Wednesday, December 25, 2024

राम मंदिर ते राष्ट्र मंदिर

आयुष्यात काही घटना या अलौकिक असतात. निमित्त मात्रं भव हीच भावना ती घटना घडून गेली की कायम असते. असाच अनुभव मागच्या आठवड्यात आला. अयोध्येतील रामजन्मभूमी वरील राष्ट्र मंदिरात जाण्याचा योग आला. साधारणपणे जानेवारीपासून सतत मनात येत होते एकदा तरी या जन्मस्थानावरील मंदिरात जायचे आणि त्या ६ वर्षीय रामलला यांना याची देही याची डोळा बघायचे. सर्वबाजूने योग जुळून आले अर्थात त्याने बोलावले आणि मन भरून बघून आलो. 

गेल्या ५ शतकांपासून हिंदूंच्या २५ हून अधिक पिढ्या ज्या मंदिराच्या उभारणीची चातकाप्रमाणे वाट पाहत आल्या आहेत, सहस्रावधी हिंदूंनी प्रभु श्रीरामाला आपल्या जीवनाचे सर्वस्व मानून त्याच्यासाठी बलीदान केले, कोट्यवधी हिंदूंनी आपले आराध्य मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या मंदिरासाठी भावपूर्ण प्रार्थना केल्या, उपासना केली, जीवनभर व्रतस्थ राहिले, तो ऐतिहासिक क्षण काळाचे द्वार ठोठावत असतांना तो भावविभोर करणारा सुवर्णक्षण अखेर दृष्टीस पडला आणि मन आनंदून गेले. 

भगवान राम हा कोटी हिंदूं धर्मियांच्या आस्थेचा विषय आहे. रामावर त्यांची अगाध श्रद्धा आहे. रामायण हा भारताचा मानबिंदू आहे. सामान्य माणसाला आणि विशेषतः तरुणांना श्रीरामांच्या जीवनातून खूप काही घेण्यासारखे आहे. मानवी जीवनाच्या दृष्टीने पूर्ण मानव म्हणून श्रीराम चरित्र आहे. श्रीरामाचे जीवन सर्वच बाबतीत आदर्श आहे.  श्रीराम जन्मभूमीवरील अत्यंत देखणा परिसर आणि त्यात युद्ध पातळीवर सुरू असलेले मंदिर निर्माण कार्य बघूनच नतमस्तक होतो. 

राम म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्र म्हणजे राम हे समीकरणच आहे. ज्यादिवशी दर्शनाला गेलो त्यादिवशी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही येणार होते त्यामुळे मंदिर आणि परिसरातील स्वच्छता अधिक नीटनेटकी आणि उत्साह वाढवणारी होती. मंदिर परिसरात असतांना श्रीरामलला आरती अर्थात श्रीराम ज्योत प्रज्वलित होताना बघण्याचे भाग्य लाभले आणि मनात आले की मातृभूमीच्या दिग्विजयाची सुप्त मनीषा पूर्ण करणारी ही श्रीराम ज्योत म्हणजे संघर्ष खुणा ओळखून निर्धाराने पाऊल टाकण्याची हीच योग्य वेळ आहे. आता ही ‘श्रीराम ज्योत’ प्रज्वलित झालेली असताना हा राष्ट्रदीप नव्याने उजळवू या... जय श्रीराम🙌🚩

सर्वेश फडणवीस

Wednesday, November 27, 2024

बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ !!

कार्तिक वद्य त्रयोदशी. ज्ञानदेवांच्या संकल्पपूर्तीचा दिवस. आज त्यांच्या आयुष्यभराची साधना कृत्यकृत्य होणार होती. अवघी वणवण आणि धडपड आज निमूटपणे शांत होणार होती. सोन्याच्या पिंपळाने अर्पण केलेल्या आयुष्यातील शेवटचा सोनेरी क्षण आज उगवणार होता. आरंभ त्याच्याच आशीर्वादाने झाला होता, आता अखेरही त्याच्याच अध्यक्षतेखाली व्हायची होती.

पंचपंच उष:काली ज्ञानेश्वर झोपेतून उठले. प्रातः कर्मे आटोपून त्यांनी इंद्रायणीमध्ये स्नान केले आणि आन्हिक उरकून ते सिद्धेश्वराच्या दर्शनाला निघाले. त्यांनी स्वत:च्या हातांनी
षोडषोपचारे श्रीसिद्धेश्वराची पूजा केली, आरतीनंतर सिद्धेश्वराला प्रदक्षिणा घातली, त्याचे आशीर्वाद घेतले. सुवर्णपिंपळाचा प्रणामपूर्वक निरोप घेतला.

-आणि ज्ञानेश्वरांची महाप्रस्थान यात्रा सुरू झाली. संतमंडळी जागोजाग शुचिर्भूत होऊन उभी होती, वातावरणात निशब्द शांतता होती, आवाज फक्त सर्वांच्या अबोल उच्छ्वासांचा नि ज्ञानदेवांचा वत्सल पावलांचा तेवढा होता. प्रत्येक संताजवळ ज्ञानेश्वर जात. त्यांच्या पाया पडत, त्यांना आलिंगन देत. तेही ज्ञानदेवांच्या पाया पडत नि मान फिरवून हुंदका आवरत. हात जोडून ज्ञानदेव पुढे जात. नारा, विठा, गोंदा, महादा ही नामदेवांची मुले एवढेसे चेहरे करून वाटेवर उभी होती. ज्ञानदेवांनी त्यांना गोंजारले, पोटाशी घेतले. विसोबा खेचर, चांगा वटेश्वर, गोरोबा कुंभार, सावता माळी, ज्ञानदेव त्यांच्याजवळ पोहोचताक्षणीच त्यांच्या पायांवर कोसळले. त्यांची प्रेमभेट घेऊन ज्ञानदेव पुढे निघाले. सर्वांनी आपले श्वास रोखून धरले होते. डोळे प्रयत्नपूर्वक कोरडेठक्क ठेवले होते, ओठ गच्च मिटले होते. शक्यतो एकमेकांकडे पाहणेही टाळण्याची खटपट चालली होती. सर्वांची दृष्टी चालत्या ज्ञानदेवांवर खिळून राहिली होती.

आणि ज्ञानदेव मात्र अंतर्बाह्य शांत होते. त्यांनी आपले पाश केव्हाच आवरले होते. ऐहिकापलीकडे जाण्याचे वेधही त्यांना फारसे लागले नव्हते. त्यांच्या लेखी आता आरंभ आणि अंत, जगणे आणि लोपणे, ऐहिक आणि पारलौकिक, अंधार आणि प्रकाश यांतील अंतर फारसे उरले नव्हते. आरंभालाच या जगात अंताची स्वप्ने पडतात, आणि अंतालाच आरंभाच्या पारंब्या फुटतात, याचे अचूक ज्ञान त्यांना होते. प्रकाशाला अंधार एरवीच अनोळखी असतो. पण ज्ञानदेवांना आता अंधारच प्रकाशरूप वाटत होता. या जगाबद्दल त्यांना राग-लोभ काहीच नव्हता. म्हणूनच ते शांतपणे पावले टाकत चालले होते. आता एकच भेट उरली होती, तिच्याकडेच आता सर्व उपस्थितांचे डोळे लागले होते. तेवढ्यासाठीच अंत:करणात उफाळणारा सर्व कोलाहल प्रयासाने कोंडून धरण्यात आला होता. काही अघटित अथवा अप्रिय होऊ नये, अशी मनोमन प्रार्थना करीतच, काय होणार, याबद्दलच्या उत्सुकतेने सर्वांनी आपली नजर तिकडे वळविली. ज्ञानेश्वरांची तिन्ही भावंडे तेथे उभी होती. निवृत्तिनाथांनी सोपान, मुक्ताबाईला आपल्या दोन्ही बाजूंना ठेवले होते. संथपणे चालत ज्ञानदेव तेथे आले.

म्लान वदनें निवृत्ती सद्गुरू सागर ।
येवूनि ज्ञानेश्वर चरणी लागे ॥
ज्ञानदेवांनी आल्या आल्या वाकून निवृत्तिनाथांच्या पायांवर डोके टेकले. निवृत्तिनाथ हे त्यांचे मोठे बंधू, त्यांचे गुरू, पितृ निधनानंतरचे त्यांचे वडील. आदिनाथापासून चालत आलेले अद्वयानंदवैभव असे गीतागुह्य 'कलीकलित' जगाचा उद्धार करण्यासाठी देशी भाषेत लोकांच्या कानी पोहोचविण्याच्या यांच्याच आदेशावरून ज्ञानदेवांनी भगवद्गीतेवर देशीकार लेणे चढविले होते. ज्ञानदेवांनी पायाची मिठी सोडली, आणि निवृत्तिनाथांसमोर ते हात जोडून उभे राहिले.

म्हणाले-
पाळिले, पोषिले चालविला लळा ।
बा माझ्या कृपाळा निवृत्तिराजा ॥

"आईवडील गेल्यानंतर तू आमची आई झालास, तूच आमचा वडील झालास. त्या नात्याने स्वरूपाकार होऊ शकलो, त्याच नात्याने आता मला निरोप दे. तोच आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. तूच आमचे लळे पुरविलेस, तुझ्या कृपाप्रसादामुळे आम्ही मायानदी ओलांडू शकलो आणि स्वरूपाकार होऊ शकलो त्याच नात्याने मला निरोप दे तोच आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. ज्ञानदेवाचे हे शब्द ऐकताच निवृत्तीनाथांना एकदम भडभडून आले. कालांतराने सकल संतांच्या समोर ज्ञानेश्वर उभे टाकले . सगळ्या संतांची हीच भावना होती आणि पुढे ज्ञानेश्वर आसनावर जाऊन बसले. त्यांनी पद्मासन घातले. पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. एकशे आठ ओव्यांनी शेवटचे नमन केले.

आतां मोक्षाचियां वाटां
पाहिला षट्चक्र चोहटा ॥
आज्ञा द्यावी वैकुंठां
ज्ञानदेवो म्हणें ॥
न लगे कलियुगीचा वारा
जे जे बोलिलो जगदुद्धारा ॥
मागितला थारा । पायीं तुझ्या ॥

ज्ञानदेवांच्या तोंडून बाहेर पडलेले ते अखेरचे शब्द. त्यानंतर त्यांनी डोळे मिटले.

ज्ञानदेव म्हणें सुखी केलें देवा
पादपद्मीं ठेवा, निरंतर ॥
तीन वेळा तेव्हां जोडिले करकमळ
झाकियेलें डोळे ज्ञानदेवे ॥
भीममुद्रा डोळां निरंजन मैदान
झालें ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥

ज्ञानेश्वरांनी समाधीकडे जाताना जगाकडे स्वाभाविकच पाठ फिरविली असेल; पण जग सम्मुख होऊन त्यांच्याकडेच पाहात होते. ज्ञानेश्वर आसनावर स्थानापन्न झाले आणि बाहेरच्या
जगात एकच कल्लोळ उडाला.  कार्तिक वद्य त्रयोदशी शके बाराशे अठरा, गुरुवार दुपारचा हा प्रसंग. ज्ञानेश्वरांची 'संजीवन समाधी' हा एक युगान्तच होता. 

प्राचार्य राम शेवाळकरांनी केलेले हे पूर्ण निरूपण ऐकतांना आजही डोळे पाणावतात आणि वाटतं हे सगळं अलौकिक आणि शब्दांच्या पलीकडचे आहे. अमृताचा घनू ज्यांनी याची देही याची डोळा अनुभवले असेल ती माणसं कित्ती भाग्यवान असतील..

आज कार्तिकी वद्य त्रयोदशी, सकल संतश्रेष्ठ माउली ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याची परममंगल अशी तिथी. प्रत्यक्ष माउली म्हणतात, 

अवघाचि संसार सुखाचा करीन । 
आनंदे भरीन तिन्हीं लोक ॥ 

आजही माउलींचे स्मरण आणि ज्ञानेश्वरी व हरिपाठाच्या ओव्यांच्या माध्यमातून मानवी मनाला आनंद देणाऱ्या या पावन मनाच्या योग्याचे दर्शन घेण्यासाठी एकदा तरी इंद्रायणीच्या तीरावरील आळंदी येथे जायला हवेच. आयुष्य कृतकृत्य झाल्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीच.
 
- सर्वेश फडणवीस 


Friday, October 11, 2024

⚜️ *नवनवोन्मेषशालिनी : आरती अहिल्यादेवीची*

घटस्थापनेपासून नवरात्रोत्सव जागर उत्सवाला सर्वत्र उत्साहात सुरुवात झाली. आज विजयादशमी अर्थात सीमोल्लंघन. हे दिवस खूप आनंदी आणि उत्साही वातावरणात गेले. जसं लेखमालेच्या सुरुवातीला लिहिले होते, आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास आहे. उपनिषद काळापासून स्त्री ही खरं तर पूजनीय, वंदनीय आहे. ती ब्रह्मवादिनी आहे. वैदिक काळापासून ती शिक्षित आणि उच्च विद्याविभूषित अशीच होती आणि आजही हे संचित कायम आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जन्म- जयंतीनिमित्त ‘नवनवोन्मेषशालिनी’ अंतर्गत अहिल्याबाईंच्या कार्य कर्तृत्वाचे विविध पैलू यानिमित्ताने मांडले. अहिल्याबाई होळकर चरित्राचा अभ्यास झाला आणि विविध संदर्भ ग्रंथातून हे लेखन झाले. या लेखमालेसाठी अनेक ग्रंथाचे साहाय्य झाले आणि त्यासाठी त्यांच्या ऋणातच राहायला आवडेल कारण त्यांनी जे काम करून ठेवले आहे त्यातून ही लेखमाला झाली यात विजया जहागिरदार यांचे तेजस्विनी, कर्मयोगिनी(कादंबरी), लोकमाता, देविदास पोटे यांचे वेध अहिल्याबाईंचा, खंड अर्थात होळकरशाहीचा इतिहास, द. बा. पारसनीस यांची महेश्वर दरबारची बातमीपत्रे, विजया खडपेकर यांचे ज्ञात-अज्ञात अहिल्या आणि अहिल्याबाई यांच्यावरील अनेक लेख वाचनात आले.

नेहमीप्रमाणे परिचयातील अनेकांच्या सूचना आणि छान अभिप्राय मिळाले. खरंतर सलग नऊ दिवस लिहिणे तसं कठीण होतं पण पोस्टवरील प्रत्येक लाईक, कमेन्ट, शेयर बघून पुन्हा काही नवं लिहिण्याची प्रेरणा मिळत होती. प्रत्येक कमेन्टला उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण काही राहिले असल्यास सर्वांना पुनश्च धन्यवाद देतो. यानंतर नवनवोन्मेषशालिनी या हॅशटॅग खाली आपल्याला सगळे लेख वाचता येतील. ब्लॉगवरही सगळे लेख एकत्रित आहेत. आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहावे हीच प्रार्थना आहे.

समारोपाच्या शेवटी येतांना वाटतं की भारत हा उत्सवप्रिय देश आहे आणि सणवार असले की सगळीकडे आनंदी आणि प्रसन्न वातावरण असतं. हिंदूंच्या मुख्य धार्मिक सणांमध्ये म्हटल्या जाणा-या आरत्या या त्या-त्या सणांचं महत्त्व आणि उत्साह द्विगुणीत करतात. आरती म्हणताना सर्वानी त्यातील अर्थ समजून घेऊन ती मनोभावे म्हटली, तर ती त्या देवतेकडे पोहोचते असा मानवी समज आहे. खरंतर आर्ततेने स्तुती करण्यासाठी केलेलं गायन म्हणजे आरती. आज या लेखमालेची सांगता नाशिक येथील पुष्पा गोटखिंडीकर यांनी अहिल्याबाईंच्या रचलेल्या आरतीने करणार आहे. राष्ट्र सेविका समितीच्या सह कार्यवाहिका चित्रा ताईनी ही आरती उपलब्ध करून दिली. आरती करतांना ज्याची स्तुती असते ते रूपच साक्षात डोळ्यांसमोर येते आणि आरतीचे हे वेगळेपण अद्भुत असेच आहे. असेच ज्यांच्या कार्याचा जागर गेले नऊ दिवस झाला त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्तुतीपर ही आरती अगदीं अर्थपूर्ण आहे.

जय देवी जय देवी जय अहिल्यादेवी ।
तुज गुण वर्णाया मज देई स्फूर्ती ।
जय देवी जय देवी ।। ध्रु ।।

साधी राहणी तुझे उच्च विचार ।
प्रजाहितासाठी करीसी आचार ।
धार्मिक तुही, असशी उदार ।
शेकडो मंदिरांचा केला जीर्णोद्धार ।। १ ।।
जय देवी जय देवी ।। ध्रु ।।

लढवय्यी तू , निपुण घोडेस्वार ।
रणांगणी तुझी, तळपली तलवार ।
अचूक न्यायदानाचा करुनी अंगीकार ।
उत्तम प्रशासक तुझा चोख कारभार ।।२ ।।
जय देवी जय देवी ।। ध्रु ।।

महिलांचा सन्मान घेऊन कैवार ।
कायदेकानू करताना केला विचार ।
ग्रंथसंपदेची तू असशी निर्मितीकार ।
गुणवंतांनी शोभे बघ तुझा दरबार ।। ३ ।।
जय देवी जय देवी ।। ध्रु ।।

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ।। ☘️

सर्वेश फडणवीस

#नवनवोन्मेषशालिनी  #लेखमाला #नवरात्र  #समारोप

Thursday, October 10, 2024

⚜️ *नवनवोन्मेषशालिनी : महेश्वरच्या अहिल्याबाई*

होळकर घरातल्या तिन्ही पुरुषांचा मृत्यू झाल्यामुळे अहिल्याबाईना आता इंदूरला होळकर वाड्यात राहणे नकोसे वाटू लागले. म्हणून त्यांनी नवीन राजधानीचा शोध सुरू केला. नेमाडमध्ये नर्मदेच्या काठी पुराणात ज्याचे वर्णन मर्दाना या नावाने आले आहे. ते स्थान त्यांच्या पसंतीस उतरले. परंतु ज्योतिषी मंडळीचे म्हणणे पडले, हे स्थान राजधानीसाठी योग्य नाही. त्या पुढे निघाल्या. नर्मदेकाठचे महेश्वर हे गाव पाहताच त्या हरखून गेल्या, नर्मदा नदीचे केवढे रुंद पात्र, दाट झाडी, भुईकोट किल्ला आणि मल्हारराव होळकरांनीच काही वर्षापूर्वी महेश्वर वसविले होते. ज्योतिषी, ब्राह्मण इत्यादींना विचारणा करून त्यांनी तेच स्थान राजधानीसाठी सुनिश्चित केले.

