवती आजही जे वलय आहे, ते सहज मिळालं नाही. त्यामागे प्रचंड साधना आहे. कष्ट आहेत. जिद्द तर आहेच आहे. शब्दाला सुगम संगीतात किती वजन असतं, ते नेमकं कुठं जाणवू द्यायचे, त्याशिवाय त्यांची एक खासियत अशी होती की, प्रत्येक अंतरा वेगळा त्यात वेगळी, हरकत याची लयलूट असे. गदिमा यांच्या सारख्या असामान्य कवीचे शब्द पुढ्यात आले की भाषाप्रभूला ज्या वेगानं शब्द सुचत, त्याच वेगात बाबूजींच्या चाली लगेच होत असत. ती चालही अशी की, गीताचा आशय अधिक भावपूर्ण असे. सुगम संगीताचा सम्राट म्हणून बाबूजी जगन्मान्य झाले पण रसिक मनाची नाडी सापडलेल्या सुधीर फडके यांनी आयुष्यभर सूर, ताल आणि लय यातच हयात व्यतीत केली असती, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निष्ठा आणि आदर्श स्वयंसेवकत्व कसे असायला हवे यासाठीं हा बायोपिक आवर्जून बघायला हवा.
नुकतीच रामनवमी झाली. मराठी रसिकांना गीत रामायणाच्या भक्तिरसात चिंब भिजवणाऱ्या अनेक सुंदर रचना बाबूजीं आणि गदिमा यांनी अजरामर करून ठेवल्या आहेत. ५६ गीतांच्या गीतरामायणाने ६० वर्षांहूनही अधिक काळ सर्व रसिकांना मंत्रमुग्ध करून ठेवले आहे. गीत रामायणाची जादू आजही रसिकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. त्याचा प्रवास आणि आठवणी यासाठी हा बायोपिक बघायला हवा.
आधीच्या आणि येणाऱ्या पिढ्यांना भुरळ घालणारी गीत संगीताची निर्मिती करणाऱ्या या मंडळींच्या कामातला सच्चेपणा प्रसंगी सर्वोत्तमाकरिता घेतलेला ध्यास हे सारंच वंदनीय आहे. अनेक पिढ्यांवर त्यांचं गारुड आहे ते पुढेही चिरंतन राहील. कारण जे अस्सल आहे ते विरत नाही मुरत जातं. एक रसिक आणि संगीत क्षेत्रातला वारकरी म्हणून मी त्यासमोर सदैव नतमस्तक राहीन. आणि याचसाठी 'जगाच्या पाठीवर' असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने हा बायोपिक आवर्जून बघायला पाहिजे. ग. दि. माडगूळकरांनी सुधीर फडके यांच्यासाठी लिहिलेल्या गाण्यातला केवळ एक शब्द बदलला आणि आयुष्य संगीताला वाहिलेले बाबूजी डोळ्यासमोर उभे रहातात आणि यानेच या बायोपिकचा शेवट होईल.
या सुरांनो या विरहांतीचा एकांत व्हा, अधिर व्हा, आलिंगने
गाली, ओठी, व्हा सुरांनो भाववेडी चुंबने... होऊनी स्वर वेळूचे
वाऱ्यासवे दिनरात या गात या... या सुरांनो या!
सर्वेश फडणवीस