प्राचीन साहित्यात महेश्वरचा उल्लेख माहिष्मती म्हणून आहे. रामायण, महाभारत, पुराणे, बौद्ध धर्मग्रंथ आणि सुप्रसिद्ध प्रवाशांच्या वर्णनात सर्वत्र या नगरीचा उल्लेख होता. हरिवंशात म्हटले होते, महिष्मान नावाच्या राजाने या नगरीची उभारणी केली. पुराणातील प्रसिद्ध राजा सहस्रार्जुन याने ज्या अनूप देशावर राज्य केले, त्या अनूप देशाची राजधानी हीच होती. या नगरीस सहस्रबाहू की वस्ती असेही संबोधले जात असे. वाल्मीकि रामायणात म्हटले होते की, लंकापती रावण सहस्रबाहुच्या राजधानीत आला असता त्याने आपल्या बाहुबळाने नर्मदेचा प्रवाह कोंडून आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या बाहूतून निसटून नर्मदेचा प्रवाह सहस्रधारांनी बाहेर पडला आणि वाहू लागला. कालिदासाने रघुवंशात माहिष्मती व नर्मदा यांचा उल्लेख केला आहे. जगद्गुरू शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांचा विख्यात शास्त्रार्थ याच नगरीत झाला होता, मंडनमिश्रांची पत्नी या वादात न्यायाधीश होती. पौराणिक काळाप्रमाणे ऐतिहासिक काळात हे नगर महत्त्वाचे होते. सुप्रसिद्ध हैहय वंशी राजांचे राज्य येथेच होते. चालुक्य परंपरांच्या काळातही महेश्वर ही एक प्रसिद्ध नगरी होती. नंतर मांडूच्या सुलतानांनी ती जिंकून घेतली. इ.स. १४२२ मध्ये ती गुजरातच्या सुलतान अहमदशहाने हुशंगाबादकडून जिंकली. अकबराच्या काळातही महेश्वर हे एक प्रसिद्ध स्थान होते. यातील बराचसा इतिहास अहिल्याबाईंना माहिती होता.

इ.स. १७३० च्या सुमारास मल्हारराव होळकरांनी मोगलांकडून जिंकून महेश्वर आपल्या आधिपत्याखाली आणले. या नगरीचे महत्त्व जाणून मल्हाररावांनी १७४५ मध्ये एक राजाज्ञा काढून महेश्वर नगरी उत्तम प्रकारे वसविण्यासाठी सर्व प्रकारच्या सोयी करण्याची द्वाही फिरवली. महेश्वरची परंपरा अहिल्याबाईंच्या प्रकृतीला भावणारी होती. किंबहुना त्यांच्या अंत:प्रेरणेला या नगरीने साद घातली होती. शिवाय त्यांची राज्यकारभार करणारी व्यवहारी वस्तुनिष्ठ नजर त्यांना सांगत होती, येथे एक जुना भुईकोट किल्ला आहे. राज्यकारभारासाठी सुरक्षित.  होळकरांच्या वारसाचा प्रश्न अजून निकालात निघालेला नव्हता. परंतु अहिल्याबाईंनी महेश्वर हे गाव स्वत:ला राहण्यासाठी म्हणून निश्चित केले. किल्ल्याची दुरुस्ती केली. किल्ल्याच्या आत एक साधाच वाडा बांधला गेला. मालेरावाच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई महेश्वर किल्ल्याच्या आत राहू लागल्या. तेथून नर्मदेचे दर्शन स्पष्टपणे घडत होते. घरात राजदरबाराचीही जागा होती. येथेच प्रमुख कारभाऱ्यांसमवेत अहिल्याबाईंचा दरबार भरू लागला. त्या पांढऱ्या घोंगडीवर बसत असत. या घराच्या एका भागात एक मंदिर होते. त्यात शिवलिंगे होती. इतर देवदेवतांच्या मूर्तीही होत्या. याच ठिकाणी अहिल्याबाई नेहमी पूजा करत असत. अहिल्याबाई कायमच्या महेश्वर-निवासिनी झाल्या. मग मंदिरांच्या अंगणांतून होमहवनांचा पवित्र धूर भोवताली पसरू लागला, ग्रंथपठणाचे, मंत्रजागराचे गंभीर स्वर वातावरणात घुमू लागले. भजन कीर्तनाचा आणि टाळ मृदंगाचा घोष नर्मदेच्या तटावर सतत निनादत होता.

महेश्वरहून अहिल्याबाई राज्यकारभार पाहू लागल्या, होळकर म्हणजे शिंदे आणि पेशव्यांचे दोन नेत्रच असे म्हटले जात होते. अहिल्याबाई सत्तेवर आल्या तेव्हा, घरातील कुटुंबात जवळची रक्ताच्या नात्याची माणसे बोटांवर मोजण्याइतकीच होती. अहिल्याबाईंनी ज्या क्षणी महेश्वर दरबारात कार्य हाती घेतले त्यावेळी देवाब्राह्मणांसमक्ष पत्र ठेवले आणि मनोमनी प्रतिज्ञा केली. ही प्रतिज्ञा महेश्वरच्या वाड्यावर आजही लिहिलेली आहे.

माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे.
माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे,
सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे जे काही करत आहे त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे.
परमेश्वराने ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवल्या आहेत, त्या मला पार पाडावयाच्या आहेत.

महेश्वर ही होळकरांची खाजगी जहागिरी होती. गौतमाबाईंकडून ती अहिल्याबाईंकडे आलेली होती. म्हणजे एका अर्थाने ते त्यांचे अढळ ध्रुवपद होते. अहिल्याबाईंच्या संपूर्ण स्वतंत्र कारभाराचा आरंभ आणि शेवट महेश्वरमध्येच झाला.

सर्वेश फडणवीस

#नवनवोन्मेषशालिनी  #नवरात्र #लेखमाला #दिवसनववा

Wednesday, October 9, 2024

⚜️ *नवनवोन्मेषशालिनी : अहिल्याबाईंचे काशी योगदान*

इतिहासामध्ये अशी अनेक व्यक्तिमत्त्वे होऊन गेली, ज्यांनी आपला ठसा इतिहासाच्या विविध पानांवर उमटविला. धर्मकार्याची पताका सक्षमपणे कोणी वाहिली असेल तर अग्रक्रमाने ज्यांचे नाव घेता येईल अशा अहिल्याबाई होत्या. धर्मकार्य करणाऱ्या अहिल्याबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख बघतांना त्यांचे काशी आणि विश्वनाथाचे योगदान अनमोल असेच आहे. 

अहिल्याबाई यांनी सर्वप्रथम काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले. अहिल्याबाईंच्या हृदयाचा पहिला नमस्कार नेहमी काशी विश्वेश्वराला होता आणि दुसरा नमस्कार पुण्याच्या शनिवारवाड्यातल्या पेशव्यांच्या आसनाला होता.तिवारी नावाच्या तिथल्या जागामालकाला विचारून ज्ञानवापी मशिदीच्या बाजूची जागा मंदिरासाठी वापरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हा निर्णय धाडसाचा होता. कारण, ज्या काळात स्त्रियांना बाहेर पडणे देखील कठीण होते, अशावेळी इस्लामिक हल्लेखोरांना अक्षरशः तोंड देणे, ही काही सोपी गोष्ट नव्हती. ज्ञानवापी मशिदीच्या बाजूच्या जमिनीवर अहिल्याबाईंनी मंदिर निर्माणाचे कार्य सुरू केले. किती दान दिले, याचा आकडा इतिहासाच्या पानांमध्ये उपलब्ध नाही. 

अहिल्याबाईंनी १७७५ मध्ये बांधलेले हे मंदिर पूर्णपणे स्वखर्चाने उभे केले होते. आत्ता उभे असलेले आणि दिसत असलेले काशी विश्वनाथ मंदिर साधारण १७८० च्या दरम्यान अहिल्याबाईंच्या पुढाकाराने पूर्ण करण्यात आले. काशी विश्वनाथ कॉरिडोरची स्थिती पाहिल्यावर आश्चर्य वाटते की, स्वातंत्र्यानंतर आपल्या सभ्यतेतील इतक्या महत्त्वाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायला ७० वर्षे उलटावी लागली. पण जीर्णोद्धार झाला असला तरी अहिल्याबाई यांनी निर्माण केलेले मूळ मंदिर आजही सुस्थितीत बघायला मिळते. 

दरम्यान काशीला दशाश्वमेध घाटही केव्हाच बांधून झाला होता. पण काशीलाच गंगेवर अजून एक मनकर्णिकेचा नवीन घाट बांधण्याचा संकल्प अहिल्याबाईंनी केला होता. मनकर्णिकेच्या घाटाच्या खास कामासाठी बाळाजी लक्ष्मण या कारकुनाची नेमणूक केली आणि पंचवीस हजार रुपयांच्या हुंड्याही काशीला पाठविल्या. अहिल्याबाईंचे कारभारी गोविंदपंत गानू या कामासाठी आश्विन वद्य सप्तमीला म्हणजेच आज, सहकुटुंब काशीला रवाना झाले. त्यांना खर्चासाठी दहा हजार रुपये दिले. विश्वनाथ भट हा ब्राह्मणही  त्यांच्यासह गेला. त्याला तीन हजार रुपये दिले. गोविंदपंत गानू काशीला बांधले जाणारे घाट पाहणार होते. गया येथे जाऊन वास्तुपूजन करणार होते. सोरटी सोमनाथ येथील देवालयही अहिल्याबाईंनी नवीनच बांधून घेतले होते. तेथे दहा हजार रुपयांच्या हुंड्या घेऊन कारकून पाठविला. अशा कामांसाठी अहिल्याबाईंना पैसा कमी पडत नव्हता. याचाच अर्थ असा की, आपल्याजवळची धनसंपत्ती कोठे, कशी वापरली जावी याविषयी त्यांच्या निश्चित काही कल्पना होत्या.

अहिल्याबाईंनी काशीला पाठविलेले बाळाजी लक्ष्मण कारकून मनकर्णिकेचा घाट बांधून होईपर्यंत, काशीतच राहिले. काही महिन्यांनंतर ते काम पूर्ण झाल्याचे त्यांनी कळविले. पंचगंगा वगैरे इतर सर्व घाटांपेक्षा अहिल्याबाईंच्या नावलौकिकाला साजेसा हा घाट सुंदर झाला आहे, असे बाळाजींना वाटत होते. त्यांनी तसे अहिल्याबाईंना कळवले. आता मनकर्णिकेच्या घाटावर आपल्याकडील चौघडा आणि घड्याळ असावे म्हणजे शोभून दिसेल, असे बाळाजींच्या मनात होते. बाळाजीपंतांनी अहिल्याबाईंना लिहिले, “मनकर्णिका काशी पुराणात उत्कर्ष असता येथील काम ईश्वराने आपल्याकडून करवून यश आपल्यास आले. ही मोठी पुण्याची गोष्ट झाली. मनकर्णिकेच्या घाटावर आपल्याकडील चौघडा व घड्याळ असल्यास उत्तम होईल.”

बाळाजी लक्ष्मण हे केवळ सांगकामे नव्हते. योजलेल्या कार्याचा ते समग्र विचार करू शकत होते. मनकर्णिकेचा ग्रंथ संदर्भ त्यांना माहिती होता. पैसा खर्च करताना आपल्या स्वामिनीचा अग्रक्रम कोणता असू शकतो याची त्यांना पूर्ण कल्पना होती. अहिल्याबाई कार्यासाठी माणसे अशी अचूक हेरत होत्या, हे त्यांच्या कर्तृत्वाचे रहस्य होते.

अहिल्याबाई यांचे कार्य तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा ज्ञानवापी मशीद जिथे उभी आहे, तिथे पुन्हा एकदा काशीविश्वेश्वर प्रस्थापित होईल. अहिल्याबाई होळकर यांचे कार्य सर्वार्थाने अतुलनीय आहे. धर्माची पताका जर न घाबरता न डगमगता आपल्या खांद्यावर पुढे नेली, तर आपले नाव, आपले कर्तृत्व अजरामर होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. 

सर्वेश फडणवीस

#नवनवोन्मेषशालिनी  #नवरात्र #लेखमाला #दिवसआठवा

Tuesday, October 8, 2024

⚜️ *नवनवोन्मेषशालिनी : अहिल्याबाईंची दैनंदिनी*

उदंड कीर्ति मिळवणाऱ्या तेजस्वी अहिल्याबाईंचे सांसारिक जीवन म्हणजे केवळ उन्हाळा होता. गौतमाबाई आणि मल्हारराव त्यांना पोरके करून निघून गेले, मालेरावांचा भीषण मृत्यू झाला. खंडेराव तर कधीच निघून गेले. खंडेरावांच्या नऊ सती, मल्हाररावांच्या दोन सती, मालेरावांच्या दोन सती, अशा तेरा स्त्रियांना सती जातांना त्यांनी पाहिलं. मुक्ताबाईला एकच मुलगा नथू. हा एकच नातू पण त्यालाही क्षयरोगाने ग्रासले होते. कधी ताप, कधी खोकला. वैद्याचं संशोधन त्याच्या कामी येत नव्हते. मुक्ताबाई तर जणू मातृसेवेसाठीच जन्मली होती. अहिल्याबाई याना तिचाच फक्त आधार होता. मुक्ताबरोबर अहिल्याबाईंच्या सांसारिक उन्हाळ्यात थोडा गारवा होता.
 
अहिल्याबाई सूर्योदयापूर्वी उठत असत. मग भूपाळ्या, देवांची विशेषकरून शंकराची पूजाअर्चा सर्व परंपरेप्रमाणे चालत असे. नंतर ठरावीक वेळ पोथ्यापुराणांचे, धर्मग्रंथाचे श्रवण. मग त्या स्वत:च्या हाताने भिक्षा घालत. बऱ्याच ब्राह्मणांना अन्नदान केले जाई. त्यानंतर लगेच भोजनाची वेळ होत असे. त्यांचे जेवण शाकाहारी होते. वास्तविक त्यांच्या जातीत मांसाहार रूढ होता. पण अहिल्याबाईंनी कधीही मांसाहार केला नाही. भोजनानंतर घटकाभर विश्रांती. मग अहिल्याबाई दुपारी दोन वाजता दरबाराला हजर होत असत. ते कामकाज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालत असे. त्यानंतर दोन ते तीन तास पुन्हा धर्मकर्म. रात्रीचे अगदी बेताचे भोजन. रात्री पुन्हा ९ ते ११ दरबाराचे काम. नंतर निद्रा. उपासाचे दिवस, उत्सव किंवा आजूबाजूला काही गडबड झाली तरच यात फरक पडत असे.

अहिल्याबाई कुणाचा निष्कारण अनादर करीत नसत. अनादर करणे, अपमान करणे हे पाप आहे, असे त्या मानीत कोणत्याही अधिकाऱ्यांनी प्रजेचा अपमान करू नये कारण प्रजेसाठी आपण आहोत हे त्या पुन्हा पुन्हा सांगत. प्रजेशी अनुचित व्यवहार आणि असत्य भाषण हीच त्यांच्या संतापाची कारणे होती. त्यांचा प्रजेशी व्यवहार कशा तऱ्हेचा होता त्याचे काही नमुने पाहिले की त्यांच्या बुद्धिची झेप लक्षात येते. अहिल्याबाईंचे संबंध प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे, प्रेमाचे होते. पक्षपात, भेदभाव, कपटकारस्थान या कशालाही थारा नव्हता. पांढरीशुभ्र साडी, भव्य कपाळ, टपोरे पाणीदार डोळे, सावळासा तेजस्वी रंग अशा अहिल्याबाई बोलू लागल्या की, सिद्ध योग्याच्या मंत्रासारखे त्यांचे शब्द येत. तेज, माधुर्य आणि शांती यांचा मिलाफ त्यांच्या नजरेत होता. 

साधारणपणे १७६७ ला अहिल्याबाईंचा राज्यकारभार सुरू झाला. चारपाच वर्षे झाली तरी पैशांची घडी बसत नव्हती. मालेरावाने केलेली उधळण भरून येत नव्हती. तशातच तुकोजीचा हिशोबाचा व्यवहार चोख नव्हता. मिळालेल्या लुटीची हिस्सेवारी जमा करणे, फौजेचा खर्च, इंदोरचा खजिना ही सर्व शिस्त, तुकोजीला लावायची हीच वेळ होती. तोच पुण्याहून दुःखद वार्ता आली. श्रीमंत माधवराव पेशवे याचा मृत्यू झाला होता आणि रमाबाईसाहेब सती गेल्या होत्या. तो धक्का अजून संपलाही नाही तोवर नारायणराव पेशव्यांचा खून झाला. पुणे येथे अनर्थावर अनर्थ घडू लागले. रघुनाथरावांनी त्यांना स्वतःला पाठिंबा द्यावा अशी गुप्त पत्रे सगळीकडे पाठवल्याचे कळताच या तेजस्वी स्त्रीने सर्वांस ताकीद दिली की, “द्रव्यमोहाने दादासाहेबांना उर्फ रघुनाथरावांस कुणी आसरा दिल्यास गादीशी द्रोह समजून कडक शासन केले जाईल. मागून सफाई चालणार नाही याची फौजबंद सरदारांनी पक्की जाण ठेवावी. घरभेद्यास ठेचून टाकले जाईल. त्या कामी ढिलाई होणार नाही हे समजून असावे.”

अहिल्याबाई स्वतः डोळ्यात तेल घालून गुप्तहेरांच्या बातम्याकडे लक्ष देऊ लागल्या आणि रघुनाथरावास कळवले की,'आपली बदनियत आम्ही कधीच जाणली. आता तर खूनखराब्यापर्यंत मजल गेली. श्रीमंत नारायणरावास राखू शकला नाहीत. आपण धनीपण गमावले आहे. आलात तसे माघारी जावे. नर्मदा ओलांडल्यास खणाखणी होईल.' या तेजस्वी स्त्रीने त्यांना नर्मदा उतरू दिली नाही. अशा या सत्ताधारी स्त्रीचा चारी दिशांना पसरणारा नावलौकिक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. 

सर्वेश फडणवीस

नवनवोन्मेषशालिनी  #नवरात्र #लेखमाला #दिवससातवा

Monday, October 7, 2024

⚜️ *नवनवोन्मेषशालिनी : अहिल्याबाईंच्या लढाया*


अहिल्याबाईंच्या एका बाजूला सतत पाहुणे- आगतस्वागत मेजवान्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला सतत लढाया- चढाया - कारवाया आणि अहिल्याबाई त्यात सतत गुंतून राहत होत्या. अहिल्याबाई  जितक्या मृदू होत्या तितक्याच त्या कठोर देखील होत्या. त्यांच्या चरित्रात असे अनेक प्रसंग आलेत ज्यात त्यांनी काहीवेळा अत्यंत शांतपणे आणि कठोरपणे निर्णय दिले अशाच या घटना आहेत. 

एकदा बळीभद्रराजाचे वकील होळकरांकडे आले. खेचीवाडा प्रांतावर बळीभद्रसिंग राजाचा अंमल होता. होळकरांचे देणे देऊन टाकण्यासाठी, बळीभद्रसिंगाने गुगरछबडा हा महाल खंडाने होळकरांना दिलेला होता. बऱ्याच दिवसांनंतर “तुम्हांला तुमच्या खंडणीचा ऐवज एव्हाना मिळालेला आहे. आता आमचा महाल सोडावा,” वकील म्हणाले. आम्ही महाल सोडत नाही,” अहिल्याबाईंनी वकिलांना उत्तर दिले. “असे कसे? हिशोब नीट पहावे. आमचा ऐवज बाकी आहे. त्याचा फडशा झाल्याखेरीज आम्ही जाणार नाही आणि वकील निघून गेले. 

त्यानंतर बळीभद्र राजाने सरळ गुगरछबडा महालावर स्वारी केली आणि तो ताब्यात घेतला. होळकरांची आसपासची इतरही ठाणी घेतली. ही बातमी महादजी शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली. खंडणी देणाऱ्या खेचीच्या राजाची ही हिंमत? शिद्यांची दहा हजार फौज दौडत गेली. त्यांनी बघता बघता गुगरछबडा ताब्यात घेतला. बळीभद्र राजाने घेतलेली इतर सर्व ठाणीही परत होळकरांच्या कबजात आणली. खेची बळीभद्रसिंग राघोगडाला पळून गेला. महादजींचा एक अंदाज होता की, शरणागती पत्करून तो अहिल्याबाईंना भेटण्यास येईल. बाई दया दाखवतील. म्हणून महादजी शिंदे यांनी आधीच अहिल्याबाईंना कळवले, “बळीभद्रसिंग खेची महेश्वरी आल्यास त्याला अटकावून ठेवणे आणि आमच्या माणसांच्या ताब्यात देणे.” महादजींचा अंदाज अचूक ठरला. खेचींकडून वाडवडिलांपासून होळकर आणि खेचींचा घरोबा होता. या समयी त्यात अंतर पडले हे खरे. चूक झाली. त्याची शिक्षाही मिळाली. 

अहिल्याबाईंना वाटले, अधिक ताणू नये हे योग्य. पण त्यांनी त्याला अटकावून निर्णय महादजींवर सोपवला. त्यांनी महादजींना सल्ला मात्र दिला की, 'खेचींना क्षमा करावी हेच बरे' शेवटी निर्णय काय झाला याची नोंद उपलब्ध नाही. गुन्हेगारांना शिक्षा करतांना अहिल्याबाईंचा दृष्टिकोन उदार होता हे अनेक ठिकाणी जाणवते. माणूस दुवर्तनापासून परावृत्त होण्यासाठी त्या कडक पाऊले उचलत असत पण माणसाचे आयुष्यभराचे नुकसान त्या कधीही करीत नसत. 

असेच एकदा अहिल्याबाईंचा प्रभाव कमी करण्यासाठी हितशत्रूंनी एक षड्यंत्र रचले. त्यांचे खाजगीतले कारभारी नारो गणेश यांना तुकोजीचा कारभारी नेमले आणि अहिल्याबाईंचे विश्वासपात्र कारभारी शिवाजी गोपाळ यांची नियुक्ती पेशवे दरबारात करवून घेतली. या सर्व बदल्यांसाठी पेशव्यांना एक लाख रुपयांचा नजराणा देण्यात आला. हे सर्व अहिल्याबाईंना कळताच यामागील षड्यंत्र त्यांच्या त्वरित लक्षात आले. त्यांनी आपली इंदूर येथील राजधानी त्वरित महेश्वरला हलवली आणि आपल्या विश्वासातले कारभारी नेमले. आपल्या शेजारी राज्यांना आपले मित्रराज्य करून ठेवणे हे अहिल्यादेवींचे तत्त्व होते. शेजारी राज्यात काही आपत्ती आल्यास, त्याचा उपाय शोधायला त्या सदैव तयार असत. ते आपले कर्तव्य आहे असे त्या मानीत.

एकदा खर्डा येथे निजामाची आणि पेशव्यांची धूमसाम लढाई झाली. पेशवे यांचा विजय झाला. तहाची कलमे फार फायद्याची ठरली. निजामाने केलेल्या कृत्याची किंमत त्याला मोजायला लागली. पाचकोटी रक्कम तीन वर्षात द्यावी. तीस लक्षाचा मुलूख आणि दौलताबादचा किल्ला मिळाला. निजामाने कबजात घेतलेले सर्व इलाखे त्याला परत करावे लागले. अहिल्याबाईंना आनंद देणारी गोष्ट म्हणजे, यशवंतराव होळकर आणि बापू होळकर यांनी खूप पराक्रम गाजवला. काशीराव होळकरने तोफखाना सांभाळला. होळकरांच्या फौजांनी नबाबास जेरबंद केले. अहिल्याबाईंना अत्यंत आनंद झाला तो याचा की पेशव्यांनी होळकरांचे निशाण अग्रभागी मिरवले. अहिल्याबाईंना ध्यास होता तो हाच की, आपली माणसं, आपलं घराणं, आपली गोळाबारूद, आपलं सैन्य पेशव्यांच्या उत्कर्षासाठी त्यांच्या विजयासाठी वापरलं जावं. त्यांची निष्ठा अशी लाखमोलाची होती. यासाठीच त्यांच्या राज्यातील किल्ल्यांवरही सैन्य सज्ज असे. 

अहिल्याबाईंचे धोरण कायम साम्राज्य वाढवण्याचे नव्हते. त्यामुळे कोणाच्याही सीमांवर त्यांनी आक्रमण केले नाही. दुसऱ्यांची राज्ये मिळायचे मनसुबे रचले नाहीत. युद्धामुळे होणाऱ्या अपरिमित हानीची, दूरदर्शी अहिल्याबाईंना पुरेपूर कल्पना होती. युद्धे टाळण्याचा त्या सदैव प्रयत्न करीत. पण युद्ध लादले गेलेच तर मात्र, त्या साक्षात रणचंडिकेचा अवतार धारण करून, युद्धसामान सज्ज करून पाठवीत. त्या युद्धात निपुण तर होत्याच; पण युद्धव्यवस्था चोख ठेवण्याचे त्यांच्यात सामर्थ्य होते.

#नवनवोन्मेषशालिनी  #नवरात्र #लेखमाला #दिवससहावा

Sunday, October 6, 2024

⚜️ *नवनवोन्मेषशालिनी : अहिल्याबाईंचा राज्यकारभार*

भारत देशाला प्राचीन कालखंडापासून अनेक कर्तबगार स्त्रियांचा वारसा लाभला आहे. या महिला नुसत्या कांतिमान नाहीत, तर स्फूर्तीदात्या आहेत. काहींनी थोर पुरुषांना जन्म दिला व त्यांच्या कर्तृत्वाची उभारणी केली, तर काहींनी प्रत्यक्ष तलवार गाजवून स्फूर्ती दिली. तर काहींनी आदर्श प्रशासन व राजकारण करून, कल्याणकारी राज्याची उभारणी केली. प्रत्येकजण आपापल्या परीने श्रेष्ठ होत्या. अहिल्याबाई होळकर सर्वगुणसंपन्न उत्तम प्रशासक होत्या. आपल्या २८ वर्षांच्या राज्यकारभारात अनेक प्रसंगी त्यांची परिक्षा पाहिल्या गेली पण मुत्सद्देगिरीने त्यांनी त्यावर मात केली आणि अहिल्याबाईंचा कारभार संपूर्ण हिंदुस्थानात नावलौकिक मिळवत होता त्यातीलच या घटना..

पेशवे सरकारने खंडेरावाच्या उत्तरक्रियेसाठी दहा हजार रुपये मंजूर केले. सूरजमल जाटानेही मल्हाररावांच्या रागाला घाबरून पंधरा गावे दिली. अहिल्याबाईंनी कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मृतीप्रित्यर्थ छत्री उभारली आणि जाटाने दिलेल्या पंधरा गावांचे उत्पन्न त्या छत्रीच्या खर्चासाठी बहाल करून टाकले. मल्हारराव तर खचून गेले होते. देशात सर्वत्र पुन्हा अशांतता माजू लागली. त्यांना स्वस्थ बसणे शक्य नव्हते. मल्हारराव जाटांविरुद्ध झुंज घेत होते. वर्ष असेच सरले.

वर्षश्राद्धासाठी आलेले लोक अहिल्याबाईंच्या सती न जाण्याची चर्चा करीत राहिले. त्यावेळी मात्र मल्हाररावांनी रुद्रावतार धारण केला. म्हणाले, "अहिल्याबाईंना आम्ही सती जाऊ दिलं नाही. यापुढे याविषयी कुणी शब्दही बोलाल तर, जिभेसकट त्या माणसालाच आग लावून टाकेन." मल्हारराव आणि गौतमाबाई समर्थपणे अहिल्याबाईंच्या पाठीशी उभे राहिले.

अहिल्याबाई कामकाज बघू लागल्या. पांढऱ्या घोंगडीवर शुभ्रवस्त्रे नेसून अलंकारविरहित अशा अहिल्याबाईंना बघून माणसं कासावीस झाली. मल्हारराव पुन्हा मोहिमा गाजवू लागले. सायनूरची लढाई झाली. दहालक्षाचा मुलूख काबीज केला. अहिल्याबाई इंदोरहुन पत्राबरहुकूम सारी व्यवस्था करीत होत्याच. त्याचवेळी नजरबाजांकडून भिल्लांच्या उपद्रवाच्या बातम्या येत होत्या. भिल्ल यात्रेकरूंवर हल्ले करीत. त्यांची लूट करीत. या लुटीला सरंजामदारांची साथ आहे. ते लुटीतला हिस्सा घेतात, हे कळलं अन् अहिल्याबाई संतापून उठल्या. त्यांनी सर्व सरदारांना पत्रे लिहिली. लिहिले की, "सर्व सरंजामदारांना ताकीद देण्यात येते की, कुणाचाही भिल्लांशी संबंध आहे असे कळले तर सरंजामी रद्द करण्यात येईल. मग सबबी ऐकल्या जाणार नाहीत. वाटा वाटांवर गस्ती फौज ठेवा. सहा स्वारांचं पथक असावं. त्यांचे काम एकच,वाटसरूंना पुढील गस्ती फौजेच्या स्वाधीन करावं त्यांनी पुढच्या गस्तीपथकापर्यंत यात्रेकरूंना संरक्षण द्यावं. तशी नाकी आणि ठाणी बांधून घ्या!”

इतकेच करून दूरदर्शी अहिल्याबाई थांबल्या नाहीत तर त्यांनी राज्यात जाहीर केले की, "जो भिल्लांचा उपद्रव नाहिसा करेल त्याच्याशी कन्या मुक्ता हिचा विवाह करून देण्यात येईल!" त्या काळात हे केवढे धारिष्ट्य होते याची आज कल्पनाही येणार नाही. अहिल्याबाई यांचा मुलगा मालेराव तर दुर्गुणीच होता, निदान जावई शूर मिळावा आणि भिल्लांचा उपद्रवही थांबावा या दुहेरी हेतूने केलेली ही योजना म्हणजे अहिल्याबाईंच्या तेजाची एक शलाकाच होती. त्या म्हणत, "ज्या मातीत धार्मिक यात्रेकरूस वा सामान्य प्रवाशास लुटारूस तनधन देणे पडते, त्या मातीचा दुलौकिक चारही दिशा जाणार. दगाबाज भिल्लांचा पुरता बीमोड करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे."

दरम्यान मल्हारराव आले ते मालेरावांची सोयरीक ठरवूनच. बहाड घराण्यातल्या मैना नावाच्या मुलीशी मालेरावांचा विवाह ठरणार होता. या वार्तेने अहिल्याबाईंना मुळीच आनंद झाला नाही. बहाडांच्या घरची मंडळी मैनेस घेऊन आली. अहिल्याबाईंनी मैनेच्या आईवडिलांना एकांतात बोलावले आणि स्पष्ट सांगितले की, "आपली कन्या चंद्राचे बिंब. पण माझ्या काही उणीवा स्पष्ट करणे माझ्या दैवी आहे. देणे-घेणे म्हणाल तर सुतळीच्या तोड्याचीही अपेक्षा नाही, पण बेलभांडार हाती घेऊन सांगते की, मालेराव फार व्रात्य, टवाळ, चहाडखोर आहेत. आम्हाला जुमानित नाहीत. घुटीची गोळी घेऊन नशा करतात, रागाचे आहारी जाऊन चाबूक उठवतात. ब्राह्मणांचे पाठी विंचू-साप सोडतात. अवघा क्रूरपणा. मातृप्रेमास मात्र तिला इथे उणे नाही" आपल्या मुलाच्या दुर्गुणांचा पाढा त्याच्या भावी सासुसासऱ्यांपुढे वाचण्याची हिंमत त्यांच्यात होती. सत्यप्रियता हा त्यांच्या देहाचा जणु कणाच होता. मालेरावचे लग्न मैनाशी झाले त्याचवेळी मुक्ताच्या लग्नाचा 'पण' कानोकानी गेला.

अहिल्याबाईंना शांतता नव्हती. अबदाली सरहिंदवरून निघाल्याची वार्ता, लाहोरची लुटालूट हे सारं ऐकून त्या अस्वस्थ होत्या. अबदालीने मथुरा वृंदावनात मुंडक्यांच्या राशी घातल्या. यमुना लाल झाली. अहिल्याबाईंनी जाणले की हिंदूंना चिरेबंद आश्रयस्थाने हवीत. त्यांनी ठिकठिकाणी धर्मशाळा बांधून घेतल्या. अहिल्याबाईंच्या समजदारीला तोड नव्हती. इतिहासात त्यांच्या चातुर्याचे, दूरदृष्टीचे अनेक दाखले आहेत. अहिल्याबाई म्हणजे सद्गुणांचे भांडार होत्या. या साऱ्या कथांना इतिहासात आधार आहे. अहिल्याबाईंनी इंदूरात तोफांचा कारखाना उघडला. त्या स्वतः तिथे जात. रणगाडे, गोळ्या यांच्यावर त्या स्वतः नजर ठेवीत. आजच्या पिढीला त्यांची ओळख एक धार्मिक स्त्री इतकीच आहे. म्हणूनच अहिल्याबाईंचा राज्यकारभार व्हावा यासाठी हा पैलू मांडला आहे आणि इतिहासात याचे दाखले व पुरावे पानोपानी आहेत.

हे कर्मयोगिनी । जयतु अहिल्या माता ।
युगो युगों तक अमर रहेगी । यश कीर्ति की गाथा ।।

सर्वेश फडणवीस

#नवनवोन्मेषशालिनी  #नवरात्र #लेखमाला #दिवसपाचवा

Saturday, October 5, 2024

⚜️ *नवनवोन्मेषशालिनी : खंडेरावांची उत्तरक्रिया*

अहिल्याबाईंच्या चरित्रातील हा टप्पा अत्यंत विचार करायला लावणारा आहे. त्याकाळी असलेल्या परिस्थितीत अहिल्याबाई यांनी जो क्रांतिकारी बदल घडवला तो अद्भुत असाच होता. खंडेराव कुंभेरीच्या लढाईत मारले गेले आणि अहिल्याबाईंचा अनावर शोक बघून मल्हारराव घाबरून गेले. सगळे सरदार, 'खंडेरावाचा अंत्यविधी करायला हवा' असं सांगून मल्हाररावांना सावध करत होते.

खंडेरावांच्या नऊ बायकांना इंदोरहून आणण्यात आले. त्या सगळ्या जणी सतीवस्त्रे नेसून उभ्या होत्या. अहिल्याबाईंनीही सती जायचा निर्धार जाहीर केला. त्याही सतीवस्त्रे नेसून, मळवट भरून उभ्या राहाताच मल्हाररावांच्या दुःखाला पारावार राहिला नाही. ते अहिल्याबाईंच्या पुढे डोई घासत म्हणाले,

“मुली, अहिल्या मेली आणि खंडू जिवंत आहे असे मी समजेन, पण तूं सती जाऊं नकोस. माझं ऐक. " हृदयाचे पाणी करणाऱ्या ह्या शब्दांनी मल्हारराव पुत्रनिधनानंतर आपल्या सुनेची समजूत घालीत होते. ही गोष्ट इ. स. १७५४ मध्ये घडली. पेशव्यांचा भाऊ राघोबा ( रघुनाथ ) याने कुंभेरीचा किल्ला घेतला. या मोहिमेंत मल्हारराव त्यांच्या मदतीला गेले होते. लढाईत मल्हाररावांचा मुख्या मारला गेला. या वेळीं अहिल्याबाईही त्यांच्याबरोबर होत्या. खंडूजी मल्हाररावाचे एकुलते एक पुत्र असल्यामुळे त्यांना पुत्रनिधनाचा फार मोठा धक्का बसला. या वेळीं अहिल्याबाईचें वय अवघें वीस वर्षांचे होते.

पुत्राचा अपमृत्यू बघायची दुर्दैवी वेळ तर त्यांच्यावर आलीच होती परंतु कर्तबगार अशा सुनेनं सती जायची तयारी केलेली बघून त्यांच्या हृदयाचा ठाव सुटला. अहिल्याबाईंना राज्यकारभाराचे सर्व पदर त्यांना पुत्राच्या जागी मानूनच शिकवले. त्या तेजस्वी स्त्रीने हा सारा राज्यकारभार, त्यातल्या खाचाखोचा,तडफदारपणे शिकून घेतल्या. अहिल्याबाई कुटुंबाच्या आणि राज्याच्याही आधारस्तंभ झाल्या होत्या. हा आधारच आता कोसळणार होता. मल्हारराव दुःखाने खचून गेले. " मुली, कष्टाने मिळवलेल्या या राज्याचा, या प्रजेचा विचार कर." तेथे उभे असलेल्या नातलगांनी मल्हाररावांचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला. अहिल्याबाई म्हणाल्या, "मामंजी, पतिव्रतेने सतीच जायचे असते ना? मी सती गेले नाही तर माझ्या धर्माची चेष्टा होईल, माझी अपकीर्ति होईल, मला सती जाऊ द्या!"

"पोरी, हे राज्य तुझ्या मदतीने नावारुपास आले. आपण जे घडवावे ते प्राणपणाने रक्षावे हे तुझंच वाक्य! माझं पुण्य संपलं का पोरी ?” मल्हारराव ढसाढसा रडू लागले. तोवर गौतमाबाईंनी अहिल्येला मिठी घातली. म्हणाल्या, "अग, तू माय आहेस या घराची! या झेंड्याची लाज राख! भीक घाल या म्हाताऱ्यांच्या पदरात!" इकडे चिता रचली गेली. खंडेरावांचं प्रेत ठेवलं गेलं. त्यांच्या नऊ बायका चितेकडे निघाल्या. अहिल्येने सर्वांच्या पायावर डोकं ठेवलं. हात जोडले, म्हणाली, "स्वामी, माझ्या निष्ठेची शपथ. आजपासून सारे अलंकार, रंग, उपभोग या चितेत टाकते. आजपासून फक्त शुभ्र वस्त्रे नेसेन. यापुढील आयुष्य प्रजेसाठी, राज्यासाठी!" अहिल्याबाईंनी सर्व अलंकार शेल्यात बांधून चितेवर ठेवले. चिता धडधडून पेटली. सगळा आसमंत सतीच्या किंकाळ्यांनी भरून गेला. सती न जाण्याचा विचार पक्का केल्यानंतर त्यांनी आपले सर्वस्व राज्य कारभारांतच खर्च करण्याचें ठरविलें. त्यांची जन्मतः असलेली धार्मिक वृत्ती आयुष्यांतील दु:खामुळे वाढतच गेली.  दिवसाचा बराच वेळ त्या पूजा-अर्चा, ध्यान, चिंतन आणि पुराणश्रवण यांत घालवत असत.

डेऱ्यात आल्यावर मल्हारराव म्हणाले, "आजपासून तुम्ही आम्हाला पुत्राच्या जागी. यापुढे तुम्हाला एकेरी हाकारणे नाही. आमच्या वस्तीला वणवा लागला. वीज कोसळली. पण तुमच्यासारखे एक अनमोल रत्न आम्ही वाचवले. तुमच्या पतिव्रताधर्माच्या आड आलो, त्याचा जबाब ईश्वराच्या दरबारात देऊ आम्ही!" आणि मल्हाररावांनी अहिल्याबाईंना बहुमानार्थी संबोधने वापरायला सुरवात केली.

मल्हारराव स्वर्गवासी झाल्यानंतर मालेरावांकडे औपचारिकरीत्या सुभेदारी आली. परंतु त्याच्या अंगांत कुवत नसल्यानें प्रत्यक्षांत सर्व राज्यकारभार अहिल्याबाईच पाहत होत्या. पेशव्यांना त्यांच्या वकुबाची पूर्ण कल्पना असल्यामुळे मालेरावांच्या निधनानंतर त्यांनी संस्थानची प्रमुख म्हणून अहिल्याबाई यांनाच मान्यता दिली. स्वतःच्या सूक्ष्म निरीक्षणानें मराठी राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या सर जॉन माल्कमनें अहिल्याबाईसंबंधीं असें म्हटलें आहे कीं, "त्यांची अंतर्गत राज्यव्यवस्था आश्चर्य वाटावी इतकी नमुनेदार होती. त्यांच्या मर्यादा लक्षांत घेऊन असें म्हणावेसें वाटतें कीं ती एका विशुद्ध मनाची आणि आदर्श राज्यकर्ती होती."

सर्वेश फडणवीस

#नवनवोन्मेषशालिनी  #नवरात्र #लेखमाला #दिवसचौथा

Friday, October 4, 2024

⚜️ *नवनवोन्मेषशालिनी : सद्गुणी अहिल्याबाई*

अहिल्याबाई होळकरांचं अवघं चरित्र विस्मयकारक आहे. काही काही व्यक्तींना लहानपणापासून त्यांचं जीवनध्येय सापडलेले असते. खरंतर अशांचीच चरित्रे लिहिली जातात की ज्यांनी काहीतरी अलौकिक केलं आहे, जे सत्याला सामोरे गेलेत, ज्यांनी चोख न्याय केला, ज्यांनी दुर्बळांची पाठ राखली, ज्यांनी सत्ताधिशांना त्यांच्या चुका दाखवल्या, ज्यांनी इतरांचा पैसा विषसमान मानला. अहिल्याबाईंनी या साऱ्यासाठी आपल्या आयुष्याचा क्षणक्षण वेचला. विवाह करुन आलेल्या अहिल्येच्या अंगी काही वेगळे पाणी आहे, हे मल्हारावांनी ओळखले. तेव्हाही कमी संख्येने पण काही स्त्रिया चांगले राज्यकारण करत होत्या. पण अहिल्याबाईं इतका अमिट ठसा कुणाचा उमटला नाही याला अनेक कारणे आहेत. त्यातीलच या घटना..

एकदा फडनिशीत हिशोब बघता बघता त्यांना पति खंडेरावांचे खाते दिसले. त्याचा वर्षाचा तनखा दोन महिन्यातच संपला होता. आता जर पति खंडेराव पैशांसाठी आले तर त्यांना नकार द्यावा लागणार होता. अन् तो प्रसंग आलाच. नशापाणी केलेले खंडेराव अहिल्येसमोर उभे होते. अहिल्येने पैसे देण्यास नम्रपणे नकार देताच ते म्हणाले, "मला पैसे हवेत, सल्ला तर मुळीच नको. हवेत ते पैसे अन् ते आम्ही नेणारच. बघुया तुम्ही आमचे काय करता ते!" त्यावर अहिल्याबाई शांतपणे म्हणाल्या, "मी जे काय करावे ते दौलतीच्या, राज्याच्या हिताचे करावे, अशी मामंजींची आज्ञा आहे. आपल्या नांवे रुपये नाहीत. अर्थात आपली सेवा होऊ शकणार नाही." हे ऐकताच खंडेरावांनी अहिल्यादेवींसमोरची हिशोबाची वही घेतली अन् कोपऱ्यात भिरकावली. अहिल्याबाईंच्या डोळ्यातून ठिणग्या उडू लागल्या. त्या संतापून कारभारी गंगोबातात्यांना म्हणाल्या, "तात्या, खतावणीची बेअब्रू करणाऱ्याचा जबाब लिहून घ्या, अन् त्यांना पंचवीस मोहरांचा दंड ठोका. वसूल करून घ्या, आम्ही सुभेदारीत जातो." मागे वळूनही न पाहाता अहिल्याबाई तिथून निघून गेल्या. गंगोबातात्या थक्क झाले. 'असे तेज पाहिले नाही' असे शब्द त्यांच्या मुखातून निघून गेले. प्रत्यक्ष पतीलाही दंड ठोकून वसूल करणारी कठोर शिस्तीत राज्यकारभार राबवणारी अशी होत्या अहिल्याबाई.

एकदा अहिल्याबाई फडणिशीत गेल्या तोच सांडणीस्वार पत्र घेऊन आला. त्यात फार दुःखद वार्ता होती. श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा नर्मदातिरी मृत्यू झाला होता. बाजीरावांचे प्राण जाताच त्यांचा आवडता हत्ती आणि कुत्रा टाहो फोडत मरून गेले. सगळे राज्य शोकात बुडाले. मल्हारराव आले ते हृदय फुटल्याप्रमाणे रडत राहिले. बाजीरावांना परलोकी शांती लाभावी म्हणून ब्राह्मणांना दाने दिली गेली. वस्त्रे, मुद्रा यांचे दान, धर्मकार्ये यांच्यावर भरपूर खर्च झाला. काही दिवसांनी अहिल्याबाई हिशोब तपासायला बसल्या तेव्हा धर्मकार्याचा सर्व खर्च सरकारी खर्चात टाकलेला बघून चकित झाल्या. त्यांनी गंगोबातात्यांना हाक मारली. म्हणाल्या, "तात्या, आपण थोर. बाजीराव श्रीमंतांच्या मुक्तिसाठी केलेल्या विधींचा खर्च आपण सरकारी तिजोरीवर टाकला? अहो काय म्हणावे याला?" गंगोबातात्या चाचरत म्हणाले, "बाईसाहेब, श्रीमंतांच्या पारलौकिक शांतीसाठी त्यांच्या सुभेदाराने केलेली कार्ये... म्हणजे ती सरकारीच नव्हे काय? मग ती खाजगी खर्चात कशी टाकावी?" यावर तेजस्वी, निर्लोभी, अहिल्याबाई म्हणाल्या, "तात्या, मामंजी काय फक्त सुभेदारच होते? अहो नाती काय फक्त रक्तातूनच येतात? काही नाती जिवाशिवाची, त्याची मोजमापे कशी घ्यावी? मामंजी आठ दिवस अन्नाला शिवले नव्हते, बाजीराव मामंजींचे शपथबंधू होते. तात्या, हा सर्व खर्च खाजगी खर्चाकडे टाका. यापुढे ही गोष्ट खंबीरपणे पाहा. कुठल्याही प्रकारच्या खाजगी खर्चाची पैसुद्धा सरकारी तिजोरीतून येता कामा नये, याची पक्की जरब ठेवा. खाजगीतून एखादे सरकारी काम झाले तर ते आम्हास चालेल पण खाजगी कामासाठी पैचा एक हिस्साही सरकारवर पडता कामा नये यासाठी पंचागे सावध रहावे." अहिल्याबाईंच्या स्वराला तिखट धार होती. त्यांचा धाक जबर होता. सोसायला जड होता.

प्रजेच्या सुखासाठी अहिल्याबाई सदैव जागरूक होत्या. विधवांचा, स्त्रियांचा छळ करणाऱ्यांना क्षमा नव्हती. खाजगी खर्चाच्या पैचाही भार सरकारी तिजोरीवर पडू नये यासाठी त्या डोळ्यात तेल घालून दक्ष राहात. अशा अहिल्याबाई प्रजाहितदक्ष आणि सदैव जागरूक होत्या. म्हणूनच सद्गुणांची खाण अशी ख्याती अहिल्याबाईंची होती.

राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची राणी
अजून नर्मदाजळी लहरती तिच्या यशाची गाणी ..

#नवनवोन्मेषशालिनी  #नवरात्र #लेखमाला #दिवसतिसरा

Thursday, October 3, 2024

⚜️ नवनवोन्मेषशालिनी : अहिल्येचा गृहप्रवेश

गौतमाबाई आणि मल्हारराव यांचा संसार सुरू झाला. मल्हाररावांचे शौर्य चारी दिशांना तळपत होते. त्यांना उसंत नव्हती. अनेक चढाया, युद्धे यातून त्यांच्या शौर्याच्या कथा पुढे येत होत्या. गौतमाबाईंना पुत्र झाला आणि सगळीकडे आनंदीआनंद पसरला. त्याला आजोबांचे खंडेराव हेच नांव ठेवण्यात आले. खंडेराव हळूहळू मोठे होऊ लागले. त्याच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली. पण या मुलाची लक्षणे विपरीत होती. राज्यकारभार, लढाया, घोडे वगैरेमध्ये त्यांना अजिबात रस नव्हता. ते अतिशय भांडकुदळ, उद्धट, तापट होते. तारुण्यात पदार्पण केल्यावर तर दुर्गुण अधिकच उसळू लागले. नशापाणी करण्याचं व्यसन लागलं. त्यांची राहाणी फारच डामडौलाची असे. आचारविचार मात्र हीन होते. त्यांचे शौर्य अशाप्रकारे वाया जात असलेले बघून मल्हारराव दुःख, चिंतेत बुडून गेले होते. आपल्या पुत्राचे जीवन मार्गी कसे लागेल याची चिंता त्यांना लागली.

एकदा बाजीरावांबरोबर लढाईहून परत येतांना सैन्याचा तळ चौंडी गावातील सीना नदीच्या काठी पडला. नदीकाठी महादेवाचं देऊळ होतं. तिथे अहिल्या आपल्या आईबरोबर दर्शनाला आली होती. मैत्रिणींबरोबर नदीकाठच्या वाळूत शिवलिंग तयार करत होती. शाळुंकेवर वाळूचे लहान लहान गोळे ठेवून नक्षी काढत होती. तोच सैन्यातला घोडा उधळला. मैत्रिणी ओरडल्या 'अहिल्ये, पळ. घोडा उधळला.' मैत्रिणी पळाल्या सुद्धा. पण अहिल्या ? तिने आपले सर्व शरीर त्या पिंडीवर झाकले. भरधाव सुटलेला घोडा अहिल्येच्या बाजूने निघून गेला. त्याचवेळी मल्हारराव अन् बाजीराव धापा टाकत तिथे पोहोचले. तिला संतापाने खसकन् उभे करीत बाजीरावांनी ओरडून विचारले, "पोरी, इथे कां थांबलीस ? उधळता घोडा तुला तुडवून गेला असता तर?" त्यावर मुळीच न घाबरता, आपले तेजस्वी डोळे बाजीरावांच्या डोळ्याला भिडवत ती म्हणाली, "जे आपण घडवावे ते जीवापाड प्रसंगी जीव सांडूनही रक्षण करावे असंच सगळी वडील माणसे सांगतात. मी तेच केले. मी घडवलेल्या पिंडीचे रक्षण केले! माझे काही चुकले का?" त्या तेजस्वी चिमुरडीचे शब्द ऐकून बाजीराव थक्क झाले. तिच्या डोळ्यात विलक्षण तेज होते. बाजीराव मल्हाररावांकडे वळत उत्स्फूर्तपणे म्हणाले, "मल्हारबा या पोरीस तुमची सून करून घ्या. तिला राज्याच्या लायक करा. ही राज्य नांवारुपास आणेल. राज्याचं प्राणपणानं रक्षण करेल. हिचे डोळे रत्नासारखे तेजस्वी आहेत. तुमचा कुळपुत्र खंडेराव त्याला राज्याच्या लायक हीच करू शकेल. हिला सून करून घ्या आणि राज्यकारभाराच्या अनेक पदरांचं शिक्षण द्या."

बीड जिल्ह्यातील,जामखेड तालुक्यातलं चौंडी हे एक लहान गांव. माणकोजी शिंदे आणि सुशीला या मातापित्यांच्या पोटी अहिल्येने जन्म घेतला. तिला दोन भाऊ होते. चौंडीची ही अहिल्या बघताच बाजीराव आणि मल्हाररावांनी तिच्या आईवडिलांची भेट घेऊन अहिल्येला मागणी घातली. थाटात लग्नसमारंभ पार पडला. अहिल्या होळकरांची सून झाली. १७३३ मध्ये हा विवाह झाला आणि अहिल्या भाग्याची सोनपाऊले घेऊनच होळकरांच्या घरात आली. मल्हाररावांचे ऐश्वर्य वाढत चालले. अहिल्येच्या लग्नाबरोबरच तिचे शिक्षण सुरू झाले. लग्न झाले तेव्हा अहिल्या केवळ दहा वर्षांची होती. परंतु मल्हाररावांनी तिच्यातलं तेज, हुशारी जाणून, तिच्या शिक्षणासाठी गुरू नेमले. आपल्या गोड स्वभावाने आणि सेवावृत्तिने ती सर्वांची लाडकी झाली.

मल्हारराव आणि गौतमाबाई आपल्या या सुनेची अपार काळजी घेत. अहिल्येच्या पायगुणाने वैभवाची कमान उंच उंच जात होती. तिची अभ्यासातली प्रगती चकित करणारी होती. सात आठ वर्षातच ती केवळ एका नजरेने हिशोबातली चूक काढू लागली. चौदिशेस घोडेसवारी करू लागली. जिल्हे, तालुके, यांची सर्व माहिती घेतली. रामायण, महाभारत वाचून संपलं. स्तोत्रे तोंडपाठ झाली. रोज फडनिशीत जावे, हिशोब बघावे, वसूल जमा बघावी, त्यासाठी माणसं पाठवावी, न्यायनिवाडे करावे, सरदारांना पत्रे पाठवावी, फौजा तयार ठेवाव्या, खाजगी उत्पन्न आणि सरकारी उत्पन्न रोखठोकपणे वेगळे ठेवावे, मल्हारराव म्हणत, आम्ही तलवार गाजवतो ती सूनबाईच्या भरोशावर. मार्तंडांनेच हे रत्न आम्हास दिले. अवघी वीस-बावीस वर्षांची अहिल्या कुशल प्रशासक होऊ लागली.

१७४५ साली अहिल्याबाईंना पुत्र झाला. त्याचे नांव मालेराव ठेवण्यात आले. राज्यात सर्वत्र आनंदी आनंद झाला. परंतु मल्हाररावांना खंडेरावांच्या वागण्याची खंत वाटे. अहिल्येसारखे रत्न लाभूनही खंडेरावात काहीही फरक पडत नाही हे बघून त्यांना अपरंपार दुःख होई. हळूहळ खंडेराव सुधारेल ही आशाही त्यांनी सोडून दिली. आता अहिल्याबाई हेच त्यांचं आशेचं एकमेव स्थान होते. अहिल्याबाईंची हुशारी, बुद्धिमत्ता यांची पारख त्यांनी केली होती. होळकरांचे निशाण अहिल्यादेवीच उंचावर नेतील याची खात्री मल्हारराव यांना होती. ते अहिल्याबाईंना राजकारण, व्यवहार, देशाची स्थिती, सावधानता, गुप्तहेरांचं महत्त्व, पैशांची व्यवस्था, कारभारातले प्रश्न, खाचाखोचा सारं समजावून देत होते.

अहिल्याबाईंची विलक्षण बुद्धी होती. त्या दिवसेंदिवस समर्थ होत होत्या. मल्हारराव सदैव लढायात गुंतलेले असत. दूरदूरच्या ठिकाणाहून मल्हाररावांची पत्रे येत. अहिल्याबाई पत्रातील आदेश तंतोतंत पाळून, त्यांची चोख व्यवस्था करीत. अहिल्याबाई मल्हाररावांबरोबर रणांगणावरही गेल्याचे इतिहासाने नमूद केले आहे. तिथेही त्यांनी धाडस, साहस आणि रणकौशल्य दाखवून सर्व कार्यात भाग घेतला होता. रणांगणाशी संबंध येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचे त्यांना ज्ञान होते. राज्यकर्त्याने देशात फिरून भूगोल पाहिला पाहिजे, सामाजिक स्थितीचे ज्ञान करून घेतले पाहिजे असं मल्हारराव त्यांना नेहमी सांगत.

एकदा एका महत्त्वाच्या व्यक्तिस काशीला जायचे होते. त्यांची व्यवस्था करण्याची विनंती बाजीराव पेशव्यांनी अहिल्याबाईंना केली होती. अहिल्याबाईंनी त्यांची व्यवस्था केलीच आणि इंदौरपासून काशीपर्यंत वाटेत लागणारी गावे, नद्या, घाट वगैरे तपशीलाचा एक नकाशा स्वतः तयार केला. आपल्या ठिकठिकाणच्या अधिकाऱ्यांना पत्रे दिली. आपल्या पराक्रमी सासऱ्याच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली, त्यांनी सर्व राज्यकारभार नांवारूपास आणला. मालेरावांच्या पाठीवर अहिल्याबाईंना तीन वर्षांनी एक कन्यारत्न झाले. तिचे नांव मुक्ता असे ठेवण्यात आले. अहिल्याबाई नवनवीन शिखरे पादाक्रांत करत होत्या.        
          
सर्वेश फडणवीस
 
#नवनवोन्मेषशालिनी  #नवरात्र #लेखमाला #दिवसदुसरा

Wednesday, October 2, 2024

⚜️ कर्मयोगिनी अहिल्याबाई

आजपासून नऊ दिवस अहिल्याबाई होळकर यांच्या नऊ पैलूंना स्पर्श करणार आहोत. अहिल्याबाई होळकर यांना मनापासून लोकांनी लोकमाता, पुण्यश्लोक, देवी, गंगाजळ निर्मळ, या सगळ्या पदव्या अर्पण केल्या होत्या. खरंतर कुठलाही पदवीदान समारंभ न होताही, या पदव्या आज दोनशे वर्षे झाली टिकून आहेत आणि टिकणार आहेत. अत्यंत प्रेमाने त्यांनी सामान्य माणसाचे हित बघितले. प्रजेतील गरिबांना जास्तीत जास्त सुखाने जगता यावे, याकडे लक्ष दिले. त्या धार्मिक होत्या हे तर, सर्वांना माहित आहे, परंतु एक राज्यशासक म्हणून त्यांचे कर्तृत्व फार महत्त्वाचे आहे.

अपार शहाणपण आणि तडफ असणारी अलौकिक स्त्री म्हणजे अहिल्याबाई. खंबीर मन आणि चातुर्य यामुळे, अनेक संकटे त्यांनी पार केले. न्यायदान तर इतके अचूक की, भांडणाऱ्या दोन्ही बाजू त्यांना दुवा देत. रणनीतीची त्यांना जाण होती. एका नजरेत हिशोब करण्यात त्या तरबेज होत्या. प्रजावत्सलता आणि परदुःखाने व्याकूळ होणारे मन त्यांना लाभले होते. त्या स्वतः रणांगणात युद्धाला उतरत होत्या, तोफा ओतणे, गोळ्या तयार करणे, याचे शास्त्र त्यांना माहीत होते. घोड्यावर स्वार होण्याचे कौशल्य तर होतेच, पण त्यांनी स्त्रियांचे सैनिकदलही तयार केले होते. मातीवर आणि देशावर निष्ठा, बाणेदार वृत्ती, साधी राहाणी, उच्च चारित्र्य हे त्यांचे विशेष गुण होते. त्यांचे कौटुंबिक जीवन अत्यंत दुःखी, काळेकुट्ट असे होते. पण प्रशासन धवलशुभ्र, निष्कलंक असेच होते.

अहिल्याबाई यांच्या चरित्रातून त्यांच्या अनेक गुणांचा परिचय यानिमित्ताने करून द्यायचा आहे. त्या धार्मिक होत्या पण धर्मांध नव्हत्या. ठिकठिकाणचे घाट, देवळे, धर्मशाळा, विहिरी, रस्ते असे त्यांचे कार्य होते. त्यांनी सुरू केलेल्या अन्नछत्रे आणि पाणपोया आजही चालू आहेत. अनेकजण आपली तहानभूक तिथे शांत करीत आहे. हे सारे कार्य जातीधर्मात अडकलेले नाही. सर्व धर्मियांसाठी त्यांनी मदत केली. म्हणूनच केवळ 'धार्मिक' इतकीच त्यांची ओळख नाही. त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी केलेले कार्य आजही जिवंत आहे कारण मंदिरे, दर्गे, अन्नछत्रे वगैरे ठिकाणी त्या त्या कार्याच्या खर्चासाठी त्यांनी उत्पन्न करून ठेवले. त्यांची ही दूरदृष्टी चकित करणारी आहे. त्यांच्यात अनेक सद्गुण बहरास आलेले होते.

अठरा सतींच्या किंकाळ्या आणि सर्व जीवलगांचे मृत्यू त्यांना बघावे लागले. शेवटी त्या एकट्या राहिल्या. संसाराचा हा उन्हाळा सोसून, ही बाणेदार स्त्री, कुणालाही शरण न जाता कर्तव्यकठोर असा कर्मयोग आचरत राहिली. प्रजेचं सुख बघत राहिली. दुःखाला खंबीरपणे सामोरे जातांनाही आपले कर्तव्य ठामपणे त्यांनी केले. त्यांची प्रत्येक कृती प्रत्येकाला सामर्थ्य आणि शक्ति देणारी आहे आणि या आदिशक्तीच्या जागर पर्वात त्रिशताब्दी जयंतीनिमित्त यावेळी आपण कर्मयोगिनी अहिल्याबाई यांचा जागर मांडणार आहोत.

कर्मयोगिनी अहिल्याबाई यांचा विजय असो..

सर्वेश फडणवीस

#नवनवोन्मेषशालिनी  #नवरात्र #लेखमाला #दिवसपहिला

Tuesday, October 1, 2024

⚜️ नवनवोन्मेषशालिनी

आपल्या देव देवता म्हणजे शक्ती आहेत. शक्तीला तिच्या तेजामुळे देवी हे अभिधान प्राप्त झाले. गेल्या पाच वर्षांपासून आदिशक्तिच्या पर्वकाळात विविध विषयांवर या माध्यमातून लेखन झाले. "उत्सव आदिशक्तीचा" शीर्षकांतर्गत विदर्भातील देवी स्थानांवर, "त्वं ही दुर्गा" अंतर्गत सामाजिक क्षेत्रांत कार्य करणाऱ्या स्त्रियांवर, "कर्तृत्वशालिनी" या अंतर्गत संरक्षण दलातील कार्यरत मातृशक्तीवर आणि "आधारवेल"  अंतर्गत गेल्या शतकातील आणि आताच्या ऐतिहासिक स्त्री चरित्रांवर लिहिण्याचा प्रयत्न केला. मागच्यावर्षी "विज्ञानवादिनी" अर्थात वैज्ञानिक क्षेत्रात महिलांनी केलेल्या कार्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. याच धारेत यावर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जन्मजयंतीनिमित्त त्यांच्या नऊ पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहे. अहिल्याबाई होळकर यांचे संपूर्ण चरित्रच आदर्श आणि प्रेरणादायी आहे.

घटस्थापनेपासून नवरात्रोत्सव जागर उत्सवाला सर्वत्र उत्साहात सुरुवात होणार आहे. नवरात्रात खरं तर जागर हा स्त्री शक्तीचा व्हायला हवा. अनेकजण या माध्यमातून तो करतांना दिसत आहेत. वेद उपनिषद काळापासून स्त्री ही खरं तर पूजनीय, वंदनीय आहे. ती ब्रह्मवादिनी आहे. वैदिक काळापासून ती शिक्षित आणि उच्च विद्याविभूषित अशीच होती आणि आजही हे संचित कायम आहे. तिचा प्रतिकात्मक नऊ दिवस आणि सदैव केलेला आदर आणि सन्मान म्हणजेच नवरात्र.

आज सर्व क्षेत्रात ती कार्य करते आहे आणि सर्व शिखरे पादाक्रांत करते आहे. हे करण्याचे धैर्य तिला इतिहासातून मिळाले आहे. संस्कारांचे बाळकडू घेऊन स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्र स्वतःच्या कर्तृत्ववाने यशोशिखरावर नेले आहे. आज प्रत्येक कार्यक्षेत्रात झोकून काम करायला सदैव तयार असणारी, नव्हे अग्रेसर असणारी स्त्री आहे. ज्या भारताला आम्ही मातेचा दर्जा देतोय त्या भारतातील स्त्री वंदनीय आहे. समाजातील विकृतीला सुद्धा प्रसंगी धैर्याने लढणारी रणरागिणी म्हणजे सुद्धा एक स्त्रीच आहे. इतिहासातून मिळालेल्या सद्गुणांचा संचय करत तिची वाटचाल प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास वेद आणि उपनिषदांच्या काळापासून तिच्या पराक्रमाने उन्नत झाला आहे. आपल्या पराक्रमाच्या गाथा तिने त्रिखंडात गाजवलेल्या आहेत. प्रत्येकाला गर्व वाटेल अशीच स्त्रीची वाटचाल आहे.

खरंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सत्तर वर्षांचे सुफळ संपूर्ण आयुष्य. दुःखाचे आघात सोसत, धैर्याने पुढे गेलेले व्यक्तिगत जीवन आणि स्वकीयांकडून सन्मान घेत , त्यांच्याशी सामनाही देत पुढे गेलेले राजकीय जीवन आणि उत्तरोत्तर बहरत गेलेले जनकल्याणकारी जीवन असा हा आयुष्याचा त्रिपदरी गोफ अहिल्याबाईंच्या जीवन चरित्राचा वेध घेतांना लक्षात येतो.

अहिल्याबाईंनी या देशाच्या चारी दिशांना उभी केलेली मंदिरे, या भूमीची सुंदर लेणी आहेत, अनेक राज्यांत विखुरलेल्या विविधांगी संस्कृतीतल्या समानतेला एका सूत्रात गुंफणारी ही लेणी आहेत. ती आपल्या परंपरेची दृश्य ओळख देत आहेत. भारतवर्षाच्या हिमालयातील उष्ण पाण्याच्या कुंडांतून, नगरचे अगणित घाट, तळी, धर्मशाळा यांतून अहिल्याबाईंची स्मृती भारतवासियांना साद घालते आहे. “नवनवोन्मेषशालिनी” या राष्ट्र सेविका समिती सह कार्यवाहिका चित्राताई जोशी यांनी दिलेल्या बिरुदावलीत थोडीफार मांडणी करण्याचा प्रयत्न सलग ९ दिवस करणार आहे. त्यांच्याशी या विषयाबद्दल बोलत असतांना त्यांच्याकडून हा शब्द सहजच बाहेर पडला आणि आवडला म्हणून सलग नऊ दिवस अहिल्याबाईंच्या विविध पैलूंना मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.

इतिहासाने पानोपानी जिची गाईली गाथा !
होळकरांची तेजस्वी ती..पुण्यश्लोक माता !

सर्वेश फडणवीस

#नवनवोन्मेषशालिनी  #नवरात्र #लेखमाला

Monday, September 30, 2024

◆ 'अवधान एकले दीजे'...


माउली आणि ज्ञानेश्वरी बद्दल नितांत आदर आणि विलक्षण प्रेम आहे. माउली या शब्दांत जे माधुर्य दडलेले आहे ते ज्ञानेश्वरीच्या पानापानावर जाणवतं. मग त्याबद्दल आणि त्या अनुषंगाने जे वाचायला मिळेल ते वाचूनच अधिक समृद्ध होत आणि दरवेळी एक वेगळी दृष्टीने पुन्हा त्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीकडे धाव जाते. असाच ‘अवधान एकले दीजे’ हा सौ.अपर्णा अजित बेडेकर यांनी लिहिलेला ग्रंथ सप्ताहात वाचून पूर्ण झाला. माउली या शब्दाकडे जाणाऱ्या साऱ्या अर्थवाटांना समर्पित असलेला हा ग्रंथ २५ लेख संकलित असलेला आणि या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे या ग्रंथाच्या प्रत्येक लेखाचे शीर्षक हे गीता किंवा ज्ञानेश्वरी ओवी असलेला आहे. त्यामुळे अपर्णा काकूंचे ज्ञानेश्वरी आणि गीतेचा अभ्यास आणि त्यातील सूक्ष्म अर्थांचे बारकावे बघून थक्क होतो. 

याचे मुखपृष्ठ चित्रकार श्री वासुदेव कामत यांनी रेखाटलेले आहे. प्रत्यक्ष ज्ञानमूर्ती असणारे माउली ज्ञानेश्वर महाराज चित्रात एका चौकटीपाशी, दरवाजाच्या उंबरठ्यापाशी ध्यानमग्न अवस्थेत बसलेत. जणू ज्ञानाच्या 'अपरिमित' आकाशाला एक चौकट आखून माउलींनी तुमच्या-माझ्या आकलनासाठी एक सोपं, 'परिमित' रूप दिलंय. गीतेचं अथांग तत्त्वज्ञान लोकभाषेच्या चौकटीत आणून ते 'सुगम' केलंय हे डॉ. अपर्णा बेडेकर यांनी लिहिलेले अर्थपूर्ण वाचूनच वाचकाला ग्रंथाचे वेगळेपण लक्षात येते. 

खरंतर गीता आणि ज्ञानेश्वरी हेतूशिवाय निर्माण झालेली नाही. अर्जुनविषादापासून परावृत्त करून अर्जुनाला युद्धसिद्ध करणं, हा गीतेचा एक सरळ सोपा हेतू आणि उपनिषदांचे सार असलेली गीता ही देववाणी संस्कृतातून लोकवाणी मराठी भाषेत सांगणे, हा ज्ञानेश्वरीचा हेतू आणि माउलींनी नऊ हजार ओव्या  घालून ज्ञानेश्वरी नित्यनूतन आणि रसमय केलेली आहे. आजही ज्ञानेश्वरीतून विविध छटा अभ्यासकांना उलगडत असतात आणि हेच याचे वेगळेपण शतकानुशतके टिकून आहे. 

ज्ञानेश्वरीबद्दल प्रत्येकाच्या मनात असलेलं सुप्त आकर्षण, किंचितसं भय व बराचसा आळस दूर व्हावा आणि ज्ञानेश्वरी हा आपला कृतिशील परिपाठ आणि विचारशील नित्यकर्म व्हावं, यासाठी हवं ते 'अवधान' आणि वाचणाऱ्या प्रत्येकाचं ज्ञानदेवांच्या शब्दांशी प्रवरेच्या तरंगांप्रमाणे प्रवाही आणि नित्यनूतन असं 'मैत्र' जोडलं जावं, असं वाटत असेल, तर त्यासाठी हवं ते 'अवधान'. हे मैत्र निर्माण होऊन 'ईश्वरनिष्ठांची मांदियाळी' या वाचनसाधनेतून एकत्र यावी याच ध्यासातून झालेलं लेखन म्हणजे, 'अवधान एकले दीजे..' असा हा ग्रंथ मनाला अत्यंत भावणारा आहे आणि म्हणूनच हा ग्रंथ वाचनीय आहे आणि संग्रही असावा असा आहे. आता लवकरच याची दुसरी आवृत्ती उपलब्ध होणार आहे तो पर्यंत वाट बघणे हेच इष्ट आहे. 

ज्ञानेश्वरी हा हृदयसंवाद आहे आणि तिथे कृष्ण आणि अर्जुनाच्या मनोव्यापारातली ही गंमत मोठी रम्य आहे. साक्षात ज्ञानमूर्ती असा हा कृष्ण.. मीही साच.. मी ही असंच मानायचो असं म्हणून आधी अर्जुनाला स्वीकारतोय. त्याचा निषेध करून त्याचा प्रश्न खोडून टाकत नाहीय. ज्ञानेश्वरीतल्या कृष्णाची ही पद्धती मोठी मनोज्ञ आहे. अर्जुनाच्या मनातल्या सगळ्या शंकांना चूक की बरोबर ठरवण्यापूर्वी कृष्ण आधी त्याला स्वीकारतोय, त्याला आश्वस्त करतोय आणि मग अर्जुनाला अपेक्षित दिशेकडे वळवतोय कुरुक्षेत्रावर अगदीं मध्यभागी संगीतलेली गीता हेच तर शिकवणारी आहे. 

समोरच्याचं म्हणणं ऐकून त्याचा स्वीकार करणं हे कृष्णाकडून शिकावं. चूक जाणवून देतानाही राखलेला समतोल राखणं हे कृष्णाकडून शिकावं. शंकानिरसन करून योग्य मार्गाकडे नेतांना साधलेली सहजता... तर कृष्णाकडूनच शिकावी. एकूणच... युद्धभूमीवरच्या रणकर्कश वातावरणातील संवादाला महन्मंगल सुसंवादाचं रूप कसं द्यावं, हे कृष्णार्जुनांकडून शिकावं हे एका लेखात वाचल्यावर अपर्णा बेडेकर यांची संत साहित्याचा अभ्यास लक्षात येतो आणि यासाठी हा ग्रंथ वाचायला हवा.

अपर्णा काकू शेवटाकडे येताना छान लिहितात, ‘ज्ञानेश्वरी समजून घेण्यास उत्सुक असलेल्या प्रत्येकाने हे 'अवधान' द्यावं, वाचावं आणि अनुभवावं. सोप्या; पण प्रभावी भाषेतल्या या मुक्तचिंतनाने वाचक- साधकाला सगुणपणे निर्गुणाची शोभा दाखवावी आणि ज्ञानाची 'जीवी शीवी' प्रभा निर्माण करण्यास प्रवृत्त करावं, आश्वस्त ठरावं, 'तथास्तु' म्हणावं हीच त्या ज्ञानरूप आणि निवृत्तीस्वरूप अशा योगेश्वराकडे प्रार्थना. ‘अवधान एकले दीजे' या ग्रंथाद्वारे घडवलेला भावार्थदीपिकेचा रम्य प्रवास वाचकांना आनंददायी आणि प्रेरणादायी ठरणारा आहे. सहज सोपा अर्थ आणि तितकाच अर्थपूर्ण गूढार्थ सोप्या शब्दांत सांगितल्या गेला आहे आणि हेच या ग्रंथाचे वेगळेपण आहे. संग्रही असावे असचे अवधान..म्हणजे ‘अवधान एकले दीजे'...

सर्वेश फडणवीस

Tuesday, July 16, 2024

श्रीज्ञानेश्वरकन्या - प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज

ईशानस्य सुता, मुकुन्ददयिताज्ञानेशमुद्रांकिता
या माधुर्यरसान्विता, सुललिता, कात्यायनीकीर्तिता ।
ख्याता पच्चलताभिधानमहता श्रद्धावतां देवता
सा मच्चिन्तनवेद्यतामवतरेत् सश्रद्धमाराधिता ।।

आपला भारतदेश 'संतांची भूमि' म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आरंभबिंदू म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, आणि त्याच परंपरेला अधिक पुष्ट करणारा एक समर्थ दुवा म्हणजे श्रीगुलाबराव महाराज. भारताचा सांस्कृतिक इतिहास गौरवशाली आहे. हा गौरव मुख्यत्वे करून या भूमीतील संतांच्या शिकवणीतून प्राप्त झाला आहे. अनेक आघात सोसूनसुद्धा अजून आपली संस्कृती वर्धिष्णू आहे. धर्माला ग्लानी आली असता आणि दुष्टांचे वर्चस्व वाढले असता धर्म रक्षणासाठी व दुष्टांचे निर्दालनासाठी योगेश्वर श्रीकृष्ण ज्याप्रमाणे नवा जन्म घेतात त्याप्रमाणेच भारतीय संस्कृतीला परकीयांचे घाव बसू लागले की संस्कृती रक्षणासाठी आपल्या भूमीमध्ये संतांचे अवतार झालेले आहेत म्हणूनच भारतामध्ये संत हे भगवान स्वरूप मानले आहेत.

विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यात चांदुरबाजार तालुक्यातलं 'माधान' हे एक छोटंसं गाव. मोहोड घराण्याकडे त्या गावाची पाटीलकी होती. घराणं राजस्थानचं. महाराजांचे पूर्वज तिथून प्रथम उत्तर प्रदेशात. नंतर हे मुळात मराठवाड्यात आणि शेवटी विदर्भात आले आणि माधानमध्ये स्थिरावले. या मोहोड घराण्यात 'राणोजीराव' हे एक कट्टर शिवभक्त होऊन गेले. शिवरात्रीचं त्यांचं व्रत एकवीस दिवसांचे असे - फक्त भस्म ग्रहण करूनच ते हा उपवास करीत असत. एके दिवशी प्रत्यक्ष महादेवानं त्यांना वृत्तांत दिला की तुझ्या कुळात एका थोर महात्म्याचा जन्म होईल. या राणोजीरावांना चार मुलं होती. रघुजी, बकारामजी, नरसोजी आणि गोंदूजी. त्यातले नरसोजी तर अल्पायुषीच ठरले. आणि रघुजी - बकारामजी यांना अपत्यलाभ झालाच नाही. कनिष्ठ पुत्र गोंदूजीचं भाग्य मात्र फळफळलं. त्यांच्या घरी या लोकोत्तर महात्म्यानं जन्म घेतला.

अमरावतीच्या दक्षिणेला लोणीटाकळी हे लहानसं खेडं आहे. तिथल्या अलोकाबाईशी गोंदूजींचा विवाह झाला होता. अलोका माहेरी गेली आणि आषाढ शु. दशमी अर्थात ६ जुलै १८८१ ला तिनं एका तेजस्वी गुटगुटीत बाळाला जन्म दिला. त्या दिवशी फक्त मोहोड कुटुंबालाच नाही तर अवघ्या 'आर्य धारणे'ला हर्ष झाला असेल की आता आमचा उद्धार करणारा, आमच्या वचनांची संगती लावणारा, अद्वैत - तत्त्वज्ञानाशी भक्ति धारेचा समन्वय साधणारा, आर्य अस्मिता जागवणारा कुणीतरी अवतरला.  

ज्या काळात स्वत:ला सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणविणारे ज्या मार्गाने, ज्या रूपाने, ज्या पद्धतीने आपला परिचय करून देत होते, त्या काळात कमालीच्या दारिद्र्याला अंगाखांद्यावर घेत, डोक्यावर ग्रंथलेखनाच्या कार्याची पेटी घेऊन रस्ते नसलेल्या गावागावांतून हे अंध महापुरुष आपल्या बरोबर वैदर्भीय काळ्याभोर चिकण मातीच्या सुगंधाचे वाटप जेथे जाईल तेथे करीत होते. विद्वान, पंडितांना मागे टाकील अशा आशयसंपन्न शैलीने सरस्वतीची पूजा बांधित होते आणि ज्ञानदेवीच्या वैभवाचा गोपालकाला मुक्त हस्ताने देत होते. त्या काल्याचा आस्वाद घेता घेता हेही कळत होते, माहीत होते की, अरे गुलाबराव महाराज हे गुलाबराव महाराज नाहीत. ते ग्रंथकार नाहीत. ते अंधही नाहीत तर आपल्या दोन देदीप्यमान लक्षणासह या विदर्भभूमीवर आलेली ही ज्ञानेश्वर कन्या आहे, गोपगोपिकांची सखी व व्रज मंडळातील रासक्रीडेतील, राधेसह अन्य गोपींसह श्रीकृष्णाच्या व्रज जीवनातील पंचलतिक गोपी आहे. खरंतर हा सर्व प्रकारच अलौकिक आहे आणि दिव्य आहे.
 
वृंदावनातील पंचलतिका गोपी व विदर्भातील कौंडण्यपूरची रुक्मिणी या दोघीही कृष्णाशी आपले हृद्य नाते सांगताना विदर्भभूमीची निवड करतात व रुक्मिणीप्रमाणेच ज्ञानेश्वर कन्या आपल्या वृंदावनातील गोपीच्या मधुर रसपूर्ण रूपाची आठवण करून देते. आज आषाढ शुद्ध दशमी श्रीज्ञानेश्वरकन्या प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यांची जयंती. त्यांच्या सुकोमल चरणी साष्टांग दंडवत.

सर्वेश फडणवीस

Saturday, July 13, 2024

स्वामी विवेकानंदांच्या दृष्टीतून भारत : शोध व बोध


'स्वामी विवेकानंदांच्या दृष्टीतून भारत : शोध व बोध' हे पुस्तक वाचनात आले. रामकृष्ण मठ नागपूर यांनी प्रकाशित केलेलं हे १०० पृष्ठाचे छोटेखानी पण पुस्तक महत्त्वपूर्ण विषयांवरील पुस्तक आहे. स्वामी विवेकानंद १८८८ पासून परिव्राजकाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वीच आपल्याला काही कार्य करायचे आहे याची सुस्पष्ट जाणीव जरी त्यांना झाली असली तरी त्या कार्याची नेमकी रूपरेषा काय असावी ह्याचा त्यांनाच नीटसा अंदाज आलेला नव्हता. 

स्वामीजी म्हणतात, “मला फार मोठं कार्य करायचं आहे, हे कार्य मी केलं पाहिजे, अशी माझ्या सद्गुरूंची मला आज्ञा आहे. काम लहान नाही. या आपल्या मातृभूमीचं पुनरुत्थान घडवून आणायचं आहे. तिचं आध्यात्मिक सामर्थ्य क्षीण झालं आहे आणि सारा समाज भुकेला आहे. भारत चैतन्यशाली झाला पाहिजे, आणि आपल्या आध्यात्मिकतेच्या बळावर त्यानं सारं जग जिंकलं पाहिजे” असे स्वामीजींचे त्यावेळचे उद्गार आहेत. त्यामुळे देशाटन करून समाज, समाजाची विविध अंगे आणि श्रीरामकृष्णांच्या उपदेशाच्या आणि स्वतःच्या आध्यात्मिक अनुभूतींच्या प्रकाशात पाहण्याच्या उद्देशाने स्वामीजींनी भारत भ्रमणास सुरुवात केली आणि आसेतूहिमाचल त्यांनी भ्रमण केले. 

स्वामीजींचे भारत पाहणे ही एक अपूर्व आणि अद्भुत गोष्ट आहे. त्यांच्या जीवनातील हे पर्व आपल्यासाठी अतिशय उद्बोधक आहे. त्यांच्या देशभ्रमणात आलेले अनुभव आपल्याला थक्क करून सोडणारे आहे. स्वामीजींचे भारतभ्रमण हे काही केवळ परंपरागत तीर्थाटन नव्हते. सामान्य साधूंसारखी त्यांनी केवळ काशी - अयोध्या - वृंदावन अशी धार्मिक तीर्थक्षेत्रेच पाहिली नाहीत तर आग्रा-लखनौसारखी ऐतिहासिक स्थानेही आवर्जून पाहिली. गिरीकंदरांत ते जसे रमले तसेच गजबजलेल्या महानगरांतही त्यांनी निवास केला. सर्व बाजूंनी भारत बघणे हेच विवेकानंदांच्या भारतभ्रमणाचे प्रमुख वैशिष्ट्य होते. या भ्रमणात स्वामीजींनी ठिकठिकाणचे धार्मिक आणि ऐतिहासिक स्थानमाहात्म्य तसेच राष्ट्रीय महत्त्व यथार्थपणे टिपलेले आहे. 

त्याकाळी मुस्लीम आणि ब्रिटीश राजवटीचा प्रभाव होता त्यामुळे विविध कला, शिक्षण, साहित्य, सामाजिक चालीरीती, राजकीय आणि आर्थिक व्यवस्थापन त्यांनी गुणदोषांसहित प्रत्यक्ष पाहिला. विविध जनस्थानांचा, आपल्या देशाच्या राष्ट्रीय आदर्शांचा सर्वस्पर्शी वेध घेणे हे विवेकानंदांचे वेगळेपण आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या विवेकानंद सर्वच स्तरांतून वावरले. उच्चभ्रू, खानदानी संस्थानिकांच्या राजप्रासादांत ते जसे राहिले तसेच अठराविश्वे दारिद्र्याने गांजलेल्या झोपड्यांतही राहिले. कारण त्यांची ती सहज वृत्ती होती.

देशाचे धार्मिक-आध्यात्मिक पुनरुत्थान घडवून आणणे हाच त्यांच्या साऱ्या परिभ्रमणाचा मध्यवर्ती उद्देश होता. साधू संताशी संवाद करीत, धर्माची समाजधारणा करण्याची क्षमता व तिचे तत्कालीन रूप बघत, धर्माची स्थूल सूक्ष्म अंगे आणि बहिरंग - अंतरंग बाबी डोळसपणे न्याहाळीत स्वामीजींचे भारतभ्रमण झालेले आहे. या बाबतीत तसे ते अगदीच निराश झाले नाहीत तथापि धर्माचे जितके उज्ज्वल व आश्वासक रूप त्यांना समाजाच्या अंतःप्रवाहांमध्ये आढळले ते त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून मांडले आहे.

स्वामी विवेकानंदांनी मांडलेले शोधविचार अर्थात त्यांचा पहिला शोध विचार आहे जनसामान्यांकडे झालेले दुर्लक्ष कारण स्वामीजींच्या काळात म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हा विचार महत्त्वाचा होता, दुसरा शोधविचार आहे धर्म हाच भारताचा कणा स्वामीजींच्या मते प्रत्येक राष्ट्राचे बलस्थान असते आणि भारतीय संस्कृतीचे बलस्थान धर्म हे आहे, मूलभूत धर्मतत्वांच्या उपाययोजनांचा प्रभाव हा पुढचा शोधविचार त्यात स्वामीजींनी वेदांताचे काही तत्व मांडले आहेत, त्यातील हिंदू धर्माचे ऐक्य आणि जगातील सर्व धर्मात सुसंवाद आणि विज्ञान आणि धर्म आणि समन्वय मुळातून वाचनीय आहे त्यानंतर स्वामीजींचा चौथा शोध विचार आहे पाश्चात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याचा कारण भारतीय संस्कृतीचे रक्षण व प्रसारासाठी देशाला भक्कम भौतिक पाया असण्याची गरज आहे याची स्वामीजींना पूर्ण जाणीव होती. त्यानंतर शिक्षणाचा शोधविचार स्वामीजी मांडताना त्यांनी भारतभर भ्रमण करत असतांना आजवर सर्वसामान्य लोकांकडे झालेले दुर्लक्ष आणि धर्म व विज्ञानाच्या तत्वांचा लोकांच्या दैनंदिन जीवनात वापर करणे हाच प्रभावी तोडगा त्यांनी शोधला होता, त्यानंतर अध्यात्माचे ज्ञान स्वामीजी मांडतात आणि हे सगळे शोधविचार वाचल्यावर वाचकाला स्वामीजींच्या जीवनकार्याचा सर्वांगीण वेध घेता येतो. कन्याकुमारीच्या वास्तव्यात भारताचे पुनरुज्जीवन व पाश्चात्य जगाला भारताने करायचे सांस्कृतिक योगदान या बाबतची आपली योजना निश्चित झाल्यानंतर भविष्यात करायच्या कार्याविषयीचे त्यांचे विचार स्पष्ट व निश्चित झाले. 

निष्कर्ष, तत्कालीन समस्या व त्यांवरील उपाययोजना यांवर स्वामी भजनानंदांनी एक प्रदीर्घ लेखमाला लिहिली होती. रामकृष्ण संघाच्या हिमालयातील मायावती स्थित 'अद्वैत आश्रमा' तून प्रकाशित होणाऱ्या 'प्रबुद्ध भारत' या इंग्रजी मुखपत्रात १९७६-७७ साली नऊ लेखांची ही मालिका Swami Vivekananda's Discoveries about India' या नावाने प्रकाशित करण्यात आलेली होती आणि त्याचा हा मराठी अनुवाद आहे. पू. भजनानंद महाराज सध्या रामकृष्ण संघाचे महाउपाध्यक्ष आहेत. स्वामी विवेकानंदांचे बृहच्चरित्र, व्याख्याने, संवाद-संभाषणे तसेच पत्रे यांचा अतिशय साकल्याने सखोल अभ्यास करून ही लेखमाला सिद्ध झालेली आहे

भारतीय समाजात स्वामीजींच्या चैतन्यशक्तीची सळसळ आजही कानी पडते आणि सखोल अंतर्दृष्टी असलेल्या महान व्यक्तीच्या नजरेतून ही बाब सुटत नाही. श्री योगी अरविंदांसारख्या महान तत्त्वज्ञानाने सुद्धा लिहून ठेवले आहे.

“विवेकानंदांचा आत्मा सिंहाप्रमाणे शक्तिशाली होता, किंबहुना ते सिंहपुरुष होते. परंतु त्यांनी जे कार्य केले, जो कार्याचा वारसा मागे ठेवला तो त्यांच्या सृजनशील शक्तीशी आणि प्रचंड ऊर्जेला साजेसा नाही. त्यांचा प्रभाव आजही फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तो कसा आणि कोठे कार्य करतो ते कळत नाही, तो कशात तरी सामावला आहे, जे अजून आकाराला आलेले नाही; मात्र तो अतिशय सामर्थ्यशाली आहे, भव्य आहे, मर्मज्ञ आहे, उंचीवर झेप घेणारा आहे - असा त्यांचा प्रभाव भारताच्या आत्म्यात सामावला आहे. आणि मग आपण नकळत उद्गारतो, 'बघा, विवेकानंदांचा आत्मा, त्याचा भाव अजूनही आपल्या मातृभूमीच्या आणि तिच्या बालकांच्या मनात वास करीत आहे. सर्वच महान व्यक्तींबाबत असेच घडते. महनीय व्यक्तींच्या कार्यापेक्षा त्यांचे व्यक्तिमत्त्व किती तरी अधिक मोठे तर असतेच, शिवाय त्यांचा व्यक्तिगत प्रभाव इतका व्यापक व निराकार असतो की त्यांनी मागे ठेवलेल्या सुपरिचित, सर्वज्ञात कार्याच्या तुलनेत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची महत्ता कितीतरी अधिक प्रमाणात चिरस्थायी व चिरस्मरणीय असते.” स्वामीजींचे विचार आजही प्रासंगिक आहेत हेच सतत जाणवते. वाचनीय आणि संग्रही असावे असेच हे पुस्तक आहे. 

सर्वेश फडणवीस

Sunday, June 16, 2024

‘देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे’


भारतीय संस्कृती खरंतर नित्यनूतन आणि वर्धिष्णू अशीच आहे. त्या संस्कृतीच्या पाऊलखुणा वाचणे म्हणजे आंनददायी पर्वणी. आपली संस्कृती बहरली आणि लोकांनी तिला आत्मसात केली म्हणून आजही युगानुयुगे तशीच शाश्वत आहे. गेले दोन दिवस या संस्कृतीच्या पाऊलखुणा देशविदेशात बहरलेल्या बघून भारावून गेलो आहे. Deepali Patwadkar लिखित ‘देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे’ पुस्तक वाचनात आले. खरंतर पुस्तक इतके छान आणि अभ्यासपूर्ण लिहिलेले आहे की एका बैठकीत वाचूनच बाजूला ठेवले जाईल असे आहे. विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाने ही कलाकृती वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदनास पात्र आहे. 

भारतीयांच्या मनावर वारंवार असे बिंबवले गेले आहे की भारताचा इतिहास हा केवळ आक्रमणांचा इतिहास आहे. एका मागोमाग एक होणारी आक्रमणे आणि त्यांना बळी पडणारा हा देश असे चित्र सामान्य माणसाच्या डोळ्यासमोर उभे केले आहे. मात्र या पुस्तकातील सप्तयात्रांमधून अर्थात सात भागातून लक्षात येते की भारतीय इतिहास हा बाहेरून येऊन जिंकणाऱ्या आक्रमकांचा नसून, भारतातून बाहेर जाणाऱ्यांनी केलेल्या भारतीय संस्कृतीच्या प्रसाराचा इतिहास आहे.

भारताचा इतिहास 'कृण्वन्तो विश्वमार्यम्' या वेदवाक्याचे मूर्तरूप आहे आणि त्याचे प्रत्यंतर पानापानावर वाचकाला येते. भारत 'भा' म्हणजे तेज व 'रत' म्हणजे रममाण झालेला. तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत आहे. भारतीय संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती. अनेक पंथांचा आणि सर्व जमातींचा समावेश या संस्कृतीत होतो. एखादा जुना अल्बम काढल्यावर जशी विस्मृतीत गेलेली माणसे, प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात, त्यासारखी या यात्रेत आपल्याला भारतीय संस्कृतीची चिन्हे दिसतात त्यात त्याचा भौगोलिक इतिहास दिसतो. ही चिन्हे आपलीच कथा, आपलाच पराक्रम आपल्याला सांगतात. ही सगळी 'स्वस्तिचिन्हे' आहेत कारण ती- 'सु + अस्ति' म्हणजे कल्याणकारी आणि मंगलकारी चिन्हे आहेत आणि त्याबद्दल पुस्तकातुन जाणून घेतल्यावर आपण त्याचे पाईक आहोत हे बघूनच अभिमान वाटतो.

भारतीय लोक जिथे गेले, तिथे कुठेही त्यांनी-विध्वंस, मोडतोड, लूट, दरोडे, युद्ध, रक्तपात केला नाही. भारतीयांच्या पाऊलखुणा मंगल आहेत. त्यांनी मागे ठेवलेली चिन्हे- विधायक कामांची आणि सृजनशीलतेची 'स्वस्तिचिन्हे' आहेत. हे पुस्तक भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे जिथे उमटली आहेत, त्या ठिकाणी घेऊन जाणारी विजय यात्रा आहे. प्रत्येक भागात त्या त्या प्रदेशातील भारतीय संस्कृतीच्या स्वस्तिचिन्हांची ओळख होते व आपली पाळेमुळे किती दूर व खोल पसरली आहेत याचा अंदाज पुस्तक वाचतांना येतो.

भारताच्या या विश्वव्यापी पाउलखुणा म्हणजे आपल्या शाश्वत, चिरंतन मानवी मूल्यांचा आपण आपल्या चित्र, शिल्प, स्थापत्य कलांच्या माध्यमातून देशोदेशी रुजविलेला संस्कार असे म्हणता येईल. या संस्कार यात्रेचा हा साचेबद्ध संचार नुसताच विस्ताराने व्यापक होता असे नाही तर तो खूप खोलवर रुजलेला, दूरगामी परिणाम करणारा आणि बहुआयामी ही होता यांची माहिती पुस्तकातून वाचकाला होते. 

प्राचीन काळापासून साधारणपणे तेराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती जिथे जिथे पोचली, त्या भूभागाला बृहत्तर भारत असं संबोधलं गेलं. त्या भूभागाचे दीपाली पाटवदकर यांनी सात भाग केले आणि त्याला वायव्यशल्य, उत्तरकुरू, ईशान्यसूत्र, पूर्वमित्र, आग्नेयपुराण, दक्षिणद्वीप, पश्चिमगाथा अशी नावे दिली आहे. त्या सात भागात त्यांनी अंतर्भाव केला तो पाकिस्तान,अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, शिनजियांग, चीन, मंगोलिया, कोरिया, जपान, तिबेट, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम,इंडोनेशिया, अंदमान, निकोबार, श्रीलंका, लक्षद्वीप, मालदीव, मॉरिशस, इराण, इराक, इजिप्त, ग्रीस, रोम, युरोप, या सुमारे ३१ देशात वा द्वीपात आजही इतक्या वर्षांनंतर आढळून येणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणांचा वेध घेण्याचा प्रयत्न दिपाली पाटवदकर यांनी केला आहे.

खाद्य संस्कृती, रांगोळी, अंक मोजण्याची पद्धत, कालगणनेची पद्धत, शिल्पकरायची पद्धत, स्थापत्य पद्धत, नृत्य-गायन- वादन-जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या परंपरा या सर्वांचा समावेश या पुस्तकात आहे, आणि त्याचे सचित्र पुरावे या पुस्तकातून वाचकाला समृद्ध करतात. दीपाली पाटवदकर एके ठिकाणी छान लिहितात, “ कोणतेही कर्तेपण न घेता भारतीयांनी ज्ञानाची कोठारे भरली. ज्ञान नुसते साठवले नाही, तर ते दोन्ही हातांनी भरभरून वाटले!मुक्तहस्ताने, कसलीही अपेक्षा न ठेवता, ज्ञानदान केले. भारताने गीतेतील निष्काम कर्माचे धडे नुसते दिले नाहीत, तर ते जगून दाखवले. रामदास स्वामींच्या उक्तीनुसार 'जे जे आपणासी ठावे, ते ते सकळांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे सकल जन' हे व्रत भारतीयांनी सहज पाळले.”

अशा या भरतभूमीत जन्माला येणं खरंतर ही भाग्याची गोष्ट म्हणायला हवी. योगी अरविंद speeches of Shri Aurobindo मध्ये म्हणतात, आज जगाला भारताच्या भविष्याची जाणीव झाली आहे.

The sun of India would rise..overflow the World.(speeches of Shri Aurobindo)

भारताचा सूर्य उगवेल व सर्व जगाला प्रकाशाने भारुन टाकेल हे त्यांचे उद्गार महत्त्वाचे आहेत आणि हे पुस्तक वाचून बृहत्तर भारताची पूर्ण कल्पना लक्षात येते. सांस्कृतिक, एकात्म भारताची व्याप्ती लक्षात येते. अत्यंत सहज शब्दांत आणि ससंदर्भ असलेले पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असावं असंच आहे.

देशविदेशातील भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे
पुस्तकासाठी संपर्क :  www.kalaapushpa.com

सर्वेश फडणवीस

Monday, June 3, 2024

यतो धर्मस्ततो जयः ।।


अर्थात जहाँ धर्म है, वहाँ विजय होगी. बस्स..अवघ्या काही क्षणांची प्रतीक्षा. भारतमातेचे संस्कार, भरतभूमीची आदर्श संस्कृती, त्यातून घडलेले असे तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे नरेंद्र मोदी आणि या पंचाक्षरी विकासाच्या मंत्राने साधारणपणे ५ एप्रिल ते ३० मे या काळात संपूर्ण देश पुन्हा एका नव्या विजयासाठी जागृत आणि सज्ज होता. ७३ वर्षीय नरेंद्र मोदींनी कडक उन्हात २०८ सभा घेतल्या. ८० मुलाखती दिल्या आणि देशाला नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या प्रेमाने जिंकून घेतलं. मला वाटतं मरगळलेल्या देशाला या व्यक्तीच्या येण्याने २०१४ मध्ये नवसंजीवनी मिळाली आणि प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती असल्यासारखी भावना निर्माण झाली. एका शीर्षस्थ नेत्यासाठी असा भाव असणे हे फक्त भारतासारख्या विविध संस्कृती, भाषा, वेषभूषा आणि प्रांत असलेल्याला देशातच बघता येईल. 'वसुधैव कुटुंबकम्' ह्या संस्कृतीचे आपण पाईक असताना या लोकनेत्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने आपले योगदान दिले. भाव हाच होता की ही व्यक्ती देशासाठी काहीतरी चांगले करते आहे. 

या व्यक्तीच्या येण्याने लहानांपासून - वृद्धांपर्यँत सारे जण मोदी मोदी करता करता दहा वर्ष कशी गेली समजलेच नाही. आदर्श व्यक्तित्वाकडून घडलेलं सेवा कार्य आणि त्यांच्याप्रती असलेला सर्व भारतीयांचा प्रामाणिक भाव यातून यांनी दिग्विजयाची नांदी आधीच दिली होती. अनेकांना यांच्या माध्यमातून अनेक तीर्थक्षेत्रांचे घरबसल्या दर्शन झाले, या मीडियाच्या माध्यमातून आणि याची ताकद ओळखून विविध घटनाही अनुभवता आल्या आणि मग प्रत्येकाच्या ओठातून सहज भाव आले..वाह मोदीजी वाह!! 

पण जगाने नरेंद्र मोदी वलयाचे वेगळेपण आणि आदरातिथ्य अनुभवले ते सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या G20 समिटच्यावेळी ज्या आदरातिथ्याने यांनी जगाला आणि जागतिक नेत्यांना जिंकून घेतले त्यातून त्यांच्याप्रती आदराची भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली. दहा वर्षांच्या कालखंडात काही घटना आणि काही प्रसंग चिरकाळ स्मरणात राहणारे अनुभवले. २२ जानेवारी २०२४ हा ऐतिहासिक दिवस अर्थात अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य मंदिरात श्रीरामलला विराजमान झाले. तो सोहळा प्रत्येकाने आपल्या घरातीलच मंगलकार्य असल्यासारखा जल्लोष आणि उत्साहात साजरा केला. 

खरंतर धर्माला ग्लानी आली की अवतार कार्यासाठी भगवंत ही येण्यासाठी उत्सुक असतात आणि अनेकांच्या मनात हीच भावना कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. शीर्षस्थ नेतृत्व बलशाली असावे म्हणून अनेकांनी २०१४ पासून व्रत, अनुष्ठान, मंत्रजप, नामस्मरण हे चालूच ठेवले होते. माझ्याही पाहण्यात असे अनेक आहेत ज्यांनी या विकासाच्या मंत्रासाठी धार्मिक अनुष्ठान केलं भाव हाच होता की फक्त ही व्यक्ती शीर्षस्थ पदावर राहावी आणि त्याला त्या त्या देवतेचे कवच मिळावे. ह्या सहजपणातून आणि सहज भावनेतून अनेकांनी ते कार्य संकल्पासह पूर्णही केले आणि आनंद हाच वाटतो की हे फक्त या आपल्या देशात बघायला मिळू शकतं. ज्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा माझ्या आजीने देवांना पेढ्याचा नैवेद्य दाखवत शपथ घेताना तरळलेले आनंदाश्रू अजूनही आठवतात. संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही भावना आणि असाच भाव यावेळी ही बघायला मिळाला. खरंतर श्रद्धेला मोल नसतंच तिथे असते फक्त निष्ठा आणि संपूर्ण समर्पण भाव आणि या भावनेतून आजचा सूर्यास्त उद्याच्या सूर्योदयाच्या नव्या विजयाची नांदी घेऊन येण्यासाठी सज्ज आहे. 

चला आपण ही काही क्षणांची प्रतीक्षा करत हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्नरत राहूया.. मान्यवर विजयोस्तु..

सर्वेश फडणवीस

Saturday, May 25, 2024

गाथा भारतीय विरागिनींची..


साधारणपणे तेराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत उत्तरेपासून दक्षिणेकडे आणि पूर्वपासून पश्चिमेकडे भारतात अनेक संत स्त्रिया होऊन गेल्या. मध्ययुगात सर्व भारतभर अनेक भक्तिपंथांचा उदय झाला. याच कालखंडातील भारतीय विरागिनींच्या कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन आणि पारमार्थिक पातळीवरील जीवनविचार हा संशोधनाचा फार मोठा विषय आहे. याच विषयाला अभ्यासपूर्ण संशोधनाची मांडणी देत डॉ.अरुणा ढेरे यांचा ‘भारतीय विरागिनी’ हा ग्रंथ मध्यंतरी वाचनात आला. किरण शेलार सरांनी नागपूर भेटीत आवर्जून ग्रंथ भेट दिला आणि आवर्जून वाच अशी सूचना वजा विनंती केली. यातल्या प्रत्येक स्त्रीचरित्राबद्दल वाचतांना सुद्धा प्रेरणा आणि त्यांच्या कार्याची संपूर्ण ओळख होत असतानाच त्यांच्याबद्दलचा आदर पानोपानी जाणवत होता. तब्बल ४६४ पानी असलेल्या या ग्रंथात ३० हुन अधिक स्त्रीचरित्रे वाचायला मिळतात. 

संपूर्ण भारताचा पट डोळ्यांसमोर ठेवून विरागिनींचे जीवन आणि साहित्य यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न अरुणा ढेरे यांनी केला आहे. संपूर्ण ग्रंथाच्या विषयाचा विस्तार मोठा आहे. शिवाय विविध प्रादेशिक भाषांमधल्या आणि बोलींमधल्या अनेकींच्या मूळ रचनांपर्यंत पोहोचणे आणि त्या भाषेबद्दल अरुणा ताईंनी केलेला प्रयत्न हेवा आणि आदर वाटावा असाच झाला आहे. भारतीय विरागिनींचे स्त्रीत्वाशी असलेल्या संवेदना आणि भारतीय भक्तिक्षेत्राशी निर्माण झालेले नाते या ग्रंथातील प्रत्येक चरित्रातून उलगडत जाते. मानवजातीचा इतिहास पाहता प्रारंभकाळात स्त्री हीच सृष्टीशी संवादी जगत होती. निसर्गाशी तिचे नाते अधिक दृढ, सामंजस्यपूर्ण, तणावरहित, स्वाभाविक असे होते.

लौकिकातून पलीकडे पाउल टाकणाऱ्या आणि लौकिक आयुष्याने निर्माण केलेल्या सर्व बंधनांपासून मुक्त होऊन परमार्थाची वाट धरणाऱ्या स्त्रियांना आपल्याकडे विरागिनी शब्दावलीत त्यांच्या कार्याचा उल्लेख केला जातो. काश्मीरच्या लाल देदपासून तमिळनाडूच्या ओव्वै किंवा अवैयार ते आंदाळपर्यंत आणि बंगालच्या चंद्रावतीपासून महाराष्ट्राच्या मुक्तेपर्यंत गेल्या आठ शतकांमध्ये होऊन गेलेल्या भारतीय विरागिनींच्या जेवढ्या म्हणून आयुष्यकथा उपलब्ध आहेत, त्यांची काळाच्या एका विशाल पटावर मांडणी केली तर असे दिसून येते की, यांपैकी प्रत्येकीला संघर्ष अटळच ठरला आहे. स्थूल किंवा सूक्ष्म असो, आई-वडिलांशी असो, सासू-सासऱ्यांशी असो, पतीशी असो की स्वत:चाच स्वतःशी असो- प्रत्येकीला संघर्षाला सामोरे जावे लागले आहे. या संघर्षाचे आणि चरित्राचे प्रतिबिंब या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळते.  

विरागिनींचा पारमार्थिक जीवनातील प्रवेश आणि त्यासाठी करावा लागणारा गृहत्याग सामाजिक स्तरावर सहज स्वीकारली जाणारी गोष्ट नव्हती. ते अवघड दिव्यच होते. यासाठी लागणाऱ्या असीम निग्रहाचा आणि धैर्याचा स्वीकार या विरागिनींनी कसा केला याबद्दल वाचून वाचक समृद्ध होतो. विरागिनींचा कौटुंबिक ते पारमार्थिक प्रवास अतिशय आत्मीयतेने अरुणा ताईंनी वर्णन केला आहे. विरागिनींनी भक्तिमार्ग स्वीकारून स्वत:ला आणि समाजाला काय दिले, अनेक पातळ्यांवरचा संघर्ष आणि त्यातून मिळणारा परमानंद या विरागिनींनी अनुभवला आहे. या अनुभवाचे यथोचित दर्शन या ग्रंथातून होते. 

संपूर्ण भारतातील तत्कालीन भारतीय कुटुंबरचना, आध्यात्मिक वातावरण, संप्रदायाचे अधिष्ठान, मठाधिपती आणि त्याचे माहात्म्य, पितृसत्ताक समाजव्यवस्थेत स्त्रियांचे स्थान, स्त्रीचे लग्नाचे वय, बालविवाह, विधवांची जीवनपद्धती इत्यादी अनेक घटकांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे या ग्रंथातून अरुणा ताईंनी समर्पक शब्दातून मांडणी केली आहे. अतिशय संशोधनपूर्ण केलेल्या या ग्रंथाच्या समारोपात अरुणा ताई लिहितात, ‘स्त्रीचे जे मिथक शेकडो वर्षांच्या हातांनी घडत गेले होते, त्या मिथकात या विरागिनींनी आत्मानुभूतीचा नवा प्राण भरला आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड ऊर्जेच्या लोटात त्या मिथकांचा जुना साचा संपूर्ण वितळून गेला.’ वाचनीय आणि प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक आहे. 

‘भारतीय विरागिनी’ – डॉ. अरुणा ढेरे म

हाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, 

पृष्ठसंख्या ४६४, किंमत- २३२ रुपये.

सर्वेश फडणवीस 

Sunday, May 12, 2024

◆ आचार्य शंकर !! 🚩


श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयम्।
नमामि भगवत्पाद शंकरं लोक शंकरं।।

शंकराचार्य हे नांवच मुळी मंत्रमुग्ध करणारे आहे. त्याकाळी आर्य सनातन वैदिक धर्माबद्दल जनमानसात अनास्था निर्माण झाली होती व परधर्माचे प्रचंड आक्रमण होऊन वैदिक धर्माला ग्लानी आली होती. देवकार्य साधण्यासाठी जे म्हणून देवमानव अवतीर्ण झाले, त्या सगळ्यांचा आविर्भाव अलौकिक रीतीनेच झाल्याचे आढळते. त्यांचा जन्म ईश्वरी इच्छेने आणि अप्राकृत व अलौकिक अशा पद्धतीने होतो. ऐतिहासिक युगात जे देवमानव धर्मसंस्थापनेसाठी भूतलावर अवतीर्ण झाले, आणि या जगात धर्मस्थापनेसाठी ज्या दैवीगुणसंपन्न महापुरुषांचा अवतार झाला त्या सर्वांमध्ये आजही आचार्य शंकरांचे अगदी निराळे स्थान आहे. 

ज्याप्रमाणे ढगांना भेदून सूर्याचे किरण बाहेर पडावेत त्याप्रमाणे काळ आणि कल्पनाविलास यांना भेदून प्रगट होणारी शंकराचार्यांची भव्यदिव्य मूर्ती आजही आपणास स्मरणीय आहे.  शंकराचार्य यांची अलौकिक प्रतिभा, मूलग्राही तत्त्वज्ञान, असामान्य चरित्रबल, लोककल्याणाची तळमळ आदी त्यांचे गुण आजही दृश्यमान असले तरी त्याची प्रतिभा आपल्याला जाणवते आणि त्यांच्या अस्तित्वाची चिन्हे ठायींठायी जाणवतात. 

ह्या तरुण संन्याशाने अखंड भ्रमण केले. आपल्या भारतभूमीत पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण सर्व टोकांपर्यंत तर त्यांनी पदयात्रा केलीच पण इतर देशांतही ते गेले. कालप्रवाहामध्ये वेदान्तधर्म जणूकाही चिखलात रुतलेल्या राजहंसासारखा झाला होता. त्याला त्यांनी मुक्त केले आणि त्याची पुनर्स्थापना केली. वेदान्तधर्माचे उज्ज्वल स्वरूप त्यांनी जगासमोर ठेवले. इतकेच नव्हे तर, त्याला त्यांनी व्यावहारिक रूप दिले. त्यांनी नित्य आचरणीय धर्म सुप्रतिष्ठित केला. सनातन वैदिक आदर्शांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली.

शंकराचार्य यांनी भारताच्या चार दिशांना असलेल्या चार प्रांतांत धर्मदुर्गांची म्हणजे चार मठांची स्थापना केली. हे चार मठ म्हणजे जणू काही चाही दरवाजांवर उभे असलेले चतु:सीमेचे रक्षण करणारे पहारेदारच आहेत. त्यांच्या रूपाने जणू चार वेदांचा सर्वत्र उद्घोष होत आहे. त्यांच्यामुळे हिंदूधर्माची विजयपताका आज सगळ्या जगात फडकत आहे. एखाद्या दिग्विजयी सेनापतीची राष्ट्राच्या संरक्षणाची योजना असावी, तशीच ही शंकराचार्यांची धर्मनीती आहे. त्यांनी प्रचलित केलेल्या अद्वैत वेदान्ताचा प्रभाव आज भारतात सर्वत्र आढळतो आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात - "अहो, वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी जे लिहिले ते वाचून आधुनिक सभ्यजग विस्मयचकित झाले आहे."

आचार्य शंकर केवळ एक प्रतिभावान दार्शनिकच नव्हते, तर अपरोक्ष अनुभूती आणि तिच्यापासून उत्पन्न झालेली दिव्य प्रेरणा, हेच त्यांच्या जीवनाचे फार मोठे वैशिष्ट्य होते. देहधारी असूनही ते विदेही होते. मानव असूनही ते अमानवी होते. सर्वसामान्य लोकांत वावरत असूनही ते लोकोत्तर होते आणि म्हणूनच ते जगद्गुरू झाले. त्यांनी दिलेला

न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः
चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्।।'

हाच मंत्र आमच्या हृदयात सुप्रतिष्ठित व्हायला हवा. त्यायोगे आम्हाला ज्ञानलाभ होवो, अर्थात स्वरूपप्राप्ती होवो. हिंदू धर्माला पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे एकरूप करणारे एकमेवाद्वितीय आदिगुरु आचार्य शंकर होते. अगदी अल्पवयांत 'जगद्गुरू' सन्माननीय पदवी त्यांनी संपादित केली, खरंतर विशालता कधीच कवेत घेता येत नाही पण या प्रातः स्मरणीय असणाऱ्या दिव्य भव्य महापुरुषाच्या चरणी सादर प्रणाम. 

सर्वेश फडणवीस

Friday, May 3, 2024

सहवासाच्या चांदण्यात 🌠

चांदण्याचा सहवास कुणालाही हवाहवासा वाटतो. पण साहित्याच्या सहवासात हे चांदणं अधिक आशादायक, दिलासादायक, आनंदी आणि स्वच्छंदी असतं यात शंकाच नाही. मध्यंतरी एका छान पुस्तकाच्या प्रवासाचा भाग होता आले ही नक्कीच पूर्वपुण्याई असावी असे वाटते. विजयाताई राम शेवाळकर यांच्याशी रेखा चवरे यांनी साधलेला हा संवाद नुकताच २ मार्चला शेवाळकरांच्या अंगणात दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांच्या हस्ते प्रकाशित झाला. अनेक दिवसांपासून यावर लिहायचे मनात होते. पण आजचा दिवस राखून ठेवला होता. पुस्तक प्रकाशनापूर्वी रेखा ताईंनी वाचायला पाठवले आणि एका बैठकीत पुस्तक वाचून पूर्ण झाले. ८४ पानांच्या या पुस्तकातून विद्यावाचस्पती वक्तादशसहस्त्रेशु राम शेवाळकर यांचे विविध पैलू उलगडून दाखवणारे हे आगळेवेगळे पुस्तक. राम आणि विजया शेवाळकर यांच्या आठवणींची वाक्गंगा म्हणजे हे पुस्तक आहे. रेखा चवरे यांच्या इच्छेला त्वरित होकार देणाऱ्या विजयाताई आणि या सुवर्णसंधीचा फायदा घेत आता अजरामर झालेली ही कलाकृती जन्माला आली.

काही योगायोग हे नियतीने लिहिलेले असतात कारण आज ३ मे नानासाहेबांचा स्मृतिदिवस आणि बरोबर त्याच्याच एक दिवस आधी अर्थात काल २ मे ला विजयाताई शेवाळकर यांनी या जगाचा निरोप घेतला. नानासाहेबांबरोबर प्रत्येक क्षण अनुभवलेल्या, सुखदुःखात नव्हे तर प्रत्येक क्षणी सावली सारखी साथ देणाऱ्या सहधर्मचारिणी असणाऱ्या विजयाताई साहित्याच्या सहवासाच्या चांदण्यात विलीन झाल्या असल्या तरी या पुस्तकातून आणि आठवणीच्या चांदण्यात कायमच स्मरणात राहणाऱ्या आहेत.

अत्यंत देखणे मुखपृष्ठ हे देखील या पुस्तकाचे वेगळेपण आहे. राम शेवाळकर आणि विजया शेवाळकर यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्यावेळी काढलेले हे छायाचित्र आहे. single picture speaks more than a thousand words. This one picture tells its own story. असं म्हंटल तर प्रत्येकाने अनुभवलेले आणि प्रत्येकाला भावलेले असे हे दोघे मुखपृष्ठ बघितल्याक्षणी जाणवतील. खरंतर विजयाताईंना बोलतं करण्याचे फार मोठे काम रेखा चवरे यांनी केले आहे. साहित्याच्या हिमालयात राहणाऱ्या विजयाताई पण त्यांनी सावलीसारखी साथ राम शेवाळकर यांना दिली आणि शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळली. यांच्या संपर्कातील अनेकांनी हा अनुभव घेतला आहे. मुलाखत संग्रहातून विजयाताईंनी मोकळेपणाने आणि आपुलकीने आपल्या संसारातील अनेक चांगल्या गोष्टींचा खजिना वाचकांसाठी यानिमित्ताने रिता केला आहे.

पुस्तक वाचतांना तुमच्या माझ्या अनेकांच्या घरातीलच हे प्रसंग असतील इतके ते सजीव आणि सुंदर आहे पण साहित्याच्या वटवृक्षात त्या कशा बहरत गेल्या आणि अधिक समृद्ध होत गेल्या यासाठी हे पुस्तक वाचनीय आहे. आदरातिथ्य करण्यात या दांपत्याचा हात कुणीही धरू शकणार नाही. जे मिळेल ते स्वीकारण्याची यांची वृत्ती प्रत्येकाला अनुकरणीय आहे. पुस्तकातून नानासाहेबांचे जसे विविध पैलू वाचायला मिळतात तसे विजयाताईंचे पाककलेच्या गुणाबद्दलही वाचायला मिळते.

मुलाखतीच्या शेवटी मुलाखतकार रेखा चवरे-जैन विजयाताईंच्या एकूण प्रवासाबद्दल खूप छान व्यक्त होतात.'सखी, पत्नी, मैत्रीण, शिक्षक, मदतनीस, लेखनिक आणि प्रसंगी आईचीही भूमिका पार पाडत नानासाहेबांना शारीरिक, भावनिक, मानसिक आधार देणाऱ्या, नानासाहेबांशी एकरूप होऊन देखील स्वतंत्र अस्तित्व राखणाऱ्या विजयाताई नानासाहेबांबद्दल भरभरून व्यक्त होतात हे वाचतांना जाणवते. बहुआयामी अशा नानासाहेबांचे विविध पैलू उलगडून कलावंत म्हणून आणि माणूस म्हणून त्याचे जे दर्शन विजयाताईंनी घडविलं ते स्तिमित करणारं आहे. प्रत्येक प्रसंगात मुलगा, सून, नात यांच्यासोबत राम शेवाळकर आणि विजयाताईंचे संबंध किती मोकळे, संकोच विरहित होते याचीही कल्पना येते आणि एकंदरीत शेवाळकर घराण्यातील हे चांदणे त्यांच्या आयुष्यात  येणाऱ्या प्रत्येकाला आनंदी, समृद्ध करणारे आहेत.

वैशाखात जसा मोगरा मानवी मनाला शांतता, शीतलता आणि सुगंधी दरवळ देणारा असतो तसंच काही नानासाहेब आणि विजयाताईंनी शेवाळकर कुटुंबाला आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला सुगंधी अत्तर दरवळणारे क्षण प्रदान केले. वाचकांच्या जवळ आवर्जून संग्रही असावा असा संग्रह म्हणजे सहवासाच्या चांदण्यात.

सहवासाच्या चांदण्यात
मुलाखतकार: रेखा चवरे-जैन
प्रकाशक: विजय प्रकाशन, नागपूर

सर्वेश फडणवीस

Thursday, May 2, 2024

स्वरगंधर्व सुधीर फडके


स्वरगंधर्व सुधीर फडके. १ मे महाराष्ट्र दिन आणि त्याच दिवशी महाराष्ट्रात घडलेले आणि मराठी गीतविश्वाला आपल्या संगीताने जागतिक पटलावर घेऊन जाणारे स्वरतीर्थ सुधीर फडके यांचा बायोपिक बघण्याचा अमृतयोग आला. सुधीर फडके उर्फ बाबूजी तमाम मराठी रसिकांना जीवापेक्षा प्रिय होते. त्यांच्याविषयी सर्व जाणून घेण्याची ओढ आजही मराठी माणसात भरभरून आहे. बाबूजींची संगीतमय कारकीर्द प्रचंड आहे आणि या प्रवासात अनेक किस्से, गोष्टी, प्रसंग असे आहेत, जे सर्वसामान्यांना माहिती नाहीत. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपट १७० मिनिटे पण पहिला मध्यांतर होईपर्यंत वेळ कसा जातो कळतच नाही. बाबूजींचा प्रवास हा अनेकांना ऐकून माहिती आहे कुणी तो वाचला आहे पण प्रत्यक्ष पडद्यावर बघतांना त्यांच्याबद्दलचा आदर अधिक दुपटीने वाढणारा आहे. 

बायौपीकची सुरुवात गाणारे व्हायोलिन म्हणून ओळखले जाणारे प्रभाकर जोग यांच्या इन्स्ट्रुमेंटल मेडलीने होते. तब्बल २६ मूळ बाबूजींनी गायलेली गाणी या चित्रपटाची वेगळी बाजू आहे. एवढी गाणी असून सुद्धा जाणवत नाही इतकी ती त्यांच्या संपूर्ण आयुष्याशी समरस झालेली आहेत हे चित्रपट बघतांना जाणवतं. दूरदर्शनच्या प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात अशोक रानडे यांनी बाबूंजींच्या घेतलेल्या मुलाखतीतून बाबूजींचा जीवनपट उलगडत जातो. लहान वयातच कोल्हापूरमधील बाबूजींची संगीताबद्दलची आवड दाखवणारे प्रसंग छान जमले आहेत. 

प्रतिकूल परिस्थितीशी, जीवाची घालमेल प्रसंगी आत्महत्येचा विचार आणि खिशात पैसे नसतांना होरपळलेले बाबूजी बघितल्यावर अंगावर काटा आला. देशभर अनेक ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम मिळवण्यासाठी झालेले प्रयत्न आणि एका वेळचे जेवणही मिळवताना झालेले कष्ट आणि रडकुंडीला आलेले बाबूजीं, असं काही बघितले की वाटतं आपल्याला प्रसिद्ध व्यक्तींचं प्रसिद्धीच्या यशोशिखरावर असलेले आयुष्य, मिळणारी वाहवा दिसते पण त्यामागची खडतर तपस्या आणि संघर्ष  दिसत नाही. पोटात अन्नाचा कणही नसतांना गाणे गाण्याची जिद्द बघून डोळे पाणावतात. 

चित्रपटाबद्दल अनेकजण लिहितील पण मला भावलेला आणि आवडलेले बाबूजींचे पैलू यानिमित्ताने मांडण्याचा प्रयत्न करतोय. बुद्धिमत्ता, प्रतिभा, कल्पकता आणि इतर प्रांतातील संगीताचा अभ्यास या सर्व गोष्टींचा वापर करून एक वेगळंच युग सुधीर फडके यांनी निर्माण केलं. ज्याचा परिणाम आजही जाणवतो आणि पुढेही जाणवत राहील. प्रख्यात संगीतकार, मनस्वी गायक, प्रखर राष्ट्रभक्त, सावरकरनिष्ठा अशा गुणवैशिष्ट्यांनी युक्त असणारे महाराष्ट्राचे लाडके बाबूजी म्हणजे सुधीर फडके. त्यांच्या बायोपिक मधून जाणवतं की कोणतेही काम एकदा स्वीकारलं की, ते अत्यंत मनापासून आणि अतिशय चांगल्या रीतीनेच करायचं, मग त्यासाठी कितीही कष्ट पडोत, वेळ लागो अथवा पैसे खर्च होवोत; पण चांगलंच करायचं हा त्यांचा स्वभाव होता.

प्रत्येक मराठी माणूस बाबूजींच्या सुरांचा चाहता आहे. त्यांचे सुर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भरून उरले आहेत त्याचा प्रत्येक गायकाने आदर्श ठेवावा आणि प्रत्येक कानसेनाने तृप्ततेची अनुभूती घ्यावी, असं हे सह्याद्रीच्या कुशीतलं हिमालयाची उंची गाठलेलं व्यक्तिमत्त्व होतं. सुरांच्या माध्यमातून ते आपल्यात सामावले असले तरी व्यक्ती म्हणून, कलाकार म्हणून ते कसे होते यासाठी आवर्जून हा बायोपिक बघायला हवा.

सुधीर फडकेंच्या मनात प्रखर देशप्रेम होतं. संगीतकार, गायक म्हणून त्यांना कीर्ती, बहुमान, पैसा मिळाला होता. त्यांच्याजागी दुसरा कोणी असता, तर सुखासीन आयुष्य व्यतीत करण्यात धन्यता मानली असती. पण फडकेसाहेबांची तशी वृत्ती नव्हती. देशाच्या उन्नतीसाठी आपल्याला काय करता येईल, याचा तेसतत विचार करीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दादरा नगर हवेली सशस्त्र क्रांतीचा उठाव कसा झाला यासाठी हा बायोपिक बघायला हवा. 

बायोपिक बघतांना जाणवतं की, बाबूजी या नावाभोवती आजही जे वलय आहे, ते सहज मिळालं नाही. त्यामागे प्रचंड साधना आहे. कष्ट आहेत. जिद्द तर आहेच आहे. शब्दाला सुगम संगीतात किती वजन असतं, ते नेमकं कुठं जाणवू द्यायचे, त्याशिवाय त्यांची एक खासियत अशी होती की, प्रत्येक अंतरा वेगळा त्यात वेगळी, हरकत याची लयलूट असे. गदिमा यांच्या सारख्या असामान्य कवीचे शब्द पुढ्यात आले की भाषाप्रभूला ज्या वेगानं शब्द सुचत, त्याच वेगात बाबूजींच्या चाली लगेच होत असत. ती चालही अशी की, गीताचा आशय अधिक भावपूर्ण असे. सुगम संगीताचा सम्राट म्हणून बाबूजी जगन्मान्य झाले पण रसिक मनाची नाडी सापडलेल्या सुधीर फडके यांनी आयुष्यभर सूर, ताल आणि लय यातच हयात व्यतीत केली असती, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निष्ठा आणि आदर्श स्वयंसेवकत्व कसे असायला हवे यासाठीं हा बायोपिक आवर्जून बघायला हवा. 

नुकतीच रामनवमी झाली. मराठी  रसिकांना गीत रामायणाच्या भक्तिरसात चिंब भिजवणाऱ्या अनेक सुंदर रचना बाबूजीं आणि गदिमा यांनी अजरामर करून ठेवल्या आहेत. ५६ गीतांच्या गीतरामायणाने ६० वर्षांहूनही  अधिक काळ सर्व रसिकांना मंत्रमुग्ध करून ठेवले आहे. गीत रामायणाची जादू आजही रसिकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. त्याचा प्रवास आणि आठवणी यासाठी हा बायोपिक बघायला हवा. 

आधीच्या आणि येणाऱ्या पिढ्यांना भुरळ घालणारी गीत संगीताची निर्मिती करणाऱ्या या मंडळींच्या कामातला सच्चेपणा प्रसंगी सर्वोत्तमाकरिता घेतलेला ध्यास हे सारंच वंदनीय आहे. अनेक  पिढ्यांवर त्यांचं गारुड आहे ते पुढेही चिरंतन राहील. कारण जे अस्सल आहे ते विरत नाही मुरत जातं. एक रसिक आणि संगीत क्षेत्रातला वारकरी म्हणून मी त्यासमोर सदैव नतमस्तक राहीन. आणि याचसाठी 'जगाच्या पाठीवर' असणाऱ्या  प्रत्येक मराठी माणसाने हा बायोपिक आवर्जून बघायला पाहिजे. ग. दि. माडगूळकरांनी सुधीर फडके यांच्यासाठी लिहिलेल्या गाण्यातला केवळ एक शब्द बदलला आणि आयुष्य संगीताला वाहिलेले बाबूजी डोळ्यासमोर उभे रहातात आणि यानेच या बायोपिकचा शेवट होईल. 


या सुरांनो या विरहांतीचा एकांत व्हा, अधिर व्हा, आलिंगने

गाली, ओठी, व्हा सुरांनो भाववेडी चुंबने... होऊनी स्वर वेळूचे

वाऱ्यासवे दिनरात या गात या... या सुरांनो या!


सर्वेश फडणवीस